यावर्षी उन्हाळा जरा जास्तच होता...
अंगाची लाही लाही
त्याचीच वाट पाहत होत्या
दिशा दाही
क्षणा क्षणाला वाढणारी
काहिली
अन घालमेलही वाढलेली
घामेजलेल्या अंगानं
काम करायचा तिला वैताग येयचा
तिनं ठरवलं,
"बास झालं सेव्हिंग, पुढच्या वर्षी आपणही ए.सी. घ्यायचा"
अन पावसाळ्यात नॅनो
कार घेऊ
स्वप्नातल्या पावसाला
सगळ्यांसोबत आपल्याच गाडीतून पाहू..
ती विचारात बुडली तेव्हा
आभाळ भरुन येत होतं
कपाळावरचा घाम पुसत
भानावर आली ती अन खिडक्या ऊघडल्या
नभी जमलेल्या घोळक्यात
तेव्हाच वीजा कडाडल्या
त्या आवाजानं धस्स
झालं उरात
सैरभैर नजर उगाचंच
फिरत राहीली घरात
का कुणास ठाऊक नभीच्या
काळ्या रंगानं तिला आज निराश.. हताश वाटत होतं
मनात अनामिक भीती कि
हुरहुर..
पावसाचं पहिलं पाऊल
कसल्या अघटीताची देत होतं चाहूल
कुठले प्रश्न.. कसली
उत्तरं.. विचारंही मनात कसले?? तिचं तिलाच कळत नव्हतं
वादळी वारा सुटला
ढग फुटल्यासारखा तो
पहिल्या दिवशीच बरसला.
ती असहाय्यपणे खिडकीतून
घरात येणारा पाऊस पाहत राहीली
त्याचवेळेस तो तिचे
रीपोर्ट्स घेऊन डॉक्टरांपुढे बसला होता
डॉक्टरांनी सांगितलं...
सहा महिने फक्त..
तसा त्याच्या काळजाचा
ठोका चुकला
ईकडे खिडकीतून घरात
घुसणारा पाऊस थांबला होता
पण तो आज काळ्या रंगातंच
रंगला होता...
तिला मात्र कळलंच नाही
यावर्षी... आधी वीज
कोसळलीए घरावर
अन मग पाऊस आला भेटीला
डोळ्यातून गालावर..
कुणाल
