बाबाच्या डोळ्यात दाटला जेव्हा पूर
वाहून गेलं सारं काही, उरी माजलं काहूर
काय दोष माझा सांग? प्रश्न साधा त्याच्या डोळ्यांन विचारला
निरुत्तर होतो मी त्यांच्या एका साध्या प्रश्नाला
प्रश्न होता साधा, काय दोष माझा सांग
त्याच्या डोळ्यातल्या सागराला आता कसा घालावा मी बांध?
माझ्या डोळ्यातली नदी त्याचं काळीज सागर
सागराला नदिनं कसा द्यावा त्या आधार?
त्याचे भरलेले डोळे अन दाटलेला कंठ
त्याचं हसू लोपल्याची मला वाटे खंत
आजवर, माझ्या हुंदक्यांना त्याच्या काळजात विसावा
आस एकंचं मनी, बाबा पुन्हा हसावा
असं वाटलं मनाला, त्याला मिठीतं मी घ्यावा
त्याच्या डोळ्यातला थेंब न थेंब माझ्या मिठीनंच प्यावा.
डोळे बरसले त्याचे जेव्हा दुःख झालं अनावर
बाबा रडला माझा आज भरल्या ताटावर
लाटा सागराच्या उसळल्या आज नदीच्या किनाऱ्यावर
मोठेपणाचा आणला आव, ऊगीच खंबीर अन कणखरं
बघत होता "तो" ही वरुनं असा कोरड्या डोळ्यानी
आश्रू सारे प्याले त्याच्या गालावरच्या खळ्यांनी
क्षणात डोळे पुसून बाबा जादू केल्यासारखा हसला
त्याच्या डोळ्यातंच मला आशेचा किरण दिसला
डोक्यावरुन हात फिरवून त्यानं मला जवळं घेतलं
हातामधे हात घेऊन ठामपणे सांगितलं
"हेही दिवस जातील... सुख येईल, सुख येईल"
कुणाल प्रकाश रुद्राके
