Tuesday, November 11, 2014

चुकले वाट


गोष्ट तशी रीसेंट आहे

आभाळाकडे निघालेले ढग
चुकूनंच चुकले वाट
मिडीया बिडीया
वेधशाळा बिधशाळा
सगळ्यांनीच चर्चेचा घातला मग घाट
कुणीतरी म्हणे मग
मोठ्ठा यज्ञ केला
मंत्र-बिंत्र म्हणून देवाकडंच
तक्रार‍अर्ज दाखल केला..
मिसिंगची कंप्लेंट
जेव्हा दाखल केली त्यांनी
देव म्हणे पाठवला तर बरोबर होता
काहीतरी घोळ घातलाय कुरियरवाल्यांनी
मी म्हणालो देवाला
चोरला तर नसेल ना कोणीतरी
देव म्हणे, देव तारी त्याला कोण चोरी
आमच्या तोंडचं पार पळालंय बघ पाणी
अशी कशी तू बरोबर पाठवूनंही दिली त्यानं हुलकावणी?
चेक कर की एकदा, पत्ता लिहायला तर नाही चुकलास?
देव म्हणे बास का, एवढाच का तुझा माझ्यावर विश्वास?
मी: तसं नाही रे पण एकदा क्रॉसचेक तर करु
देव: ठिके बाबा, पत्ता सांगायला सुरुवात करु?

पत्ता:
आहे जिथे काळजी, श्रद्धा आपुलकी
दुसऱ्याबद्दल प्रेम आणि खूप सारी माणूसकी
जिथे बोटभरही स्वार्थ नाही
तिथ बरसणं तुझं व्यर्थ नाही
थकली गात्र जिथं
बरस तू जाऊन तिथं
बरस येऊ दे आता पावसाळा
संपव काहीली भिजव आसमंत सगळा..

मी: चं च्च च्च.. पाऊस नाही ना कुरीयरवाले नाही..
पत्ता चुकला तुझाच सगळा...
म्हणूनंच येऊन दाटला बघ पाऊस
माझ्या बळीराजाच्या डोळा.. बळीराजाच्या गळा

के पी आर

सारं सारं संपलं


त्याच्या कापलेल्या गळ्यातून
वाहून गेला...
जातीय सलोखा..
तुटलेल्या हाडा-काडातून
भंगली एकात्मता..
अंगभरच्या वळांमधे
रुतून बसली गुलामगिरी
ऊघड्याच राहिलेल्या डोळ्यामधे
अजरामर झाली भीती
डोळ्यातल्या पाण्यासोबत
वाहून गेली माणूसकी
मंद होणाऱ्या श्वासासोबत
खोल खोल वाढत गेली दरी
विरत चालल्या किंचाळी सोबत
बहिरे होत गेले कान
त्याच्या जीवासारखाच
अकाळी मेला विश्वास
निपचीत पडल्या बेवारस मड्याला
शिवत राहिली अस्पृश्यता
पेपरात आल्या बातमी अन फोटोला
चिकटले निषेध अन राजकीय महत्वकांक्षा
पेटल्या चितेमधे
जळून झाली खाक स्वप्न, ईच्छा, आकांक्षा अन निरागसता

मडकंभर राख मिसळली पाण्यात
.
.
सारं सारं संपलं तरी मागं राहिली जात..

के पी आर

क्षणात सारे बदलले


एकल्या त्या रातीला श्वास तुझा जाणवतो
रित्या रित्या कुशीलाही स्पर्श असा खुणावतो
उरात अडकल्या श्वासांची माळ आता तुटली
दूर थकल्या चंद्रकोरीनं पापणीही मिटली
क्षितीजावरचं चांदणं रात सारी भरकटले
एकाच त्या क्षणात बघ सारे बदलले

पोरका घरादाराचा कानाकोपरा
साद घालतो तुला काळजाचा आवाज कापरा
वेगळी तुझी वाट वेगळाच प्रवास आता
मिट्ट काळोखाला मिठी उजेडाला भीता भीता
आठवणींच्या आभाळात मेघ आसवांचे दाटले
एकाच त्या क्षणात बघ सारे बदलले

अर्ध्यावरती सोडलास हात
मोडला असा डाव..
अनोळखी मलाच आता माझा गाव
सारं सारं मागे ठेऊन तू दिशा बदलली
ध्यानी मनी नसताना उषा अशी काळवंडली...
दिव्याचे वातीशी नाते कसे गं तुटले
एकाच त्या क्षणात बघ सारे बदलले

घट्ट पकडायची धडपड केविलवाणी
विरणारे श्वास अन रंग बदलले रंगांनी
उमजेना मनास आता हे नियतीचे खेळ कुठले
एकाच त्या क्षणात बघ सारे बदलले.. सारे कसे बदलले.

कुणाल
(वाट पाहते तुझी... दारातला हट्टी सडा अन रांगोळी
कसं समजावू त्यांना, आता वाट तुझी वेगळी... एकली)

Dedicated to my Aatya.

आनंद


मी चाललो होतो आनंदाच्या गावी
आनंद मजला शोधत आला
मी मागितला स्पर्श क्षितीजाचा
अन तू सारा आसमंत दिला.

मी पाहिलं ऊगवत्या सूर्याकडे
काळजात त्याचा कवडसा आला
तिन्ही सांजेला शोधते नजर त्याला
तेव्हाच तो चांद खिडकितून डोकावत आला.

मी पाहिला बहर पारीजातकाचा
श्वासात माझ्या तो भरुन आला
अत्तराच्या कुपीची लाही लाही
म्हणे वाऱ्यास हा सुगंध कुठून आला

मी जपलं ज्याला जीवापाड
त्या काळजानंच आज घात केला
दोन डोळ्यात हि धार आली कशी गं
नजरेची कट्यार अन खोलवर हा घाव गेला.

बघू नकोस वळून परत अशी
उरला सुरलाही बघ तोल गेला
स्पर्श कटाक्षाचं मांडताना गणित
हातचा राखायचाच राहून गेला.

भुवयांच्या मधली चंद्रकोरीची बर्फी
अन तिट लावली म्हणे नभाला
मिठीत माझ्या चांदण्याची बरसात
तिथेही साखर पेरणी हवी कशाला.

के पी आर

मोकळं आकाश


काल सारखाच आजचा दिवस
धुकं चिरत वर येणारा सूर्य
अन धुकंच चिरत अंगोपांगी रुतणारी थंडी
बर्फासारख्या थंड पडलेल्या वीजेच्या तारा
महापालिकेनं मागल्या आठवड्यात फांद्या छाटल्यानंतर
एकेक करुन बोडक्या झाडावर उगवणारी पानं
नाही म्हणायला.. माणसांची लगबग तेवढी नाही..
चहाचा वास, भांडी पडल्याचा आवाज
गाडी दामटणं, बस पकडायची घाई..
काहीच नाही..
आज रविवार..
रजई, गोधडी, चादर, शालीत..
साखरझोप आज सगळ्यांची
माणसाला कुठं..
हिंडायचंय वणवण..
रोजंच दोन वेळच्या खाण्यासाठी
पिलाची अंडी घरट्यातून पडण्याची भीती नाही
पर्मनंट घर असल्यामुळे घरट्यावर कुऱ्हाड चालण्याचीही भीती नाही
शिकाऱ्याचे बाण नाहीत
छंदाच्या नावाखाली पारध्याचा पिंजरा नाही..
आजी आजोबा, काका काकू अन झालंच तर डे केअर, पाळणाघरं..
कोणी ना कोणी आहे पिलाकडे पाहण्यासाठी..
पिलावर सापानं झडप घालण्याची सतत भीती नाही
जीव मुठीत घेऊन आकाशाकडे झेपावणं नाही
पण.. माणसाला..
पाश आहेत, आपल्या माणसांचे, नोकरी धंद्याचे अन कशा कशाचे
बंधनं आहेत प्रेमाची अन बेगडी समाजाची
माणसाला जात आहे, धर्म आहे.. रंग दिसण्या बिसण्याचा भेद आहे
माणसाला खरंतर माणूसंच असण्याचा खेद आहे
तुझं स्थैर्य, सुरक्षा, सुबत्ता
तुलाच लखलाभ

माणसा तुझ्याकडे बघून का होऊ मी हताश
एकूणंच बरंय माझंच..
माझं मोकळं आकाश.

के पी आर

काही दिवसांपूर्वी
कधी नाही ते
मॉर्निंग वॉकला गेलो
आजूबाजूला मिट्ट काळोख
आणि घट्ट धुकं
धुकं चिरत..
सूर्याकडे चालत राहिलो
चंद्रासारख्या दिसणाऱ्या सूर्याला
डोळ्यानंच मिठी मारुन
मागे फिरलो
घरात सगळीकडे शोधलं
पण... तू नव्हतीस..
अंदाजानं हातंही पसरले
चारही बाजूला..
पण जाणवलाच नाही तुझा स्पर्श..
घरी येईपर्यंत
धुकं निवळलं होतं आजूबाजूचं
अन साठलं होतं
माझ्या डोळ्यात..

आता मी लख्ख उजाडल्याशिवाय
बाहेरंच पडत नाही

के पी आर

तेव्हा...


तेव्हा...
स्वच्छ धुतलेला, निळ घातलेला पांढरा शर्ट - चेक
कडक ईस्त्री केलेली खाकी पँट - चेक
लेस काढून धुतलेले, पत्र्यावर वाळत घातलेले कॅन्व्हासचे बूट - चेक
चौकातल्या दुकानातून आणलेले आठाण्याचे दोन पांढरे खडू - चेक
ओल्या खडूनं पांढऱ्या बूटाचं केलेलं पॉलिश - चेक
आदल्या दिवशी केलेला केसांचा सोल्जर कट - चेक
कपाटातली स्वेटरची घडी, कपाटातंच ठेवणे - चेक
सकाळच्या थंडीत चकाचक धुतलेली सायकल - चेक
सकाळी पाच वाजता कसलाही गजर न लावता ऊठणं - चेक
पांढरे शुभ्र सॉक्स वर ओढून...
झक्कास कॅन्व्हासचे बूट आणि कडक गणवेश घालून...
सव्वा सहा वाजल्यापासून शाळेत जायला एकदम रेडी - चेक
एका रांगेत शिस्तीनं उभे राहणारे वांड मित्र - चेक
शाळेतलं संचलन - चेक
जन गण मन, वंदे मातरम - चेक
मुख्याध्यापकांचं भाषण कानात जीव ओतून ऐकणं - चेक
मुठी वळून, बेंबीच्या देठापासून "भारत माता की जय" "वंदे मातरम" - चेक
शाळेतलं समूहगीत, गाताना आणि ऐकताना डोळ्यात येणारं पाणी - चेक
गर्वानं फुगलेली छाती, तिरंग्याला ठोकलेला सलाम - चेक
.
.
.
आज...
फेसबूकच्या प्रोफाईल पिकवर तिरंगा - चेक
वॉट्‌स अ‍ॅप, फेसबूकवर स्टेटस चेंज, सगळ्यांना शुभेच्छा - चेक
हॉटेल वीकेंडचा प्लान - चेक
भारत "आज" माझा देश आहे - चेक

भारत माता की जय...
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

के पी आर

आय वॉना बी यूअर अंडरवेअर


नवा ड्रेस..
चकचकीत कॅरीबॅगेतून काढून
चढवला मी अंगावर..
केसावरुन जेलचा हात फिरवत
पाहिलं आरश्यात..
नव्या कपड्याच्या स्पर्शानं सुखावलो
हसलो स्वतःशीच..
कानात ईयर फोन सारत
बाईकला कीक मारली..
ब्रायन अ‍ॅडम्सचे शब्द कानावर पडण्याआधी
स्पीड वाढवला..
पुढच्याच चौकात.. लाल दिवा..
आईचा घो.. गिअर बदलत
ब्रेक मारला कर्रकचून..
चौकातल्या एका कोपऱ्यात
जीर्ण, कळकट..
शाल सर्दृश कापड गुंडाळून
बसलेला म्हातारा..
कोरडा पावाचा तुकडा खाणारी चिमुकली
भांडणारे बहिण भाऊ.. भावंडंच असावी
तोंड हात पाय सगळं तडकलेलं..
डिसेंबर महिना.. बोचरा वारा
त्याच्या शर्टची सगळीच बटनं तुटलेली..
बघता बघता सिग्नल सुटला..
मागच्या गाड्यांचे हॉर्न्स..
समोर दोन नागवी पोरं..आणि
कानात ब्रायन अ‍ॅडम्स,
"आय वॉना बी यूअर अंडरवेअर"...

के.पी. आर

भूक


दिवसभराचं काम, शीण
त्यानंतरचा प्रवास..
आंबून गेलेलं अंग
त्यात ट्रॅफिक..
कारच्या काचेवर टकटक..
१०-१२ वर्षाची पोर
सरावानं तोंड बारीक करत..
काही नाहीये म्हणून हातवारे करणारा मी
चिकाटीनं गाडी पुढे जाईल तशी
पुढे पुढे येणारी ती
बाहेर न बघता..
हातात येईल ती चिल्लर
काच खाली करुन.. हात बाहेर काढला मी
ऐका तर दादा.. पैसे नको
खूप भूक लागलीये..
तिच्या आवाजानं आंतर्बाह्य हललेला मी
तेवढ्यात सिग्नल सुटला
गर्दीच्या दबावाखाली.. माझी गाडी पुढे
.
.
.
येता जाता अजूनंही..
शोधतो तिला त्या चौकात
माझ्या समाधानासाठी..
तिला पोटभर खायला घालावं "एकदा" म्हणून
पण ती परत कधीच दिसली नाही..

माझ्या भरलेल्या ताटांत मात्र
रोज दिसते..
तिच्या डोळ्यातली भूक..

के पी आर

नाकासमोर



रस्त्याच्या कडेनं
तो फिरत असतो..
मान खाली घालून..
काहीतरी शोधत..
जवळ जातो कुणाच्या..
घुटमळतो जरासा..
पाहतो आशेनं
कोणी खाली वाकून
दगड ऊचलतो
कोणी नुसतंच हा....ड म्हणतो
चार दोन दिवसांच्या
संयमानंतर.. भूकेनं सैरभैर होतो
मग गुरकतो कुणाच्या अंगावर
आता रस्त्यावरंही धावतो
आंधळ्यासारखं...
वाऱ्याच्या वेगानं येणारा एखादा
तयार नसतो थांबायला
अन वेगंही कमी करायला
त्याच्यासाठी..
तो उडतो.. रस्त्यावर आपटेपर्यंत जीव जातो...
पोटातली नळी पसरते रस्ताभर...
मागून येणाऱ्या गाड्यांखाली
होतो रक्तामासाचा चिखल
रस्त्याच्या कडेनं जाणारा मी
पाहतो कधी तुमचं कधी माझं
प्रतिबिंब त्या भटक्या कुत्र्यात...
अन सैरभैर न होता..
चालत राहतो असाच "नाकासमोर.."

के पी आर

हि तर सुरुवात आहे..


मागे वळून पाहू नये म्हणे..
का? पहावं कधीतरी...
ना मागे ना पुढे
असंच काहीसं रहावं कुठेतरी
रमावं क्षणभर..
मोजलं नाही तरी जाणवतो ना
गाठलेला पल्ला, चाललेलं अंतर.
विणायचा छंद मला
पण तू,
कधीच उसवू दिलं नाहीस नातं.
ओंजळ भरलेलीच नेहमी
अन काळीजही कधीच नाही रितं
ऊन पावसाचा खेळ तर
चालूच राहतो तसा
पण माझ्या घरट्यावर
आजवर ठेवलास तू सावलीचाच ठसा
माझी नजरंही ओळखतोस तू
अन चाहूलही..
तुझ्यासोबतंच हरेक श्वास माझा
अन प्रत्येक पाऊलही
तसा मलाही कळतोच तुझा ठोका चुकलेला
पण नाकारायचा नसतो तो खंबीरपणा
तुझ्या डोळ्यात दिसलेला
किती झाली रे वर्ष???
आपल्या लग्नाला?
सोड ना.. माझ्या लेखी तरी
अर्थ नाही अशा आकड्यात मोजण्याला
कोणी मोजतं का रे
सूर्याची किरणं, पावसाचा ओलावा
आभाळातले तारे, हवेचा गारवा...
नाही ना.. सोड तर मग
असंच कधीतरी पाहत जाऊ
जरा.. मागे वळून
हि तर सुरुवात आहे..
अजून बरंच चालायचंय आपल्याला मिळून...

के.पी. आर

(तू कविता नाही केलीस तरी चालेल...
मी वाचत जाईन तुझ्या डोळ्यात...
फक्त रोजचा बेड टी मात्र चुकवू नकोस)

तुझीच वगैरे म्हणायलाच हवं का?
बरं... थांबतेही म्हणत नाही.. कारण
हि सुरुवात आहे...

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...