रस्त्यावरच्या रक्ताला रंग धर्माचा दिलाय
मनामनातल्या दऱ्यांमधे चेव जातीपातीला आलाय
एकेकाचं भरलंय पोट, पैशानं ठासून ठासून
माणूसकीच्या गळ्याला लावलंय नख चक्क डोळे झाकून
"मी माझा"च्या जयघोषानं आसमंत भरलाय
पायाखालचं बघताना फक्त स्वार्थीपणा उरलाय
स्वाभिमान तर आम्ही ठेवलाय कधीच गुंडाळून
शोधला जीवाचं रान करुन पण मिळेना पिढ्यानंपिढ्या धुंडाळून
आयाबहीणींची आब्रू वेशीवर टांगलीए
वासना दिवसाढवळ्या चव्हाट्यावर आणलीये
पदराआडच्या शालिनतेचा कधीच गळा दाबलाय
कंबरेचं सोडून डोक्याला बांधण्यात प्रत्येकजण रमलाय
खून दरोडा बलात्कार अन घोटाळ्याच्या बातम्या रोज तोंडी लावतो आम्ही
स्वैराचार अन अराजकतेची आहे १०० टक्के हमी
चरफडतो, हळहळतो, घेतो राग गिळून
डोळेही केलेत कोरडे आसवं सगळी पिळून
अम्हाला नेहमीच वाटतं..
आता शिवाजी जन्माला यावा पण यावा शेजारच्या घरात
त्याला लढताना पाहू आम्ही ऊभं राहून दारात
श्रींची ईच्छा अन तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही स्वराज्य ऊभं केलंत
आमच्यासारख्या नालायकांच्या हाती तुम्ही सोनं का हो दिलंत?
"सगळं छान चाललंय... या एकदा बघायला"
असं म्हणायची आमची लायकी नाही
स्वराज्य घडवण्यापेक्षा बिघडवण्यात आम्ही सोडली नाही कसर काही.
म्हणूनंच आज तुमची परत वाटतेय गरज
स्वार्थापुरती माणसं जोडायचं आमच्यात आहे कसब
म्हणूनंच म्हणतो...
"राजे तुम्ही परत या... आम्ही बांगड्या भरल्यात"
तुमच्या स्वराज्य अन सुराज्याच्या आता फक्त आठवणीच उरल्यात...
कुणाल प्रकाश रुद्राके
