तो मुंबई विमानतळावर पोहोचला. इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार
पार पडले होते आणि
पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर होती.
गेल्या दोन दिवसात लंडन
मुंबई फ्लाईट मिस झाली होती
होती, नव्याने तिकिटस बूक करुन वेळेत
भारतात येणं गरजेचं होतं.
घरच्या सगळ्यांचे तिकिटस रीस्केड्युल करता येत होते
पण त्यांची ट्रॅवल डेट दोनदा बदलून
घेतली असल्यानं आता परत बदलता
येत नव्हती. फॅमिलीला ज्या फ्लाईटमध्ये तिकिट
मिळत होतं त्यात त्याला
मिळत नव्हतं. त्याला त्यांच्या आधी सहा तास
निघावं लागणार होतं. नाईलाजाने त्याने ते तिकिट बुक
करून टाकलं. तो हिथ्रो एअरपोर्टवर
पोचला आणि विमान दोन
तास डिले झालं तरीही
डायरेक्ट फ्लाईट असल्याने तो घरच्यांपेक्षा तीन
तास आधीच मुंबई एअरपोर्टवर
पोहोचला. दोन दिवसांची धावपळ
शारीरिक आणि मानसिक रित्या
भयंकर थकवणारी होती. त्याच्याकडे त्याची छोटी बॅकपॅक आणि
हातातलं कोलीन हूवरचं “इट एंडस विथ
अस” वगळता काहीही सामान नव्हतं.
एअरपोर्टवर
त्यातल्या त्यात कमी वर्दळ असलेल्या
ठिकाणी कोपऱ्यातल्या एका खुर्चीवर तो
बसला आणि शेजारच्या खुर्चीवर
त्याने बॅग ठेवली. आजूबाजूच्या
गर्दीवर निरर्थक कटाक्ष टाकत त्याने हातातल्या
घड्याळात पाहिलं, दुपारचे दोन वाजले होते.
घरच्यांची फ्लाईट पाच वाजता लॅंड
होणार होती. असहाय्यपणे एक उसासा सोडत
त्याने पुस्तक उघडलं. पुस्तकात नीटसं लक्ष लागेना, मिस्ड
फ्लाईट, लांबलेला प्रवास, एअरपोर्टवरचं ताटकळणं, शरीरासोबत मनंही आंबून गेलं होतं पार.
तो चटकन वॉशरुममध्ये जाऊन
चेहरा थंडगार पाण्याने धुवून परत जागेवर येऊन
बसला. त्याने जरावेळ डोळे बंद करुन
घेतले, सतत कुठेतरी धावत
पळत काहीतरी गाठायचा प्रयत्न केल्यासारखं वाटत राहिलं, झोप
मात्र येईना. झोप येईना तेव्हा
त्याने परत एकदा पुस्तक
काढून पुढे वाचायला सुरुवात
केली, दोन पानं वाचून
झाली असतील तेव्हा ॲटलस लिलीला म्हणत
होता, “इन द फ्युचर…
इफ बाय सम मिरॅकल
यू एव्हर फाइंड यूअरसेल्फ इन द पोझिशन
टू फॉल इन लव्ह
अगेन… फॉल इन लव्ह
विथ मी”.
ते वाक्य वाचून काहीतरी आठवल्यासारखं तंद्रीत जात त्याने पुस्तक
पोटावर उपडं ठेवलं. खुर्चीत
रेलत मान मागे सोडून
दिली.
मिरामार बीचवर संध्याकाळचा सनसेट बघत शांत बसला असताना आभाळ जांभुळसर नारींगी झाल्यावर ते डोळ्यात साठवून घेत त्याने अशीच मान मागे सोडली होती. आजूबाजूचा कोलाहल क्षणात विरुन त्याची तंद्री लागली, बीचवरची गर्दी तर सोडाच पण पलीकडेच आपले दोन मित्र बसले आहेत हे सुद्धा तो पूर्णपणे विसरुन गेला होता, कानात फक्त समुद्राच्या लाटांचा लयबद्ध आवाज येत होता आणि समुद्र किनारी जणू फक्त तो एकटा बसलाय असं त्याला वाटत होतं. तो त्याच्या विश्वात एवढा मश्गुल झाला होता कि त्याचे मित्राने त्याला ४-५ वेळा हाक मारलेलीही त्याला ऐकू गेली नाही, शेवटी त्याचा मित्राने जवळ येत त्याच्या खांद्याला धरुन त्याला गदागदा हलवलं आणि म्हणाला बरोबर आहे तुझं मी एकटाच आहे या बीचवर. तंद्रीतून भानावर येत त्याने मित्राकडे आश्चर्याने आणि तेवढ्याच वैतागाने पाहिलं. मी कुठे काय बोललोय हे शब्दशः न विचारताही हा प्रश्न त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
मित्र
हसू लागला तसं आजूबाजूला बघितल्यावर
त्याला लक्षात आलं कि हा
दुसऱ्याच कोणाशी बोलतोय. तो काही बोलणार
इतक्यात मित्रानेच परत सांगायला सुरुवात
केली, "हा काय ईथे
बसूनही वेगळ्याच दुनियेत रमलाय आणि बाकीचे चौघे
रुमवर मदिरा प्राशन करत बसलेत. मीच
या गर्दीत हरवलोय ए क टा,
यू आर अबसोल्यूटली राईट
मी एकटाच आलोय गोव्याला". मित्र
समोर उभारलेल्या मुलीशी बोलतोय लक्षात येताच तो जगाचा उठून
उभा राहिला, मित्राने दोघांची ओळख दिली,
तो म्हणाला ती त्याची फॅमिली
फ्रेंड आहे आणि सांगितलं
की या
चौघी गोव्याला निघाल्या होत्या पण त्यातल्या दोघींना
तारकर्ली जास्तं आवडलं म्हणून त्या तिथेच थांबल्या
आणि या दोघीच गोव्यात
आल्या आणि आता पुढे
येऊन बोअर होत आहेत.
अरे मग उद्या आमच्या
बरोबर या आम्ही साऊथ
गोव्याला चाललोय म्हणून त्याने तिला इन्व्हाईट करुन
टाकलं आणि मग त्याच्या
लक्षात आलं की हि
आपली पहिलीच भेट आहे तसा
तो चट्कन म्हणाला की आय मीन
तुमची काही हरकत. त्याला
थांबवत ती म्हणाली हरकत
कसली त्यात दोघी बोअर होतोय,
तुमच्या सोबत बोअर होऊन
बघुया पण तुमच्या गाडीत
जागा आहे का आम्हाला
अकोमोडेट करायला?
अरे
आपली नाईन सीटर आहे,
एक जागा शिल्लक राहिल
डोंट वरी म्हणत त्याने
त्याची पँट झटकत रेती
काढायचा एक अयशस्वी प्रयत्न
केला. ते तिघेही तिथून निघाले तेव्हा
त्याने नुकताच टिपलेल्या सनसेटचा वॉलपेपर त्याच्या डबल सिक्स डबल झिरो वर सेट केला,
त्यावर्षी तुफान गाजत असलेलं गाणं लावून हेडफोन कानात सारले, कानात गाणं चालू झालं
आणि त्याने परत एकदा गर्दीपासून स्वतःला डिस्कनेक्ट करुन घेतलं, केके त्याच्या आवाजाने
संमोहित करत होता
तू हि मेरी
शब है सुबह है तू हि दिन है मेरा.
दुसऱ्या दिवशी
ठरलेल्या वेळात ते निघाले आणि त्या दोघींना वाटेतून पिक केलं, हाय हॅलो, ओळख पाळख झाल्यावर
त्या दोघी उजव्या बाजूला मागून दुसऱ्या सीटवर बसल्या, खरंतर त्यांना सगळ्यात मागच्या
सीटवर बसायची इच्छा होती पण शेवटच्या सीटवर त्याचं अघोषित रीजर्वेशन होतं. दिवसभर साऊथ
गोव्या हिंडून मनसोक्त सीफूड खादडून संध्याकाळी वार्का बीचवर धमाल करुन ते परतीच्या
प्रवासाला लागले तेव्हा बराचवेळ फना आणि गँगस्टरची गाणी डोळे मिटून ऐकणारा तो आशिकीचं
अब तेरे बीन लागल्यावर स्वतःच्याच तंद्रीत जराशा मोठ्या आवाजात गाणं गाऊ लागला. गाणं
संपलं तसे डोळे उघडले तर ती त्याच्याकडेच बघत होती. रीफ्लेक्स ऍक्शन व्हावी तसा त्याच्याही
नकळत तो तिला सॉरी म्हणाला, काहीही न म्हणता खिडकीतून बाहेर बघणं कंटिन्यू केलं.
अच्छा तर काल
तू खरंच बोलत होतीस तर म्हणत त्याने तिच्याशी बोलायचं प्रयत्न केला.
काय बोलले मी
तुला? खिडकीतून अंधाराला आरपार भेदणारी नजर न हटवता तिने प्रतिप्रश्न केला.
हेच, की आत्ता
दोघी बोअर होतोय उद्या तुमच्या बरोबर बोअर होऊन बघू.
तसंच काही नाही
पण... तिने बोलणं मध्येच थांबवलं.
हां, आता कसं...
पण आहे ना, तसंच काही नाही पण... पण काय
पण... मला वेगळं
गाणं ऐकायची इच्छा आहे आणि तू स्टोनएज मधली गाणी एंजॉय कारतोएस.
एवढंच ना...
सांग तुला कोणतं गाणं ऐकायचंय, चाल ते लाऊ.
कॅसेट नसणार
त्याची गाडीत.
तो काहीही न
बोलता उठून पुढे गेला आणि दोन मिनिटांत परत आला तेव्हा गाडीतली गाणी बंद झाली होती,
बाकीचे जवळपास सगळे झोपी गेले होते.
काय रे मी गाणी
बंद कर असं कुठे म्हणाले? तुझया फेवरेट गाण्यांना स्टोन एजची गाणी म्हणाले म्हणून राग
आला की काय?
ह्याट राग काय
यायचा त्याच्यात, मी म्हणलं तुझं फेवरेट गाणं आहे तर तुझ्या फोनमध्ये नक्कीच असेल,
गाडीतली गाणी बंद केली तर तुझ्या मोबाईल मधली गाणी ऐकता येतील.
काय?
काय काय काय?
कोणतं गाणं ऐकायची इच्छा होती ते लाव की.
तिने काहीही
न बोलता गाणं लावून डोकं खिडकीच्या गजावर टेकवलं आणि चित्राच्या आवाजात स्वतःचा आवाज
मिसळला, "ला ला ला ला ला ला ला ला, साथिया तूने क्या किया"
गाणं संपल्यावर
तो म्हणाला लव्ह आणि आशिकी दोन्हीचा अर्थही तसा फारसा वेगळा नाहीये. ती काहीच बोलत
नाहीये बघून तो म्हणाला हा पीजे असला तरी हे दोन्ही पिक्चर १-२ वर्ष मागेपुढे रीलीज
झाले असतील तरी माझं फेवरेट गाणं स्टोनएज मधलं आहे वा.
आय डोंट नो
अबाऊट एनी आदर सॉंग बात धिस वन इज ऍन एव्हरग्रीन.
पुढे पणजीला
परत येई पर्यंत त्यांच्या एकमेकांना खेचत कधी एकमत होत गप्पा रंगल्या.
दिवसभर थकल्यामुळे
रात्री जेवायला न येता तिची मैत्रीण थेट रुमवर झोपायला गेली आणि जेवण झाल्यावर तो तिला
तिच्या रुमवर सोडायला म्हणून तिच्यासोबत चालत गेला. दोघांनी खूप गप्पा मारल्या, मेजॉरिटी
वेळ गाणी हाच गप्पांचा समान धागा होता. नवी ओळख, दिवसभराचा अवघडलेपणा वगैरे कुठल्या
कुठे गेला होता आणि आता झोपायला न जाता रात्रभर असंच पायऱ्यांवर गप्पा मारत बसावसं
वाटत होतं दोघांना. तिला ४ वेळा मैत्रिणीचा फोन येऊन गेला होता, शेवटी नाईलाजाने साडेबारा
वाजता दोघांनी काढता पाय घेतला तेव्हा त्यांना वर्षानुवर्षांपासून आपली ओळख असल्यासारखं
वाटत होतं. दोघांनी नंबर्स एक्स्चेंज केले, रुमवर जाताच त्याच्या गुडनाईट मेसेजला तिने
:) स्माईली पाठवून रीप्लाय केला.
पुढचे तीन दिवस त्यांनी जमेल तेवढा एकत्र वेळ घालवला, समुद्रातल्या राईड्स, सनसेट्स, लंच आणि डिनरच्या वेळी मिळून ऑर्डर देणं आणि रात्री दूरवर चालत जाऊन गप्पा मारणं सगळं सगळं एकत्रंच. दोघांनाही एकमेकांचा सहवास हवाहवा वाटू लागला होता, दोघांच्या आवडीची गाणी लावून एक इयरफोन त्याच्या आणि एक तिच्या कानात लाऊन गाणी ऐकणं आणि त्यासाठी एका सीटवर बसणं, याउपर एकमेकांच्या बोटाला स्पर्श करता करता हातात हात घेणं हे कधी चालू झालं हे त्यांच्याही लक्षात नाही आलं.
सेकंड लास्ट डेला काहीही न करता हॉटेलवर पडीक राहायचा प्लॅन सगळ्यांनी
केला असताना आणि सगळे कंटाळलेले असताना या दोघांनी सगळ्यांना जबरदस्ती परत एक्दा वार्का
बीचला नेलं. संध्याकाळी परत येताना सगळ्यांनी यांना जबरदस्तीने ओल्ड गोवा चर्च बघायची
गळ घातली. परतीच्या प्रवासात दोघांनी फक्त तूही मेरी शब आणि साथिया तूने क्या किया
ची पारायणं केली. चर्च जवळ येत असताना तो झोपी गेला तेव्हा संध्याकाळचे जवळपास साडेसात
वाजले होते. चर्च आल्यावर ए चला रे म्हणत एकेकाने गाडीतून बाहेर उड्या मारल्या तेव्हा
मी उठवते त्याला, तुम्ही चला म्हणून तिने सगळ्यांना पुढे व्हायला सांगितलं. सगळे खाली
उतरल्यावर तिने रस्त्याच्या बाजूच्या दोन खिडक्यांचे पडदे ओढून बंद केले आणि त्याला
हाक मारली, त्याने शून्य प्रतिसाद दिला, क्षणभर थांबून तिने जवळ येत त्याच्या गालावर
हलकेच तिचे ओठ टेकवले आणि त्याने काहीच न कळल्यासारखं आळोखेपिळोखे देत कूस बदलली. मग
तिने त्याला मोठयाने आवाज देत उठवून खाली नेलं.
डिनरनंतर ढेपाळलेल्या
सगळ्यांची पटापट विकेट उडाली. हे दोघे एक फेरफटका मारुन नेहमीप्रमाणे हॉटेलच्या मागच्या
बाजूच्या पायऱ्यांवर येऊन बसले. रोजच्या सारखे आज ते अविरत बडबड करत नव्हते रादर दोघेही
शांत होते. थोडावेळ काहीच न बोलता बसून राहिल्यावर ती म्हणाली फोन दे तुझा तुला गाणं
ट्रान्स्फर करायचं होतं ना? ब्लूटूथने करते. गाणं ट्रान्स्फर करताना ती म्हणाली संध्याकाळी
मी तुला गालावर किस केलं एवढंसुद्धा तुला कळलं नाही का रे? किती डंब आहेस तू. नजरेला
नजर न मिळवता तो म्हणाला कळलं होता मला.
मग काही बोललाही
नाहीस.
त्याने फक्त
तिच्याकडे पाहिलं, दोघांमध्ये सूतभर अंतर शिल्लक होतं.
त्यात बोलण्यासारखं
काही नव्हतं, तिच्यावर रोखलेली नजर न हटवता तो म्हणाला.
बोलण्यासारखं
नव्हतं तर मग...
श्श.... म्हणून
तिच्या ओठावर बोट ठेवत तो म्हणाला, बोलण्यासारखं नव्हतं... करण्यासारखं होतं
मग काहीच केलं
का नाहीस?
तिथे शक्य नव्हतं
मग आत्ता...
तिचं वाक्य
पूर्ण होऊ न देता त्याने ओठ तिच्या ओठांवर टेकवले, डाव्या हाताने तिची हनुवटी वर करत
एकदा या गालावर आणि मग त्या गालावर हलकेच किस केलं आणि म्हणाला आपण इंटरेस्ट सकट परतफेड
करतो.
बोलू नकोस...
ती वैतागून म्हणाली तसा त्याने तिचा चेहेरा दोन्ही हातात पकडून ओठांवर ओठ टेकवत एक
दीर्घ किस घेतला, मग परत एक आणि अजून एक, भान हरपून दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली.
एक्सयूज मी
तुमची बॅग खाली ठेवलं का? कोणीतरी रिक्वेस्ट करतंय ते ऐकून तो तंद्रीतून बाहेर आला
आणि डोळे न उघडताच शेजारच्या चेअरवर ठेवलेली बॅकपॅक खाली घेऊ लागला. बॅग खाली ठेवता
ठेवता डोळे उघडून बघतो तर त्याच्या समोरच्या खुर्च्यांच्या ओळीतल्या एकाजणाला कोणीतरी
बसायला जागा व्हावी म्हणून रीक्वेस्ट करत होती. त्याने पोटावरचं पुस्तक उचलून पुढे
वाचायला सुरुवात केली. थोड्याच वेळात जेव्हा लिलीने रायलला सेपरेट होण्याचा पक्का निर्णय
सांगितला त्याच्या पुढे त्याला वाचवेना. त्याने यावेळी पुस्तक चेहेऱ्यावर ठेवत डोळे
मिटले.
लॉंग डिस्टन्स असूनही त्यांच्यातला स्पार्क ट्रिपनंतरंही कायम होता. तो पुण्यात ती मुंबईत पण फोनवर अहोरात्र बोलणं, जमेल तसं भेटणं चालू होतं. फॉर्मली दोघांनीही एकमेकांना प्रपोज वगैरे केलं नव्हतं आणि तशी त्याची गरजंही नव्हती. त्याच्या बंद डोळ्यासमोर परत एकदा २००६ चे दिवस दिसू लागले होते पण यावेळी चित्र जरा धूसर दिसत होतं, याला कारण मगाशी बॅग उचलायची रिक्वेस्ट करणारा आवाज होता.
ती अली तशी ती अविरत कोणाशी तरी फोनवर बोलत होती.
बोलण्यावरुन नवऱ्याशी बोलत असावी असा सहज अंदाज लावता येत होता. बोलता बोलता ती म्हणाली,
"सी देअर इज नो साच थिंग ऍज बॅड पीपल, वुई आर ऑल जस्ट पीपल व्हू समटाईम्स डू बॅड
थिंग्ज". त्याला हे वाक्य ऐकून त्यांची शेवटची भेट आठवली. त्या दिवशी तो तिला
मुंबईला भेटायला गेला होता, तासनतास विनासायास एकत्र वेळ घालवणाऱ्या दोघांना त्यादिवशी
काय करावं हे सुचत नव्हतं, बराचवेळ काहीच न सुचल्याने त्यांनी शेवटी वो लम्हे पिक्चर
पहिला जाऊन. परत येताना गाडीत तेरे बिन मै यू कैसे जिया गाणं तिसऱ्यांदा लागलं तेव्हा
तिने सीडी बाहेर काढली आणि न राहावून त्याला असली डिप्रेसिंग गाणी ऐकत जाऊ नकोस म्हणाली,
आणि पुढे म्हणाली धिस इज नॉट द सेम गाय आय मेट इन द गोवा ट्रिप. त्याने शांतपणे तिच्या
हातातली सीडी काढून घेतली, खिडकीची काच खाली घेत सीडी लांब अंधारात भिरकावून दिली,
नाही ऐकणार प्रॉमिस म्हणत काच पुन्हा वर घेतली.
मी फार वाईट
वागले ना? तू बोल ना यार, म्हण ना की मी वाईट आहे.
तिच्या ओठांवर
बोट ठेवत तोही काहीसा याच आशयाचं बोलला होता, "नोवन इज बॅड अँड यू आर सर्टनली
नॉट, समटाईम्स द सिच्युएशन इज बॅड".
पण त्याला डोळे
मिटलेले असताना एक लक्षात आलं की फक्त या वाक्यामुळे आपल्याला ती शेवटची भेट आठवली
नाहीये, हा आवाज... असा विचार करत त्याने डोळे उघडले, तोंडावर पुस्तक तसंच उपडं ठेवलेलं
होतं, ती अजूनंही फोनवर बोलत होती, एकतर किती महिन्यांनी मी मुंबईत आलेय, तुला कित्ती
सांगितलं नाही यायचं मला गोव्याला, नाही आवडत मला गोवा पण तू कधी ऐकतंच नाहीस. आता
हि फ्लाईट डिले झालीये, वेड्यासारखं एअरपोर्टवर बसून राहायचं, घरीही जात येत नाही.
समोरची व्यक्ती काय बोलली ते माहित नाही पण ती काकुळतीला येऊन म्हणत होती, बट आय हेट
गोवा.
काहीतरी स्ट्राईक
झाल्यासारखं त्याने झट्कन चेहेऱ्यावरचं पुस्तक खाली करुन समोर पाहिलं, समोरच्या खुर्चीत
बसून फोनवर बोलणारी ती होती, हो तीच होती. त्याने तिला लक्षात यायच्याआधी क्षणात परत
डोळे मिटून घेतले. त्यांच्या शेवटच्या भेटीला आता १६ वर्ष होऊन गेली होती. त्याने डोळे
मिटले पण पुस्तक परत चेहऱ्यावर घ्यायचं त्याला सुचलंच नाही.
तब्बल १६ वर्षांनंतर
ती त्याच्या समोर, अगदी दोन हाताच्या अंतरावर बसली होती, तो परत एकदा तिच्याशी बोलू
शकत होता पण त्याने जणू तिला बघितलंच नाहीये असे डोळे बंदंच ठेवले. ती फोनवर बोलत होती
पण त्याला तिचा शेवटच्या भेटीच्या वेळचा कारमधला आवाज ऐकू येत होता.
प्लिज असं करु
नकोस, क्लीन शेव्ह कर, नीट राहा, आय'इल ऑल्वेज मिस यू, यू विल ऑल्वेज बी स्पेशल फॉर
मी.
कारमधल्या त्याने
डोळे झाकून घेतले होते, ती विनवणी करत होती, प्लिज प्रॉमिस मी तू नीट राहशील. त्याच्या
गच्च मिटलेल्या डोळ्यातून पाणी गालावर ओघळलं, ती गाडीतून खाली उतरली होती. ड्रायव्हर
साइडला येत तिने काचेवर टकटक केली, त्याने अंदाजानेच काच खाली केली.
नीट राहशील
ना? तिने परत एकदा विचारलं.
डोळ्यातून पाणी
ओघळत असताना त्याने हुंकार देत होकारार्थी मान हलवली.
तिने आय लव्ह
यू म्हणून, त्याच्या गालावरचं पाणी पुसत हलकेच ओठ गालावर टेकवले आणि पाठ फिरवून झपाझप
चालायला सुरुवात केली.
त्याने बराचवेळ
डोळे उघडलेच नाहीत, गोव्यात उघडले नव्हते तसेच...
आत्ता एअरपोर्टवरंही
त्याच्या गालावर ओठ टेकलेले त्याला जाणवले, तिचा आवाज मात्र येत नव्हता, कोणीतरी दूर
निघून चालल्याची जाणीव होत होती.
एअरपोर्टवरचा
सगळा कोलाहल थांबला होता आणि त्याच्यापासून थोडंसं दूर कोणाच्यातरी फोनची रींगटोन वाजली,
"साथिया तूने क्या किया"
आजंही काहीच
न कळल्याचा आव आणत तो मनातल्या मनात म्हणाला' "मैने किया तेरा इंतजार...."
केपी आर