खरं सांगू? या खरं सांगू नंतर मी घेतलेला पॉज पत्रात दिसत असता तर…
खरं सांगू विचारल्यानंतर डोक्यात आलं नको खरं बोलायला, काट मारुन टाकूया या वाक्यावर. मग परत लक्षात आलं काट मारलेलीही कळेलंच, त्याखालचं खरं सांगू दिसेलंच. त्यापेक्षा हे पानंच डिस्कार्ड करुया दुसऱ्याच पानावर लिहायला घेऊ. पण खूप विचार केल्यावर कळलं आताही आडपडदा ठेवण्यात काही अर्थ नाही, मुखवट्यामागे लपून लिहिण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे खरंच बोलूया.
खरं सांगायचं तर तुला मी जेव्हा पत्र लिहिलं तेव्हा त्याचं उत्तर येईल असं मला आजिबातंच वाटलं नव्हतं. म्हणजे तुला ते मिळेल की नाही आणि मिळालं तर उत्तर देशील की नाही… नकोच त्यात पडायला.
पण, मला वाटलं होतं हे शेवटचं किंवा कदाचित जर ८-१० दिवसांत पत्ता चुकीचाए म्हणून पोस्टमन ने परत आणून दिलं तर किंवा नाही दिलं तर परत एक पत्र टाकून बघूया का? याच्यापेक्षा जास्त विचार मी केला नव्हता. आणि खरं सांगायचं तर असं वाटलं होतं दीड वर्षाचा जो मी उल्लेख केलाय पत्रात त्यावर तू आक्षेप घेशील कारण आपल्याला कुठल्याही प्रकारे शेवटचा संपर्क करुन दीड नाही तर चार वर्ष झाली आणि मागचं पत्र लिहिताना अनावधानानं मी दीड वर्ष लिहून गेलो कारण गेले दीड वर्ष मी विचार करतोय तुला पत्र लिहिण्याचा, पत्र लिहिण्याचाच असं नाही पण कॉंटॅक्ट करण्याचा.
आणि पहिले काही महिने तर मी का करु… मीऽच का करु याच्यामध्ये गेले. त्यानंतरचे काही महीने अकारण माझा राग तुझ्यावर काढण्यात गेले. तुझ्यावर रागवायचा बराच प्रयत्न केला, खूप विचार करुन बघितला काय केल्याने हिला त्रास होईल, हिची चिडचिड होईल, संताप होईल. कॉंटॅक्टंच नाही, एकमेकांना बघतंही नाही, चुकून कुठे दिसतंही नाही, कोणाकडून काही कळण्याची शक्यताही नाही तर हे कसं साधता येईल.
हळूहळू राग निवळत गेला किंवा आपण म्हणूया कि कळत गेलं की तो अकारण आहे. आणि मग सुरुवात झाली की यार चुकलोच आपण हे हळूहळू ॲक्सेप्ट करण्याची. चुकलो याची जाणीव होऊ लागली हळूहळू. म्हणजे डोक्यात आलं की आपण चुकलो का आणि ते ॲक्सेप्ट करण्यात बाकीचा वेळ गेला.
तर हे असं एकूण ॲक्सेप्टंसच्या किंवा उपरतीच्या प्रवासात वर्षदीड वर्ष गेलं आणि लिहिताना डोक्यात तेच असल्यानं चुकून मी दीड वर्षाचा उल्लेख केला.
तुला पत्र लिहीण्या आधी ना बरेच दिवस, बरेच महिने खरंतर असं छातीवर कोणीतरी खूप मोठा दगड ठेऊन दाबतंय असं वाटायचं आणि पत्र पोस्टात टाकेपर्यंत… नाही सांगता येणार मला नेमकं काय. आत्ताच का हा प्रश्न माझा मेंदू सतत कुरतडत होता पण ॲट द सेम टाईम आता नाही तर कधी हा ही होताच. ते लहानपणी ना आम्ही पतंग अडकला ना झाडामध्ये की लिमजर बनवायचो, मांजाच्या एका टोकाला दगड बांधायचा आणि बरोबर जिथे पतंग मांजासाकट अडकला असेल त्याच्यावर हा दगड टाकून एकमेकांत अडकवून एक टोक ओढायचं. आणि हळूहळू पतंगाचा मांजा खाली घेऊन तो काढायचा प्रयत्न करायचा. कधी जमायचं बऱ्याचदा फसायचाही प्रयत्न. आणि आपल्या हातातला दोर तुटून वरच्या मांज्यामध्ये गुंतून दगड आणि मांजा तसाच अडकून राहायचा. येताजाता तो दगड डोक्यावर हलताना दिसायचा. माझ्या डोक्यावर सतत हे दोन प्रश्न हलत होते, आत्ताच का आणि आता नाही तर मग कधी? शेवटी इतक्या वर्षानंतर मनात सगळ्यात जास्त तीव्रतेने येणारा प्रश्न जो होता, कशी आहेस? एवढंच लिहून पाठवलं. उत्तराची अपेक्षा नव्हती त्यामुळे उत्तर आल्यानंतर आता काय लिहावं या विचारानं पुरता गोंधळून गेलो.
ज्या कॅफेत बसून पत्र लिहितोय ना तिथे त्याने गाणी लावलीयेत आणि आत्ताच का आणि आता नाही तर मग कधी या एकूण दोलायमान अवस्थेत असताना माझे पत्र लिहिण्याचे स्किल जेवढे खराब आहेत त्यापेक्षा खराब आवाजात सुशांतसिंग राजपूत विचारतोय के तेरे मेरे बीच मे क्या है? त्या ओळीवर थांबून विचार करायला नको म्हणलं तरी रेंगाळायला झालंच. पुढे काय लिहू हा प्रश्नंही होताच.
हे असं काहीतरी भरकटल्यासारखं लिहिणं झालंय, म्हणजे एकूणात पत्राची सुरुवात असावी, त्यात काहीतरी गाभा असावा आणि मग शेवट असावा हे असं आपल्याला खरंतर चौथीपाचवी मध्ये पत्रलेखनामध्ये शिकवलं होतं.
सुरुवात, गाभा…. शे व ट म्हणजे पूर्ण कसं करु पत्र हा ही प्रश्न आहेच. आणि मग तेवढ्यात परवा अंधाधुन बघितलेला आठवला. त्यात तो आयुषमान स्पर्धेसाठी पियानोची प्रॅक्टीस करत असतो. त्याचा एक पीस कंप्लीटंच होत नसतो, तो बराच प्रयत्न करतो, एका लेवलला आल्यावर त्याला सुचतंच नाही पुढे काय वाजवावं. राधिका आपटेला पहिल्यांदा भेटतो तेव्हा तिला वाजवून दाखवतो आणि ती म्हणते कमाल आहे की. तो म्हणतो नाही पण पूर्ण नाही झाला ना.
पूर्ण नाही झाला? पण सुंदर आहे की हेच.
पण पूर्ण नाही ना झाला.
ती म्हणते पण काही गोष्टी म्हणूनंच चांगल्या असतात ना कारण त्या पूर्ण होत नाहीत, अपूर्ण राहतात. पूर्ण करायच्या नादामध्ये उगाच काहीतरी बोटं घालून खराब करु नकोस.
मला पटलंय ते… प्रत्येक गोष्ट पूर्ण करायचा अट्टाहास करु नये माणसानं.
सध्या तरी इतकंच!
No comments:
Post a Comment