काल सारखाच आजचा दिवस
धुकं चिरत वर येणारा सूर्य
अन धुकंच चिरत अंगोपांगी रुतणारी थंडी
बर्फासारख्या थंड पडलेल्या वीजेच्या तारा
महापालिकेनं मागल्या आठवड्यात फांद्या छाटल्यानंतर
एकेक करुन बोडक्या झाडावर उगवणारी पानं
नाही म्हणायला.. माणसांची लगबग तेवढी नाही..
चहाचा वास, भांडी पडल्याचा आवाज
गाडी दामटणं, बस पकडायची घाई..
काहीच नाही..
आज रविवार..
रजई, गोधडी, चादर, शालीत..
साखरझोप आज सगळ्यांची
माणसाला कुठं..
हिंडायचंय वणवण..
रोजंच दोन वेळच्या खाण्यासाठी
पिलाची अंडी घरट्यातून पडण्याची भीती नाही
पर्मनंट घर असल्यामुळे घरट्यावर कुऱ्हाड चालण्याचीही भीती नाही
शिकाऱ्याचे बाण नाहीत
छंदाच्या नावाखाली पारध्याचा पिंजरा नाही..
आजी आजोबा, काका काकू अन झालंच तर डे केअर, पाळणाघरं..
कोणी ना कोणी आहे पिलाकडे पाहण्यासाठी..
पिलावर सापानं झडप घालण्याची सतत भीती नाही
जीव मुठीत घेऊन आकाशाकडे झेपावणं नाही
पण.. माणसाला..
पाश आहेत, आपल्या माणसांचे, नोकरी धंद्याचे अन कशा कशाचे
बंधनं आहेत प्रेमाची अन बेगडी समाजाची
माणसाला जात आहे, धर्म आहे.. रंग दिसण्या बिसण्याचा भेद आहे
माणसाला खरंतर माणूसंच असण्याचा खेद आहे
तुझं स्थैर्य, सुरक्षा, सुबत्ता
तुलाच लखलाभ
माणसा तुझ्याकडे बघून का होऊ मी हताश
एकूणंच बरंय माझंच..
माझं मोकळं आकाश.
के पी आर

No comments:
Post a Comment