Showing posts with label Breathing diaries. Show all posts
Showing posts with label Breathing diaries. Show all posts

Thursday, December 7, 2017

द शो मस्ट गो ऑन

"द शो मस्ट गो ऑन"
खूप आवडायचं हे वाक्य नाही तुम्हाला
मी गेल्यावर सेलिब्रेट करा
रडू नका...
सांगायचात आम्हाला नेहमी हसून
पण तुम्ही गेल्यापासून
एकसारखा पाऊस पडतोय
हिवाळा असूनंही
रडू नका सांगायचात आम्हाला
मग... आता ही चिटींग नाहीये का
सांगा ना

०६/१२/२०१७

हे घर मोकळं मोकळं वाटतं
तुम्ही गेल्यापासून खरतंर
गर्दी वाढलीये ईथे
भेटणारे, सांत्वन करणारे
आणि खांद्यावर हात ठेऊन
आम्ही आहोत सांगणारे येतात
मी शून्यातली नजर
त्यांच्यासोबत मिळवायचा प्रयत्न करतो
कोण काय सांगतंय हे कळो न कळो
होकारार्थी मान हलवतो सगळ्यांनाच
जुन्या एकाकी पडक्या वास्तूंची भगदाडं कशी असतात
तशाच घराच्या कानाकोपऱ्यात आठवणींची भगदाडं पडलीयेत
त्याच्यातून आरपार बघताना
तुम्ही दिसता ठळक...
मग स्वतःकडे आरश्यात पाहिल्यावरही
फक्त तुम्हीच दिसता...
तुम्ही माझ्यात आहात याचं समाधान वाटतं
पण याव्यतिरीक्त...
दुसरीकडे कुठेही बघितलं तर
हे घर मोकळं मोकळं वाटतं

आय लव्ह यू भाऊ

०७/१२/२०१७

तो डॉक्टर म्हणाला होता मला
७२ तास यांना जगवलं व्हेंटीलेटरवर तर
बघतिल कदाचित तुझ्याकडे
डोळे उघडून
ओळखतील तुला
आणि कोणास ठाऊक
काही मिरॅकल झालंच तर
बोलतीलंही तुझ्याशी... पण..
पण वाचणार नाहीतच..
आत्ता कसंय विचारल्यावर म्हणाला
आत्ता काही कळत नाहीये त्यांना
वेदना, यातना, स्मृती... काहीच नाही
सेमी कोमामध्ये आहेत
कानात तुमचे शब्द ऐकू आले
मला व्हेंटीलेटरवर जगवू नका
म्हणाला होता तुम्ही ताई आणि मला

जगवायचं कशासाठी तर...
तुम्ही वाचणार नाहीत हे सांगण्यासाठी
पण व्हेंटीलेटर काढा
असं सांगायला जीभ रेटली नाही
कदाचित आयसीयू बाहेर
आमची द्विधा मनस्थिती
तुम्हाला बघवली नसेल
व्हेंटीलेटर चालू असतानाच
तुम्ही थांबायचं ठरवलंत
तुम्ही डोळे उघडून पाहीलं नाहीत माझ्याकडे
बोललाही नाहीत काहीच
तुम्ही हॉस्पिटलमध्ये गाढ झोपेत असताना
मी कित्येकदा येऊन म्हणायचो
आय लव्ह यू भाऊ
आजही म्हणतो रोज
तेव्हा वाटायचं तुम्ही ऐकलं नसेल कधीच
पण आज वाटतं तुम्ही नक्की ऐकल असेल
ऐकत असाल... आजंही
आय लव्ह यू भाऊ!

०७/१२/२०१७

रोज चिकाटीनं सकाळचा एक दिड तास
एकेक माणूस आठवून
सगळ्यांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवायचात तुम्ही
मग एक दिवस
मी तुम्हाला ब्रॉडकास्ट करायला शिकवलं
त्यात तुम्ही माझं नावंही ईन्क्लुड केलंत
हॉस्पिटलच्या बेडवर पाठ टेकवण्याआधी
तुम्ही शेवटचा ब्रॉडकास्ट केलात
"ईफ यू फॉल, आय विल बी देअर" गुड मॉर्निंग
आता व्हॉट्सॅप उघडायची ईच्छा होत नाही
जपून... लक्षपूर्वक पावलं उचलावी लागतात आता
तुम्ही म्हणाला होता
"ईफ यू फॉल, आय विल बी देअर"
पण आता...
पडून चालायचं नाही

आता रोज सकाळी उठून
तुमचा शेवटचा मेसेज वाचावासा वाटतो
"ईफ यू फॉल, आय विल बी देअर"

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...