दोघांचा
आवाज वाढला, ड्रायवरने खाली उतरत प्रशांतच्या बाजूचा दरवाजा उघडून प्रशांतला
हाताला धरुन बाहेर खेचायचा प्रयत्न केला. बाचाबाची वाढली तसे आजूबाजूचे लोक जमा
झाले, सकाळचा ड्रायवरंही लोकांचा घोळका बाजूला करत करत गाडीपाशी पोचला. काय तमाशा
आहे काय म्हणत गर्दी पांगवली, कॅबवाल्याला समजावत ड्रायविंग सीटवर बसवलं,
प्रशांतला सर प्लिज चला मी तुम्हाला ड्रॉप करतो म्हणत बाहेर उतरवलं. प्रशांतंही कसलाही
प्रतिकार न करता बाहेर आला आणि निमूट सकाळच्या ड्रायवरच्या गाडीत जाऊन बसला. पूर्ण
प्रवासात दोघेही एकमेकांशी बोलले नाहीत, प्रशांतचे घर जवळ आल्यावर मात्र ड्रायवरने
न रहावून बोलायला सुरुवात केली.
सर तुम्हाला ऑकवर्ड पोझिशनमध्ये
नाही टाकायचं मला पण सर खरंच काळजी वाटली म्हणून बोललो सकाळी. स्मशानात जाऊन बसताय
सर दिवस दिवसभर, जिथे सामान्य माणूस जायचं टाळतो, जायला घाबरतो, नाईलाज म्हणून
जातो, अगदी स्मशानाच्या रस्त्यावरुन जायचं टळण्यासाठी रस्ता बदलून वेळप्रसंगी
लांबच्या रस्त्यानेही जातो, अंत्यविधीला गेलाच कुणाच्या तर जमेल तितक्या लवकर
तिथून बाहेर पडतो, सगळ्यांना माहीती असतं कि हेच आपलं शेवटचं डेलस्टीनेशन हेच आहे
तरी आपण ईथे कधीच येणार नाही या अविर्भावात स्वतःला फसवत जगतात, होताहोईस्तोवर सगळेचजण
तिथे जाणं टाळतात तेच स्मशान तुम्ही रोज सकाळी उठून धावतपळत गाठता. हे माझ्या
डोक्याबाहेरचंय, विचित्रंय सर हे. का करताय असं, प्लिज नका करु, मानसिक संतुलन
बिघडून जाईल अशानं तुमचं. उद्या तुमच्या ऑफिसमध्ये कळलं कि दिवसभर तुम्ही
स्मशानातून काम करताय तर काय परीणाम होतील याचा तरी विचार करा सर.
इतका वेळ शांत बसलेला प्रशांत खाली उतरता उतरता
म्हणाला मला बरं वाटतं म्हणून मी जातो तिथे. एनीवे थॅंक्स.
सर बरं वाटतं? पण हे असं बरं
वाटणं नॉर्मल नाहीये ना, तुम्हाला एक सांगू का सर म्हणत तो थोडा चाचपडत बोलला कि
स...सर गैरसमज करुन घेऊ नका पण तुम्ही एखाद्या सायकॅट्रीस्टकडे का जाऊन येत नाही?
त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष
टाकत प्रशांत म्हणाला मी वेडा नाहीये, वेडा नाहीये मी. पैसे किती झाले?
रागावू नका सर पण... बरं
जाऊद्या, मी काही पैशासाठी तुम्हाला सोडायला नाही आलोय आत्ता, तुम्ही तर राईडंही
बूक केली नाहीयेत. हे माझं कार्ड ठेवा सर, छोटासा बिजनेस ए आपला ट्रॅव्हल्सचा. कधी
काहीही लागलं तर फोन करा, माझं नाव निलेश आहे म्हणत त्याने त्याचे नील
ट्रॅव्हल्सचे विजिटींग कार्ड प्रशांतच्या हातात दिले.
थॅंक्स म्हणून कार्ड घेत अरे पण
पैसे किती झाले ते सांग ना म्हणूम प्रशांतने त्याला आग्रह केला.
सर प्रत्येक गोष्ट पैशासाठी
नाही करत माणूस म्हणून त्याने कॅब चालू केली.
मग कशासाठी हे...
सर, तुमचं डेस्टीनेशन ते नाही
हे आहे हे सांगायाला, असं म्हणत निलेश हसून निघून गेला.
निलेश गेला पण रात्री उशिरापर्यंत प्रशांतच्या कानात त्याचे
शब्द घुमत राहीले. सायकॅट्रीस्टकडे जाऊन या, ते तुमचं डेस्टीनेशन नाहीये,
ऑफिसमध्ये कळलं तर काय होईल? मानसिक संतुलन बिघडून जाईल अशानं तुमचं. फिरुन फिरुन
तीच ती वाक्य कानात घुमत होती, उत्तरोत्तर आवाजंही वाढत राहीला. डोक्यात घण घातल्यासारखं
वाटत राहीलं ढण्ढण्ढण. त्याने घरातल्या घरात चकरा मारल्या, डोळे मिटून मेडीटेट
करायचा प्रयत्न केला पण डोळे मिटल्यावर कैलासचा कानाकोपरा मिटल्या डोळ्यात घुमत
रहायचा आणि उघडल्यावर कानात निलेशचे शब्द.
त्याने मनगटावरच्या घड्याळ बघितलं
तेव्हा रात्रीचे अडीच वाजले होते. आत्ता उठावं आणि कैलास गाठावं असं त्याला मनोमन
वाटू लागलं. कॅब बूक करण्यासाठी त्याने मोबाईल बाहेर काढला पण परत निलेशंच तर राईड
अँक्सेप्ट करणार नाही ना या विचाराने त्याची राईड बूक करायची हिंमतंच होईना. त्याचं
एक मन म्हणत होतं कि च्यायला कोण हा निलेश, एक कॅब ड्रायवर साधा, काय संबंध
त्याचा, मी काय त्याला आन्सरेबल नाहीये, तो कोण मला कुठेही जाण्यापासून अडवणारा
आणि एका बाजूला निलेशचे शब्द कानावर ढण्ढणा आदळत होते, तुमचं मानसिक संतुलन
बिघडेल, सायकॅट्रीस्टला दाखवा आणि उद्या तुमच्या ऑफिसात कळलं तर हि सगळ्यात जास्त
त्रास देणारी वाक्य होती. कॅब बूक करण्यासाठी परत फोन बाहेर काढल्यावर तो स्वतःशी
पुटपुटला ऑफिसमध्ये कळलं तर? साला हा निलेशंच ऑफिसमध्ये जाऊन काही बोलायचा नाही ना?
हि शंका मनात आल्या आल्या प्रशांतने पटकन फोन खिशात ठेऊन दिला. या सगळ्या गोंधळात पहाटेचे
सव्वातीन वाजून गेले होते. त्याने मनाचा हीय्या करुन ठरवलं साला चालतंच जाऊया,
निघण्याआधी खिडकीचा पडदा ओढून बंद करताना त्याने बाहेर डोकावून पाहीलं, नजरेच्या
टप्प्यात बसणारा पूर्ण रस्ता निर्जन होता, माणूसंच काय एखादं भटकं कुत्रंही दिसत
नव्हतं.
तो घराला कुलूप लावून रस्त्यावर आला आणि नीलाच्या शाळेच्या दारात त्याला
निलेश दिसला, म्हणजे निलेशची कॅब दिसली. भेंचोद हा काय दिवसरात्र मला नजरकैदेत
ठेवतो का काय असं म्हणत तो चटकन दोन पावलं मागे सरकला. नीलाच्या शाळेवरुन
जाण्याशिवाय त्याच्या घरुन जायला दुसरा रस्ताही नव्हता. तो चरफडत परत घरात आला,
धुसफुसत एका जागी बसून राहीला. पंधरा मिनिटांनी खिडकितून डोकावून बघितलं तर रस्ता
परत पूर्णपणे निर्जन होता.
निलेशची कॅब कोपऱ्यावर नव्हती, मनातल्या मनात सुटकेचा
निश्वास टाकत तो परत बाहेर आला, घराला कुलूप लावून रस्त्यावर आला तर परत नीलाच्या
शाळेबाहेर निलेशची कॅब उभी होती. आपल्याला निश्चितंच भास होतोय असं त्याला वाटू
लागलं पण पुढे जाऊन चेक करायची हिंमत होईना. त्याची भयंकर चिडचिड होत होती, काय
करावं ते सुचेना तेव्हा त्याने रागारागात पायापाशी पडलेला एक दगड उचलून कॅबच्या
दिशेने भिरकावला, खळ्ळकन् आवाज आल्या आल्या त्याला त्याची चूक जाणवली. तो
आवाजाच्या दिशेने धावत गेला, नीलाच्या शाळेच्या कोपऱ्यावर आणि पूर्ण रस्त्यावर
कोणीच नव्हते, कोणतीही गाडीही नव्हती, सगळीकडे सामसूम होती. त्याने घड्याळात
पाहीलं तर, सकाळचे सहा वाजले होते. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला होता, शहर
अजून गाढ झोपेत होतं, स्वतःला मिटून घेण्याआधी नीलाच्या शाळेपलिकडची रातराणी
नेटानं गल्लीच्या रंध्रारंध्रात सुवास पेरत होती. डोळे मिटून त्याने रातराणी पूर्ण
दमाने छातीत भरुन घेतली, क्षणात सबंध रात्रीच्या जागरणामुळे आलेली मरगळ कमी
झाल्यासारखं वाटलं त्याला. डोळे उघडून पुढे चालू लागणार एवढ्यात त्याला पायाशी
त्याने भिरकावलेला दगड आणि इतस्तः पसरलेले काचेचे बारीक तुकडे दिसले. कुठेही
काचेची फुटलेली वस्तू, गाडी काहीही दिसत नसताना ईथे काच कशाची फुटली तेच कळेना, जर
एखाद्या गाडीच्या काचेवर दगड लागला तर तो गाडीत जाऊन पडायला हवा, रस्त्यावर दगड
पडलाच कसा काय आणि पडला तर पडला पण मग सेकंदात गाडी गायब झालीच कुठे आणि कशी? कि
हा दगड, या काचा आणि मी हा दगड भिरकावणं हे सगळंच भास आहे? आधीच पूर्ण रात्रभराचं
जागरण त्यात ही असली न उमगणारी अन सुटणारी कोडी. त्याचं डोकं काम द्यायचं बंद झालं
होतं, या सगळ्याचं मूळ आपल्याला कैलासमध्ये जायच्या ईच्छेमध्येच आहे असं वाटू
लागल्याने त्याने कैलासला जाणं टाळायचंच ठरवलं. रात्रभर अंगमेहनतीचं काम
केल्यासारखा तो थकला होता, हा थकवा मानसिक पातळीवरचा जास्तं असला तरी झोपेअभावी
शरीरालाही आता रीबूटची गरज वाटत होती. असं असूनंही घरी आल्यावर त्याला झोप येईना.
रात्रीत घडलेल्या कोणत्या गोष्टी खऱ्या आणि कोणते भास याबद्दल त्याची पुरती गल्लत
होऊ लागली होती, एका पॉइंटनंतर त्याने कसलाही विचार करायचा बंद केलं. साला तो
निलेश म्हणाला तसा आपल्या डोक्यावर परीणाम तर नाही ना झाला, सायकॅट्रीस्टकडे जावं
लागेल का आपल्याला खरंच, बरं खरंच आपलं मानसिक संतुलन बिघडलं असेल तर आपल्याला कसं
कळेल कि आपण सायकॅट्रिस्टकडे जायला हवं? एकामागे एक प्रश्नांची न संपणारी माळंच
समोर येत होती, उत्तर मात्र कशाचंच नव्हतं.
आजचा दिवस फार व्यस्तं होता त्याचा, तीनेक तासाचं वर्च्युएल
इन्स्पेक्शन आणि उरलेल्या वेळात आय.ए.सो. रीसर्टीफिकेशन ऑडिट होतं. दोन्ही
मिटींग्जसाठी त्याला कॅमेरा ऑन ठेवावा लागणार होता त्यामुळे आज कैलासमधून काम करणं
अशक्य होतं. शेवटी आज कैलासमध्ये जायलाच नको, साला त्या निलेशची कटकटंही जरा कमी
होईल असा विचार करुन त्याने घरातल्या डेस्कवर लॅपटॉप अरेंज केला. सगळी कामं उरकता
उरकता संध्याकाळचे चार वाजले, त्याला त्या गडबडीत जेवायचीही शुद्ध राहीली नाही.
कामं गुंडाळून त्याने नेपमीपेक्षा लवकरंच सुटी केली. चांगला मग भरुन कडक आल्याचा
चहा करुन घेतला आणि तो पिता पिता आता कैलासला कसं जावं हा विचार करु लागला. चहा
संपवून काहीतरी मनाशी ठरवल्यासारखा तो उठला, पाण्याची बाटली भरुन घेत घराबाहेर
पडला नि थेट चालायला सुरुवात केली. दोन दिवसांपासून तो कैलासला गेला नव्हता, तिकडे
जाण्याची हि कसली अनामिक ओढ हे त्याला कळत नव्हतं आणि त्याला याचा विचारंही करायचा
नव्हता. चालताना त्याची अस्वस्थता वाढलीये, छातीवर कोणीतरी अवजड वस्तू ठेवून
दाबतंय असं त्याला वाटत होतं. त्याने चालण्याचा वेग वाढवला, छातीतली धडधड वाढण्यापलिकडे
बाकी काहीच झालं नाही. रस्त्याने चालताना त्याला बाकी काहीही दिसत नव्हतं, सगळं
लक्ष कुठे निलेश तर दिसत नाहीये ना यावरंच केंद्रीत झालं होतं. कॅब्जचा महापूर
आलाय आणि आपण तो पार करत, कधी कॅब्ज तुडवत चाललोय आणि सगळ्या कॅब्जच्या
खिडक्यांतून निलेश हात बाहेर काढून आपल्याला मागे खेचतोय, सर जाऊ नका म्हणतोय आणि
आपण त्याला दुर्लक्षून रेटून पुढे चाललोय असं काहीबाही वाटत होतं त्याला. आपण
पूर्ण दुर्लक्ष करतोय हे लक्षात आल्यावर सर तुमच्या डोक्यावर परीणाम झालाय,
सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाऊ का म्हणत निलेश भेसूर हसतोय असं वाटू लागलं तसा तो आणखी
वेगानं चालू लागला, इतकं कि बघणाऱ्याला वाटावं कि धावतोय तो. काही क्षणातंच
कैलासचं गेट ओलांडून तो आत आलाय हे त्याच्या लक्षात आलं तसा छातीवरचं वजन गॅसच्या
फुग्यासोबत उडून गेल्यासारखं त्याला हलकं हलकं वाटू लागलं. तो त्याच्या नेहमीच्या
पारावर जाऊन बसला, म्युट केलेल्या टिव्हीवर जसं फक्त चित्र दिसत राहतं पण आवाज येत
नाही तशी त्याला आजूबाजूची हालचाल फक्त दिसत होती पण कानात कसलाही आवाज येत
नव्हता. तो डोळे मिटून शांत बसून राहीला, तिथे पोहोचल्यावर नेमकं शब्दात सांगता
येणार नाही असं समाधान त्याला जाणवत होतं. किती वेळ गेला कुणास ठाऊक पण अचानक कुणाच्या
तरी आर्त किंकाळीने तो भानावर आला. डोळे उघडून पाहीलं तर आजूबाजूला कोणीही नव्हतं
पण शोकाकूल लोकांच्या ओक्साबोक्शी रडण्याचे आवाज येत होते. तो आवाजाच्या दिशेने
गेला, एक अंत्ययात्रा नुकतीच स्मशानात दाखल झाली होती. तो थेड्या दूरुनंच अंदाज
घेत उभा राहीला. लोकांच्या बोलण्यावरुन कोणीतरी तरुणंच मुलगा गेल्याचं कळलं, अशा
बातमीने कोणीही हळहळेल तसाच तो सवयीनं हळहळला. मृताचे आप्तेष्ट दुःखातिरेकाने
व्याकूळ झाले होते पण त्यात एकजण अगदी शांतपणे मृतदेहापाशी बसून राहीला होता,
त्याच्या डोळ्यात टिपूसंही नव्हता न तो काही बोलत होता, फक्त कोऱ्या चेहऱ्याने मृत
व्यक्तिच्या चेहेऱ्याकडे एकसारखा बघत होता. अंत्यविधीची तयारी होत आली तसं एकेका
जवळच्या व्यक्तिला मृतदेहापासून दूर करणं आणि समजूत घालणं हे मोठं जिकिरीचं झालं
होतं. टाहो फोडणाऱ्या स्वकियांना आवरणं हे भयंकर मोठं आव्हान होतं
अंत्ययात्रेतल्या लोकांसाठी. बाकी सर्वांना स्वतःला आवरा, डोळे भरुन शेवटचं बघून
घ्या वगैरे समजावत असताना त्याला मात्र लोक म्हणत होते आण्णा असं करु नकोस रे,
मोकळा हो, आत दाबून ठेऊ नकोस, त्रास होईल तुला. त्याला कोणीतरी रडायला सांगा रे,
रडायला हवा तो, असं दाबून ठेवणं बरं नाही त्याच्या प्रकृतीसाठी. आण्णा मात्र
शून्यात नजर रोखून बसला होता, मघधूनंच कोणी काय सांगेल त्या यांत्रिक हालचाली करत
होता पण डोळ्यात पाण्याचा थेंब नव्हता. सरण रचून मृतदेह सरणावर ठेवल्यावरंही आण्णा
मूकपणे शून्यातंच नजर लावून होता. आजूबाजूचे लोक आण्णा मोकळा हो रे असं दाबून ठेऊ
नकोस म्हणून विनवण्या करत होते पण त्याने काहीही फरक पडत नव्हता. सगळे नातेवाईक
हवालदिल झाले होते, खांदा गदागदा हलवून आण्णा ए आण्णा म्हणणाऱ्या एकालाही आण्णा
प्रतिसाद देत नव्हता. कोणास ठाऊक काय विचार करुन पण प्रशांत त्याच्या जागेवरुन
पुढे चालत चालत आण्णापाशी जाऊन थांबला. काहीही न बोलता त्याने आण्णाच्या डोळ्यात
पाहीलं, दोन्ही दंडाला पकडून त्याला उभं केलं. ईतका वेळ कोणालाही दाद न देणारा
आण्णा उभा राहीला, त्याला घट्ट मिठी मारुन प्रशांतने त्याच्या पाठीवर हात फिरवला
अन आण्णाने टाहो फोडला. आण्णाचा आवाज उपस्थितांच्या काळजावर चर्र करत घाव करुन
गेला. प्रशांत बाजूला झाला तसा आण्णा मटकन् गुडघ्यावर बसला आणि अनिर्बंध ढसाढसा
रडला. प्रशांत निर्विकार चेहऱ्याने तिथून निघून परत पारावर येऊन बसला, झाडाला
टेकता टेकता तिथेच आडवा झाला. काल रात्रभराचं जागरण, आजचं दिवसभराचं काम आणि सतत
केलेले विचार, भास या सगळ्यामुळे दमलेला तो काहीही कळायच्या आत गाढ झोपी गेला
तेव्हा रात्रीचे सव्वा आठ होत आले होते. तो जिथे बसायचा तो पार स्मशानाच्या एका
टोकाला कोपऱ्यात होता त्यामुळे तिकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ नसायची आणि
म्हणूनंच तो तिथे झोपी गेल्याचं फारसं कोणाच्या लक्षात आलं नाही. ज्यांनी पाहिलं
त्यांना कोणी तरी दारुडा खूप दारु ढोसून तिथे पडलाय असं वाटल्याने त्याला कोणीच
उठवलं नाही. तसंही कोणता सामान्य माणूस स्मशानात कशाला झोपेल तेव्हा कोणाला वेगळी
काही शंका यायला. प्रशांत मध्यरात्रीनंतर जागा झाला तेव्हा सभोवताल लाल पिवळ्या
ज्वाळांनी भरुन गेला होता, गार हवेचा झोत आला तशी एखाद्या चितेपाशी जाऊन बसून उब
घ्यायची अघोरी ईच्छा त्याच्या मनात आली तसा तो मनोमन चपापला, मनात तीव्र अपराधीपणा
दाटून आला आणि अंगावर सरसरुन शहारा आला त्याच्या. दंडापासून मनगटापर्यंत उघडे हात
त्याने चोळले, पारावरुन उठला आणि स्मशानातल्या नळ कोंडाळ्यावर गेला, मोठा नळ सोडून
त्याने थंड पाण्याचे हबकारे चेहेऱ्यावर मारले, पाठोपाठ हातंही धुतले. खिशातला
रुमाल काढून चेहरा आणि हात पुसत तो घाईघाईने कैलासच्या बाहेर पडला तेव्हा पहाटेचे
साडेतीन वाजले होते.
चितेची शेकोटी करायचा विचार मनात आल्यामुळे तो भलताच
अस्वस्थ झाला होता. पुढचा पूर्ण आठवडा त्याने महत्प्रयासाने कैलासला जायचं टाळलं.
त्यानंतरच्या आठवड्यातंही कैलासला जायची अनावर ईच्छा होऊ लागली, ते टाळायचं म्हणून
त्याने मुंबईतल्या एका ट्रेनिंगसाठी स्वतःला एनरोल करुन तीन दिवस मुंबई गाठली. पुण्यात
परत आल्यावर मात्र त्याला काही केल्या कैलासपासून लांब राहवेना, परत त्या दिवशी
झालं होतं तसं छातीवर काहीतरी अवजड वस्तू ठेवून वरुन कोणीतरी दाबल्यासारखं वाटू
लागलं त्याला. बराचवेळ ते दडपण सहन करत तो पुणे स्टेशनवरच्या कमसम कॅफेत तसाच बसून
राहीला. आता छाती फुटून बारीक बारीक तुकडे आजूबाजूल उडतील असं वाटू लागलं, ताण
असह्य झाला तसा त्याने फोन उचलून कॅब बूक केली, नेहमीप्रमाणे ड्रायवरने त्याला
कैलासच्या दारात सोडलं, कपड्याची बॅग, लॅपटॉपची बॅकपॅक घेऊन तो जड पावलांनी चालत
कैलासमधे शिरला, ईकडे तिकडे न बघता तडक पार गाठला. पारावर टेकून दीर्घ श्वास घेतला
नाकात उदबत्त्या, गुलालबुक्का, सुकलेली फुलं, रानफुलं, गवत सगळ्याचा संमिश्र वास
आला, तो घशात अडकून जोरदार ठसका लागला आणि त्याला आपल्या टेरीटेरीत आल्याचं फिलींग
आलं. नव्याने सिगरेट ओढायला लागलेल्या माणसाला जसा पहिल्या कशला ठसका लागतो डोळे
लाल होतात, डोळ्यातून पाणी येतं पण त्याला किक बसते, एक हवंहवंसं डोकं हलकं करणारं
फिलींग येतं तसं त्याला होत होतं. त्याने समाधानाने हसत डोळे उघडले, तब्बल बारा
दिवसैनंतर तो पारावर येऊन बसला होता. शर्टाच्या बाह्या दुमडत तो नळावव गेला, हात
तोंड धुवून एखाद्या साधूने ध्यानस्त बसावं असा तो पारावर येऊन परत डोळे मिटून
बसला. संथ लयीत मगाशी ज्या वासाने ठसका लागला होता तोच वास तो छातीत भरुन घेत
होता, हळूहळू त्याला तो वास हवाहवासा वाटू लागला होता. त्याला परत अपराधी वाटू
लैगलं होतं पण त्याने आज अपराधीप़णाला ओवरपॉवर होऊ द्यायचं नाही असं मनोमन ठरवलं
होतं. थोड्यवेळाने पाठ भरुन आली तशी त्याने कपड्यांची बॅग डोक्याखाली घेत पारावरंच
अंग टाकून दिलं. निरभ्र आकाशातल्या ताऱ्यांची रांगोळी बघत बघत तो गाढ झोपी गेला.
त्या रात्री त्याला कसलीही स्वप्नं पडली नाहीत, दिड आठवड्याने तो शांत झोपी गेला.
सकाळी उठला तेव्हा सव्वा आठ वाजले होते, त्याने हाताच्या बाह्या सरळ करत बटनं
लावली, तोंडावरुन हात फिरवत जागचा उठला, नीलाच्या समाधीपाशी जाऊन प्रसन्न हसला, आय
लव्ह यू म्हणून अर्धा पाऊण तास तिथेच बसून राहीला. मग पारावर बसत त्याने
बॅकपॅकमधून लॅपटॉप बाहेर काढला, काही महत्वाच्या मेल्सला रीप्लाय केले,
सेटींग्जमध्ये जाऊन आऊट ऑफ ऑफिसचे ऑटो रीप्लाइज ऑफ केले. काल रात्री कमसम मधून
पार्सल घेतलेलं सॅंडविच पारावरंच बसून खाल्लं आणि झाडाला टेकत कामाची सुरुवात
केली. दहा वाजले होते, कैलासमध्ये वेगवेगळ्या दहाव्याच्या विधीसाठी नातेवाईकांची
गर्दी झाली होती. लॅपटॉपचा किबोर्ड बडवता बडवता तो अधूनमधून मान वव करुन बघत होता.
कोणाच्या पिंडाला खाती ठेवायचा अवकाश कि वाट बघत असल्यासारखे कावळे शिवत होते तर
कोणाला जराशी वाट बघावी लागत होती. पिंडाला कावळा शिवल्यावर इतकावेळ अस्वस्थता
परावर्तित करणाऱ्या आप्तेष्टांच्या चेहेऱ्यावर सुटका झाल्याचं समाधान दिसू
लागायचं. तुरळक पिंडांना कावळा शिवण्यासाठी जास्त वेळ थांबावं लागत होतं, तोवर घरच्यांची
चलबिचल वाढत होती, अस्वस्थ चेहेऱ्याने येरझाऱ्या घालणाऱ्या नातेवाईकांची आणि
कुटुंबाची अवस्था पाण्याविना तडफडणाऱ्या माशांसारखी होत होती. ते पुढे येऊन मृतात्म्याला
काही बाही करु, कोणालातरी सांभाळू, काळजी करु नकोस आम्ही आहोत वगैरे सांगत होते.
एकेक करत जवळपास सगळ्या पिंडांना कावळा शिवला फक्त एक पिंड स्मशानात कावळ्यांचा
थवाच्या थवा वर घोंघावत असताना तसच्या तसं पडून राहीलं होतं. पहिली दहा पंधरा
मिनिटं सगळे शांत बसले होते, नंतर मग कोणी कोणी कुटुंबातल्या एकेकाला वेगवेगळ्या
सूचना करु लागले. आईची काळजी घेईन सांग रे त्याला, मी नीट राहते काळजी करु नका बोल
गं, बहिणीला अंतर देणार नाही वचन दे, सूचना थांबेनात. या कोणत्याही गोष्टींनी उपायोग
होत नव्हता, कोणीतरी म्हणालं काहीतरी ईच्छा राहीली असणार बघ. घरातल्या एकेकाने पुढे
जाऊन आठवेल तसं काय काय बोलून झालं, काहीही उपयोग होईना. बघता बघता पाऊण एक तास
झाला, घरातले सगळे हतबल झाले होते, किती तरी कावळे वर घोंघावत असताना एकही कावळा
तिकडे फिरकेना, एक दोनदा एक कावळा पिंडापाशी क्षणभर बसला पण पिंडाला न शिवताच परत
उडून गेला. कोणीतरी चटकन म्हणालं अरे थोडं लांब थांबा रे त्या पिंडापाशी जाऊ नका
सारखे, कावळे खाली यायलाच घाबरतायेत. सगळे पटकन मागे सरकले, कोणी झाडाच्या सावलीत बसून
तर कोणी हात पाठीमागे बांधून उभे राहीले. कोणी घोळक्यात उभं राहून एकमेकांच्या
कानांत कुजबुजंत होते. या सगळ्यात आता एक तास झाला होता, स्वतःच्याही नकळत प्रशांत
पारावरुन उठला, चालत चालत त्या कुटुंबापाशी गेला, क्षणभर तिथे थबकला आणि इकडे
तिकडे जणू कोणीच नसल्यागत चालत राहीला ते पिंड ठेवल्या जागी जाऊनंच थांबला.
एवढ्यात मागून कोणीतरी ओरडलं, अरे कोण ए हा मागे सरका सांगितलेलं कळत नाही का, परत
उडले बघा ते कावळे. प्रशांत शांतपणे तिथे उभा राहीला, एकवार मान वर करुन
आभाळातल्या कावळ्यांकडे पाहिलं, एकदा जमिनीवर ठेवलेल्या पिंडाकडे पाहिलं आणि
मनातंच निश्चिंत रहा म्हणाला. सगळे वैतागून त्याच्याकडे बघत असतानाच अचानक एका
कावळ्याने सूर मारुन खाली येत पिंडावर चोच मारली आणि बघता बघता चारपाच कावळ्यांनी
अक्षरशः पिंडावर झडप घातली. प्रशांत मागे वळून न बघता आल्या पावली परत पारावर जाऊन
बसला, समाधानी चेहऱ्याने ते कुटुंब निघून गेलं.
जाता जाता त्या
कुटुंबातल्या काहीजणांनी दूरुनंच हात जोडून तर काही वयस्कर लोकांनी दोन्ही हातांनी
आशिर्वाद दिल्यासारखं केलं त्याच्याकडे बघून. त्याला हे लोक असे का वागतायेत हे
उमगलंच नाही.
कोणीतरी संमोहित
केल्यासारखा तो पारावर येऊन बसला आणि क्षणभरानं खडबडून जाग आल्यासारखा भानावर आला.
आत्ता घडलेला पूर्ण प्रसंग त्याला स्वप्नं किंवा भास असल्यासारखा वाटू लागला. हे
घडलंच नाहीये आपल्याला भास झालाय, उघड्या डोळ्यानं आपण स्वप्न
बघतोय असंच तो स्वतःला समजावत राहीला. या असल्या अंधश्रद्धांवर त्याचा बिलकुल
विश्वास नव्हता, रादर स्पष्टंच सांगायचं तर या अंधश्रद्धांचा
त्याला मनापासून तिटकारा होता. साला हे असलं काहीतरी आपल्याकडून होणं शक्यंच नाही,
हा भासंच होता, हो भासंच होता निश्चित,
तो वारंवार स्वतःला बजावून सांगत होता. तो जितक्या वेळा हा भासंच
होता हे मनातल्या मनात रीपिट करत होता तितक्या वेळा त्याला मगाचा प्रसंग ठळकपणे
आठवत होता, इतका कि आता तो प्रेक्षक म्हणून पारावर बसला होता
आणि तोच प्रसंग परत त्याच्या डोळ्यांसमोर घडत होता. तो स्वतःला चालत चालत पिंडाकडे
जाताना बघत होता, त्याने मनातल्या मनात निश्चिंत राहा
म्हणालेलं त्याला सुस्पष्ट ऐकू आलं. तो फिरुन परत येताना त्याच्या मागे पिंडावर
तुटून पडलेला कावळ्यांचा थवा आणि ते बघून चेहेऱ्यावर समाधान घेऊन तिथून निघालेले
मृताचे नातेवाईक दिसले. निश्चिंत राहा, निश्चिंत राहा
वारंवार त्याच्या कानात स्वतःच्याच आवाजातले शब्द घुमू लागले. त्याचा या कशावरंच
विश्वास बसेना, साला निलेश म्हणतो तसं आपल्या डोक्यावर
परीणाम तर नाही ना झाला? त्याच्या डोक्यात नवा प्रश्न आला.
मग त्याला आठवलं, डोक्यावर परीणाम झालाय असं निलेश वास्तविक
पाहता कधी म्हणलाच नाहीये त्याला. तो फक्त म्हणाला होता कि सर तुम्ही
सायकॅट्रिस्टकडे का जात नाही? डोक्यावर परीणाम झालाय हे
आपणंच ॲड केलंय. आपणंच बिंबवतोय आपल्याच डोक्यात कि आपल्याच डोक्यावर परीणाम
झालाय. झालाय का खरंच? च्यायला असा प्रश्नं का येतोय डोक्यात
आपल्या? नको त्या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधायची नव्हती
कारण एकतर ती चुकीचीच मिळण्याची शक्यता होती किंवा खरंतर प्रश्नंच चुकिचे होते. या
सगळ्या विचारात तो पारावरुन तिरीमिरीत उठला. निश्चिंत राहा, डोक्यावर
परीणाम झालाय हेच फिरुन फिरुन कानात वाजत होतं. त्याने बॅगा उचलल्या आणि अक्षरशः कैलासच्या
दरवाजाकडे धावत सुटला. छातीवर परत एकदा अवजड वस्तू ठेऊन वरुन कोणीतरी दाबल्यासारखं
वाटू लागलं त्याला, तसा त्याने धावण्याचा वेग अजूनंच वाढवला.
कैलासच्या बाहेर आल्यावर ऑटोमॅटीकली कोणीतरी बटन दाबून जादू केल्यागत त्याच्या
छातीवरचा दबाव निवळला. चौकात आल्यावर लोकांची, गाड्यांची
वर्दळ बघून त्याला स्मशानातून बाहेर पडल्याची जाणीव झाली आणि तो धापा टाकत भर चौकात
खाली बसला. लाकडाचा भुस्सा गिळल्यासारखा घसा कोरडा पडला होता, त्याने घाईघाईत बॅकपॅक पाठीवरुन उतरवून त्यातली पाण्याची बाटली बाहेर
काढली, ती रीकामी होती. त्याला दरदरुन घाम फुटला होता,
अंगातला शर्ट पिळून घ्यावा इतपत ओला झाला होता. तो जमेल तेवढा दीर्ध
श्वास घेऊन छातीच्या भात्यात हवा भरुन घ्यायचा प्रयत्न करत होता. एव्हाना कोणीतरी
स्मशानातून धावत येऊन अचानक चौकात बसलाय आणि पाठीवरची बॅग उघडून त्यातल्या वस्तू
बाहेर काढतोय हे लक्षात आल्याने त्याच्या बाजूने लोकांनी घोळका केला होता.
गर्दीकडे बघून उजव्या हाताचा अंगठा वर काढत पाणी द्या म्हणून तो खुणावत होता.
कोणीतरी पाणी देईपर्यंत गर्दीतून वाट काढत निलेश तिथे आला आणि प्रशांतला अशा
अवस्थेत रस्त्यावर बसलेला पाहून पुरता गांगरला. चला चला जरा हवा येऊ द्या, बाजूला व्हा, गर्दी कमी करा म्हणत त्याने गर्दी
पांगवली. प्रशांतचे पाणी पिऊन झाल्यावर बाटली घेऊन गर्दीतल्या ज्या तरुणाची होती
त्याला परत केली. प्रशांतच्या बॅगेची चेन लावत बॅग उचलून पाठीला लावली, कपड्यांची बॅग उचलत असताना प्रशांत त्याला अडवत असू दे म्हणाला. त्याने
प्रशांतकडे एक निश्चयी कटाक्ष टाकून बॅग उचलली आणि चला म्हणाला. प्रशांत
त्याच्यामागे निमूटपणे चालत कॅबमध्ये जाऊन बसला.
पुढचा एक किलोमीटरभर
कोणी काहीच बोललं नाही, मग प्रशांतने तो ऑकवर्ड सायलेंस ब्रेक
केला.
थॅंक यू निलेश
….
मी ॲक्च्युअली, असं म्हणून पुढे काय बोलावं यासाठी शब्दांची जुळवाजुळव करु लागला. त्याचा
स्ट्रगल बघून निलेश म्हणाला असू द्या सर कसलीही स्पष्टीकरणं नकोएत मला आणि अर्थात
मी कोण आहे तुम्ही मला कसलीही स्पष्टीकरणं द्यायला? बाकी
काही नाही पण नशीबाने मी आत्ताच चौकात एक राईड संपवली होती आणि अचानक झालेली गर्दी
बघून मी काय झालंय हे चेक करायच्या कुतुहलापोटी तिथे आलो, बघतो
तर भर रस्त्यात बसलेल्या तुमची ही अशी अवस्था. सर बघवत नाही ही अशी एखाद्या
चांगल्या घरातल्या माणसाची अवस्था. घरी कोण कोण असतं तुमच्या? त्यांच्याशी मनमोकळं बोला एकदा हवंतर, सायकॅट्रीस्टकडे
नाही जायचं हे समजू शकतो पण घरातल्या माणसांशी तरी बोला. सर अशाने काहीतरी विपरीत
होऊन बसेल, माणसानं बोलून मोकळं होणं गरजेचं असतं. सगळ्या
गोष्टी आत दाबून ठेवाल तर प्रेशर कुकर होईल एक दिवस, आणि
प्रेशर कुकरलाही प्रेशर रीलीज करावं लागतं नाहीतर बर्स्ट होतो एकदाच.
प्रशांत शून्यात नजर
लावून शांत बसून ऐकत होता. घर आलं तशी निलेशने गाडी थांबवली. कधी बोलावं वाटलं तर
सांगा सर, मी येईन म्हणाला. प्रशांत गाडीतून उतरला,
खिडकीतून वाकून आत बघत निलेशला म्हणाला सॉरी यार, आणि खरंच थॅंक्स. दोघंही एकमेकांकडे बघत असताना प्रशांतने त्याला विचारलं
घरी येतोस? म्हणजे ये ना चहा घेऊया एकत्र. निलेश काहीही
बोलायच्या आधी नाही म्हणू नकोस यार चल म्हणत निलेश येणार या खात्रीने त्याने
चालायला सुरुवात केली. निलेश रस्त्याच्या कडेला व्यवस्थित गाडी पार्क करुन
येईपर्यंत प्रशांत कुलूप उघडून घरात गेला होता. सोफ्यावर बसलेल्या निलेशच्या
पुढ्यात पाण्याचा ग्लास ठेवून प्रशांतने किचनमध्ये जाताजाता काय घेशील चहा कि कॉफी
विचारलं. काहीही चालेल सर म्हणत त्याने सभोवार नजर फिरवली. तीन पांढऱ्या शुभ्र
भिंती आणि एक निळीशार. मोठ्या खिडकीत ठेवलेल्या फुलांच्या कुंड्या, त्यातली काही फुलं सुकलेली तर काहींनी तग धरलेला. गेल्या काही दिवसांत
त्यांना पाणी दिलं गेलं नसावं. निळ्या भिंतीवर पांढऱ्या रंगाची नाजूक नक्षी
काढलेली, मधोमध एक मोठ्ठा कपल फोटो, पडणाऱ्या
तिला हात देणारे सर आणि तशातंही खळखळून हसणारे ते दोघे. कदाचित ठरवून काढलेला
कॅंडीड फोटो. ही नक्कीच सरांची बायको असणार असं स्वतःशीच म्हणत तो उभा राहत
भिंतीवरची बारीक, सुबक नक्षी न्याहळू लागला आणि तेवढ्यात दोन
कप चहा घेऊन प्रशांत हॉलमध्ये आला.
सर घर सुंदर आहे तुमचं
थॅंऽक्यू!
स्पेशिअली या निळ्या
भिंतीवरची नक्षी आणि चित्रं सुरेख आहेत.
थॅंक्स निलेश, ती सगळी
कलाकारी नीलाची, आय मीन माझ्या बायकोची.
आईशपथ, ग्रेटंच ओ सर. मला वाटलं होतं प्रोफेशनल आर्टीस्टकडून करुन घेतलंय.
प्रोफेशनल आर्टीस्टंच आहेत का मॅडम?
नाही नाही रे, हे आपलं आवड म्हणून.
ओह, भारीच आहे हे सर. मॅडम नाहीत वाटतं आज घरी?
हंमम, नाहीये, ती नसते इथे आता.
इथे नसते? म्हणजे? ओह आय ॲम सॉरी मी फारंच पर्सनल गोष्टी…
नाही रे दॅटस ओके, ती नसते म्हणजे ती गेली साडेचार महिने झाले.
काऽय.. स्स सर सॉरी, तुम्ही
त्यामुळे कैलास…
नाही नाही तसं नाहीये ते
मग, म्हणजे.. तुम्हाला कंफर्टेबल असेल तर… कारण बोलल्याने, म्हणजे फाऽयदा, आय मीन
अरे हो कळलं, एवढा अडखळू नकोस. सांगतो काय झालं ते.
असं म्हणून प्रशांतने
निलेशला नीलाचं जाणं ते कॅबने त्याला चुकून कैलास स्मशानभूमीपाशी सोडणं पासून ते
स्मशानात जायला चाचपडणाऱ्या त्याला स्मशानात वेळ घालवायला कसं आवडू लागलं हे सगळं
सांगितलं.
सर हे कायच्या काय
विचित्र वाटतंय.
आहेच विचित्र अरे.
म्हणजे तुम्हाला कळतंय
तर.
हो, कळतंय पण वळत नाहीये दाद्या.
सर एक बोललो तर रागावणार
नाहीत ना?
बोल बोल, मला माहितीये तू काय बोलणारेस ते.
काय?
तुझा विश्वास बसत नाहीये
या गोष्टीवर असंच ना?
आं, क काय?
नाही ना बसते विश्वास.
हो, म्हणजे नाही… म्हणजे विश्वास बसत नाहीये. पण तुम्हाला कसं कळलं.
अरे या गोष्टी
माझ्यासोबत घडलेल्या असूनंही माझाच विश्वास बसत नाहीये तर तुझा काय विश्वास बसणार.
बाय द वे सगळ्यात जास्तं अविश्वसनीय काय वाटलं तुला? एक
उत्सुकता म्हणून प्रशांतने त्याला विचारलं.
अं.. सग..ळ्यात जास्तंऽ
सांगायचं तर म्हणत निलेशने अडखळत सांगायला सुरुवात केली. सगळ्यात जास्तं हेच कि
तुम्ही कॅब बुक करताना तुमच्या घरचं लोकेशन टाकल्यावर कॅब तुम्हाला कैलास स्मशानभूमी
बाहेर नेऊन सोडते. हे केवळ अशक्य आहे सर.
का अशक्य आहे?
मी गेली सहा वर्ष कॅब
चालवतोय, हि सगळी सिस्टिम टेक्निकली एवढी स्ट्रॉंग
आहे ना कि जीपीएस गंडणं आणि ते ही वारंवार गंडणं हि अशक्यप्राय गोष्ट आहे सर.
प्रशांत जागचा उठून
खिडकीपाशी जाऊन उभा राहीला आणि बाहेर बघत बघत म्हणाला खोटं बोलत नाहीये मी, एक दिवस मी प्रूव करुन दाखवेन तुला निलेश.
सर तुम्ही खोटं बोलताय
असं म्हणायचं नाहीये मला पण..
बरं ते सोड म्हणत
प्रशांतने निलेशचं वाक्य मधेच तोडत खिडकीतून बाहेर बोट दाखवत त्याला विचारलं काय
रे ही मागची काच कशी काय फुटली?
काय सांगू सर तुम्हाला, मध्यंतरी एक आठवडा फुल नाईट केली. एकदा घरी जाताना कोणीतरी कैलास
स्मशानाबाहेर दगड मारला फेकून.
निलेश कैलास बाहेर नाही
म्हणून एक मोठा पॉज घेतला त्याने आणि म्हणाला याऽ पलिकडच्या कोपऱ्यावर.
सर कैलास बाहेर घडला ओ
प्रकार, इथे पलिकडे नाही.
निलेश जऽरा थांब, मी तुला तारीख
आणि वेळंही सांगतो कधी झालंय हे. तो आठवायचा प्रयत्न करतोय हे त्याच्या
चेहेऱ्यावरुन कळत होतं. त्याच दिवशी ऑडीट होतं असं म्हणत त्याने खिशातला फोन काढून
काहीतरी चेक केलं आंनि म्हणाला २४ सप्टेंबर, सोमवार होता.
सकाळचे पाच अठ्ठावन्न झाले होते. तू माझ्या गल्लीच्या कोपऱ्यावर उभा होतास.
सऽर तारीख तर बरोबर
सांगताय, वेळंही कदाचित तीच असेल पण
पण काय निलेश? तू कोपऱ्यावर
गाडी घेऊन उभा होतास. मला कैलासमध्ये जायची जाम अनावर ईच्छा झाली होती. मी याच
खिडकीतून बाहेरचा अखंड रस्ता स्कॅन केला, कोणीही नव्हतं
रस्त्यावर. मग मी कुलूप लावून घराबाहेर पडलो तर कोपऱ्यावर तू दिसलास. आय मीन एकदा
दिसलास, परत गायब झालास आणि परत आलास, जणू माझ्यावर पाळत ठेवत होतास लपूनछपून.
कैलासला जायचं तर तो कोपरा पार करावाच लागणार होता. तू
तिथून हलण्याची चिन्हं दिसेनात, मला भास होतोय कि तू खरंच
तिथे आहेस हे कळेना तेव्हा तिरीमिरीत मी एक दगड उचलला आणि कसलाही विचार न करता
तुझ्या गाडीच्या दिशेने भिरकावला. दगडाने अचूक तुझ्या गाडीच्या मागच्या काचेचा वेध
घेतला, काही कळायच्या आत काच फुटली आणि आपली चूक झालीये हे
मला जाणवलं. मी लगबगीने तिथे आलो पण तोवर तू गेला होतास, क्षणभरापूर्वी
डोळ्यासमोर कार होती पण मी तिथे पोहोचलो तर कसा कोणास ठाऊक तू तिथे नव्हतास,
पण तिथे दगड आणि काचेचे विखुरलेले तुकडे होते.
सर, गोष्ट तर भारी सांगिलीत तुम्ही पण डॉटस् कनेक्ट होत
नाहीयेत. म्हणजे बघा कामधंदा सोडून मी तुमच्यावर पाळत का ठेवेन? कोणतीही राईड
नसताना सकाळी सहा वाजता तुमच्या घराच्या कोपऱ्यावर का थांबून राहीन? आणि जर तुम्ही
फेकलेल्या दगडाने गाडीची काच फुटली असेल तर सर दगड रस्त्यावर कसा, तो तर गाडीत
पडला पाहीजे ना?
एक्झॅक्टली, मलाही तेच वाटलं होतं कि दगड बाहेर कसा पडला?
पण पडला होता खरं.
सर तुमच्या घरचं लोकेशन टाकल्यावर कॅब स्मशानाबाहेर सोडते
हे अशक्य आहे हे मी सांगितलं तेव्हा तुम्ही खिडकीत उभे होता, पुढे काही बोलता
येणार नाही हे लक्षात आल्यावर तुम्हाला विषय बदलायची गरज वाटली आणि तेवढ्यात
तुम्हाला खाली माझी गाडी दिसली, मागची काच फुटलेली. मग काय तुम्ही गोष्ट रचलीत पण
दुर्दैवाने ती खोटी आहे.
डोकं फिरलंय का तुझं, तू आहेस कोण मी तुझ्याशी खोटं
बोलायला. काही कशाला लपवेन मी तुझ्यापासून?
सॉरी सर, पण माझ्या गाडीची काच कैलासच्या पलिकडच्या चौकात
फुटलीये हे मी प्रूव्ह करु शकतो. कारण मी इंश्युरंससाठी अप्लाय केल्यावर त्या
सर्वेयरने समोरच्या दुकानातल्या सीसीटिव्हीवरुन तो प्रसंग डाऊनलोड करुन घेतलाय,
त्यात फक्त काच फुटताना दिसतेय, कोणी दगड फेकला ते दिसत नाहीये. आणि तुमचं म्हणणं
खरं मानायचं तर तुम्ही फेकलेला दगड इथून सहासात किलोमीटरवर जाऊन थेट माझ्या गाडीची
काच फोडू शकणार नाही ना?
परत एकदा आपल्याला भास तर होत नाहीयेत ना असा विचार
प्रशांतच्या मनात येऊ लागला, तो विचार झटकून टाकावा तर आपल्या डोक्यावर परीणाम
झालाय असं वाटू लागलं त्याला.
सर प्लिज गैरसमज करुन घेऊ नका पण मॅडमच्या जाण्यानं कदाचित
तुम्हाला प्रचंड मानसिक धक्का बसलाय, त्या ताणामुळे तुम्हाला भास होत असतील, न
घडलेल्या गोष्टी घडतायेत असं वाटत असेल तर यासाठी तज्ञांची मदत घ्यायला काय हरकत
आहे. बाकी सगळं सोडा सर, कदाचित भास होत नाहीयेत, हे खरंच घडतंय असं जरी आपण मान्य
केलं तरी त्यामुळे तुमचं रुटीन पार डिस्टर्ब होत नाहीये का? त्रास होत
नाहीये?
तुला खरं सांगू निलेश त्रास तर सोडंच पण मला समाधान मिळतं
स्मशानात बसून. तिथे जाण्याला काहीही कारण नसतं पण तिथे गेल्यावर सगळा स्ट्रेस गेल्यासारखं
हलकं हलकं वाटतं.
सर पण हे विचित्र नाही वाटत तुम्हाला? रेग्युलर आयुष्य डिस्टर्ब
नाही होत याने, दूरगामी परीणाम काय होतील याचे, विचार तरी केला आहे का कधी? बाकी
सगळं सोडा पण मॅडम आज असत्या तर तुम्ही हे असं केलं असतं? आणि केलं असतं तर मॅडमला
काय वाटलं असतं. खूप साधेसाधे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले तर तुमचं तुम्हाला
कळेल हे चुकिचं आहे.
अरे यार मला हा सगळा विचार करायचाच नाहीये, खूप दिवसांनी
कशाने तरी समाधान मिळतंय मला, ते मनमोकळेपणानं कसलाही विचार न करता मला घेऊ दे.
पण सर...
हे बघ हे असलं लेक्चर ऐकावं लागतं आणि तू बघितलंस तर टोकतोस
हे टाळण्यासाठी मी अक्षरशः दिवसा ऐवजी रात्री स्मशानात जायला सुरुवात केलीये आणि
आश्चर्याची गोष्ट म्हणजे रात्री तिथे जाणं हे जास्तंच समाधान देणारं आहे, ती
अनुभूती मी शब्दात वर्णन करुच शकणार नाही, रादर मला करायचीही नाही. नाही म्हणायला
काही रेअर अनुभव थोडे.. असं म्हणून तो बोलायचा थांबला.
सर तुम्ही हे थांबवावं असं मला वाटतं म्हणून तो ईतका वेळ
हातात धरलेला चहाचा रीकामा कप टिपॉयवर ठेवत जायला निघाला.
थॅंक्स निलेश.. भेटूया परत, तेव्हा मी पुराव्यासहित सिध्द
करेन कि लोकेशन घरचं टाकलं तरी कॅब कैलासलाच सोडते.
हंह.. मागेही सांगितलं होतं, परत सांगतो सर काहीही मदत
लागली तर फोन करा, नंबर आहे आता तुमच्याकडे माझा आणि हो खरंच सायकॅट्रिस्टकडे जाऊन
या मदत होईल. दिवसरात्र विनाकारण स्मशानात राहणं, स्मशानाची ओढ वाटणं नॉर्मल
माणसाचं लक्षण नाहीये सर. येतो मी.
साला हा निलेश मदत करतो याबद्दल काही वादंच नाही पण जेव्हा
जेव्हा भेटतो तेव्हा डोक्यात किडे सोडूनंच जातो यार. मलाही कळतंय कि, कळत नाही
अशातला काही भाग नाहीये कि स्मशानात राहणं हे काही ठिक नाही, कोणत्याही नॉर्मल
माणसाला स्मशानाचं अट्रॅक्शन वाटणारंच नाही, रादर येताजाता वाटेतंही स्मशान लागू
नये म्हणून दक्षता घेणारी माणसं असतात आणि आपण येता जाता सोडा आवर्जून एखाद्या
मॉलमध्ये... छ्यॅ मॉल नाही एखाद्या योग शिबिरामध्ये मेडिटेशनला गेल्यासारखं
स्मशानात जाऊन बसतोय. स्मशानात बसणं हेच आपलं मेडिटेशन झालंय च्यायला, काय असेल ते
असेल तिथे बसलं कि शांत वाटतं, डोक्यात चांगलेवाईट कसलेच विचार येत नाहीत, कसले
प्रश्न पडत नाहीत, न कशाची चिंता वाटते न काळजी, या भौतिक जगाशी जोडणारे सगळे पाश
सुटून जातात, एखादं बटन दाबून स्वतःला जगाशी डिसकनेक्ट करीवं तशी अवस्था होते,
नाही म्हणायला आपण असतो या जगातंच पण या जगाचे नसतो. नेमक्या शब्दात सांगता येणार
नाही अशी काहीशी विचित्र पण हवीहवीशी, न धड अध्यात्मिक ना निद्रिस्त अवस्था.
जगण्याला क्षणभंगूर का म्हणत असतील लोक काय माहीत, खरंतर मरण क्षणात येतं पण
त्याआधी आणि त्यानंतरंही जगण्याला सीमाच नाही. स्मशानातल्या त्या ट्रांसमध्ये मृत्यूपश्चात
जीवन अनुभवतो कि काय आपण? साला हे नेमकं कसलं स्ट्रेसबस्टर? हा भलताच विलक्षण
प्रकार आहे... कि निलेश म्हणतो तसा विचित्र प्रकार आहे. एवढं मात्र नक्की कि
नॉर्मल नाहीये हे. जगण्या अलिकडे नाही, मरणाच्या पलिकडे नाही, साला कोणत्या
अवस्थेबद्दल बोलतोय आपण, मरणाला क्षणभंगूर म्हणतोय? निलेश म्हणतो तसा डोक्यावर
परीणाम तर नाही ना झाला? फ्फक, निलेश आपल्याला डोक्यावर परीणाम झालाय असं एकदाही
बोलला नाहीये. आ....ह, रागाच्या भरात त्याने टिपॉयवर आवळलेली मूठ दाण्णकन् आपटली
आणि त्या हादऱ्याने निलेशने मगाशी ठेवलेल्या रीकाम्या कपातला चहा उसळून बाहेर आला.
री का म्या कपातला चहा? व्हॉट द फक, हा कप आत्ता दोन मिनिटापूर्वी रीकामा होता,
निलेशने ठेवला तेव्हा आपण बघितलं होतं, कप रीकामाच होता कि आपल्याला भास झाला कप
रीकामा असल्याचा. आपल्या वागण्याचा राग येऊन चहा तसाच ठेऊन गेला कि काय निलेश? पण
मग आपल्याशी बोलता बोलता निलेशने चहाचे दोनतीन घोट घेतल्याचं आपल्याला स्पष्टं
आठवतंय. भेंचोद दोनतीन घोट घेतले असतील तर कपातून चहा उसळून बाहेर येण्याएवढा
काठोकाठ कसा काय भरलेला असू शकतो? साला चहा प्यायलाच नाही का निलेश? पण मग मगाशी
कप मोकळा कसा होता? चहा पिणं हे तर नंतर, निलेश आला होता ना आपल्यासोबत घरी? कि...
तो आल्याचाच आपल्याला भास झाला? हा विचार डोक्यात येताच त्याच्या अंगावर सर्रकन
काटा आला अन पुढच्याच क्षणी त्याला दरदरुन घाम सुटला, मगाशी कैलासबाहेर झाला होता
अगदी तसाच किंबहुना थोडा जास्तंच घसा लाकडाचा भुस्सा, वीटेची भुकटी गिळल्यासारखा
कोरडा झाला. आता काय करावं हे सुचेना तसा त्याने टिपॉयवरचा कपभर चहा घटाघटा पिऊन
टाकला, साला एखाद्या हवाबंद डब्यात जसं काहीही भरता येत नाही तसाच अगदी तसाच चहा त्याच्या
घशातून खाली उतरत नव्हता. या सगळ्याचा त्याच्या मनावर भयंकर ताण आला, कोणीतरी संथपणे
मेंदू पोखरुन आरपार बीळ पाडत असल्यासारखं वाटू लागलं, हातातला कप टिपॉयवर ठेवत पाय
पसरुन तो सोफ्यावरंच आडवा झाला आणि काही कळण्याआधी स्वतःला त्याने झोपेच्या
स्वाधीन करुन टाकलं.
क्रमशः