ती उठली, म्हणजे तिला जाग आली पण ती तशीच अंथरुणात लोळत पडली होती. आज काही केल्या उठून अंग झटकून कामाला लागावं असं वाटेचना तिला. पापण्या आपसूकंच मिटत होत्या आणि परत उघडायचा प्रयत्न केल्यावर किलो किलोचं वजन पापण्यांवर बांधल्यागत वाटत होतं. ती उठून बसली चेहऱ्यावरुन हात फिरवला, केस नीट केले, खिडकितून बाहेर पाहिलं खडखडीत उजाडलं होतं, उन्हाची तिरीप खिडकिच्या काचेला छेदत आख्या खोलीभर आरपार पसरत होती. खिडकिच्या बाजूच्या टेबलावर कॉफीचा रीकामा कप होता, त्याच्या शेजारी ताजी वर्तमानपत्र, त्यावर चष्म्याचा छोटासा बॉक्स. आज तिला न उठवता त्यानं स्वतः कॉफी करुन घेतली आणि पेपर वाचत एकट्यानंच प्यायली सुद्धा. त्याची डॉक्टरसोबत अपॉइंटमेंट होती म्हणून सगळं उरकून पेपर वाचून तो वेळेवर घराबाहेर पडला होता.
मागच्या भिंतीवरच्या गजानन महाराजांच्या फोटोकडे बघून तिनं हात जोडले, तोंडातल्या तोंडात काही बोलली आणि आळस झटकून उठून ऊभी राहिली, टेबलावरचा मोकळा कप उचलून धुवून ठेवला. तिनं एकदा सबंध घरात नजर फिरवली आणि बाहेरच्या चप्पल स्टँडच्या शेजारच्या कप्प्यातून रांगोळी अन हळदी कूंकवाचे डबे काढले. दरवाजाची कडी ऊघडून अंगणात रांगोळी काढण्यासाठी मांडी घालून बसली. रोजंच ती सकाळी आदल्या दिवशीची रांगोळी पुसून, झाडून सडा घालून नवी रांगोळी काढायची, खूप आवडायचं तिला सडा रांगोळी करायला. असं केल्यानं मन प्रसन्न होतं स्वतःचं अन घरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचंच असं तिनं मानणं होतं. पण आज काही केल्या तिला कालची रांगोळी पुसायची ईच्छा होईना. बराच वेळ तशीच बसून राहीली ती अंगणातल्या रांगोळीकडे बघत अगदी नजर धुरकट होईस्तोवर. पदरानं डोळ्याच्या कडा पुसत उठून ऊभी राहिली अन रांगोळी न पुसता आजूबाजूनं झाडून घेतलं तुळशीला पाणी घातलं. हे सगळं करताना तिच्या कानात सारखे तिच्या नातीचे शब्द घुमत होते, "आजी मी रांगोळी काढू प्लिज". हंम्म.. कालची रांगोळी तिच्या नातीनंच काढली होती, गोंडस गणपती अन शेजारी इंग्रजीमधे लिहिलं होतं, "Ganapati Bappa". तिनं रांगोळी आणि हळदी कूंकू परत जागेवर ठेऊन दिले.
दाराशेजारची जागा आज रीकामी होती, गेला महिनाभर तिथे दहा-पंधरा तरी चपलेचे जोड पडलेले असायचे, येता जाता ती एकेकाली ओरडायची चपला स्टँड मधे ठेवत जा रे, बाहेर दिसल्या तर एकेकाला फटके देणारे. आज तीच रीकामी जागा पाहून तिला कसंसंच झालं.
ती मग आतल्या खोलीत गेली, तिकडे नातीचे लेकीचे पॅकिंग करताना नजरचुकीनं राहीलेले कपडे पडले होते, कुठे नातवंडांची खेळणी तर कुठे नातीनं काढलेली छान छान चित्र. तिनं सगळं तसंच जागेवर ठेवत डोळ्यात साठवून घेतलं आणि दुसऱ्या खोलीत गेली. तिथे ड्रेसिंग टेबलवर नातीनं केलेलं ग्रिटींग कार्ड पडलं होतं, "आय विल मिस यू मामा", तिचा गळा भरुन आला, आता कोणत्याही क्षणी बांध फुटणार असं तिला वाटत होतं तेवढ्यात लँडलाईन वाजला, लगबगीनं हॉलमधे जात तिनं फोन ऊचलला. फोन त्याचा होता.
तो: उठलीस का?
ती: (गळा दाटलेला असूनंही जमेल तितका आवाज नॉर्मल ठेवत) हंम्म्म..
तो: कॉफी घे ओव्हनमधे गरम करुन, गॅसवर झाकून ठेवलीए.
ती: हंम्म्म.. घेते.
तो: काय करणार, लेकरं मोठी झाली ती उडून जाणारंच गं.. प्रत्येकाचं आभाळ वेगळं, महिनाभर का असेना किलबिलाट ऐकायला मिळतो, अंगाखाद्यावर खेळतात हेही काही कमी नाही.
ती: ... (गालावर गरम पाणी)
तो: मी येतोच, १५-२० मिनिटात.
ती: लवकर या
आता त्यानं डोळ्यात तरळणारं पाणी लपवत फोन बंद केला.
कॉफी गरम न करता कपात घेऊन ती खिडकीत जाऊन बसली, काच उघडून मारीचं आर्ध बिस्कीट तोडून तिनं बाहेर ठेवलं पण आज रोजच्या कावळ्याचाही पत्ता नव्हता. हातातलं आर्ध बिस्किट तिच्या गळ्याखाली उतरेना, बिस्किट तसंच हातात घेऊन ती बसलेली असताना तो घरी आला अन दरवाजाच्या आवाजानं ती भानावर आली. त्यानं आत येतंच रेडिओचं बटन दाबलं.
तो: (कपाला हात लावत) काय गं? कॉफी गार झालीये पार.
ती: ...
कॉफी ओव्हनमधे गरम करुन त्यानं तिच्या पुढ्यात आणून ठेवली अन समोर बसला. दोघंही एकमेकांशी न बोलता खिडकीतून खाली बघत बसले. बाहेर रोज नातीला मोठ्यानं आवाज देऊन बोलवणाऱ्या तिच्या मैत्रिणी त्यांच्याच नादात खेळत होत्या.
ती: आजी तुझ्या डोक्याला तेल लावू? आजी थांब थांब मी पाय दाबते तुझे.. मामा आज आम्हाला तू ग्राऊंडवर नेऊ शकतोस? आंss
ती तिच्याच नादात नातीचे डायलॉग्ज म्हणत होती. त्यानं काही ऐकलं की नाही कुणास ठाऊक.. की त्याच्याही कानात नातवंडांचे आवाज अजूनंही घुमत होते जणू आणि नजर बाहेर खेळणाऱ्या मुलांमधे नातवंडांना शोधत होती.
तो: (त्यानं चेहरा तिच्याकडे वळवत विचारलं) काय गं केवढा पसारा झालाय घरात, आवरला नाहीस? चल आज मी मदत करतो तुला.
ती: राहू द्या..
तो: अगं असं काय.
ती: राहू द्या खरंच. रोजचं ते ईस्त्री केलेलं घर अंगावर येतं. हा पसारा असला तर अगदीच मोकळं वाटत नाही घर. आठवणीनंच का असेना पण भरलेलं असूद्या जरा, आवरु हळू हळू.
ती बोलत असताना त्याचा फोन वाजला, लेकीचा मेसेज होता: पोहोचलो, पोरांना खायला घालून थोड्या वेळात फोन करते.
त्याच्याकडे बघत तिनं विचारलं कोण आहे? तिच्या हातात फोन देत त्यानं आवंढा गिळला अन फक्त म्हणाला, पोहोचले.
तिनं फोन हातात घेतला तोवर व्हॉट्स अॅपवर नातीची व्हॉईस नोट आली.
नात: आय मिस यू आजी भाऊ, मामा मामी. आजी तू प्लिज मामाला माझ्या ईयर सिक्ससाठी तिकडे अॅडमिशन घ्यायला सांगशील?
नात बोलत असताना मागून लेकिचा आवाज येत होता.
लेक: आजी भाऊंना सांग रडू नका.
नात: (रडवेल्या आवाजात) आं.. आजी भाऊ रडू नका, मी पण नाही रडत. टेक केअर
तिनं नातवंडांच्या चेहऱ्यावरुन हात फिरवल्यासारखा मोबाईलच्या स्क्रिनवरुनंच हात फिरवला अन म्हणाली सात वर्ष झाली परदेशात जाऊन पण कणभर बदललं नाही माझं लेकरु.
त्यानं डोळ्यावर चष्मा न चढवता सकाळी वाचलेलाच पेपर पुन्हा चेहऱ्यासमोर धरला, का ते वेगळं सांगायला नको.
रेडिओवर लता मंगेशकर आर्त स्वरात गात होत्या: या चिमण्यांनो परत फिरा रे~~
के.पी. आर




.jpg)
