"पेन्सिल स्केचेस"
जादू होती तिच्या बोटात..
हो.. पेन्सिल स्केचेस काढायची ती
डोळ्यांना दिसणारं अन काळजाला भावणारं
सगळं काही उतरायचं तिच्या कॅन्व्हासवर
जपून ठेवायची मग कागदावरचे ते क्षण
काय काय अन कसं कसं
सुचेल तसं अन दिसेल तसं
नेहमी म्हणायची ती..
ब्लॅक अँड व्हाईटची जादू कळणार नाही तुम्हाला..
बघता बघता जिवंत व्हायचा मग कागद अन कागद
आज पसरले होते सारेच तिच्या अवती भवती
अन अस्ताव्यस्त..
त्यानं तिला दिलेला पहिला गुलाब..
चेहऱ्यावर उडणारी केसाची बट
दोन्ही खांद्यावरुन घेतलेला झिरझिरीत दुपट्टा
हळूच गालांत हसणारी ती
अन लाजेनं झुकलेली नजर..
मरीन ड्राईव्हवर पाठमोरे बसलेले ते दोघे..
किनाऱ्यावर आपटून उसळलेलं पाणी
त्याच्या खांद्यावर तिनं टेकवलेलं डोकं
अन त्यानं तिच्याभोवती गुंफलेला हात
रीमझिम रीमझिम बरसणारा पाऊस
तिच्या गालावरुन वाहणारे पावसाचे थेंब
भान हरखून तिच्याकडे बघणारा तो
एक हातानं त्याचा हात घट्ट धरुन
एका हातात पाठीमागे मिटलेली छत्री लपवणारी ती
बाईकवर ते दोघे..
भन्नाट वेग..
मागे बसून दोन्ही हात पसरुन वाऱ्याला कवेत घेणारी ती..
एक छोटासा कॉफी जॉईण्ट
कॉर्नर टेबल..
मंद प्रकाशात बसलेले ते..
दोघांमधे एकंच कप..
तिच्या चष्म्यावर जमणारी वाफ
अन त्याच्या डोळ्यात तिचं प्रतिबिंब..
सारं काही अनुभवलेलं
सारं काही जगलेलं
अन जीवापांड जपलेलं
सगळं सगळं रेखाटलं होतं तिनं
.
.
.
अस्ताव्यस्त पसरलेलं एकेक चित्र बघता बघता
भरुन आलं तिच्या डोळ्यात..
क्षणात सारी चित्र ओघळली मग गालावर..
ईतका वेळ मुठीत घट्ट धरलेलं खोडरबर..
दोन बोटात धरलं तिने..
बेछुटपणे एकेका कागदावर फिरत राहीलं ते..
प्रयत्न केला तिनं आटोकाट.. पण
पसरुन राहीली कागदावर अन काळजावर
आठवणींची काजळी...
कुणाल प्रकाश रुद्राके
