"द शो मस्ट गो ऑन"
खूप आवडायचं हे वाक्य नाही तुम्हाला
मी गेल्यावर सेलिब्रेट करा
रडू नका...
सांगायचात आम्हाला नेहमी हसून
पण तुम्ही गेल्यापासून
एकसारखा पाऊस पडतोय, हिवाळा असूनंही...
रडू नका सांगायचात आम्हाला
मग...
आता ही चिटींग नाहीये का
सांगा ना
०६/१२/२०१७
खूप आवडायचं हे वाक्य नाही तुम्हाला
मी गेल्यावर सेलिब्रेट करा
रडू नका...
सांगायचात आम्हाला नेहमी हसून
पण तुम्ही गेल्यापासून
एकसारखा पाऊस पडतोय, हिवाळा असूनंही...
रडू नका सांगायचात आम्हाला
मग...
आता ही चिटींग नाहीये का
सांगा ना
०६/१२/२०१७
हे घर मोकळं मोकळं वाटतं
तुम्ही गेल्यापासून खरतंर, गर्दी वाढलीये ईथे
भेटणारे, सांत्वन करणारे आणि
खांद्यावर हात ठेऊन
आम्ही आहोत सांगणारे येतात
मी शून्यातली नजर
त्यांच्यासोबत मिळवायचा प्रयत्न करतो
कोण काय सांगतंय हे कळो न कळो
होकारार्थी मान हलवतो सगळ्यांनाच
जुन्या, एकाकी, पडक्या वास्तूंची भगदाडं कशी असतात
तशाच घराच्या कानाकोपऱ्यात आठवणींची भगदाडं पडलीयेत
त्याच्यातून आरपार बघताना
तुम्ही दिसता ठळक...
मग स्वतःकडे आरश्यात पाहिल्यावरही
फक्त तुम्हीच दिसता...
तुम्ही माझ्यात आहात याचं समाधान वाटतं
पण याव्यतिरीक्त...
दुसरीकडे कुठेही बघितलं तर
हे घर मोकळं मोकळं वाटतं
आय लव्ह यू भाऊ
०७/१२/२०१७
तो डॉक्टर म्हणाला होता मला
७२ तास यांना जगवलं व्हेंटीलेटरवर तर
बघतिल कदाचित तुझ्याकडे, डोळे उघडून
ओळखतील तुला
आणि कोणास ठाऊक
काही मिरॅकल झालंच तर
बोलतीलंही तुझ्याशी... पण..
पण वाचणार नाहीतच..
आत्ता कसंय? विचारल्यावर म्हणाला
आत्ता काही कळत नाहीये त्यांना
वेदना, यातना, स्मृती... काहीच नाही
सेमी कोमामध्ये आहेत
कानात तुमचे शब्द ऐकू आले
"मला व्हेंटीलेटरवर जगवू नका"
म्हणाला होता तुम्ही ताई आणि मला
जगवायचं कशासाठी तर...
तुम्ही वाचणार नाहीत हे सांगण्यासाठी
पण व्हेंटीलेटर काढा
असं सांगायला जीभ रेटली नाही
कदाचित आयसीयू बाहेर
आमची द्विधा मनस्थिती
तुम्हाला बघवली नसेल
व्हेंटीलेटर चालू असतानाच
तुम्ही थांबायचं ठरवलंत
तुम्ही डोळे उघडून पाहीलं नाहीत माझ्याकडे
बोललाही नाहीत काहीच
तुम्ही हॉस्पिटलमध्ये गाढ झोपेत असताना
मी कित्येकदा येऊन म्हणायचो
आय लव्ह यू भाऊ
आजही म्हणतो रोज
तेव्हा वाटायचं तुम्ही ऐकलं नसेल कधीच
पण आज वाटतं तुम्ही नक्की ऐकल असेल
ऐकत असाल... आजंही
आय लव्ह यू भाऊ!
०७/१२/२०१७
रोज चिकाटीनं सकाळचा एक दिड तास
एकेक माणूस आठवून
सगळ्यांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवायचात तुम्ही
मग एक दिवस
मी तुम्हाला ब्रॉडकास्ट करायला शिकवलं
त्यात तुम्ही माझं नावंही ईन्क्लुड केलंत
हॉस्पिटलच्या बेडवर पाठ टेकवण्याआधी
तुम्ही शेवटचा ब्रॉडकास्ट केलात
"ईफ यू फॉल, आय विल बी देअर" गुड मॉर्निंग
आता व्हॉट्सॅप उघडायची ईच्छा होत नाही
जपून... लक्षपूर्वक पावलं उचलावी लागतात आता
तुम्ही म्हणाला होता
"ईफ यू फॉल, आय विल बी देअर"
पण आता...
पडून चालायचं नाही
आता रोज सकाळी उठून
तुमचा शेवटचा मेसेज वाचावासा वाटतो
"ईफ यू फॉल, आय विल बी देअर"
काही बघायचं राहीलं नाही बघ
तुझं लग्नं, तुझी दोन्ही मुलं
तू रांकेला लागेलेला पाहिला त्यांनी
कोणत्याही ईच्छा राहील्या नव्हत्या
बघ की कावळासुद्धा अगदी टपून बसल्यासारखा
शिवला पिंडाला क्षणभरात
आणि कळलं होतं त्यांना
आजकाल बघ नेहमी
मरणाच्या गप्पाच मारायचे
पंधरा दिवसापूर्वी तर
आता माझा अंत जवळ आलाय म्हणाले
चेष्टा नव्हती ती... आत्ता कळतंय
मनाला लावून घेऊ नकोस
जगायची ईच्छाच संपत चालली होती त्यांची
असं काहीबाही सांगत राहतात सगळे मला
मी कोणालाही दुखवत नाही
पण कसं हो सांगू त्यांना
मी स्वतः पाहीलंय तुम्हाला
त्या हॉस्पिटलवरच्या बेडवरुन
नातवाशी फोनवर बोलताना
बरं वाटतंय बाळा मला
येतो हां... लवकर घरी येतो
ताईशी बोलताना
सारखी ग्लानी येतेय गं मला
सारखी ग्लानी येणं काही चांगलं लक्षण नाही
आतमध्ये येऊन बोलत जा माझ्याशी
झोपेतून उठवत जा मला म्हणजे मला ग्लानी येणार नाही
सूनेला सांगताना
एवढे वारंवार डायलिसिस कोण करतं का?
अशानं तुम्ही गमवून बसाल मला
असं नका करु
मला सांगताना
मला काल काही कळतंच नव्हतं
सारखी ग्लानी येत होती
मला जरा सुपारी आणून दे चघळायला
म्हणजे ग्लानी येणार नाही
मी पाहीलीये...
तुमची धडपड... आजारातून उठण्याची
तुमच्या नजरेतली ईच्छा
परत नव्यानं जगण्याची...
कसं सांगू त्यांना?
कसं सांगू?
ते म्हणतात जगण्याची ईच्छा राहीली नव्हती तुमची
१६/१२/२०१७
तुमची ओशोशी
आणि माझी तुमच्याशी
असलेल्या जवळीकीमुळे
उभा राहू शकलोय
तुम्ही नेहमीच सांगायचात
आयुष्यात कठीण समयी
आई वडील गेले तेव्हा
मरणाच्या दाढेतून परत आलात तेव्हा
व्यावसायिक अपयशातून सावरताना
ओशोनं साथ दिली तुम्हाला
तुम्ही वाचलेलं मला सांगायचात
फार काही नाही तरी
मतितार्थ तरी माझ्यापर्यंत पोचवायचात
ओशो वाचायची ईच्छा तीव्र झाली त्यामुळे लहानपणापासूनंच
थोडाफार वाचलाही तुमच्या नादानं
पण गेल्या एक-दिड वर्षात
जसं डॉक्टरने सगळं ठीक नसल्याचे
आणि परत ठिक न होण्याचे
संकेत द्यायला सुरुवात केली
तसंतसं ओशो वाचावासा वाटू लागला
म्हटलं कठीण समयी ओशोनं साथ दिलीये तुम्हाला
आपल्यालाही बळ मिळेल
पण सगळं माहीती असूनंही
जेव्हा मनापासून पटलं की
तुमचाच नाही तर सगळ्यांचाच वेळ लिमिटेड आहे
आणि कळून चुकलं की एका लिमिटनंतर
आता तुम्हाला वाचवू शकणार नाहीच
तेव्हा ओशो वाचण्यापेक्षा
तुम्हाला वाचू लागलो मी
आय बेट, "एवढं बळ तुम्हाला ओशोनंही दिलं नसेल"
२२ डिसेंबर २०१७
जसा घर एकट्यानं संभाळण्याएवढा मोठा झालो
तसा खुश होयचो तुम्ही दोघंच ट्रीपला जाणार असाल तेव्हा
मी घरी एकटा... फ्रिडम...
अहं... हवा तसा नंगानाच खरंतर
उशिरा उठणं, उशिरा ब्रश करणं
मित्रांना गोळा करुन धुडगुस
मग तुम्ही परत येयच्या आदल्या दिवशी
सगळं घर आवरुन
आरशाला लाजवेल असं चकाचक करुन ठेवायचं
कित्येक वर्ष चाललं हे
पण दोन ते तीन दिवसाच्यावर नको वाटायचं
"एकट्यानं रहाणं"
मग एकदा तुम्ही आजारी पडून
दवाखान्यात दाखल झालात
आई दिवस रात्र तुमच्या उशापायथ्याशी
मी घरी एकटा...
रात्रीच काय दिवसंही भयाण वाटायचे
रडू कसंबसं कंट्रोल करत
मनातल्या मनात प्रार्थना करायचो
तुम्ही घरी या लवकर... नको मला असलं फ्रिडम
आणि आता... तुम्ही एकटेच गेलात निघून
परत कधीच न येण्याच्या प्रवासावर
आज एक-सव्वा महिन्यानी
आई मामाकडे चाल्लीये
माहेरी जाऊन येयचं असतं म्हणे
पण आज...
पायाखालची जमिन सरकल्यासारखं वाटतंय
आधांतरी... ना पायाखाली जमिन ना डोक्यावर छप्पर
आधी म्हणायचो तरी नको मला असलं फ्रिडम
या तुम्ही लवकर घरी...
आता..
सकाळी आईला विचारावं वाटलं
या अशा प्रथा पाळायलाच हव्या का
का जातेयेस
पण शब्द गिळत, नजरा नजर टाळत म्हणालो मी
कधीही वाटेल तेव्हा फोन कर
मी येतो घेयला..
पुढचं सगळं माझी मिठी बोलून गेली तिला
एकटेपणा खरंच खूप वाईट असतो ओ
आई घालवेल माझा
पण मी... मी कसा घालवू तिचा...
नकोय खरंच.. नकोय असलं फ्रिडम मला
२५ डिसेंबर २०१७
No comments:
Post a Comment