Friday, September 18, 2020

कसब

 माणसं जोडणं हे कसब आहे, प्रत्येकाला जमेलंच असं नाही. भाऊंना माणसं जोडणं खूप आवडायचं आणि त्यांना ते जमायचंही. मग त्यांना यात वय, जात, धर्म, लिंग, आर्थिक परीस्थिती काही म्हणजे काही आड येयचं नाही. त्यांचे स्वतःचे मित्र, त्यांच्या वडिलांचे मित्र, माझे मित्र मैत्रिणी, माझ्या बहिणींच्या मित्र मैत्रिणी, एवढंच काय तर या सगळ्यांचे extended family members, शेजारीपाजारी, त्यांचे नातेवाईक, आमचे नातेवाईक, सहकारीवर्ग, डायलिसीस क्लिनिकमधले डाॅक्टर्स, नर्सेस, technicians, सोबतचे patients, अगदी ward boys, आया, नातवाची babyseater मावशी, घरकामाला येणा-या ताई-मावशी माणूस कोणीही असो एकदा संपर्कात आलं की तो संपर्क टिकवायचेच भाऊ. ओळख मैत्री याहीपलिकडे एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होयचं लोकांचं त्यांच्याशी. ताईमाईच्या कित्येक मैत्रिणी भाऊंना अगदी सख्खा बाप आणि जिवलग मित्र मानायच्या... मनापासून. माझे मित्र भाऊंशी सतत संपर्कात असायचे, ते भाऊ माझे वडिल आहेत म्हणून नाही तर त्यांचं त्यांचं हे एक वेगळंच नातं होतं.

आपल्याकडे नोकरी करताना कामासाठी परदेशवारी करणं अजूनंही प्रगतीचं प्रमाण मानलं जातं, किंवा चांगलं काम करणाऱ्यालाच कंपनीही कामासाठी परदेशवारी करायला पाठवते. माझा मित्र अमोलने चारपाच वर्ष आतोनात स्ट्रगल केल्यावर त्याला चांगली नोकरी मिळाली होती, त्यातून त्याला जेव्हा पहिल्यांदा जपानला जायची संधी मिळाली तेव्हा त्याने ऑफिसमधून तडक आमचं घर गाठून सगळ्यात पहिल्यांदा ही आनंदाची बातमी भाऊंना सांगितली होती, त्यानंतर बाकी सर्वांना. भाऊंवर उपचार करणारे डाॅक्टर आंबेकर भाऊंबद्दल भरभरुन बोलायचे, म्हणायचे लाखातंही एखादा असा patient मिळत नाही. दवाखान्यात कायम हसतमुख जाणारे भाऊ तिथेही कायम मजामस्करी करायचे. अगदी काऊंटरवरच्या कॅशियर मुलीही त्यांच्यासोबत मस्करी करायच्या. बाकीचे patients आपली भीती, राग, प्रेम भाऊंकडे बोलायचे, कुटुंबाबद्दल, करीयरबद्दल मनमोकळ्या गप्पा मारायचे, one day का असेना भाऊंसोबत trips plan करायचे. Ward boys, Nurses, Technicians हे सगळे लोक आपापल्या अडचणी भाऊंसोबत शेअर करायचे, भाऊ जमेल ती आणि जमेल तशी मदत करायचे या सगळ्यांना. कोणाला पैसे दे, कुणाशी मनमोकळं बोलून ताण हलका कर, कुणाचं लग्न ठरवायला मदत कर. या सगळ्यांच्या घरचेही भाऊंना चांगले माहीत होते. इंग्लंडला गेल्यावर तिकडून परत येताना हॉस्पिटलच्या पूर्ण स्टाफसाठी लक्षात ठेऊन त्यांनी काही ना काही गिफ्टस आणले होते. त्यांच्या सोबतच्या patientsना नैराश्य येऊ नये म्हणून भाऊ त्यांच्याशी बोलायचे, धीर द्यायचे, मजा मस्करी करायचे, मनातली भीती घालवून motivate करायचे. डाॅक्टरही भाऊंचं डायलिसिस झालं की बऱ्याचदा त्यांना बसवून घेयचे आणि आग्रह करायचे,”बसा ओ रुद्राके सर, कोल्ड काॅफी घेऊन जा”. नातेवाईक मित्रमंडळी सगळे घरी भाऊ आहेत म्हणून चक्कर टाकायचे. तरीही खर सांगायचं तर भाऊ कोणाशीही अकारण गोडगोड बोलत नव्हते, मधाचं बोट लावत नव्हते. ओठात एक पोटात एक असं त्यांना कधी जमलं नाही, मनात येईल ते स्पष्ट नि फटकन बोलून मोकळे होयचे. कोणाला राग येईल का, वाईट वाटेल का असला विचार करत नव्हते ते बोलण्याआधी. समोरच्यावर जसं मनापासून प्रेम करायचे तसेच हक्कानं बोलायचे. कधी कधी तर आम्हालाच टेंशन येयचं की कोणीतरी फटकून उलट उत्तर देईल कोणालातरी आवडणार नाही पण या सगळ्यांचं भाऊंवरंही तितकंच प्रेम होतं, कोणी कधीही मनात राग वगैरे ठेवला नाही. भाऊंचा आपला स्वतःचा असा Aura होता. ते आजारी असले की त्यांना बरं वाटावं म्हणून मनापासून नवस बोलणारी मित्रमंडळी होती. १९९८ साली जीवावरचं दुखणं झालं तेव्हा ते जकात खात्यात काम करत होते. जकात नाक्यावर येणारे जाणारे ड्रायव्हरसुद्धा भेटायला घरी येयचे, एका ट्रान्स्पोर्टरने दवाखान्यात येऊन त्यांच्या केसाची बट कापून नेली होती म्हणाले होते मी बालाजीला चाल्लोय तुमचे केस वाहून येतो, नक्कीच बरं वाटेल साहेबांना माझा पक्का विश्वास ए. आमचा भाडेकरु दुकानदार भेटायला येतानाच १० हजार घेऊन आला होता. जबरदस्तीने पैसे घरी ठेऊन जाताना म्हणाला होता, “पैसे emergency लागू शकतात, नाही लागले तर परत द्या नाहीतर वापरा”. बाकी त्यांचे मित्र आमचे मित्रमैत्रिणी सगळे होतेच आणि त्यानंतरच्या सगळ्याच आजारपणात सगळे त्यांच्यासोबत उभे होते. नोव्हेंबरमध्ये अचानक तब्येत गंभीर झाल्यावर शेवटचे दोन दिवस दवाखान्यात तळ ठोकणारी मित्रमंडळी शेवटच्या क्षणापर्यंत भाऊ बरेच व्हावे म्हणून प्रार्थना करत होती. तशीच गरज पडली तर मला व्हेंटीलेटरवर कधीही ठेऊ नका सांगणाऱ्या भाऊंना शेवटी व्हेंटीलेटरवर ठेवल्यावर माझ्याशी वर्षानुवर्ष न बोलणारा माझा मित्र मला बजावून सांगत होता काहीही होऊ दे, कुणाल आपण व्हेंटीलेटर नाही काढायचा, कितीही दिवस लागू दे... आपल्याला भाऊ हवेत. काहीही झालं तरी भाऊ बरे होऊन परत आपल्यात यावे ही वेडी आशा होती त्या सगळ्यांना. भाऊंशी सगळ्यांचं शब्दांपलिकडलं नातं होतं, माणसं जोडणं टिकवणं हे भाऊंना लीलया जमलेलं होतं, त्यांनी ती सगळी नाती शेवटच्या श्वासापर्यंत टिकवली.
डॉक्टर आंबेकरंच काय तर डॉक्टरांच्या पत्नी, आंबेकर म्याडमचाही जबरदस्त कनेक्ट होता भाऊंसोबत. आता काहीच होऊ शकत नाही, रुद्राके सर वाचणं almost impossible ए हे डॉक्टरांनी सांगितल्यावर, म्याडम एकापाठोपाठ एक पर्याय सांगत होत्या, म्हणाल्या रुद्राके sir is a fighter, आपणंही quit नाही करायचं ते येणार यातूनंही बाहेर.
भाऊ गेल्यावर थोड्या दिवसांनी डॉक्टर भेटले तेव्हा कडकडून मिठी मारुन म्हणाले मला, “सॉरी कुणाल, मी नाही काही करु शकलो, आमचं आख्खं हॉस्पिटल including all the staff & patients शॉकमध्ये आहे. रुद्राके सर मला father figure होते. आपली अडचण ऐकून घेऊन त्यावर सारासार विचार करुन स्वतःचं मत देण्यापेक्षा खरंच काय चांगलं काय वाईट हे समजवून सांगणारं वडिलधारं माणूस सोबत असणं फार महत्वाचं असतं. तू नशिबवान आहेस असा माणूस तुला बाप म्हणून लाभला. रुद्राके सर was a fighter, he didnt quit till the very end, we are lucky he was a part of our lives”
परवाच आमच्या शेजारच्या काकांच्या वर्कशाॅपमध्ये काम करणारा बिहारी कामगार “गगन” आला होता. त्याचा भाऊंशी जाम कनेक्ट होता, जेव्हा जेव्हा ईथे येयचा तेव्हा तेव्हा भाऊंकडे येऊन भरभरुन गप्पा मारायचा, येताना दारातूनंच मोठ्यानं आवाज देयचा भाऊऽऽऽ म्हणून. परवाही दारातून त्याने तशीच हाक मारली... भाऊऽऽऽ भाऊ गेल्याचं सांगितल्यावर त्याच्या डोळ्यात टच्चकन पाणी आलं... पद्मा आपण माणसंच तर कमवली आयुष्यभर असं नेहमी म्हणायचे भाऊ.
मी काॅलेजमध्ये असताना मजेमजेत एकेकाला अवाॅर्ड दिले होते एक वर्ष. त्यात मला मॅग्नेट ऑफ द ईयर अवॉर्ड दिलं होतं, पण आमच्या घरातलं खरं मॅग्नेट भाऊ होते... त्यांच्या तुलनेत मी १०%सुद्धा नाही जमवू शकत हे सगळं.
म्हटलं ना माणसं कमवायचं, जोडायचं आणि नाती टिकवायचं कसबंच असावं लागतं.. प्रत्येकालाच नाही जमत... भाऊंना जमत होतं, शेवटच्या श्वासापर्यंत
भाऊ


No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...