Thursday, January 1, 2026

पत्र लिहिण्यास कारण की - कुणाल

 


मला हे पत्र बित्रं जमत नाही म्हणालो होतो पण तूच पत्र लिहिणं बंद केलंस. फोन हळूहळू कमी होत बंद झाले. नेहमीच्या ठिकाणच्या फेऱ्या तर कधीच बंद केल्या होत्या. भेट होण्याच्या सगळ्या शक्यता संपवून टाकल्या होत्या, तू कि मी यात पडण्यात काहीच अर्थ नाही. मान्य आहे तू फोन, मेसेज केले नाही म्हणून मी ही भेटण्या-बोलण्याचा प्रयत्न करु नये असं नाही पण असो. जे झालं ते कितीही उगाळलं तरी बदलता येणार नाहीये. 

दीड वर्ष मोठा पिरीएड असतो यार पण. दीड वर्षांनी तरी मी का पत्र लिहीतोय? तू तिथेच राहत तरी असशील का? तू कदाचित भेटायचा प्रयत्न केला असशीलही पण मीच काहीही न सांगता घर बदललं, आली असशील तर आय ॲम रीअली सॉरी आणि आली नसशील तर त्यात तुझी बिलकुल चूक नाही. साला कधी कधी कोणीच चुकीचं नसतं पण वेळ चुकीची असते असलं फिल्मी बोलावं वाटतंय पण तू म्हणशील स्वतःच्या चुका झटकून टाकण्यासाठी फिलॉसॉफी सुचतीये. तर असो… 

पत्र लिहिण्यास कारण की, कशी आहेस? काय करतेस सध्या वगैरे विचारणार नाही पण कशी आहेस हे मात्र विचारावं वाटतंय. हे विचारायला इतके दिवस लागले का किंवा आता का आठवण आली किंवा माझ्या या वरवर साध्या वाटणाऱ्या प्रश्नाला तू अजून बरेच प्रतिप्रश्न विचारु शकतेस पण I leave that up to you. तुझी प्रतिक्रिया काय असेल हे ही मीच बोलू लागलो तर म्हणशील किमान मला काय वाटतंय हे तरी माझं मला ठरवू दे.

तर पत्र लिहिण्यास एकमेव कारण हेच की कशी आहेस हे पत्र मिळालं तर नक्की सांग. बोलायची ईच्छा नसली तर तसेही स्पष्ट सांग कारण माझ्या लहरी प्रमाणे सध्या बोलायला नको, भेटायला नको म्हणत एकमेकांची सवय तुटेपर्यंत ताणलं असताना आता अचानक धूमकेतू सारखा समोर येतोय. खरंतर खूप बोलावं वाटतंय पण पत्र अजूनंही जमत नाहीच शिवाय जमलंच तरी तुझं म्हणणं काय आहे हे ही महत्वाचं आहेच नाही का? उगीच आपलं हुक्की आली म्हणून पत्राच्या नावाखाली इमोशनल मोनोलॉग खरडून पाठवण्यात काय हशील. त्यामुळे पत्र लिहिण्याचं कारण की कशी आहेस? 

नवा पत्ता देतोय, पत्र मिळालं आणि बोलायला हरकत नाही असं वाटलं तर नक्की उत्तर पाठव. 


कशी आहेस?


के-११०२, आयकॉन ग्रीनबर्ड

क्वालिटी कॉलनी, सोमवार पेठ

पुणे - ४११००१

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...