Sunday, March 21, 2021

दोघं - भाग १२

 


सगळ्यांनी, सगळ्यांनी म्हणजे तिने, तिच्या आणि त्याच्या मित्रमैत्रिणींनी त्याला देव म्हणून हाक मारायला सुरुवात केली त्याला दोन अडीच वर्ष झाली असतील.तो मजेनं म्हणायचाही की त्याचं खरं नाव काय आहे हे आता त्याचं त्यालाच आठवेनासं झालंय. कॉलेज संपवून ॲप्रंटीसशिप चालू केल्यावर गळ्यात पहिल्यांदा गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून त्याने नव्या कलिगसोबत काढलेला फोटो मोठा आटापिटा करुन मेल केला होता तिला. तेव्हा आजच्यासारखं सहजासहजी प्रत्येक फोनवर वगैरे इंटरनेट नसायचं. नेट कॅफे अजूनंही जोमात होते, नोकीयाचा पूर्वी इतका जोर नसला तरी आज इतका नोकीया पूर्णपणे संपलेलाही नव्हता. तो फोटो बघून फोन करुन ती पहिल्यांदा त्याला अरे माझ्या महादेवा म्हणाली होती. मऽऽहादेवा ह्यॅ? हे काये? अरे बाबा महादेवाच्या गळ्यात नाही का शेषनाग असतो तसाच तुझ्या गळ्यातला तो स्टेथोस्कोप. प्लिजंच, एकतर महादेवाच्या गळ्यात असतो तो शेषनाग नाही नुसता नाग आणि विष्णूचा शेषनाग असतो. तेच रे... शेषनाग म्हणायला भारी वाटतं.

तर महादेवाचं, देवा आणि देवाचं देव कधी झालं कळलंच नाही. तिने त्याचं नावंही मोबाईलमध्ये देव म्हणूनंच सेव्ह केलं होतं. देव ॲप्रंटीसशिप यथावकाश संपवून पुण्यात आला. गेल्या पाचसात वर्षात रोज फोनवर म्हणण्यापेक्षा एसेमेसवर भेटणारे दोघे कित्येक वर्षानंतर प्रत्यक्ष भेटले ते पहिल्यांदा तो जॉब करत असलेल्या हॉस्पिटलच्या कॅंटीनमध्ये आणि तिथे भेटणं हे त्यांच्यासाठी रुटीन होऊन गेलं. तिथल्या कॉफ़ीमध्ये काहीही स्पेशल नव्हतं, ना चव ना कप ना तिथलं ॲंबियंस पण ती कॉफीही त्या दोघांना आवडू लागली होती. तो पहील्यांदा तिला मनातलं बोलण्यासाठीही असाच कॉफी शॉपमध्ये घेऊन गेला होता. दिड तास आणि तीन कॉफीनंतर शेवटी तीच म्हणाली होती त्याला, आवडतोस तू मला, अशीच वाट बघत बसले तर कधी मनातलं सांगशील काय माहीत. तीचं हे बोलणं ऐकून चपापला होता तो आणि ती म्हणाली दचकायला काय झालं, नेहमी मुलानेच पुढाकार घ्यायला हवा काय? म्हणजे तू पुढाकार घेऊन बोलला असतास तर आवडलं असतं मला पण अशीच अनिश्चित काळासाठी वाट बघण्याएवढे पेशंस बिलकुल नाहीयेत माझ्यात. तो बावचळल्यासारखा बघतंच राहीला होता तिच्याकडे. अरे बाबा मी होऽऽऽऽ म्हणत्येय किमान रीॲक्शन तर चांगली दे की म्हणत तिने त्याचा हात हातात धरुन हलकेच दाबला तरीही त्याला काय रीॲक्ट करावं ते सुचलं नव्हतं.
अं.. पण.. त्याने चाचपडत बोलायला सुरुवात केली तसं तिला हसू आवरेना.
अगं हसतेस काय मला बोलू तर दे.
हंमम बोल म्हणून तिने हसू दाबून धरलं, म्हणजे हसण्याचा आवाज तेवढा येत नव्हता पण ती हसतंच नव्हती अशातला भाग नाही.
प्लिज ना यार मला आधीच कठीण जातंय, आता तर खूप गिल्टी वाटतंय. प्लिज हसू नकोस म्हणत तो बोलायचा परत थांबला.
काय झालंय देवा? सांगशील का नीट? तिने हसू पूर्णपणे थांबवून विचारलं.
पुढचे दोन मिनिट असेच शांततेत गेल्यावर त्याने  एका झटक्यात सांगून टाकलं, लग्न ठरलं माझं मागच्या आठवड्यात.
आता मात्र तिला खरंच हसू आवरेना, हसून हसून डोळ्याच्या कडांमध्ये साचलेलं पाणी पालथ्या मनगटाने पुसत ती म्हणाली एवढं फिल्मी नको रे वागू. ही असली मस्करी खूप सिनेमात बघून झालीये माझी.
मी खरं बोलतोय, त्याने कोऱ्या चेहऱ्याने सांगितल्यावर तिला अस्वस्थ वाटू लागलं. ती निरखून त्याच्या चेहेऱ्याकडे पाहू लागली. तीचा पुरता गोंधळ उडून गेला होता. हा खरंच बोलतोय की मस्करी करतोय हे ओळखताच येईना तिला. तिची कानशीलं गरम झाली, छातीतली धडधड प्रमाणाबाहेर वाढली. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत नाहीयेत तो खोटं बोलत नाहीये अशी खात्री वाटू लागताच ती काकुळतीला येऊन बोलू लागली प्लिऽऽज मस्करी करत असशील तर बास कर आता माझा जीव गळ्याशी आलाय, एकदाच खरं काय ते सांग म्हणून तिने त्याच्या हातावर हात ठेवला तेव्हा तिचे तळहात घामाने थंऽऽड पडले होते.
सॉरी म्हणून पुटपुटत त्याने मान खाली घातल्यावर ती यांत्रिकपणे त्याच्या हातावर हात तसाच ठेवून बसून राहीली. तिने त्याचा हात धरला नव्हता आणि त्याने त्याचा हात सोडवूनंही घेतला नव्हता. मग गेल्या कित्येक वर्षात आपल्यात जे होतं ते नेमकं काय हा प्रश्न विचारावासा वाटला पण तिने तो मनातल्या मनात स्वतःला विचारण्यापर्यंतच स्वतःला थोपवलं. ती रडली वगैरे नाही, कसलाही आतताईपणा केला नाही, कुठलेही प्रश्नं विचारले नाहीत कारण खरं बोलायचं तर त्यांच्यात मैत्री पलिकडे कधी काही नव्हतंच पण फक्त मैत्रीही निश्चितंच नव्हती. ते एकमेकांना स्पष्ट शब्दात काही बोलले नव्हते पण सूचक बोलण्यातून गाडी बऱ्यापैकी पुढे गेली होती तरीही स्टेशनला पोहोचली नव्हती. तो माझाच आहे असं तिने गृहीतंच धरलं होतं आणि रादर त्याचं वागणंही ती माझीच आहे असंच होतं. पण गणित नेमकं कसं कधी कुठे आणि का चुकलं कुणास ठाऊक पण आत्ता समोर जे होतं तेच नेकेड ट्रूथ होतं.
तिने निघण्यापूर्वी त्याला फक्त एकदा विचारलं तुला कधीच जाणवलं नाही?
बऱ्याचदा वाटलं
मग?
पण मग असंही वाटलं की तू मनमोकळेपणानं वागतेस म्हणजे तू माझ्या प्रेमातंच असशील असा अर्थ काढणं बुरसटलेपणाचं होईल नाही का? तरी माझे मित्र मला म्हणायचे तिला तू आवडतोस नक्कीच पण मीच त्यांना सांगायचो की ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे, तुमच्या डोक्यात फक्त एकंच गोष्ट येते काय? तू पक्का मूऽऽर्ख आहेस असं म्हणून मित्र विषय सोडून द्यायचे. मला मनातून वाटलं तरी तुला आवडणार नाही असंही वाटायचंच
ती हसली पण तिच्या हसण्यात यावेळी सरकॅज्म होता. मग एवढी चांगली मैत्री होती, रोज एवढं बोलत होतो तरी तुझं लग्न ठरतंय एवढं फक्त तू सांगू शकला नसतास का मला? तिला विचारावं वाटलं पण आज तिने सगळे प्रश्नं तिच्याकडेच ठेवले, तसेच आत. कधी आहे लग्न? हे विचारणं तिला खूप कठीण गेलं पण तिला जाणून घ्यायचं होतं तिच्याकडे किती वेळ आहे.
नोव्हेंबर २०१०
काऽऽऽय? तू खरं सांगतोएस कि मस्करी चालूये मला खरंच काहीही कळत नाहीये
मी खरं बोलतोय, प्लिज परत परत तोच प्रश्न विचारु नकोस तो थोडा कातावून बोलला
अरे इट्स लाईक मोअर दॅन टू यर्स फ़्रॉम टूडे. टू यर्स टू मंथ्स टू बी प्रिसाईज. एवढा वेळ कोण लग्न ठरवून ठेवतं? तिने हे एवढ्या उत्साहात विचारलं, तिचं तिला कळत नव्हतं अजून दोन वर्ष आहेत याचा तिला नेमका आनंद का होतोय. आपल्याकडे अजून वेळ आहे म्हणजे तो पूर्णपणे दुसऱ्या कोणाचा झाला नाहीये म्हणून कि दोन वर्षात निर्णय बदलूही शकतो म्हणून?
ओके दॅट डझंट चेंज एनिथिंग फ़ॉर मी ॲट लीस्ट. आय लाईक यू... लव्ह यू ॲंड आय नो दॅट यू डू टू बट आय वोंट स्पीक फ़ॉर यू. आय’ड स्पीक फॉर ओन्ली मायसेल्फ. नथिंग चेंजेस बीटवीन अस, आय मीन आय होप वी आर स्टील फ्रेंड्स ॲंड यू वोंट टेक  दॅट अवे फ़्रॉम मी, नॉट ॲट लीस्ट टील यू गेट मॅरीड. सी यू म्हणून त्याच्या कसल्याही उत्तराची वाट न बघता ती निघून गेली.
त्या दिवसापासून कॉफी शॉप आणि त्यांची भेट हा अलिखित नियम ठरून गेला होता. त्याचं लग्न ठरलंय ही गोष्ट दोघांनीही त्यांच्या मैत्रीच्या आड येऊ दिली नव्हती.
त्याची नाईट शिफ्ट आणि त्यांचं हॉस्पिटलच्या कॅंटीनमध्ये भेटणं हे एक वेगळंच समीकरण होतं. किती किती आणि काय काय गप्पा मारल्या असतील त्यांनी तिथे बसून. जे कधी होऊच शकणार नाही ते झालं तर कसं असेल या इमॅजिनरी गप्पा. आपल्या घराच्या कोणत्या भिंतीला कोणता रंग द्यायचा, खिडक्यांना पडदे कसले घ्यायचे, मुलांची नावं, पहिली मुलगीच होणार वगैरे. या सगळ्या प्रवासात त्याला खूपदा गिल्टी फिल व्हायचं. आपलं तर लग्न ठरलंय आणि लग्न होईपर्यंतच्या मधल्या काळात आपण तिला खोटी आशा दाखवतोय का, गैरफायदा घेतोय का. तिचा सहवास कितीही हवाहवासा वाटला तरी हे टेंपररी आहे, बरं तिलाही हे माहीत असलं तरी तिला आपल्यात किती गुंतवून ठेवायचं या संभ्रमात असूनंही तो स्वतःला थोपवू शकत नव्हता.
तो पुण्यात नसताना एका रात्री एसेमेसवर चाट करताना असंच एकदा म्हणाला होता तो शाळेत असताना तिचे लांब केस खूप आवडायचे त्याला आणि एका रात्री तिने चाचपडंत सांगितलं होतं कि तिने हेअरकट केलाय. एकदा तिने मैत्रिणीसोबत पहिल्यांदा कॉकटेल टेस्ट केलं होतं, ते तिला इतकं आवडलं कि ती पाठोपाठ तीन कॉकटेल्स प्यायली होती. त्या रात्री तासभर फोनवर बोलून झाल्यावर तिने त्याला विचारलं होतं की आज त्याला काही फरक जाणवला नाही का? त्याला काहीच कळलं नाहीये हे लक्षात आल्यावर तिने सांगितलं मी आज तीऽऽऽन कॉकटेल्स प्यायलेय आणि खळखळून हसली होती. तो कॉलेजसाठी पुण्याबाहेर होता तेव्हा एसेमेसवर गप्पा मारणं हे त्यांच्यासाठी डेली रुटीन होतं. रात्री अकरा ते पहाटे दोनतीन पर्यंत एसेमेस वर एसेमेस चालायचे. एक दिवस खंड पडत नव्हता, रोज एवढं बोलूनंही एकंही रात्र आता काय बोलावं असा प्रश्न पडलाच नाही कधी त्यांना. या सगळ्या आठवणीही ते त्या हॉस्पिटलच्या कॅंटीनमध्येच बसून काढायचे. 
आज अमुक एक पेशंट कसा क्रिटीकल झाला होता पासून ते तिला कुठला रंग आवडतो ते बर्म्युडा ट्राएंगलची काय मिस्टरी असेल अशा कोणत्याही विषयावर ते बोलत बसत. पण सगळ्यात जास्त तो हॉस्टेलला असताना रात्र रात्र जागून एसेमेसवर मारलेल्या गप्पांच्या आठवणी काढून कॉफी पित बसणं हा त्या दोघांचाही फेवरेट छंद होता. जवळपास वर्ष गेलं असावं असंच, आता त्याला खरंतर खूऽऽपंच काळजी वाटू लागली होती. तिची त्याच्यातली इन्व्हॉल्वमेंट दिवसागणिक वाढतंच चालली होती, त्याचीही परिस्थिती वेगळी नव्हती. ज्या गावाला जायचं नाही त्या गाडीत का बसायचं हे कळत असूनंही वळत मात्र नव्हतं. तिच्या मनात फिल्मी आशा होती की लग्न जोपर्यंत होत नाही तोवर इव्हरीथिंग इज नॉट लॉस्ट, काहीतरी मिरॅकल होईल असं तिला उगाचंच वाटत होतं. तोही त्या दृष्टीने काहीही प्रयत्न करत नसला तरी काहीतरी मिरॅकल व्हावंच असं त्याला वाटत होतं आणि समजा काहीच नाही झालं तरी हातात असलेला वेळ एकमेकांना एकमेकांच्या आयुष्यातून वजा करुन घालवायचा नव्हता त्यांना. कुणास ठाऊक त्याच्या लग्नानंतर कितपत संपर्कात रहायला जमेल. सिरीयस नोटवर बोलणं चालू झालं की  देअर इज नो हार्म इन ड्रिमिंग अबाऊट इंपॉसिबल थिंग्ज असं म्हणून ती त्याला गप्प करायची. एक मात्र नक्की की दोघांनाही एकमेकांना फसवायचं नव्हतं, ते जे काय होतं तो टाईमपास निश्चितंच नव्हता पण जे काही होतं ते पुढच्या लेवलला जाऊच शकत नव्हतं. लग्न करणं म्हणजेच सुफळ संपूर्ण असं तुलाही वाटतं का असं तिनं एकदा विचारल्यावर त्याने फक्त नकारार्थी मान हलवली होती. तो एकदा काऊंटरवर दोघांसाठी कॉफी आणायला गेल्यावर तिने त्याच्या मोबाईनधून त्याच्या होणाऱ्या बायकोचा फोन नंबर घेऊन वेगळ्याच नावाने सेव्ह करुन ठेवला होता. एका अनावर क्षणी तिला असं वाटलं होतं पीसीओवरुन फोन करुन तिला सग्गळं सगळं सांगून टाकावं पण पुढच्याच क्षणी आपण इतका चीप विचार कसा करु शकतो हे वाटून शिसारी आली होती आणि तिने तो नंबर त्यानंतर परत कधी उघडूनंही बघितला नाही.
एकदा ते कॅंटीनमध्ये बसलेले असताना तिच्याशी नजर न मिळवता तो अडखळतंच तिला म्हणाला, मी चुकतोय असं वाटतंय मला. लोकांना कळलं तर म्हणतील मी गैरफायदा घेतला तुझा. लग्न ठरलेलं असताना मी तुझ्याबरोबर म... म.. मजा मारतोय. लोकांचं जाऊ दे उद्या तुझ्या दिदिला कळलं तर तिलाही हे बरोबर वाटणार नाही आणि तुला माझ्यात गुंतवून मी असाच आनंदाने मूव्ह ऑन करु शकणार नाहीये गं.
तो बोलायचा थांबलाय याची खात्री करुन घेते ती त्याला म्हणाली, “झालं? तुला कधीपासून लोकांच्या वॅलिडेशन आणि कन्फर्मेशनची गरज वाटू लागली? आय डोंट थिंक वी नीड इट, वी आर फार बायॉंड ऑल धिस बुलशीट. आय’ड नेव्हर डाऊट योर इंटेंट. तुला आणि मला काय वाटतं हे जास्तं महत्वाचंय रादर तेच महत्वाचंय. लाईफ एकदाच्चे देव, आपल्या आजूबाजूला दबा धरुन बसून संधी मिळताच तुटून पडणाऱ्या सोकॉल्ड समाजाच्या बुरसटलेल्या नियम आणि सीमांमध्ये अडकून नाही रहायचं मला. हां तुला संपर्कात राहणं नको वाटत असेल तर तसं सांग. आपल्यात वावगं काहीच नाहीये त्यामुळे अर्थात आपण एकमेकांना तर नाहीच पण आपल्या घरच्यांना आणि अगदी तुझ्या होणाऱ्या बायकोलाही कणभरंही फसवत नाहीये. आपल्याला आवडणाऱ्या माणसासोबत वेळ घालवण्यात गैर काहीच नाहीये. पण तरीही तुला यातलं काहीही वाटत असेल तर आपण इथेच थांबूया, मी मागे वळून बघणार नाही, तुला कधीही दोष देणार नाही एवढी खात्री देते आणि हो बाकी कशाहीपेक्षा मी मला बरं वाटतं, माझं समाधान होतं म्हणून तुला भेटते, माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी”. त्यानंतर बराचवेळ ते दोघे बसून राहीले असेच. मी नाईट ड्युटीवर आहे, जायला हवं म्हणून तो निघाला, एक अवाक्षरही न काढता ती तशीच बसून राहीली.
त्या दिवसानंतर त्यांच्या भेटीगाठी कमी होत गेल्या पण पूर्णपणे थांबल्या नाहीत. एकदाच तिने विचारलं होतं त्याला कि बोलून बघूया का आपण घरी त्यावर त्याच्याकडे काहीच उत्तर नाही हे बघून तिने तो विषय परत कधीच काढला नाही. कधीही स्वतःला त्याच्यावर लागलं नाही, प्लिज म्हणत गळ घातली नाही, विचार कर एकदा तरी म्हणत दबाव टाकला नाही. तिथून पुढे त्याच हॉस्पिटलच्या कॅंटीनमध्ये ते बऱ्याचदा भेटले पण त्यांच्यात संवाद घडलाच नाही. मनात कसली अढी नाही, राग नाही, कधी भांडणंही झाली नाहीत, दोघांनीही एकमेकांना कधीच कशासाठीही दोष दिला नाही पण शब्द आटत गेले ते गेलेच. एकाच टेबलावर बसणाऱ्या त्या दोघांतली दरी शांतताच भरुन काढायची नेहमी. फक्त एकत्र बसणे आणि आपापली वेळ झाली की निघणे एवढ्यापुरत्या मर्यादित राहील्या भेटी. एखाद्या आजारी नातेवाईकासाठी लोक जसे हॉस्पिटलात फक्त बसून राहतात, बोलत नाहीत फक्त विचार करत असतात तसेच हे दोघे आजूबाजूच्या गर्दीत बसायचे. भवतालचा कोलाहल कोणीतरी म्युट केल्यासारखा शांत व्हायचा, कधीकधी ती एखादं गाणं गुणगुणायची तिच्याही नकळत, डोळ्यात पाणी आलंच तर चटकन दुसरीकडे मान फिरवून डोळे टीपायची. तो ती शांतता असह्य होईपर्यंत बसून रहायचा, काळजावरचं ओझं पेलण्यापलिकडे गेलं की बऱ्याचदा न बोलताच उठून जायचा, नजरानजर झालीच तर दोघे सवयीनं फक्त हसायचे. शेवट शेवट एकदा तिच्याकडे न बघता तो म्हणाला होता आपलं भांडण झालं असतं तर बरं झालं असतं, पुढची वाटचाल तरी कदाचित सोपी गेली असती. गोष्टी सोप्या असत्या तर इथवर आलो असतो का आपण म्हणत तिने हलकेच त्याचा हात दाबला होता.
त्याचं लग्न चार महीन्यावर आलं तेव्हा काहीही न बोलता न ठरवता कसलाही फॉर्मल निरोप न घेता ते वेगळे झाले. मधल्या काळात अवाक्षरंही न काढता एकमेकांना समजून घेत सोबत अनुभवलेल्या शांतते एवढा चांगला आणि परिणामकारक संवाद त्यांच्यात कधीच घडला नव्हता. खरंतर पहिल्यापासूनंच त्यांना मनातलं न बोलताच एकमेकांपर्यंत पोहोचवायची सवय होती. बोलायचंच नव्हतं तर भेटायचं तरी कशाला असा लॉजिकल प्रश्न कोणालाही पडेल पण सर्वसामान्यपणे लॉजिकमध्ये बसणाऱ्या गोष्टी त्यांनी केल्याच नाहीत, चारचौघांना लॉजिकली पटेल असंच वागावं असं त्यांना वाटलंही नाही. ते ग्रेसफुली वेगळे झाले, खरंतर वेगळे होण्यासाठी त्यांच्यात होतंच काय हा प्रश्नंही तेवढाच लॉजिकल आहे. मनात एकमेकांविषयी कसलीही कटुता न ठेवता त्यांनी आपापला रस्ता निवडला, न बोलताच संवाद चालू ठेवला.
त्याचं लग्न झाल्यावरंही कधी स्वतःतल्या कोलाहलापासून दूर जावं वाटलं तर ती त्याच कॅंटीनमध्ये जायची कॉफी प्यायला. याला कोणी फिल्मी म्हणेल तर कुणी निव्वळ खुळेपणा पण तिने तो केला... स्वतःसाठी.
काही वर्षांनी यथावकाश तिचंही लग्न ठरलं तेव्हा तिच्या वाढदिवशी त्याने तिला विश करायला फोन केला आणि चाचपडंत म्हणाला मला आत्ता कळतंय तेव्हा तुझ्या काय फिलींग्ज असतील, आय कुडंट पुटं मायसेल्फ इन योर शूज देन. ती फक्त ऐकत होती.
आता खरंतर मला आनंद व्हायला हवाय पण आय’ड बी ऑनेस्ट विथ यू.... मला वाईट वाटतंय, खूप वाईट वाटतंय.
दॅटस ओके! इट्स ओके टू फिल दॅट वे
काय गं तुला तरी आता वाटतं का लग्न करणं म्हणजेच सगळं सुफळ संपूर्ण?
सी देव सम स्टोरीज डोंट डिझर्व ए लॉजिकल एंडींग ऑर टू बी प्रिसाईज अ लॉजिकल कन्क्लुजन. दे आर डेस्टीन्ड टू रीमेन ओपन एंडेड. आय होप यू’व्ह रीअलाइज्ड दॅट बाय नाऊ.
काही गोष्टींना लॉजिकमध्ये बसवायचा आटापिटाच करु नये आणि हो सुफळ संपूर्ण वगैरे काही नसतं... रादर संपूर्ण असं काही नसतं... धिस... माय डिअर इज ए पर्पेचुअल जर्नी व्हाय शुड वी वरी अबाऊट दी डेस्टीनेशन?
आय लव्ह यू म्हणत त्याने फोन बंद केला. तिचा प्रतिसाद ऐकणं गरजेचं नव्हतं कारण काही गोष्टी ओपन एंडेट राहीलेल्याच चांगलं असतं.

केपी आर

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...