Wednesday, April 5, 2023

यू हॅव रीच्ड भाग ४

 त्याला सहसा स्वप्नं पडत नसंत. नीलाला मात्र खूप स्वप्न पडायची. कधी दिवसभर ज्या गोष्टीचा फार विचार केला असेल त्याची, तर कधी बेसंबंध, तर कधी पारंच अगम्य.

आज मात्र तो झोपला आणि त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात त्याच्या अंगावर कडक इस्त्री केलेला फॉर्मल ड्रेस, पायात लेदरचे शूज होते, डोक्याशी ऑफिसची बॅकपॅक घेऊन तो गाऽढ झोपला होता. अस्ताव्यस्त केस आणि चेहऱ्यावरचा थकवा स्पष्टं दिसत होता. तो जिथे झोपला होता तिथे सोसाट्याचा वारा सुटलेला, त्यावर त्याचे केस उडत होते आणि आणखी अस्ताव्यस्त होत होते, पॅंटमध्ये टकइन केलेल्या शर्टात वारा घुसून त्याचा फुगा होत होता. धुळीसोबत कागदाचे कपटे, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि सुकलेल्या फुलांच्या पाकळ्या वाऱ्यावर उडत होत्या. तो कुठे झोपलाय हे त्याला कळेना तसा मागे सरकत त्याने पूर्ण फ्रेम नजरेत बसवून बघायचा प्रयत्न केला तर आजूबाजूची जागा आता जऽरा ओळखीची वाटू लागली. एक अजस्त्र वडाचं झाड, झाडाच्या फांद्यावरुन  लोबणाऱ्या पारंब्या, झाडाच्या बाजूने बांधलेला प्रशस्त पार. पाराच्या पंधरा एक फुटांवर एक भलीमोठ्ठी कंपाऊंड वॉल. एवढी मोठी कि त्याने पायापासून वर पाहायला सुरुवात केल्यावर वरचं टोकंच सापडेना, थेट आभाळाला टेकल्याचा भास होऊ लागला. भिंती अलिकडचं जग वेगळं आणि पलिकडचं वेगळं, सरसकट दोन भाग करणारी सीमारेषाच जणू. पण भिंतीच्या आतल्या बाजूने बाहेर काय आहे याचा अदमास लावणं कठिण, खरंतर आतल्या बाजूला तो असूनंही तो नेमका कुठंय याचा अंदाज त्याला लावता आला नव्हता. कंपाऊंड वॉल आणि पाराला चिकटून उगवलेली रानटी झाडांची रोपटी. हे सगळं कुठे तरी निश्चितंच पाहिलंय असं त्याला स्वप्नात जाणवत होतं. वाऱ्यावर उडणारी धूळ कि रानफुलांचा वास नेमकं काय नाकात गेलं ते त्याला कळलं नाही पण त्याला जोरदार ठसका लागला. त्यानं कुस बदलली, उबळ कमी झाली पण ठसका पूर्णपणे थांबला नाही. गुडघे पोटाशी घेत तो तसाच खोकत खोकत पडून राहीला. तो जागा असल्यासारखा झोपेतंही स्वप्नातली ती जागा नीट निरखून पाहू लागला आणि मग त्याला लक्षात आलं तो मातीत म्हणजेच जमिनीवर झोपला होता. खोकला अजूनंही पूर्ण थांबला नव्हताच त्याचा, भवतालाचा अदमास घेता घेता त्याला एकदम स्ट्राईक झालं, तो कैलास स्मशानभूमीत झोपला होता. ठसक्याचा जोर कमी झाला नव्हता, झोपेतंच त्याला पाठीवरुन कोणी तरी हात फिरवल्यासारखं वाटलं. त्याला डोळे उघडून बघावं वाटत होतं पण डोळ्यावरची ग्लानी काही केल्या जाईना, इतक्यात पाठीवरचा हात त्याच्या गालावरुन फिरला आणि स्वप्नात झोपलेल्या त्याने चपापून डोळे उघडले. तो हात, तो स्पर्श ओळखीचा होता पण, पण गालावर कोणीतरी बर्फ फिरवावा असा तो थंडगाऽर होता. डोळे पूर्ण उघडताच त्याला लक्षात आलं तो नीलाच्या समाधीच्या पायथ्याशी झोपला होता, आता फारसा विचार न करता त्याला लक्षात आलं कि तो स्पर्श नीऽलाचा होता. तो स्पर्श ओळखल्या बरोबर पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत वीजेचा झटका बसावा अशी त्याची अवस्था झाली. अंगावर सर्रकन् काटा आला आणि तेव्हाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. झाडाचा आडोसा वगैरे न शोधता तो तसाच पावसात चिंब भिजत उभा राहीला आणि आता त्याला खरोखरंच जाग आली.

जाग आली तेव्हा त्याला दरदरुन घाम फुटला होता, अंगावरचा शर्ट घामाने ओलाकच्चं झालेला, जणू तो खरोखरंच पावसात भिजला होता. हात लांब करत त्याने पहिल्यांदा पंख्याचं बटन दाबलं पण पंखा लागेना, लाईट गेली  होती. बसल्या जागेवर त्याने नजर फिरवली तेव्हा त्याला अंधारात चमकणारे चहाचे दोन रीकामे कप दिसले. डोळ्यांवरची ग्लानी जशी कमी झाली तसं त्याला आठवलं कि झोपी जाण्याआधी त्याच्या घरी निलेश येऊन गेला होता किंवा निलेश आल्याचा त्याला भास झाला होता. तो भास होता कि सत्य या विचित्र द्वंद्वामुळे परत डोकं बधीर होऊ नये म्हणून त्याने जाणीवपूर्वक त्याला कोणतं स्वप्न पडलं होतं हे आठवायचा प्रयत्न केला. स्वप्नात तो झोपला होता आणि कदाचित स्वप्नातल्या झोपेतंही त्याला स्वप्न पडलं होतं, नीलाच्या थंडगार स्पर्शाने स्वप्नातल्या स्वप्नातून तो जागा होऊन तो मुसळधार पावसात भिजत होता. तसा भिजत असताना त्याला झोपेतून जाग  आली होती. नेमका भास कोणता? स्वप्न कोणतं? स्वप्नातलं स्वप्न, भास या सगळ्याची टोटल लावता लावता त्याचं डोकं परत एकदा जड होऊ लागलं होतं.

नीलाला विचित्र किंवा अगम्य स्वप्नं पडायची तेव्हा ती कितीही गडबडीत असली तरीही त्याला सांगून त्याचा काय अर्थ असावा याची उकल केल्याशिवाय आपल्या कामाला लागायची नाही. त्याला आता पुसटसं आठवलं कि मागे एकदा नीलाने त्याला सकाळी उठल्या उठल्या एक विचित्र स्वप्न पडल्याचं सांगितलं होतं. ते स्वप्न काहीसं असंच होतं. तिला स्वप्न पडलं होती कि तिच्या स्वप्नात प्रशांत एका अनोळखी ठिकाणी झोपला होता, त्याच्या स्वप्नात वादळ सुटलं होतं. त्याला ठसका लागला तेव्हा प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून तिने त्याच्या पाठीवरुन हात फिरवायचा प्रयत्न केला तेव्हा प्रशांत जिथे झोपला होता त्या जमिनीखालून तिचा हात बाहेर आला. तिने पाठीवरुन हात फिरवून गालावर हात टेकवून त्याला मिठि मारण्याआधी तो चपापून उठला होता. तो कुठे झोपला होता, तिचा हात जमिनीखालून कसा काय आला, तिच्या स्पर्शाने तो दचकला का, ती जमिनीखाली काय करत होती, आभाळाला टेकणारी कंपाउंड वॉल, या सगळ्याचा अर्थ काय हे त्या दोघांनाही  लक्षात आलं नव्हतं.

साला हे काय चाललंय, माणूस भेटल्याचा भास होण्यापर्यंत ठिक होतं, मेलेल्या बायकोला हयात असताना पडलेलं स्वप्न तंतोतंत तसंच आपल्याला कसं काय पडू शकतं, का स्वप्न पडल्याचाही भासंच झाला आपल्याला? स्वप्नं, स्वप्नातलं स्वप्न, खरे प्रसंग, स्वप्नांतले भास, भासातले स्वप्न या सगळ्यांची डोक्यात सरमिसळ झालेली असताना त्याला घरात स्वस्थं बसणं शक्य नव्हतं. निलेश म्हणल्याप्रमाणे आपल्या डोक्यावर परीणाम झालाय किंवा होऊ लागलाय असं त्याला आता वारंवार वाटू लागलं होतं, खरंतर निलेशने फक्त सायकॅट्रीस्टकडे जाणं सुचवलं होतं, डोक्यावर परीणाम झालाय ही जोड त्याच्या मनाचीच. या सगळ्याच्या मूळाशी कैलासंच आहे, याची सुरुवातंच स्मशानाच्या आकर्षणातून झालीये का अशी शंका त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात जोर धरु लागली होती. तरीही ती ओढ काही केल्या कमी होत नव्हतीच. सिगारेटच्या पाकिटावरचे वैधानिक ईशारे वाचून, भयावह फोटो बघूनंही सिगारेट ओढणारा त्याकडे सोयीस्कर रीत्या दुर्लक्ष करुन आपण शाश्वत अशा दरीत उडी मारतोय, जिथून परतणं शक्यंच नाही हे मनोमन माहीत असूनंही सिगारेट ओढणं सोडत नाही तसं कैलास त्याच्याकडून सुटत नव्हतं.

या सगळ्या विचारचक्रातून बाहेर पडण्याचा रामबाण उपाय होता त्याच्याकडे. काही विषांवर जसा विषाचाच उतारा चालतो तसंच कैलासचे विचार, त्यातून होणारी मानसिक तगमग, कन्फ्युजन्स या सगळ्यावर त्याच्यासाठी उताराही कैलासंच होतं. कैलासमध्ये जाऊन शांत बसून राहणं हे त्याच्यासाछी मेडीटेशनपेक्षा कमी नव्हतं. त्याने हात लांब करत हॉलमधली खिड़की उघडली, कडकडकडकड आवाज करुन धोधो पावसाला सुरुवात झाली. अवकाळी मुसळधार कोसळणाऱ्या पावसात कसलीही लगबग न करता फॉर्मल ड्रेस घालून सावकाशीनं पावसाचा थेंब न थेंब अंगात मुरवून घेत तो कैलासच्या दिशेनं चालू लागला. 



दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...