तिनं लॅपटॉप बंद करुन बॅगेत टाकला, डाव्या हाताच्या कोपऱ्यात वन साईड युज केलेली पानं रफ वापरण्यासाठी एकसारखी करुन ठेऊन दिली, समोरचा व्हाईटबोर्ड पुसला, तिची खुर्ची सरळ करुन ठेवली, सगळा डेस्क क्लिन केला. तीन तीनदा सगळं व्यवस्थित झाल्याची खात्री केली आणि मग तिच्या क्युबिकलमधली लाईट बंद करुन सावकाश बाहेर निघाली. आज जेवढा जास्त वेळ तिला गर्दीत राहता येईल तेवढं रहायचं होतं म्हणून विनाकारणंच ती ऑफिस सुटल्यानंतरही घरी जायचं सोडून तिथेच घुटमळत बसली होती. बऱ्याच वेळानं तिच्या लक्षात आलं की या आवराआवरीच्या नादात तिच्या फ्लोअरवरचे बाकीचे कधीच निघून गेले होते आणि ती एकटीच राहीली होती.
आज एकटं रहायचं नाही म्हणून तिनं पूर्ण दिवस पॅक करुन घेतला होता, एकापाठोपाठ मिटींग्ज शेड्यूल केल्या होत्या, दिवसभरात क्षणभराचीही उसंत मिळणार नाही याची सर्वतोपरी खबरदारी घेतली होती. दुपारच्या एका मिटींगनंतर मिनिट्स ऑफ मिटींगचा कागद मोठ्या ऊत्साहात तिच्यासमोर नाचवणाऱ्या ज्युनियरच्या अंगावर, "तारीख वार वेळेसकट गोष्टी रजिस्टर करायची मोठी घाई तुम्हाला" म्हणत खेकसली होती. खरतंर ती बिलकुलंच अशी नव्हती, वेळच्यावेळी कामं करणारी लोकं तिला मनापासून आवडायची पण आजची गोष्ट जरा वेगळी होती. आजची तारीख तिला एकटेपणा जाणवून देणार होती आणि म्हणूनंच आजच्या तारखेकडे तिला होता होईस्तोवर दुर्लक्ष करायचं होतं, गर्दीत आणि त्यातल्या त्यात बिझी रहायचं होतं. संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी तिनं जमवून आणलं होतं हे सगळं. तारखेकडे फारतर दुर्लक्ष करता येतं ती पूर्णपणे विसरता येत नाही हे ती सोयीस्कररीत्या विसरायचा प्रयत्न करत होती. गेल्या चार दिवसापासून ड्रॉवरमध्ये टाकून दिलेलं डेस्कवरचं कॅलेंडर, लॅपटॉपवरचा हाईड केलेला टास्कबार आणि पर्समधे काढून ठेवलेलं हातातलं घड्याळ, तारखेकडे दुर्लक्ष करण्याच्या तिच्या या डेस्पिरेशनमुळे आजची तारीख अजूनंच ठळकपणे तिच्या डोक्यात पिंगा घालत होती. त्यातल्या त्यात बरी म्हणावी अशी एकंच गोष्ट की ती आज दिवसभर बिझी होती आणि तारीख कोणती का असेना आज तिला त्याबद्दल विचार करायला क्षणभरंही उसंत मिळाली नव्हती.
ऑफिसच्या बाहेर येत, व्हाईट बोर्डसारखी डोक्यातली तारीख खसाखसा पुसता आली असती तर किती बरं झालं असतं असं स्वतःशीच म्हणत तिनं फोन बाहेर काढून कॅब बूक केली आणि तिचा पत्ता शोधत येणारा ड्राईव्हर कॉल करेल म्हणून फोन पर्समध्ये न टाकता तसाच हातात ठेवला. ऑफिसबाहेरच्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे बघत एकटीच उभी राहिली, तसं तर म्हणायलाच फक्त एकटी कारण कितीही टाळलं तरी एकेक करत आठवणींनी डोक्यात गर्दी करायला सुरुवात केली होती. हंह... आठवणी एकटं सोडेनात असं वाटत असतानाच तिचा फोन वाजला, "वन मेसेज रीसिव्हड्". सेलिब्रेट यूअर बर्थडे विथ वेस्टसाईड, एंजॉय ट्वेंटी पर्सेंट डिस्काऊंट ऑन यूअर पर्चेसेस अॅट वेस्टसाईड. तिनं मेसेज वाचला आणि गेल्या कित्येक दिवसांपासून जे विसरायचा तिनं आटोकाट प्रयत्न केला होता त्याच गोष्टीला सामोरं जायची वेळ नाईलाजानं का असेना पण आली होती. त्याच्या कार्डावर अॅडॉन घेतला होता त्यानं तिचा हा नंबर आणि केवायसीसाठी त्याचेच डॉक्युमेंट सबमिट केलेले असल्यानं हे असले एसेमेस येणं सहाजिक होतं. गेल्या वर्षाभरात तिनं जमेल आणि आठवेल त्या सगळ्या गोष्टी अनसबस्क्राईक केल्या होत्या तिच्या नंबरवरच्या पण समहाऊ हे वेस्टसाईडचे मेसेजेस अनसबस्क्राईब करायचे राहून गेले होते.
त्याच्या गेल्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ते भेटले होते.... बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच दिवसांनी म्हणजे किमान पंचवीसेक दिवस तर सहज झाले होते. एकमेकांना भेटल्याशिवाय किंवा दिवसरात्र फोनवर बोलल्याशिवाय ज्यांचा कधी एक दिवसंही गेला नाही त्यांच्यासाठी पंचवीसेक दिवस म्हणजे नक्कीच खूप मोठा स्पॅन होता. त्याच्यासमोर बसता बसता तिनं बॅगेतला चिप्सचा पुडा काढला.
तो: कितीदा सांगितलंय तुला हे असलं तेलकट खात जाऊ नकोस
ती: आठवण आलीच नाही ना तुला माझी
तो: कॉफी घेणारेस?
ती: मिस केलं मी तुला वेड्यासारखं
तो:....
ती: आज आठवण आली तुला?
तो: जेवली नाहीयेस ना?
ती: (चिप्स परत बॅगेत ठेवत) चल मी निघते
तो: मी भेटतो तुझ्या बाबांना येऊन
ती: अंह.. नको
तो: ताईला? दोघं बोलू हवं तर
ती: वेळ... नाहीच ना कळलं तुला अजूनंही वेळेचं महत्व
तो:....
ती: मिस नाही केलंस मला खरंच?
तो:....
ती: मी केलं तुला खूप जास्तं
तो: सवय करुन घे आता...
पुढचा बराचवेळ ते दोघे एक चकार शब्दही न काढता गप्प बसून राहीले. दोघांमध्ये गुदमरणारी शांतता वाढत राहीली, तिच्या तळहाताला त्याच्या तळहाताचा उबदार स्पर्श जाणवत राहीला. न रहावून शेवटी तिनं तिचा हात मागे ओढला, त्याच्या हाताची घट्ट पकड ढिली होत होत तिचा हात त्याच्या हातून सुटला. ती तिथून निघाली तेव्हा त्यानं घट्ट डोळे मिटून घेतले होते.
कॅब ड्रायव्हरच्या कॉलनं ती भानावर आली. डेस्टीनेशन ऑलरेडी सेट केलेलं होतं पण तरी ड्रायव्हर म्हणाला मॅडम मै नया हू ईस रुट पे, थोडा हेल्प करना. हं म्हणत तिनं मान डोलावली आणि खिडकीच्या काचेतून तिच्यासाठीही तुलनेनं नव्या असणाऱ्या पुण्यातल्या रस्त्यांकडे बघत राहीली.
बाहेर बघता बघता तिला आठवलं मागच्या वर्षी त्याच्या वाढदिवसाला पहिल्यांदाच तिनं त्याला रात्री बाराला फोन केला नव्हता आणि मेसेजही नाही. त्यानंच सांगितलं होतं, सवय करुन घे. दुपारी मात्र न रहावून तिनं कॉल केला.
पलकला ये.. म्हणजे येशील? प्लिज? अधिकारवाणीनं सांगता सांगता तिनं रीक्वेस्ट केली.
तो: हंमम्... किती वेळात
ती: जमेल तसा ये.. मी ऑलरेडी पोहोचलेय.
ओके म्हणत त्यानं फोन ठेवला आणि पुढच्या पाचंच मिनिटात तो हॉटेल पलकला पोहोचला. ती आज त्यांच्या नेहमीच्या टेबलवर बसली नव्हती.
तो: आज ईकडे? आपला टेबल मोकळाय
ती: हंमम्.. सवयी मोडायच्या म्हणजे सगळ्याच मोडायला हव्या...
तो: हे बघ... मी
ती: (त्याला मध्येच थांबवत) नाही मी सरकॅस्टीकली म्हणतंच नाहीये. बरोबरे तुझं
तो:...
ती: विसरु शकशील मला?
त्यानं आवंढा गिळत, उहूं म्हणून नकारार्थी मान हलवली
असह्य दुखणाऱ्या गळ्यानं त्यानं परत एकदा आवंढा गिळत क्षणभर डोळे मिटले. परत डोळे उघडून कसंनुसं हसत म्हणाला
तो: बरं झालं आलीस.. कारण आता जाशील ते... परत न येण्यासाठीच
तिनं ईतकावेळ बॅगेत ठेवलेला बुके आणि चॉकलेट पेस्ट्री बाहेर काढली, म्हणाली
ती: मला माहितीये कोणतंही जवळ ठेवता येईल असं गिफ्ट घेऊन गेला नसतास, म्हणून फुलंच आणली
तो:....
ती: किमान आजचा काहीवेळ मनसोक्त बोल ना पहिल्यासारखा
तो: पहिल्यासारखं काय राहिलं गं आता? कितीही तसंच रहावं म्हटलं तरी तशी ना तू राहिलीस ना मी...अन वेळ तर नाहीच नाही, पहिल्यासारखा काय बोलणार आता
नजर धुरकट होत असताना त्यानं मान खाली घातली आणि समोर ठेवलेली पेस्ट्री कट करत एक घास तिला भरवला
ती: हॅपी बड्डे! आय लव्ह यू... विल ऑल्वेज डू!
तो तिच्याकडे बघत असताना तिचा फोन वाजला... जब वी मेट मधल्या "ना है येह पाना" गाण्याच्या इंस्ट्रुमेंटलची रींगटोन होती, त्याची फेवरेट म्हणून ठेवलेली. तिला मोकळेपणानं बोलता यावं म्हणून तो उठून गेला, वॉश बेसिनवर हात आणि तोंड धुवून परत येईपर्यंत तिनं बोलून फोन सायलेंट करुन ठेऊन दिला होता.
ती: आलास?
तो: मी परत न येण्यासाठी गेलोच नव्हतो कधी... चाल्लीयेस तू
ती: थांबवणार नाहीस?
तो: मी थांबू शकतो, अगदी कायमचा... ती माझी चॉईस ए.. आणि तू जाणं न जाणं, थांबणं किंवा न थांबणं ही सर्वस्वी तुझी.
ती: हे असं होयलाच हवं होतं का रे आपल्याबरोबर?
तो: जे होयला हवं होतं ते होत नाहीये... (कपाळावरुन बोट फिरवत) नशीब... दुसरं काय...
ती: ईथून खरंच मागे नाही का रे फिरता येणार परत?
तो: वन वे ट्रॅफिक ए डार्लिंग... फिरणं शक्य नाही आणि बरोबरही...
ती: तुला माहितीये ना माझ्यासाठी तू किती प्रिशिअस आहेस... प्लिज परत कधीच डोळ्यात पाणी येऊ देऊ नकोस.
तो: (मोठ्यानं हसत) आणि तू माझ्यासाठी पहाटेच्या स्वप्नासारखी
ती: हंह.. पहाटेच्या स्वप्नासारखी.. महिना दिड महिन्यावर आलंय माझं लग्न आणि तुला अजूनंही शक्य वाटतंय सगळं
तो: नाही नाही... पहाटेच्या स्वप्नासारखी म्हणजे.. जोवर असतेस तो प्रत्येक क्षण गोड करुन टाकणारी, स्वप्नात असेपर्यंत माझी. अगदी पहाटेच्या स्वप्नासारखी हवीहवीशी, मनसोक्त बघावं, मन भरुन जवागं वाटावी अशी. फक्त तेवढ्यासाठी तरी कधीच डोळे उघडू नये अशी... डोळे उघडल्यावर हे सगळं खोटं आहे, खोटंच होतं याची जाणीव करुन देणारी... डोळे मिटून परत तेच ते स्वप्न बघतंच रहावं अशी वाटणारी... असो, त्या स्वप्नात तरी कोणाचाही हक्क नाही तुझ्यावर, अगदी तुझाही नाही... बाकी पहाटेची स्वप्न खरी होतात वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही... खरंतर मिटल्या डोळ्यानी बघितलेली कोणतीच स्वप्नं खरी होतात यावर माझा विश्वास नाही
ती: पुढच्या वाढदिवसाला काय करशील
तो: पुढचा वाढदिवस कोणी पाहिलाय
ती:...
तो: जो भी है बस येही एक पल है
ती:....
किमान जाताना एकदा तरी हसून जा... तुझा हसरा चेहरा घेऊन जाऊ दे मला पुढे म्हणताना त्याला डोळ्यातून गालावर येणारं पाणी थांबवता आलं नाही.
तिनं त्याचा घट्ट पकडलेला हात सोडला, हलकेच त्याच्या तळहातावर ओठ टेकवले, म्हणाली प्लिज हसतमुख रहा... पूर्वीसारखा
तो काहीच बोलला नाही... ती निघाली तसे त्यानं डोळे घट्ट मिटून घेतले. परत कधीच न येण्यासाठी जाणारी ती बघणं त्याला शक्य नव्हतं
ती भानावर आली तोवर कॅब टिळक रोडवर आली होती. भैय्या जरा दो मिनट रुकना म्हणत तिनं ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला लावली. खाली उतरुन समोरच्या माँजिनिजमधून दोन पेस्ट्रीज आणल्या एक ड्रायव्हरला दिली, बिल पे केलं... हातातल्या मोबाईलवरुन रेडीओ स्टेशनला फोन लाऊन गाणं डिमांड केलं
निघता निघता ड्रायव्हर म्हणाला मॅडमजी कुछ खास है आज?
हंमम् म्हणून मान डोलावत म्हणाली ती, "अ डे टू रीमेंबर"
गर्दिला डिसकनेक्ट करुन कानात हेडफोन लावत चालत निघाली, तोवर रेडीओवर तिचं गाणं चालू होऊन गेलं होतं
"तेरा ना होना जाने क्यूँ होना ही है"
केपी आर
