Monday, December 5, 2016

काय बिनसलंय


गेल्या बऱ्याच दिवसांपासून मी विचार करतोय की नेमकं काय बिनसलंय. म्हणजे बघा गेल्या कित्येक वर्षापासून, म्हणजे जसं कळतंय तसं... म्हणजे जवळपास १९९७ पासून काँग्रेसच्या कामाचा कंटाळा वगैरे आला होता. आणि यूपीएच्या शेवटच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात तर कळसंच झाला होता. दिवसेंदिवस त्यांचा कारभार बघून पराकोटीचा राग, चिडचिड, तिटकारा, वैताग वगैरे वगैरे वगैरे काय म्हणता येईल ते झालं होतं. मनमोहनसिंग स्वतः कितीही चांगले किंवा ज्ञानी आहेत याची खात्री असली तरीही ते पंतप्रधान असताना त्यांच्यावर सडकून टिका करायची एकही संधी मी सोडली नाही. राहुल गांधीला पप्पू म्हणून हिणवाण्यातही धन्यता मानली. राज ठाकरे, नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे वगैरे "सद्‌गृहस्थांनी" काँग्रेसच्या मंडळींची जाहीर सभेत उडवलेली खिल्ली बघून खो-खो हसलोय. 

बरं... एवढंच नाही, झालंच तर जनलोकपाल का काय ते आंदोलन होतं ना त्यामधून नेमकं काय साध्य होणारे याची पूर्ण कल्पना नसताना मीच काय आपल्यातल्या कित्येकांनी त्याला पाठींबा दिला आणि त्याला कारण एकंच की हा आवाज प्रस्थापितांविरुध्द आहे, काँग्रेसच्या निर्लज्ज राजवटीविरुध्द आहे आणि ज्या पातळीवर हे आंदोलन पोहोचत होतं ते पाहता वर्षानुवर्ष काँग्रेसच्या चिखलात रुतलेल्या आपल्याला ती सत्ता उलथवून टाकायची सुवर्णसंधीच मिळतीये असं मला वाटत होतं. अब कमल खिलेगा असं मनापासून वाटू लागलं होतं. काँग्रेस विरोधक म्हणजे भाजप  समर्थक असणं हे एक सहाजिक समीकरण होतं आणि वर्षानुवर्षे माझा उघड उघड पाठींबा भाजपलाच होता. अटलजी सक्रीय राजकारणात असताना ते पंतप्रधान व्हावे ही एकंच तीव्र ईच्छा मनात होती. १९९७ सालच्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसला राम राम ठोकून पुणे विकास आघाडी स्थापन करत पुण्यातून लोकसभेच्या रींगणात ऊतरलेले सुरेश कलमाडी, त्यांना भाजपनी दिलेला पाठींबा अजूनंही लक्षात आहे माझ्या. गेल्या कित्येक वर्षाचा काँग्रेस विरोध विसरुन फक्त अटलजींसाठी फर्स्ट ईयर डिप्लोमाची परीक्षा वगैरे वाऱ्यावर सोडून च्यायला रस्त्यावर उतरत अगदी सुरेश कलमाडीसारख्या माणसाचाही प्रचार केला होता तेव्हा. त्यानंतरचं अल्पमतातलं सरकार १३ दिवस टिकलं मग परत एकदा १३ महिने आणि मग कडबोळ्याचं म्हणजेचं एकेकाचा टेकू घेत का असेना भाजपचं सरकार आलं. तेव्हा मोठ्या आनंदानं आणि तावातावानी बोंबलत फिरलोय, "अब की बारी, अटल बिहारी".

अटलजींच्या कार्यकाळात २००२ साली झालेलं गोध्रा हत्याकांड, त्यानंतर उसळलेल्या दंगली, जाळपोळ, देशभरातल्या मेडियानी या घटनेची घेतलेली दखल आणि अटलजींनी नरेंद्र मोदींना राजधर्म पाळून मुख्यमंत्रीपदावरुन पायऊतार होण्याचा दिलेला सल्ला. सगळ्याच घटना कशा आजंही अगदी काल-परवा घडल्यासारख्या वाटतात. ईतका प्रभावशाली माणूस मुख्यमंत्री असताना त्याला कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता अटलजींनी दिलेला राजधर्म पाळण्याचा सल्ला, म्हणजेच चूक कोणाची का असेना न्याय करण्याची वृत्ती आणि सर्व जनमानसात "अजातशत्रू" म्हणून असलेली त्यांची प्रतिमा, या सगळ्यानंतर माझं भाजपला समर्थन नसतं तर नवल. धार्मिकता हा ज्यांच्या राष्ट्रीय राजकारणाचा पाया होता अशा जहाल अडवाणींनी फक्त धर्माच्या आधारे मोठं यश संपादन करता येणार नाही हे लक्षात येताच अटलजींच्या मवाळ चेहऱ्यालाच भाजपचा चेहरा म्हणून प्रमोट केल्यानं त्यांच्या धार्मिक कट्टरतेकडेही कानाडोळा करायला जमलं होतं मला. आणि अटलजींच्या नेतृत्वाखाली काही अंशी चांगले बदलही घडत होते. तर सांगायचा मुद्दा हा की या सगळ्या गोष्टीमुळे माझा अगदी मनापासून भाजपला पाठींबा होता. मतदानाचा अधिकार मिळाल्यापासून मी कधीच भाजप सोडून कोणत्याही दुसऱ्या पक्षाला कधीच मत दिलं नाही. चांगली कामं केल्यानंतरही १३ मे २००४ ला लोकसभा निवडणुकीत अटलजींच्या भाजपला अनपेक्षितरीत्या पराभवाचा धक्का बसला होता आणि त्यानंतरची दहा वर्ष भाजप सत्तेवर परत येण्यासाठी मी चातकासारखी वाट पाहीलीये.

अटलजींच्या राजकीय संन्यासानंतर आणि प्रमोद महाजनांच्या अपघाती निधनानंतर काँग्रेसच्या वर्षानुवर्ष रुळलेल्या सत्तेला आव्हान देऊ शकेल असा चेहराच राष्ट्रीय राजकारणात उरला नव्हता. अडवाणींच्या नेतृत्वात सत्ताबदल घडवण्याची ताकद राहीली नव्हती. बरं कोणी काहीही म्हटलं तरी गोध्राच्या भूतानं मोदींची आणि माझ्यासारख्या भाजप पाठीराख्यांची मानगुट सोडली नव्हतीच. पण तरीही मोदींव्यतिरीक्त काँग्रेसला शह देईल आणि सत्तापालट करु शकेल असा प्रबळ उमेदवारंच नव्हता भाजपकडे. आणि त्यामुळेच पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून मोदींच्या नावाला होणारा पक्षांतर्गत विरोध बघून अस्वस्थ होयला होत होतं. गोध्रा बिध्रा सगळं सगळं मागे सोडून मी मोदींना मत देण्यासाठी सज्ज झालो होतो आणि तसंच भाजपच्या वरिष्ठांनीही कसलाही विरोध न करता एकमतानं मोदींचं नाव जाहीर करावं असं मनोमन वाटू लागलं होतं. वाटत होतं च्यायला मोदींना विरोध करुन भाजपवाले सेल्फ गोल मारणारेत. भाजपने पंतप्रधानपदाचा अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींचं नाव जाहीर केल्यावर जाम आनंद झाला होता कारण मनोमन असं वाटत होतं की साला आता काँग्रेसची सत्ता उलथणार. बरं एकेकाळी एवढा कट्टर भाजप समर्थक असूनंही आजमितीला असं काय झालंय, काय बिनसलंय की मी या सरकारच्या कारभाराला पूर्ण कंटाळलोय?

१) दुतोंडेपणा
राष्ट्रहिताचा विचार फक्त आम्हीच करतो, आम्ही प्रत्येक पाऊल हे फक्त आणि फक्त राष्ट्रहितासाठीच उचलतो हा अभिनिवेश मिरवत चाललेली वाटचाल. मागच्या सरकारच्या सगळ्या योजनांना त्या त्या वेळी टोकाचा विरोध करणाऱ्या भाजपनं सत्तेवर येताच मागच्याच सरकारच्या योजनांची नावं बदलत अंमलबजावणी सुरु केली आणि धड्याक्यात मार्केटींग करुन आम्ही जगावेगळ्या योजना आणल्याचा आव आणायलाही सुरुवात केली. पाकिस्तानला लव्ह लेटर लिहिणं बंद करा, एकमेकांतली द्विपक्षीय चर्चा बंद करा म्हणून मनगटाला चूना लावून बोंब मारणारा भाजप पक्ष आठवा आणि पंतप्रधानांनी पाकिस्तानला दिलेली सरप्राईज विजिट, नवाझ शरीफांच्या आईच्या पाया पडणं किंवा त्यांना भेटवस्तू देऊन मोठ्या शिताफीनं सोशल मिडियातून आपल्या भेटीबद्दल अनुकुलता तयार करुन अशी धाडसी कृती करणारा एकमेव संस्कारी पंतप्रधान म्हणून  आपल्या पक्षाकरवी आणि भक्तांकरवी देशभरात आपली वाह वाह करुन घेत आपल्याच पूर्वीच्या भुमिकेपासून सराईतपणे यू टर्न घेणारे मोदी आठवा.
विरोधी पक्षात असताना भाजपानं वारंवार लोकसभेचं कामकाज बंद पाडलं होतं. २०१२ मध्ये तर जाहीर पत्रकार परीषदेमध्ये व्यंकेय्या नायडू म्हणाले होते की लोकसभेच्या कामकाजात व्यत्यय आणणं आम्ही असंच चालू ठेऊ.  शिवाय एकाचवेळी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाने राजीनामा देऊन सरकार बर्खास्त करावं हि अव्यवहार्य मागणी भाजपने कितीतरी दिवस लावून धरली होती. संसदेचं काम बंद पाडणंही संवैधानिक पाऊलंच आहे अशी जाहिर भूमिका एकेकाळी विरोधी बाकावर बसून भाजपंने घेतली होती. पण आता भाजप सत्तेत येताच काँग्रेसनं त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत लोकसभेचं काम बंद पाडणं म्हणजे देशविघातक असल्याची उपरति भाजपला झालीये.
भाजप बाकीच्या सत्तालोलूप पक्षांपेक्षा वेगळा आहे ही माझी पूर्वीपासून धारणा होती, पण निवडणूकीच्या तोंडावर सगळ्या पक्षातून अट्टल चोर, नाठाळ, सत्तापिपासू, भ्रष्टाचारी पुढारी आयात करुन मोदी लाटेतलं पाणी त्यांच्यावर शिंपडून रातोरात पवित्र करुन त्यांना आपल्यात सामावून घेणाऱ्या भाजपनं सिद्ध केलं की आम्ही वेगळे नाही, वुई आर नोमोअर अ पार्टी विथ डिफरंस. मोदींची लाट एवढी निर्विवादपणे मोठी होती तर या उपऱ्यांना पक्षात घेऊन निवडणूका जिंकण्याची काय आवश्यकता होती? मोदींच्या नावाखाली जसे बाकी काही फारसे प्रसिद्ध नसलेले चेहरे निवडून आले तसेच अजून काही आले असतेच की.
शिवाय सत्तेत आल्यानंतर, काश्मीरात आपल्या पूर्वीच्या भुमिकेपासून यू-टर्न घेऊन आपली तथाकथित मूल्य पायदुळी तुडवत पीडीपीसोबत केलेली  युतीही काही पचनी नाही पडली बाबा आपल्या.
गेल्या अडीच वर्षापासून अशा कित्येक गोष्टीतून भाजपचा दुतोंडेपणा वारंवार अधोरेखित झालाय. बरं आता लोक म्हणतील की हा तर राजकारणाचा भाग आहे आणि कोणता पक्ष हे करत नाही? कोण करो न करो भाजप मला नेहमीच बाकीच्या नालायकांपेक्षा वेगळा वाटत होता आणि माझ्या या धारणेला तडा गेलाय.

२) मी मी मी, आपलीच पाठ थोपटणं
कोणताही माणूस जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्याची दखल ही घ्यावीशीच वाटते, मनापासून कौतुकही करावसं वाटतं. विरोधासाठी विरोध करणाऱ्यातला मी नाही कारण त्यामुळे माझा ना फायदा होणार ना तोटा. पण चांगलं काम केल्यानंतर सगळ्याच चांगल्या गोष्टींच श्रेय लाटायचं, मी केलं, मी केलं, मी केलंचा अविरत जप करायचा आणि काही वाईट झालंच तर मात्र त्याची जवाबदारी घ्यायची नाही यामुळे फक्त मी माझं करत स्वतःचीच पाठ थोपटून घेणाऱ्या लोकांबद्दल हळू हळू चिड येयला लागते. मोदी हे त्या कॅटेगरीतले एक म्हणण्यापेक्षा मोदी त्यात अव्वल म्हणावे लागतील. सर्जिकल स्ट्राईक केली, त्याची जाहीर जवाबदारीही स्वीकारली. जबरदस्त धाडसी पाऊल होतं ते नक्कीच, आंतरराष्ट्रीय राजकारणात वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी एक अतिशाय महत्वाचं पाऊल होतं. सगळ्यांनाच या गोष्टीचं कौतुक वाटत होतं, अभिमान वाटत होता. पण हे कौतुक हा अभिमान जास्त काळ टिकू दिला नाही भाजपने. सर्जिकल स्ट्राईक आम्हीच पहिल्यांदा करवून आणली पासून ते रात्रभर मोदी कसे अन्नपाण्याविना जागे राहीले वगैरे वगैरे सुरस कथा जास्तीत जास्त तिखट मीठ लावून दणादणा बाहेर येयला लागल्या, अरे चौका चौकात बॅनर लावून स्वतःची पाठ थोपटून घ्यायलाही मागे पुढे बघितलं नाही यांनी. सर्जिकल स्ट्राईकच्या श्रेयवादाचं ओंगळवाणं प्रदर्शन खरंच नुसतं अंगावर नाही आलं तर डोक्यात गेलं. बर कट्टर मोदी विरोधकांसारखा कुजका प्रश्न मला पडला नाही की सर्जिकल स्ट्राईक तर लष्करानं केली त्यात सरकारचा काय संबंध? लष्करालाही धडाकेबाज कारवाई करण्यासाठी धाडसी नेतृत्व असणं गरजेचं असतं याची जाणीव आहे मला. पण सर्जिकल स्ट्राईकनंतर जोमात प्रचार करणारं सरकार नजीकच्या काळात सीमेवर झालेले हल्ले आणि जवानांचे मृत्यू याबाबतीत मूग गिळून गप्प का असा प्रश्नही डोकं वर काढतोच ना.
बरं नुकत्याच केलेल्या नोटाबंदी नंतरही जागोजागी भाजपने हे अभिनंदनाचे बॅनर लावले. मध्यंतरी शिवसेनेनं नाही का सगळीकडे बॅनर्स लावले होते, "करुन दाखवलं, करुन दाखवलं" किंवा हे पुढारी नाही का अगदी बसण्यासाठी बाकडं टाकलं, एखादा बसस्टॉप बांधला, सार्वजनिक शौचालय बांधलं किंवा अगदी साधी कचऱ्याची पेटी जरी आणून ठेवली तरी निर्लज्जासारखं अमुक दादा तमुक ताईंच्या आमदार/खासदार/नगरसेवक निधीतून अमुक अमुक सुविधा नागरीकांसाठी उपलब्ध करुन दिल्याचे बॅनर लावतात किंवा त्या त्या "सुविधेवरंच" सौजन्य म्हणून स्वतःचं नाव चिकटवतात त्यांपेक्षा काही वेगळं भाजप सरकार करतंय असं वाटेनासं झालंय. अरे केलं तर टिमक्या वाजवून पाठ कसली थोपटून घेताय, ती तुमचीच जवाबदारी आहे, चांगल्या पद्धतीनं पार पाडाल तर जनता आपोआपंच पाठ थोपटेल आणि पुढच्या निवडणूकीत कौलही तुमच्या बाजूनं देईल. जरा मी मी मीचा जप करणं बंद करा प्लिज.

३) कंट्रोल फ्रिक्स
आताच्या सरकारला लोकांवर नियंत्रण ठेवणं भयंकर आवडतं. कोणी काय खायचं काय खायचं नाही, कुठे जायचं कुठे जायचं नाही, काय बोलायचं काय बोलायचं नाही तत्सम गोष्टींमधे यांना भयंकर रस. पहलाज निहलानीसारख्या, "मी नरेंद्र मोदींचा चमचा आहे" असं निर्लज्जपणे सांगणाऱ्या रद्दड माणसाला सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष केला, त्यानं २८ आक्षेपार्ह शब्दांची लिस्टंच जाहीर केली, सिनेमांमध्ये अव्यवहार्य कट्स सुचवायला सुरुवात केली. सिनेमे कसे बनवायचे आणि त्यात काय दाखवायचं यावरंही कसला आलाय सांस्कृतिक कंट्रोल?
अमुक तमुकवर बंदी घालणं तर यांचा छंदच आहे जणू. बीफ बॅन हा असाच एक तुघलकी निर्णय. बरं ईथे बीफ खायला बंदी असली तरी गेल्या दोनेक वर्षात आपण बीफच्या निर्यातीत अग्रेसर आहोत. निर्यात करण्यासाठी पशू मारले तर चालतं पण ईथे खाण्यासाठी नाही चालणार. मुख्तार अब्बास नक्वी तर म्हणाले ज्यांना बीफ खायचं त्यांनी पाकिस्तानात जा. उठसूट वेगळी मतं असणाऱ्यांना देशद्रोही ठरवून पाकिस्तानात पाठवण्याची भारी हौस बाबा यांना, भारतात रहायचं असेल तर भारत माता की जय म्हणावंच लागेल असं जाहीरपणे फडणवीस साहेब म्हणतात. नोटाबंदीला विरोध करणारे देशद्रोही आहेत असंही म्हणतात. आमचा तुमच्यावर टोटल कंट्रोल असणार आणि तुम्ही आमच्या मताप्रमाणे, मनाप्रमाणे वागलात तर ठिक... लोकांच्या खाण्या-पिण्यावर, वागण्या बोलण्यावर, जगण्यावरही नियंत्रण ठेवणारं हे सरकार स्वतः खूप ईन्सिक्युअर आहे बहुदा आणि त्यामुळेच त्यांना लोकांच्या मेंदूवरची स्वतःची पकड बिलकुल ढिली होऊ द्यायची नाहीये. मागच्या कोणत्याही सरकारनं (एक इंदिरा गांधींच्या काळातली आणीबाणी सोडता) अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची धडपड केल्याचं स्मरणात नाही आणि ऐकिवातंही नाही.

४) देशभक्तीची प्रशस्तिपत्रकं
सरकारला प्रश्न विचारणारे सगळे देशद्रोही आणि गुबूगुबू करत फक्त माना डोलवणारा प्रत्येकजण देशभक्त अशी सरसकट वर्गवारी भाजपंने गेल्या अडीच वर्षात केलेली दिसते. कोणी कसलाही प्रश्न विचारला किंवा शंका उपस्थित केली की लगेच गेल्या साठ वर्षात देशाची माती झाली तेव्हा कुठं होता हा प्रश्न एखादं पिसाळलेलं कुत्र अंगावर सोडल्यागत सगळे सरकार समर्थक अक्षरशः अंगावर सोडतात. लोकशाहीमधे एकतरी चांगला विरोधक असणं गरजेचं आहे किंवा निंदकाचं घर असावं शेजारी वगैरे गोष्टींवर यांचा मूळातंच विश्वास नसावा असं वाटतं. जरा कोणत्या बाबतीत तोंड उघडावं, विरोध करावं म्हटलं तर दुसऱ्या क्षणाला तुम्ही देशद्रोही ठरवले गेलेला असता. सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले भाजप अध्यक्ष श्रीयुत अमित शहा आणि आजूबाजूची सगळी हवा शोषून आपल्या फुफ्फुसात भरुन घेऊन मग जीवाच्या आकांतानं आरडा ओरडा करणारा (खरतंर बोंबलणारा म्हणायला हवं) अर्णब गोस्वामी हे देशभक्ती शिकवून ही सर्टीफिकीटं वाटण्यात किंवा वर्गवारी करण्यात आघाडीवर असतात. लोकशाही मार्गानं सरकारचा विरोध करणं किंवा एखाद्या निर्णयाबद्दल नाराजी प्रकट करण्यानंही तुम्ही देशभक्तीचं सर्टीफिकेट मिळण्यासाठी अपात्र ठरता. सरकारला विरोध म्हणजेच देशद्रोह असं एक सरधोपट समीकरण मांडून ते गळी उतरवलं जातंय, एकूणंच देशभक्तीच्या प्रशस्तिपत्रकाचा बाजार तेजीत आहे.

५) टोकाचा राष्ट्रवाद
प्रत्येक गोष्टीचा संबंध देशभक्तीशी लावायला सुरुवात झालीये. एटीएम, बँकातल्या रांगांबद्दल तक्रारीचा सूर लावलात तर तुम्ही देशात होणाऱ्या मोठ्या बदलाच्या आणि पर्यायानं देशाच्या प्रगतिच्या विरोधात आहात. मोदींच्या परदेश दौऱ्याबद्दल प्रश्न विचारलात तर तुम्हाला पंतप्रधानांना न भूतो न भविष्यती मिळणारा जनाधार/रीस्पाँस बघवत नाहीये. अचानकपणे सिनेमांना विरोध होतात, सिनेमे प्रदर्शित करण्याच्या बदल्यात लष्कराला पाच कोटी देण्याची मांडवली केली जाते, या असल्या मांडवलीमध्ये मध्यस्त नसले तरी मुख्यमंत्री साक्षीदार असतात. काहीही झालं की सीमेवर जवान प्राणाची आहुती देतायेत आणि तुम्हाला एवढं सहन करायला नको का म्हणत प्रत्येक गोष्टीत ओढून ताणून राष्ट्रवाद आणण्याचा प्रयत्न केला जातोय. लोकसभेत छाती पिटून माझं काही चुकलं असेल तर माझा गळा कापा वगैरे डायलॉग्ज भरल्य़ा गळ्यानं आणि कर्णकर्कश्य आवाजात टोकले जातायेत. राष्ट्रवादाच्या नाटकाचे नवनवे अंक रोज लिहिले जातायेत. व्यवहार्य गोष्टी करणं आणि त्यामधे दिवसेंदिवस होणारी सुधारणा/डेव्हलपमेंट दाखवणं कठीण असतं म्हणून लोकांच्या भावनांना हात घालून भावनिक मुद्दे उपस्थित केले जातायेत. आणि टोकाचं देशप्रेम हा एक सोपा मार्ग यासाठी निवडला जातोय. खरंतर टोकाचा राष्ट्रवाद हा खऱ्या राष्ट्रवादाला किंवा राष्ट्राच्या प्रगतिला कायमंच हानिकारक असतो पण राष्ट्रवादाच्या पडद्याआड जर लोकांना गुंतवून ठेवून जे मूलभूत प्रश्न उपस्थित करत आपण सत्ता काबीज केली त्यांना बगल देता आली तर तेच प्रश्न उद्या आपल्यालाही विचारले जाणार नाहीत याची खबरदारी घेणं सोप जात असावं कदाचित. जय हिंद, भारत माता की जय म्हणायलाच हवं वगैरे गोष्टींचा अट्टहास कशासाठी? जुलमाचा रामराम आणि जबरदस्तीचं प्रेम हे कधीच मनापासून नसतं आणि दिर्घ काळासाठी टिकू शकत नाही याची जाणीव भाजप सारख्या मोठ्या पक्षाला नसेल असं वाटत नाही... पण तरीही आजमितीला धारदार अस्मिता आणि टोकाचा राष्ट्रवाद हे त्यांचं महत्वाचं अस्त्र  आहे यात तिळमात्रही शंका घ्यायला जागा नाही.

६) टिकेबद्दलची असहनशीलता
बरेच भाजप समर्थक (भक्त नाही म्हणायचं, लोक चिडतात) विचारतात गेल्या कित्येक वर्षात "असहिष्णूता" हा शब्द कधीच ऐकला नव्हता. २०१४ नंतरंच हे फॅड ऐकायला मिळतंय. असं का? तर या "असं का"चं उत्तर शोधणं फारसं कठीण नाहीये खरंतर पण त्यासाठी सत्याला उघड्या डोळ्यानं आणि मनानं सामोरं जायची तयारी हवी. २०१४च्या आधी जमेल तशी जमेल तेवढी टीका प्रत्येकानंच काँग्रेसवर केलेली आहे. बरं या प्रकारात सगळ्यात आघाडीवर माझ्यासारखे भाजप समर्थक असायचे आणि खुद्द भाजपच्या सदस्यांनी तर पातळी सोडून अश्लाघ्य शब्दांतही टीका केलीये. न पटणारे खोटेनाटे फोटोज, फोटोशॉप करुन मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींचे टायटॅनिक पोझमधले फोटोज सोशल मेडियवर फिरवलेत. वर निर्लज्जासारखं हे सगळं मजामस्करीमध्ये घ्या हे सांगितलं जायचं. आताही अरविंद केजरीवालचे असेच कितीतरी मॉर्फ केलेले फोटोज विडीओज फिरतात व्हॉट्सॅपवर. या सगळ्या गोष्टी विनोद म्हणून लोक फॉरवर्डही करतात आणि ख्या ख्या करुन हसतातही पण हे करताना भाजपवर एका मर्यादेत राहून केलेली टिकाही यांच्या पचनी पडत नाही.  केजरीवालला खुजलीवाल, रविश कुमारला रबिश कुमार, राहुल गांधीला पप्पू, मनमोहनसिंगांना रोबोट, मूका प्राणी म्हणून हिनवणाऱ्या भाजपाला मोदींबद्दल ब्र शब्द काढलेलाही खपत नाही. विधायक टिका असू शकते आणि मूळात आपल्या चूका समजून घेऊन दुरुस्त करुन सुधारणा करण्यालाही वाव असू शकतो या गोष्टीवर विश्वासंच नाही भाजपचा. चूक मान्य न करणं आणि टिका बिलकुलही सहन न करणं हे यांचं स्वाभाव वैशिष्ठ्य बनत चाललंय. टिकेचा सूर लावून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकरांना ईथे प्रेस्टीट्यूट्‌स म्हणलं जातं, विरोधी भूमिका घेणाऱ्या सामान्य माणसालाही देशद्रोही ठरवलं जातं, सेक्युलर लोकांना सिक्युलर आणि पुरोगाम्यांना सरसकट फुरोगामी म्हणून हिणवलं जातं. बरं मान्य आहे विरोधासाठी विरोध करुन टोकाची भूमिका घेणारे स्वयंघोषित इंटेलेक्च्युअल्स, पुरोगामी आहेत आपल्याकडे पण म्हणून जनरलाईज करणं किती बरोबरे?
मूळात आपण टिका करतो तेव्हा आपल्यावर होणारी टिकाही मोठ्या मनानं स्वीकारण्याची किंवा ऐकून घेण्याची तरी तयारी असायला हवी आणि ती तयारी आत्ताच्या भाजपमध्ये तरी बिलकुलंच दिसत नाहीये आणि म्हणूनंच बाकी कसल्याही इंटॉलरंसपेक्षाही भाजप टिकेला इन्टॉलरंट आहे आणि ही असहनशीलता अजूनंच वाढत चाललीये असं मला वाटतंय.

७) कुठल्याही गोष्टीचा संबंध कुठेही जोडणं
आपली संस्कृती कशी श्रेष्ठ होती याचे पोवाडे सारखे वाजवायचे. गोमुत्रामध्ये अमुक शक्ति आहे, आयुर्वेद सगळ्यात प्रगत शास्त्र आहे. ऑर्गन ट्रान्सप्लांट/अवयव प्रत्यारोपणाचा शोध भारतात लागला, टेस्ट ट्यूब बेबीपासून ते व्हिडियो कॉल ते अगदी विमानापर्यंत सगळंच आमच्याकडे पौराणिक काळापासूनंच आहे. न्यूटनने लावलेले कित्येक शोध कसे खरंतर पुराणात, ज्ञानेश्वरीमध्ये ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत वगैरे मुद्दे हिरीरीने मांडले जातायेत. मान्य आहे आपली संस्कृती श्रेष्ठंच आहे, ते कुणीही नाकारु शकत नाही पण आपलंच उदात्तीकरण करण्यात धन्यता मानल्यानं काय होणारे? मान्यंय ना बाबांनो आपले पूर्वज ग्रेट होते पण गेल्या कित्येक वर्षात त्या वैभवशाली परंपरेतून आपण काय शिकलो? फक्त आपलेच गोडवे गाणं? कुठेतरी हे थांबून पाश्चिमात्य देशांनी मधल्या काळात न भूतो न भविष्यती प्रगति केलीये हे मान्य केल्यानं आपल्या वैभवशाली संस्कृतीला कुठल्याही प्रकारे धक्का बसणार नाहीये. तुमच्याकडे अमुक आहे का, च्यायला हे तर आमच्याकडे रामायणाच्या काळात होतं, तुमच्याकडे तमुक आहे का ते तर आम्ही कधीच वेदात लिहून ठेवलंय. कुठल्याही गोष्टीचा संबंध पुराणाशी जोडणं थांबायला हवं कुठेतरी आणि हो प्रगत देशांचे शोध खरंतर आम्हीच पुराणात लावलेले आहेत हे सिद्ध करण्यापेक्षा ईथून पुढे नव्या पिढीला त्या प्रकारचं शिक्षण देण्यावर भर नको का द्यायला. पण सध्यातरी तशा दृष्टीनं काही होण्याची शक्यता दिसत नाहीये. घोड्याची शेपूट गाढवाला लावत आपलीच टिमकी वाजवणं चालू ठेवण्याचे दिवस आलेत.

८) खोटे बोला पण रेटून बोला: आधुनिक गोबेल निती
एकीकडे भारताच्या पुराणकाळाबद्दल भरभरुन चांगलं बोलणारे भाजपचे सदस्य आणि समर्थक भारताच्या स्वातंत्रपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर ईतिहासाबद्दल मात्र सोयीनं खोटा प्रचार करताना आढळतात. नेहरु आणि सरदार पटेलांमधले कथित/खोटे मतभेद मोठ्या हिरीरीनं पसरवले जातात. महात्मा गांधींबद्दल खोटनाटं पसरण्याचे सगळे प्रयत्न संपल्यानंतर आणि ते शक्य होत नाही लक्षात आल्यानंतर महात्मा गांधींना प्रातःस्मरणीय करुन टाकलं भाजपने. कित्येक आरेसेसवाले आणि भाजपवाले याच महात्मा गांधींच्या हत्येला वध म्हणून संबोधतात. जीडिपीचे खोटे आकडे पसरवले जातात, नोटाबंदीनंतर चिमूटभर लोकांचा सर्व्हे करुन ९०% लोकांचा निर्णयाला पाठींबा असल्याचं दर्शविलं जातं, झाडू मारणाऱ्या सफाई कामगाराचा फोटो मॉर्फ करुन त्यावर मोदींचा चेहेरा लावला जातो, ग्वांगझाऊच्या बसस्टेशनचा फोटो अहमदाबादच्या बीआरटीचा म्हणून दाखवला जातो, नेहरु गांधींचा फोटो एडीट करुन नेहरुंच्याजागी विदेशी तरुणी चिकटवली जाते, खोटं बोललं जातंय, ते रेटून बोललं जातंय... वारंवार एकंच गोष्ट (खोटी का असेना) लोकांच्या कानीकपाळी ओरडून सांगितली की त्यामध्ये बऱ्याचजणांना तथ्य दिसायला लागतं, तेच खरं वाटायला लागतं... याच गोबेल नितीचा आधार घेणं चालूये.

९) ठराविक वर्गाला प्राधान्य
एकाबाजूला आरेसेस ठराविक वर्गाला धार्मिक आधारावर प्राधान्य देतं आणि एकाबाजूला पंतप्रधान त्यांची मुस्लिमद्वेष्टे म्हणून झालेली प्रतिमा बदलायचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. दादरी, मुजफ्फरनगर सारख्या घटना घडतात, मोदींच्या गुजरातमधे मेलेल्या गायीचं कातडं काढणाऱ्या तरुणांना उघडं नागडं करुन गुरासारखं बडवलं जातं, आरेसेस मधले काही दिड शहाणे नथुरामसारख्या खुन्याची जयंती, पुण्यतिथी साजरी करुन त्याचं उदात्तीकरणं करतात, बायकांनी मर्यादेत रहावं असं सांगतात, माजी राष्ट्रपति डॉ. कलाम  मुस्लिम असूनंही देशभक्त होते असं म्हणतात, गिरीराज सिंगांनी तर असंही सांगितलं की जे मुस्लिम नरेंद्र मोदींच्या कामाबद्दल नाराज असतील त्यांनी पाकिस्तानात जावं. घरवापसी, लव्हजिहाद सारखे मुद्दे गंभीर स्वरुप धारण करत गेले, निरंजन ज्योती नामक साध्वी बाईंनी जाहीर सभेत वक्तव्य केलं की, "आप को तय करना है के दिल्ली मे सरकार रामजादों की आयेगी या हरामजादों की" आणि हे सगळं घडत असताना आपले पंतप्रधान मौनव्रत धारण करुन बसतात. गिरीराज सिंगांची तेवढी कानऊघडणी केली मोदींनी पण बाकीच्या बाबतीत त्यांनी न बोलणंच पसंद केलं माजी पंतप्रधानांना मुका म्हणून हिनवणारे मोदी आज अन्याय्य घटनांबद्दल मूग गिळून गप्प बसलेले बघणं पचनी पडत नाही.

१०) साठ वर्षाचं तुणतुणं
कोणी गेल्या अडीच वर्षात काय केलं असा प्रश्न विचारलाच तर गेल्या साठ वर्षात कधी मागच्या सरकारांना हा प्रश्न विचारला नाहीत, आत्ता जेवढे प्रश्न विचारताय त्याच्या ५-१०% जरी पूर्वीच्या सरकारांना विचारले असते तर आज भारतात बराच विकास झाला असता हे ऐकवलं जातं, माननीय फडणवीस साहेब तर कविता वाचून आता गेल्या साठ वर्षातले चोरही हिशोब मागायला लागलेत म्हणतात. माणूस प्रश्न कोणाला विचारतो, टिका कोणावर करु शकतो? ज्याच्याकडून अपेक्षा आहेत त्यालाच. मग? भारतातल्या जनतेचा काँग्रेस काहीतरि करु शकेल यावरचा विश्वासंच उडाला होता, ते नकोयेत म्हणून तुम्हाला निवडून दिलंय मोठ्या आशेनं, आता काही करण्याची आशा तुमच्याकडून बाळगून आहेत लोक, की अशी अपेक्षा बाळगणंही चूक ए? आणि काँग्रेसनं गेल्या साठ वर्षात एवढी घाण करुन ठेवलीये की ती साफ करायलाच ४-५ वर्ष जातील, खरा विकास त्यानंतर सुरु होईल असंही रेटून सांगितलं जातंय. बास करा आता या युक्तिवादाचाही कंटाळा येयला लागलाय. अरे गेले साठ वर्ष काँग्रेसनं घाण केली हे मान्य करु एकवेळ पण म्हणजे फक्त घाणंच केली असंही नाही ना?  बरं हे ही मान्य केलं की घाणीची सफाई करायला ४-५ वर्ष जातील. पण गेल्या साठ वर्षातली घाण साफ करायला साठ वर्ष लागणार असतील तर गेल्या साठ वर्षात अंगात ठासून भरलेली आर्थिक निरक्षरता नोटाबंदीनंतर दोन महिन्यात संपुष्टात येऊन लोक आर्थिकरीत्या साक्षर व्हावे हा कसला अट्टहास ए? म्हणजे जेव्हा आम्हाला मुदत हवी तेव्हा आम्ही ४-५ वर्षाची घेणार आणि तुम्हाला देताना २ महिन्यांची... वाह!
तुम्हीच जाहीर सभेत सांगता भारत आणि पाकिस्तान एकाचवेळी स्वतंत्र झाले, साठ वर्षानंतर भारत सॉफ्टवेअर निर्यात करतोय तर पाकिस्तान अतिरेकी निर्यात करतायेत, आम्ही चंद्रावर पोहोचलो तुम्ही अजून चिखलात लोळताय. बरं ज्या डिजिटल इंडियाची स्वप्न आपण बघतोय त्याची बीजं तर राजीव गांधीच्या काळात रुजवली गेली हे तर किमान मान्य करा. की सगळ्या चांगल्या गोष्टी फक्त गेल्या अडीच वर्षात झाल्यात आणि घाण तेवढी साठ वर्षात?
बरं मी भाजप आणि त्यांच्या भक्तांसारखं म्हणणार नाही की कोणतीच चांगली पावलं उचलली गेली नाहीयेत गेल्या अडीच वर्षात.
झालंच तर येमेन मध्ये नागरीकांची केलेली सुटका, जनधन योजना, घरगुती सिलेंडरवरची सबसिडी, स्वच्छ भारत अभियान आणि रीयल ईस्टेट बिल वगैरे चांगलीच पावलं आहेत पण सरकारनं पण वर दिलेली बाकीच्या कारणांमुळे, एकेकाळचा भाजप समर्थक म्हणून माझा फार मोठा भ्रमनिरास झाला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
२०१४च्या निवडणूकीच्यावेळी मी भाजपमधल्या माझ्या जवळच्या मित्राला म्हणालो होतो मोदींच्या त्सुनामीमध्ये सगळे वाहून जाणारेत यात शंका नाहीच पण आताशा भाजपमध्ये घडत चाललेल्या वाईट बदलांमुळे माझ्यासारखे काही लोक भाजपपासून दूर चाललेत हेही काही खोट नाही, पण आत्ता दृष्टीक्षेपात आलेलं यश बघता माझ्यासारखा फडतूस पाठीराखा तुमच्या पासून फारकत घेतोय यानं मोदी लाटेला आणि पर्यायानं भाजपला काहीच फरक पडणार नाहीये हे निश्चित आहे पण दूरगामी परीणामांचा विचार करता पूर्वापार तुम्हाला सपोर्ट करत आलेल्या लोकांची नाळ तुमच्यापासून तुटू नये यासाठी तुम्हाला एक ना एक दिवस उपाययोजना कराव्या लागतील... दुर्दैवानं भाजप मोदी लाटेतून आणि २०१४च्या यशाच्या नशेतून अन धुंदीतून अजूनंही बाहेर आलेला नाहीये...

पण काही अंशी मला माझी उत्तरं आता मिळाली आहेत... काय असं बिनसलंय, कालपरवापर्यंत भाजप समर्थक असणारा मी आज त्यांच्या राजवटीपासून समाधानी का नाहीये...



कुणाल प्रकाश रुद्राके

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...