हे आताशा वारंवार होऊ लागलं होतं, अस्वस्थ वाटणं, छातीवर मोठ्ठा
दगड ठेवून वरून कोणी तरी दाबल्यासारखं वाटणं, घसा अतोनात कोरडा पडणं आणि या अटॅक मधून
बाहेर पडण्यासाठी फक्त कैलास मध्ये जावं वाटणं. कैलास मध्ये गेल्यावर अचानक अगदी
जादू केल्यासारखं बरं वाटणं. हे त्याला आता विचित्र वाटू लागलं होतं. मनातून एक
अनामिक भीती दाटू लागली होती. म्हणजे स्मशानाबद्दल कोणत्याही सर्वसामान्य माणसाला
वाटत असलेली नैसर्गिक भीती त्याच्या मनातून केव्हाच गळून पडली होती पण आपल्याला
सतत स्मशानात जावसं वाटतं, ते आकर्षण वाढतंच चाललंय, कितीही विचार केला तरी हे असं
का होतंय हे लक्षात न येणं याची भीती वाटू लागली होती त्याला. पण त्या भीतीपेक्षा
स्मशानात जाऊन बसण्याच्या ओढीची तीव्रता खूप जास्तं होती. रोजंच आज कैलास मध्ये
जाणं टाळायचंच असं ठाम ठरवूनंही तो कैलास मध्ये जात होता. नुसता जात नव्हता तर
तिथे तास न् तास घालवत होता. तिथे बसणं हे मेडीटेशन पेक्षाही त्याची दैनंदिन गरज
होऊन गेलं होतं. जिवंतपणीच काय तर अगदी धडधाकट असताना स्मशान आपली दैनंदिन गरज
झालंय हा विचार डोक्यात आल्यावर क्षणार्धात भीतीची थंड लाट तळपायापासून मेंदूपर्यंत
उसळायची त्याच्या. सर्वांगातलं रक्त बर्फासारखं थंऽड झालंय आणि आपण एका जागी गोठून
गेलोय, आता कसलीही हालचाल करणं शक्य नाही असं वाटायचं. सर्व शक्ती एकवटून तो जागचा
हलायचा प्रयत्न करायचा अन त्यात यश मिळेपर्यंत पहाटेच्या वेळी पाना फुलावर दव
जमावं तसा त्याच्या पूर्णांगावर थंडगार घामाचा घट्ट थर जमा झालेला असायचा. कैलासला
पोहोचता पोहोचता आत्ताही तसंच झालं, धोधो पावसात चिंब भिजत तो कैलासच्या दारात
येऊन थबकला आणि आत जाणं ही आपली मानसिक गरज आहे जाणवून त्याच्या छातीवरचं दडपण
वाढलं, घसा कोरडा ठाक पडला, पायांना खिळे ठोकल्यासारखे पाय जागचे हलेनात, नखशिखांत
भिजलेल्या अवस्थेतंही त्याला दरदरुन घाम सुटलाय असं वाटू लागलं, छातीत घण
मारल्यासारखी धडधड वाढली. तो महत्प्रयासानं पाय जवळपास खुरडतंच मुख्य गेटाकडे चालू
लागला. प्रत्येक पावलागणी छातीतली धडधड एवढी वाढली कि कोणत्याही क्षणी छाती बॉम्बसारखी
फुटून ह्रदय बाहेर उडेल असं वाटू लागलं. हे सगळं सहन करत तो कसाबसा नीलाच्या गारीपर्यंत
जाऊन पोहोचला. सगळ्यात आधी त्याचा घसा जादूची कांडी फिरवल्यासारखा पूर्ववत झाला,
छातीचा भाता नियमित लयीमध्ये वर खाली होऊ लागला, छातीवरचं मणामणाचं ओझं हवेत कापूर
उडून जावा असं नाहीसं झालं. तो शांतपणे खाली बसतो न बसतो एवढ्यात त्याच्या लक्षात
आलं सर्वांगं पावसाच्या पाण्यानं भिजूनंही घाम सुटल्यामुळे त्याला इतकावेळ गार
वाटत नव्हतं पण त्याची अवस्था पूर्ववत होताच अंगात मुरणारा घाम, पावसाचं पाणी आणि
स्मशानात सुटलेल्या बोचऱ्या वाऱ्यामुळे तो थंडीने अक्षरश: कुडकुडू लागला.
कुठे
बसता येईल याचा अंदाज घेण्यासाठी त्याने आजूबाजूला पाहीलं, कुठे आडोसा दिसेना.
नेहमीच्या पारावर बसावं तर पाऊस आडवा तिडवा पडत होता, त्या अजस्त्र
वडाखालीही पाऊस लागलाच असता. हा आटापिटा कोरडं राहण्यासाठी तर नव्हताच, कारण तो आधीच
ओलाचिंब झालेला होता. फक्त कुडकुडत असताना अजून धोधो पाऊस त्याला अंगावर झेलायचा
नव्हता. दिवसभराचा मानसिक तणाव, दिवसभर पोटात अन्नांचा कण
नाही, नाही
म्हणायला मगाशी एक कप कि दोन कप प्यायलेला चहा आणि गेला पाऊण तास धोधो पावसात भिजत
तुडवलेला रस्ता यामुळे तो थकला होता. शारिरीक थकव्यापेक्षा विचारांनी त्याची
मानसिक परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. आता त्याला त्या पावसात उभं राहवेना, बटन दाबावं आणि
कुठला तरी आडोसा मिळावा किंवा तयार व्हावा असं त्याला वाटू लागलं. मागचा पुढचा
विचार न करता तो समोरच्या शेड खाली जाऊन उभारला. निम्म्याच्यावर. जळलेली एक चिता
तिथे भकाभक धूर ओकत ठराविक वेळेत पूर्ण जळून राख व्हायचं
टार्गेट मिळाल्या सारखं घाईघाईत जळत होती. डोक्यावर पत्रा आणि चारी बाजूने मोकळी
अशी शेड, त्यातून आत येणारा पाऊस आणि सुयांसारखा बोचणारा वारा.
साला वारा तर थांबणार नव्हता पण किमान पावसाचा कमीत कमी मारा लागावा म्हणून तो
जास्तीत जास्त मधल्या बाजूला सरकला.
मागल्या
वेळी चितेची उब मिळवायच्या फक्त विचाराने त्याला धडकी भरली होती, कैलास मधून तो
जीवाच्या आकांताने बाहेर पळाला होता. आज मात्र त्याला काहीही झालं तरी कैलास
मध्येच थांबावं वाटत होतं आणि चमत्कारीक रीत्या तो जसजसा चितेच्या आणखी जवळ जात
होता तसतसं वाढणाऱ्या उबेमुळे त्याला बरं वाटत होतं. आज चितेची शेकोटी करायचं
त्याच्या मनात आलं नसलं तरीही आपसूक तेच झाल्यानं त्याला फार बरं वाटत होतं.
हळूहळू त्याने आकसून घेतलेलं अंग मोकळं सोडलं, त्याच्या देहबोलीतला
अवघडलेपणा कमी कमी होत पूर्ण गेला आणि चक्क त्या चितेकडे चेहरा करुन तो चितेच्या
जेवढ्या जवळ बसता येईल तेवढ्या जवळ जाऊन तो बसला. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून
त्याने आपोआपंच हात पुढे करत ज्वाळांवर शेकले, त्याच्या शरीराची पुढची बाजू
बऱ्यापैकी कोरडी झाली, मग त्याने बसल्या जागेवर फिरुन ज्वाळांकडे पाठ केली.
जवळपास सगळे कपडे पूर्ण कोरडे झाल्यावर त्याचे पाय दुखतायेत, तळपायाला काहीतरी
बोचतंय असं त्याला जाणवलं. पायाकडे बघितलं तर त्याला काही कळेना, परत गोल फिरत त्याने
ज्वाळांकडे चेहरा केला. त्या उजेडात बघितलं तर तळपायातून रक्त येत होतं, पाय चिखलात बरबटलेले
होते, जखमा
नेमक्या कुठे झाल्यात याचा त्याला अंदाजंच येईना. पाय धुतल्या शिवाय ते कळणंही
शक्य नव्हतं. मोठ्या प्रयत्नाने सगळे कपडे कोरडे झाले होते आणि आता परत त्या
शेडमधून बाहेर जाऊन पूर्ण भिजत पाय धुवायचं त्याच्या जीवावर आलं होतं. बसल्या
जागचा न उठता तो तसाच बुड जमिनीवर घसरत घसरत, खरंतर अक्षरशः खुरडत शेडच्या
कोपऱ्यापर्यंत गेला. शेडमधून पाय बाहेर काढत पडत्या पावसात त्याने जमेल तसे पाय
धुतले. परत जागेवर येत पाय ज्वाळांवर कोरडे केले आणि त्याच्या या वागण्याची त्याला
भयानक लाज वाटली, स्वतःची घृणा वाटू लागली. तो चटकन जागचा उठला, त्याच्या अंगावर
सर्रकन् काटा आला.
No comments:
Post a Comment