बस स्टॉपवरची गर्दी
रणरणतं ऊन
गाड्यांचा गोंगाट अन..
उडणारी धूळ
त्यातही धूराची भर घालत
येणारी बस..
धक्के बुक्के खात..
महत्प्रयासानं मिळवलेली जागा
लाल डब्याची खडखड
अन ऊशीर झाल्यानं होणारा त्रागा..
धूळीनं माखलेल्या चेहऱ्यानं
गाठायचं ऑफिस..
बॉसची कटकट
कलिग्जचे टोमणे
तापणाऱ्या दिवसासोबत
वाढतंच राहतात..
दिवसभर काम उपसून
ती तयार होते
बसची खडखड, धक्के बुक्के अन धुळीचे लोट
सहन करायला..
बॅग भरता भरता
ध्यानी मनी नसताना
येतं आभाळ भरुन..
"उशीर करु नकोस, लवकर निघ" येतो फोन घरुन
घामेजलेल्या चेहऱ्यानं ती परत बसस्टॉपवर येते
अन नेमका तेव्हाच तो गाठतो..
"मुसळधार"
तुटक्या शेडमधून.. गर्दीला चुकवत
पोहचतो तिच्यापर्यंत..
बॅगेतलं प्लॅस्टिकचं फोल्डर
धरते ती डोक्यावर अन..
तेवढ्यात परत फोन वाजतो..
एक दोन तीन... कित्येक रिंग होतात...
बंद पडायच्या आत
उचलते ती लगबगीनं..
"पहिल्या पावसाच्या शुभेच्छा"
बोलतो तो पलिकडून
ईतकावेळ त्रासलेली "ती"
हसते मग खळखळून..
ह्यॅ असं काय... तुटक्या शेडमधे
गर्दीत लपून...
भेटतात का पावसाला असं चोरून???
एवढंच बोलून ठेवतो तो फोन
बरसत्या पावसात शोधत राहतात त्याला
तिचे आश्चर्यानं भरलेले डोळे दोन
बाईक रस्त्याच्या कडेला लाऊन
हसत असतो तो तिच्याकडे पाहून
पाऊस, गर्दी, रस्ता...
सारं सारं विसरुन ती त्याला बिलगते...
त्या गोड मिठीचं महत्व पावसालाही समजते
एवढ्यात वाजतात हॉर्न्स...
येतात दोघे भानावर..
बाईकवर पावसाचे थेंब झेलतानाच
"आय लव्ह यू"
मागून तिचे शब्द येतात त्याच्या कानावर...
उत्तरादाखल तो फक्त हसतो
अन पहिला पाऊस असाच
त्या दोघांच्या प्रेमात भिजतो
कुणाल प्रकाश रुद्राके
