लिंबू मिर्ची
गजबजलेला चौक..
कर्णकर्कश्य वाजणारे हॉर्न्स..
अशातंच रेड सिग्नल..
करकचून ब्रेक मारला त्याने
८०,७९,७८... लाल आकड्यांचं काऊंटडाऊन चालू झालं
एकेकाची घाई, कुठे कोण कुणाला घासलेला तर कोण
थोडक्यात वाचलेला
एका कोपऱ्यात मोबाईल फोनवर बोलणारा ट्रॅफिक पोलिस
सिग्नल मोडून गाडी दामटणारे लोक
हे सारं बघत असताना
चौकात ती आली..
पायघोळ स्कर्ट.. पण विटलेला..
पोलकं नेमकं नको तिथेच फाटलेलं
काळीसावळी पण आखीव रेखीव
विटक्या मळक्या फाटक्या कपड्यातंही उठून दिसणारी
अन दुर्दैवानी त्यातून डोकावणारं तारुण्य
हातात कसलसं टोपलं..
त्याच्याही नकळत त्याची नजर तिचा पाठलाग करु लागली
तसं तर चौकातले सगळेच तिच्याकडेच बघत होते..
अधाशी नजरेनं...
तिला रोजचं होतं..
मोलभाव करण्याच्या बहाण्यानं होणारे स्पर्श
फाटक्या कपड्यातून सर्वांगावर खिळलेल्या गिधाडांच्या नजरा..
पण पोटाच्या खळग्यासमोर अब्रू हरायची नेहमीच
नेमानी येयची ती चौकात..
डोळ्यावर कातडी ओढून..
विकायची कवडीमोल किंमतीला तिच्याकडची जिन्नस..
फाटक्या कपड्यांच्या अन वाढत्या वयाच्या मोबदल्यात...
मिळायचं तिला दोन वेळचं अन्न
पर्याय नव्हता तिला..
गाड्यांच्या गर्दीतून वाट काढत
ती त्याच्यापर्यंत पोहोचली..
त्याच्याही नकळत शरमेनं मान खाली गेली त्याची
घेणार का? दहा रुपये फक्त!! तिचा आवाज कानावर पडला त्याच्या..
डोळे मिटून नकारार्थी मान हलवली त्यानं फक्त
"घ्या ना साहेब नजर नाही लागणार कुणाची" तिचे निरागस शब्द..
डोळे उघडले तेव्हा चपापला तो, "लिंबू मिर्च्या" होत्या तिच्या टोपलीत.
अहोरात्र वखवखलेल्या नजरा झेलणारी ती...
लोकांना मात्र वाचवत होती...
वाईट नजरेपासून!!!
कुणाल प्रकाश रुद्राके
