Friday, September 18, 2020

तेरे दर पर सनम चले आए


 

फिर तेरी कहानी याद आयी १९९३ साली झी टीव्हीवर रीलीज झाला होता. पिक्चर आला तेव्हा मी १२ वर्षाचा होतो. तेव्हा काहीच न कळलेला पिक्चर अजून दोनेक वर्षांनी टेपरेकाॅर्डरवर बहीणींनी लावलेली गाणी ऐकून ऐकून पाठ झाल्यावर परत पाहीला होता. जेमतेम दिड तासाच्या या पिक्चरमध्ये मानसिक संतुलन बिघडलेली प्रेयसी दाखवली नसती तर तो विशेष वेगळा वाटला नसता. दारुच्या आहारी गेलेल्या प्रतिथयश दिग्दर्शकाला (राहुल) पुनर्वसन केंद्रात भेटलेली मुलगी (पूजा), त्याला पुढे जाऊन कळतं की ती मानसिक रुग्ण आहे पण तोवर ते एकमेकांच्या आकंठ प्रेमात पडलेले असतात. दिवसेंदिवस पूजाची विकृती वाढत जाते, त्या वेडात तिचा राहुलवरचा विश्वासंही ढळायला सुरुवात होते, राहुल आणि तिच्या आजूबाजूचे सगळेच तिला मारायचा कट रचतायेत असं तिला वाटू लागतं. तिच्या हा प्रवासात ठामपणे उभ्या असणाऱ्या राहुललाही तिची ही दीनवाणी अवस्था बघवेनाशी होते अन पूजाची रवानगी वेड्यांच्या ईस्पितळात होते. पूजाच्या आत्महत्येने या कहाणीचा करुण अंत होतो. या सगळ्या प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर येणारी गाणी या पिक्चरची युएसपी होती.

पिक्चरच्या ओपनिंग सीनला येणारं दिल देता है रो रो दुहाई असो की पूजा आश्रमात भेटल्यावरचं बादलों मे छुप रहा है चाॅंद क्यू असो. एकापेक्षा एक अप्रतिम गाण्यांनी भरलेला पिक्चर, एकाच सिनेमातली सगळीच गाणी अप्रतिम असणं हे तेव्हा तसं रेअर नव्हतं. नव्वदच्या दशकात असे अनेक परिपूर्ण अल्बम्स आले. फिर तेरी कहानी याद आयी हा त्यातलाच एक पण माझ्यासाठी एकदम वरचा नंबर असलेला पिक्चर.

तेरे दर पर सनम चले आए (फिमेल वर्जन) गाणं चालू होण्याआधी राहुलवर रुसुन त्याच्या घराबाहेर बसलेली चाॅकलेटी ड्रेसमधलली पूजा भट तेव्हा लै लै आवडली होती. उत्तरार्धात मेंटल हाॅस्पिटलमधून आलेली केस बारीक कापलेला पूजाही जाम म्हणजे जामंच आवडली होती तेव्हा. शायरानासी है जिंदगी की फजामध्ये नीना गुप्ता जे काय अप्रतिम दिसलीये त्याला तोड नाही.

उत्तरार्धात येणारी आनेवाला कल आणि तेरे दर पर सनम (मेल वर्जन) खुळ लावणारी गाणी आहेत अक्षरशः

दिल मे सनम की सुरत गाणं पिक्चरमध्ये पूर्ण येत नाही याचं वाईट वाटतं. (एकमेकांवर प्रेम करण्यासाठी) मेरे खुदा मुझे तू इक और जिंदगी दे हे पिक्चरमध्ये बघायला मिळत नाही

आजकाल पूर्ण अल्बम चांगला असण्याचे दिवस राहीले नाहीत आणि गाण्यासाठी पिक्चर हीट होण्याचेही नाहीत.

आज फिर तेरी कहानी याद आयी कोणी पाहीला तर कदाचित बिलकुल आवडणार नाही पण फाॅर द लव्ह ऑफ नाईन्टीज हा एक खूप आवडता पिक्चर आहे माझा. कैफी आज़मींचे शब्द कुमार सानू, अलका याज्ञिक, साधना सरगमचा आवाज आणि अन्नू मलिकचं संगीत.... लाजवाब!

यातली सगळीच गाणी लेट नाईट प्लेलिस्टमध्ये पर्मनंटली ॲड केलेली आहेत तरीही तेरे दर पर सनम चले आए हे विशेष आवडतं, हे गाणं मी एकटा गाडी चालवत असताना लूपवर कितीहीवेळा ऐकू शकतो

गुजरा हुवा कल बस अपना है, हम गुजरे कल मे रहते है

#LateNightPlaylist

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...