Friday, September 18, 2020

वर्कफ्राॅमहोम

 


माझ्या पूर्ण काॅर्पोरेट करीयरमध्ये ज्या लोकांना वर्कफ्राॅमहोम करायला मिळतं त्यांचा मला उघड उघड हेवा आणि सुप्त आसूया वाटत आलीये. माझ्याच नाही तर माझ्या कित्येक मित्रांच्या आणि कलिग्जच्या भावना तंतोतंत सेमंच होत्या. मागच्या आठवड्यातंही सरकारने आवाहन करण्यापूर्वी वर्कफ्राॅमहोम मिळायला हवं राव असाच सगळ्यांचा सर्वदूर सूर दिसत होता. पण तेव्हा हे वर्कफ्राॅमहोम प्रकरण एक आठवडा किंवा फारफार तर १० दिवस करावं लागेल असा सगळ्यांचा आडाखा होता. शिवाय वर्कफ्राॅमहोम करुन बाहेर खायला प्यायला आणि उनाडक्या करायलाही थोडीफार फ्लेक्झिबिलीटी राहील असं कित्येकांनाच वाटत होतं. पण पहिल्या २-३ दिवसातंच चित्र स्पष्ट झालं आणि वर्कफ्राॅमहोम तर करायचंच पण बाहेर जाणं आणि बाकीच्या टाईमपासवर पूर्णपणे आणि कडक निर्बंध आले तसे एकेकाचे धाबे दणाणले. एकमेकांना फोन करुन वाॅटसॅप ग्रुपवर मेसेजेस करुन चाचपणी होऊ लागली. दिवसभर घरी बसतो पण संध्याकाळी गाडी काढून चक्कर टाकतो राव एखादी असं काही मित्र बाकीच्यांना सांगू लागले.

अशातंच २२ मार्चच्या जनता कर्फ्यूची घोषणा झाली आणि मग मात्र एकेकाला वाटू लागलं की बाहेर पडण्यावर पारंच बंदी येणार. मग वाॅटसॅपवर लोकांनी अक्षरशः उच्छाद मांडला. दिवसभर काय करायचं हा गहन प्रश्न सर्वांना पडला होता. तरी बरं हा जनता कर्फ्यू सार्वजनिक सुटी म्हणजे रविवारी करायचा ठरला होता. लोकांनी नाकातोंडात पाणी घुसायला लागल्यासारखं तडफडायला सुरुवात केली. कदाचित नाकातोॅडात पाणी शिरायला लागल्यावरंही माणूस एका क्षणी हातपाय मारायचे सोडून देत असेल पण वाॅटसॅप बहाद्दर निम्मा रविवार गेला तरी शर्थीने पूर्ण दिवस काय करायचं या देश पातळीवरच्या गहन समस्येवर निरनिराळे उपाय सुचवतंच राहीले. माझ्या वयाचे म्हणजे पस्तीशी ओलांडलेले कित्येकजण ज्यांनी आयुष्यात दोन पानंही अभ्यासाच्या पुस्तका व्यतिरिक्त वाचली नसतील ते हजारो पानी पीडीएफ रुपी फुकटची पुस्तकं पाठवू लागले. काॅपिराईट, लेखक प्रकाशकाचे वेळ कष्ट पैसा यातलं काहीच त्यांच्या निरागस मेंदूला पुसटसंही स्पर्शून गेलं नाही. तुमचं वाचन नाही म्हणजे तुमच्याकडे पुस्तकांच्या हार्ड काॅपीज असण्याची शक्यताच नाही आणि त्याला कोणाची हरकत असायचं काहीच कारण नाही. पण तुमच्या हातात स्मार्ट फोन आहे ज्यावरून तुम्ही नाॅट सो स्मार्ट मेसेजेस भसाभसा पाठवत राहता त्याच स्मार्ट फोनवर कित्येक फ्री ॲप्स आहेत, ईसाहीत्य सारखी फ्री पुस्तकं देणारी वेबसाईट आहे वाचकांसाठी. ते डाऊनलोड करा किंवा तुम्हाला स्वतःला वाचायचंच नाहीये पण बाकीच्यांची काळजी वाटत्येत तर त्यांना या ॲप्सची यादी पाठवा फारतर, फुकट पुस्तकं कसली वाटता लेखक प्रकाशकांच्या परवानगी शिवाय? फ्री साठी हे पर्याय आहेत. त्याशिवाय हवं असल्यास विकतंही डिजिटल कंटेट मिळतं पण जे कंटेट फ्री नाही तेच फुकट मिळावं हा अट्टहास का आहे हे मला कधीच कळलं नाहीये.

बरं या कार्यकर्त्यांना जर विचारलं की गेल्या जवळपास दोन हजार रविवारांमध्ये तुम्ही कोणकोणत्या रविवारी भरीव किंवा मिनिंगफुल म्हणता येईल अशी कामं केलीत किंवा पुस्तकं वाचलीत तर धड चार रविवार सांगता यायचे नाहीत. बरं रोजंही हे अशा कोणत्या अत्यावश्यक सेवा पुरवत असतात किंवा अशी किती कामं करतात की एका रविवारमध्ये मी काय करु असा प्रश्न पडत असावा?

बोअर झालं राव, वेळ कसा घालवायचा कळतंच नाही असं वर्कफ्राॅमहोम वाले म्हणायला लागले की मला कम्माल वाटते. पाच दिवसांचा वर्किंग वीक असणाऱ्यांना रोज किमान साडे नऊ ते दहा तास वर्किंग असतं. घरुन काम करत असल्याने आणि वर्च्युअली सगळं जगंच सध्या लाॅकडाऊनमधून जात असल्याने कामाचा ताण तसा कमी असेल असं गृहीत धरला तरी त्या १० तासातले किमान ५ तास काम असायलाच हवं. सध्या अगदी कॅटरीना कैफच्या घरातंही कामवाली बाई नाही हे आतापर्यंत आपण सर्वांनीच कुठे न कुठे विडीयोमधून बघितलंच असेल. तर आपल्या घरी घरकाम करणारे मदतनीस सध्या आपल्याला उपलब्ध नसल्याने फक्त गरजेचं म्हणजे अगदी रोजचं झाडलोट फरशी पुसणे, भांडी घासणे, किचन ओटा आवरणे आणि स्वयंपाक करणे ही कामं घरातल्या सर्वांनी वाटून घेतली तर त्यात किमान दोन अडीच तास जातात. साधारणपणे प्रत्येकाच्याच घरात किमान एक आणि जास्तीत जास्त दोन लहान मुलं आहेतंच (काही अपवाद वगळता). त्यांना एंगेज्ड ठेवणं, थोडा अभ्यास घेणं, खेळणं यात किमान तीनेक तास जातातंच. हे सगळं मिळूनंच साडे दहा तास झाले. याउपर सगळ्यांकडेच स्मार्ट फोन, काहीजणांकडे स्मार्ट टिव्ही स्वस्तातलं इंटरनेट आहे. वाॅटसॅप फेसबूक युट्यूब नेटफ्लिक्स अमॅझाॅन हाॅटस्टार आणि ढीगभर ॲप्स वगैरे हे तुम्ही नेहमीच वापरता. कित्येकांचा ॲवरेज स्क्रिनटाईम चार-पाच तास आहे. साडे पंधरा तास झाले. आठ तास झोप, साडे तेवीस तास... उरलेला आर्धा तास व्यायाम करा किंवा काय हवं ते करा. व्यायाम करायचाच म्हटलं तर खरंतर या शेड्युलप्रमाणे आर्धा तास कमीच पडतोय, बघा कुठून आर्धा तास काढता आला स्वतःसाठी तर.

याहून दिवस कसा घालवायचा हा प्रश्न पडतंच असेल तर, एकतर तुम्ही वर्कफ्राॅमहोम असून करायला हवं तेवढं वर्कफ्राॅमहोम करत नाहीये किंवा तुम्हाला मुद्दलातंच वर्किंग अवर्समध्ये काम कमी असतं किंवा नसतंच (कंपन्यांनी सध्या लोकांचे वाॅटसॅप फेसबूक फिड बघितले तर बऱ्याचजणांना मोठ्ठी सुटी मिळू शकते.) किंवा तुम्ही घरचं काडीमात्रंही काम करत नाही, तसं असल्यास ते बिलकुलंच भूषणावह नाही.

माझं विचाराल तर मला कणभर या आयसोलेशनचा त्रास होत नाहीये. उलट मला जो रोज किमान साडे तीन ते चार तास प्रवास करावा लागतोय तो कमी झालाय. कित्येक दिवसांपासून स्नूझ केलेले वाचनाचे आणि पिक्चर बघण्याचे प्लान थोडेथोडे तरी अंमलात आणता येताहेत. रात्री उशिरा झोपलेलं चालतंय. पोरांसोबत वेळ घालवतोय कोणाची खूपंच आठवण आलीच तर व्हिडीयो काॅल्स आहेत, काॅनकाॅल आहेत. शिवाय दिवसभर पुरेल असं स्वतःचं आणि आॅफिसचं काम आहे. वर्क अवर्स फ्लेक्झिबल झालेत, कामं भरपूर असली तरी जशी येतील तशी निपटवतोय, घरची स्वयंपाक सोडता बाकी सग्गळी कामं रोज करतोय. खरंतर जे जे करायचंय त्यासाठी वेळ आणि एनर्जी पुरत नाहीये

आपण नशिबाने, आईबापाच्या पुण्याईने आणि आपापल्या कर्तृत्वानेही सुखवस्तू कुटुंबातले लोक आहोत. तीन आठवडे तर ठिकंच पण सहा महिने लाॅकडाऊन झालं (ज्याची शक्यता नाही) तरी आपल्याला खाण्यापिण्याची ददात असणार नाहीये. महागाई भडकली तरी आपल्या सेविंग्जमधून आपण यातून निभावून जाऊ. हातावर पोट असणाऱ्यांचं काय, रस्त्यावर राहणाऱ्या भटक्यांचं भिकाऱ्यांचं काय, छोटे व्यवसायिक कसे तरतील यातून, त्यांच्याकडे कामाला असलेल्यांचा कसा पगार करतील, यातून बाहेर पडल्यावर कसे धंदे उभे करतील परत? जे गरीब लोक कामाधंद्यासाठी पुण्यामुंबईत, महानगरांत आलेत कामाला आणि आता परत जाता येत नाहीये शिवाय खायलाही काही नाही, बसेस ट्रेन बंद आहेत, अर्ध कुटुंब गावाकडे काळजी करतंय किंवा इथेही बायकापोरांची उपासमार होत्येय, ज्यांना सरकारकडून होणाऱ्या अनाऊंसमेंटस नीट कळत नाहीयेत आणि जे पॅनिक होऊन कुटुंबासाठी खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लायनीत गर्दीत उभे राहतायेत, एकेकटे राहणारे म्हातारे कोतारे कसं काय खायप्यायच्या गोष्टी अन औषधं मिळवतील, आपल्या लहान लहान पोरांनाही कसं आपण छान हात धुवायला शिकवलंय, त्यांचे व्हिडीयो बनवलेत, कित्येकजण हात धुताना नळ तसाच चालू ठेवतात, पाणी वाहत राहतं, उन्हाळ्याच्या तडाख्यात ज्यांच्या लेकरांना धड प्यायला पाणी मिळायची शाश्वती नाही ते कसे वारंवार हात स्वच्छ धुतील, ज्यांच्या घरी अत्यावस्थ रुग्ण आहेत, ज्या रुग्णांना नियमित दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय नाही ते काय करतील, पोलिस, डाॅक्टर्स, नर्सेस, वाॅर्डबाॅईज, आया, बॅंक कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारे सगळेचजण पुरेशा पर्सनल प्रोटेक्टीव्ह ईक्विपमेंटस शिवाय कशी कामं करतील? डोकं विचार करुन भण्णं होतंय.

माझी बहीण इंग्लंडमध्ये राहते तिकडे लागण झालेल्यांचा आकडा दणादण वाढतोय, ती राहते त्या एरीयात परवा २६ पाॅझिटीव्ह रुग्ण सापडलेत. दुसरी बहीण पुण्यातंच असते पण बॅंकेत काम करते, बॅंका अत्यावश्यक सेवांमध्ये येतात. ती रोज कामाला जात्येय. काळजी घ्या एवढं सांगण्याव्यतिरिक्त दोघींसाठी काहीही करु शकत नाही. नोकरी सोड असं सांगणं सोपं असतं पण व्यवहारीक नाही.

उत्तर नसलेले प्रश्न डोक्यात पिंगा घालत राहतात. काळ कठीण असला तरी माझ्यासारख्या वर्कफ्राॅमहोम करु शकणाऱ्या पैसे राखून असणाऱ्या नोकरदार लोकांसाठी बाकीच्यांपेक्षा निश्चितंच उपाय खूपखूप सोपा आहे. घरी बसणे हा उपाय बाकीच्या वंचित अन अपरीहार्यतेपोटी बाहेर पडावं लागणाऱ्या लोकांच्या तुलनेत माझ्यासाठी तरी एखादी दैवी देणगी आणि स्वतःला रीबूट करायच्या संधी सारखाच आहे.

बोअर होणाऱ्यांनी पूर्ण डोळे उघडून अन थोऽऽऽडे काळजाचे दरवाजे किलकिले करुन विचार केला तर सद्दपरिस्थितीबद्दल परत कधी तक्रारीचा सूर लावणार नाहीत... कधीच.

मित्रांनो जान है तो जहान है असं आपण म्हणू शकतो कारण यातून जीव वाचल्यावर आपल्याला जगण्याची अन कुटुंबाला जगवण्याची भ्रांत असणार नाहीये.

दीर्घ असाध्य आजारपण

 


दीर्घ अन असाध्य आजारपण साधं नसतं. भयंकर विलपाॅवर लागते आणि शिवाय ती कायमंच टिकवून ठेवावी लागते. कमीजास्त होतेच कितीही प्रयत्न केला तरी पण विलपाॅवर संपलीच तर आजारापेक्षा जास्त आपणंच आपल्याला मारु लागतो.

२०१० साली सगळं व्यवस्थित चालू असताना माझ्या चालत्या फिरत्या वडीलांच्या एका रात्री अचानक पोटात दुखु लागलं. आईला वाटलं रात्री झोपताना मिल्कशेक प्यायल्यामुळे दुखत असेल. सकाळी उठल्यावरंही दुखणं कमी होईना म्हटल्यावर मी भाऊंना घेऊन आमच्या फॅमिली डाॅक्टरांकडे गेलो. त्यांनी तपासून सांगितलं की पोट जरा कडक लागतंय तू ताबडतोब भाऊंना सोनोग्राफी करायला घेऊन जा, मी चिठ्ठी लिहून देतो. डाॅक्टरांकडून बाहेर पडल्यावर पोट दुखायचं जवळपास थांबलंच म्हणून भाऊ घरी जायचा हट्ट करु लागले, मी दामटूनंच घेऊन गेलो सोनोग्राफीसाठी. त्यात मीही तापाने फणफणलो होतो. सोनोग्राफी केल्यावर पित्ताशयात खडे झाल्याचं कळलं. दुसऱ्या दिवशी सर्जरी प्लान झाली. प्रीसर्जरी सगळ्या टेस्टस केल्या गेल्या फिटनेस चेक करण्यासाठी. रात्री टेस्टसचे रीपोर्ट पाहून डाॅक्टर पूर्णपणे चक्रावले, भाऊ स्वतःच्या पायावर चालत हाॅस्पिटलमध्ये आलेत यावर त्यांचा विश्वास बसेना. सर्जनने तात्काळ सांगून टाकलं, सर्जरी उद्या करता येणार नाही आणि बाकी गोष्टी तुम्हाला तुमचे डाॅक्टर एक्सप्लेन करतील. रात्री उशिरा डाॅक्टरांनी येऊन सांगितलं, क्रिएटीनीन १०+ आणि ब्लड युरीया १००+ झालीये. क्रिएटीनीनची नाॅर्मल रेंज ०-१.५ आणि युरीयाची २०-४० असते. आता हे दोन्ही घटक लवकरात लवकर ॲक्सेप्टेबल रेंजमध्ये येणं पहीलं आव्हान होतं आणि मग सर्जरी. शिवाय सर्जरीनंतर पेनकिलर्स वगैरे देण्यावर आतोनात बंधनं येणार होती. एक दिवसापूर्वी पित्ताशयाची सर्जरी मोठी असली तरी किरकोळ असते हे सर्वांना माहीत होतं आणि ती झाल्यावर चार दिवसात हाॅस्पिटलमधून घरी जाणार असं वाटत होतं.आता अचानक ती सर्जरी बाजूलाच पडली होती आणि प्री व पोस्ट सर्जरी किडनी फंक्शन कसं पूर्ववत करता येईल हे भयानक अवघड आव्हान डाॅक्टरांसमोर होतं. भाऊंच्या किडनीज जन्मतःच पाॅलिसिस्ट असल्यामुळे म्हणजेच हा आजार क्राॅनिक असल्यामुळे किडनीचं कार्य पूर्ववत होण्याची शक्यता धुसर होती.

चारेक दिवस डायलिसिस करुन क्रिएटीनीन आणि युरीयाची लेवल खाली आणून सर्जरी केली गेली. सर्जरी नंतर पेनकिलर्स देण्यावर बंधनं असल्याने पुढचे दोन दिवस आतोनात यातना सोसल्या त्यांनी. तेव्हा माहीत नव्हतं की ही एका न संपणाऱ्या आजाराची सुरुवात आहे.

जी भीती होती तेच झालं भाऊंचं किडनी फेल्यूअर झालं. आता जगण्यासाठी शेवटपर्यंत डायलिसीस करणे हा एकंच मार्ग होता किंवा फारतर ट्रान्सप्लांट.डायलिसीस चालू झाल्यावर पहिले काही महिने भाऊंसकट आमच्या सगळ्यांचाच त्याला रेझिस्टंस होता कारण एकदा डायलिसीस चालू झालं की ते परत थांबवता येत नाही असं कळलं होतं. हळूहळू भाऊंची आणि आमची मानसिक तयारी होत गेली. तरी आम्ही वेगवेगळे डाॅक्टर्स, वैद्य शोधत रहायचो बुद्धीला पटत नसलं तरी काहीतरी चमत्कार होईल अशी आशा मनात ठेऊन. सुवातीला पंधरा दिवसाला एक डायलिसीस करता करता झपाट्याने फ्रिक्वेंसी वाढत गेली. शेवटचे दोन वर्ष आठवड्यात तीनदा म्हणजे दिवसाआड डायलिसीस असायचं. चार तास हातात दोन सुया खुपसून झोपून रहायचं. ब्लडप्रेशर फ्लक्चुएशंस, इलेक्ट्रोलाईट इंबॅलंस होत रहायचं डायलिसीस चालू असताना. डायलिसीस झाल्यावर वेल्क्रोच्या दोन पट्ट्या हाताला करकचून बांधल्या जायच्या. त्या पुढच्या किमान सहा ते आठ तास सोडता येत नव्हत्या. हात कोपरात वाकवता यायचा नाही. तळहाताला मुंग्या यायच्या, हात जड व्हायचा, दुखायचा. चुकून वेल्क्रो ढिले केले तर भळाभळा रक्तं वाहायला लागायचं, धावतपळत पुन्हा दवाखाना गाठावा लागायचा. कधी नीडल आऊट जायच्या, हात सुजायचा, काळानीळा पडायचा. शेवटी शेवटी ब्लड प्रेशरचे फ्लक्चुएशंस नेहमीच होऊ लागले, प्रत्येक डायलिसीसला. सततच्या डायलिसीसमुळे हृदय कमजोर झालं होतं. पोस्ट डायलिसीस बीपी ६०/९० वगैरे व्हायचं. घरी आल्यावर पायाखाली उंच उश्या घेऊन पडून रहावं लागायचं. दर तासादोन तासांनी बीपी चेक करत रहायचे.सगळ्यात वाईट म्हणजे पाणी लिक्वीड पिण्यावर बंधनं होती. शरीरातल्या पाण्याचं प्रमाण काही केल्या वाढू दिलेलं चालायचं नाही. वाढलंच तर धाप लागायची, जास्तंच वाढलं तर फुफ्फुसं हृदयावर प्रेशर वाढायचं, श्वासंही घेता यायचा नाही. हृदयाची क्षमता खूपंच कमी झाल्यामुळे पाठ फ्लॅट बेडला टेकवून झोपतां यायचं नाही. कित्येकदा शरीरात प्रमाणापेक्षा पाणी वाढलं तर रात्रीअपरात्री हाॅल्पिटल गाठावं लागायचं. लागोपाठच्या दिवशी तीनतीन चारचार डायलिसीस करावे लागायचे. डायलिसीसमुळे बाकी व्हायटल अवयव हळूहळू कमजोर होत जातात, इन्फेक्शंस फार पटकन कॅच होतात. दोन डायलिसीसमध्ये जर एखादा दिवस अंतर वाढलं तरी नाॅशिया वाढतो, मळमळ व्हायला लागते, भूक लागते पण जेवायची ईच्छा होत नाही, ताटावर बसलं तरी जेवण जात नाही, पाणी जास्तं पिता येत नाही शरीरात कायमंच पाण्याचं अतिरिक्त प्रमाण असल्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास होतो. भाऊंचे तर किडनीसोबत लिव्हरही पाॅलिसिस्ट होतं, त्यात त्यांना डिसेंबर २०११ मध्ये हिपेटायटीस सी झाली होती, हळूहळू लिव्हर निकामी होत गेलं. पॅनक्रीयाज एनलार्ज झाल्यामुळे प्लेटलेटस एक लाखाच्या आतंच असायच्या. डायलिसीससाठी रक्त पातळ करायचं औषध द्यावं लागायचं, अशात कधी एखादी जखम झाली तर रक्त पातळ आणि पुरेशा प्लेटलेटस नसल्यामुळे रक्तप्रवाह थांबायचा नाही.

हे सगळं सहन करत साडेसात वर्ष भाऊंनी हसतखेळत डायलिसीस करुन घेतलं. विशेष म्हणजे सुरुवातीची काही दिवस सोडले तर डायलिसीस करायला ते स्वतः टूव्हीलर चालवत जायचे अन झाल्यावर स्वतःचं गाडी चालवत यायचे. कधी मी पिक करायला गेलोच तर डाॅक्टर मला म्हणायचे तुझे बाबा मेंटली जबरदस्त स्ट्राॅंग आहेत, त्यांना कमजोर करु नकोस, त्यांना इंडीपेंडंटली येऊजाऊ दे. असे पेशंटस रेअर असतात. भाऊ हसतखेळत जायचे यायचे. मोबाईलमध्ये जुनी गाणी निवडून निवडून प्लेलिस्ट केली होती, हेडफोन लावून गाणी ऐकायचे, डायलिसीस सेंटरमधल्या टीव्हीवर बातम्या क्रिकेटमॅच बघायचे. डाॅक्टर्स, टेक्निशियंस आणि सगळ्या स्टाफसोबत चेष्टामस्करी करायचे, स्टाफला लागेल ती मदत करायचे, डाॅक्टरांच्या फॅमिलीसोबत मस्तं घरोबा झाला होता त्यांचा. डायलिसीस एखादी फारंच क्षुल्लक गोष्ट असल्यासारखे राहीले ते. माझ्या बहीणीकडे इंग्लंडला जाऊन आले, तिकडेही हसतखेळत डायलिसीस करायचे.

डायलिसीसच्या श्येड्युलमुळे तुम्हाला दुसरं काहीच करता येत नाही. आठवड्यातले तीन दिवस प्रत्येकी किमान चार तास तुम्ही मशिनला बांधले जाता, प्रत्येक डायलिसीसनंतर माणूस अक्षरशः पिळून काढल्यासारखा ड्रेन आऊट होतो. वाढत्या बीपी फ्लक्चुएशंसमुळे आता जीव जाईल की काय क्षणात असं कित्येकदा वाटतं. तुमचे डायलिसीस मेटस आजारी पडत असतात, वीक होत जात असतात, पुढल्यावेळी डायलिसीस सेंटरला गेल्यावर कळतं की आपल्या शेजारच्या बेडवर नेहमी असणारा आपला मित्र, सहकारी आता परत कधीच दिसणार नाही. एक दिवस आणि कदाचित लवकरंच आपल्यासाठी राखून ठेवलेल्या बेडवर आपण नसू, दुसरं कोणीतरी असेल. आपण या आजारातून कधीच बरे होणार नाही, कारण आत्ता चालू असलेलं हे सगळं उपाय नाहीयेत तर फक्त आजचं मरण उद्यावर ढकलंत राहणार. खूप खूप डीप्रेसिंग असतं सगळं, मानसिक कणखरतेची भयंकर मोठी परीक्षा असते ती.

आज विचार केल्यावर वाटतं आज जर भाऊ असते तर या पॅनडेमिकच्या काळात कसं केलं असतं सगळं. डायलिसीसच्या पेशंटसना कुठलंही इन्फेक्शन पटकन होतं. इन्फेक्शन्स होऊ नये म्हणून आयसोलेशनमध्ये राहू शकत नाहीत कारण आठवड्यातून तीनदा डायलिसीस केल्याशिवाय जगणंच अशक्य असतं, मग तीन दिवस हाॅस्पिटलला जावंच लागतं. कसं जमलं असतं हे सगळं? ज्यांच्या घरात डायलिसीसचे पेशंट आहेत ते कसं करत असतील या काळात? बाकी दुर्धर आजार असणाऱ्या पेशंटसची काय अवस्था होत असेल सध्या? किती जीव मुठीत घेऊन उपचार करत असतील, कसं हाॅस्पिटलला येत जात असतील. प्रत्येकाच्या घरी थोडीच. स्वतःची चारचाकी गाडी असेल. डायलिसीस करताना होणाऱ्या काॅंप्लिकेशंसमुळे हाॅस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागणाऱ्या लोकांची शारिरीक आणि मानसिक अवस्था काय असेल सध्या? घरातले लोक किती प्रचंड भीतीच्या सावटाखाली किती राहत असतील, काय भयंकर मानसिक तणाव असेल. पेशंटस या काळात कसं मनोबल वाढवत असतील स्वतःचं, जगण्याची उमेद कशी टिकवून ठेवत असतील.

हे असे विचार मनात आले की खूप कसंतरी होतं. या सगळ्याचा विचारंही करवत नाही. असहाय्यता ही फार बेक्कार फिलिंग असते.

सगळ्या दुर्धर आजारांवर उपचार घेणाऱ्या लोकांचे आणि त्यांच्या घरच्यांचे मनोबल टिकून राहो. More power to you all!

Take Care!


स्मशानभूमी

 



कोणाचंही मरण हे वाईटंच पण तरीही कोणाच्यातरी मरणावर दुसऱ्या कोणाचं जगणं अवलंबून असतं असं म्हणालो तर विचित्र किंवा काहीतरी पोकळ आदर्शवादी वगैरे वाटेल ना. पण नाही, हे खरंच आहे कोणा न कोणाच्या मरणावर जगणं अवलंबून असणारे लोकंही असतात. मी अंत्यसंस्कार करणाऱ्या पुरोहीतांबद्दल बोलत नाहीये. स्मशानाची देखभाल करणारे अन तिथे अंत्यसंस्कारांसाठी सगळी तजवीज करणारे लोक असतात.

मी ज्या जातीत जन्माला आलोय त्यात माणसाचं मरणानंतर दहन केलं जात नाही, दफन केलं जातं. पण त्या विधीसाठी दफन हा शब्द वापरत नाहीत तर समाधी लावली असं म्हटलं जातं. कोणाचंही निधन झाल्यावर मृतदेहाचे पाय वळवून मांडी घालून दोन्ही हात मांडीच्या मधोमध ठेवून जणू समाधी लावल्याप्रमाणे बसवलं जाते आणि त्याच अवस्थेत गाडले जाते.

तर यासाठी वेगळी स्मशानभूमी राखून ठेवलेली असते.

त्या स्मशानभूमीच्या देखरेखीसाठी अन तिथल्या व्यवस्था किंवा अंत्यविधीसाठी लागणारी तजवीज करण्यासाठी पूर्वी तरी एखादं कुटुंब गंज पेठेतल्या स्माशानातंच एका कोपऱ्यात झोपडीवजा घरात राहीलेलं मी पाहीलंय. बिरादार आडनाव त्यांचं. त्यांच्याशिवाय नेमून दिलेले काही लोक जे कोणाच्या निधनाची वार्ता कळवल्यावर बोलावले जातात. एकावेळेस एक किंवा दोन फारतर, खड्डा खणण्यासाठी. या खड्ड्यांना गार म्हणतात. गार खणणाऱ्यांना शेपाचशे मिळत असावे खड्डे खणायचे. इतर ऋतुंमध्ये ठिक पण पावसाळ्यात यांचे भयंकर हाल होतात. पाणी जेवढं जमिनीत झिरपत जाईल तेवढं खणणं कठीण होत जातं, हातातून कुदळ निसटत राहते, माती घट्ट होऊन गोळे होतात, अंत्यनिधीनंतर काही नातेवाईक आप्तेष्ट माती ओढतात पण शेवटी खड्डा पूर्ण बुजवण्यासाठी या कामगारांनाच माती ओढावी लागते, पावसाळयात हे भयंकर कठीण काम असतं. या लोकांची घरं स्मशानातल्या कामावर म्हणजेच कोणा न कोणाच्या मरणावर चालतात.

नक्की आठवत नाही पण कदाचित माझे आजोबा वारले होते तेव्हा त्यांच्या तिसऱ्याच्या दिवशी आम्ही स्मशानात गेलो तेव्हा अजून कोणाचातरी तिसऱ्या दिवसाचा विधी होऊन गेला होता. दिवसाला मेलेल्या माणसाच्या आवडीचे पदार्थ समाधीवर ठेऊन नैवेद्य दाखवायची प्रथा आहे. सगळी पूजा आणि नैवेद्य झाल्यावर मग घरचे जवळचे नातेवाईक अन मित्रमंडळी समाधीपासून थोड्या अंतरावर जाऊन उभे राहतात. कावळ्याने तिथे ठेवलेला एखादातरी पदार्थ खाल्ला की समाधानाने माघारी फिरतात. कावळा शिवला म्हणे मृत माणसाची कोणती ईच्छा अतृप्त राहीली नाही म्हणतात. तर आम्ही स्मशानात गेलो तेव्हा कोणाच्यातरी तिसऱ्याचा विधी होऊन गेला होता. त्या समाधीवर साखरेचे कोरडे गुलाबजाम ठेवले होते. कावळ्याने चोच मारली तसे घरचे नातेवाईक वगैरे गेले. अन तिथली गर्दी हटल्या हटल्या बिरादारांचा नातू (नातूच असावा कदाचित) पळत पळत आला अन चट्टशिरी त्या पुड्यातला एक गुलाबजाम तोंडात टाकून पुडा उचलून घरात पळाला.

करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यावर दहनंच केलं जातं. ज्यांचे निधन दुसऱ्या कोणत्याही कारणाने होत असेल त्यांच्या अंत्यविधीला सध्या माणसं नाहीत. अंत्यविधी झालाच तर गाडण्याची परवानगी मिळत असेल का? गार खणून पैसे मिळवणाऱ्या कामगारांची कमाई कशी होत असेल. अंत्यविधीसाठी लोक जमलेच तर या कामगारांसाठी कसलं आलंय सोशल डिस्टन्सिंग? कसलं आयसोलेशन? दिवस केलाच तर दिवसाला विधी करुन हे असे पदार्थ समाधीवर ठेवले जात असतील का?

स्मशानाच्या देखभालीवर जगणाऱ्या लोकांचे काय हाल असतील या दिवसात? कसलं सॅनिटेशन त्यांच्या गावी तरी असेल का?

लाॅकडाऊनमध्ये यांना दोन वेळचं खायला कसं मिळत असेल? मिळत असेल का?

लोकांच्या मरणावर जगणाऱ्यांना लोक मरुनंही सध्या जगता येत असेल का?

कसब

 माणसं जोडणं हे कसब आहे, प्रत्येकाला जमेलंच असं नाही. भाऊंना माणसं जोडणं खूप आवडायचं आणि त्यांना ते जमायचंही. मग त्यांना यात वय, जात, धर्म, लिंग, आर्थिक परीस्थिती काही म्हणजे काही आड येयचं नाही. त्यांचे स्वतःचे मित्र, त्यांच्या वडिलांचे मित्र, माझे मित्र मैत्रिणी, माझ्या बहिणींच्या मित्र मैत्रिणी, एवढंच काय तर या सगळ्यांचे extended family members, शेजारीपाजारी, त्यांचे नातेवाईक, आमचे नातेवाईक, सहकारीवर्ग, डायलिसीस क्लिनिकमधले डाॅक्टर्स, नर्सेस, technicians, सोबतचे patients, अगदी ward boys, आया, नातवाची babyseater मावशी, घरकामाला येणा-या ताई-मावशी माणूस कोणीही असो एकदा संपर्कात आलं की तो संपर्क टिकवायचेच भाऊ. ओळख मैत्री याहीपलिकडे एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होयचं लोकांचं त्यांच्याशी. ताईमाईच्या कित्येक मैत्रिणी भाऊंना अगदी सख्खा बाप आणि जिवलग मित्र मानायच्या... मनापासून. माझे मित्र भाऊंशी सतत संपर्कात असायचे, ते भाऊ माझे वडिल आहेत म्हणून नाही तर त्यांचं त्यांचं हे एक वेगळंच नातं होतं.

आपल्याकडे नोकरी करताना कामासाठी परदेशवारी करणं अजूनंही प्रगतीचं प्रमाण मानलं जातं, किंवा चांगलं काम करणाऱ्यालाच कंपनीही कामासाठी परदेशवारी करायला पाठवते. माझा मित्र अमोलने चारपाच वर्ष आतोनात स्ट्रगल केल्यावर त्याला चांगली नोकरी मिळाली होती, त्यातून त्याला जेव्हा पहिल्यांदा जपानला जायची संधी मिळाली तेव्हा त्याने ऑफिसमधून तडक आमचं घर गाठून सगळ्यात पहिल्यांदा ही आनंदाची बातमी भाऊंना सांगितली होती, त्यानंतर बाकी सर्वांना. भाऊंवर उपचार करणारे डाॅक्टर आंबेकर भाऊंबद्दल भरभरुन बोलायचे, म्हणायचे लाखातंही एखादा असा patient मिळत नाही. दवाखान्यात कायम हसतमुख जाणारे भाऊ तिथेही कायम मजामस्करी करायचे. अगदी काऊंटरवरच्या कॅशियर मुलीही त्यांच्यासोबत मस्करी करायच्या. बाकीचे patients आपली भीती, राग, प्रेम भाऊंकडे बोलायचे, कुटुंबाबद्दल, करीयरबद्दल मनमोकळ्या गप्पा मारायचे, one day का असेना भाऊंसोबत trips plan करायचे. Ward boys, Nurses, Technicians हे सगळे लोक आपापल्या अडचणी भाऊंसोबत शेअर करायचे, भाऊ जमेल ती आणि जमेल तशी मदत करायचे या सगळ्यांना. कोणाला पैसे दे, कुणाशी मनमोकळं बोलून ताण हलका कर, कुणाचं लग्न ठरवायला मदत कर. या सगळ्यांच्या घरचेही भाऊंना चांगले माहीत होते. इंग्लंडला गेल्यावर तिकडून परत येताना हॉस्पिटलच्या पूर्ण स्टाफसाठी लक्षात ठेऊन त्यांनी काही ना काही गिफ्टस आणले होते. त्यांच्या सोबतच्या patientsना नैराश्य येऊ नये म्हणून भाऊ त्यांच्याशी बोलायचे, धीर द्यायचे, मजा मस्करी करायचे, मनातली भीती घालवून motivate करायचे. डाॅक्टरही भाऊंचं डायलिसिस झालं की बऱ्याचदा त्यांना बसवून घेयचे आणि आग्रह करायचे,”बसा ओ रुद्राके सर, कोल्ड काॅफी घेऊन जा”. नातेवाईक मित्रमंडळी सगळे घरी भाऊ आहेत म्हणून चक्कर टाकायचे. तरीही खर सांगायचं तर भाऊ कोणाशीही अकारण गोडगोड बोलत नव्हते, मधाचं बोट लावत नव्हते. ओठात एक पोटात एक असं त्यांना कधी जमलं नाही, मनात येईल ते स्पष्ट नि फटकन बोलून मोकळे होयचे. कोणाला राग येईल का, वाईट वाटेल का असला विचार करत नव्हते ते बोलण्याआधी. समोरच्यावर जसं मनापासून प्रेम करायचे तसेच हक्कानं बोलायचे. कधी कधी तर आम्हालाच टेंशन येयचं की कोणीतरी फटकून उलट उत्तर देईल कोणालातरी आवडणार नाही पण या सगळ्यांचं भाऊंवरंही तितकंच प्रेम होतं, कोणी कधीही मनात राग वगैरे ठेवला नाही. भाऊंचा आपला स्वतःचा असा Aura होता. ते आजारी असले की त्यांना बरं वाटावं म्हणून मनापासून नवस बोलणारी मित्रमंडळी होती. १९९८ साली जीवावरचं दुखणं झालं तेव्हा ते जकात खात्यात काम करत होते. जकात नाक्यावर येणारे जाणारे ड्रायव्हरसुद्धा भेटायला घरी येयचे, एका ट्रान्स्पोर्टरने दवाखान्यात येऊन त्यांच्या केसाची बट कापून नेली होती म्हणाले होते मी बालाजीला चाल्लोय तुमचे केस वाहून येतो, नक्कीच बरं वाटेल साहेबांना माझा पक्का विश्वास ए. आमचा भाडेकरु दुकानदार भेटायला येतानाच १० हजार घेऊन आला होता. जबरदस्तीने पैसे घरी ठेऊन जाताना म्हणाला होता, “पैसे emergency लागू शकतात, नाही लागले तर परत द्या नाहीतर वापरा”. बाकी त्यांचे मित्र आमचे मित्रमैत्रिणी सगळे होतेच आणि त्यानंतरच्या सगळ्याच आजारपणात सगळे त्यांच्यासोबत उभे होते. नोव्हेंबरमध्ये अचानक तब्येत गंभीर झाल्यावर शेवटचे दोन दिवस दवाखान्यात तळ ठोकणारी मित्रमंडळी शेवटच्या क्षणापर्यंत भाऊ बरेच व्हावे म्हणून प्रार्थना करत होती. तशीच गरज पडली तर मला व्हेंटीलेटरवर कधीही ठेऊ नका सांगणाऱ्या भाऊंना शेवटी व्हेंटीलेटरवर ठेवल्यावर माझ्याशी वर्षानुवर्ष न बोलणारा माझा मित्र मला बजावून सांगत होता काहीही होऊ दे, कुणाल आपण व्हेंटीलेटर नाही काढायचा, कितीही दिवस लागू दे... आपल्याला भाऊ हवेत. काहीही झालं तरी भाऊ बरे होऊन परत आपल्यात यावे ही वेडी आशा होती त्या सगळ्यांना. भाऊंशी सगळ्यांचं शब्दांपलिकडलं नातं होतं, माणसं जोडणं टिकवणं हे भाऊंना लीलया जमलेलं होतं, त्यांनी ती सगळी नाती शेवटच्या श्वासापर्यंत टिकवली.
डॉक्टर आंबेकरंच काय तर डॉक्टरांच्या पत्नी, आंबेकर म्याडमचाही जबरदस्त कनेक्ट होता भाऊंसोबत. आता काहीच होऊ शकत नाही, रुद्राके सर वाचणं almost impossible ए हे डॉक्टरांनी सांगितल्यावर, म्याडम एकापाठोपाठ एक पर्याय सांगत होत्या, म्हणाल्या रुद्राके sir is a fighter, आपणंही quit नाही करायचं ते येणार यातूनंही बाहेर.
भाऊ गेल्यावर थोड्या दिवसांनी डॉक्टर भेटले तेव्हा कडकडून मिठी मारुन म्हणाले मला, “सॉरी कुणाल, मी नाही काही करु शकलो, आमचं आख्खं हॉस्पिटल including all the staff & patients शॉकमध्ये आहे. रुद्राके सर मला father figure होते. आपली अडचण ऐकून घेऊन त्यावर सारासार विचार करुन स्वतःचं मत देण्यापेक्षा खरंच काय चांगलं काय वाईट हे समजवून सांगणारं वडिलधारं माणूस सोबत असणं फार महत्वाचं असतं. तू नशिबवान आहेस असा माणूस तुला बाप म्हणून लाभला. रुद्राके सर was a fighter, he didnt quit till the very end, we are lucky he was a part of our lives”
परवाच आमच्या शेजारच्या काकांच्या वर्कशाॅपमध्ये काम करणारा बिहारी कामगार “गगन” आला होता. त्याचा भाऊंशी जाम कनेक्ट होता, जेव्हा जेव्हा ईथे येयचा तेव्हा तेव्हा भाऊंकडे येऊन भरभरुन गप्पा मारायचा, येताना दारातूनंच मोठ्यानं आवाज देयचा भाऊऽऽऽ म्हणून. परवाही दारातून त्याने तशीच हाक मारली... भाऊऽऽऽ भाऊ गेल्याचं सांगितल्यावर त्याच्या डोळ्यात टच्चकन पाणी आलं... पद्मा आपण माणसंच तर कमवली आयुष्यभर असं नेहमी म्हणायचे भाऊ.
मी काॅलेजमध्ये असताना मजेमजेत एकेकाला अवाॅर्ड दिले होते एक वर्ष. त्यात मला मॅग्नेट ऑफ द ईयर अवॉर्ड दिलं होतं, पण आमच्या घरातलं खरं मॅग्नेट भाऊ होते... त्यांच्या तुलनेत मी १०%सुद्धा नाही जमवू शकत हे सगळं.
म्हटलं ना माणसं कमवायचं, जोडायचं आणि नाती टिकवायचं कसबंच असावं लागतं.. प्रत्येकालाच नाही जमत... भाऊंना जमत होतं, शेवटच्या श्वासापर्यंत
भाऊ


अन्याय

 

मागे एकदा ऑफिसमध्ये माझ्याबद्दल फिडबॅक देताना एक मित्र म्हणाला होता, “If someone is getting bullied by a group & being alienated Kunya ensures that the weaker one isn’t standing alone, ग्रुपमध्ये कोणीही एकटा किंवा कमजोर पडत असल्यास कुण्या त्याला एकटा पडू देत नाही”

This I think is one of the best compliments I’ve ever received till date.

मला वाटतं आपापल्या घरात आपल्या सगळ्यांचं असंच असतं. घरात एकापेक्षा जास्तं मुलं असतील तर त्यातल्या त्यात कमजोर मुलाकडे आईचा ओढा जास्त असतो. तिला त्याची जास्त काळजी वाटत असते. याचा अर्थ असा नाही की तिचं बाकीच्या मुलांवर प्रेम कमी असतं. ती बाकीच्यांबद्दल जास्त निर्धास्त असते, कमी वेळ अन एफर्टस टाकूनंही बाकीच्यांचं धडभलं होईलंच याची खात्री असल्याने ती त्या अमुक एका तुलनेनं कमजोर मुलावर जास्तं लक्ष केंद्रीत करते. त्याला अडचण येऊ नये, आली तर लवकर सुटावी आणि एकूणात आपल्या मदतीने तरी त्याचं सगळं सुरळीत चालावं हा त्यामागचा उद्देश असावा. सहाजिकंच ईतरांच्या तुलनेत त्या दोघांबधला बाॅंड हा जरा जास्तं चांगला डेव्हलप होतो, नर्चर होतो. त्या एकाचे जऽरा जास्तं लाड होतात. हे जसं आईचे लेकरांबद्दल होते तसंच मुलांचेही आईबापाबद्दल होतं... ठरवून केलं जातं नाही, आपोआप होतं.

१९९५ साली आमच्या भाऊंचं पहिल्यांदा बीपी शूट झालं ते ईतकं की घाम आल्याने अंगातला टी-शर्ट अक्षरशः पिळून काढावा लागला होता. सिस्टोलिक २१० आणि डायस्टोलिक बीपी १४० असं काहीसं रीडिंग होतं. असं अचानक बीपी शूट होण्याच्या कारणाची शोधाशोध सुरु झाली. वेगवेगळ्या टेस्टस केल्या. सोनोग्राफीमधून हे कळलं की भाऊंच्या किडनीज पाॅलिसिस्टीक (सोप्या भाषेत सांगायचं तर किडनीला आतून पाण्याने भरलेले असंख्य सिस्टस असणे) आहेत. शिवाय त्यांचा साईज ॲबनाॅर्मली मोठा झाला आहे त्यामुळे बीपी वाढलं आहे अन यासाठी आयुष्यभर औषधं घेण्याशिवाय पर्याय नाही. त्याच वर्षी चारेक महिन्यापूर्वी माझे आजोबा वारले होते. त्यांच्याही किडनीज पाॅलिसिस्टीक होत्या. हे कळल्यापासून आईची चिंता खूप वाढली होती. तिला मी समजावून सांगायचो, सगळ्याचा ईलाज होतो आता, ईलाज नाही असा एकंही आजार नाही. तेव्हापासून मात्र भाऊंवर सीकेडीचा (क्राॅनिक किडनी डिसीज) शिक्का बसला. एकदोन महिन्यात टेस्टस वगैरे करुन रोजच्या गोळ्या चालू करुन अन काटेकोर पथ्य पाळायची असं डाॅक्टरने सांगून सगळं सुरळीत झालं ते पुढची तीन वर्ष सुरळीत चाललं.

१९९८ साली भाऊ मित्रांसोबत वैष्णोदेवीच्या ट्रीपला जाऊन आले अन दुसऱ्या दिवशी आजारी पडले. सुरुवातीला आम्हाला वाटलं प्रवास, दगदग यामुळे झालं असेल. ते असे तापाने फणफणले की ताप कमीच होईना. पाचेक दिवसांनी जरा कमी झालेला ताप एकदोन दिवसात पुन्हा आला. दहाबारा दिवसांत ताप कमी होत नाही म्हटल्यावर आता भाऊंना हाॅस्पिटलाईज करुया असे सगळे म्हणू लागले. त्याकाळी हाॅस्पिटलाईजेशनची एक भीती होती मनात. ते टाळता येईल का हे चेक करण्यासाठी मी आमच्या एका फॅमिलफ्रेंड जोशी डाॅक्टरांना भेटलो. भाऊंच्या किडनीज पाॅलिसिस्ट आहेत हे ऐकताच डाॅक्टरांनी मला दारातूनंच पिटाळलं आणि म्हणाले आल्यापावली जा आणि त्यांना पहिल्यांदा हाॅस्पिटलाईज कर. डाॅक्टरांची रीॲक्शन बघूनंच मला गोष्ट सिरीयस असल्याची हिंट मिळाली होती. परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे म्हणता म्हणता पार हाताबाहेर गेली. किडनीजला इन्फेक्शन झालं होतं आणि भाऊंची परिस्थिती क्रिटीकल झाली होती. एक वेळ अशी आली की डाॅक्टरांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं जेवढे प्रयत्न करु शकत होतो ते आम्ही केले. आता हाॅस्पिटलमध्ये राहण्यात अर्थ नाही. औषधं आणि इंजेक्शन्स प्रिस्क्राईब करुन देतो. तुमच्या फॅमिली डाॅक्टरला बोलवून रोज इंजेक्शन्स द्या, औषधं चालू ठेवा. आता याउपर तुमचं नशीब. भाऊ मात्र विश्वासाने म्हणायचे आईला मी मरत नाही तू काळजी करु नकोस. भाऊंची विलपाॅवर स्ट्राँग होती, डाॅक्टरांनी हात टेकले पण भाऊ मात्र तब्बल ३ महीन्यांनी या जीवघेण्या आजारातून बरे झाले.

तेव्हापासून मात्र भाऊंच्या तब्येतीबद्दल मनात खूप भीती बसली. भाऊ बिनधास्त होते पण आमचं पूर्ण कुटुंबं भाऊंना तापंही येऊ नये म्हणून जीवापाड जपू लागलं. कधी आलाच तर दोनेक दिवसांत त्यांचा ताप जाईपर्यंत भीतीने आमचा जीव कंठाशी यायचा. भीती वाढून फोबियामध्ये कन्व्हर्ट झाला होता. आई आणि भाऊंमध्ये भाऊ तब्येतीने कमजोर आहेत हे डोक्यात बसल्याने सहाजिकंच भाऊंची काळजी जास्त वाटू लागली, त्यांच्याकडचा ओढा खूप वाढला. भाऊंची तब्येत, औषधगोळ्या सगळ्याची आम्ही एक्स्ट्रा काळजी घेऊ लागलो. प्रत्येकाचाच भाऊंसोबतचा बाॅंड स्ट्राँग होत गेला. किडनी फेल्यूअर डिटेक्ट होण्याआधीपर्यंत पुढची बारा वर्ष भाऊ नाॅर्मल आयुष्य जगले

१९९८ पासून आमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू झालेल्या भाऊंची २०१० पासून तर आतोनात काळजी वाटू लागली. भाऊंनी स्वतःच्या आजाराचा कधीच बाऊ केला नाही आमच्या सगळ्यांसाठी मात्र भाऊंची तब्येत नीट राहणं यापेक्षा मोठं कोणतंच ध्येय राहीलं नव्हतं. पण या सगळ्यात आम्ही कळत नकळत सगळ्यात जास्त आईला गृहीत धरत गेलो. आमचं लक्ष १००% फक्त भाऊंवर केंद्रीत झालं होतं. याकाळात आईच्या बाकीही काही ईच्छा असतील, तिलाही कधी रुटीनचा कंटाळा येत असेल हे जाणवायला बराच वेळ लागला आम्हाला. भाऊंना सर्दीपडसं झालं तरी आम्ही आतून घाबरायचो. त्यांच्या अपाॅइंटमेंटस, टेस्टस, रीपोर्टस या सगळ्याला आतोनात महत्व देण्याची गरजंच होती. भाऊंच्या एखाद्या रीपोर्टमध्ये काही वाईट असणं म्हणजे डायरेक्ट जीव जाण्यावर यायची गोष्ट, आम्ही हादरुन जायचो पार पण तेच आईचं कधी छोटंमोठं आजारपण असेल किंवा एखादी टेस्ट किंवा थोडीफार शुगर वाढलेले रीपोर्टस येणं असो आम्ही त्यात काय एवढं अशा अविर्भावात असायचो. अर्थात ते गंभीर कधीच नव्हतं पण कळत-नकळत तुलना झाल्यामुळे त्याबद्दल आमचा थोडा का असेना कॅज्युअलंच अप्रोच असायचा. भाऊंची औषध-गोळ्या आहेत का, कधी संपतायेत हे लक्ष देऊन बघणं, संपण्याआधी आणणं. वेळेवर घेतायेत की नाही चेक करणं हे नियमित करायचो मी. पण भाऊ असेपर्यंत तेवढ्याच गांभीर्याने आईच्या औषधपाण्याकडे लक्ष द्यायला जमलं नाही, द्यायला हवं होतं खरंतर. कदाचित भाऊंची केस डायरेक्ट लाईफ ऑर डेथ या दोन शक्यतांमधल्या एक्स्ट्रीमवरंच जायची म्हणून आणि आईची शुगर बीपी विशेष गंभीर नसल्याने असेल पण फरक राहीलाच.

अजाणतेपणी का असेना रीस्पाॅंसमध्ये उन्नीसबीस झालंच आमच्याकडून. तब्येतीने कमजोर असलेल्या माणसासोबत उभं राहताना तुलनेनं स्ट्राँग व्यक्तीकडे अनावधानानं का असेना दुर्लक्ष झालंच. एकप्रकारे अन्यायंच झाला ना खरंतर.

भाऊ गेले तेव्हा मी आईला म्हणायचो आता माझी आईही तूच आणि भाऊही तूच. पण नाही... प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. भाऊ वेगळे अन आई वेगळी. आईला फक्त आई म्हणून तिचं वेगळेपण मान्य करत जपायला हवं आम्ही. तिचीही आयडेंटीटी आहे, तिला स्वतःची वेगळी ओळख नको असली तरी आम्ही ती जाणीवपूर्वक जपायला हवीये. जेवढं खंबीरपणे, प्रेमाने अन उत्कटतेने भाऊंसोबत राहीलो तसंच आईसोबत रहायला हवं मी आणि आम्ही सगळ्यांनीच.

म्हणून आता जाणवत की ensuring you stand by the weaker ones is important but in exceptional cases you got to make sure that the rest do not feel left out too!

 


तेरे दर पर सनम चले आए


 

फिर तेरी कहानी याद आयी १९९३ साली झी टीव्हीवर रीलीज झाला होता. पिक्चर आला तेव्हा मी १२ वर्षाचा होतो. तेव्हा काहीच न कळलेला पिक्चर अजून दोनेक वर्षांनी टेपरेकाॅर्डरवर बहीणींनी लावलेली गाणी ऐकून ऐकून पाठ झाल्यावर परत पाहीला होता. जेमतेम दिड तासाच्या या पिक्चरमध्ये मानसिक संतुलन बिघडलेली प्रेयसी दाखवली नसती तर तो विशेष वेगळा वाटला नसता. दारुच्या आहारी गेलेल्या प्रतिथयश दिग्दर्शकाला (राहुल) पुनर्वसन केंद्रात भेटलेली मुलगी (पूजा), त्याला पुढे जाऊन कळतं की ती मानसिक रुग्ण आहे पण तोवर ते एकमेकांच्या आकंठ प्रेमात पडलेले असतात. दिवसेंदिवस पूजाची विकृती वाढत जाते, त्या वेडात तिचा राहुलवरचा विश्वासंही ढळायला सुरुवात होते, राहुल आणि तिच्या आजूबाजूचे सगळेच तिला मारायचा कट रचतायेत असं तिला वाटू लागतं. तिच्या हा प्रवासात ठामपणे उभ्या असणाऱ्या राहुललाही तिची ही दीनवाणी अवस्था बघवेनाशी होते अन पूजाची रवानगी वेड्यांच्या ईस्पितळात होते. पूजाच्या आत्महत्येने या कहाणीचा करुण अंत होतो. या सगळ्या प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर येणारी गाणी या पिक्चरची युएसपी होती.

पिक्चरच्या ओपनिंग सीनला येणारं दिल देता है रो रो दुहाई असो की पूजा आश्रमात भेटल्यावरचं बादलों मे छुप रहा है चाॅंद क्यू असो. एकापेक्षा एक अप्रतिम गाण्यांनी भरलेला पिक्चर, एकाच सिनेमातली सगळीच गाणी अप्रतिम असणं हे तेव्हा तसं रेअर नव्हतं. नव्वदच्या दशकात असे अनेक परिपूर्ण अल्बम्स आले. फिर तेरी कहानी याद आयी हा त्यातलाच एक पण माझ्यासाठी एकदम वरचा नंबर असलेला पिक्चर.

तेरे दर पर सनम चले आए (फिमेल वर्जन) गाणं चालू होण्याआधी राहुलवर रुसुन त्याच्या घराबाहेर बसलेली चाॅकलेटी ड्रेसमधलली पूजा भट तेव्हा लै लै आवडली होती. उत्तरार्धात मेंटल हाॅस्पिटलमधून आलेली केस बारीक कापलेला पूजाही जाम म्हणजे जामंच आवडली होती तेव्हा. शायरानासी है जिंदगी की फजामध्ये नीना गुप्ता जे काय अप्रतिम दिसलीये त्याला तोड नाही.

उत्तरार्धात येणारी आनेवाला कल आणि तेरे दर पर सनम (मेल वर्जन) खुळ लावणारी गाणी आहेत अक्षरशः

दिल मे सनम की सुरत गाणं पिक्चरमध्ये पूर्ण येत नाही याचं वाईट वाटतं. (एकमेकांवर प्रेम करण्यासाठी) मेरे खुदा मुझे तू इक और जिंदगी दे हे पिक्चरमध्ये बघायला मिळत नाही

आजकाल पूर्ण अल्बम चांगला असण्याचे दिवस राहीले नाहीत आणि गाण्यासाठी पिक्चर हीट होण्याचेही नाहीत.

आज फिर तेरी कहानी याद आयी कोणी पाहीला तर कदाचित बिलकुल आवडणार नाही पण फाॅर द लव्ह ऑफ नाईन्टीज हा एक खूप आवडता पिक्चर आहे माझा. कैफी आज़मींचे शब्द कुमार सानू, अलका याज्ञिक, साधना सरगमचा आवाज आणि अन्नू मलिकचं संगीत.... लाजवाब!

यातली सगळीच गाणी लेट नाईट प्लेलिस्टमध्ये पर्मनंटली ॲड केलेली आहेत तरीही तेरे दर पर सनम चले आए हे विशेष आवडतं, हे गाणं मी एकटा गाडी चालवत असताना लूपवर कितीहीवेळा ऐकू शकतो

गुजरा हुवा कल बस अपना है, हम गुजरे कल मे रहते है

#LateNightPlaylist

 



एमबीए झाल्यानंतर पहिला सेल्सचा जाॅब मिळाला तिथे प्राॅडक्ट ट्रेनिंग वगैरे झाल्यावर आम्हाला आमचं पहीलं सेल्सपिच तयार करायला सांगितलं गेलं. एक माॅक सेल्सकाॅल अटेंड करायचा होता त्यात आमचा मॅनेजर कस्टमरच्या भूमिकेत आणि आम्ही नव्याने जाॅईन झालेले कार्यकर्ते आमच्याच म्हणजे सेल्स इंजिनियरच्या भूमिकेत होतो. आमच्या आणि काॅंपिटीटर प्राॅडक्टचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स कंपेअर करणं, कस्टमरची गरज नेमकी काय आहे हे बघणं, त्यातून कोणत्या स्पेक्सवर जास्तं भर द्यायचा आणि नेमके कोणकोणते फिचर्स युएसपी म्हणून सादर करायचे हे शिकायला मिळणार होतं. आम्ही तयारी करुन बोलायला सुरुवात केली, काहीही करुन... बाय हूक ऑर क्रूक आपलं प्राॅडक्ट विकलंच गेलं पाहीजे अशा जोशात आम्ही होतो. एकतंर सेल्सवाल्या लोकांना पहिल्या दिवसापासूनंच ऐकायला मिळत असतं की सेल्सवाले मे फायर होनी चाहीये, ऑर्डर लाने की भूख, एक आग होनी चाहीये वगैरे वगैरे. मग नवोदित कार्यकर्ते पेटून उठतात. आम्हीही तसेच पेटलेल्या अवस्थेत तयारी करुन पहीलंवहीलं सेल्सपिच तयार केलं नि सादरंही केलं. त्यात आम्ही काय विकतोय ते लै भारीये यासोबतंच काॅंपिटीटर जे विकतोय ते कसं बकवास किंवा खराब क्वालिटीचं आहे या आशयाच्या माहितीचा भरणा होता.

त्यानंतर माझ्या बाॅसने मला जो फिडबॅक दिला होता तो मी कधीच विसरणार नाही. माझा बाॅस मला म्हणाला होता, “कुणाल एक गोष्ट लक्षात कायम ठेव, दुसऱ्याच्या प्राॅडक्टला डीमीन करुन किंवा ते कसं खराब आहे अशी जाहिरात करुन कधीच आपला सेल होत नाही किंबहुना करायचा नाही. एकावेळी दोन पिक्चर रीलीज झाले असतील तर एक्स पिक्चर खराब म्हणून वायला गर्दी होईल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. मी पेन विकतोय आणि काॅंपिटीटरंही पेन विकतोय तर माझा पेन कसा छान ही माहीती समोरच्याला दे, कधीही त्याचा पेन खराब आहे म्हणून माझा घ्या असं सांगू नकोस. दोनचार किंवा पाचदहा वेळेस सेल होईलंही पण ती सस्टेनेबल ग्रोथ नसेल. किती दिवस समोरच्याचं प्राॅडक्ट खराब म्हणून तुझं घेतील लोक? तुझं प्राॅडक्ट चांगलं म्हणून लोक घेऊ लागले तर मात्र तुझ्या सेलमध्ये कंसिस्टंसी आणि सस्टेनॅबिलीटी असेल”.

ही गोष्ट त्या दिवसापासून डोक्यात फिट्ट बसलेली आहे. दुसऱ्याची रेघ छोटी करुन आपली मोठी करायची नाही ही खूप महत्वाची गोष्ट करीयरच्या सुरुवातीलाच शिकलो. आणि ही गोष्ट आयुष्यात खूप ठिकाणी रीलेट होते. प्रत्येक माणूस, घटना, परिस्थिती आपल्याला चांगलंच काहीतरी शिकवून जाते यावर माझा ठाम विश्वास आहे. समोरची व्यक्ति/परिस्थिती/घटना चांगली असली तर आपोआपंच चांगली शिकवण मिळते, वाईट असेल तर कसं वागू नये हे शिकता येतं. आपण काय घ्यायचं ते आपल्यावर असतं.

हे सगळं आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे सध्या ट्रेंडमध्ये असलेली चीनी वस्तूंविरोधी तथाकथित लाट. जो उठतो तो बाॅयकाॅट चायनीज प्राॅडक्टस, तुमच्याकडे आधीच असलेल्या वस्तूही वर्षभरात काढून टाका वगैरे सांगत सुटलाय. काही दिडशहाण्यांनी काल पुण्यात कचकड्याचे फोन फोडून चीन विरोधात प्रतिकात्मक लढाईला सुवरुवात केलीये. बाबांनो चीनकडे प्राॅडक्टसची जी रेंज/वरायटी आहे ती आपल्याकडे आहे का? क्वालिटी, वाॅल्यूम, अफोर्डॅबिलिटी या निकषांवर त्यांच्याकडे जे प्रचंड ऑप्शंस आहेत ते ग्राहकांना कुठून मिळणारेत का? चले तो चांद तक नही तो रात तक एवढंच चीनी वस्तूबद्दल माहीती असणाऱ्यांची रविवारपेठ आणि तत्सम चीप चीनी वस्तू मिळणाऱ्या ठिकाणांपलिकडे पोहोच गेलीच नाहीये. चीन पाच-सात हजारात बारा मेगापिक्सेल कॅमेरा, किमान ६४ जीबी मेमरीस्पेसवाले, बऱ्यापैकी स्पीड असणारे मोबाईल फोन उपलब्ध करुन देतं, ४०-५० हजारांच्या रेंजमधले ॲपलसोबत स्पेसिफीकेशंसवाईज कंपिट करु शकेल असलेही फोन विकतं याकव्यतिरिक्त मोबाईल मार्केटमध्ये सगळ्यात जास्त गाजावाजा असणाऱ्या ॲपलचं प्राॅडक्शन/असेंब्ली चीनमध्ये होतेय. ही रेंज आहे का आपल्याकडे? हे झालं डायरेक्ट एंडयुजर वापरत असणाऱ्या प्राॅडक्टबद्दल.

बाकी कित्येक इलेक्ट्राॅनिक वस्तू आहेत ज्यात ढीगानी चाईल्ड पार्टस चीनकडून घेऊनंच एंडप्राॅडक्ट बनतं. अगदी मुस्लिमांच्या डोक्यावर घालायच्या गोल टोप्यांपासून ते हिंदूच्या लाडक्या गणपतीच्या मूर्तीही चीनमधून भारतात येतात. चीनी वस्तू घेऊ नका सांगणं हे खूपंच सोपंय पण चीनी वस्तूंना त्या तोडीचे ग्राहकांना परवडतील असे पर्याय आहेत का आपल्याकडे. पुढची काही वर्ष इन्वेस्ट करुन आपली चीनी वस्तूंना तोडीसतोड पर्याय (क्वालिटी/क्वांटीटी/प्राईज या सर्व आघाड्यांवर) देण्याची तयारी आहे का? लोकांना ज्यादिवशी आपण या सगळ्या आघाड्यांवर चांगले पर्याय उपलब्ध करुन देऊ त्यादिवशी बाॅयकाॅट चायनीज प्राॅडक्टस असं सांगायची वेळंच येणार नाही. आपलं नाणं खणखणीत आहे हे फक्त सांगा आणि सिद्ध करा, दुसऱ्याच्या नाण्याकडे लोक ढुंकूनंही बघणार नाहीत.

एकदा जागतिकीकरण आणि भांडवलशाही व्यवस्थेची निवड केल्यानंतर अन त्या व्यवस्थेचा अविभाज्य भाग झाल्यावर ती नाकारण्यात काय हशील आहे? शिवाय आपल्याला चीनच्या वाटेवर जायचं आहे का हाही मुद्दा आहेच. आपल्याच लोकांना जनावरांपेक्षा वाईट वागणूक देऊन, अनन्वीत छळ करुन काबाडकष्टाला जुंपुन आपल्याला मास प्राॅडक्शन वगैरेमध्ये चीनच्या पुढे जायचंय का?

आपली रेघ मोठी करण्यावर भर द्या मित्रांनो... दुसऱ्याच्या रेघा छोट्या करण्यात प्रयत्न आणि वेळ घालवण्यात काहीही अर्थ नाही


जरा तसवीर से तू



 

पडद्यावर तीन स्पाॅटलाईटस तरीही धुसर दिसणाऱ्या आकृत्या. व्हायोलीन वाजवणारा शाहरुख आणि गाण्याला झालेली सुरुवात. चेहेऱ्यासमोरुन व्हायोलीन बाजूला सारत असताना दिसणारे त्याचे ते बोलके डोळे आणि व्हायोलीन पूर्ण बाजूला करुन त्याने हलवलेली मान. पहिल्या तीनचार ओळींना शून्य लिपसिंक, आणि मग गायला सुरुवात करणारा अर्जुन, “जरा तसवीर से तू निकल के सामने आ मेरी मेहबूबा” आणि चेहेऱ्यावर लाल ओढणी घेतलेलं मॅनेक्वीन.

तिने यावं अशी मनापासून ईच्छा असणारा, ती आगतिकता चेहेऱ्यावर दिसणारा अर्जुन. ती आल्यावर चेहेऱ्यावरच्या आगतिकतेची जागा आश्चर्य घेते. पुढचं पूर्ण कडवं गंगावर कॅमेरा आहे. लाडेलाडे गाऊन गंगाच्या स्वभावाला साजेशी सुरुवात अलका याज्ञिक करते. अन त्याच्या पुढच्या कडव्यात अर्जुनच्या देहबोलीतून त्याचा आनंद ओसंडून वाहतो. चेहेऱ्यावरचं आश्चर्य जाऊन हसू आलेलं असतं. ती खरंच आलीये ही गोष्ट जणू सिंक इन झालेली असते. कसल्याही ॲक्रोबॅटीक स्टेप्स नाहीत अगदी साध्यासोप्या स्टेप्स, अमेझिंग बाॅडी लॅंग्वेज, डोळ्यातून साधलेला संवाद आणि थोडक्यात गाण्यातलाही अप्रतिम अभिनयं, कुमार सानूचा आवाज नदीमश्रवणचं झक्कास संगीत हे सगळंच गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. ती पांढरी टोपी डोक्यावरुन डोळ्यापर्यंत ओढून जवळपास अर्धा चेहरा झाकलेला असताना, हसून गालावर उमटलेली खळी, त्याचा तो सहज वावर यातून ती आल्यानं त्याला झालेला आनंद शाहरुख आपल्यापर्यंत तंतोतंत पोहोचवतो. त्यावेळचा शाहरूखचा अभिनय बघून गेल्या दहाबारा वर्षात त्याने स्वतःला अक्षरशः वाया घालवलेलं बघून जाम वाईट वाटतं.

फोन वाजतो अन आपल्याला वाटतं गाणं संपलं. राजीवच्या (होणाऱ्या नवऱ्याच्या) घरुन फोन असतो, तू गॅरेजच्या लफंग्यांसोबत नाचतीयेस म्हणून लोक हसतायेत आमच्यावर, आत्ताच्या आत्ता घरी येतीयेस की नाही? फक्त हो किंवा नाही सांग असा प्रश्न समोरुन आल्यावर आपल्याला वाटतं आता ही हो म्हणून जाईल पण ती नाही म्हणून झटक्यात फोन ठेवते आणि इतकावेळ या सगळ्या सेलिब्रेशनच्या गदारोळात बाजूला अगदी शांतपणे उभा असलेला पवन मल्होत्रा विश्वासाने हसतो.

या गाण्यात शाहरुखनंतर जर कोणी आवडलं असेल तर ती महीमा नसून तो पवन आहे.

पिक्चर पोरकट घटनांनी भरलेला आणि फारसं काही विशेष नसलेला असला तरीही गाणी झक्कास आहेत. बाकीच्या गाण्यांविषयी परत कधीतरी.

मेरी मेहबूबा शाहरुखसाठी हजारोवेळा ऐकलं आणि बघितलंय

#LateNightPlaylist

ती टोपी जाम आवडली होती मला, अजूनंही कुठे मिळाली तर घ्यायचीये

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...