अशीच होती ती पहिल्यापासून
गजबजाटात "एकटी"
डोळ्याला पाणी अन काळजाला रुखरुख
जवळ तिच्या फार
मित्र होते मोजकेच चार
पण..
एकटेपणा जिव्हाळ्याचा वाटायचा
मेघ दाटायचे डोळ्यात
अन आठवणींचे हुंदके अडकायचे गळ्यात
भरल्या नभासमोर रीते व्हायचे डोळे
तिचं अन नभाचं हितगुज तिचं तिलाच कळे
रातीच्या अंधाराचा वाटायचा आधार
काळोखंच होता आपलासा निर्गुण निराकार
वाटायचं बसून रहावं एकटंच
एकटंच..
त्या चंद्रासारखं..
चांदण्यात राहूनंही होतं सुख पारखं
तिचं तिलाच नाही गवसलं वेदनेचं मूळ
केव्हापासून होतं डोक्यात एकंच खुळ
शोधताना खोल.. खोलवर कुठेतरी
सोबत होते सगळे पण साथ नव्हती खरी
तिनंही सोडला नाद मग शोधायचा
अन जडला उरी छंद "वेदना" जपायचा
जपलंय तिनं.. जोपासलंय आता
एकटेपणाही एकटा वाटत नाही आताशा
तरीही कोणीतरी जातं हिणवून
डोळ्यातल्या मेघाला जरासं खुणवून
कोणी म्हणतं मग.. हळवी, वेडी कोणी सेंटी...
पण...
गोष्ट एकंच खरी..
अशीच होती ती पहिल्यापासून
गजबजाटातही "एकटी"
कुणाल प्रकाश रुद्राके
