Wednesday, June 17, 2009

तुलाच शोधतोय

तुलाच शोधतोय!

अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना.
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना.
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना.
पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना.
दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना.
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना.
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना.
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना.
तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना.
तुलांच शोधतोय नि शोधत राहिन मातीत या मिसळतांना......
मरणाकडून मरणाकडे प्रवास माझा करताना.
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना.
तुलांच शोधतोय खरंच कण-कण मरतांना... कण-कण मरतांना.......

तुझांच????


कुणाल.


तो आणि ती


तो आणि ती!!!!!!

तो - आता तर सवयंच झालीए
तुझ्याशिवाय जगण्याची.
रात्र रात्र जागून त्या चंद्रातही
तुझाच चेहरा शोधण्याची.

ती - पण त्या चंद्रालही आहे खोड
तुझ्याच अंगणी पहुडण्याची.

तो - रोज पहुडला जरी माझ्या अंगणी
तरी त्याला आहे सवय अमावस्येच्या रात्री मला दगा देण्याची.

ती - अमावस्येची रात्र जरी आली
तुझ्या माझ्या प्रितीला काळी तिट लावून गेली.

तो - शोधूनही दिसेना तिट ती
नजर आता थकली आहे.
कसली प्रिती नि कसलं प्रेम
वेदना मात्र ऊरी माझ्या जपली आहे.

ती - लपलीए ती प्रित तुझ्या नि माझ्या ऊरी
आणि झालीए रातीची गत फुलपाखरापरी.

तो - फुलपाखरं ऊडली सारी
मागे आठवंण ठेऊन.
रंगच आठवतो प्रितीचे रोज रात्री
काळोखाची चादर लेऊन.

ती - त्या झालरीतंच खरं गुपित दडवलं आहे
प्रेमाची साक्ष देणाऱ्या क्षणांना
जगापासून लपवलं आहे.

तो - क्षण सारे आता हवेमधे विरले आहेत
चंद्राच्या भेटीसाठी तारेही रात्र रात्र झुरले आहेत
आठवणीचे गीत तेवढे माझ्या ओठी ऊरले आहे
माझ्या प्रत्येक शब्दाने तिलाच फक्त स्मरले आहे.........
तिलाचं फक्त स्मरले आहे.


कुणाल.

Tuesday, June 16, 2009

ईन्जिनिअरींग

ईन्जिनिअरींग
पूर्ण सेमीस्टर कट्ट्यावर बसणारा प्रत्येकजण, आपण फावल्या वेळेत ईन्जिनिअरींगही करतोय हे सोयीस्कररीत्या विसरलेला असतो.
पण आता सबमिशनच्या लास्ट डेट्स ची चाहूल लागताच, त्याच्याही नकळ्त फाईलींच्या ढिगाऱ्यामधे तो अचानक घसरलेला असतो.
कॉलेजच्या नावाखाली दिवसाही हॉस्टेलच्या रूमवर झोपा काढणारे डोळे आता रात्र-रात्र जागतात.
एकेका सबजेक्टचं सबमिशन पूर्ण करण्यासठी सारेच एकमेकांकडे आता झेरॉक्स आणि राईट-अप्स मागतांत.
घाई-गडबडीत, थोडंफार वगळून, कसं का असेना एकेक फाईल आता कंप्लिट होऊ लागते.
कष्टाची सवय नसल्यानं डोळे, पाठ, कंबर, हात; सारं शरीरंच आता निर्वाणीची भाषा बोलू लागते.
रात्र जागून काढण्यासाठी चहा-कॉफीच्या टपरीवर रात्रीही वर्दळ वाढू लागते.
एरव्ही तास न तास बुड न हलवणारी गर्दीही आता एक कप चहा-कॉफीतंच तिथून पाय काढू लागते.
कणभरही माहीती नसलेले राईट-अप्स कॉपी केल्यावर फाईल चेक करण्याची आता येते वेळ.
आज ये, ऊद्या ये या निरोपांबरोबर एकेका प्रोफेसरकडे खेटे घालण्याचा सुरु होतो मग खेळ.
यामधे भर म्हणून की काय नोटिस बोर्डावर झळकते डिफॉल्टर्स लिस्ट.
रेग्युलरली इर्रेग्युलर असणाऱ्या भावी ईन्जिनियरच्या सबमिशनच्या कहाणीत येते आता नवीनंच ट्विस्ट.
ऊद्याच्या एन्जिनियरचं सबमिशन चेक करुन डिटेन्शन टाळण्यासाठी पाच-पाच पेपर लिहून आणण्याची शिक्षा निश्चित होते.
याचं-त्याचं कॉपी करुन, जमेल तेवढं वगळून ही शिक्षाही मान खाली घालून आता भोगली जाते.
या एका महिन्यापुरता मात्र प्रत्येकालांच ईन्जिनिअरींगचा मनापासून तिटकारा येऊ लागतो.
सगळ्यांचे नखरे सहन करताना प्रत्येकजण प्रोफेसरपासून एच.ओ.डि आणि प्रिन्सिपललाही शिव्यांची लाखोली वाहू लागतो.
पि.एल. चालू झाली तरी अजून एकेका विषयाची तोंडओळखही व्हायची असते.
कुठल्या सबजेक्टला कोणत्या ऑथरचं पुस्तक वापरायचं हे ही अजून ठरलेले नसते.
सबमिशन संपून अभ्यासाला सुरुवात करेपर्यंत डोळे पांढरे व्हायची वेळ येऊ लागते.
स्कोरींगचं भूत मानगुटीवरून उतरून, कट-टू-कट मॅजिक फिगर गाठण्याची महत्वकांक्षा आता मनी पूनर्जन्म घेऊ लागते.
दिवसभर कट्ट्यावर दिसणाऱ्या टाळक्यांची गर्दी आता लायब्ररीमधे होऊ लागते जमा.
दिवस-रात्र पुस्तकांत डोकं खपवून अभ्यास करताना, खाणं-पिणं नि तब्येतीची कुणालांच नसते तमा.
असांच एकेक दिवस मोजताना परीक्षेचा तो अप्रिय दिवस येऊन ठेपतो.
कितही अभ्यास केला तरी एक्झामच्या पहिल्या बेलबरोबर प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकतो.
एकेका पेपरबरोबर एटिकेटिच्या लिस्टमधे पडू लागते भर.
एटिकेटिमधे का असेना पास होण्याची खात्री होतांच, पुढच्या सेमिस्टरला मात्रं ऑल-क्लिअर होण्याची योजना मनी करू लागते घर.
शेवटचा पेपर संपताच पुढच्या सेमिस्टरला पहिल्यापासून अभ्यास करायचा, असं प्रत्येकजण अगदी शपथेवर ठरवतो.
पण पुढच्या सेमिस्टरच्या पहिल्या दिवसापासून कट्ट्याचा ईतिहासंच प्रत्येकजण ईमाने-एतबारे गिरवतो.


असांच एक ईन्जिनिअर.......

कुणाल.


Monday, June 15, 2009

तुमचं आणि त्यांचं.....

तुमचं आणि त्यांचं.....

त्यांची टोपी, त्यांचा बुरखा.
तुमचा भगवा पंचा नि अंगरखा.
त्यांची मेणबत्ती त्यांचा क्रॉस
तुमची उदबत्ती नि तुमचा विश्वास
तुमची प्रार्थना त्यांचा नमाज
तुमचा डावीकडे त्यांचा ऊजवीकडे समास.
तुमचा देव त्यांचा अल्ला.
तुमचा पंडीत त्यांचा मुल्ला.
तुमचं प्रेम त्यांच ईश्क.
तुमचा ॐ त्यांचं ७८६ (सेवन एट सिक्स).
तुमचा शुभ विवाह त्यांचं कबूल कबूल कबूल.
तुमचे राजा राणी त्यांचे मिया मक्बूल.
तुमचं मंदिर त्यांची मशिद
तुमचा राम त्यांचा रशिद.
ते जहाल तर तुम्ही तर कुठे मवाळ ?
ते दगडधोंड्यापरी तर तुम्ही कुठे रवाळ ?
तुमची कविता त्यांची गजल.
तुमची सभा त्यांची मैफल.
तुमची दिवाळी त्यांचा रमजान.
तुमची भूपाळी त्यांची अजान.
म्हणतांत ना "व्यक्ती तितक्या प्रकृती"
देशद्रोह नि अतिरेकीपणा हा नसतो कुणाचा धर्म, ती तर असते व्यक्तिगत विकृती.
आपला राष्ट्रध्वज आहे तिरंगी.
कुठल्याही एका रंगाने पूर्ण ध्वज होण्याचा हट्ट धरु नये, तो हिरवा असो वा नारींगी.
तुमचं शिवालय त्यांचा ताजमहाल.
अरे पण रक्त नसतं हिरवं किंवा भगवं, सगळ्यांच्या रक्ताचा रंग असतो लाल.
म्हणूनच म्हणतो कशासाठी हा सारा नावांचा वाद.
फक्तं एक भारतीय माणूस म्हणूनच घेऊया खरा जीवनाचा आस्वाद.....

तुमचा आणि त्यांचा, सर्वांचा
कुणाल.


"एवढंच मागतोय तुला"

"एवढंच मागतोय तुला"
तुझ्या नभांगणातले तारे नको सारे,
पण माझ्या वाटचं मूठभर चांदणं मागतोय तुला.
तू माझी होणं कठीण आहे,
पण माझ्या स्वप्नात सदैव तुझं नांदणं मागतोय तुला.
साऱ्या आयुष्याची साथ नाही,
तुझ्या सहवासाचे चार क्षण मागतोय तुला.
तुझ्याविना जगण्यासाठी त्या चार क्षणांची आठवण मागतोय तुला.
"सदाफूली" नको पण तुझ्याच वहीत दबूनही
तुझ्या श्वासात सुगंध भरणारं माझं कोमेजलेलं फूल मागतोय तुला.
माझ्या बाळा म्हणतेस ना मला नेहमी,
पण माझ्यातलंच हरवलेलं निरागस मूल मागतोय तुला.
आठवणींच्या सागराच्या हिंदोळ्यावर तरंगणारी सहवासाची नाव नको
तुझ्याच डोळ्यात पाहिलेला नि दोघांच्या मनांत वसवलेला स्वप्नांचा गाव मागतोय तुला.
ऊगवतीचा सूर्य नाही, पण सांजेचा दिवा मालवून एकाकीपणांत तुझ्या स्वप्नांत रमवणारी निशा मागतोय तुला.
परत तुझी साथ नाही पण, तू हात सोडल्यापासून माझी जगण्याची हरवलेली दिशा मागतोय तुला.
तुझ्या काळजावरचा हक्क तर गमावला पण.....
तुझ्या नजरेच्या एकाचं कटाक्षानं चुकलेला, माझ्या काळजाचा ठोका मागतोय तुला
प्रितीचा वृक्ष उन्मळून पडण्याआधी, त्याला बांधून उंच अंबरी गेलेला स्वप्नांचा झोका मागतोय तुला.
तुझ्या काळजाचा कोपरा नको, पण त्याच कोपऱ्यांत अडकलेला माझांच शेवटचा श्वास मागतोय तुला.
तुला जाताना रोखणार नाही, पण तुझ्यासोबत निघून चाललेला माझा जगण्याचा ध्यास मागतोय तुला....
माझाच जगण्याचा ध्यास मागतोय तुला....

कुणाल

"पाऊसही.... चिंब ओला असेल"

"पाऊसही.... चिंब ओला असेल"

आजकालच्या पावसांत भिजूनही मी कोरडाच असतो.
तुझ्या प्रेमळ आठवणीनं भिजलेल्या मनाला, हा पाऊसही कोरडाच भासतो....
पण तरीही आजही मी एकटांच मनसोक्त भिजतो.
तुझ्या आठवणींचा शृंगार करुन ओलेत्यानं सजतो.
त्या पावसाचं नि मातीचं आपल्यासारखंच आहे एकमेकांवर अगदी खरं प्रेम.
वर्षभर धुळ ऊडवणारी धरणी, दरवळते सुगंध, झेलून पावसाळी अत्तराचा पहिलाच थेंब.
मी एकटाच नाही असा, जो तुझ्या आठवणीत तरसतो.
विरहांत झुरणारा तो पाऊसही धरणीला आलिंगन देण्यासाठी बेधूंद होऊन बरसतो.
आणि तू सुद्धा, तू सुद्धा अशीच कुठेतरी माझ्या आठवणीत एकटीच भिजते आहेस.
आपल्या प्रेमाचं बीज तुझ्या मनी विरहांतही रुजते आहे.
या बीजाला विरहाच्या पावसातही नक्कीच अंकुर फुटेल.
अगं, अगं धीर धर थोडा, बघता बघता आपल्या दोघातला दुरावाही आता चटकन मिटेल.
हा चार दोन दिवसाचा दुरावाच बघ आपल्याला एकमेकांच्या कीती जवळ आणतोय.
आणि त्यात हा पाऊस......
त्याचा प्रत्येक थेंब न थेंब आपल्या दोघांतली विरहाची दरी सांधतोय.
दुरावा संपवून लवकरंच तू मला, वीजेपेक्षाही जास्त कडाडून भेटशील.
त्या पावसाचा थेंब न थेंब झेलून मग, मला बाहुपाशांत लपेटशील.
तेव्हा मात्रं तो पाऊस माझ्यासाठी कोरडा नसेल.....
तेव्हा मात्रं तो पाऊस माझ्यासाठी कोरडा नसेल.....
आपल्या धुंद प्रणयानं आणि तुझ्या प्रेमळ स्पर्शानं तोही चिंब ओला झाला असेल.


कुणाल.

खरं सांगतो मित्रांनो पाऊस मला आवडतो.....

खरं सांगतो मित्रांनो पाऊस मला आवडतो.....

खरंच किती निरागस होतो तेव्हा.
पावसाळी डबक्यांत चिखल आणि पाणी उडवत मित्रांसोबत उड्या मारायचो जेव्हा.
रद्दीची पानं फाडून होड्या पाण्यात सोडण्याचा तास न तास चालत असे खॆळ.
आज मात्रं वळवाच्या पावसांतही भिजण्यासाठी नाही माझ्याकडे वेळ.
तो पाऊस बघून आता मी नाचत बागडत नाही.
म्हणून आजकाल मला हा पाऊसंच आवडत नाही.

पूर्वी कसं होतं सारं छान छान.
पावसांत हिंडायला होतं आम्हाला मोकळं रान.
जागोजागी पाणी साचून शाळेला सुट्टी पडत होती.
आता मात्रं भिजतंच ऑफिस गाठावं लागतं.
पावसामुळे सुट्टी मिळण्यासारखं आता काहीच घडत नाही.
म्हणून आजकाल मला हा पाऊसंच आवडत नाही

कॉलेजला असताना पावसांत भिजतंच बाईकवर हिंडायचो.
तर कधी बाहेर पाऊस आहे म्हणून हॉस्टेलच्या रुमवर पत्त्यांचा डाव मांडायचो.
बरसणारा पाऊस नि हिरव्या निसर्गाच्या साक्षीनं सिंहगड गाठायचो.
त्या सुखद गारव्यातंच कांदाभजी नि झुणका भाकरी चेपायचो.
आता मात्रं याच पावसाच्या भीतीनं आम्ही सुट्टीच्या दिवशीही बाहेर पडत नाही.
म्हणून आजकाल मला हा पाऊसंच आवडत नाही.

पावसामुळे ऊशीरा येते ती, त्याच्याचं भीतीनं लवकर जाते.
या पावसाचं मला काही कळत नाही.
ती जाताना मात्रं तो पडत नाही
म्हणून आजकाल मला हा पाऊसंच आवडत नाही.

पावसाच्या गारव्यानं पूर्वी मन कसं प्रसन्न होत होतं.

आज मात्रं २६ जुलैच्या आठवणीनं सुन्न होत जातं.

पूर्वी म्हणायचो मी, पावसाळ्यांत हा निसर्ग मला साद घालतो.
आज मात्रं मुंबईसह महाराष्ट्र पाण्यात बुडाला हि चूक राजकारण्यांची कि महानगरपालिकांची, यावर आम्ही वाद घालतो.
त्या हिरव्यागार निसर्गाकडे लक्ष द्यायला आम्हाला सवड नाही.
माझांच सारा राग काढतो मी त्या पावसावर..... म्हणून आजकाल मला हा पाऊसंच आवडत नाही.


पूर्वी कसा रीमझिम बरसायचा तो.
आता मात्रं अनिर्बंधपणे फैरी झाडतो.
मी नाही, पण मन कधी कधी नाचतं त्याच्या जुन्या रीमझिम तालावर.
परत हे सारं आठवून आसवं ओघळतांत मग गालावर.
पण.... माझा बालमित्रच तो, आसवं कुणालाच दिसू नये म्हणून त्याच्यातंच मिसळून घेण्यासाठी नेमका तेव्हांच तो पडतो.
माझ्यासोबत तोही असा आपसूकच रडतो.
म्हणून खरं सांगतो मित्रांनो...... मला तो पाऊस मनापासून आवडतो.
मला तो पाऊस मनापासून आवडतो.

कुणाल

"एका पराभूताचा अलविदा"


"एका पराभूताचा अलविदा"

"एका पराभूताचा अलविदा"
मित्रांनो हि कविता मी जरी लिहिली असली तरी, ती कुणालची नाही आणि ती कुणालाचं आपली वाटू नये हि मनापासुन ईच्छा आहे.
कधी कधी अशा लोकांना भेटणं होतं जे निकराचे प्रयत्न करत असतांत पण अपयश पाठ सोडत नाही. प्रत्येक अपयशी प्रयत्नानंतर ते जिंकण्याच्या ईर्षेने पेटून ऊठतांत, पण नियतीला त्यांनी जिंकणं मान्यच नसतं......
तर सतत प्रयत्न करुनही अपयश येऊन थकलेल्या माणसाचं मनोगत कसं असेल हे मांडायचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. यातून कुणीही चुकीचा संदेश घेऊ नये.....आणि तुम्ही सदैव लढवय्येपणानं जगा आणि कधीच हार मानू नका हिच माझी सदिच्छा......लक्षात ठेवा प्रयत्नांती परमेश्वर.

"एका पराभूताचा अलविदा"

आव्हानांकडे पाठ फिरवणारा नव्हतो मी कधीच.
अपयशाचा धडा गिरवणारा नव्हतो मी कधीच.

दिवसांगणिक अपयशाचं विष पचवत मी गेलो.
येणाऱ्या प्रत्येक क्षणाला माझ्याचं अपयशानं सजवत मी गेलो.
पराभवाच्या धरतीवर विजयाचं बीज रुजवत मी गेलो.

विजयाचं बीज रुजवण्याचा प्रयत्नही कसा ठरला असा अपयशी.
या विजयानं का पाडलं असावं मला असं तोंडघाशी?

पराभवाची प्रत्येक ठेच, जिंकण्याची ईर्षा माझ्यांत जागवंत होती.
प्रयत्नाची प्रत्येक पायरी नव्या ऊर्मीनं नवी दिशा दाखवंत होती.

पण कसं सांगू, आता मत्रं दिशाहीन झालो मी.
काय चुकलं माझं असं की शेवटाच्या ईतकं जवळ आलो मी?
जिंकण्याचा निश्चय करुनही कसा हारत गेलो मी.
हारता हारता जिंकायचंय मला हेच विसरत गेलो मी.

माफ करा मित्रांनो मला, पण तुमच्यांत राहिले माझे आता काही मोजकेच क्षण.
कधीही हार न मानणारा तुमचा मित्र आता सोडून चाललाय हे जीवनाचंच रण.

माझ्यानंतर अश्रू ढाळू नका माझ्यासाठी.
एक वचन मोडलं तरी एक वचन देऊन जातोय, फिरुनी परत घेईन जन्म मी सारं जग हे जिंकण्यासाठी.

आठवणीत माझ्या रमू नका मी तुमच्यातून गेल्यावर.
साजरा करा तो दिवस, कारण झाली असेल जागा अजून एका पराभूतासाठी, मी अलविदा केल्यावर.

कुणाल

खरंच बापू....खरंच तुम्ही हरलात.

खरंच बापू....खरंच तुम्ही हरलात.

बापू.... प्रत्येक नोटेवर आज तुमचं चित्र आहे.
तुमच्याच नावानं राजकारणही सर्वत्र आहे.

अहिंसा वगैरे शब्द आता फक्त पुस्तकात दिसतात.
अहिंसेवर भाषण देणाऱ्याचे हात मात्र निष्पापांच्या रक्‍तानं माखलेले असतात.

तुमच्या तीन माकडांचाही अर्थ प्रत्येकजण सोयीनंच लावतो.
चांगलं, बोलण्या वागण्या अन ऐकण्यापासून प्रत्येकजणंच दूर दूर धावतो.

सत्याचा आग्रह वगैरे सध्या फार मोठं पाप आहे.
शांततेच्या मार्गानं न्यायासाठी झगडणाऱ्याला अन्यायाचा शाप आहे.

तुमच्या मूल्यांची ईथे कधीच राखरांगोळी झाली आहे.
सत्य पेटलं, अहिंसा जळली.... आम्हीच त्यांची होळी केली आहे.

कसलं सत्य, अन कसली अहिंसा.... बघा तुम्ही तेव्हा चुकलात ना.
सत्य बित्य सगळंच झूठ आहे तुम्ही आमच्याकडून शिकलात ना?

अहिंसेसाठी प्राण गमावलात ना तुम्ही.
पण हिंसेसाठी तुमचंच चित्र असलेली नोट मोजतो आम्ही.

ईतक्या वर्षात न समजलेली तुमची तत्व, तीन तासात मुन्नाभाई आम्हाला शिकवतो.
गांधीगिरीच्या मार्गानं जगा.... तो आम्हाला सुचवतो.

गांधीवादामधला गांधी संपवला या देशानं.... आता फक्त वाद उरलाय.
देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण एक महात्मा हरलाय.

खरंच बापू....खरंच तुम्ही हरलात.
तुमचं कोण ऐकतं ईथं.... एका मुन्नाभाईच्या रुपानं तेवढं तुम्ही प्रत्येकाच्या मनात उरलात.

कुणाल.

Sunday, June 14, 2009

"मागे वळून बघ एकदा"....


"मागे वळून बघ एकदा"....

कारे दगड हातामधे
कोणासाठी डोकी फोडतोय
रक्त वाहतंय कुणाचं
का हा हिंसाचार घडतोय?

का रे भाषा लाठ्या-काठ्यांची
गालावरचं हसू लोपलंय....
कपाळावर सत्ता आठ्यांची
तूही म्हणे विचार करतोय.

कुणाचा हा कत्तलखाना
कुणासाठी गळे चिरतोय.
नसानसांतून वाहतंय ते पाणी
अन रस्त्यावर मात्र रक्ताचा पाट वाहतोय.

कशासाठी जाळपोळ ही
कोणासाठी आग लावतोय.
राखेशिवाय काय येणार हाती
तू मात्र आगीतंच गारवा शोधतोय.

कारे आकांत तुझ्या जीवाचा
कुणाकडून आशा करतोय
कसला सच्चेपणा अन कसली तत्व
आपल्या पैशानंच तो खिसे भरतोय.

जात-पात धर्म पुढारी
नेत्यांची ही अक्कल हुशारी.
कसलं सरकार अन कसली सत्ता
कसला पक्ष अन कसली निष्ठा.
कशामागे वणवण धावतोय
कोणतं सुख अन कसली शांती
कोणासाठी मानवतेशी लढा करतोय????

महाराष्ट्र बंद कोणासाठी? कोणासाठी भारत बंद?
सर्वांगात उसळणारं रक्त आता पडलंय थंड.
थंड रक्तानंही कोणासाठी हत्यार उचलतोय
कोणाला मारतोय तू..... अन कोणासाठी मरतोय?
मागे वळून बघ एकदाच....
बघ एकदाच तू काय करतोय....
बघ एकदाच तू काय करतोय....

कुणाल.
--

तिला ग्रेस वाचायला आवडतो....

तिला ग्रेस वाचायला आवडतो....


तुमच्या आमच्या समोर मात्र
ती त्या चेहऱ्यावर मेक-अपची पुटं चढवते.
निर्जीव मेक-अप मागे सजीव दुःखाला दडवते.
तुम्हाला मात्र त्या खोट्या मेक-अपमुळे
चमकणारा चेहरा आवडतो.
अन ऊदास वाटताच आज-काल
तिला ग्रेस वाचायला आवडतो

मिटल्या पापण्यात आठवणी बघते ती.
आठवणींमधे जगते तरीही....
भविष्यासाठीही धावते ती
अवसेच्या आंधारात निजताना
ऊद्याचा सूर्योदयही पाहते ती.
आठवणीच्या कोषात अडकूनही
सर्वांसोबत राहते ती.

अन अचानक एक दिवस
आठवणीच्या डोहात उतरावेसे वाटते.
नव्या सूर्यासोबत, मनात मात्र
गतकाळचे मळभ दाटते.
बोलक्या डोळ्यांनाही मग पूर येऊ लागतो.
अन नकळत, तिचा हात आठवणींकडे आधार मागतो.
पण पुढच्याच क्षणी तिला
नव्या सूर्यात आशेचा किरण सापडतो.....
असंच कधीतरी ऊदास वाटताच....
तिला ग्रेस वाचायला आवडतो....
तिला ग्रेस वाचायला आवडतो....

कुणाल

"ते दिवस"

"ते दिवस"

निशःब्द ती, निशःब्द मी
पण डोळे बोलत होते.
छेद द्यायचा होता शांततेला
पण शब्दच हरवले होते.
तिच्या डोळ्यातल्या पाण्यात तिची घालमेल दिसत होती.
ती मात्र अश्रू लपवत कसंनुसं हसत होती.
कदाचित तिलाही वाटत होतं की आता मनसोक्त रडावं.
डोळ्यात बांधून ठेवलेल्या आठवणींना आसवांवाटे मोकळं करावं.
आठवत होता तिला त्याच्यासोबत घालवलेला हरेक क्षण.
प्रत्येक क्षणात दडलेली सोनेरी ती आठवण
दिवसभर त्याचेच फोन अन सारा ईनबॉक्स त्याच्याच मेसेजेसनी भरलेला असायचा.
रोजची रटाळ सकाळही गुड मॉर्निंग बनवणारा त्याचाच मेसेज ठरलेला असायचा.
त्याचं हसणं, त्याचं चिडणं, त्याचा हरेक शब्द थेट मनाला भिडणं.
तिचे रुसवे तिचे फुगवे, त्यानंच नेहमी समजूत काढणं.
आठवत होतं त्याचं अन फक्त त्याचंच असणं.
त्याच्याशिवाय जगण्याचा विचारही आजवर मनाला शिवला नव्हता.
पण नियतीनं मात्र अचानक आज हा डाव साधला होता.
हुंदका आवरताना झालं दुःख तिला अनावर.
संयमाचा बांध फोडून आसवं ओघळली गालावर.
सगळे बंध झुगारुन ती हमसून हमसून रडली.
अन धैर्य सारं एकवटून ती बापाला बिलगून बोलली.
"पप्पा, नका ना हो असं करु
त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत"
मी मात्र म्हणत होते (मनाशीच) "सोन्या, सावर स्वतःला, दगडाच्या काळजाला नसतो गं पाझर फुटत"
बघता बघता डोळे माझे पाणावले होते....
खूप वर्षांनी आसवांचे तारे आज गालावर निखळले होते.
तिच्या डोळ्यातले अश्रू मात्र माझ्याही काळजात झिरपत होते.
२५ वर्षांनी आज परत.....
गेले "ते दिवस" म्हणता म्हणता "तेच दिवस" माझ्या काळजाच्या तुकड्याच्या वाट्याला आले होते

"तेच दिवस" माझ्याच काळजाच्या तुकड्याच्या वाट्याला आले होते....

तिच्यासारखीच असहाय्य.... तिची आई....

कुणाल.

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...