पत्र आल्याचं बघितलं आणि रेल्वे रुळाच्या अलिकडे उभ्या असलेल्या माझ्या स्तब्ध देहासमोरून एक रेल्वे धडधडत निघून गेली. त्या क्षणी स्तब्ध उभ राहून एका तालात आणि एका दमात डोळ्यासमोरचा पट बदलताना बघत बसणं या खेरीज काहीच नसतं आपल्या हातात. तसंच झालं..
पत्र न उघडता चक्क चुरगाळून भिरकावलं खोलीतच. सगळं संपलं आहे आता हे स्वतःला समजावूनही झालेत बरेच महिने मग हा त्रागा का होतोय? कसला होतोय? का मीच फेकून दिलेलं पत्रं भूत होऊन माझ्या मानगुटीवर बसतय?…
नाही म्हणता म्हणता उघडलं पत्र आणि भिडायचं ठरवलं स्वतःलाच. रागाने तापलेली माझीच कानशिल आणि तितकाच गरम अश्रू. पण एकच. पूर्वी इतकं भडाभडा रडले नाही. हे नवीन होतं मलाच. अगदी लहानपणीची एक आठवण आहे माझी. बागेतल्या एका उभ्या खांबाला लटकत गोल गोल फिरत राहायचे. तासंतास त्या खांबा सोबतचे खेळ खेळायचे. त्या गरगरण्यात केवढी झिंग होती.. पुढे मुंबईत असताना लोकलच्या खांबाला धरून दारात सुसाट वारं खाऊ लागले. ती एक वेगळी झिंग.. खऱ्या आयुष्यात पण असाच एक खांब शोधला होता बहुदा मी… ज्याला घट्ट पकडून आजमावू शकेन स्वतःला.
तो खांब कोसळला भसकन आणि सोबत मी ही..
असो.. पत्र वाचून जरा हसूपण आलंच मला. तुला खरच जमत नाही अजून पत्र लिहायला.. इतकी वळणं घेत घेत कधी बोलायला लागलास तू? “चुकलो मी.. मग? (सगळेच चुकतात)” चा माज पण आहेच.. तरी ‘कशी आहेस? पाशी थांबले आहे मी. मी आहे हेच खूप आहे सद्ध्या. दिल्लीतली आर्ट क्युरेटर फेलोशिप संपवून नुकतीच आलेय घरी परत. मी कशी आहे नाही विचारायचय मला.. तू ही नको विचारूस.
तूर्तास इतकंच..
No comments:
Post a Comment