Tuesday, November 29, 2011

"पेन्सिल स्केचेस"


"पेन्सिल स्केचेस"




जादू होती तिच्या बोटात..
हो.. पेन्सिल स्केचेस काढायची ती
डोळ्यांना दिसणारं अन काळजाला भावणारं
सगळं काही उतरायचं तिच्या कॅन्व्हासवर
जपून ठेवायची मग कागदावरचे ते क्षण
काय काय अन कसं कसं
सुचेल तसं अन दिसेल तसं
नेहमी म्हणायची ती..
ब्लॅक अँड व्हाईटची जादू कळणार नाही तुम्हाला..
बघता बघता जिवंत व्हायचा मग कागद अन कागद
आज पसरले होते सारेच तिच्या अवती भवती
अन अस्ताव्यस्त..
त्यानं तिला दिलेला पहिला गुलाब..
चेहऱ्यावर उडणारी केसाची बट
दोन्ही खांद्यावरुन घेतलेला झिरझिरीत दुपट्टा
हळूच गालांत हसणारी ती
अन लाजेनं झुकलेली नजर..
मरीन ड्राईव्हवर पाठमोरे बसलेले ते दोघे..
किनाऱ्यावर आपटून उसळलेलं पाणी
त्याच्या खांद्यावर तिनं टेकवलेलं डोकं
अन त्यानं तिच्याभोवती गुंफलेला हात
रीमझिम रीमझिम बरसणारा पाऊस
तिच्या गालावरुन वाहणारे पावसाचे थेंब
भान हरखून तिच्याकडे बघणारा तो
एक हातानं त्याचा हात घट्ट धरुन
एका हातात पाठीमागे मिटलेली छत्री लपवणारी ती
बाईकवर ते दोघे..
भन्नाट वेग..
मागे बसून दोन्ही हात पसरुन वाऱ्याला कवेत घेणारी ती..
एक छोटासा कॉफी जॉईण्ट
कॉर्नर टेबल..
मंद प्रकाशात बसलेले ते..
दोघांमधे एकंच कप..
तिच्या चष्म्यावर जमणारी वाफ
अन त्याच्या डोळ्यात तिचं प्रतिबिंब..

सारं काही अनुभवलेलं
सारं काही जगलेलं
अन जीवापांड जपलेलं
सगळं सगळं रेखाटलं होतं तिनं
.
.
.
अस्ताव्यस्त पसरलेलं एकेक चित्र बघता बघता
भरुन आलं तिच्या डोळ्यात..
क्षणात सारी चित्र ओघळली मग गालावर..
ईतका वेळ मुठीत घट्ट धरलेलं खोडरबर..
दोन बोटात धरलं तिने..
बेछुटपणे एकेका कागदावर फिरत राहीलं ते..
प्रयत्न केला तिनं आटोकाट.. पण

पसरुन राहीली कागदावर अन काळजावर
आठवणींची काजळी...

कुणाल प्रकाश रुद्राके

Tuesday, November 15, 2011

सावल्यांच्या पाऊलखुणा..


 सावल्यांच्या पाऊलखुणा..


तुझ्या आधी अन तुझ्या नंतर
सावल्याच फक्त अन हे अंतर
काळोखाचा लळा लागला..
जपता आठवं अशी निरंतर
आठवांच्या मातीमधली वाट एकली कधीच नव्हती
जपता जपता निखळणारी माळ गुंफली कधीच नव्हती
धागा निसटला नकळत तेव्हा.. आता कसले जपतो जर तर?
तुझ्या आधी अन तुझ्या नंतर
सावल्याच फक्त अन हे अंतर
तुझ्यासवे हा चांदणसडा
पूनवेनही भरला चुडा
चांदवाही चमके भाळी
सूर्व्यालाही तेज झळाळी
तुझ्याविना धगधगतं नभ
तुझ्याविना कसलं जग?
तिरप्या उन्हात वाढत्या सावल्या
भरल्या डोळ्यात वाहत्या बाहुल्या
सूर्व्या, चांदवा नभही जर्जर..
तुझ्या आधी अन तुझ्यानंतर
सावल्याच फक्त अन हे अंतर
हिरमुसली जरी.. ती वाट अजूनी खुणावते
जाता जाता आठवांनाही क्षणात तिथे बोलावते
काळजाच्या ठोक्यांनाही साद तुझी सतावते
एकल्याच त्या वाटेवरती सांग कसे हे जगायचे
डोळे झगडतात आसवांशी
आसवंही पापण्यांशी
ओघळता ते गालांवरती वाट अडखळे पावलांशी
एकला मी कधीच नसतो साथ मिळते सावल्यांची
हसतो रडतो बोलतो भांडतो
फक्त आता या सावल्यांशी
दिस विझतो रातही सरते
वाटेलाही आस असते फक्त तुझ्या पावलांची
बोलत राहतो असाच मग मी आठवांशी तुझ्या पुन्हा
कितीक जपाव्या काळजानं त्या सांग
सावल्यांच्या पाऊलखुणा... सावल्यांच्या पाऊलखुणा..


कुणाल प्रकाश रुद्राके

Tuesday, November 1, 2011

"पैज हारलो मी..."

"पैज हारलो मी..."




सामानाची आवरा आवर करुन तो काऊंटरपाशी गेला
अटेंडंटनी भांडी, सतरंज्या सगळं सामान मोजून घेतलं
डिपॉझिटमधून वजा करुन कार्यालयाचं भाडं दिलं त्यानं
थकलेला तो दोन मिनिट तसाच बसला खुर्चीत
धुळीनं माखलेले हात, चुरगळलेले कपडे,
पेंगुळलेले डोळे, दुखरे पाय
कपाळावरचा सुकलेला गंध.. अन..
तसाच सुकलेला त्याचा चेहरा
खुश होता तो खूप..
.
.
.
भाडं देऊन पाकिट खिशात ठेवताना
आपसूकंच त्याची नजर पाकिटातल्या फोटोकडे गेली..
एवढीशी ती तरीही त्याला कडेवर घेतलं होतं तिनं
तो मात्र लाथा झाडायचा तिनं जवळ घेतल्यावर
तिच्या वस्तू घेऊन पळून जायचा तिला वाकुल्या दाखवत
रागारागात तिचे केस ओढणं तर नेहमीचं होतं
अगदी डोक्याला टेंगूळ येईपर्यंत
तिच्यावर रुसायचा.. तोंड फुगवून बसायचा
पाठीत गुद्दा घालून पळायचा
जमेल तितकं अन जमेल तसं तिला छळायचा
उलटसुलट बोलायचा अन उद्‍धटपणे वागायचा..
फार "मोठा" झाल्यासारखं वाटायचं त्याला
आई ओरडायची नेहमी त्याच्या नावानं
"मेल्या, ताईडी लग्न करुन जाईल ना तेव्हा बसशील रडत"
ह्यॅ रडणार आणि मी..? लावतेस पैज? म्हणत तोंड वेंगाडून हसायचा तो..
ती मात्र जपायची त्याला जीवापाड
आई-बापा पेक्षाही जास्तच करायची त्याचे लाड
त्याची पहिली सायकल, पहिला गॉगल, पहिली ट्रेंडी सॅक
कॉलेजची अ‍ॅडमिशन, पहिली बाईक..
सगळंच तर ताईडी घ्यायची त्याला... "पहिल्यांदा"
सगळ्या मागण्या, हट्ट, पॉकेटमनी.. ताईडीच पुरवायची
तरीही राग येयचा त्याला तिचा आणि आई डॅडाचा..
सगळ्यांदेखत चिंट्या म्हणून हाक मारायची ती त्याला
कुठल्याही गोष्टीत तिचंच मत ऐकायचे सगळे..
ताईडीला आलेलं स्थळ, माईचा जॉब.. "चिंट्याच कॉलेज"
हंम्म.. सगळे तिचंच ऐकायचे
यानं काही सांगायचा प्रयत्न केलाच तर म्हणायचे सगळे
"तू लहान आहेस अजून, गप्प बस"
लहानपणापासून चिडून म्हणायचा तो, "मी मोठा झालोय आता"
.
.
.
बघता बघता खरंच मोठा झाला होता तो..
पण.. कधीच जाणवलं नाही त्याला एक दिवस हि लग्न करुन जाईल
अगदी कालपरवापर्यंतही नाही..
तो विचारात बुडलेला असतानाच..
बीप बीप..
"चिंट्या साखरपुडा झालाय आज, लग्न नाही.. मी घरी वाट बघतेय ये लवकर"
ताईडीचा मेसेज आला त्याला..
मेसेज वाचताना कसानुसा हसला तो...
पाकीट खिशात ठेवताना जुन्या फोटोवरुन हात फिरवला त्यानं.. उगाचंच
डोळ्याच्या कडांत पाणी साठू लागलं होतं त्याच्या...
कुणास ठाऊक का... कारण..
खुश होता तो खरंतर...
हसण्याचा प्रयत्न केला त्यानं... पण गळा भरुन येत होता..
अन डोळे तर.. हंम्म..
त्यानं घट्ट मिटले डोळे अन मेसेज पाठवला

"ताईडे पैज हारलो मी..."



कुणाल प्रकाश रुद्राके

"लाईफ डजंट गिव्ह यू सेकंड चान्स"



बेडवर पडल्या पडल्या त्यानं मोबाईलवरच्या घड्याळात पाहिलं
"सव्वा अकरा"... नेहमीचीच वेळ होती
त्यानं तिला मेसेज करण्याची..
तिच्या नुसत्या विचारानंही तो सुखावला..
एक छानसा रोमँटिक एसेमेस तिला पाठववून तो गालातल्या गालात हसला...
अंगावरुन मोरपिस फिरवावं तसं कि स्वतःच एक मोरपिस झाल्यासारखं..
हलकं हलकं...
नेमकं कसं वाटत होतं...
अहं त्या फिलींग्ज शब्दात सांगणं अशक्यच..
तीनदा मोबाईल चेक करुन झाला होता, तिला मेसेज पाठवल्यापासून..
पण आज तिचा रीप्लाय नाही आला
डिलीव्हरी रीपोर्ट ऑन करुन परत तोच मेसेज पाठवला त्याने..
दुसरा, तिसरा.. आर्धा तास झाला पण... "नो रीप्लाय"
क्षणा क्षणाला बेचैनी वाढत होती त्याची..
"काय झालं, रागावलीएस? अहं.. झोपलात वाटतं.. ना.. आज काय विशेष..."
छ्या... दोन चार पर्स्नलाईज्ड मेसेज टाईप करुन परत डिलीट केले त्याने..
सहसा असं होतं नसे..
त्याच्या रोमँटिक मेसेजला तेव्हढाच रोमँटिक रीप्लाय येयचा तिचा...
फॉरवर्डेड मेसेजेस वरुन गाडी पर्स्नल मेसेजेसकडे कधी वळायची ते कळायचंही नाही दोघांना...
पर्स्नलाज्ड मेसेजेस मग "सूचक" व्हायचे..
त्यालाही कळून चुकायचं अन तिलाही..
"वुई लव्ह ईच आदर" पण व्यक्त कधीच केलं नाही... "कोणीच.."
अन त्या क्षणाचं फिलींग ती जादू काही औरच होती...
अलिखीत, अव्यक्त.. बेभान, बुधुंद सारं..
ती समोर नसूनही ती समोर असल्याचा भास व्हायचा त्याला..
घड्याळातल्या बाराच्या ठोक्यांनी तो भानावर आला..
हो नाही, हो नाही करत... हिम्मत एकवटून त्यानं एवढ्या रात्री फोन केला..
"हाय, बरं झालं तू फोन केलास.. तुला एक गूड न्यूज द्यायची होती" पलिकडून आवाज तिचा
त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
गुलाबी वातावरण, मोरपिस.. हसू सगळं सगळं विरलं क्षणात..
ऐकतोएस ना? तिच्या प्रश्नानं भानावर आला तो..
अं.. हो.. काSS.. लग्न ठरलं की काय, हा??? उगाचंच चेष्टा केल्यासारखा बोलला तो..
काय रे कसं काय ओळखलंस तू.. मला सांगायचं होतं ना तुला.. लाडेलाडे चिडून म्हणाली ती..
तू चेष्टा तर करत नाहीसं ना? सारं बळ एकवटून विचारलं त्यानं
चार चारदा खात्री करुन घेतली ती चेष्टा करत नसल्याची
ती अखंड बोलत होती, मुलगा कुठलाय, काय करतो, लग्न कधी आहे अन काय काय
पण त्याचं लक्ष नव्हतं..
गृहितंच धरलं होतं आपण ती फक्त माझीच आहे.. किमान मला सांगता निर्णय घेणार नाही कुठला..
तिच्या ॅक्शन्सही तशाच होत्या, तिचंही प्रेम होतं ना माझ्यावर..
मीच उशिर केला कि.. नाही नाही तिनं चान्स दिलाच नाही मला.. स्वतःचीच समजूत काढत होता तो..
तिचं बोलून झालं, त्यानं ऐकलं ऐकलं कुणास ठाऊक...
दोन मिनिट विचित्र शांतता दोन्हीही बाजूला.. अन..
कसंनुसं हसत म्हणाला तो..

"काँग्रॅट्स... चल मी ठेवतो"
तिनं थँक्स म्हणेपर्यंत तिला ऐकू आलं "क्लिक"
.
.
या कुशीवरुन त्या अन परत परत तेच...
ज्या विचारांनी सुखावला होता तो..
तेच विचार आता काळजावर सुरी चालवत होते..
ती दुसऱ्या कोणाचीतरी.. ह्यॅ अशक्य..
मित्रापलिकडे आपल्यात काही पाहिलंच नाही तिने.. साला आपलाच गैरसमज झाला..
मनापासून वाटत होतं त्याला हि चेष्टा असावी.. 
रहावून पुन्हा मेसेज टाईप केला त्याने, "तू चेष्टा करत नाहीस ना???? मग आपल्यात जे काही होतं त्याला काय नाव देणार"
सेंड चं बटन दाबणार ईतक्यात...
मेसेज आला... तिचाच 
अन मी चेष्टा करत असेन तर?
जरी मला माहितीये तुला मनापासून वाटतय हि चेष्टा असावी.. पण..
सोड ना... नाही करते मी चेष्टा...
तुला वेळ दिला होता मी.. सुचवलं पण कित्येकदा..
पण तू बोललाच नाहीस कधी.. वाटलं माझाच गैरसमज होतोय..
तुझ्या आयुष्यातून जायच्या आधी एकदा तरी ऐकायचं होतं तुझ्याकडून..
पण असो..
ऑल बेस्ट फॉर यूअर फ्युचर.. वुई विल ऑल्वेज बी गुड फ्रेंड्स"
.
.
"आय लव्ह यू.. आय रीअली डू.. प्लिज.." त्यानं रीप्लाय टाईप केला..
परत डिलीट केला..."आय विल मिस यू..."
हाह.. एक उसासा टाकून तेही डिलीट केलं अन एक मेसेज सेंड केला पटकनं..
"थँक्स फॉर कन्फेसिंग, काँग्रॅट्स फॉर गूड न्यूज... आणि
हो एक गोष्ट लक्षात राहिल आयुष्यभर...
लाईफ डजंट गिव्ह यू सेकंड चान्स..."

डोळ्यातलं पाणी गालावर जाणवण्याआधीच त्यानं बटन दाबलं... "क्लिक.... स्विच ऑफ"


कुणाल प्रकाश रुद्राके

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...