Saturday, November 12, 2016

काळा बाजार संपणार का?


८ नोव्हेंबरला माझी वापीला जाण्यासाठी तयारीची गडबड चालू होती. जवळपास ८ वाजत आले होते. आमच्या कॉलेजच्या ग्रुपवर एका मित्राचा मेसेज आला की टिव्ही बघत रहा माननीय पंतप्रधान एक महत्वाची घोषणा करणार आहेत. माझी गडबड असल्यामुळे मी टिव्ही वगैरे नाही लावला, मग थोड्याच वेळात परत त्याच मित्राचा मेसेज आला की पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदी आली. माझी अजूनंही बॅग भरायची गडबड चालू असल्यानं मी त्या मेसेजकडे दुर्लक्षंच केलं. आणि त्यातल्या त्यात व्हॉट्‌सॅपवरच्या मेसेजेसला काय सिरीयसली घ्यायचं असं मनात वाटलं. पण दोनंच मिनिटात वडिलांचं बोलणं ऐकू आलं आणि कळलं की बाबा यावेळेस व्हॉट्‌सॅपवरचा मेसेज खरा निघाला. बरं आता जायची तयारी म्हणून थोड्याचवेळापूर्वी एटीएम मधून पैसे काढून आणले होते. खिशात पैसे तर होते पण सगळ्या पाचशेच्या नोटा, २-४ चारशेच्या नोटा. बरं या नोटा बदलायची किंवा बँकेत भरायची मुभा पंतप्रधानांनी दिलेली असल्यानं ते पैसे वाया जाणार नव्हते पण आत्ताच्या घडीला किमान प्रवासात मला ते पैसे पूर्णपणे निरुपयोगी होते. डोकं चालेना च्यायला आता पुढचे दोन दिवस कसं काय करायचं?

पण हा निर्णय मोठा होता, माझ्यासाठी सोडा, देशासाठी निश्चितंच मोठा होता. गैरसोय होणार होती पुढचे काही दिवस पण ती सहन करायची तयारी होती. मनातून एक प्रकारचा आनंद होत होता. वाटत होतं साला आपणंच टॅक्स भरतो ईमानदारीत (पर्यायंही नाही ना), आपण म्हणजे नोकरी करणारे. आपल्या आजूबाजूला कित्येकजण आहेत जे बाजीरावकी करतात, पेशाच्या टिमक्या वाजवत फिरतात. च्यायला एकेकजण आज सरळ होईल. आपल्याला काय बातम्या वाचायच्या, व्हॉट्‌सॅपवर जोक्स एंजॉय करायचे आणि झोप आली की कसलाही विचार न करता ताणून द्यायची मस्त. कारण काय तर घरात सगळे झाडून २५-३० हजार रुपये रोख होते, ते भरायला ५० दिवसाची मुदत जाहिर केली होती पंतप्रधानांनी आणि माझ्या इन्कम लिमिटमध्ये बसतंही असल्यानं आपण आता हे पैसे वाचवायचे कसे हा प्रश्नंच नव्हता. मोदींनी मास्टरस्ट्रोक लगावला होता आणि त्यावर मी खुश होतो.

आपल्या खिशात खर्च करण्यासाठी जास्त पैसे नाहीत, दोन दिवस तरी आपल्याला एटीएम मिळणार नाही हे सगळं माहीत असूनंही एक वेगळाच उत्साह संचारला होता. व्हॉट्‌सॅप, फेसबूकवर मोठ्या उत्साहात गप्पा, फॉर्वर्डा फॉर्वर्डी केली. दरम्यान एक एकदम सुखावणारा मेसेज आला की ज्य नव्या दोन हजाराच्या नोटा चलनात येणार आहेत त्या नोटांमधे अशा काही विशेष सुविधा असणारेत की काळा पैसा जमवणंच काय तर तसा विचार करणंही कसं कठीण असणारे ईथून पुढे. ती बातमी वाचून तर आभाळ ठेंगणं झाल्यागत वाटायला लागलं. नेमक्या शब्दात कसं काय सांगू आता पण लै लै भारी वाटत होतं, म्हणलं च्यायला कायतरी धुव्वा होणार आता.


मग ते बारामतीत भव्य शेकोटी, पवारांनी रद्दीच्या भावाची विचारणा केली वगैरे असले फालतू जोक वाचून डोकं जड व्हायला लागल्यावर यूवर स्टोरी आणि ईकॉनॉमिक टाईम्सवर याबद्दलची माहीती वाचायला सुरुवात केली.
दुसऱ्या दिवशीही सकाळी लवकर उठून ईटी नाऊ, बीबीसी चॅनेलवर अर्थशास्त्रातल्या तज्ञांच्या मुलाखती पाहिल्या, चर्चा ऐकल्या आणि जमेल तेवढं वाचन चालू ठेवलं. नव्या नोटातल्या सुविधा, चीप बीप वाला आनंद काही जास्त वेळ टिकला नाही. अगदी सकाळी दहा वाजायच्या आतंच कळलं की नोटांसारख्या नोटा असणारेत, चीप वगैरे सगळ्या अफवा. साला १२० मीटर खोल दडपून ठेवल्या तरी सापडतील नोटा असं कळलं होतं पण हे खोटं आहे हे कळायला १२० तासांचीही वाट बघावी लागली नाही. मग आर.बी.आय. मधे एक भाऊ जॉब करतो, त्याला मेसेज केला. त्याच्याशी बोलताना जाणवलं की आपलं या विषयावर जे काही म्हणून वाचन चालूये योग्य दिशेनं चालूये.


जसाजसा अजून वेळ जात होता तसंतसं सुरुवातीचा अतिउत्साह जाऊन आपल्याला अर्थशास्त्रातलं शून्य कळतं हे लक्षात येऊ लागलं होतं. मग किमान वाचन करुन आपल्याला जे कळतं, म्हणजे लॉजिकली जे पटतं ते म्हणू आपण त्या अनुशंगानं सगळ्या घाडामोडींचा अर्थ लावायचा प्रयत्न चालू झाला. पंतप्रधान किंवा भाजप समर्थक किंवा या मोठ्या निर्णयानं भारावून गेलेल्या किंवा हुरळून गेलेल्या लोकांनी आतापर्यंत जाहीर करायला सुरुवातंही केली होती की या निर्णयामुळे देशातला काळा बाजार संपुष्टात येईल. कसं आपण आता महासत्ता होणारंच, ब्ल्याक मनीवाल्या शार्क्सला कसं जाळ्यात पकडलंय याबद्दलचे मेसेजेस येऊ लागले.

पण या सगळ्या दरम्यान मोठा भ्रमनिरास या गोष्टीमुळे झाला होता की पंतप्रधान सांगत होते की या मोठ्या नोटांवर बंदी आणल्यानं काळ्या पैशाला पायबंद बसेल आणि लगेच काही दिवसात पाचशेच्या नव्या आणि दोन हजाराच्या नोटा चलनात आणणार असल्याची घोषणाही केली होती. बरं आतापर्यंत हे ही कळलं होतंच की दोन हजाराच्या नोटात चीप किंवा काही जगावेगळी सुविधा, तंत्र नसणारे. एका बाजूनं मोठ्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे काळा पैसा नियंत्रणात येईल असं सांगितलं जात होतं आणि दुसऱ्या बाजूला त्यापेक्षा मोठ्या नोटा चलनात आणायची घोषणाही केली जात होती. या सगळ्यामुळे मूळ उद्देशालाच सुरुंग लागला होता.

दुसरी गोष्ट म्हणजे जसजसं यावर अजून विचार करु तसतं पटू लागलं की काळा पैसा काय मोठमोठे बिजनेसमन, पुढारी वगैरे फक्त नोटांमधे जमवत नसतील. पिक्चरमधे दाखवतात तसं बाथरुमच्या टाईल्समागे, गादीत, उशांच्या आभ्र्यात, गोदामातल्या पोत्यात भरुन ठेवत नसणार सगळेच निश्चित. बड्या बड्या धेंडांकडे यापेक्षा एक-सो-एक पर्याय असणार साला काळा पैसा दडवण्याचे. सोन्यात, जमिनीत, बाँडमधे, डॉलरमधे वगैरे वगैरे मध्ये काळा पैसा लपवणं ज्यास्तं सोयीस्कर नाही का आजच्या ग्लोबलाईझेशनच्या जमान्यात? बरं याचा अर्थ काय तर काळा पैसा बाहेर येणारंच नाही का? तर तसं बिल्कुल नाही. काळा पैसा बाहेर येईलंच पण तो काळा पैसा मुख्यत्वे छोटे किंवा मध्यम स्वरुपाचा काळा पैसा बाळगून असलेल्या माणसांचा बाहेत येईल. काही प्रमाणात लोक आपल्याकडचा पैसा जाहीर करतील, काही प्रमाणात आपले काँटॅक्ट्‌स वापरतील, तर काही जण आपाल्या कमायीपेक्षा काही प्रमाणार जास्त दाखवून त्यावर कर आणि शिवाय दंडही भरतील. पण बड्या धेंडांकडे यातून काही ना काही पळवाटा काढण्यासाठी मार्ग हे असतीलंच असतील. याचा अर्थ काय तर मोठ्या प्रमाणात ज्यांच्याकडे काळा पैसा आहे ते यात सापडणं कठिण आहे आणि सापडले तरीही त्यांच्यासाठी परीणाम भयंकर नसतील, जे सापडतील ते स्मॉल आणि मिड कॅप लोक सापडतील. यातून काळा पैशावर मोठ्या प्रमाणावर अंकुश बसेलंच पण तेवढ्याच प्रमाणात अडचणीही येतील कारण भारतातला जवळपास ६० टक्क्याहून अधिक व्यवहार हा रोखीनं होतो, असंघटीत क्षेत्र हे मोठं आहे आपल्याकडे. शेतजमिनींचे भाव लवकर खाली येतील, प्रॉपर्टीजचे भाव खाली येयला वेळ लागेल. बँकांमधे मोठ्या प्रमाणात ठेवी वाढल्यामुळे कॅश रिझर्व वाढेल. मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यानं बँकांना कर्ज देणं सोपं होईल आणि त्यामुळे कदाचित बँका व्याजदर सुद्धा कमी करतील. हे सगळे शॉर्ट टर्म परिणाम असतील. जसजसं नवीन चलन व्यवहारात येईल तसं मागणी पुरवठ्याचं संतुलन राखलं जाईल आणि गोष्टी स्टॅबिलाईझ होतील.

पण या सगळ्या गदारोळात एक वाईट गोष्ट हि आहे की ज्याबद्दल सरकार, पंतप्रधान आणि सर्व समर्थकांकडून मोठ मोठ्या आवाजात गाजावाजा केला गेला तो काळा बाजार संपणार नाही, नव्या मोठ्या नोटा आणि वर नमूद केलेले विविध पर्याय अजूनंही उपलब्ध असतील. नजीकच्या काळात वेगवेगळ्या राज्यात निवडणूका आहेत, त्यामधे सर्वप्रथम आपल्याला या काळ्या पैशाची चुणूक दिसेलंच. काळ्या पैश्यावर खरंच गंडांतर आलं तर पुढारी जनतेकडे वर्गणी मागतील, निवडणूकीचे मोठमोठे खर्च त्यांना परवडणार नाहीत, बॅनर, होर्डिंग्ज, प्रचारासाठी मोठमोठ्या बाईक कार रॅलीज नसतील. जमेल तेवढा चालून, लोकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन प्रचार केला जाईल. लाखो लोकांना पर्सनलाईज्ड एसेमेस येणार नाहीत. स्मार्ट कार्ड टाईप मतदानाच्या पावत्या वाटल्या जाणार नाहीत. दारु पार्ट्या, डिजे आणि पैश्याची आमिषं हद्दपार होतील. आभाळात नेत्यांची हेलिकॉप्टर्स घरघरणार नाहीत, वर्तमानपत्राची मुख्य पानं राजकीय पक्षांच्या मोठमोठाल्या जाहिरातींनी व्यापली जाणार नाहीत. राजकिय नेत्यांच्या, पुढाऱ्यांच्या मुलामुलींची लग्न म्हणजे राजेशाही सोहळे असणार नाहीत. अंगावर किलो किलोनं दागिने घालून टिनपाट राजकारणी मिरवणार नाहीत. भारत जगातला सगळ्यात स्वच्छ देश होईल, कारभारात पारदर्शकता असेल, एका दिवसात देशाच्या दोन दोन तीन तीन टोकाच्या वेगवेगळ्या ठिकाणी पंतप्रधान प्रचारसभा घेणार नाहीत, विरोधक पाण्यासारखा पैसा आणि दारु ओतणार नाहीत. मागे पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे खरंच आपण भारतात जन्माला आल्याचा आपल्याला पश्चाताप होणार नाही. आणि कसल्याच प्रकारचा अवाजवी खर्च परवडणारंच नाही सताधारी किंवा विरोधी पक्षाला...
भारत व्यवसाय करण्यासाठी वन ऑफ द मोस्ट फेवरेबल डेस्टीनेशन होईल, परकीय चलन गुंतवणूक वाढेल, नोकऱ्या वाढतील आणि थोडक्यात सगळं सुजलाम्‌ सुफलाम्‌ होईल.

आणि यातलं काहीच झालं नाही तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा आत्ता लाँग टर्ममधे काळा बाजार संपुष्टात येणारंच असा केलेला गाजावाजा हा फसवा असेल, आत्ताची उपाययोजना चांगली असली तरी ती तात्कालिक किंवा टेंपररी असेल. करंसी ब्यान आणि त्याहूनही नवी करंसी व्यवहारात आणण्यानं प्रदीर्घ कालावधीसाठी काळा पैसा नियंत्रणात येणार नाही.

तोवर थोडीफार विरोधी मतं असणार एकमेकांची याची मनाशी खूणगाठ बांधूया, मतभेदांचा आदर करुया, सरकारचा कोणताही निर्णय असू दे त्यातल्या त्रुटी न दाखवता फक्त गोडवेच गा असा अट्टहास सोडूया, पूर्वग्रहदूषित नजरेनं मोदी करतील ते सगळं चूक आणि वाईटंच असं म्हणनंही सोडूया, चांगल्या कामाला चांगलं म्हणायला शिकू या, तटस्थ भुमिका घ्यायला जमलीच नाही तर किमान तटस्थ भुमिका घेणाऱ्यांची हेटाळणी करणं आणि त्यांच्या अंगावर धावून जाणं सोडू या. सर्वात महत्वाचं म्हणजे किमान एक चांगली सुरुवात करायचा प्रयत्न म्हणून आपण पंतप्रधानांच्या या निर्णयाचं स्वागत करुया आणि पंतप्रधानांना पुढच्या वाटचालीसाठी व आव्हानांसाठी शुभेच्छा देऊया.

केपी आर



दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...