Thursday, October 13, 2011

"आजी जन्माला आली.."






सुरकुतलेलं सर्वांग.. मंदावलेल्या हालचाली
सलणारी असहायता अन काळजातली कालवाकालाव..
सारं काही काळजातंच दडवत ती अंथरुणावर पहुडली
दिसत काही नव्हतं, पण आवाज येत होता..
अधून मधून मुसमुसल्याचा अन सुरकुतल्या गालावरुन वाहणारं पाणी पुसताना
किणकिणनाऱ्या बांगड्यांचा..
डोळ्यातल्या पाण्यानं काल अन आज मधली दरी सांधली तिच्याही नकळत
तेव्हा जाणवलं तिला..
सूनेचा अस्फूट हुंदका ऐकलाच नाही आपण कधी
तिच्या डोळ्यातली आर्जवं.. असहाय्यता..
तिचे हाल.. दुःख..
तिची कुठलीच भावना ना जाणवली ना दिसली आपल्याला कधी..
आपणंच डोळे मिटून आंधाराचा आव आणलेला.
घरात दहा दहा माणसं.. अन समाजसेवेचा टेंभा मिरवल्यामुळे घरात वाढलेली वर्दळ
गुराढोरासारखं कष्ट उपसणारी..
नाक्यावरच्या सार्वजनिक नळकोंडाळ्यावरुन..
एक हंडा डोक्यावर अन एक कमरेवर पाणी वाहणारी.. "सून"
घर-दार, पै पाहुण्यांची उठबस..
सासू सासऱ्यांचे टचके टोमणे
पाऊलो पावली आई बापाचा अन गरीबीचा केलेला उद्धार
सारं सारं तिच्या डोळ्यातल्या पाण्यात तरळलं
अशातंच पोटुशी राहिलेली ती..
लेकाला झालेला आनंद अन...
तिच्या मनावरचं दडपण, "नातूच हवाय आम्हाला"
जीव मुठीत घेऊन दिवस चालले होते
पहिल्या बाळांतपणाचं कौतुक अन डोहाळे पुरवणं तर सोडाच पण..
वाढणाऱ्या पोटासोबत शिव्या अन कामंही कधीच कमी झालं नाही..
अशातंच एके दिवशी पहाटे तिच्या बाळाच्या आवाजानी घर दुमदुमलं
"बर्फी आणा.. बर्फी आणा" आवाज ऐकला तिनं बाहेर
दोन-चार दिवस सगळे आले भेटायला.. बाळाचं कोडकौतुक करायला
पण आजीनं नातीचं तोंडही पाहीलं नाही..
आठवड्याभराचीच ओली बाळांतीण.. पण जुंपली परत कामाला..
सरणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत नात वाढत होती
आजीच्या तिरस्काराच्या बदल्यात आजीवर प्रेमंच करत होती
आईकडूनंच आला होता वारसा..
माया प्रेम आपुलकीचा
मोठ्यांचा आदर अन परीस्थितीच्या जाणीवेचा..
आपसूकंच आजी-नातीचं नातं झालं घट्ट
पुरे करु लागली आजी तिचे हट्ट
वाऱ्यावरच्या म्हातारीसोबत उडत गेला काळ
शाळेच्या गॅदरींगमधे नटणारी नवरी आज खरंच नटली
आजीच्या डोळ्यात तेव्हा अपराधीपणाची सर साठली..
हात जोडून सांगितलं तिनं मुलाकडच्यांना
"सोन्यासारखं लेकरु आहे, जपा तिला.."
डोळ्यातली सर आताही सुरकुतल्या गालावरुन वाहत होती..
वाहता वाहता सांगत होती तिला..
जिच्या आईला आयुष्यभर अन जिला जन्मताच झिडकारलं...
तिच्याचसाठी आज काळीज भळभळतंय..
आता नाही थांबवलं तिनं आसवांना..
मुसमुसणं अन बांगड्यांची किणकिण मात्र थांबली होती
अन तेवढ्यात..
दोन्ही गालावरुन हात फिरला तिच्या..
नातीनं भरल्या डोळ्यानं आसवं पुसली तिची..
आजच्या आंधारात मात्र लख्ख दिसत होत्या तिला तिच्या चूका..
चेहऱ्यावरुन हात फिरवून... लहान लेकरागत भराभरा मुके घेतले तिनं नातीचे..
अन म्हणाली... माफ कर बाळा, आज कळलं मला..
आईच्या पोटात असल्यापासून तुझी केली उपेक्षा
"मुलगाच हवा" आमची अवाजवी अपेक्षा
आमचा द्वेश, राग, तुसड्यासारखं वागणं
तुझे बोलके डोळे, प्रेम, निरागसता अन काळजाला हात घालत हसणं
वेलीवरचं फूल हवं पण वेल खुडायची होती
विसरले होते... तुझ्यासारखीच उपेक्षित तुझी आजीही होती..




तुझ्याकडे पाठ फिरवली, पण.. तू आपलंस केलंस मला
तुझ्यामुळंच हि "आजी" आली जन्माला..


कुणाल प्रकाश रुद्राके

"हाऊसवाईफ नव्हे.. घराची आई"






प्रशस्त हॉल.. दारात रांगोळी
हळू आवाजातली शेहनाई वातावरण अजूनंच मंगलमय करत होती
जोडिला आकर्शक रोषणाई.. फुलांची आरास.. अन
यथोचित आदर सत्कार... हवं काय अजून?
पण तरीही काहीतरी कमतरता होती..
हो.. राहून राहून वाटत होतं त्याला आज "आई" हवी होती
.
.
एरव्ही कधीही फारसा भावनिक न होणारा तो
आज आयुष्याच्या नव्या पर्वात पाऊल टाकताना जरा हेलावला होता..
नेहमी म्हणायचो तो आई गेली नाही.. आहे ती माझ्यासोबत
पण आज.. आज त्याला ती पोकळी जाणवली
साखरपुड्याच्या कार्यक्रमानंतर..
घरी आईच्या फोटोसमोर येऊन उभा राहिला तो..
तिच्या चेहऱ्यावरचा करारीपणा झाकत नव्हता..
तिची जिद्द.. तिची शिस्त..
प्रेम, माया अन आव्हानांना लीलया पेलण्याची ताकद..
घरातल्या प्रत्येक नात्याला.. धाग्याला एकसंध ठेवलं होतं तिनं
ती गेल्यापासून ओकंबोकं वाटायचं घर त्याला
ती आहे.. ती आहे.. उगाचंच समजवत रहायचा तो स्वतःला
माणसं होती घरात पण तो ओलावा हरवला होता
म्हटलं तर सुखही होतंच.. पण...
ती माया, तो स्पर्श... ते वाट बघणारे डोळे...
माफ करणारं काळीज.. ते कान उपटणारे अन पाठ थोपटणारे हात
काय काय मिस करायचा तो..
विखुरलेली नाती... अन सैल होत चाललेली नात्यांची विण...
कशी होईल परत एकसंध...?
मनातल्या मनातंच प्रश्न विचारला त्यानं आईला...
"घर टिकवेल ना गं आई ती? माझी जोडीदाराची निवड बरोबर आहे ना?"
कुणास ठाऊक कसा.. पण
तो करारी चेहरा आज समाधानी वाटला त्याला
आईच्या डोळ्यातलं हसू पाहून कळलं त्याला चुकली नाही आपली निवड..
स्वतःशीच हसला तो अन सेल फोन उचलून मेसेज पाठवला तिला..
"माहितीये मला तुझ्यासाठी किती कठीण आहे हे..
आजवर तळहाताच्या फोडासारखं जपलं ज्यांनी ते आई वडील..
जीवापाड प्रेम केलं ज्यांच्यावर ते बहिण भाऊ..
सगळं सगळं सोडून येणारेस तू ईकडे.. पण..
लेक दुरावणार नाही घराला, त्यांना अजून एक मुलगा मिळेल..
फार अपेक्षा नाहीत माझ्या..
फक्त एवढंच वाटतं सुख-दुःखात समान साथ देशीलंच तू पण..
तुझ्या रुपात माझ्या पोरक्या घरालाही त्याची "आई" परत मिळेल..


कुणाल प्रकाश रुद्राके

ताईडीच्या वस्तू...




रुममधे येताच तिनं सवयीनं लॅपटॉप चालू केला..
हम्म्म्मं.. सवयंच होती तिला..
दिवसभर फोटो काढायची अन त्याच रात्री नेटवर शेअर करायची
ताईच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करायचे होते तिला
पण आज तिच्याही नकळत जुन्या फोटोंचा स्लाईड शो चालू केला तिनं
लॅपटॉपवरची ती बॅकग्राऊंड ईमेज..
रीफ्रेशिंग ब्लू ड्रेसमधे स्कूटीवर बसलेली ती..
फोटो काढताना केवढी रुसलेली ती..
तिच्या रुसण्याचं आता तिला मनापासून हसू आलं..
.
.
रुसायला कारणंही तसंच असायचं
आत्ता रीफ्रेशिंग वाटणार तो ब्लू ड्रेस
खरंतर ताईचा होता..
अन स्कूटीही.. ताईला अ‍ॅक्टिव्हा घेतल्यावर तिला दिलेली
ताईडीचे कपडे कधी आल्टर करुन तर कधी तसेच
ताईडीची पुस्तकं.. खाकी कव्हर्स तेवढे नवे
ताईच्या जुन्या वस्तू तिच्यासाठी नव्या असायच्या
सगळे म्हणायचे... तिला त्या छान दिसायच्या
जाम राग येयचा तिला..
ताईडीचा, तिच्या वस्तूंचा अन...
पार्सलिटी करणाऱ्या आईचा..
त्यामुळं वाटणी करायची ती ताईसोबत..
वस्तूंची, कपड्यांची, जागेची अन कामाचीही
एकाचं कपाटाचेही दोन भाग केले होते तिनं
पण ताईडी अतिक्रमण करुन मिक्स करायची सगळं
वर हसून म्हणायची बहिणींमधे कधी असतं का तुझं माझं असं वेगळं
मागच्याच आठवड्यात ताईडी चिडवत होती तिला...
माझ्यानंतर एका वर्षात हिचं लग्न ठरवा..
माझाचं शालू वापरेल ना... सगळे एकसुरात हसले
हि चिडली.. आदळ आपट करत घराबाहेर पडली
संध्याकाळी ताईचा फोन आला...
अगं ये गं घरी.. आता नोमोअर जुन्या वस्तू..
मीच चालले ना..
चिंगे ये घरी पटकन, मुलाकडच्यांचा होकार आलाय..
आपल्याला साखरपुड्याची तारीख ठरवायचीये..
घरी येता येता आठवलं तिला..
सगळं रुसणं.. सगळी भांडणं
अन आठवलं..
तिनं फोडलेल्या डायनिंग टेबलच्या काचेसाठी तायडीनं खाल्लेला मार
मैत्रिणीची पार्टी, ओव्हरनाईट ट्रिप असो की लायसन्स नसताना गाडी चालवणं..
चालायचा ताईडीचाच वशिला..
कमी मार्क पडले की ताईच्या मागे लपायची ती..
आई डॅडाचा ओरडा खाताना ढाल बनायची ती ताईडी..
तिच्यासाठी रविवारचा मूव्ही, हॉटेलिंगची हौस
नेलपेंट लिपस्टीकच्या व्हरायटीज, पॉकेटमनी
ब्रँडेड कपडे अन चकाचक शूज..
सगळं सगळं करताना स्वतःसाठी मात्र वर्षात दोन तीनंच ड्रेस घ्यायची ताईडी
चूक केल्यावर पहिल्यांदा आठवायची ताई..
चूका पोटात घालणारी व्हायची ती "आई"
ताईडीला सॉरी म्हणून मिठी मारताना गळा भरुन आला तिचा
अन लॅपटॉपवरचा स्लाईड शो पण अचानक धुरकट दिसू लागला...
भानावर येत डोळे पुसले तिने..स्वतःचाच राग आला तिला
कपाट उघडतानाच ठरवलं तिने..
बास झाला आता वेडेपणा.. वाटणी अन हिश्यांचा..
रागारागात कपाटातले ताईचे अन तिचे..
सगळे कपडे सगळ्या वस्तू एकत्र केल्या तिनं
तो रीफ्रेशिंग ब्लू ड्रेस अंगाला लावून भरल्या डोळ्यानं आरश्यापुढे उभी राहीली..
अन आरश्यातंच तिच्या मागे येऊन थांबलेली ताईडी पाहिली...
भरल्या डोळ्यानंच घट्ट मिठी मारली दोघींनी एकमेकीला...
डोळ्यातून आठवणींना स्लाईड शो वाहतंच होता...






कुणाल प्रकाश रुद्राके

To be continued..

"खाऱ्या पाण्याचं गुपित"



आत्तापर्यंत अगणित वेळा कुस बदलून झाली होती तिची...
पण आठवणी झोपू देईनात
डोळ्यासमोर सारखी तिच..
पोटातली तिची चाहूल ते आजवरचा प्रवास
डोळ्यासमोरुन हटेना..
साडी नेसायचा हट्ट करणारी चिमुकली अन..
आज हिरव्या शालूमधे मिरवणारी ती..
ह्यॅ कितीही प्रयत्न करुनही झोप येईना
भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहण्यासाठी तिनं डोळे किलकिले केले
अन छातीशी अल्बम धरुन खुर्चीत बसलेला दिसला तो
लेकीच्या ताटातुटीच्या विचारानं बापाचं काय होतं ते आज जाणवलं तिला
त्याला अजून भावनाविवश होऊन द्यायचं नाही म्हणून तिनं झॊपेचं सोंग घेतलं
डोळ्यात खारं पाणी जमलं तिच्याही...
आसवं थोपवली पण मनाला नाही थोपवता आलं तिला
"ते" गेलंच आपसूक तिच्या "कृष्ण धवल" काळात
.
.
शेणानं सारवलेलं घर, दारात रांगोळी, वीज नव्हती पण...
रॉकेलवरची चिमणी सारं घर लख्ख करायची
दोन वेण्या बांधून फिरणारी ती... शाळा सोडलेले लहान भाऊ, मोठी बहीण
अन घरात शिकणारी एकटी ती
हातावरचं पोट पण कुटुंब होतं सुखी
तक्रार नव्हती गरीबीबद्दल, तिचं तर होती खरी सखी
पण.. एक दिवस.. निमित्त झालं धनुर्वाताचं, अन..
बाप काय असतो ते कळण्याआधीच तो गेला
आधीच तकलादू भिंती अन दैवानं छपरावरंच घातला घाला
सारं गाव हळहळलं पण मायनं डोळ्यातनं टिपूसही नाही गाळला
कुणी म्हणे माधुकरी, कुणी भिक्षा पण पोरांसाठी भिक मागायलाही मायनं मागंपुढं पाहिलं नाही
तुटक्या फरशीवर भाकरी थापायची ती...
चूलीपुढं आसवं लपवायला डोळ्यावर पदर धरायची ती
काय झालं गं माय विचारल्यावर, "सरपन वल्लच हाय, मायंदळ धूर येतोय बाये" सांगायची ती
तेव्हा मायच्या डोळ्यातल्या खारट पाण्याचं गुपित तिला कधीच नाही गवसलं
.
.
थोड्याच दिवसात शिक्षणासाठी मायनं तिला मावशीकडे पाठवलं
दिवस उडून गेले बघता बघता..
मावशीकडून मायचं प्रेम मिळालं शिकता शिकता
मायच्या कुशीत मात्र खेळायचं राहीलं...
शाळा पास झाल्यावर मायनं तिच्याकडं अभिमानानं पाहिलं
एक दिवस माय अन मावशीला बोलताना ऐकलं तिनं
शिकून सवरुन मोठं झालय लेकरु
आता लवकर तिचे हात पिवळे करु
"बिनबापाचं लेकरु आहे, संभाळून घ्या" सासरकडच्यांना सांगत...
मायनं आपल्या वाटची जमिन विकून आणलेले दिड हजार दिले लग्नखर्चासाठी
हुंदका आवरुन मायंला मिठी मारत म्हणाली ती, "बा पण अन माय पण तूच माझ्यासाठी"
माय काहीच बोलली नाही, फक्त तिच्या डोक्यावरुन प्रेमानं हात फिरवला
कुणास ठाऊक कसा पण आताही अगदी तसाच हात तिला तिच्या डोक्यावर जाणवला
डॅडाला "आय विल मिस यू" म्हणून जाताना, तिच्या डोक्यावरुन हात फिरवायला तिची लेक विसरली नाही
पोटच्या पोरीच्या स्पर्शानं मायच्या आठवणीतून भानावर आली आई
पुन्हा डोळे घट्ट मिटून घेतले तिनं
गालावरुन वाहणाऱ्या खारट पाण्यानं कुसंच काय... साऱ्या आठवणींनाही भिजवलं
स्वतःशीच म्हणाली ती, "माय तुझ्या डोळ्यातल्या खाऱ्या पाण्याचं गुपित आज मला गवसलं"

कुणाल प्रकाश रुद्राके

ड्रिम कॉल ते आठवणींचा अल्बम



पाहुण्यांची ऊठबस, मान पान
अन आनंदाच्या भरात हरपलेलं भान
सारं काही भरुन पावल्याचे डोळ्यातले भाव
परकं होणारं आपलंच गाव
ओठावर हसू मनात चलबिचल
खांद्यावर जवाबदारी, काळजातलं प्रेम
सारं काही जसच्या तसं जपून तो रुममधे आला
त्याच्याही नकळत स्टूलावर चढून..
त्यानं कपाटावरचा फोटोंचा जूना अल्बम काढून झटकला
पिवळ्या होत चाललेल्या पानांवर एकेक आठवण दडलेली
पलटणाऱ्या पानांवर वाटे जणू कालपरवाच घडलेली
तिचं निरागस हसू, ते बोलके डोळे
एका हातात घट्ट पकडलेली चोखणी अन...
एका हातानं पैंजणाशी चाललेले चाळे
रांगता रांगता भिंतीला धरुन चालणारी ती
दुडूदुडू धावणारी अन कधी ईथे तर कधी तिथे लपणारी ती
आईचं मेकअपचं सामान अन आरश्यापुढे नटणारी ती
एवढ्या तेवढ्या गोष्टींवरुन कट्टी घेऊन रुसणारी ती
भातुकलीचा खेळ, बाहुलीचं लग्न.. अन जाणवलं त्याला
उद्या हिच्या लग्नाचे फोटो आपण बघत बसू..
कधी आठवणी वाहतील डोळ्यातून तर कधी येतील ओठावर बनून हसू
तिचे पहिले वहिले बोबडे बोल
अन आजचा आवाज अगदी तसच्या तसा वाटायचा त्याला
"डॅडा" झोपला नाहीस अजून? तिच्याच प्रश्नानं तो भानावर आला
त्यानं नकारार्थी मान हलवली अन कसानुसा हसला
त्याच्या गालावर हलकेच ओठ ठेवून म्हणाली ती
"आय विल मिस यू डॅडा..."
स्वप्नात आला होतास तू.. सांगावासं वाटलं तिला.. पण..
त्याच्या डोळ्यात पाणी तरळण्याआधी ती तिथून बाहेर पडली
.
.
.
त्यानं अल्बम बंद करुन छातीशी धरला, अन..
बसल्याजागी शांतपणे मिटले डोळे...
पुन्हा एकदा आठवणींचा अल्बम चाळायला..



कुणाल प्रकाश रुद्राके


To be continued...

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...