मागे
एकदा ऑफिसमध्ये माझ्याबद्दल फिडबॅक देताना एक मित्र म्हणाला होता, “If someone is
getting bullied by a group & being alienated Kunya ensures that the weaker
one isn’t standing alone, ग्रुपमध्ये कोणीही एकटा किंवा कमजोर पडत असल्यास कुण्या
त्याला एकटा पडू देत नाही”
This
I think is one of the best compliments I’ve ever received till date.
मला
वाटतं आपापल्या घरात आपल्या सगळ्यांचं असंच असतं. घरात एकापेक्षा जास्तं मुलं
असतील तर त्यातल्या त्यात कमजोर मुलाकडे आईचा ओढा जास्त असतो. तिला त्याची जास्त
काळजी वाटत असते. याचा अर्थ असा नाही की तिचं बाकीच्या मुलांवर प्रेम कमी असतं. ती
बाकीच्यांबद्दल जास्त निर्धास्त असते, कमी वेळ अन एफर्टस टाकूनंही बाकीच्यांचं
धडभलं होईलंच याची खात्री असल्याने ती त्या अमुक एका तुलनेनं कमजोर मुलावर जास्तं
लक्ष केंद्रीत करते. त्याला अडचण येऊ नये, आली तर लवकर सुटावी आणि एकूणात आपल्या
मदतीने तरी त्याचं सगळं सुरळीत चालावं हा त्यामागचा उद्देश असावा. सहाजिकंच
ईतरांच्या तुलनेत त्या दोघांबधला बाॅंड हा जरा जास्तं चांगला डेव्हलप होतो, नर्चर
होतो. त्या एकाचे जऽरा जास्तं लाड होतात. हे जसं आईचे लेकरांबद्दल होते तसंच
मुलांचेही आईबापाबद्दल होतं... ठरवून केलं जातं नाही, आपोआप होतं.
१९९५
साली आमच्या भाऊंचं पहिल्यांदा बीपी शूट झालं ते ईतकं की घाम आल्याने अंगातला
टी-शर्ट अक्षरशः पिळून काढावा लागला होता. सिस्टोलिक २१० आणि डायस्टोलिक बीपी १४०
असं काहीसं रीडिंग होतं. असं अचानक बीपी शूट होण्याच्या कारणाची शोधाशोध सुरु
झाली. वेगवेगळ्या टेस्टस केल्या. सोनोग्राफीमधून हे कळलं की भाऊंच्या किडनीज
पाॅलिसिस्टीक (सोप्या भाषेत सांगायचं तर किडनीला आतून पाण्याने भरलेले असंख्य
सिस्टस असणे) आहेत. शिवाय त्यांचा साईज ॲबनाॅर्मली मोठा झाला आहे त्यामुळे बीपी
वाढलं आहे अन यासाठी आयुष्यभर औषधं घेण्याशिवाय पर्याय नाही. त्याच वर्षी चारेक
महिन्यापूर्वी माझे आजोबा वारले होते. त्यांच्याही किडनीज पाॅलिसिस्टीक होत्या. हे
कळल्यापासून आईची चिंता खूप वाढली होती. तिला मी समजावून सांगायचो, सगळ्याचा ईलाज
होतो आता, ईलाज नाही असा एकंही आजार नाही. तेव्हापासून मात्र भाऊंवर सीकेडीचा
(क्राॅनिक किडनी डिसीज) शिक्का बसला. एकदोन महिन्यात टेस्टस वगैरे करुन रोजच्या
गोळ्या चालू करुन अन काटेकोर पथ्य पाळायची असं डाॅक्टरने सांगून सगळं सुरळीत झालं
ते पुढची तीन वर्ष सुरळीत चाललं.
१९९८
साली भाऊ मित्रांसोबत वैष्णोदेवीच्या ट्रीपला जाऊन आले अन दुसऱ्या दिवशी आजारी
पडले. सुरुवातीला आम्हाला वाटलं प्रवास, दगदग यामुळे झालं असेल. ते असे तापाने
फणफणले की ताप कमीच होईना. पाचेक दिवसांनी जरा कमी झालेला ताप एकदोन दिवसात पुन्हा
आला. दहाबारा दिवसांत ताप कमी होत नाही म्हटल्यावर आता भाऊंना हाॅस्पिटलाईज करुया
असे सगळे म्हणू लागले. त्याकाळी हाॅस्पिटलाईजेशनची एक भीती होती मनात. ते टाळता
येईल का हे चेक करण्यासाठी मी आमच्या एका फॅमिलफ्रेंड जोशी डाॅक्टरांना भेटलो.
भाऊंच्या किडनीज पाॅलिसिस्ट आहेत हे ऐकताच डाॅक्टरांनी मला दारातूनंच पिटाळलं आणि
म्हणाले आल्यापावली जा आणि त्यांना पहिल्यांदा हाॅस्पिटलाईज कर. डाॅक्टरांची
रीॲक्शन बघूनंच मला गोष्ट सिरीयस असल्याची हिंट मिळाली होती. परिस्थिती
कंट्रोलमध्ये आहे म्हणता म्हणता पार हाताबाहेर गेली. किडनीजला इन्फेक्शन झालं होतं
आणि भाऊंची परिस्थिती क्रिटीकल झाली होती. एक वेळ अशी आली की डाॅक्टरांनी आम्हाला
स्पष्ट सांगितलं जेवढे प्रयत्न करु शकत होतो ते आम्ही केले. आता हाॅस्पिटलमध्ये
राहण्यात अर्थ नाही. औषधं आणि इंजेक्शन्स प्रिस्क्राईब करुन देतो. तुमच्या फॅमिली
डाॅक्टरला बोलवून रोज इंजेक्शन्स द्या, औषधं चालू ठेवा. आता याउपर तुमचं नशीब. भाऊ
मात्र विश्वासाने म्हणायचे आईला मी मरत नाही तू काळजी करु नकोस. भाऊंची विलपाॅवर
स्ट्राँग होती, डाॅक्टरांनी हात टेकले पण भाऊ मात्र तब्बल ३ महीन्यांनी या
जीवघेण्या आजारातून बरे झाले.
तेव्हापासून
मात्र भाऊंच्या तब्येतीबद्दल मनात खूप भीती बसली. भाऊ बिनधास्त होते पण आमचं पूर्ण
कुटुंबं भाऊंना तापंही येऊ नये म्हणून जीवापाड जपू लागलं. कधी आलाच तर दोनेक
दिवसांत त्यांचा ताप जाईपर्यंत भीतीने आमचा जीव कंठाशी यायचा. भीती वाढून
फोबियामध्ये कन्व्हर्ट झाला होता. आई आणि भाऊंमध्ये भाऊ तब्येतीने कमजोर आहेत हे
डोक्यात बसल्याने सहाजिकंच भाऊंची काळजी जास्त वाटू लागली, त्यांच्याकडचा ओढा खूप
वाढला. भाऊंची तब्येत, औषधगोळ्या सगळ्याची आम्ही एक्स्ट्रा काळजी घेऊ लागलो.
प्रत्येकाचाच भाऊंसोबतचा बाॅंड स्ट्राँग होत गेला. किडनी फेल्यूअर डिटेक्ट
होण्याआधीपर्यंत पुढची बारा वर्ष भाऊ नाॅर्मल आयुष्य जगले
१९९८
पासून आमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू झालेल्या भाऊंची २०१० पासून तर आतोनात काळजी
वाटू लागली. भाऊंनी स्वतःच्या आजाराचा कधीच बाऊ केला नाही आमच्या सगळ्यांसाठी
मात्र भाऊंची तब्येत नीट राहणं यापेक्षा मोठं कोणतंच ध्येय राहीलं नव्हतं. पण या
सगळ्यात आम्ही कळत नकळत सगळ्यात जास्त आईला गृहीत धरत गेलो. आमचं लक्ष १००% फक्त
भाऊंवर केंद्रीत झालं होतं. याकाळात आईच्या बाकीही काही ईच्छा असतील, तिलाही कधी
रुटीनचा कंटाळा येत असेल हे जाणवायला बराच वेळ लागला आम्हाला. भाऊंना सर्दीपडसं
झालं तरी आम्ही आतून घाबरायचो. त्यांच्या अपाॅइंटमेंटस, टेस्टस, रीपोर्टस या सगळ्याला
आतोनात महत्व देण्याची गरजंच होती. भाऊंच्या एखाद्या रीपोर्टमध्ये काही वाईट असणं
म्हणजे डायरेक्ट जीव जाण्यावर यायची गोष्ट, आम्ही हादरुन जायचो पार पण तेच आईचं
कधी छोटंमोठं आजारपण असेल किंवा एखादी टेस्ट किंवा थोडीफार शुगर वाढलेले रीपोर्टस
येणं असो आम्ही त्यात काय एवढं अशा अविर्भावात असायचो. अर्थात ते गंभीर कधीच
नव्हतं पण कळत-नकळत तुलना झाल्यामुळे त्याबद्दल आमचा थोडा का असेना कॅज्युअलंच
अप्रोच असायचा. भाऊंची औषध-गोळ्या आहेत का, कधी संपतायेत हे लक्ष देऊन बघणं,
संपण्याआधी आणणं. वेळेवर घेतायेत की नाही चेक करणं हे नियमित करायचो मी. पण भाऊ
असेपर्यंत तेवढ्याच गांभीर्याने आईच्या औषधपाण्याकडे लक्ष द्यायला जमलं नाही,
द्यायला हवं होतं खरंतर. कदाचित भाऊंची केस डायरेक्ट लाईफ ऑर डेथ या दोन
शक्यतांमधल्या एक्स्ट्रीमवरंच जायची म्हणून आणि आईची शुगर बीपी विशेष गंभीर नसल्याने
असेल पण फरक राहीलाच.
अजाणतेपणी
का असेना रीस्पाॅंसमध्ये उन्नीसबीस झालंच आमच्याकडून. तब्येतीने कमजोर असलेल्या
माणसासोबत उभं राहताना तुलनेनं स्ट्राँग व्यक्तीकडे अनावधानानं का असेना दुर्लक्ष
झालंच. एकप्रकारे अन्यायंच झाला ना खरंतर.
भाऊ
गेले तेव्हा मी आईला म्हणायचो आता माझी आईही तूच आणि भाऊही तूच. पण नाही...
प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. भाऊ वेगळे अन आई वेगळी. आईला फक्त आई म्हणून तिचं
वेगळेपण मान्य करत जपायला हवं आम्ही. तिचीही आयडेंटीटी आहे, तिला स्वतःची वेगळी
ओळख नको असली तरी आम्ही ती जाणीवपूर्वक जपायला हवीये. जेवढं खंबीरपणे, प्रेमाने अन
उत्कटतेने भाऊंसोबत राहीलो तसंच आईसोबत रहायला हवं मी आणि आम्ही सगळ्यांनीच.
म्हणून
आता जाणवत की ensuring you stand by the weaker ones is important but in
exceptional cases you got to make sure that the rest do not feel left out too!
No comments:
Post a Comment