धोनी... प्रिय
वगैरे म्हणायचा नाटकीपणा करणार नाही रे. कारण तू मला प्रिय वगैरे नव्हतासंच कधी.
तू वन डे आणि
टी-२० च्या कर्णधार पदावरुन पायऊतार झालास, बातमी ऐकली. आजवरची तुझी
वाटचाल बघता हि
अशी अचानक आलेली बातमी ऐकून फारसं आश्चर्य वाटलं नाही. हे असंच
काहीसं होणार
याचा अंदाज होता, म्हणजे अचानक
जाहीर करणं तुझ्यासाठी नवीन नाही
आणि सगळ्यात
महत्वाचं म्हणजे "तू आता कर्णधारपद सोड" असं सांगायची वेळ
तू येऊ द्यायचा
नाहीस असंही वाटत होतंच. तू कितीही आवडत नसलास तरी रांचीसारख्या एका छोट्याश्या
ठिकाणाहून, एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन केवळ तुझ्या दुर्दम्य
ईच्छाशक्ती, मनगटातली ताकद
आणि स्वकर्तृत्वावर तू मिळवलेलं यश हे खूप खूपंच उत्तुंग आहे. आणि आजवर तू जे काही
साध्य केलं आहेस त्यासाठी मी तुला मनापासून फक्त मानतंच नाही तर तुझा खूप
रीस्पेक्ट करतो.
तू मला कधी आवडला नाहीस हे खरंय पण म्हणून तू टाकाऊ होत नाहीस,
तसं तर तू कोणालाही आवडला नाहीस तरीही तू टाकाऊ होत नाहीस कारण तू कर्तृत्वानं मोठा
झालायेस, कोणाच्या मानण्या न मानण्यानं त्यात तसूभरंही फरक पडू शकत नाही. तुझा अनऑर्थडॉक्स गेम,
आडवे तिडवे फटके, टेक्निकल अप्रोचपेक्षा ताकदीवर भर देऊन केलेला खेळ याकडे कोणीही सहजंच दुर्लक्ष केलं असतं
खरंतर पण तू टिम इंडियात आल्यापासून सिनियर
प्लेयर्ससाठी रुंदावलेलं एग्झिट डोअर, चेन्नई सुपरकिंग्जच्या आणि पर्यायनं
तुझ्या मर्जीतल्या खेळाडूंना मिळणाऱ्या अवाजवी संधी यामुळे तुझ्याबद्दल एक अढी तयार झाली मनात. कदाचित हे सगळे आमच्या
मनाचे खेळंही असतील पण बऱ्याच
प्रसंगांमध्ये सिनियर प्लेयर्स आणि तुझ्यातली दरी खूप प्रकर्षानं जाणवली आणि तू यश मिळवत असतानाही आम्ही तुझा तिरस्कार
करण्यातंच धन्यता मानली.
गावठी, आंधळी कोशिंबीर फेम, आडवी ब्याट आणि काय काय म्हणून तुझ्यावर टिका केली... खरंतर तुझा राग करण्यासाठी
बऱ्याचदा कारणंही शोधली. मला २००४ मधली पाकिस्तानातली तुझी धडाकेबाज खेळी अजूनंही आठवते, दुसऱ्या दिवशी द्वारकानाथ संझगिरींनी लिहिलं होतं काल सचिन आऊट झाला म्हणून ज्यांनी टिव्ही
बंद केला ते खरे कर्मदरीद्री. पुण्यातल्या
नेहरु स्टेडीयमवर श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमधे जेव्हा चांगली सुरुवात करुन सचिन आऊट झाला होता तेव्हा नाराज होऊन मी
स्टेडीयममधे थोडावेळ झोपलोही होतो. शेवटी पंचवीस एक
बॉलमध्ये आपल्याला जिंकायला अठरा रन हवे होते, तू स्ट्राईकवर होतास. आमच्या पुढच्या रांगेतल्या एकजण
म्हणाला अरे तीन सिक्स मार आणि संपवून
टाक च्यायला. पुढच्या बॉलवर तू सिक्स मारलीस, त्याच्या पुढच्याही आणि तिसऱ्या बॉलवरही. जणूकाही तुलाच डोक्यावर घेतलंय अशा जोशात आम्ही त्या "तीन सिक्स मार आणि
संपव" म्हणणाऱ्या माणसाला अक्षरशः डोक्यावर घेऊन
नाचलो होतो. तेव्हा तू आवडायचास..खूप आवडायचास... तू कॅप्टन झालास आणि सिनियर प्लेयर्सला लागलेली गळती बघून तू
आवडेनासा झालास. तू थंड डोक्याने,
शांत चित्ताने खेळत राहीलास. सगळ्यांसमोर
कितीही तुझ्यावर टिका केली तरी आतून तुझे हे गुण
आवडले होते आपल्याला. कोणी कितीही टिका केली तरी तू तुझे संघसहकारी निवडलेस आणि सक्सेसफुल होत राहिलास. नव्यांना
संधी दिलीस, भले ते तुझ्या
मर्जीतले का असेनात, मैदानावर अक्षरशः जुगारंही खेळलास (पहिल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड
कपच्या फायनलमधली जोगिंदर शर्माची लास्ट ओव्हर कोण
विसरेल?) बऱ्याचदा यशस्वी झाले
काहीवेळी चुकलासंही. हारलास तरी
तितकाच स्थितप्रज्ञ जिंकलास तरी तितकाच, तुलाच ठाऊक कसं काय जमवलंस. टिम
इंडिया असो की आय.पी.एल तू जिंकत राहीलास, मी तुझ्यावर टिका करत राहीलो. आय.पी.एल मध्ये तर तू आणि तुझे टिममेट्स धडाकेबाज खेळ्या करत अशक्यप्राय हा शब्दही फार
छोटा वाटावा अशा मॅचेस जिंकत राहीलात.
मीसुद्धा तुझा राग करतंच राहीलो, पण खरं सांगायचं
ना तर तुझ्या खेळापेक्षा ते
"सिनियर वर्सेस यू" या गोष्टीमुळे तो राग होता. पारंपारीक खेळ, तांत्रिकता आणि टिकाकार यांना फाट्यावर मारत तू जिंकत राहीलास, हारलास तेव्हाही पुढे चालत राहीलास, गांगुली नंतर संघाला तू जिंकण्याची खरी सवय लावलीस.
सचिन वन डेतल्या पहिल्यावहिल्या डबल सेंच्युरीच्या उंबरठ्यावर
ऊभा असताना एका बाजूने तूसुद्धा फटकेबाजी चालू ठेवलीस, एक वेळ तर अशी आली की सचिनला स्ट्राईकंच मिळेना, त्यावेळी मी म्याच बघत नव्हतो पण मित्र फोनवरुन
आखो देखा हाल सांगत होते. प्रत्येक बॉलगणिक
मी तुला जीव खाऊन शिव्या देत होतो, सचिनची डबल
सेंच्युरी तुझ्यामुळे हुकणारंच असं
वाटत होतं पण नाही सचिनला स्ट्राईक मिळाली आणि त्यानं रेकॉर्ड केलं. पण मुद्दाम असं करण्याईतका मनाचा कोतेपणा तर
निश्चितंच कोणत्याच नॅशनल लेवलला
खेळणाऱ्या प्लेयरमध्ये नसणारंच, तू कसा काय
त्याला अपवाद असशील. वरची फळी अपयशी
झाली तू भयंकर संथ खेळून चाळीसेक रन काढून स्वतःची बाजू सेफ करतोस आणि शेवटी हाणामारी करुन हिरो होयला बघतोस असं वाटत
राहिलं नेहमीच पण कोणत्याही
परीस्थितीत थंड डोक्यानं खेळणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाही... तू जमवलंस, जवळपास नेहमीच. गांगुली, सेहवागची एक्झिट, युवराज टिम बाहेर बसणं आणि जडेजा, रैना, मुरली विजयला
अपयश येऊनंही संधी मिळत राहणं यामुळे
उत्तरोत्तर तुझा रागंच केला मी. पण फॉर्च्युन फेवर्स द ब्रेव्ह म्हणतात ना तसं तुला नशिबानंही साथ दिली आणि तू मैदानावर
तुझी धमकंही दाखवलीसंच. यश डोक्यात जाऊ न देणारा आणि
अपयशंही तितक्याच शांतपणे पचवणाऱ्या धोनीवर माझ्यासारख्या कोणीही कितीही टिका करो पण वर्ल्ड क्रिकेटमध्ये तू
तुझं एक अढळ स्थान निर्माण केलंस.
आजकाल तुझा खेळ पूर्वीसारखा आक्रमक राहीला नाहीये, शिव्या द्यायला आम्हाला चालूनंच आलीये संधी पण... महेंद्रसिंग धोनी आता तुझ्यावर
कॅप्टंसीची जवाबदारी नाहीये, तू जसा तुझा काळ गाजवलास तसाच धडाकेबाज खेळत
रहा... मला कितीही आवडत नसला तरीही
पुढच्या वर्ल्डकपमध्ये धोनी संघात असावाच अशी माझी मनापासून ईच्छा आहे.
धोनी तू मला कधीच आवडला नाहीस... आजंही आवडत नाहीस... पण
स्वकर्तृत्वावर तू शिखर गाठलंस, तिथे तळ ठोकलास
तर आता जेव्हा कधी रीटायर होशील तेव्हा माझ्यासारख्या टिकाकारांची तोंड बंद करुन जोरदार खेळून बाहेर जावंस अशी
मनापासून ईच्छा आहे... कोणाचाच पडता काळ
बघायला आवडत नाही मला आणि तूही त्याला अपवाद नाहीस...
#HappyBirthdayMSD
Play Well, Enjoy Your Game!
केपी आर
