मावळतीच्या
सूर्याचे आणि पर्यायाने दिवसाचे आभाळातले उरलेसुरले अवशेष पुसत जसजशी रात्र दबक्या पावलानं येऊ लागते तसं घर स्वतःचा आकार
सोडून आ वासलेल्या जबड्याचा
आकार घेऊ लागतं. दिवसभर ज्या घरात मोठ्या प्रयत्नानं मन रमवलेलं असतं
तेच घर आता तिला
खायला उठतं. ती
हाताला येतील ती सगळी बटनं
दाबून सगळ्या घरातल्या लाईट्स लावते. मेनडोअर आतून घट्ट बंद करून घेत हॉलमधल्या खिडकीत येऊन बसते. बाहेर, येणार्या- जाणार्या माणसांनी, गाड्यांनी
रस्ता फुलून गेलेला असतो. एकेक गाडी, माणूस, दारात खेळणारी लहान मुलं बघता बघता तिची नजर गेल्या चार महिन्यात जागच्या न हललेल्या त्याच्या
गाडीवर येऊन स्थिरावते. धुळीच्या जाडंच जाड थरामध्ये त्याची गाडी झाकून गेलेली असते. तिच्या काळजावरंही अशीच आठवणींची पुटं चढलेली असतात. रोज शेकडो वेळा त्यावर बोटं फिरवत तिने "I miss
you" लिहून झालेलं असतं. पण तरीही आठवणींचा
थर कणभरंही कमी होत नाही. आठवणींच्या थरावर फिरवलेल्या बोटापासून सुरुवात करत ती तास, दिवस,
आठवडे, महिने करत करत किती वर्ष झाली ते मोजत राहते.
नजर खिडकीच्या बाहेर रोखून ती बोटावर वेळेचं
गणित मांडत राहते.
देवापुढे
दिवा लावायची वेळ उलटून चाललेली असते. गेली कित्येक वर्षं नित्यनेमाने आणि भक्तिभावाने केलेलं काम आता तिला मनापासून करावसं वाटत नाही. ती तशीच जागेवर
रेंगाळते. पलीकडच्या तक्क्याखाली पडलेला मोबाईल फोन उचलून ती contact list मध्ये जाते, एकेक alphabet शोधून ती त्याचं नाव
टाइप करते, नावावर क्लिक करून त्याचा नंबर वाचून बॅक बटन दाबून contact list मधून बाहेर येते. परत त्याच्या नावावर क्लिक करते परत त्याचा नंबर वाचून बाहेर येते. हा खेळ बराचवेळ
चालत राहतो. तिला मनापासून एकदाच का असेना पण
त्याला कॉल करुन बघावसं वाटत राहतं, पलीकडून तो बोलणार नाही
नक्कीच हे माहिती असूनही
असंच वाटत राहतं. मग ती मोठ्या
प्रयत्नाने फोन बाजूला ठेऊन देते. पलीकडेच बैठकीवर त्याच्या नेहमीच्या बसायच्या जागेवर तिची नजर जाते. ती लगबगीनं जागची
उठून बैठकीपाशी जाते, बैठकीवर पडलेलं आणि घडीही न उघडलेलं आजचं
वर्तमानपत्र उचलून रद्दीच्या कप्प्यात टाकून देते. बैठकीवरचं बेडशीट एकसारखं करत झटकून त्यावरच्या छोट्या उशा एका रांगेत लावून ठेवते. त्याला जशी आवडते अगदी तशी बैठक ती चकाचक करते.
पलिकडे ठेवलेला लँडलाईन फक्त इनकमिंग पुरता मर्यादित असतो, कधी वाजलाच तर... उचलायचा... मनाविरुद्ध. एरव्ही इंटरनेट बंद पडलंच कधी तर कंप्लेंट करण्यापुरता
वापरला जायचा आधी आता तेही कोणी वापरत नाही जास्तं.. मग बंद पडल्यानं
फरकंही पडत नाही. शेवटचा आउटगोइंग कॉल कदाचित त्यानंच केला असावा कित्येक महिन्यांपूर्वी असं वाटून ती विनाकारण रिसीव्हर
उचलून रिडायलचं बटन दाबते, पलिकडून ऑटोमेटेड आवाज ऐकू आल्यावर रिसीव्हर परत जागेवर ठेऊन देते.
लॅण्डलाइनच्याखाली ठेवलेला त्याचा लॅपटॉप काढून पदरानं पुसते. याआधी कधीच न वापरलेला लॅपटॉप आज तिला उघडून बघावासा वाटतो. ती तो फ्लॅप उघडते, फ्लॅप उघडलेल्या बंद लॅपटॉपकडे बघता बघता जमिनीवर मांडी घालून बसते. लॅपटॉपच्या बंद स्क्रीनमध्ये तिला तो दिसतो.. चष्मा लावून लॅपटॉप मांडीवर घेऊन बसलेला. नाकावर चष्मा थोडासा खाली ओढून कानात इयरफोन लावून पिक्चर बघणारा तो आपल्याच नादात मोठ्यानं हसतो, पलिकडे तीही असते. ओ काय लावलंय, रात्रीचे बारा वाजलेत बंद करा तुमचं ते डबडं म्हणून ती हातवारे करत असते. इयरफोनमुळे त्याला ऐकू येत नाहिये हे कळाल्यावर ती ओ शुक शुक करून मोठ्यानं आवाज देते, तो तिला सांगतो तू झोप मी पिक्चर संपल्याशिवाय झोपणार नाहिये. ती त्याला ओ ओ करून आवाज देत उगाचंच चिडवत राहते. तो हनुवटी एका हाताच्या तळव्यावर टेकवून पुढचा पिक्चर बघत राहतो. ती कूस बदलते आणि लॅपटॉपच्या बंद स्क्रीनवर दिसणारे ते दोघे तिला दिसायचे बंद होतात. ज्या कीबोर्डवर कायम त्याची बोटं फिरली त्या कीबोर्डवर त्याच्या हाताचे ठसे उमटल्याचा भास होतो तिला. मग ती प्राणपणानं तिचा तळहात त्या कीबोर्डवर ठेऊन त्याच्या तळहाताच्या रेषांशी स्वतःच्या तळहाताच्या रेषा जुळवायचा प्रयत्न करते. तिला बघायचं असतं की अजून किती काळ हे असं त्याच्याशिवाय एकट्यानं जगायचंय. या प्रश्नाचं उत्तर तिला काही केल्या हवं असतं. सैरभैर होत ती हात कीबोर्डवरून फिरवत राहते.
त्याच्या तळहाताच्या रेषा कीबोर्डवर तर दिसत नाहीत पण डोळ्यात साठवलेल्या असतात तिने. त्याचा हात आपल्या हातात घेऊन कित्येकदा बोललेली असायची ती, "सायबा, एवढा मऊ कसा काय तुमचा हात? आणि ती आयुष्यरेषा बघा लांबच लांब आहे. काळजी करू नका". हे वाक्य बोलल्यानंतर प्रत्येकवेळी हसणारी ती आता मात्र स्वतःचा तळहात भानातून गेल्यासारखं निरखून बघत राहते. तळहाताच्या रेषा ठळक होत होत वाऱ्यावर धूळ उडून डोळ्यात जावी अशा डोळ्यात खुपू लागतात. इतकावेळ स्पष्ट दिसणारा हात धूसर होत जातो. ती तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये झाकते, तिचे अस्फुट हुंदके त्या तळव्यांवर विरून जातात. तिला मोठ्याने रडावंसं वाटत असतं, वाटतं आपला आवाज पोहोचेल त्याच्यापर्यंत पण ती तसं करत नाही, तळव्यावर विरलेल्या हुंदक्याला ती बाहेर पडू देत नाही.
लॅण्डलाइनच्याखाली ठेवलेला त्याचा लॅपटॉप काढून पदरानं पुसते. याआधी कधीच न वापरलेला लॅपटॉप आज तिला उघडून बघावासा वाटतो. ती तो फ्लॅप उघडते, फ्लॅप उघडलेल्या बंद लॅपटॉपकडे बघता बघता जमिनीवर मांडी घालून बसते. लॅपटॉपच्या बंद स्क्रीनमध्ये तिला तो दिसतो.. चष्मा लावून लॅपटॉप मांडीवर घेऊन बसलेला. नाकावर चष्मा थोडासा खाली ओढून कानात इयरफोन लावून पिक्चर बघणारा तो आपल्याच नादात मोठ्यानं हसतो, पलिकडे तीही असते. ओ काय लावलंय, रात्रीचे बारा वाजलेत बंद करा तुमचं ते डबडं म्हणून ती हातवारे करत असते. इयरफोनमुळे त्याला ऐकू येत नाहिये हे कळाल्यावर ती ओ शुक शुक करून मोठ्यानं आवाज देते, तो तिला सांगतो तू झोप मी पिक्चर संपल्याशिवाय झोपणार नाहिये. ती त्याला ओ ओ करून आवाज देत उगाचंच चिडवत राहते. तो हनुवटी एका हाताच्या तळव्यावर टेकवून पुढचा पिक्चर बघत राहतो. ती कूस बदलते आणि लॅपटॉपच्या बंद स्क्रीनवर दिसणारे ते दोघे तिला दिसायचे बंद होतात. ज्या कीबोर्डवर कायम त्याची बोटं फिरली त्या कीबोर्डवर त्याच्या हाताचे ठसे उमटल्याचा भास होतो तिला. मग ती प्राणपणानं तिचा तळहात त्या कीबोर्डवर ठेऊन त्याच्या तळहाताच्या रेषांशी स्वतःच्या तळहाताच्या रेषा जुळवायचा प्रयत्न करते. तिला बघायचं असतं की अजून किती काळ हे असं त्याच्याशिवाय एकट्यानं जगायचंय. या प्रश्नाचं उत्तर तिला काही केल्या हवं असतं. सैरभैर होत ती हात कीबोर्डवरून फिरवत राहते.
त्याच्या तळहाताच्या रेषा कीबोर्डवर तर दिसत नाहीत पण डोळ्यात साठवलेल्या असतात तिने. त्याचा हात आपल्या हातात घेऊन कित्येकदा बोललेली असायची ती, "सायबा, एवढा मऊ कसा काय तुमचा हात? आणि ती आयुष्यरेषा बघा लांबच लांब आहे. काळजी करू नका". हे वाक्य बोलल्यानंतर प्रत्येकवेळी हसणारी ती आता मात्र स्वतःचा तळहात भानातून गेल्यासारखं निरखून बघत राहते. तळहाताच्या रेषा ठळक होत होत वाऱ्यावर धूळ उडून डोळ्यात जावी अशा डोळ्यात खुपू लागतात. इतकावेळ स्पष्ट दिसणारा हात धूसर होत जातो. ती तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये झाकते, तिचे अस्फुट हुंदके त्या तळव्यांवर विरून जातात. तिला मोठ्याने रडावंसं वाटत असतं, वाटतं आपला आवाज पोहोचेल त्याच्यापर्यंत पण ती तसं करत नाही, तळव्यावर विरलेल्या हुंदक्याला ती बाहेर पडू देत नाही.
डोळ्यांच्या कडा टिपत ती सभोवार नजर
फिरवते, संपूर्ण घर तिला एकाकीपणाच्या
रंगात रंगल्यासारखं वाटतं. तळमजल्यावर खेळणार्या नातवाला ती
आवाज देते, तो आपल्याच नादात
बागडत राहतो. ती अगदीच एकटी
नसते घरात, दिवसभर खेळून दमलेली नात निरागस चेहर्याने गाढ झोपलेली असते पण खरं सांगायचं
तर तिचा एकाकीपणा हा घरातल्या माणसांच्या
संख्येनेशी निगडीत नसतो. बरं माणसंही तिची स्वतःची असली तरीही त्याच्या जाण्यानं झालेली पोकळी ही भरून येणारी
नसते. तिची भिरभिरणारी नजर फिश टँकवर स्थिरावते. त्यातले सगळेच मासे त्यानं आणि तिनं मिळून आणलेले असतात. मासे शांतपणे टँकच्या या टोकापासून त्या
टोकापर्यंत पोहत असतात. दिवसभर त्यांचा तोच खेळ चालू असतो. दिवसरात्र पोहूनंही ते एकाच ठिकाणी
असतात. तो गेल्यापासून तिला
तिचं आयुष्य त्या माशांसारखं झालंय असं वाटतं असतं, कितीही काहीही झालं तरी ते पुढे जातंच
नसतं, तो गेला त्या
क्षणापाशी तिचं आयुष्य थांबून राहिल्यासारखं कॅलेंडरची पानं पलटून परत ती तिथेच जात
राहते. ती संमोहित झाल्यासारखी
नजरेनंच माशांच्या हालचाली टिपत टँकच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत डोळे फिरवत राहते.
तो
खेळ थांबवून मग ती उठून
देवघरात जाते. सकाळी तिने पूजा करून मांडलेले सगळे देव जसेच्या तसे त्याच जागेवर असतात. त्यांच्या पुढ्यातल्या छोट्या वाटीत नैवेद्यासाठी ठेवलेले साखर फुटाणे तेवढे नातवानं येताजाता लांबवलेले असतात. आता जे काय करायचं
ते या लेकरांसाठीच असं
काहीतरी पुटपुटत ती देव्हार्याखालची
काडेपेटी, अगरबत्ती आणि तेलाची लोटी काढते. दिव्याची वात वर ओढत तेलानं
दिवा भरून वात पेटवते. तेवता दिवा चेहर्याच्या जवळ अगदी जवळ आणते, चेहर्याच्या आरपार डोळ्यातल्या पाण्यापलिकडे त्या देवाला दिसेल अशी एक वेड़ी आशा
असते मनात. दिवा, अगरबत्ती लावून यांत्रिकपणे ती जागेवर ठेवते
तेव्हा देव्हार्यातल्या एकातरी देवाला हाताला धरून बाहेर काढून समोर उभं करावं नि दोन्ही खांद्यांना
धरून गदागदा हलवत त्याला विचारावं की किती दिवस
असा निर्जीव असल्याचा आव आणणारेस, किती
दिवस मुक्यानंच बघत राहणारेस, किती दिवस तू निर्गुण निराकार
आहेस म्हणून मी स्वतःचं खोटं
समाधान करुन घ्यायचं, किती दिवस जळी स्थळी काष्टी पाषाणी, चराचरात तूच आहेस म्हणत राहायचं मी? अजून किती दिवस माझ्या देवाशिवाय जगायचं मी? मोजून किती लिहिलेस श्वास माझ्या नशिबात? असं ओरडून ओरडून विचारावंसं वाटतं. ती तशीच बसून
राहते बराच वेळ.
माहितीये तुला भरल्या घरातलं रितेपण काय असतं, आपल्या माणसातलं एकटेपण काय असतं? कसं वाटतं मध्यातंच हात सुटल्यावर अन पुढे एकट्यानंच नेमका किती रस्ता चालायचाय हे माहितीही नसल्यावर. आयुष्यभर कष्ट उपसताना जगायला न जमलेल्या माणसाचं चांगले दिवस आल्यावर मनसोक्त जगण्याआधी आयुष्यच संपून जातं तेव्हा मागे राहणार्या साथीदाराची हतबलता, असहायता काय असते कळेल तुला कधी? मेलंय तुझ्या जवळचं कधी कोणी, झालीये कधी न संपणारी ताटातूट? कसं कळेल मग तुला? विचारू नकोस कोणाला चुकलंय हे? किमान तुला तरी जन्म मरणाचा फेरा नाही म्हणे ना? खोटं खोटं सांत्वन तर नकोच आता, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. देव्हार्यास्मोर बसून या सगळ्या उद्वेगाला मनातल्या मनात वाट करू देत असताना वार्याच्या झुळुकेवर फडफडणारा दिवा पाहून ती भानावर येते आणि सवयीनंच दोन्ही हाताची ओंजळ दिव्याभोवती धरते. लख्ख उजळलेल्या ओंजळीत तिला परत तो दिसतो. ती देव्हार्याकड़े बघते अजूनंही सगळे देव निर्विकार चेहर्याने जागच्याजागी बसलेले असतात. ती सवयीनं डोकं टेकवून जागची उठते. घड्याळाचे काटे खाऊन खाऊन पोट टच्च करून सुस्तावलेल्या अजगरासारखे हळूहळू पुढे सरकत असतात. तीही पायाला मणामणाचं ओझं बांधल्यागत देव्हार्यापासून दूर जाते.
तिथून निघताना त्याच्या वॉर्डरोबचा दरवाजा उघडून आत व्यवस्थित घड्या
करून एकावर एक रचलेले कपडे
बघते. त्यानं दवाखान्यात जाण्याआधी म्हणजे चालता फिरता असताना शेवटचा घातलेला शर्ट दिसतो तिला. हास्पिटलचे कपडे अंगावर चढवण्याआधी काढून लेकाच्या हातात देत धुवायला टाक घरी जाऊन सांगितलेलं असतं त्याने. च्यायला हे हॉस्पिटलचे कपडे
घालायलाच पाहिजे का म्हणत वैतागलेला
तो आठवतो तिला. कपाटातला तो शेवटी घातलेला
शर्ट ती बाहेर काढते.
जणू तो त्या शर्टमध्ये
असल्यागत मायेनं त्यावरून हात फिरवते, शर्ट स्वतःच्या अंगावर टाकून घट्ट मिठी मारते. आता तिला हुंदका आवरत नाही. इतकावेळ प्राणपणाने दाबून ठेवलेलं बाहेर पडतं. ती मोठ्यानं हंबरडा
फोडते. कामावरून नुकताच येत घरात पाऊल टाकलेला लेक, तिचा आवाज ऐकून आल्यापावली तिच्या शेजारी जाऊन बसतो. डोक्यावरून हात फिरवत तिला कवेत घेतो, मनसोक्त रडू देतो. लेकाच्या मिठीतून बाहेर न येता म्हणते
ती, "कडक इस्त्री केल्याशिवाय कपडे घालत नव्हते रे कधीच, रूमाल
सुद्धा इस्त्री करून खिशात ठेवायचा माझा राजा. हॉस्पिटलच्या कपड्यावर जीव गेला, ना आंघोळ घातली
ना कपड़े बदलले, हॉस्पिटलच्या चादरीत गुंडाळून नावाला पायावर दोन तांबे पाणी ओतून माती केली रे आपण"... पुढे
एकंही शब्द न बोलता लेकाच्या
मिठीत स्फुंदत रहते ती. लेक बाजूला होत तिचे डोळे पुसतो परत एकदा डोक्यावरून हात फिरवतो. ती आसवांना बांध
घालत डोळे कोरडे करते, पण ते ओसरणं
नसतं, आतल्या आत परत साठत
राहतं, कधीही बांध फोडून आवरण्या पलिकडे पूर येऊ शकेल अशा नदीसारखे तिचे डोळे दिसत राहतात. ती सोंबरलेल्या डोळ्याने
आणि जडावलेल्या डोक्याने परत एकदा खिडकीत येऊन बसते.
थोड्यावेळाने
जेवताना कोरड्याठाक घशातून एकेक घास खाली ढकलणं कठीण होत जातं. प्रत्येक घासाला तोटरा बसू लागतो मग ती पाण्याच्या
घोटासोबत दोनचार घास पोटात ढकलते आणि निर्विकार चेहर्याने नजर शून्यात रोखून बसते. जसजशी रात्र चढत जाते तसतसा आजूबाजूच्या आंधारापेक्षा तिच्यात अंतर्बाह्य आंधार साठून राहतो. डोळे बाहेरच्या अंधाराला सरावतात पण आतल्या आंधारात
तिचं मन चाचपडंत आठवणींशी
झगडत राहतं. तिला तो आंधार बाकी
कशाहीपेक्षा शाश्वत वाटत राहतो. वाटतं या काळोखाच्या डोहात
देहाची नाव सोडून द्यावी आणि परतून येऊच नये, डोहाच्या माधोमध गेल्यावर नाव सोडून उडी मारावी आणि खोल खोल जात तळ गाठावा आयुष्याचा.
वर आलाच तर फक्त देह
यावा, आपण बुडून जावं कायमचं. आजंच व्हावं हे, अगदी आत्ताच... नको बघायला उद्याचा सूर्य, नको परत ते दुष्टचक्र. काळोखाच्या
गर्भातून खोल खोल तळाशी पोहोचल्यावर कदाचित दिसेल आपल्याला वाट, जी त्याच्यापाशी घेऊन
जाईल परत. तो परत दिसल्यावरंच
उजळून जावं अस्तित्व. अंथरूणावर पडल्या पडल्या घरभर नजर फिरवते ती, तिला ते तिचं घर
वाटतंच नाही. भिंतीवर टांगलेल्या घड्याळाची टिकटिक थांबलेली असते, तासनतास घड्याळ एकंच वेळ दाखवत राहत. जहाल विषासारखी रात्र क्षणोक्षण तिच्यात भिनत राहते. एकामागून एक आठवणींचे कढ
येत राहतात, बांध फुटतो, ती आसवं थोपवत
नाही, अश्वत्थ जखमेसारखी डोळ्यातून आसवं भळभळत राहतात. आठवणींचा शीणवटा तिला पेलण्यापालिकडे असतो. ती जडावलेल्या पापण्यांनी
आणि शीणलेल्या मेंदूने स्वतःला झोपेच्या स्वाधीन करून टाकते तेव्हा रात्रीचा प्रवास वेगानं दिवसाच्या दिशेने चालू झालेला असतो. आठवणीत स्वतःला अशी गुरफटून झोपते ती की उगवणाऱ्या
दिवसाचा उजेड तिच्यापर्यंत पोहोचतंच नाही.
नाईलाजाने
डोळे उघडते तोवर उजाडलेलं असतं, तिच्या नव्या दिवसावर सूर्य एकाकीपणाची किरणं फेकत असतो. घरातला एकेकजण आवरायला सुरुवात करतो, प्रत्येकजण पुढे पुढे चालायचा प्रयत्न करत असतो अन तेव्हाच तिचं
मन पायाला चाकं लावल्यासारखं वेगानं भूतकाळाकडे निघालेलं असतं. तिला पुढे जाण्यात स्वारस्य नसतं, मनाच्या कोपर्यात कुठेतरी तिचं आठवणींचं गाव असतं, त्या गावत मधोमध त्या दोघांचं घर असतं. मिटल्या
डोळ्यांना ते दोघे त्याच
घरात एकत्र दिसत असतात. ते एकत्र असतात
तिथे लख्ख उजेड असतो. घराचा कानाकोपरा त्याच्या अस्तित्वानं उजळून गेलेला असतो. तेवढं एक ठिकाण सोडलं
तर तिच्या उघड्या डोळ्यांना मात्र सर्वदूर न भेदता येणारा
काळोख पसरलेला दिसतो. ती न रहावून
डोळे मिटून घेते परत आणि खांद्यावर डोकं टेकवून निश्चिंत बसून राहते. सायबा मला एकटीला सोडून जाऊ नका हा म्हणते तेव्हा
उत्तरादाखल तो फक्त हसतो.
ती डोळे उघडते, श्वासांची माळ तुटत नाही जगण्याशी जुळलेली नाळ सुटत नाही, डोळे बंद करून बसावसं वाटतं... बंद डोळ्यांना आठवणींशिवाय काहीही दिसत नाही. उघड्या डोळ्यांनी कुठेही बघवत नाही... राहतं घर स्वतःच वाटत
नाही कारण तो घरात नसतो.
एकट्यानं उपसण्यासाठी कालसारखाच दिवस समोर आ वासून अस्तव्यस्त
पडलेला असतो.
तिच्या
पुढ्यात ठेवलेला चहाचा कप गार होत
आलेला असतो. तो गेल्यापासून चहासोबत
बिस्किट न खाणारी ती
रोज बिस्किटं सोबत घेऊन बसते. खिडकी उघडून एक बिस्किट हातात
धरते न धरते तोवर समोरच्या
फांदीवर बसलेला कावळा खिडकीच्या गजावर येऊन बसत तिच्या हातातलं बिस्किट चोचीत घेऊन उडून जातो. रोज एकच बिस्किट घेतो परत येत नाही. ती एकट्यानं चहा
पिण्याचा सोपस्कार पार पाडते आणि नाईलाजानं उठून दिवसातला एकेक क्षण वेचत राहते, तळहातावरची आयुषयरेषा कणकण तुटत राहते. थेंब थेंब करून तिच्यातला काळोख सभोवताली गळत राहतो, ती आठवणींची काजळी
अविरत आयुष्यावर सारवत राहते. घर मोठया जबड्याचा
आकार घेत राहतं, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र होत राहते. तिच्या आयुष्याच्या बळकट दोरीमध्येच मान अडकवून तिचा श्वास गुदमरत राहतो. असह्य एकटेपण वागवत काळजात आठवणींची माळ गुंफत पाय खुरडत का असेना पण
एक ना एक वाट
त्याच्याकडे घेऊन जाईल आपल्याला या एका आशेनं
ती चालत राहते... ती एकाकी चालत
राहते
केपी
आर
