Sunday, December 11, 2011

"टर्निंग पेजेस"


"टर्निंग पेजेस"



प्रत्येक पान नवं

प्रत्येक पान.. जगायला हवं..

फक्त पलटण्यात अर्थ नव्हता

म्हणूनच.. थांबलो प्रत्येक पानावर

कधी नकळत.. कधी अपघातानं

कधी चक्क जाणून बुजून.. तर कधी... फक्त तुझ्यासाठी..

त्या रेंगाळण्यातही मजा होती..

अन लिहिण्यात तर.. हंम्म्म.. एक नशा..

मला लिहायची घाई अन लिहिल्यावर पान उलटायची

तुला मात्र आस... मनसोक्त जगायची.. पान अन पान

मी लिहायचो पण तू कोरायचीस..

सुटत्या, निखळत्या, सैलावलेल्या

पानांना एकसंध करायचीस

मी मात्र जपलंच नाही कधी काही..

माहीती असायचं तू वेचशील क्षण सारे

त्यासाठीच मी ही सोडली होती..

काही पानं कोरी..

जाणलं होतं मी.. तू वेचलेले क्षण उतरतील त्यावर...

पण गुदमरून द्यायाचं नव्हतं त्यांना असं

दबक्या वहित.. मिटल्या पानात..

म्हणून उधळली सारी..

बेछूट.. अनिर्बंध..

उसवली वीण..

जगलो पान अन पान..

अन जगू दिलं पानावरच्या त्या क्षणांना...

असंच मनसोक्त.. मनमोकळं..

पण तुला कधी कळलाच नाही...

अर्थ मोकळ्या पानांचा..

उलटत राहीलीस तू पाना मागून पान

सारं काही संपेपर्यंत..



कुणाल प्रकाश रुद्राके

Monday, December 5, 2011

"खुशमस्कऱ्या"





टण्ण.. टण्ण.. टण्ण..
शेवटचा प्रयोग संपला होता दिवसातला
रंगीबेरंगी कपडे स्पॉटलाईट
लोकांची उत्कंठा चेहऱ्यावरचं हसू
एण्ट्रीच्या शिट्ट्या एक्झिटच्या टाळ्या
सगळं सगळं आज स्टेजवर न सोडता
काळजात जपून तो बॅकस्टेजला आला.
ग्रीनरुममधे येऊन त्याच्या खुर्चीमधे बसला
थकलेल्या चेहऱ्यानं कसानुसा हसला
हसताना रंगवलेल्या तोंडामुळे ओढणारे गाल जाणवले
अन कुणास ठाऊक कसे पण आज डोळे त्याचे पाणावले
हंम्म्म.. पहिल्यापासूनंच त्याचा स्वभावंच होता असा..
"खुशमस्कऱ्या"
सुरुवातीपासूनंच तो सगळ्यांच्या चेष्टेचा विषय होता..
मित्रमैत्रीणींच्या हसण्याचा आशय होता
तो ही मग हसायचा
स्वतःवर स्वतःच्या आयुष्यावर
स्वतःच्या दिसण्यावर
अन सगळे हसायचे त्याच्या "असण्यावर"
तो होता फक्त एक कारण सगळ्यांच्या हसण्यासाठी
अन सगळ्यांचं हसणं होतं कारण त्याच्या "असण्यासाठी"
कधी सिरीयसली पाहिलंच नाही त्यानं आयुष्याकडे
मजा मस्करी चेष्टा थट्टा..
आयुष्याला कधीच लावला नाही गांभीर्याचा बट्टा
त्यामुळेच की काय पण
कोणीच सिरीयसली घेतलं नाही
त्याच्या हसण्याला, रडण्याला... अहं...
ना... त्याच्या जगण्याला..
कानांत कायमंच घुमत रहायचा लोकांचा हशा
मनमोकळं रडूही द्यायच्या नाहीत दाहीदिशा..
पण
आज वाहत राहीलं पाणी डोळ्यातून
अन रंग गालावरुन..
स्वतःला सावरत चेहऱ्यावरचा रंग धुतला त्याने..
ईतकावेळ स्पॉटलाईट अन रंगात चमकणारा चेहरा
आता सुरकुत्यांमागे केविलवाणा वाटत होता
कसलीहि समज येण्याआधीच
चढवला होता रंग चेहऱ्यावर
स्वतःचंच हसं करणारे हावभाव
वित्रविचित्र शूज.. अन
रंगीबेरंगी कपडे, त्यावर वेलबुट्ट्या
कळलंच नाही त्याला काय लपवण्यासाठी होता हा खाटाटोप..
आरश्यातलं प्रतिबिंब बोलत होतं त्याच्याशी..
काय बिनसलं आज?
याचसाठी तर जन्माला आलास..
याचसाठी तर जगलास आजवर..
लोकांना हसवणं एक नशा..
सगळ्यांनाच नाही जमत..
तू करुन दाखवलंस..
पाहिलं नाहीस बाहेर..
ऐकलं नाहीस स्टेजवर..
माझ्या तर कानात अजूनही घुमतोय तो आवाज..
जिंकलस तू सगळं.. सगळं काही
अजून काय हवं??
मनापासून हसतायेत्त बघ सगळे..
दोन्ही हातानी कान घट्ट दाबून धरले होते त्यानी..
पण तरीही घुमत राहिला कानात प्रश्न..
अजून काय हवं?? अजून काय हवं??
भरल्या डोळ्यानं न रहावून बोलला तो स्वतःशीच...

"मलाही हसायचंय.. मनापासून... एकदाच"



कुणाल प्रकाश रुद्राके







Thursday, December 1, 2011

‎"लिंबू मिर्ची"



लिंबू मिर्ची

गजबजलेला चौक..
कर्णकर्कश्य वाजणारे हॉर्न्स..
अशातंच रेड सिग्नल..
करकचून ब्रेक मारला त्याने
८०,७९,७८... लाल आकड्यांचं काऊंटडाऊन चालू झालं
एकेकाची घाई, कुठे कोण कुणाला घासलेला तर कोण
थोडक्यात वाचलेला
एका कोपऱ्यात मोबाईल फोनवर बोलणारा ट्रॅफिक पोलिस
सिग्नल मोडून गाडी दामटणारे लोक
हे सारं बघत असताना
चौकात ती आली..
पायघोळ स्कर्ट.. पण विटलेला..
पोलकं नेमकं नको तिथेच फाटलेलं
काळीसावळी पण आखीव रेखीव
विटक्या मळक्या फाटक्या कपड्यातंही उठून दिसणारी
अन दुर्दैवानी त्यातून डोकावणारं तारुण्य
हातात कसलसं टोपलं..
त्याच्याही नकळत त्याची नजर तिचा पाठलाग करु लागली
तसं तर चौकातले सगळेच तिच्याकडेच बघत होते..
अधाशी नजरेनं...
तिला रोजचं होतं..
मोलभाव करण्याच्या बहाण्यानं होणारे स्पर्श
फाटक्या कपड्यातून सर्वांगावर खिळलेल्या गिधाडांच्या नजरा..
पण पोटाच्या खळग्यासमोर अब्रू हरायची नेहमीच
नेमानी येयची ती चौकात..
डोळ्यावर कातडी ओढून..
विकायची कवडीमोल किंमतीला तिच्याकडची जिन्नस..
फाटक्या कपड्यांच्या अन वाढत्या वयाच्या मोबदल्यात...
मिळायचं तिला दोन वेळचं अन्न
पर्याय नव्हता तिला..
गाड्यांच्या गर्दीतून वाट काढत
ती त्याच्यापर्यंत पोहोचली..
त्याच्याही नकळत शरमेनं मान खाली गेली त्याची
घेणार का? दहा रुपये फक्त!! तिचा आवाज कानावर पडला त्याच्या..
डोळे मिटून नकारार्थी मान हलवली त्यानं फक्त
"घ्या ना साहेब नजर नाही लागणार कुणाची" तिचे निरागस शब्द..
डोळे उघडले तेव्हा चपापला तो, "लिंबू मिर्च्या" होत्या तिच्या टोपलीत.
अहोरात्र वखवखलेल्या नजरा झेलणारी ती...
लोकांना मात्र वाचवत होती...

वाईट नजरेपासून!!!



कुणाल प्रकाश रुद्राके








खैरात


वोह सूरजही डूब गया
जब सारे अरमाँन ले के...

कंबख्त चंद तारोंकी "खैरात" कौन चाहता है!!!


कुणाल प्रकाश रुद्राके

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...