विश्वास न बसण्याइतकं एवढं काय ए त्यात? पत्र
लिहीतोय, हंममम पहिल्यांदाच आणि कदाचित शेवटचं. बोलायला जमत नसलं की लिहून सांगणं सोपं
वाटतं म्हणून नाहीतर मला शाळेतल्या जबरदस्तीवाल्या पत्रलेखनाच्या प्रश्नाचं उत्तरंही
कधी जमलेलं नाही आयुष्यात. अजून काही दिवस भेटत रहावं असं कितीही वाटलं तरी कुठेतरी
थांबावं लागेलंच ना. मग कुठेतरीऽऽऽ, कधीतरीऽऽऽ कशाला नाही का? आजंच, इथेच थांबूया असं
वाटलं. माहितीये सोपं नाहीये पण अजून पुढे जाऊन थांबणं तरी सोपं असणारे का? नोटीस देऊन
थांबायला काय आपलं कॉर्पोरेट टायअप नाहीये नाही का. आणि एक दिवस ठरवायचा मग उरलेले
सगळे दिवस त्या तारखेवर कॉंसंट्रेट करत भेटत रहायचं. अमुक एक तारखेनंतर सोबत नसू पेक्षा
अमुक एक तारखेपर्यंत तरी १००% सोबत आहोत, पुढचं पुढे बघू म्हणत आला दिवस आपला म्हणून
कंपनी एंजॉय करणं आपल्याला जमलंच नसतं. किमान मला तरी नाही. उंऽऽऽच डोंगर चढून जायचं,
कशासाठी तर त्या कड्यावर पोचल्यावर उडी मारायचीये खाली म्हणून, वेल प्लान्ड सुसाईड!
त्यापेक्षा जिथे आहोत तिथूनंच नाहीसे झालो अचानक एकमेकांसाठी तर? तर जास्तं सोपंय असं
मलातरी वाटतंय. म्हणूनंच उद्या भेटूया असं सांगून निघालो असलो तरी हे पत्र तुझ्या बॅगेत
ठेवताना मी ठरवलंच होतं, उद्याच काय परत कधीही भेटायचं नाही, ठरवून तर नक्कीच नाही.
अपघाताने भेटलोच कधी रस्त्यात तर तेव्हाचं तेव्हा बघू. कधी नव्हे ते मी काहीतरी ठरवलंय
आणि मी ते करतोय. आय होप तू राग धरणार नाहीस मनात. वेगळं व्हायच्या आधी बरंच काही बोलावं
वाटत होतं पण, पण… बोलायलाच हवं असं काही नाही, नक्कीच नाही आणि बोलण्याने काही बदलेल
अशातला काही भागंही नाही. वुई आर स्टॅंडींग ॲट अ पॉइंट ऑफ नो रीटर्न. तरी विचारावं
वाटतंच
एवढं लिहून पुढच्या दोन ओळी भरुन फक्त गिरगोट्या.
त्या गिरगोट्यांखाली काय लिहिलं होतंस तुलाच माहीत. कसा आहेस रे तू असा? मी किती प्रयत्न
केला असेल माहीतीये ते वाचण्याचा पण काहीही केल्या कळूच नये अशा पद्धतीने खोडलंयेस.
आजंही आठवण आली की मी ते पत्र काढते आणि फक्त त्या गिरगोट्यांच्या खालचा मजकूर वाचायचा
प्रयत्न करते, कधी कधी काय लिहिलं असशील याचे वेगवेगळे अंदाज बांधते फक्त.
विसरु शकशील मला? नाही असं नसशील विचारलं. सगळं
सोडून माझ्याशी लग्न करायची हिंमत दाखवशील? नाही हेही शक्यंच नाही, माझ्यापेक्षा ममीपप्पांचा
विचार तू जास्त करायचास. जीव द्यावासा वाटतोय! ह्यॅ, असलं तर पार अ…श…क्य… असलं काहीतरी
बोलून इमोशनल ब्लॅकमेल करायला कधीच जमणार नाही तुला. मग काय लिहिलं असशील रे? भेटला
असतास परत कधी तर विचारता आलं असतं. भेटणं तर दूरंच तू परत कसल्याच संपर्कात राहीला
नाहीस. सुरुवातीला ऑनलाइन तरी दिसायचास वॉटसॅपवर पण रीप्लाय केलाच नाहीस कधी. दोनचारदा
तुला पाठवलेले मेसेजेस डिलीट केले मी पण काय डिलीट केलंस का डिलीट केलंस असंही कधी
विचारावं वाटलं नाही तुला? आता तू कधीच ऑनलाइन दिसत नाहीस. कुठे असतोस? कितीही विचारावं
वाटलं तरी विचारु कुठे आणि विचारु कोणाला? रोज त्या गिरगोट्यांखाली काय बोलला असशील
याचा विचार करुन करुन डोकं फुटायची वेळ येते. काहीतरी टोचून बोलला असशील मला राग यावा
म्हणून पण मग परत खोडलंस अगदी पान फाटेपर्यंत… कसं जमतं रे मागे बिलकुलंच वळून न बघणं?
तुला कधी ठसका लागतो का पहिल्याच घासाला? मला तर नेहमीच लागतो… मग समोर फक्त गिरगोट्या
दिसत राहतात. त्याखालचे न वाचलेले प्रश्न समोर फेर धरतात. डोळ्याच्या कडात साचलेल्या
पाण्यामुळं ते प्रश्न आजंही स्पष्ट दिसत नाहीत. धुसर धुसर धुसरंच होत राहतात. कोण गं
आठवण काढतं तुझी रोज रोज म्हणतात घरचे. कोणीतरी पाण्याचा ग्लास समोर धरतं. घोटभर पाण्यासोबत
प्रश्न गिळायचा प्रयत्न करते पण ते पाठ सोडत नाहीत.तुला का वाटलं होतं रे की सोबत सोडली
तर सोबत नसू एकमेकांच्या? भेटलास परत कधी तर विचारण्यासाठी हे सगळे वेडगळ प्रश्न राखून
ठेवलेत. तोवर रोज गिरगोट्यांखाली दडलेल्या तुझ्या एकेका प्रश्नावर काट मारत राहते एक
ना एक दिवस माझा प्रश्न मला मिळेलंच अन तू भेटलासंच कधी तर तुला तुझं उत्तर एवढी एकंच
वेडी आशा घेऊन.
हे पत्र कुठे पाठवू कि ठेवू तुझ्या पत्रासोबत?
पत्ता लिहून त्यावर गिरगोट्या मारुन?
केपी आर
