दीर्घ
अन असाध्य आजारपण साधं नसतं. भयंकर विलपाॅवर लागते आणि शिवाय ती कायमंच टिकवून
ठेवावी लागते. कमीजास्त होतेच कितीही प्रयत्न केला तरी पण विलपाॅवर संपलीच तर
आजारापेक्षा जास्त आपणंच आपल्याला मारु लागतो.
२०१०
साली सगळं व्यवस्थित चालू असताना माझ्या चालत्या फिरत्या वडीलांच्या एका रात्री
अचानक पोटात दुखु लागलं. आईला वाटलं रात्री झोपताना मिल्कशेक प्यायल्यामुळे दुखत
असेल. सकाळी उठल्यावरंही दुखणं कमी होईना म्हटल्यावर मी भाऊंना घेऊन आमच्या फॅमिली
डाॅक्टरांकडे गेलो. त्यांनी तपासून सांगितलं की पोट जरा कडक लागतंय तू ताबडतोब
भाऊंना सोनोग्राफी करायला घेऊन जा, मी चिठ्ठी लिहून देतो. डाॅक्टरांकडून बाहेर
पडल्यावर पोट दुखायचं जवळपास थांबलंच म्हणून भाऊ घरी जायचा हट्ट करु लागले, मी
दामटूनंच घेऊन गेलो सोनोग्राफीसाठी. त्यात मीही तापाने फणफणलो होतो. सोनोग्राफी
केल्यावर पित्ताशयात खडे झाल्याचं कळलं. दुसऱ्या दिवशी सर्जरी प्लान झाली.
प्रीसर्जरी सगळ्या टेस्टस केल्या गेल्या फिटनेस चेक करण्यासाठी. रात्री टेस्टसचे
रीपोर्ट पाहून डाॅक्टर पूर्णपणे चक्रावले, भाऊ स्वतःच्या पायावर चालत हाॅस्पिटलमध्ये
आलेत यावर त्यांचा विश्वास बसेना. सर्जनने तात्काळ सांगून टाकलं, सर्जरी उद्या
करता येणार नाही आणि बाकी गोष्टी तुम्हाला तुमचे डाॅक्टर एक्सप्लेन करतील. रात्री
उशिरा डाॅक्टरांनी येऊन सांगितलं, क्रिएटीनीन १०+ आणि ब्लड युरीया १००+ झालीये.
क्रिएटीनीनची नाॅर्मल रेंज ०-१.५ आणि युरीयाची २०-४० असते. आता हे दोन्ही घटक
लवकरात लवकर ॲक्सेप्टेबल रेंजमध्ये येणं पहीलं आव्हान होतं आणि मग सर्जरी. शिवाय
सर्जरीनंतर पेनकिलर्स वगैरे देण्यावर आतोनात बंधनं येणार होती. एक दिवसापूर्वी
पित्ताशयाची सर्जरी मोठी असली तरी किरकोळ असते हे सर्वांना माहीत होतं आणि ती
झाल्यावर चार दिवसात हाॅस्पिटलमधून घरी जाणार असं वाटत होतं.आता अचानक ती सर्जरी
बाजूलाच पडली होती आणि प्री व पोस्ट सर्जरी किडनी फंक्शन कसं पूर्ववत करता येईल हे
भयानक अवघड आव्हान डाॅक्टरांसमोर होतं. भाऊंच्या किडनीज जन्मतःच पाॅलिसिस्ट
असल्यामुळे म्हणजेच हा आजार क्राॅनिक असल्यामुळे किडनीचं कार्य पूर्ववत होण्याची
शक्यता धुसर होती.
चारेक
दिवस डायलिसिस करुन क्रिएटीनीन आणि युरीयाची लेवल खाली आणून सर्जरी केली गेली.
सर्जरी नंतर पेनकिलर्स देण्यावर बंधनं असल्याने पुढचे दोन दिवस आतोनात यातना
सोसल्या त्यांनी. तेव्हा माहीत नव्हतं की ही एका न संपणाऱ्या आजाराची सुरुवात आहे.
जी
भीती होती तेच झालं भाऊंचं किडनी फेल्यूअर झालं. आता जगण्यासाठी शेवटपर्यंत
डायलिसीस करणे हा एकंच मार्ग होता किंवा फारतर ट्रान्सप्लांट.डायलिसीस चालू
झाल्यावर पहिले काही महिने भाऊंसकट आमच्या सगळ्यांचाच त्याला रेझिस्टंस होता कारण
एकदा डायलिसीस चालू झालं की ते परत थांबवता येत नाही असं कळलं होतं. हळूहळू भाऊंची
आणि आमची मानसिक तयारी होत गेली. तरी आम्ही वेगवेगळे डाॅक्टर्स, वैद्य शोधत रहायचो
बुद्धीला पटत नसलं तरी काहीतरी चमत्कार होईल अशी आशा मनात ठेऊन. सुवातीला पंधरा
दिवसाला एक डायलिसीस करता करता झपाट्याने फ्रिक्वेंसी वाढत गेली. शेवटचे दोन वर्ष
आठवड्यात तीनदा म्हणजे दिवसाआड डायलिसीस असायचं. चार तास हातात दोन सुया खुपसून
झोपून रहायचं. ब्लडप्रेशर फ्लक्चुएशंस, इलेक्ट्रोलाईट इंबॅलंस होत रहायचं डायलिसीस
चालू असताना. डायलिसीस झाल्यावर वेल्क्रोच्या दोन पट्ट्या हाताला करकचून बांधल्या
जायच्या. त्या पुढच्या किमान सहा ते आठ तास सोडता येत नव्हत्या. हात कोपरात वाकवता
यायचा नाही. तळहाताला मुंग्या यायच्या, हात जड व्हायचा, दुखायचा. चुकून वेल्क्रो
ढिले केले तर भळाभळा रक्तं वाहायला लागायचं, धावतपळत पुन्हा दवाखाना गाठावा
लागायचा. कधी नीडल आऊट जायच्या, हात सुजायचा, काळानीळा पडायचा. शेवटी शेवटी ब्लड
प्रेशरचे फ्लक्चुएशंस नेहमीच होऊ लागले, प्रत्येक डायलिसीसला. सततच्या
डायलिसीसमुळे हृदय कमजोर झालं होतं. पोस्ट डायलिसीस बीपी ६०/९० वगैरे व्हायचं. घरी
आल्यावर पायाखाली उंच उश्या घेऊन पडून रहावं लागायचं. दर तासादोन तासांनी बीपी चेक
करत रहायचे.सगळ्यात वाईट म्हणजे पाणी लिक्वीड पिण्यावर बंधनं होती. शरीरातल्या
पाण्याचं प्रमाण काही केल्या वाढू दिलेलं चालायचं नाही. वाढलंच तर धाप लागायची,
जास्तंच वाढलं तर फुफ्फुसं हृदयावर प्रेशर वाढायचं, श्वासंही घेता यायचा नाही.
हृदयाची क्षमता खूपंच कमी झाल्यामुळे पाठ फ्लॅट बेडला टेकवून झोपतां यायचं नाही.
कित्येकदा शरीरात प्रमाणापेक्षा पाणी वाढलं तर रात्रीअपरात्री हाॅल्पिटल गाठावं
लागायचं. लागोपाठच्या दिवशी तीनतीन चारचार डायलिसीस करावे लागायचे. डायलिसीसमुळे
बाकी व्हायटल अवयव हळूहळू कमजोर होत जातात, इन्फेक्शंस फार पटकन कॅच होतात. दोन
डायलिसीसमध्ये जर एखादा दिवस अंतर वाढलं तरी नाॅशिया वाढतो, मळमळ व्हायला लागते,
भूक लागते पण जेवायची ईच्छा होत नाही, ताटावर बसलं तरी जेवण जात नाही, पाणी जास्तं
पिता येत नाही शरीरात कायमंच पाण्याचं अतिरिक्त प्रमाण असल्यामुळे सर्दी खोकल्याचा
त्रास होतो. भाऊंचे तर किडनीसोबत लिव्हरही पाॅलिसिस्ट होतं, त्यात त्यांना डिसेंबर
२०११ मध्ये हिपेटायटीस सी झाली होती, हळूहळू लिव्हर निकामी होत गेलं. पॅनक्रीयाज
एनलार्ज झाल्यामुळे प्लेटलेटस एक लाखाच्या आतंच असायच्या. डायलिसीससाठी रक्त पातळ
करायचं औषध द्यावं लागायचं, अशात कधी एखादी जखम झाली तर रक्त पातळ आणि पुरेशा
प्लेटलेटस नसल्यामुळे रक्तप्रवाह थांबायचा नाही.
हे
सगळं सहन करत साडेसात वर्ष भाऊंनी हसतखेळत डायलिसीस करुन घेतलं. विशेष म्हणजे
सुरुवातीची काही दिवस सोडले तर डायलिसीस करायला ते स्वतः टूव्हीलर चालवत जायचे अन
झाल्यावर स्वतःचं गाडी चालवत यायचे. कधी मी पिक करायला गेलोच तर डाॅक्टर मला
म्हणायचे तुझे बाबा मेंटली जबरदस्त स्ट्राॅंग आहेत, त्यांना कमजोर करु नकोस,
त्यांना इंडीपेंडंटली येऊजाऊ दे. असे पेशंटस रेअर असतात. भाऊ हसतखेळत जायचे यायचे.
मोबाईलमध्ये जुनी गाणी निवडून निवडून प्लेलिस्ट केली होती, हेडफोन लावून गाणी
ऐकायचे, डायलिसीस सेंटरमधल्या टीव्हीवर बातम्या क्रिकेटमॅच बघायचे. डाॅक्टर्स, टेक्निशियंस
आणि सगळ्या स्टाफसोबत चेष्टामस्करी करायचे, स्टाफला लागेल ती मदत करायचे,
डाॅक्टरांच्या फॅमिलीसोबत मस्तं घरोबा झाला होता त्यांचा. डायलिसीस एखादी फारंच
क्षुल्लक गोष्ट असल्यासारखे राहीले ते. माझ्या बहीणीकडे इंग्लंडला जाऊन आले,
तिकडेही हसतखेळत डायलिसीस करायचे.
डायलिसीसच्या
श्येड्युलमुळे तुम्हाला दुसरं काहीच करता येत नाही. आठवड्यातले तीन दिवस प्रत्येकी
किमान चार तास तुम्ही मशिनला बांधले जाता, प्रत्येक डायलिसीसनंतर माणूस अक्षरशः
पिळून काढल्यासारखा ड्रेन आऊट होतो. वाढत्या बीपी फ्लक्चुएशंसमुळे आता जीव जाईल की
काय क्षणात असं कित्येकदा वाटतं. तुमचे डायलिसीस मेटस आजारी पडत असतात, वीक होत
जात असतात, पुढल्यावेळी डायलिसीस सेंटरला गेल्यावर कळतं की आपल्या शेजारच्या बेडवर
नेहमी असणारा आपला मित्र, सहकारी आता परत कधीच दिसणार नाही. एक दिवस आणि कदाचित
लवकरंच आपल्यासाठी राखून ठेवलेल्या बेडवर आपण नसू, दुसरं कोणीतरी असेल. आपण या
आजारातून कधीच बरे होणार नाही, कारण आत्ता चालू असलेलं हे सगळं उपाय नाहीयेत तर
फक्त आजचं मरण उद्यावर ढकलंत राहणार. खूप खूप डीप्रेसिंग असतं सगळं, मानसिक
कणखरतेची भयंकर मोठी परीक्षा असते ती.
आज
विचार केल्यावर वाटतं आज जर भाऊ असते तर या पॅनडेमिकच्या काळात कसं केलं असतं
सगळं. डायलिसीसच्या पेशंटसना कुठलंही इन्फेक्शन पटकन होतं. इन्फेक्शन्स होऊ नये
म्हणून आयसोलेशनमध्ये राहू शकत नाहीत कारण आठवड्यातून तीनदा डायलिसीस केल्याशिवाय
जगणंच अशक्य असतं, मग तीन दिवस हाॅस्पिटलला जावंच लागतं. कसं जमलं असतं हे सगळं?
ज्यांच्या घरात डायलिसीसचे पेशंट आहेत ते कसं करत असतील या काळात? बाकी दुर्धर
आजार असणाऱ्या पेशंटसची काय अवस्था होत असेल सध्या? किती जीव मुठीत घेऊन उपचार करत
असतील, कसं हाॅस्पिटलला येत जात असतील. प्रत्येकाच्या घरी थोडीच. स्वतःची चारचाकी
गाडी असेल. डायलिसीस करताना होणाऱ्या काॅंप्लिकेशंसमुळे हाॅस्पिटलमध्ये ॲडमिट
व्हायला लागणाऱ्या लोकांची शारिरीक आणि मानसिक अवस्था काय असेल सध्या? घरातले लोक
किती प्रचंड भीतीच्या सावटाखाली किती राहत असतील, काय भयंकर मानसिक तणाव असेल. पेशंटस
या काळात कसं मनोबल वाढवत असतील स्वतःचं, जगण्याची उमेद कशी टिकवून ठेवत असतील.
हे
असे विचार मनात आले की खूप कसंतरी होतं. या सगळ्याचा विचारंही करवत नाही.
असहाय्यता ही फार बेक्कार फिलिंग असते.
सगळ्या
दुर्धर आजारांवर उपचार घेणाऱ्या लोकांचे आणि त्यांच्या घरच्यांचे मनोबल टिकून
राहो. More power to you all!
Take
Care!

No comments:
Post a Comment