Friday, September 18, 2020

वर्कफ्राॅमहोम

 


माझ्या पूर्ण काॅर्पोरेट करीयरमध्ये ज्या लोकांना वर्कफ्राॅमहोम करायला मिळतं त्यांचा मला उघड उघड हेवा आणि सुप्त आसूया वाटत आलीये. माझ्याच नाही तर माझ्या कित्येक मित्रांच्या आणि कलिग्जच्या भावना तंतोतंत सेमंच होत्या. मागच्या आठवड्यातंही सरकारने आवाहन करण्यापूर्वी वर्कफ्राॅमहोम मिळायला हवं राव असाच सगळ्यांचा सर्वदूर सूर दिसत होता. पण तेव्हा हे वर्कफ्राॅमहोम प्रकरण एक आठवडा किंवा फारफार तर १० दिवस करावं लागेल असा सगळ्यांचा आडाखा होता. शिवाय वर्कफ्राॅमहोम करुन बाहेर खायला प्यायला आणि उनाडक्या करायलाही थोडीफार फ्लेक्झिबिलीटी राहील असं कित्येकांनाच वाटत होतं. पण पहिल्या २-३ दिवसातंच चित्र स्पष्ट झालं आणि वर्कफ्राॅमहोम तर करायचंच पण बाहेर जाणं आणि बाकीच्या टाईमपासवर पूर्णपणे आणि कडक निर्बंध आले तसे एकेकाचे धाबे दणाणले. एकमेकांना फोन करुन वाॅटसॅप ग्रुपवर मेसेजेस करुन चाचपणी होऊ लागली. दिवसभर घरी बसतो पण संध्याकाळी गाडी काढून चक्कर टाकतो राव एखादी असं काही मित्र बाकीच्यांना सांगू लागले.

अशातंच २२ मार्चच्या जनता कर्फ्यूची घोषणा झाली आणि मग मात्र एकेकाला वाटू लागलं की बाहेर पडण्यावर पारंच बंदी येणार. मग वाॅटसॅपवर लोकांनी अक्षरशः उच्छाद मांडला. दिवसभर काय करायचं हा गहन प्रश्न सर्वांना पडला होता. तरी बरं हा जनता कर्फ्यू सार्वजनिक सुटी म्हणजे रविवारी करायचा ठरला होता. लोकांनी नाकातोंडात पाणी घुसायला लागल्यासारखं तडफडायला सुरुवात केली. कदाचित नाकातोॅडात पाणी शिरायला लागल्यावरंही माणूस एका क्षणी हातपाय मारायचे सोडून देत असेल पण वाॅटसॅप बहाद्दर निम्मा रविवार गेला तरी शर्थीने पूर्ण दिवस काय करायचं या देश पातळीवरच्या गहन समस्येवर निरनिराळे उपाय सुचवतंच राहीले. माझ्या वयाचे म्हणजे पस्तीशी ओलांडलेले कित्येकजण ज्यांनी आयुष्यात दोन पानंही अभ्यासाच्या पुस्तका व्यतिरिक्त वाचली नसतील ते हजारो पानी पीडीएफ रुपी फुकटची पुस्तकं पाठवू लागले. काॅपिराईट, लेखक प्रकाशकाचे वेळ कष्ट पैसा यातलं काहीच त्यांच्या निरागस मेंदूला पुसटसंही स्पर्शून गेलं नाही. तुमचं वाचन नाही म्हणजे तुमच्याकडे पुस्तकांच्या हार्ड काॅपीज असण्याची शक्यताच नाही आणि त्याला कोणाची हरकत असायचं काहीच कारण नाही. पण तुमच्या हातात स्मार्ट फोन आहे ज्यावरून तुम्ही नाॅट सो स्मार्ट मेसेजेस भसाभसा पाठवत राहता त्याच स्मार्ट फोनवर कित्येक फ्री ॲप्स आहेत, ईसाहीत्य सारखी फ्री पुस्तकं देणारी वेबसाईट आहे वाचकांसाठी. ते डाऊनलोड करा किंवा तुम्हाला स्वतःला वाचायचंच नाहीये पण बाकीच्यांची काळजी वाटत्येत तर त्यांना या ॲप्सची यादी पाठवा फारतर, फुकट पुस्तकं कसली वाटता लेखक प्रकाशकांच्या परवानगी शिवाय? फ्री साठी हे पर्याय आहेत. त्याशिवाय हवं असल्यास विकतंही डिजिटल कंटेट मिळतं पण जे कंटेट फ्री नाही तेच फुकट मिळावं हा अट्टहास का आहे हे मला कधीच कळलं नाहीये.

बरं या कार्यकर्त्यांना जर विचारलं की गेल्या जवळपास दोन हजार रविवारांमध्ये तुम्ही कोणकोणत्या रविवारी भरीव किंवा मिनिंगफुल म्हणता येईल अशी कामं केलीत किंवा पुस्तकं वाचलीत तर धड चार रविवार सांगता यायचे नाहीत. बरं रोजंही हे अशा कोणत्या अत्यावश्यक सेवा पुरवत असतात किंवा अशी किती कामं करतात की एका रविवारमध्ये मी काय करु असा प्रश्न पडत असावा?

बोअर झालं राव, वेळ कसा घालवायचा कळतंच नाही असं वर्कफ्राॅमहोम वाले म्हणायला लागले की मला कम्माल वाटते. पाच दिवसांचा वर्किंग वीक असणाऱ्यांना रोज किमान साडे नऊ ते दहा तास वर्किंग असतं. घरुन काम करत असल्याने आणि वर्च्युअली सगळं जगंच सध्या लाॅकडाऊनमधून जात असल्याने कामाचा ताण तसा कमी असेल असं गृहीत धरला तरी त्या १० तासातले किमान ५ तास काम असायलाच हवं. सध्या अगदी कॅटरीना कैफच्या घरातंही कामवाली बाई नाही हे आतापर्यंत आपण सर्वांनीच कुठे न कुठे विडीयोमधून बघितलंच असेल. तर आपल्या घरी घरकाम करणारे मदतनीस सध्या आपल्याला उपलब्ध नसल्याने फक्त गरजेचं म्हणजे अगदी रोजचं झाडलोट फरशी पुसणे, भांडी घासणे, किचन ओटा आवरणे आणि स्वयंपाक करणे ही कामं घरातल्या सर्वांनी वाटून घेतली तर त्यात किमान दोन अडीच तास जातात. साधारणपणे प्रत्येकाच्याच घरात किमान एक आणि जास्तीत जास्त दोन लहान मुलं आहेतंच (काही अपवाद वगळता). त्यांना एंगेज्ड ठेवणं, थोडा अभ्यास घेणं, खेळणं यात किमान तीनेक तास जातातंच. हे सगळं मिळूनंच साडे दहा तास झाले. याउपर सगळ्यांकडेच स्मार्ट फोन, काहीजणांकडे स्मार्ट टिव्ही स्वस्तातलं इंटरनेट आहे. वाॅटसॅप फेसबूक युट्यूब नेटफ्लिक्स अमॅझाॅन हाॅटस्टार आणि ढीगभर ॲप्स वगैरे हे तुम्ही नेहमीच वापरता. कित्येकांचा ॲवरेज स्क्रिनटाईम चार-पाच तास आहे. साडे पंधरा तास झाले. आठ तास झोप, साडे तेवीस तास... उरलेला आर्धा तास व्यायाम करा किंवा काय हवं ते करा. व्यायाम करायचाच म्हटलं तर खरंतर या शेड्युलप्रमाणे आर्धा तास कमीच पडतोय, बघा कुठून आर्धा तास काढता आला स्वतःसाठी तर.

याहून दिवस कसा घालवायचा हा प्रश्न पडतंच असेल तर, एकतर तुम्ही वर्कफ्राॅमहोम असून करायला हवं तेवढं वर्कफ्राॅमहोम करत नाहीये किंवा तुम्हाला मुद्दलातंच वर्किंग अवर्समध्ये काम कमी असतं किंवा नसतंच (कंपन्यांनी सध्या लोकांचे वाॅटसॅप फेसबूक फिड बघितले तर बऱ्याचजणांना मोठ्ठी सुटी मिळू शकते.) किंवा तुम्ही घरचं काडीमात्रंही काम करत नाही, तसं असल्यास ते बिलकुलंच भूषणावह नाही.

माझं विचाराल तर मला कणभर या आयसोलेशनचा त्रास होत नाहीये. उलट मला जो रोज किमान साडे तीन ते चार तास प्रवास करावा लागतोय तो कमी झालाय. कित्येक दिवसांपासून स्नूझ केलेले वाचनाचे आणि पिक्चर बघण्याचे प्लान थोडेथोडे तरी अंमलात आणता येताहेत. रात्री उशिरा झोपलेलं चालतंय. पोरांसोबत वेळ घालवतोय कोणाची खूपंच आठवण आलीच तर व्हिडीयो काॅल्स आहेत, काॅनकाॅल आहेत. शिवाय दिवसभर पुरेल असं स्वतःचं आणि आॅफिसचं काम आहे. वर्क अवर्स फ्लेक्झिबल झालेत, कामं भरपूर असली तरी जशी येतील तशी निपटवतोय, घरची स्वयंपाक सोडता बाकी सग्गळी कामं रोज करतोय. खरंतर जे जे करायचंय त्यासाठी वेळ आणि एनर्जी पुरत नाहीये

आपण नशिबाने, आईबापाच्या पुण्याईने आणि आपापल्या कर्तृत्वानेही सुखवस्तू कुटुंबातले लोक आहोत. तीन आठवडे तर ठिकंच पण सहा महिने लाॅकडाऊन झालं (ज्याची शक्यता नाही) तरी आपल्याला खाण्यापिण्याची ददात असणार नाहीये. महागाई भडकली तरी आपल्या सेविंग्जमधून आपण यातून निभावून जाऊ. हातावर पोट असणाऱ्यांचं काय, रस्त्यावर राहणाऱ्या भटक्यांचं भिकाऱ्यांचं काय, छोटे व्यवसायिक कसे तरतील यातून, त्यांच्याकडे कामाला असलेल्यांचा कसा पगार करतील, यातून बाहेर पडल्यावर कसे धंदे उभे करतील परत? जे गरीब लोक कामाधंद्यासाठी पुण्यामुंबईत, महानगरांत आलेत कामाला आणि आता परत जाता येत नाहीये शिवाय खायलाही काही नाही, बसेस ट्रेन बंद आहेत, अर्ध कुटुंब गावाकडे काळजी करतंय किंवा इथेही बायकापोरांची उपासमार होत्येय, ज्यांना सरकारकडून होणाऱ्या अनाऊंसमेंटस नीट कळत नाहीयेत आणि जे पॅनिक होऊन कुटुंबासाठी खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लायनीत गर्दीत उभे राहतायेत, एकेकटे राहणारे म्हातारे कोतारे कसं काय खायप्यायच्या गोष्टी अन औषधं मिळवतील, आपल्या लहान लहान पोरांनाही कसं आपण छान हात धुवायला शिकवलंय, त्यांचे व्हिडीयो बनवलेत, कित्येकजण हात धुताना नळ तसाच चालू ठेवतात, पाणी वाहत राहतं, उन्हाळ्याच्या तडाख्यात ज्यांच्या लेकरांना धड प्यायला पाणी मिळायची शाश्वती नाही ते कसे वारंवार हात स्वच्छ धुतील, ज्यांच्या घरी अत्यावस्थ रुग्ण आहेत, ज्या रुग्णांना नियमित दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय नाही ते काय करतील, पोलिस, डाॅक्टर्स, नर्सेस, वाॅर्डबाॅईज, आया, बॅंक कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारे सगळेचजण पुरेशा पर्सनल प्रोटेक्टीव्ह ईक्विपमेंटस शिवाय कशी कामं करतील? डोकं विचार करुन भण्णं होतंय.

माझी बहीण इंग्लंडमध्ये राहते तिकडे लागण झालेल्यांचा आकडा दणादण वाढतोय, ती राहते त्या एरीयात परवा २६ पाॅझिटीव्ह रुग्ण सापडलेत. दुसरी बहीण पुण्यातंच असते पण बॅंकेत काम करते, बॅंका अत्यावश्यक सेवांमध्ये येतात. ती रोज कामाला जात्येय. काळजी घ्या एवढं सांगण्याव्यतिरिक्त दोघींसाठी काहीही करु शकत नाही. नोकरी सोड असं सांगणं सोपं असतं पण व्यवहारीक नाही.

उत्तर नसलेले प्रश्न डोक्यात पिंगा घालत राहतात. काळ कठीण असला तरी माझ्यासारख्या वर्कफ्राॅमहोम करु शकणाऱ्या पैसे राखून असणाऱ्या नोकरदार लोकांसाठी बाकीच्यांपेक्षा निश्चितंच उपाय खूपखूप सोपा आहे. घरी बसणे हा उपाय बाकीच्या वंचित अन अपरीहार्यतेपोटी बाहेर पडावं लागणाऱ्या लोकांच्या तुलनेत माझ्यासाठी तरी एखादी दैवी देणगी आणि स्वतःला रीबूट करायच्या संधी सारखाच आहे.

बोअर होणाऱ्यांनी पूर्ण डोळे उघडून अन थोऽऽऽडे काळजाचे दरवाजे किलकिले करुन विचार केला तर सद्दपरिस्थितीबद्दल परत कधी तक्रारीचा सूर लावणार नाहीत... कधीच.

मित्रांनो जान है तो जहान है असं आपण म्हणू शकतो कारण यातून जीव वाचल्यावर आपल्याला जगण्याची अन कुटुंबाला जगवण्याची भ्रांत असणार नाहीये.

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...