Tuesday, May 27, 2014

पाऊस



त्यानं जुनी डायरी काढली
पानं चाळली..
डोळे मिटून ध्यानस्त बसला..
हातातल्या पेनाच्या खटक्याशी खेळला
टेबलावरच्या कोऱ्या पानाकडे पाहिलं
वाऱ्यामागचं ऊन उगाचंच त्याला दिसत राहिलं
ऊनापल्याडच्या पावसाला
सुचेनाच त्याला, कसं आणावं आपल्या आडोशाला
जाऊ दे म्हणत त्यानं..
खिडकितून आत डोकावणारे ढग
साठवले डोळ्यात..
अन पडायला आसुसलेला पाऊस
जरासा गळ्यात
खिडकिच्या काचेवरची पाण्याची नक्षी
त्यानं पानावर वाहिली
कोऱ्या पानाची एकेक रेघ ओली चिंब होत राहिली

त्याचवेळी
फक्त खिडकित बसण्याऐवजी
ती थंड हवेत बाहेर आली
तेव्हाच नेमकी पावसाला "पडायची" लहर आली
तिच्यासोबत भिजण्यासाठी
पाऊस तिला आवर्जून भेटला
ओल्या मातीच्या अत्तरालाही
तिनं पाऊस थोडा वाटला..
भिजलेला वारा तिनं मनसोक्त उरात भरला
थोडासा पाऊस तरीही तिच्या काळजात उरला
उरलेल्या पावसाचं तिनं केलं गाणं
कागदाच्या होड्यांसारखं तिलाही आवडतं
पहिल्या पावसात वाहत जाणं

हवेला कवेत घेताना, तिच्या तळव्यावर
पाऊस कविता करत राहिला..
त्याच्यासाठी तिनंच..
त्याच्या कवितेत दिसणारा पहिला पाऊस
आज आभाळभर लिहिला

के.पी. आर

Thursday, May 15, 2014

दोघं - भाग ९


सगळं आवरुन झालं होतं आज त्याचं आणि ते ही नेहमीच्या वेळेआधीच. असं कधी व्हायचं नाही त्याच्या बाबतीत. नेहमी सकाळची धावपळ ठरलेली असायचीच. आज मात्र अपवाद होता रुटिनला.. त्यानं लॅपटॉपची बॅग उचलली, स्मार्ट फोनच्या स्क्रिनवर बोट फिरवून पाहिलं, कसलेही नोटिफिकेशन्स नव्हते, क्षणभर मोबाईल हातात धरुन थांबला नकारार्थी मान हलवली आणि मोबाईल खिशात ठेऊन दिला. मनगटावर घड्याळ बांधता बांधता काटे उलटे फिरल्याचा भास झाला त्याला. घाईघाईतंच त्यानं बॅग खाली ठेऊन घड्याळाची डायल दुसऱ्या हातानं झाकली आणि घट्ट दाबून धरली, त्याच्या कानात घड्याळाची टिक टिक आणि छातीतली धडधड घुमत राहिली आणि कॅलेंडरची पानं त्याला घेऊन गेली मागे मागे मागे.

त्या दिवशी असंच त्यानं परत एकवार मनगटावर बांधलेल्या घड्याळात पाहिलं होतं. गेल्या आर्ध्या तासात हि कितवी वेळ होती कुणास ठाऊक? घड्याळ हातात बांधलं तरी वेळ आपल्या हातात नसते ती तिच्या चालीनं चालत राहते, ना जरा सावकाश ना वेगानं. कदाचित म्हणूनंच घड्याळ मनगटावर बांधत असावेत मुठित नाही. का कुणास ठाऊक आज इंपेशंट वागत होता तो खूप, सतराशे साठ वेळा घड्याळात बघून झाल्यावर त्यानं वैतागून मूठ गादीवर आपटली पण सेकंद काटा अक्षरशः खूप खाऊन सुस्तावलेल्या अजगरासारखा टिक टिक करत राहिला. मिनिट काटा जसजसा बाराच्या दिशेनं निघाला तशी त्याची धडधड वाढली. त्यानं मोबाईल उचलला, नंबर डायल केला, काऊंटडाऊन चालू झालं होतं कानात वाजणाऱ्या रींगपेक्षाही जोरानं त्याला स्वतःचे ठोके जाणवत होते. पलिकडून फोन उचलला.
ती: हॅलो
तो: ...
ती: हॅलोss
तो: ...
ती: हॅलोsss ओsss.. आता बोलशील का प्लिज.
तो: शू ssss
ती: काय खेळ आहे हा..
त्याच्या मनगटातल्या घड्याळाचा काटा बारावर सरकला आणि
तो: विश यू ऑल द हॅपीनेस ईन द वर्ल्ड. हॅपी बर्थडे लव्ह. लव्ह यू!
ती: (स्वतःशीच हसत) ....
तो: काय गं, पुण्यात का नाही आलीस? मला भेटायचं होतं तुला आज.
ती: तू सुद्धा ईकडे येऊ शकला असतासंच की पण माझ्या बड्डेला मीच येयचं. जा मी येणारंच नाहीये. आय एक्स्पेक्टेड यू टू कम.
तो: हं.. आय डोंट नो नेक्स्ट ईयर
ती: (मधेच त्याला थांबवत) प्लिज आत्ता नको ना तो विषय. तू आज आला नाहीस हे माझ्या आयुष्यभर लक्षात राहिल.
तो: आणि माझ्या सुद्धा. ये ना प्लिज.
ती: ...
पुढचा तीन चार तास तिला वेटींगवर कोणा ना कोणाचे फोन्स येत राहिले, तिनं सगळ्या कॉल्सकडे दुर्लक्ष केलं कि तिला जाणवलेच नाहीत कुणास ठाऊक.
तो: चल लेट झालाय खूप, झोप आता.
ती: (हताश) हो ना खरंच खूप खूप उशिर झाला रे.. तुला वेळेचं महत्व कळलंच नाही कधी. आय विश..
तो: ...
ती: गूड नाईट, किमान स्वप्नात तरी वेळेवर येतोस ते काय कमी.
तो: लव्ह यू!

जरा डोळा लागतो न लागतो तोवर तिचा फोन परत वाजला. डोळे किलकिले करत तिनं उशाशी पडलेला फोन उचलून त्यावर त्याचं नाव पाहिलं, बेडवर पडल्या पडल्या फोन रिसिव्ह केला.
तो: गूड मॉर्निंग. ऊठा.. आज वाढदिवस आपला आळसात घालवू नका.
ती: काय रे झोपू दे थोडावेळ.
तो: साडे सहा वाजले. आणि मला भेटली नाहीस आज मग मी झोपू देणारंच नाही.
तिनं कानाचा फोन काढून घड्याळ पाहिलं, खरचं साडे सहा वाजले होते. पहाटे तीन साडे तीन पर्यंत बोलत बसल्यावर एवढ्या सकाळी मध्यरात्रीचा फिल येणं सहाजिक होतं. फोन परत कानाला लावत ती त्याच्यावर डाफरली.
ती: आला नाहीस ते नाहीस, आधीच वाढदिवस बेकार जाणार माझा त्यात तू झोप मोड कर... आणि यावर डिफेंड करायचा प्रयत्नंच नको करुस तू
तो: काय गं खरंच भेटायचं होतं मला.
ती: ये मग, अजूनंही वेळ आहे. वाशी पुणे जास्त अंतर नाहीये.
तो: येऊ खरंच?
ती: ...
तो: ठिके, तुझ्याकडे अं.. १५-२० मिनिट आहेत. पटकन आवर आणि बाहेर ये. मी पोचतोच.
ती: (झटकन बेडवर उठून बसत, मोठ्यानं) तू आलाएस?
तो: (तिच्या आवाजातल्या आश्चर्यानं सुखावत) हो. पंधरा मिनिट.
ती: (आवाजातलं आश्चर्य न लपवता) खरंच.
तो: (हसतंच) वेडी आहेस का? कसं पॉसिबल आहे मला. आलाएस का म्हणे
ती: (खर्रकन चेहरा उतरला तिचा) जा माझ्याशी बोलू नकोस.

तो: ए ए ए.. फोन ठेऊ नकोस. पंधरा मिनिट.. पटकन आवर. मी आलोय... तुझी शपथ.
ती: (लाडीक रागात) रात्री का नाही सांगितलंस? मला आवरायला वेळ लागेल... डोक्याला तेल चोपडून ठेवलंय मी. फोन ठेव... चल चल चल... मी आवरते पटकन.
पाचंच मिनिटात त्याचा फोन परत वाजला.
ती: तू... खरंच आलाएस.
तो: अगं मी कसं सांगू तुला?
ती: नाही चार तासापूर्वी आपण गप्पा मारल्या आणि..
तो: हे बघ.. दलेर मेहंदीची कॉन्सर्ट आहे ईथे कसली? पुढच्या महिन्याच्या १२ तारखेला? त्याचे होर्डिंग्ज लागलेत.
ती: तुला कसं माहीत.
तो: परत.. शिवनेरी थांबते तिथे नवं हॉटेल झालंय... ब्रिजच्या खाली एकसाईडचा रस्ता बंद आहे.. काम चालूए.
ती: तू हे सगळं पेपरमधे वाचलं असणार.
तो: ठिके आपण नेहमी भेटतो त्या कॅफेमधे व्हॅलेंटाईन डे स्पेशल स्किम चालूए फॉर न्यूली वेड कपल्स. रेड बोर्ड आहे मोठ्ठा.. व्हाईट फाँटमधे लिहिलय, "सेलिब्रेट यूवर टूगेदरनेस विथ अस"
ती: म्हणजे... तू खरंच आलाएस. (तिच्या आवाजातला आनंद त्याला जाणवत होता)
तो: यू हॅव फिफटीन मिनिट्‌स... ग्रेस टाईम दिलाय समज.
ती: (फोन बंद करत) आलेच.

ती येईपर्यंत त्यानं बाजूच्या स्नॅक्स जॉईंटमधून मोठी कॅडबरी घेतली तिला, बाकी सगळे शॉप्स बंद होते. गाडीला टेकून तो आजूबाजूची लगबग बघत राहिला. आर्ध्या तासात ती धावत-पळतंच तिथे आली. एका खांद्यावरुन घसरणारा दुपट्टा सावरत, एका खांद्यावर पर्स अडकवत लांबूनंच पाहिलं त्यानं तिला. जवळ येताच दोन्ही कान धरले तिनं चिमटीत.
ती: सॉरी.. सॉरी.
तो तिच्याकडे बघतंच राहिला. तिच्या खांद्यावरुन पाठीवर रुळणारे ओले केस.. रात्रभर जागरण केल्यानंतरही दिसणारे पांढरे शुभ्र, बोलके डोळे..
रात्री का नाही सांगितलंस? तिच्या आवाजानं तो भानावर आला. तिच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यासाठी त्यानं काहीही केलं असतं, पुणे वाशी प्रवास म्हणजे काहीच नव्हतं त्यापुढे.
तो: तिच्या डोळ्यात डोळे घालून... मग हा सरप्राईज्ड लूक, आवाजातला आनंद आणि हे जीवघेणं स्माईल नसतं मिळालं मला आज.
ती परत एकदा हसली.
दोघही गाडीत बसले, गाडी चालत राहीली लाँग ड्राईव्हसाठी.
ती: कमाल आहेस तू. झोपलाच नाहीस? कसा काय आलास?
तो: कसा नाही येणार. धिस ईज द लास्ट चान्स फॉर स्पेंडींग टाईम विथ यू ऑन यूअर बड्डे. पुढल्या वर्षी... फोन तरी..
ती: नको आठवण करुन देऊस.

त्यांची गाडी गणपती मंदिरासमोर थांबली. दोघंही मंदिरात गेले, तसे ते नेहमीच भेटल्यावर तिथे जायचे. दर्शन घेऊन झाल्यावर ते दोघेही बाहेर येऊन बसले. शहराच्या गर्दीपासून दूर होतं मंदिर कसलीही गडबड गोंगाट नव्हता तिथे. थोडा वेळ बसल्यावर तिनं विचारलं त्याला.
ती: काय मागितलंस?
त्यानं हसून नकारार्थी मान हलवली.
ती: सांग ना
तो: तुला वाटतं तसं काहीच नाही.
ती: ...
तो: मला कशात आडकाठी घालायची नाहिए.
ती: ...
तो: आणि मी आता काहीही मागणंच सोडून दिलंय. मिळत तर नाहीच, कशाला हवी लाचारी?
ती: तू बोलून बघतंच नाहीस. हाच तर प्रॉब्लेम आहे.
तो: ...
ती: ...
तो: पुढल्या वर्षी तू तुझ्या घरी.. तुझ्या नवऱ्याच्या. का झालं, कसं झालं... कारणमीमांसा करण्यात काही अर्थ नाही..
ती: ...
तो: आजचा दिवस तुझ्यासोबत हवा होता.. मिळाला... अजून काय मागू.. काही नको.
ती: आय विश.. मागे जाऊन सगळं बदलता आलं असतं.
तो:जे बदलता येत नाही ते अ‍ॅक्सेप्ट करावं लागतं.
ती: कॉन्टॅक्टमधे रहायला तुला काय प्रॉब्लेम आहे? आपण मित्र सुद्धा राहू शकत नाही?
तो: प्रेम आहे तर राहू दे ना.. कशाला मैत्रीच्या चौकटीत अडकवतेस? आणि मला मागं फिरता येत नाही..
ती: अरे पण..
तो: तू पुढे चाललीएस.. चालत रहा.. माझा प्रवास ईथवरंच.. मी मागे नाही फिरणार पण ईथून पुढेही येणं... शक्य नाही.
ती: म्हणून माणूसंच तोडून टाकायचं?
तो: पण न भरणाऱ्या जखमेचं मूळ मिटवायलाचं हवं ना. आणि ठसठसणारी जखम बनून रहायचं नाही मला तुझ्या डोळ्यासमोर आयुष्यभर.
ती: तू विसरशील?
तो: प्रश्न विसरण्याचा नाहिचे.. प्रश्न असण्या आणि नसण्याचा आहे.. आणि जे ईनएविटेबल आहे ते ओढून ताणून ओरबडून मी का तुला त्रास देऊ? तुमच्या आयुष्यात लुडबूड करत राहण्यापेक्षा तुझ्या आठवणीत राहणं ईज बेटर.
ती: चल निघूया.

त्यानं तिच्या हातावर कॅडबरी ठेवली, म्हणाला तोंड गोड कर माझ्याकडून आणि अशीच गोड रहा आयुष्यभर. ईथून पुढच्या सगळ्याच बड्डेसाठी शुभेच्छा. लव्ह यू..
तिनं कॅडबरी पर्समधे ठेवली, रुमाल काढला आणि हळूच डोळ्याच्या कडा टिपल्या. तो हसला, म्हणाला चिअर अप, आजचा दिवस डोळ्यात पाणी नको आणूस. ती ही हसली.

त्यानं तिला ड्रॉप केलं
ती: थांब ना थोडावेळ अजून
तो: अजून थांबलो तर जाणं कठीण होईल..
ती: आय विश..
तो: खरं सांगायचं तर आय विश टू... बट विशेस डोंट ऑल्वेज कम ट्रू..
ती: ...
तो: काही गाठी सुटत नसतील तर त्या तोडाव्याच लागतात आणि नाही तोडल्या तर त्या आपोआपंच घट्ट होत जातात. नव्या जुन्यांचा गुंता होण्यापेक्षा जुन्या तोडलेल्याच बऱ्या.
लव्ह यू!

त्यानं गाडी वळवली, आरश्यात पाहून खिडकितून हात उंचावत बाय केला. ती गोठल्यासारखी तिथेच ऊभी होती. ईतकावेळ दाबून धरलेलं पाणी डोळ्यातून गालावर आलं त्याच्या आणि त्यानं गाडीचा वेग वाढवला. त्याचा फोन वाजला.. मेसेज तिचाच होता.
ती: विल ऑल्वेज मिस यू. विल चेरीश धिस डे फॉरएव्हर. आय विश आपण दोघेही ईथेच थांबलो असतो ना पुढे ना मागे... पण खरय वेळ कोणाच्याच हातात नाही. तुला मागे फिरायला आवडत नाही आणि मला माणसं तोडायला. अ‍ॅक्सेप्ट ईट ऑर नॉट यू विल ऑल्वेज बी अ स्पेशल फ्रेंड.

त्याच्या घट्ट मुठीतून घड्याळाची टिक टिक अजून तशीच चालू होती, आज एक वर्ष झालं होतं तिच्यासोबत साजरा केलेल्या वाढदिवसाला. तो भानावर आला.. डोळ्याच्या कडांत साठू पहाणाऱ्या पाण्याला मोठ्या प्रयत्नानं अडवलं. तिला किमान मेसेज करावा असं वाटत होतं त्याला पण त्यानं ठरवलं होतं तिच्या लग्नानंतर संपर्क करायचा नाही म्हणून. फोन खिशात ठेऊन तो निघणार ईतक्यात त्याचा फोन वाजला. सवयीनं फोन काढून त्यानं टचस्क्रिनवर बोट फिरवलं, वन मेसेज रिसिव्ह्‌ड.

ती: डोंट वरी डिअर, आय गॉट यूअर विशेस!

तो हसला, फोन शर्टच्या खिशात ठेवला अन त्यावर तळहात ठेऊन म्हणाला... "हॅपी बड्डे डिअर"

के.पी. आर

Saturday, May 10, 2014

आई


#HappyMothersDay
तू तर बोलूच नकोस रे काही, माहितीये तू किती अन कसा बदलला आहेस. वैतागलेली आई त्याला ऊद्देशून मोठ्यानं बोलत होती. आई अगं काय झालंय, काय केलं गं मी आणि काय बदललो कि तुला असं वाटतंय त्यानंही हतबल होऊन आईला प्रश्न विचारला. आई गप्प बसली काहीच बोलेना, तो दोन मिनिट आईसमोर तसाच ऊभा राहिला. त्यालाही शब्दाला शब्द देऊन विषय वाढवायचा नव्हता, मुळात याची सुरुवातंच कशी आणि कुठून झाली हे त्याला कळत नव्हतं. आई तोंड फिरवून खिडकीतून बाहेर बघत बसली, तो बॅग उचलून त्याच्या खोलीत गेला बॅग ठेवली आणि दरवाजा मागची गाडीची चावी काढून आईला म्हणाला, आई मी आलोच जाऊन तासाभरात. आईनं त्याच्याशी नजरा नजर करायचं टाळत, खिडकीतून बाहेर बघतंच हो म्हणून मान हलवली.

दारातली गाडी काढताना त्यानं एकवार खिडकीत बसलेल्या आईकडे पाहिलं, आईची नजर त्याला आरपार छेदून शून्यात रोखलेली होती. गाडी काढून निघाला तेव्हा तो हतबल झाला होता, त्याला राग येत होता आणि खूप वाईट वाटत होतं. राग परिस्थितीचा येत होता की स्वतःचा त्याला कळेना, कारण आई आबांवर चिडणं त्याला जमलं नसतंच कधी. वाईट अन हतबल वाटत होतं कारण त्याच्या, हो त्याच्या स्वतःच्या आई आबांना आज असं वाटत होतं की त्यांचा मुलगा बदललाय. त्याला स्पष्टीकरण द्यायला आवडायचं नाही कधीच पण त्याच्या अशा गप्प बसण्यामुळे गैरसमज निश्चितंच वाढत होते. त्यानं कोणाला बोलून दाखवलं किंवा नाही तरी आई आणि आबा हेच त्याची टॉप प्रायोरिटी होती कायमंच आणि आई आबांनीच आपल्याला ओळखू नये हि गोष्ट त्याला  छळत होती, त्यांनाच वाटावं आपण बदललोय. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, गाडीच्या काचेवर धुळीची पुटं चढल्यागत सगळं दिसू लागलं. शर्टच्या बाहीनं त्यानं डोळे पुसले, डोळ्यातलं पाणी दाबून धरल्यानं दाटून आलेला गळा दुखू लागला. त्यानं गाडी शांतपणे बाजूला घेतली, गाडीतली पाण्याची बाटली काढून तोंड धुतलं अन परत निघाला. पाचंच मिनिटात बायकोला पिक अप केलं त्यानं.

तुझे डोळे असे का दिसताएत आज, तू रड.. तिनं बिचकतंच विचारलं त्याला. तिच्याकडे न बघताच त्यानं म्युजिक प्लेअरचा आवाज वाढवला, मला हे गाणं खूप आवडतं म्हणाला. मी काय विचारलं तुला? ती परत त्याच विषयाकडे वळू लागली तसं त्यानं ओठांवर बोट ठेऊन तिला गप्प बसायची खूण केली आणि म्हणाला एवढं गाणं ऐकू दे मग बोलू. कुणाचं काय तर कुणाचं काय, कशाला कधी महत्व द्यावं हे या बाबाला कधी कळतंच नाही. खिडकीवर कोपर आणि तळहातावर हनुवटी टेकवून ती पुटपुटत राहिली. गाणं संपेस्तोवर त्यानं मनापासून स्वतःला समजावत डोळ्यातलं पाणी रोखलं आवंढा गिळला, मोठ्यानं जांभाई देऊन डोळ्यात पाणी आलंय म्हणत डोळे पुसले. गाणं संपल्यावर तिच्याकडे हसत पाहून म्हणाला, अगं आज मी टू व्हिलरवर गेलो होतो नगर रोडला आणि जेवणंही स्किप झालंय दुपारचं म्हणून चेहरा असा झालाय. तिनं चटकन त्याच्याकडे बघत खरं का म्हणून विचारलं? पुढचं गाणं लागलं आणि त्यानं कॅज्युअली आवाज वाढवला.

तो गाडी पार्क करेपर्यंत ती हॉस्पिटलमधे गेली. तिचं चेक अप होईस्तोवर तो वेटींग एरीयामधे बसून राहिला. बसल्या बसल्या सुद्धा त्याच्या डोक्यात सारखं आईचं वाक्य घोळत होतं, "तू किती आणि कसा बदलाएस माहितीए". ती पाचंच मिनिटात बाहेर आली, त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसली. त्यानं तिच्याकडे पाहिलं तर तिचे डोळे पाण्यानं डबडबले होते. त्याला कळेना हि का रडतेय, छातीतल्या वाढल्या धडधडीसोबत त्यानं विचारलं तिला,

तो: काय झालं अगं बोल तरी, काय म्हणाले डॉक्टर.
ती डोळ्यातलं पाणी न रोखता हसली.
तो अजूनंच बुचकळ्यात पडला.
ती: (ऊत्साहात) मी पाहिलं.. पाहिलं मी.
तो: ...
ती: (गालावर आलेलं पाणी न पुसता) आणि ऐकलं सुद्धा.
तो: ... (कुतुहलाने बघत)
ती: (पाची बोटं जुळवून वेगळी करत खुण करत होती) हलताना दिसलं... आणि अरे धडधड धडधड.. एवढी फास्ट..
तो: ...
ती: (त्याला मिठी मारत) मी फर्स्ट टाईम आपलं बेबी पाहिलं, आय कांट एक्स्प्लेन, नेक्स्ट टाईम तू आत ये सोनोग्राफीला. डॉक्टर सेड एव्हरीथिंग ईज जस्ट फाईन
तो डोळ्यातलं पाणी न रोखता फक्त हसला मनापासून.
ती: तुला न बघता कसं एवढं फिल होतंय?
तो: (मान हलवत) अहं..
ती: सांग ना.
तो: मी आपलं बेबी नाही पाहिलं अजून पण तुझ्या डोळ्यात मला "आई" दिसली.

त्यानं पटकन मोबाईल काढला, नंबर डायल केला...

तो: थोडा बदल झालाय गं.. ईतके दिवस मुलगा होतो फक्त आता बापसुद्धा होणारे. पण आई.. आई कधीच बदलत नाही गं आई. आई आबा तुम्हीच माझी लेकरं आहात आता.
फोन बंद केला, अजूनंही डोळ्यात आनंदाश्रू होते त्याच्या.

तसंच त्यानं बायकोकडे बघून फक्त मान हलवली, मनापासून हसला आणि फक्त म्हणाला
"आई"

के.पी. आर

Wednesday, May 7, 2014

दोघं - भाग ७

आजकाल त्याचं सगळं लक्ष मोबाईलमधेच असायचं. तसं पाहिलं तर त्याला फोन कोणाचेच येयचे नाहीत पण तरीही कुणीतरी खिदळल्यासारखे आवाज करत रींग वाजायची त्याच्या फोनची आणि तो हसत हसत फोनकडे बघायचा अन पटापट काही बाही टाईफ करुन परत वर बघायचा. जेवणाच्या टेबलवरही त्याच्या हातून मोबाइल सुटायचाच नाही. कधी विचार करत, कधी हसत, कधी वैतागून तो त्यात काहीतरी वाचायचा अन उजव्या हातानं जेवण थांबवून डाव्या हातानं काहीतरी टाईफ करायचा. आजूबाजूच्या कोणाचंच आणि कशाचंच त्याला भान नसायचं, आई आबांना हे असलं वागणं बिलकुल रुचत नव्हतं त्याचं. पण आता पोरगं मोठं झालंय असल्या गोष्टीमधे त्याला बोलायला नको असं वाटायचं दोघांना. काहीही असलं तरी पोरगं भानातून गेलंय हे मात्र दोघांनाही कळून चुकलं होतं.


हॉल आणि जेवणाचं टेबलंच काय घेऊन बसलात जेवण झाल्यावर त्याच्या रुममधे झोपायला गेल्यावर निम्म्या रात्रीपेक्षा जास्तवेळ याचं मोबाईल पुराण अखंड चालायचं. रात्रीच्या शांततेमधे अगदी हळू आवाजातली रींगटोन पार शेजारच्या घरातही ऐकू जायची मग घरातल्यांना न समजणं तर दूरची गोष्ट होती. मग एकदा आईनं विचारलंही त्याला की काय फालतूपणा चाललाय? कोणाला एवढी उचकी लागतेय तुझ्या नावाची निम्म्या रात्रीची सुद्धा? त्यावर त्यानं ऊत्तर दिलं होतं अगं मी तर ११ लाच झोपलो होतो, काय बोलतीएस तू?
आई: (सूचक नजरेनं त्याच्याकडे बघत) फोन सायलेंट करुन काही फायदा नाही, व्हायब्रेटर घुरघुरतो रात्रभर.
मग त्याला जाणवलं रींगटोन बंद करावी अन व्हायब्रेटर ऑन ठेवावा तर फोनचं गुरगुरणं सगळीकडेच ऐकू जायचं. नजर चुकवून त्यानं विषय बदलला आणि तेवढ्यापुरती वेळ मारुन नेली.


त्यानंतर मात्र तो फोन पूर्णपणे सायलेंट करुन ठेवू लागला, फोनला सिक्युरीटी कोड आला आणि निर्धास्तपणे तो झोपायला जाईपर्यंत फोन कुठेही पडू लागला त्याचा. रात्री मात्र फोन सायलेंट करुन मेसेज मेसेज खेळायचे ते दोघं. २-३ वाजत आले की त्याला झोप येयची, आधी झटपट रीप्लाय करणारा तो मग तीन तीन - चार चार मिनिट होईपर्यंत रीप्लाय करायचा नाही.

ती: झोपलास का?
तो: नाही नाही.. उद्या मूव्ही ला जाऊया, गेस्ट सेमिनारंच तर आहे, व्हॉट से?
आता तिचा रीप्लाय येईपर्यंत झोपी जायचाच तो पण मग तिला कळू नये म्हणून फोन बंद डोळ्यावर ठेऊन द्यायचा. तिचा रीप्लाय आल्यावर बॅकलाईट ऑन व्हायची अन त्याला जाग येयची. हा असा खेळ ती झोपी जाईपर्यंत चालायचा.

दिवस दिवस एकत्र घालवून आणि रात्रभर एसेमेस नी जागवूनही दोघांनाही नक्की माहीत नव्हतं की आपल्यात नेमकं नातं काय आहे.
आपण बेस्ट फ्रेंड्‌स आहोत, की त्यापेक्षा जरा जास्तं की आपल्याला फक्त एकमेकांची सवय लागलीये खूप. सगळंच कन्फ्युजिंग होतं जाम.
तिला मी आवडतो कि ती माझ्याशी मोकळ्या मनानं फ्रि वागते खूप आणि वेगळा अर्थ आपणंच काढतोय? ती हिंट देतेय आपल्याला की आपणंच मनाचे मांडे रचतोय? कि तिनंही मनोमन हे अ‍ॅक्सेप्ट केलंय.
हां.. विचार करुन करुन त्याच्या डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली होती. त्याचं बाकी कशातंच लक्ष लागेना. ती कॉलेजला येणार नसेल तर त्याला ते ८-१० तास खूप जड जाऊ लागले, दुसरं कोणी तिच्याशी जवळीक करत असेल तर उगाचंच जेलस फिल होऊ लागलं. एक दोनदा त्यानं कॉलेज बुडवून पाहिलं, वाटलं त्याला कि ती मिस करेल आपल्याला पण तसं काहीच झालं नाही. खूप वाट पाहून पाहून त्यानंच मेसेज केला तिला अन तिचाही त्यावर जुजबी रीप्लाय.  आता त्याला बिलकुलंच कळेना हे काय होतंय. त्याला आता हा सस्पेंस ब्रेक करायचा होता, बाकी सगळ्याच गोष्टी, सगळेच रीलेशन्स आता अफेक्ट होऊ लागले होते. त्याला हे बिलकुल सहन होईना, आतल्या आत त्याची घुसमट चालू होती, ना धड ईकडे ना तिकडे च्यायला लिफ्ट मधे असताना अचानक लाईट जाऊन आर्धा वरच्या न आर्धा खालच्या मजल्यावर अडकून पडावं अशी अवस्था झाली त्याची. तिच्या मनात नेमकं काय आहे हे त्याला आता माहिती करुनंच घ्यायचं होतं, हो तर हो.. आणि नाही तर... नाही.. आर या पार

 त्यानंतरही बरेच दिवस त्याची विचारायची हिंमत होईना, अगदी जीभेवर आलेले शब्द मागे फिरु लागले. त्याच्या वागण्या बोलण्यात एवढा अडखळलेपणा कधीच नव्हता. एक दिवस कॉलेज सुटल्यावर त्यानं हिंमत करुन सांगितलं तिला.
तो: मला बोलायचंय तुझ्याशी.
ती: (बाकिच्या ग्रुपसोबत टवाळक्या करत) बोल ना..
तो: असं नाही.. फक्त..
ती (अजूनंही बाकिच्यांमधेच दंग.) ...
तो: मी तुझ्याशी बोलतोय.
ती: (बेफिकिरपणे) अरे हो मी सुद्धा बोलतेच आहे की. बोल ना.
तो: (जरासा वैतागून) तुला म्हणालो ना असं नाही म्हणून.
ती: (त्याच्याकडे न बघता, समोरच्या मित्राशी बोलत बोलतंच) अरे मग कसं?

त्यानं ग्रुपमधल्याच एका मित्राला विचारलं तू सोडशील का तिला जाताना? तो हो म्हणताच हा तिच्याकडे न बघता सगळ्यांना ऊद्देशून बाय म्हणून चालू लागला. ती त्याच्या पाठोपाठ आली.

ती: (काहीच न झाल्यासारखं) काय रे काय झालंय काय तुला आजकाल?
तो: (वैतागून) काही नाही, वेड लागलंय.
ती: अरे असं काय करतोएस?
तो: जा ना तू बिझी आहेस फार..
ती: तू कुठे चाललाएस पण?

मला उशिर झालाय म्हणून ती काही बोलायच्या आतंच त्यानं गाडी काढली. ती मागे बसली, तिला ड्रॉप करेपर्यंत दोघांनीही तोंडातून चकार शब्द नाही काढला. गाडीवरुन उतरताना ती फक्त त्याला सॉरी म्हणाली, तिला माहीती होतं तिनं जाणूनबुजून त्याच्या बोलण्याकडे मगाशी दुर्लक्ष केलं होतं. तो वैतागलेला असूनंही तोंडदेखलं हसत काहीही न बोलता निघून गेला.

त्यानंतर ते दोघेही एकमेकांशी जरा अंतरंच राखून वागले, बऱ्याचदा ती सगळेच लेक्चर अटेंड करु लागली. तोही काही ना काही कारणं सांगून कट्ट्यावर बसणं टाळू लागला, भेटणं टाळू लागला. पण अशा वागण्यानं प्रश्नाचं ऊत्तर मिळणार नव्हतं उलट ते दोघंही प्रश्नालाच बगल देत होते.त्याला या आधांतरी जगण्याचा कंटाळा आला होता, एक दिवस त्यानं मनाची तयारी करुन ठरवलं आज बोलायचंच. त्यानं मेसेज टाईप केला चार चारदा वाक्य शब्द चेक केले.. डिलीट केले.. परत लिहिलं.. आर्धा तास मोबाईल तसाच हातात ठेवला आणि शेवटी तिला मेसेज पाठवला.

तो: I can't take it anymore.. मला तुझ्याशी बोलायचंय. आत्ता.. इग्नोअर करु नकोस प्लिज.
ती: प्लिज आपण नंतर बोलूया? दोन आठवड्यात आपली फायनल एक्झाम आहे आणि I don't want to get in to... प्लिज समजून घे.. मी फेल होईन.
तो: तुला आयडीया आहे मी काय बोलणारे?
ती: म्हणूनंच म्हणतेय, थोडा पेशन्स ठेव. मी फेल होईन.. मला फेल नाही होयचं रे.
तो: I care a damn about exam. मला आत्ता बोलायचंय. नाही बोललो तर मी फेल होईन.
ती: ...
तो: एकतर आज नाहीतर कधीच नाही. Choice is yours.
ती: ...
निम्मी रात्र त्यानं तळमळत काढली.. मग कधी झोपी गेला ते त्यालाच कळलं नाही. पहाटे साडे तीनला तिचा मेसेज आला.
ती: बोल, एम रेडी टू हिअर..
तो खडबडून जागा झाला, त्यानं बराच वेळ विचार करुन मेसेज लिहिला..
तो: I think I have started liking you... Love, Like.. Like Love.. बराच विचार करुन शेवटी त्यानं Like लिहिलं.
ती: I knew.. तू हेच बोलणार...
तो: ?
ती: Please don't get in to this.. मला सुद्धा हिच भीती आहे.. I have started liking you too.. पण
तो: पण काय..
ती: I don't want to go beyond this.
तो: पण का? I really love you... (हिम्मत करुन शेवटी "Love" लिहिलंच त्यानं)
ती: I don't want to get in to this. We are friends & will always be. तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस.
तो: ठिके.. मी परत हा विषय परत कधीच नाही काढणार. Promise me आपली मैत्री यानं अफेक्ट नाही होणार.
ती: Promise :)


दोन चार दिवस असेच गेले त्यानं तो विषय परत नाही काढला, साधी हिंट सुद्धा नाही. वरवर कितीही प्लेन वागला तरी त्याचं त्यालाच कळत होतं आतमधे त्याची अवस्था काय होतेय ते. मग एक दिवस कॉलेज सुटल्यावर ती म्हणाली त्याला, "चल ना मस्त कुठेतरी चक्कर मारु एक, कि तुला घरी जायची घाई आहे". ऊत्तरादाखल त्यानं बाईक चालू केली आणि तिला फक्त बसायची खूण केली. सिटीच्या ऐन मध्यवस्तीमधे एक ब्रिज होता तिथून सनसेट मस्त दिसायचा. सनसेट बघून दोघेही निघाले, गाडीवरच्या २०-२५ मिनिटांच्या प्रवासात एक चकार शब्द नाही काढला दोघांनी. त्यानं तिला घराबाहेर ड्रॉप केलं आणि निघणार एवढ्यात.
ती: थांब ना..
तो काहीही न बोलता थांबला, तिच्याकडे फक्त पाहिलं.
ती: (लाजून) असं नको ना पाहूस.
त्याची प्रश्नार्थक नजर.
ती अजूनंच लाजली, त्याच्या बाईकच्या बटनाशी खेळत त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली.
तो: काsssय.
तिनं फक्त काही नाही म्हणत मान हलवली आणि हसली.
ती त्याच्याकडे बघणं टाळत होती, त्यानं बाईकला किक मारली आणि म्हणाला चल मी निघतो.
ती: (घाईगडबडीत त्याच्याकडे बघून) थांब ना रे..
त्याला तिचं विचित्र वागणं कळेना, गाडी तशीच चालू ठेऊन तिच्याकडे एकटक बघत तो बोलला.
तो: काय ते पटकन बोल ना, साडे सात वाजत आले.
तिनं परत एकदा त्याच्याकडे बघणं टाळलं, मान खाली घालून नकारार्थी हलवली, गालातल्या गालात हसली परत, मागे वळून जाऊ लागली आणि जाता जाता पाठमोरीच बाsssय म्हणाली.
ती घरात निघून गेली तरी तो तिथेच उभा होता. त्यानं गाडी बंद केली आणि तिला मेसेज पाठवला.


तो: Thanks.. Thanks a lot!
ती: पण कशासाठी..?
तो: तुला जे बोलली नाहीस ना त्यासाठी. आता होकाराचा रिप्लाय नाही केलास तरी चालेल. "I love you" :)


के.पी. आर

Sunday, May 4, 2014

दोघं - भाग ६


आज दिवसाची सुरुवात मस्तं झाली होती. बऱ्याच दिवसांनी तिला उशिरापर्यंत झोपायला मिळालं होतं, आज ना सकाळचा अलार्म होता, ना घाईघाईत उठून आवरायचं होतं, ना धावत पळत ऑफिसची बस पकडायची होती, ना कुणाचे फोन, अन आलेच तर तिला कळणार नव्हतंच कारण आदल्या दिवशी झोपतानाच तिनं  फोन सायलेंट करुन ठेवला होता. तिला जाग आली तेव्हा डोक्यावर पंखा गरागरा फिरत होता आणि जमिनीवर गरमंच हवा फेकत होता. त्याचाही नाईलाजंच होता म्हणा, टेंपरेचरंच एवढं वाढलं होतं की सकाळी सकाळी घामाच्या धारा लागत होत्या. पण तिनं गरम हवा, वाढलेलं टेंपरेचर आणि अकार्यक्षम पंखा असल्या फुटकळ गोष्टींकडे आज दुर्लक्षंच केलं होतं, कसल्याही क्षुल्लक कारणावरुन चिडचिड करुन तिला सुट्टी वाया घालवायची नव्हती. तिनं उठून पहिल्यांदा पडदे बाजूला करुन खिडकी उघडली आणि दिर्घ श्वास घेतला. कुणीतरी नुकतंच कुंड्यांना पाणी घातलं होतं. ओल्या मातीचा वास उरात भरुन घेत ती मनापासून खुश झाली, तिला हवी तशीच दिवसाला अगदी परफेक्ट सुरुवात झाली होती.
ती तिच्याच नादात "पुरा~~ लंडन ठुमकदा" गाणं म्हणत हॉलमधे आली. तिच्या गाण्याची चाल ओरीजनल गाण्याच्या किंचितही जवळपास सुद्धा जात नव्हती पण ती असं गाणं म्हणतेय म्हणजे ती चांगल्याच मूडमधे असणार हे त्याला पक्क ठाऊक होतं. ती हॉलमधे आली तेव्हा तो किचेनमधे तिच्यासाठी ओट्‌स बनवत होता, तिची चाहूल लागताच मागे वळून न बघता मोठ्यानं अन मोठ्या प्रेमानं गूड मॉर्निंग म्हणाला. ती अजूनंही हॉलच्या खिडक्या उघडत तिच्याच नादात "हंगामा हो गया" म्हणत होती.
तो: (आता मागे बघत) ओय क्वीन, गूड मॉर्निंग.
ती: (हातानंच काय म्हणून खुणवत) गूड मॉर्निंग. काय अजून घरी तू?
तो: (तोंड वाकडं करत) हो ना मला जेलस फिल होतंय, तू घरी आराम करणार आणि मी.. असो
ती: (चिडवल्यासारखं हसत) जा जा.. दर सॅटर्डेला तुला सुट्टी असते आणि मी ऑफिसला जाते तेव्हा?
तो: ...
ती: (लाडात) ए.. ऐक ना, तुला आज सुट्टी नाही काढता येणार? जायलाच पाहिजे का?
तो: (वाकुल्या दाखवत) आता का? हा??
ती: ए सोड ना चेष्टा.. चल कुठेतरी जाऊया मस्त, एखादा पिक्चर बघू.. टू स्टेट्‌स आलाय.
तो: ...
ती: ओय, चल की काय भाव खातोस, मी दाखवते मूव्ही..
तो: ना~~ही.. शक्य नाही आज
ती: बर चल लंच पण.. तोही मीच देते.. अब बोलो..
तो विचार केल्यासारखा चेहरा करुन काही बोलणार एवढ्यात
ती: अब आया ऊट पहाड के नीचे.. चल मी आवरु पटकन.
तो: (ओट्‌सची डिश तिच्यासमोर ठेवत) सॉरी.. नॉट पॉसिबल. एम.डी सोबत अपॉइंटमेंट आहे माझी.
ती: (हवेत हात उडवत) जा जा..
तो: बाय..
ती: ...
तो: बा~~~~य..
ती: (नाराजीनंच) बाय.
तो जातो न जातो तेवढ्यात तिचा फोन वाजला, मेसेज त्याचाच होता.
तो: सॉरी, आज खरंच पॉसिबल नव्हतं. उद्या एकदम लवकर येतो.
ती: :( एनीवेज ड्राईव्ह सेफली..
तो गेल्यानंतरचे दोन तास  आळसात, आवरण्यात, कपाट लावण्यात गेले तिचे. आज सासू सासरे सुद्धा एका लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. दुपारचं जेवण एकट्यानं करायला नको वाटायला लागलं तिला, रोजं ऑफीसमधे काय घरचे सोबत नसायचे पण तरीही घरी कसं सगळे असल्याशिवाय बरं वाटायचं नाही तिला. आणि तो ही नेहमीच म्हणायचा, "असली मजा सब के साथ". तसंही सकाळी त्यानं केलेले ओट्‌स खाल्ले होते तिनं आणि जेवणंही कमीच होतं तिचं, मग काय टिव्ही बघत काहीतरी सटरफटर खाल्ल तिनं. टिव्हीवरंही फारसं काही बघण्यासारखं नव्हतं. तिनं वैतागून घड्याळाकडे पाहिलं, दुपारचे साडे तीन वाजत आले होते. आळोखेपिळोखे देत तिनं झोपायची तयारी केली, टिव्हीचा टायमर लाऊन मस्त ताणून दिली. झोपेतून उठल्यावर, सगळ्या घरातल्या लाईट्‌स लावत देवापुढे दिवा लावला तिनं, रामरक्षा म्हटली. आपसूकंच प्रसन्न वाटू लागलं तिला. तसं फार मोठं घर नव्हतं त्यांचं; टेरेस, पार्कींग वगैरे पकडून २५०० वगैरे स्क्वेअर फिट असावं. दिवसा फारसं काही नाही वाटायचं पण रात्री खूप एकटं एकटं वाटायचं, एकट्याला तसं नकोच वाटायचं पण आज ईलाजंच नव्हता. बाहेर जाऊन भाजी, फळं आणावी असं वाटत होतं तिला पण दिवे लागणीला दार बंद करुन जायची ईच्छा होईना मग हॉलची मोठी खिडकी ऊघडून ती बाहेर बघत बसली. बाहेरचा सगळा गोंगाट आत आला, गाड्या, हॉर्न्‌स, लाईट्‌स, लोकांचे आवाज आणि गा~~र वारा. ती तिच्याच नादात बाहेर बघत बसली. बराच वेळ तिथे बसल्यानंतर तिला त्याचं बोलणं आठवलं, "खिडकी बंद ठेवत जा रे तुम्ही लोकं, त्या आवाजानं डोकं उठतं माझं", खिडक्यांशी त्याचं काय वाकडं होतं कुणास ठाऊक, हॉल, बेडरुम कुठेही तो आला की पहिल्यांदा खिडकी बंद करायचा आणि ती आली कि पहिल्यांदा खिडकी उघडायची. चालू बंद चा हा खेळ रोजचा होता. आज मात्र खिडकी बंद करायला तो घरी नव्हता, तिनं स्वतःशीच हसत खिडकी बंद केली आणि त्याचा फोन आला.
तो: काय करतीएस?
ती: काय करणार, खिडकीमधे बसले हॉलच्या.
तो: डोकं नाही दुखत का गं तुमचं त्या गोंगाटानं? झोपायच्या आधी खिडकी बंद कर बर का.
ती फक्त हसली.
तो: हसू नकोस, काळजी वाटते म्हणून बोललो
ती: (त्याला चिडवत) ओहो, काळजी आहे तर मग जायचंच नाहीस ना, एकटीला सोडून.
तो: नसतो गेलो गं पण काय करणार कंपनी माझ्या पप्पाची नाही ना.
ती: आणि हो सासऱ्याचीही नाही, बिच्चारा तू.
तो: (कुत्सितपणे हसत) ते सोड, काय केलंस आज?
ती: काहीही नाही. आज माझा एक ऊनाड दिवस होता.
तो: जेवलीस की नाही?
ती: खाल्लं सटरफटर..
तो: ...
ती: नाही झाली माझी ईच्छा एकट्यानं खायची.
तो: ...
ती: असं काय करतोस.
तो: ...
ती: मग मला न्यायचं होतंस.
तो: तुला माहीतीये ते शक्य नव्हतं.
ती: मग सोड तर.
तो: आता नीट जेवणारेस तू.
ती: ...
तो: मी काय बोलतोय.
ती: बघू..
तो: बघू नाही.. नक्की.. समजत नाही का तुला?
ती: तुलाच समजत नाहीए..
तो: अगं असं काय
ती: एवढं मोठं घर आपलं, मी एकटी, रात्र.. नाही ईच्छा होत.
तो: (हसत) तुला भीती वाटतीये.. सोडून बोल.. मला नको सांगूस.
ती: हंम्म्म.. भीती नाही.. एकटं वाटतंय.
तो: ...
ती: कसा रे तू, कशाला गेलास मला एकटीला सोडून? आता मला झोप नाही येणार.
तो: पण तू एकटी कुठे आहेस.
ती: (फणकाऱ्यानं) आता फालतू फिल्मी डायलॉग्‌ज मारु नकोस. माझ्या आठवणी आहेत ना वगैरे..
तो: ना~~ही...
ती: मग
तो: ज्युनिअर मी आहे ना तुझ्यासोबत
ती: पोटावर हळूवार हात ठेवत हसली स्वतःशी.
तो: एकटा तर मी आहे.
ती: ...
तो: बेडटाईम स्टोरी सांग बेबीला.
ती: चल फोन ठेव. आम्हाला डिस्टर्ब होतंय.
तो: टेक केअर. मुआह टू पिल्लू.
ती: गूड नाईट.
फोन कट करत तिनं त्याला मेसेज पाठवला
ती: आय लव्ह यू.
बेडवर येऊन पडली, पोटावर हात ठेवून बोलू लागली
ती: एक होती चिऊ, एक होता काऊ... चिऊचं घर होतं मेणाचं...

के.पी. आर

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...