असंच राहू दे सारं..
असंच वाहू दे वारं..
वाऱ्याबरोबर फिरवलीस
पाठ तरी मनात राहू दे सारं
असंच राहू दे..
वहित दबलेलं फूल श्वासात
सुकलेली कळी
ओठावरचं हसू अन गालावरची
खली
माझ्या काळजातला तुझा
ठोका, वेड्या वयातल्या वेड्या चूका
वाट पाहणारे दोन डोळे,
भावनांचेते खेळ खुळे
भेटण्याची ठिकाणं,
येण्याजाण्याच्या वाटा
किनाऱ्याला येऊन विसावलेल्या
लाटा
तो सागरी किनारा अन
चांदरात
वाळूवर नक्षी कोरणारे
हात
कातरवेळ अन आभाळाची
लाली
परतीचे वेध अन हळूच
निसटणारा सूर्य डोंगराखाली
चिंब भिजवणाऱ्या पावसाच्या
धारा
जवळ आणणारा गार वारा
धमाल मस्तीचे दिवस
अन बाईकवरच्या फेऱ्या
साठवलेली सिनेमाची
तिकिटं अन दुर्गा कॅफेच्या वाऱ्या
कॉलेज कॅंटीन कट्टा
अन आपला शेवटचा बाक
फुगवलेले गाल अन नाकाच्या
शेंड्यावरचा लटका राग
मेल्स, मेसेजेस अन
माझ्यासाठी केलेल्या कविता
सारं काही मनाच्या
कागदावर उतरवून ठेव आता
विरहाचं दुःख, भेटल्याचा
आनंद
निरोपाची वेळ अन तुटणारे
बंध
बेसूर आवाजात गायलेली
गाणी
हसताना पापण्याच्या
कड्यात लपवलेलं पाणी
अन.. अन..
काळजाच्या कोपऱ्यात
जपलेल्या आठवणी..
सारं काही राहू दे
तस्सच्या तस्स..
विसरायचं का अन विसरायचंही
कसं?
पण आता..
पण आता देऊ नकोस दिल्या
घेतल्या वचनाची शपथ सारखी सारखी
राहू दे मला अशीच..
अनोळखी अनोळखी..
तरीही तुझीच..
कुणाल.
