Monday, April 21, 2014

दोघं - भाग २


एकिकडे खिडकीत बसून कॉफी पिणारे हे दोघे अन दुसरीकडे घड्याळाच्या काट्यावर दिवस सुरु केलेले ते दोघे.
अलार्म वाजला.. तिनं डोळे किलकिले करुन पाहिले, साडे पाच. स्नूझ करुन परत ती पांघरुणात शिरली. दहा मिनिटात परत एकदा अलार्म वाजला, च्च्चक करुन ती अंथरुणात उठून बसली, तो कुस बदलून पोट पायात घेऊन झोपला. रोजंच सकाळी त्याची पाठ दुखायची मग तो पाय पोटात मुडपून घ्यायचा, बरं वाटायचं थोडा वेळ. पांघरुण बाजूला सारत ती बेडरुम मधून बाहेर गेली, तोंडावर पाण्याचा हबकारा मारुन स्वयंपाकघरात गेली. भाजी मंद गॅसवर परतून, फळं चिरुन ती आवरायला गेली. आंघोळ वगैरे उरकल्यावर तिनं त्याला आवाज दिला, "प्लिज माझ्या डब्यात थोडी द्राक्ष आणि एक दोन अंजीर देतोस" म्हणत रिक्वेस्ट करत ती बाकीचं आवरायला गेली. त्यानं डोळे किलकिले करुन पाहिलं ६:२५ झाले होते, काही ऐकलं नसल्यासारखा तो परत रजई डोक्यावर ओढून पडून राहीला. पाचेक मिनिटांनी त्याला परत जाग आली, त्यानं तिच्या डब्यात फळं घालून दिली तोवर तिची निघायची घाई चालू झाली होती. एका खांद्याला पर्स, त्याच हातात डब्याची पिशवी, एका हातात कचऱ्याची कॅरी बॅग, उजव्या हाताच्या अंगठ्यामधे अडकवलेली गाडीची चावी, हि सगळी कसरत संभाळत तिनं पायात मॅचिंग चप्पल सरकवली अन निघाली. "सावकाश जा, घाई गडबड करुन गाडी चालवू नकोस, अजून ७ मिनिटं आहेत" तिला पाठमोरं पाहत त्यानं सूचना दिल्या. पुढे तसंच चालता चालता तिनं हो म्हणत हात वर करुन बाय केलं.
ती गेल्याबरोबर त्यानं आळस झटकत आवरलं, रजई, अंथरुण सगळं जागेवर ठेवलं आणि स्वयंपाक खोलीत आला. डायनिंग टेबलवर तिनं दूध-पोहे, केळी अन खजूर मिक्स करुन नेमकं पदार्थाचा नाव सांगता येणार नाही असं काहीतरी करुन ठेवलं होतं, ते उभ्यानंच खात, डबा घेऊन त्यानं "आई मी निघालो" म्हणत सातच्या काट्याला घर सोडलं. बसमधे बसतो न बसतो तोवर त्याला मेसेज आला, "निघालास तू? आणि टेबलवर ठेवलेलं खाल्लस?"
तो: हो खाल्लं, बस निघाली १५ मि. झाले. तू कुठपर्यंत पोचलीस?
ती: माझी झोपंच पूर्ण होत नाही रे. कशीबशी बस मिळाली आज, उद्यापासून १० मि. लवकर उठणार. मी पोचले पिंपरीपर्यंत
तो: आळशी होत चाल्लीएस तू. वुई विल सी किती लवकर उठतेस.
ती: :(
तो: ....
पुढल्या एक तासात दोघेही कामाला लागले. ना फोन, ना मेसेज ना व्हॉट्‌स अ‍ॅप. ११ च्या सुमारास तिच्या फोनमधे रिमांडर वाजली. सेफ्टीच्या मिटिंगमधे सगळ्यांना एक्स्युजमी म्हणत तिनं मोबाईलमधे डोकं खुपसलं. "डॉक्टर्स अपॉइंटमेंट अ‍ॅट ७:३०". तिच्या सासऱ्यांची डॉक्टरची अपॉइंटमेंट मागच्या दोन वेळा चुकली होती म्हणून यावेळेस तिनं रिमांडर सेट करुन ठेवली होती. तिनं पुढच्या मिनिटाला घरचा लँडलाईन डायल केला, "आई, आज आबांची डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे साडे सातची" आठवण करुन देत तिनं फोन ठेवला अन परत कामात बुडाली.
दुपारच्या जेवणाआधी तिचा त्याला फोन आला.
ती: जेवलास तू?
तो: नाही, जस्ट कँटीनला आलोय.
ती: ऐक ना, तू एकटा आधी भाजी खाऊन बघ, मला वाटतंय बेचव झालीए अगदीच. बरी वाटली तरंच दे बाकीच्यांना.
तो: एवढा नाही गं विचार करायचा.
ती: बघ मला मीठ कमी वाटतंय.
तो: असू दे.
ती: (थोडी अपराधीपणानं) आणि तिखटसुद्धा थोडसं.
तो: (विषय टाळत, घाईघाईनं) मी म्हणालो ना असू दे.
ती: (जरा नाराजीनं) आणि तीनंच पोळ्या दिल्यात. छोट्या डब्यात लसणाची चटणी आहे ती खा, भाजी नाही आवडली तर. आणि हो, एक अंजीर आणि ऑरेंजही दिलंय संध्याकाळी खायला.
तो: .....
ती: सॉरी मी ठेवते चल, मला माहितीए तुला बोअर झालंय, पण फ्रुट्‌स तसेच परत आणू नकोस, नक्की खा. चल बाय (फोन कट)
पंधरा मिनिटांनी तिला मेसेज...
तो: भाजी ईज डॅम गूड, एव्हरीवन लाईक्‌ड ईट. अँड या मी टू..
ती: :)
लंचटाईम, जेवण, डब्ब्याच्या गप्पा, टाईमपास, थोड्याच वेळात दोघेही परत कामात बिझी. संध्याकाळी परतीची बस अन बसमधे मेसेज
ती: निघालास? मला खूप वाईट वाटतंय रे. फिलींग लो :(
तो: (बसमधे झोपेतून जागा होत) ???????
ती: बघ ना आपल्याला जायला ८ वाजतात ऑल्मोस्ट. आई सगळं काम करतात, मला काहीच करायला जमत नाही. खूप गिल्टी फिल होतं.
तो: मलाही कळतंय गं पण वळत नाही :(
बसचा प्रवास, अर्धवट झोप, खड्डे खुड्डे, धूर धुळ, डिझेलचा वास अन त्यानंतर गाठलेलं घर. हात पाय धुवून, फ्रेश होऊन जेवण मग आईला जरातरी आराम मिळावा म्हणून दोघांनी मिळून केलेली आवरा आवर. आई आबांशी १५-२० मिनिट गप्पा आणि दमून बेडरुममधे दाखल  होणं. अंथरुण टाकून पाठ टेकते ना टेकते तोवर दोघांचा संवाद.
ती: आईंची खूप धावपळ होते रे, या वयात त्यांना सगळं करावं लागतं. मला खूप खूsssssप वाईट वाटतं रे.
तो: हम्म्मं मलाही. काय करुया?
ती: आपल्याला दोघांना तर १५-२० मिनिटही एकत्र स्पेंड नाही करता येत. गप्पा मारणं तर दूरंच पण भेटसुद्धा होत नाही आपली नीट.
तो: ....
ती: मी जॉब सोडू का? घरी सुद्धा लक्ष देता येईल. आणि या प्रवासाचा मलाही खूप कंटाळा येतो रे. सकाळी दिड तास संध्याकाळी दोन तास.
तो: ....
ती: तू कधीच काही बोलत नाहीस. झोपलास का?
तो: आज अकरा तारीख, गाडीचा ईएमआय गेला १३ हजार. ईसीएस आहे ना, ११ म्हणजे ११ ला जातोच, त्याचं १० ही होत नाही आणि ११ ही.
ती: हंम्म्म..
तो: एलायसी, रिकरिंग, पर्सनल लोन, क्रेडीट कार्ड सगळं वजा करुन ३,७०० रुपये उरलेत अकाउंटमधे, अजून १९ दिवस जायचेत.
एका मोठ्या पॉझ नंतर.
तो: (जरासा हसत) तरी बरं फोन आणि लाईट बिल तुझ्याकडे असतं.
ती: ....
.
.
.
तो: सोड तू जॉब, डेअरींग केल्याशिवाय काही होत नाही. आपल्या दोघांचं मिळून कमवण्याची जवाबदारी माझी.
ती: शूssss... झोप आता शांत. ऊशीर झालाय खूप.
तिनं कुस बदलत त्याच्या हाताची उशी केली. दोघांनीही डोळे मिटले, झोप कधी लागली कळलं नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी बसमधे त्याला मेसेज आला
ती: निघालास तू? खाल्लस टेबलवरचं? डब्बा घेतला?
तो फक्त हसला.

आणखी एक दिवस सुरु झाला होता... नव्यानं

के.पी. आर

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...