ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार
फ्रेंडशिप डे!! हंम्म फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा दिवस..
आमच्यावेळी नव्हतं असं म्हणत नाक मुरडायचा तो आजवर
पण आज एकही मित्र राहीला नव्हता बरोबर
तेव्हा रंगायचे गप्पांचे फड
साक्षीला असायचा पाराचा वड
चौक, कट्टा, टिंगल, मस्करी, मजा
दोस्तीसाठी हरेक दिवस असायचा ताजा
आज फ्रेंडशिप बँडमागे लपलेले हात धरायला नाहीत कोणी आपले
सुख दुःखात घट्ट हात धरणारे आठवले त्याला सगळे
खुर्चीत बसल्या बसल्या
मिटल्या डोळ्यासमोर एकेक नावं येत गेली
अशोक, सत्त्या, अज्या, रव्या
अंत्या, सोम्या, आप्पा, माउली
खिशातून डायरी काढून त्यानं सुरुवात केली
एकेकाचा नंबर डायल करायला
कोणाचा नंबर बंद, कोणाचा फोन स्विच ऑफ
तर कोणी गेल्याची बातमी त्याच्या मुलानी दिली
टि पॉयवर पडलेल्या डायरीची पानं फडफडत राहीली
एकटेपणा अजूनंच जाणवू लागला त्याला
का कुणास ठाऊक आजच्या काळातल्या
फ्रेंडशिप डेचं महत्व पटलं त्याला
काठीचा आधार घेऊन उठणार तेवढ्यात तिनं हात पुढे केला
मागच्या हातात काहीतरी लपवत
ईवल्याशा हाताने डोळे झाकले त्याचे
हॅपी फ्रेंडशिप डे म्हणत त्याच्या हातात काहीतरी ठेवलं जेव्हा
नातीच्या रंगलेल्या फ्रॉककडे पाहून आश्चर्य वाटलं तेव्हा
ग्रिटींग कार्डवर लिहिलं होतं तिच्या हस्ताक्षरात
"टू माय फर्स्ट अँड बेस्ट फ्रेंड, हॅप्पी फ्रेंडशिप डे ग्रँडपा"
कुणाल प्रकाश रुद्राके
Happy friendship day to all of you
Loads of Love
Kunal
