Tuesday, September 11, 2018

दोघं - भाग ११




मावळतीच्या सूर्याचे आणि पर्यायाने दिवसाचे आभाळातले उरलेसुरले अवशेष पुसत जसजशी रात्र दबक्या पावलानं येऊ लागते तसं घर स्वतःचा आकार सोडून वासलेल्या जबड्याचा आकार घेऊ लागतं. दिवसभर ज्या घरात मोठ्या प्रयत्नानं मन रमवलेलं असतं तेच घर आता तिला खायला उठतंती हाताला येतील ती सगळी बटनं दाबून सगळ्या घरातल्या लाईट्स लावते. मेनडोअर आतून घट्ट बंद करून घेत हॉलमधल्या खिडकीत येऊन बसते. बाहेर, येणार्या- जाणार्या माणसांनी, गाड्यांनी रस्ता फुलून गेलेला असतो. एकेक गाडी, माणूस, दारात खेळणारी लहान मुलं बघता बघता तिची नजर गेल्या चार महिन्यात जागच्या हललेल्या त्याच्या गाडीवर येऊन स्थिरावते. धुळीच्या जाडंच जाड थरामध्ये त्याची गाडी झाकून गेलेली असते. तिच्या काळजावरंही अशीच आठवणींची पुटं चढलेली असतात. रोज शेकडो वेळा त्यावर बोटं फिरवत तिने "I miss you" लिहून झालेलं असतं. पण तरीही आठवणींचा थर कणभरंही कमी होत नाही. आठवणींच्या थरावर फिरवलेल्या बोटापासून सुरुवात करत ती तास, दिवस, आठवडे, महिने करत करत किती वर्ष झाली ते मोजत राहते. नजर खिडकीच्या बाहेर रोखून ती बोटावर वेळेचं गणित मांडत राहते.

देवापुढे दिवा लावायची वेळ उलटून चाललेली असते. गेली कित्येक वर्षं नित्यनेमाने आणि भक्तिभावाने केलेलं काम आता तिला मनापासून करावसं वाटत नाही. ती तशीच जागेवर रेंगाळते. पलीकडच्या तक्क्याखाली पडलेला मोबाईल फोन उचलून ती contact list मध्ये जाते, एकेक alphabet शोधून ती त्याचं नाव टाइप करते, नावावर क्लिक करून त्याचा नंबर वाचून बॅक बटन दाबून contact list मधून बाहेर येते. परत त्याच्या नावावर क्लिक करते परत त्याचा नंबर वाचून बाहेर येते. हा खेळ बराचवेळ चालत राहतो. तिला मनापासून एकदाच का असेना पण त्याला कॉल करुन बघावसं वाटत राहतं, पलीकडून तो बोलणार नाही नक्कीच हे माहिती असूनही असंच वाटत राहतं. मग ती मोठ्या प्रयत्नाने फोन बाजूला ठेऊन देते. पलीकडेच बैठकीवर त्याच्या नेहमीच्या बसायच्या जागेवर तिची नजर जाते. ती लगबगीनं जागची उठून बैठकीपाशी जाते, बैठकीवर पडलेलं आणि घडीही उघडलेलं आजचं वर्तमानपत्र उचलून रद्दीच्या कप्प्यात टाकून देते. बैठकीवरचं बेडशीट एकसारखं करत झटकून त्यावरच्या छोट्या उशा एका रांगेत लावून ठेवते. त्याला जशी आवडते अगदी तशी बैठक ती चकाचक करते. पलिकडे ठेवलेला लँडलाईन फक्त इनकमिंग पुरता मर्यादित असतो, कधी वाजलाच तर... उचलायचा... मनाविरुद्ध. एरव्ही इंटरनेट बंद पडलंच कधी तर कंप्लेंट करण्यापुरता वापरला जायचा आधी आता तेही कोणी वापरत नाही जास्तं.. मग बंद पडल्यानं फरकंही पडत नाही. शेवटचा आउटगोइंग कॉल कदाचित त्यानंच केला असावा कित्येक महिन्यांपूर्वी असं वाटून ती विनाकारण रिसीव्हर उचलून रिडायलचं बटन दाबते, पलिकडून ऑटोमेटेड आवाज ऐकू आल्यावर रिसीव्हर परत जागेवर ठेऊन देते.

लॅण्डलाइनच्याखाली ठेवलेला त्याचा लॅपटॉप काढून पदरानं पुसते. याआधी कधीच वापरलेला लॅपटॉप आज तिला उघडून बघावासा वाटतो. ती तो फ्लॅप उघडते, फ्लॅप उघडलेल्या बंद लॅपटॉपकडे बघता बघता जमिनीवर मांडी घालून बसते. लॅपटॉपच्या बंद स्क्रीनमध्ये तिला तो दिसतो.. चष्मा लावून लॅपटॉप मांडीवर घेऊन बसलेला. नाकावर चष्मा थोडासा खाली ओढून कानात इयरफोन लावून पिक्चर बघणारा तो आपल्याच नादात मोठ्यानं हसतो, पलिकडे तीही असते. काय लावलंय, रात्रीचे बारा वाजलेत बंद करा तुमचं ते डबडं म्हणून ती हातवारे करत असते. इयरफोनमुळे त्याला ऐकू येत नाहिये हे कळाल्यावर तीशुक शुक करून मोठ्यानं आवाज देते, तो तिला सांगतो तू झोप मी पिक्चर संपल्याशिवाय झोपणार नाहिये. ती त्याला करून आवाज देत उगाचंच चिडवत राहते. तो हनुवटी एका हाताच्या तळव्यावर टेकवून पुढचा पिक्चर बघत राहतो. ती कूस बदलते आणि लॅपटॉपच्या बंद स्क्रीनवर दिसणारे ते दोघे तिला दिसायचे बंद होतात. ज्या कीबोर्डवर कायम त्याची बोटं फिरली त्या कीबोर्डवर त्याच्या हाताचे ठसे उमटल्याचा भास होतो तिला. मग ती प्राणपणानं तिचा तळहात त्या कीबोर्डवर ठेऊन त्याच्या तळहाताच्या रेषांशी स्वतःच्या तळहाताच्या रेषा जुळवायचा प्रयत्न करते. तिला बघायचं असतं की अजून किती काळ हे असं त्याच्याशिवाय एकट्यानं जगायचंय. या प्रश्नाचं उत्तर तिला काही केल्या हवं असतंसैरभैर होत ती हात कीबोर्डवरून फिरवत राहते.

त्याच्या तळहाताच्या रेषा कीबोर्डवर तर दिसत नाहीत पण डोळ्यात साठवलेल्या असतात तिने. त्याचा हात आपल्या हातात घेऊन कित्येकदा बोललेली असायची ती, "सायबा, एवढा मऊ कसा काय तुमचा हात? आणि ती आयुष्यरेषा बघा लांबच लांब आहे. काळजी करू नका". हे वाक्य बोलल्यानंतर प्रत्येकवेळी हसणारी ती आता मात्र स्वतःचा तळहात भानातून गेल्यासारखं निरखून बघत राहते. तळहाताच्या रेषा ठळक होत होत वाऱ्यावर धूळ उडून डोळ्यात जावी अशा डोळ्यात खुपू लागतात. इतकावेळ स्पष्ट दिसणारा हात धूसर होत जातो. ती तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये झाकते, तिचे अस्फुट हुंदके त्या तळव्यांवर विरून जातात. तिला मोठ्याने रडावंसं वाटत असतं, वाटतं आपला आवाज पोहोचेल त्याच्यापर्यंत पण ती तसं करत नाही, तळव्यावर विरलेल्या हुंदक्याला ती बाहेर पडू देत नाही

डोळ्यांच्या कडा टिपत ती सभोवार नजर फिरवते, संपूर्ण घर तिला एकाकीपणाच्या रंगात रंगल्यासारखं वाटतं. तळमजल्यावर खेळणार्या नातवाला ती आवाज देते, तो आपल्याच नादात बागडत राहतो. ती अगदीच एकटी नसते घरात, दिवसभर खेळून दमलेली नात निरागस चेहर्याने गाढ झोपलेली असते पण खरं सांगायचं तर तिचा एकाकीपणा हा घरातल्या माणसांच्या संख्येनेशी निगडीत नसतो. बरं माणसंही तिची स्वतःची असली तरीही त्याच्या जाण्यानं झालेली पोकळी ही भरून येणारी नसते. तिची भिरभिरणारी नजर फिश टँकवर स्थिरावते. त्यातले सगळेच मासे त्यानं आणि तिनं मिळून आणलेले असतात. मासे शांतपणे टँकच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहत असतात. दिवसभर त्यांचा तोच खेळ चालू असतो. दिवसरात्र पोहूनंही ते एकाच ठिकाणी असतात. तो गेल्यापासून तिला तिचं आयुष्य त्या माशांसारखं झालंय असं वाटतं असतं, कितीही काहीही झालं तरी ते पुढे जातंच नसतं, तो गेला त्या क्षणापाशी तिचं आयुष्य थांबून राहिल्यासारखं कॅलेंडरची पानं पलटून परत ती तिथेच जात राहते. ती संमोहित झाल्यासारखी नजरेनंच माशांच्या हालचाली टिपत टँकच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत डोळे फिरवत राहते.

तो खेळ थांबवून मग ती उठून देवघरात जाते. सकाळी तिने पूजा करून मांडलेले सगळे देव जसेच्या तसे त्याच जागेवर असतात. त्यांच्या पुढ्यातल्या छोट्या वाटीत नैवेद्यासाठी ठेवलेले साखर फुटाणे तेवढे नातवानं येताजाता लांबवलेले असतात. आता जे काय करायचं ते या लेकरांसाठीच असं काहीतरी पुटपुटत ती देव्हार्याखालची काडेपेटी, अगरबत्ती आणि तेलाची लोटी काढते. दिव्याची वात वर ओढत तेलानं दिवा भरून वात पेटवते. तेवता दिवा चेहर्याच्या जवळ अगदी जवळ आणते, चेहर्याच्या आरपार डोळ्यातल्या पाण्यापलिकडे त्या देवाला दिसेल अशी एक वेड़ी आशा असते मनात. दिवा, अगरबत्ती लावून यांत्रिकपणे ती जागेवर ठेवते तेव्हा देव्हार्यातल्या एकातरी देवाला हाताला धरून बाहेर काढून समोर उभं करावं नि दोन्ही खांद्यांना धरून गदागदा हलवत त्याला विचारावं की किती दिवस असा निर्जीव असल्याचा आव आणणारेस, किती दिवस मुक्यानंच बघत राहणारेस, किती दिवस तू निर्गुण निराकार आहेस म्हणून मी स्वतःचं खोटं समाधान करुन घ्यायचं, किती दिवस जळी स्थळी काष्टी पाषाणी, चराचरात तूच आहेस म्हणत राहायचं मी? अजून किती दिवस माझ्या देवाशिवाय जगायचं मी? मोजून किती लिहिलेस श्वास माझ्या नशिबात? असं ओरडून ओरडून विचारावंसं वाटतं. ती तशीच बसून राहते बराच वेळ.

माहितीये तुला भरल्या घरातलं रितेपण काय असतं, आपल्या माणसातलं एकटेपण काय असतं? कसं वाटतं मध्यातंच हात सुटल्यावर अन पुढे एकट्यानंच नेमका किती रस्ता चालायचाय हे माहितीही नसल्यावर. आयुष्यभर कष्ट उपसताना जगायला जमलेल्या माणसाचं चांगले दिवस आल्यावर मनसोक्त जगण्याआधी आयुष्यच संपून जातं तेव्हा मागे राहणार्या साथीदाराची हतबलता, असहायता काय असते कळेल तुला कधी? मेलंय तुझ्या जवळचं कधी कोणी, झालीये कधी संपणारी ताटातूट? कसं कळेल मग तुला? विचारू नकोस कोणाला चुकलंय हे? किमान तुला तरी जन्म मरणाचा फेरा नाही म्हणे ना? खोटं खोटं सांत्वन तर नकोच आता, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. देव्हार्यास्मोर बसून या सगळ्या उद्वेगाला मनातल्या मनात वाट करू देत असताना वार्याच्या झुळुकेवर फडफडणारा दिवा पाहून ती भानावर येते आणि सवयीनंच दोन्ही हाताची ओंजळ दिव्याभोवती धरते. लख्ख उजळलेल्या ओंजळीत तिला परत तो दिसतो. ती देव्हार्याकड़े बघते अजूनंही सगळे देव निर्विकार चेहर्याने जागच्याजागी बसलेले असतात. ती सवयीनं डोकं टेकवून जागची उठते. घड्याळाचे काटे खाऊन खाऊन पोट टच्च करून सुस्तावलेल्या अजगरासारखे हळूहळू पुढे सरकत असतात. तीही पायाला मणामणाचं ओझं बांधल्यागत देव्हार्यापासून दूर जाते

तिथून निघताना त्याच्या वॉर्डरोबचा दरवाजा उघडून आत व्यवस्थित घड्या करून एकावर एक रचलेले कपडे बघते. त्यानं दवाखान्यात जाण्याआधी म्हणजे चालता फिरता असताना शेवटचा घातलेला शर्ट दिसतो तिला. हास्पिटलचे कपडे अंगावर चढवण्याआधी काढून लेकाच्या हातात देत धुवायला टाक घरी जाऊन सांगितलेलं असतं त्याने. च्यायला हे हॉस्पिटलचे कपडे घालायलाच पाहिजे का म्हणत वैतागलेला तो आठवतो तिला. कपाटातला तो शेवटी घातलेला शर्ट ती बाहेर काढते. जणू तो त्या शर्टमध्ये असल्यागत मायेनं त्यावरून हात फिरवते, शर्ट स्वतःच्या अंगावर टाकून घट्ट मिठी मारते. आता तिला हुंदका आवरत नाही. इतकावेळ प्राणपणाने दाबून ठेवलेलं बाहेर पडतं. ती मोठ्यानं हंबरडा फोडते. कामावरून नुकताच येत घरात पाऊल टाकलेला लेक, तिचा आवाज ऐकून आल्यापावली तिच्या शेजारी जाऊन बसतो. डोक्यावरून हात फिरवत तिला कवेत घेतो, मनसोक्त रडू देतो. लेकाच्या मिठीतून बाहेर येता म्हणते ती, "कडक इस्त्री केल्याशिवाय कपडे घालत नव्हते रे कधीच, रूमाल सुद्धा इस्त्री करून खिशात ठेवायचा माझा राजा. हॉस्पिटलच्या कपड्यावर जीव गेला, ना आंघोळ घातली ना कपड़े बदलले, हॉस्पिटलच्या चादरीत गुंडाळून नावाला पायावर दोन तांबे पाणी ओतून माती केली रे आपण"... पुढे एकंही शब्द बोलता लेकाच्या मिठीत स्फुंदत रहते ती. लेक बाजूला होत तिचे डोळे पुसतो परत एकदा डोक्यावरून हात फिरवतो. ती आसवांना बांध घालत डोळे कोरडे करते, पण ते ओसरणं नसतं, आतल्या आत परत साठत राहतं, कधीही बांध फोडून आवरण्या पलिकडे पूर येऊ शकेल अशा नदीसारखे तिचे डोळे दिसत राहतात. ती सोंबरलेल्या डोळ्याने आणि जडावलेल्या डोक्याने परत एकदा खिडकीत येऊन बसते.

थोड्यावेळाने जेवताना कोरड्याठाक घशातून एकेक घास खाली ढकलणं कठीण होत जातं. प्रत्येक घासाला तोटरा बसू लागतो मग ती पाण्याच्या घोटासोबत दोनचार घास पोटात ढकलते आणि निर्विकार चेहर्याने नजर शून्यात रोखून बसते. जसजशी रात्र चढत जाते तसतसा आजूबाजूच्या आंधारापेक्षा तिच्यात अंतर्बाह्य आंधार साठून राहतो. डोळे बाहेरच्या अंधाराला सरावतात पण आतल्या आंधारात तिचं मन चाचपडंत आठवणींशी झगडत राहतं. तिला तो आंधार बाकी कशाहीपेक्षा शाश्वत वाटत राहतो. वाटतं या काळोखाच्या डोहात देहाची नाव सोडून द्यावी आणि परतून येऊच नये, डोहाच्या माधोमध गेल्यावर नाव सोडून उडी मारावी आणि खोल खोल जात तळ गाठावा आयुष्याचा. वर आलाच तर फक्त देह यावा, आपण बुडून जावं कायमचं. आजंच व्हावं हे, अगदी आत्ताच... नको बघायला उद्याचा सूर्य, नको परत ते दुष्टचक्र. काळोखाच्या गर्भातून खोल खोल तळाशी पोहोचल्यावर कदाचित दिसेल आपल्याला वाट, जी त्याच्यापाशी घेऊन जाईल परत. तो परत दिसल्यावरंच उजळून जावं अस्तित्व. अंथरूणावर पडल्या पडल्या घरभर नजर फिरवते ती, तिला ते तिचं घर वाटतंच नाही. भिंतीवर टांगलेल्या घड्याळाची टिकटिक थांबलेली असते, तासनतास घड्याळ एकंच वेळ दाखवत राहत. जहाल विषासारखी रात्र क्षणोक्षण तिच्यात भिनत राहते. एकामागून एक आठवणींचे कढ येत राहतात, बांध फुटतो, ती आसवं थोपवत नाही, अश्वत्थ जखमेसारखी डोळ्यातून आसवं भळभळत राहतात. आठवणींचा शीणवटा तिला पेलण्यापालिकडे असतो. ती जडावलेल्या पापण्यांनी आणि शीणलेल्या मेंदूने स्वतःला झोपेच्या स्वाधीन करून टाकते तेव्हा रात्रीचा प्रवास वेगानं दिवसाच्या दिशेने चालू झालेला असतो. आठवणीत स्वतःला अशी गुरफटून झोपते ती की उगवणाऱ्या दिवसाचा उजेड तिच्यापर्यंत पोहोचतंच नाही.

नाईलाजाने डोळे उघडते तोवर उजाडलेलं असतं, तिच्या नव्या दिवसावर सूर्य एकाकीपणाची किरणं फेकत असतो. घरातला एकेकजण आवरायला सुरुवात करतो, प्रत्येकजण पुढे पुढे चालायचा प्रयत्न करत असतो अन तेव्हाच तिचं मन पायाला चाकं लावल्यासारखं वेगानं भूतकाळाकडे निघालेलं असतं. तिला पुढे जाण्यात स्वारस्य नसतं, मनाच्या कोपर्यात कुठेतरी तिचं आठवणींचं गाव असतं, त्या गावत मधोमध त्या दोघांचं घर असतं. मिटल्या डोळ्यांना ते दोघे त्याच घरात एकत्र दिसत असतात. ते एकत्र असतात तिथे लख्ख उजेड असतो. घराचा कानाकोपरा त्याच्या अस्तित्वानं उजळून गेलेला असतो. तेवढं एक ठिकाण सोडलं तर तिच्या उघड्या डोळ्यांना मात्र सर्वदूर भेदता येणारा काळोख पसरलेला दिसतो. ती रहावून डोळे मिटून घेते परत आणि खांद्यावर डोकं टेकवून निश्चिंत बसून राहते. सायबा मला एकटीला सोडून जाऊ नका हा म्हणते तेव्हा उत्तरादाखल तो फक्त हसतो. ती डोळे उघडते, श्वासांची माळ तुटत नाही जगण्याशी जुळलेली नाळ सुटत नाही, डोळे बंद करून बसावसं वाटतं... बंद डोळ्यांना आठवणींशिवाय काहीही दिसत नाही. उघड्या डोळ्यांनी कुठेही बघवत नाही... राहतं घर स्वतःच वाटत नाही कारण तो घरात नसतो. एकट्यानं उपसण्यासाठी कालसारखाच दिवस समोर वासून अस्तव्यस्त पडलेला असतो.

तिच्या पुढ्यात ठेवलेला चहाचा कप गार होत आलेला असतो. तो गेल्यापासून चहासोबत बिस्किट खाणारी ती रोज बिस्किटं सोबत घेऊन बसते. खिडकी उघडून एक बिस्किट हातात धरते धरते तोवर समोरच्या फांदीवर बसलेला कावळा खिडकीच्या गजावर येऊन बसत तिच्या हातातलं बिस्किट चोचीत घेऊन उडून जातो. रोज एकच बिस्किट घेतो परत येत नाही. ती एकट्यानं चहा पिण्याचा सोपस्कार पार पाडते आणि नाईलाजानं उठून दिवसातला एकेक क्षण वेचत राहते, तळहातावरची आयुषयरेषा कणकण तुटत राहते. थेंब थेंब करून तिच्यातला काळोख सभोवताली गळत राहतो, ती आठवणींची काजळी अविरत आयुष्यावर सारवत राहते. घर मोठया जबड्याचा आकार घेत राहतं, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र होत राहते. तिच्या आयुष्याच्या बळकट दोरीमध्येच मान अडकवून तिचा श्वास गुदमरत राहतो. असह्य एकटेपण वागवत काळजात आठवणींची माळ गुंफत पाय खुरडत का असेना पण एक ना एक वाट त्याच्याकडे घेऊन जाईल आपल्याला या एका आशेनं ती चालत राहते... ती एकाकी चालत राहते

केपी आर

Thursday, July 19, 2018

तुमचं लक्ष विचलित करून चोरी करण्याची एक पद्धत असते. मागे दोनजण मिळून बँकेतून बाहेर पडलेल्या माणसाला गाठून मागून आवाज देत सांगायचे दादा शर्टवर कसलीतरी घाण पडलीये, तो माणूस चटकन मागे वळून कुठे? कुठे पडलीये असं विचारायचा;प्रतिक्षिप्त क्रिया. या दोघांपैकी एकानेच हाक मारण्याआधी पार्ले जी बिस्किट चावून तो लगदा त्या माणसाच्या शर्टवर टाकलेला असायचा. मग कुठे म्हणून विचारलं की एकजण त्याच्या खांद्याच्या मागच्या बाजूचा शर्ट पुढे ढकलत ती घाण दाखवायचा. ती घाण बघून हातातली बॅग झटक्यात खाली ठेवून शर्टावरची घाण काढण्यात दादा गुंगायचे आणि ही संधी साधून दोघातला एकजण बॅग उचलून गायब व्हायचा. शर्टावर घाण आहे असं सांगून आपलं लक्ष विचलित करून आपण हातोहात गंडवलो गेलोय हे कळेपर्यंत उशिर झालेला असायचा.
सध्या आपल्याकडे सर्रास ही पद्धत अवलंबून पब्लिकला घाऊक पद्धतीने गंडा घातला जातोय. तुम्ही म्हणाल कसा? तर समाज म्हणून किंवा एक व्यक्ति म्हणूननंही आपल्यासमोर महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत हे स्वतःला विचारून बघा.
रोजगार, शेतमालाचे भाव, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, इंधनाचे भाव, वाढती महागाई, पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, महिलावरचे बालकांवरचे अत्याचार, आरोग्यसेवा, सुरक्षाव्यवस्था, शिक्षण, भ्रष्टाचार, संप, दंगे, प्रदूषण, भेसळ, रहदारी, भेदभाव, बालमजुरी, वाढती गुन्हेगारी, हुंडाबळी यासारखे प्रश्न रोज वाढततंच चाललेत. मोठमोठे वायदे करून सत्ता काबीज केलेले पवित्र सत्ताधीश याबद्दल चकार शब्द काढायला तयार नाहीत. प्रश्न विचारणारे एकतर कॉंग्रेसी म्हणून हिणवले जातात किंवा देशद्रोही म्हणून तरी गणले जातात. बरं ज्यांचा सरकारच्या नाकर्तेपणाला विरोध आहे तेही लोक कशावर बोलणं पसंत करतात? कशावर?
1) भिडेच्या झाडाचे आंबे
2) निरगुडकरानी भिडेची घेतलेली मुलाखत
3) संतापेक्षा मनू एक पाउल पुढे होता हे भिडेचं विधान
4) कॉंग्रेस मुसलमानांचा पक्ष आहे हे मोदींचे विधान
5) डॉक्टरने केलेलं जगन्नाथाच चेकअप
6) साबुदाणा खिचडी
7) धर्माधिकारीचं ओम = mc² विधान
8) वटपौर्णिमेवरचे पांचट जोक्स
9) प्लास्टिक बंदीवरचे किळसवाणे जोक्स
10) योगा डेवरचे पाचकळ जोक्स
आणि बरंच काही.

राजकारणी हुशार असतात ते स्वतः वादग्रस्त पण मूळ मुद्द्याला फाट्यावर मारणारी विधानं करतात किंवा इतर कोणाकडून तरी  करून घेतात. आपण फेसबुकवर whatsapp वर त्याची खिल्ली उडवण्यात आणि एक दिवसाचे like मिळवण्यात धन्यता मानतो. चार दोन टाळकी हसतात वाहवा करतात आपल्याला हुरूप चढतो आपण सतत तेच करत राहतो. मध्यंतरी भिडे त्याचे आंबे याचा वीट येईस्तोवर पब्लिकने चावून चोथा केला, हिडीस जोक्स केले. आता मनूस्मृतीपेक्षा संविधान कसं श्रेष्ठ आहे याचे दाखले देण्यात आपण व्यस्त झालोत. मधेच मोदी आलू सोना वगैरे म्हणतात आपण तिकडे वळतो, संबित पात्रा टीव्हीवर काहीतरी झक मारतो आपण त्याचे Video शेअर करत बसतो. कोणीतरी अमुक एक चित्रपट संस्कृतीला मारक आहे म्हणून बरळतं आपण त्याचं खंडन करत बसतो. हिंदू मुस्लिम वगैरे बिनकामाचे वाद उकरून काढले जातात आपण त्याला बळी पडतो.
हे मुद्दे, ही विधानं हेतुपुरस्सर पेरली जातात आपण कामाचं बोलायचं सोडून यावर चर्चा, वाद प्रतिवाद, मस्करी करत राहतो. मला तरी हे सगळं त्या शर्टावर पडलेल्या कृत्रिम घाणीसारखंच वाटतं आपलं लक्ष विचलित करण्यासाठी जाणूनबुजून आपल्या शर्टावर फेकलेलं..

निवडणुका जवळ आल्यात आपल्याला विचलित करण्यासाठी अजून खूप सारी घाण फेकली जाणार आहे, आपण विचलित न होता ज्या प्रश्नांनी फरक पडतो ते प्रश्न विचारत राहिलं पाहिजे नाहीतर कधी आपल्या शर्टावर घाण टाकून आपल्याला गंडा घातला जाईल हे कळणारंही नाही

क्यू के अगर महत्त्वपूर्ण मामलों से ध्यान हटाते है तो दाग अच्छे नही है

केपी आर 

Tuesday, February 20, 2018

टेक न्यू गोल्ड

आपल्या देशात लोकांना म्हणजे बऱ्याचशा लोकांना भूतकाळात रमायला आणि रहायला फार म्हणजे फार्फार आवडतं. स्वतः काहीही न करता पुराणाचे, भव्य इतिहासाचे गोडवे गाणं, आपल्या अस्मिता त्याच्याशी जोडणं हे यांचं प्राथमिक काम असतं. कोणा थोर पुरुषानं/स्त्रीनं समाजासाठी आयुष्य वेचून अचाट अफाट असं काहीतरी केलेलं असतं आणि हे सर्वश्रुत असलं किंवा आख्ख्या जगाने त्यांच्या कार्याची आणि पराक्रमाची योग्य ती दखल घेतलेली असली तरी हे महाभाग रात्रंदिवस फक्त थोर व्यक्तिमत्वांचा जप, जयजयकार करण्यात आणि त्यांच्या नावाने अरेरावी करण्यात धन्यता मानत असतात. बरं बऱ्याचदा हा जयजयकार अगदी चुकिच्या पद्धतीने केलेला दिसतो, महापुरुषांनी/स्त्रीयांनी जी शिकवण दिलेली असते किंवा जे महान कार्य केलेले असते त्याच्याशी काडीमात्र संबध नसल्यागत हे सगळे बिथरल्यासारखे वागत राहतात आणि याउपर यांचं असं म्हणणं असतं की या दिड शहाण्यांना आपल्या इतिहासाचा जाज्वल्य (?) वगैरे अभिमान असतो. त्यांच्याकडून प्रेरणा वगैरे घेऊन आपण काही करणं तर फार लांबची गोष्ट पण हे महाभाग त्यांचीच नितीमूल्य पायदुळी तुडवत असतात आणि हे यांच्या गावीही नसतं.

अरे किती दिवस आपण फक्त इतिहासावर बोलण्यात, इतिहासात रमण्यात, बेंबीच्या देठापासून फक्त जयजयकार करण्यात आणि एकूणातंच इतिहासाचे गोडवे गाण्यात धन्यता मानणार? किती दिवस आपल्याला आपल्या पूर्वजांची पूर्वपुण्याई पुरणार. तुम्ही स्वतःही काही करणार आहात का फक्त जयंती, पुण्यतिथी, हा ऊत्सव तो ऊत्सव करत गाड्यांच्या सायलेंसरच्या नळकांड्या काढून, कर्णकर्कश्य हॉर्न्स वाजवून, भगवे, निळे, हिरवे झेंडे घेऊन गाड्या उडवत राहणार? आपला आपल्या स्वकर्तुत्वावर बिलकुल विश्वास नाहीये, आपण त्यापेक्षा सोपा मार्ग निवडतो, इतिहासाच्या कुबड्या वापरुन आयुष्यात खुरडत राहतो. बरं कोणी चार चांगले शब्द सांगायला गेलं तर अस्मिता, अभिमान, गर्व बिर्वाचं कार्डं वापरुन त्याला/त्यांना वेठीस धरता येतं, आपल्या भावना तर  कचकड्यापेक्षा नाजूक असतात आणि त्या पापणी लवेस्तोवर दुखावल्या जातात. ज्या महापुरुषांची नावं घेतो आपण त्यांना वर लज्जेने मान खाली घालावी लागत असेल असलं वर्तन करुन आपण आपला निषेध नोंदवतो, दंगे, तोडफोड करतो. शिवाजी, गांधी, सावरकर, आंबेडकर, नेहरु, टिळक यांना आत्ताची परीस्थिती बघायची सोय असेल तर निश्चितंच त्यांना आपण कोणासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं असा प्रश्न पडून लाज वाटत असेल.

मी गेल्या दहाएक वर्षात कित्येक पोरं बघितली जी नेहमी तक्रारीच्या सुरात सांगत असतात की आमच्या फादरला तेव्हा लै चान्स होता राव पैसे कमवायचा, तेव्हा एखादी जागाबिगा घेऊन ठेवायचा पण तेव्हा काय नाय केलं. तेव्हाची अमुकएक संधी एनक्याश करायला बाप कसा चुकला नाहीतर आम्ही कसे आज श्रीमंत वगैरे असतो हे सांगताना हे महाभाग सोयीस्कररीत्या विसरलेले असतात की आपण स्वतः या घडीला काहीच करत नाही, गुड फॉर नथिंग आयुष्य जगतोय. बरं बापानं यांच्यासाठी आयुष्यभर केलेला स्ट्रगल यांना दिसत नाही, वडीलांच्या आजोबाच्या वडीलांचं नाव काय ते माहीत नसतं पण शके १७२० ला काय झालं त्याचे २०१८मध्ये गोडवे गात रीकामटेकडं बसायला यांना जमतं. अरे त्या थोर स्त्री-पुरुषांकडून आदर्श घेऊन तेव्हाच्या गोष्टीतून आज प्रेरणा घेऊन आत्ताच्या काळाशी सुसंगत गोष्टी करणं एवढं कठीण आहे का? बरं राजकारण्यांचं ठीके त्यांना त्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी तुम्हाला भूतकाळात रमवून, भावनांचं, अस्मितांचं राजकारण करणं गरजेचं आहे. असं केल्यानं लोकोपयोगी ठोस कसलीही कामं नाही केली तरी त्यांना त्यांची दुकानं चालवता येतात पण तुमची चूल कशी चालणार? तुमच्या आई-बाप, लेकराबाळांसाठी कोण झटणार?

मायला मोठा लोकप्रिय नेता होण्यासाठी विशेष काहीही काम न करता सतत फक्त आदर्श व्यक्तिमत्वांचा जयघोष करत रहायचं, पुतळे, स्मारकं उभी करायची ते करताना भाषा, प्रांत, धर्म नि जातीपातीचं राजकारण करायचं आणि तुम्हाआम्हालाही त्यात गुंतवून ठेवायचं ही ढोबळ पद्धत होऊन गेलेलीये आपल्याकडे. शाहूफुलेआंबेडकरशिवाजीसंभाजीटिळकगांधीसावरकर यांनी कोणाला अमुकतमुक माझे आदर्श/देव आहेत म्हणत हारतुरे घालून पुजत बसल्याचं ऐकीवात तरी आहे का? त्यांनी वेळ घालवला का या असल्या गोष्टीत? त्यांनी हेच केलं असतं तर आज आपलं आयुष्य कसं असतंय याचा विचार करुन बघा.

कोणीतरी काहीतरी बरळतो आपला माथा भडकतो, मरण्या-मारण्याची, कापण्याची, उडवण्याची भाषा, हातात दगड लाठ्या काठ्या हे सगळं क्षणात चालू होऊन जातं. कोणाही उपटसुंभानं आपल्या थोर व्यक्तीबद्दल अपशब्द उच्चारल्याने काहीही होत नसतं. ते सगळे सूर्य आहेत, वर तोंड करुन कोणी सूर्यावर थुंकायचा प्रयत्न केल्यानं काय होतं हे वेगळं सांगायला हवं का?

हे सगळे थोर लोक थोर होतेच याबद्दल कणमात्रंही शंका किंवा दुमत असूच शकत नाही, कोणीही ते नाकारु शकत नाही आणि नाकारल्यानं काही फरकंही पडत नाही... आज जर का शिवाजी फुले आंबेडकर सावरकर टिळक असते तर त्यांनी काय केलं असतं? ते आमचा एक युगपुरुष होऊन गेला म्हणून ढोल बडवत नसते बसले, रीसर्च-डेव्हलपमेंटमध्ये आपला देश पुढे कसा जाईल, नवनवे शोध कसे लावता येतील, लोकहितवादी गोष्टी कशा करता येतील, बाल्मृत्यू दर कमी कसा करता येईल, साक्षरता कशी वाढवता येईल, रोजचं जगणं कसं सोपं करता येईल यावर विचार केला असता, कृती केली असती. आपापल्या महापुरुषांची वाटणी करुन फुले आमचे टिळक तुमचे, गांधी तुमचे सावरकर आमचे असले धंदे करत बसले नसते.

ओशोच्या एका उताऱ्यातली एकंच ओळ आठवतेय,  पूर्ण आठवत नाहीये आत्ता पण ती एक ओळंही बेस्ट होती. "आय नो ओल्ड इज गोल्ड बट नाऊ टेक न्यू गोल्ड"
आपण कधी नवं गोल्ड घेण्याचं धाडस करणार आहोत? आपण कधी जागे होणार? कधी आपण पुढचं पाऊल टाकणार? किती दिवस आपण दिवसागणिक मागे मागे मागेच चालत राहणार?


केपी आर

Friday, February 16, 2018

नीरव मोदी व्हाया नेहरु


माननीय परंपूज्य श्री श्री श्री नीरव मोदीजी  यांचा जन्म जरी १९७१ साली झाला असला तरी पण वास्तविक पाहता मोदीजींना पंजाब नॅशनल ब्यांकेकडून रुपये ११,३०० कोटी (फ....क्तं) चे कर्ज सन १९४० सालीच नेहरुंच्या सांगण्यावरुन देण्यात आले होते. हे कर्जप्रकरण ब्यांकेच्या संचालक मंडळापुढे आल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी या प्रकरणास कडाडून विरोध केला होता पण त्यावेळी मोटाभाई मोदी शेट नसल्यामुळे लोकांना सरदार पटेलांची खरी किंमत कळली नव्हती आणि म्हणूनंच असले राष्ट्रहितविरोधी निर्णय घेणाऱ्या नेहरुंना लोकांनी उचलून धरले होते. पुढे जाऊन आपला देश आणि पर्यायानं देशाच्या नागरीकांना या निर्णयाची भयंकर झळ पोहचू शकते, नव्हे तशी ती पोहोचेलंच याचा अंदाज आल्यानं सरदार पटेलांनी जीवाच्या आकांताने, प्राणपणाने या सगळ्याला विरोध केला पण भ्रष्ट लोक आणि चोरांना पाठीशी घालण्याची सवय असलेल्या सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या प्रभावाखाली येत नेहरुंनी देशाला आर्थिक संकटात टाकणारे अनेक निर्णय घेतले त्यातलाच हा एक निर्णय होता.

नेहरु, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी यांचा कारभार सुरु होण्याआधीच त्यांच्या कारभाराला कंटाळून सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली, पटेलांनी त्यांना जोरदार पाठींबा दिला पण त्यांच्या दुर्दैवाने मोटाभाईचे उजवे का डावे हात आमितभाई शहा यांना काँग्रेसने कटकारस्थान करुन गुजरातमध्ये येण्यास मज्जाव केला होता त्यामुळे ते सुभाषबाबूंना काही मदत करु शकले नाहीत. होमग्राऊंडवर ब्याटींग करु देत नाहीत म्हणजे काय. तर या सर्वांनी प्राणपणाने नेहरु आणि काँग्रेसविरुद्ध आघाडी उघडूनंही त्यावेळेस हट्टाला पेटलेल्या नेहरुंनी माननीय परंपूज्य श्री श्री श्री नीरव मोदीजी यांना तब्बल रुपये ११,३०० कोटीचे कर्ज दिले आणि आज माननीय निरागस, निष्पाप नरेंद्रशेट मोदी यांच्यावर नालायक विरोधक चिखलफेक करतायेत...

शोधपत्रकारीतेचे वर्ग घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मोहनकाकांनी स्वतः पी.टी.आय.च्या त्यांच्या "वैयक्तिक शाखेतून" जीवावर उदार होत सन १९४९लाच ही बातमी बाहेर आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता पण तात्कालीन पक्षपाती सरकार, पंतप्रधानांमुळे ते करणे शक्य झाले नाही. पण त्यावेळेस मोहनकाकांनी पी.टी.आय.च्या "वैयक्तिक शाखेत" करुन ठेवलेल्या नोंदी धक्कादायक असून त्यातली एक गोपनीय नोंद माननीय एडवर्ड स्नोडेन यांच्या सहाय्याने आम्ही आपल्यासमोर आणत आहोत. त्यामधला मजकूर काहीसा असा होता.

नीरव मोदींचे प्रस्तावित कर्जप्रकरण संचालक मंडळापुढे आल्यानंतर सरदार पटेल आणि नेहरुंमध्ये त्यावरुन खडाजंगी झाली आणि तुम्ही हे कर्ज देण्यासाठी एवढे का हट्टाला पेटला आहात असे सरदार पटेलांनी विचारले असता नेहरुंनी धक्कादायक उत्तर दिले, "ते काय का आसंना, मला नीरवला कर्ज देयचच्चे म्हंजे देयचच्चे कारन २०१४ मदी येनारं मोदीशेटचं सरकार मला २०१८ मदी गोत्यात आनायचंय, बाकी सगळं गेलं खड्ड्यात". असं ऐकिवात आहे की नेहरुंच्या या ऊत्तरानंतर पटेल आणि त्यांच्यातली दरी वाढतंच गेली आणि देशाची त्यानंतर झालेली अधोगती आपण अनुभवत आहोतंच.


(शेट तुम्ही आगे का काय म्हणतात ते बढत र्हावा ओ, तो यज्ञ करा सगळीकडची माती गीती आनून लालकिल्ल्यावं, हे उगं नीरव मोदी विजय मल्ल्या गिल्ल्या असल्या फालतुक बातम्यात वेळ घालवू नका तुमचा.)

केपी आर


Tuesday, February 13, 2018

व्हॅलेंटाईन डे


कॉलेजात असताना आमचा एक दोस्त होता. मुंगेरीलाल आणि त्याच्यात फार म्हणजे फार्फारंच साम्यं होतं. तर या आमच्या मुंगेरीला कॉलेजातली प्रत्येक पोर्गी त्याच्या मागे हातंच काय तर हात पाय नाक तोंड सग्गळं सग्गळं धुवून मागे लागलीये असं वाटायचं. त्याचं स्वतःचं असं एक कल्पनाविश्व होतं, ह्यॅटतेच्यायला कल्पनाविश्व म्हणण्यापेक्षा भ्रामकविश्व होतं. कॉलेजातली कोणतीही पटाख्खा पोर्गी ही कशी त्याच्या मागं लागलीये, कितीवेळा कधीकधी कोणीकोणी त्याला फोन केले, ब्लँक कॉल मारले, रात्रीअपरात्री मेसेजेस केले निनावी पत्रं आणि ग्रिटींग कार्ड्‌स दिले याच्या सुरस कथा ऐकायला लै मजा येयची. पहिल्या वाक्यात आम्हाला कळलेलं असायचं की थापा चालू झाल्यात पण आमच्या कपाळावर बोल्ड आणि क्यापिटलमध्ये "चुतिया" लिहिलं असल्यासारखं हा आम्हाला स्वरचित कथा आणि मनाचे श्लोक ऐकवत बसायचा आणि आम्ही मोठ्या भक्तिभावानं त्याच्या या प्रवचनाचा परमानंद घेतंच रहायचो.
सगळ्या मित्रांकडे तेव्हा मोबाईल फोन नव्हते, तुरळक चार-दोन टाळक्यांकडे मोबाईल असायचा. एकेक करत प्रत्येकजण फोन घेऊ लागला आणि ज्याने कोणी नवीन फोन घेतला असेल त्याच्या फोनवरुन आम्ही मुंगेरीलालला मेसेज आणि मिस्‌ड कॉल मारायचो. तो तेच मेसेजेस आम्हाला दाखवायचा आणि प्रत्येकवेळेस कॉलेजातल्या वेगवेगळ्या पोरींची नावं सांगायचा. बघ अमुकनी मेसेज केला, बघ तमुकनी मिस्ड कॉल मारला. वास्तविक पाहता हे मेसेजेस आणि मिस्ड कॉल आम्हीच त्यावेळेसंच मारलेले असायचे.
एकदा असंच एका मित्राच्या बहिणीच्या लग्नाला गेलो असताना तिकडे दुसऱ्याच मित्राचा लहान भाऊ भेटला. बरं तेव्हा मोबाईल फोन घेणं ही एक बातमी असायची. लहानपणी जसे नवे कपडे घेतले की ते नवे कपडे घालून ताबडतोब शेजारीपाजारी चक्कर टाकून सगळ्यांना नवा ड्रेस घेतला, कसाय? असं सांगत, विचारत फिरायचो तसं त्याकाळी मोबाईलबद्दल होयचं. तर तो मित्राचा लहान भाऊ भेटल्या भेटल्या लै कौतुकानं माझ्यासमोर मोबाईल नाचवत म्हणाला, "कुण्या नवीन घेतला". अरे वाह म्हणता म्हणता माझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. एव्हाना आमच्या जवळपास सगळ्या मित्रांनी फोन घेऊन झाले होते आणि आपापले नंबर एकमेकांशी शेअरही करुन झाले होते त्यामुळे मुंगेरीला मेसेज आणि मिस्ड कॉल देण्यासाठी नवा फोन नंबर मिळणं दुरापास्तं झालं होतं. मित्राच्या भावाचा फोन बघितल्या बघितल्या नवा खजाना गवसल्यागत आम्ही खुश झालो. त्याला नीट समजावून सांगत हजारदा बजावलं आत्ता मी एक मेसेज तुझ्या फोनवरुन करणारे तर त्याला रीप्लाय आला किंवा त्या फोन नंबरवरुन परत कॉल आला तर रीसिव्ह करायचा नाही किंवा एखाद्या मुलीला बोलायला लावायचं. बर, लग्न होतं १४ फेब्रुवारीला... "व्हॅलेंटाईन डे" वगैरेचं तेव्हा लै अप्रुप. मग आम्ही मेसेज टाईप केला, "विल यू बी माय व्हॅलेंटाईन" आणि परत करकच्चून ब्याकस्पेस हाणून आख्खा मेसेज डिलीट हानला आणि मेसेज टाईप करुन गप्पकन्‌ सेंड केला... "हाय हँडसम". डिलीव्हरी रीपोर्ट येतो न येतो तोवर जेवणाच्या रांगेतून आपला आलेला नंबर सोडून मुंगेरी धावतपळत आम्हाला शोधत आला, मला बाजूला ओढून नेत मोबाईलवरचा मेसेज हळूच दाखवला, "हे बघ, तिच पाठौवतीये परत"
कोण ती
तीच रे, ती मुंबैची
आ.... य.... ला, ती... घंटा कोण ते न कळताही जस्काय दिवसरात्र तिच्याबरोबर असल्यागत माझी प्रतिक्रीया
मग, किती दिवस तुला सांगत होतो, तुझा विश्वासंच नाही
विश्वास नाही असं कुठे झालंय काय, आमच्याबाबतीत असलं काय होत नसतंय म्हणून जरा वेगळं वाटतंय रे
हसू दाबत दाबत हा गंभीर संवाद चालू असेपर्यंत मित्रांनी दुसरा मेसेज टाकला
कॅन आय बी यो’र व्हॅलेंटाईन, हँडसम
तो मेसेज स्क्रीनवर दिसला न दिसला तोवर मी बोभाटा केला.
एय, आयला... कसले मेसेज यायलेत बघितलात काय दाद्याला... सेलिब्रीटी झाला आयच्या गावात. आपण मरायलो, झुरायलो पोरीशी न बोलताच आन हितं दादूला कनाकन मेसेज यायलेत व्हॅलेंटाईन डेचे.
एय गप गप, ओरडू नको असं उगंच म्हणत मुंगेरीनं फोन खिशात ठेवायची फक्त अ‍ॅक्शन केली.
सगळे कार्यकर्ते जमून, त्याच्याबाजूनं कोंडाळा करुन यथासांग त्या मेसेजेसचं जाहीर वाचन झालं, मग मोबाईल खोदून खोदून आम्हीच पाठवलेल्या मागच्या मेसेजेसचं जाहीर वाचन झालं. मुंगेरी खुश होऊन होऊन लालेलाल झाला. ग्रुपमधल्या प्रत्येकानं त्याला जमल तेवढा हरभऱ्याच्या झाडाच्या सगळ्यात वरच्या फांदीच्या सगळ्यात वरच्या पानाच्या वर चढवला, एवढा चढवला की त्यानं आम्हाला सगळ्यांना खुशी खुशीत त्या रात्री आईस्क्रीम खायला घातलं.
आईस्क्रीम खाता खाता, आयला दादू काय हिरोए राव असल्या कचकून चर्चा पार पडल्या, हसू दाबून धरण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले पण तरी दादू सातवे बितवे सोडा तेच्यायला लैच वरच्या कोनच्यातरी आस्मानात पोचलावता त्यामुळं त्याला आमचं हसणं नोटंच नाय झालं.
मग कोणतरी म्हणलं, थांबे च्यायला ही कोने ते मला बघैचंच्चे.. फोन लाव त्या नंबरला.
चुतिया ए का रे, पावणे बारा झाले रात्रीचे, एवढ्या रात्री पोरीला फोन लावतात होय रे, अक्कल चालव जरा
एवढ्या रात्री पोर्गी मेसेज करु शकती, आपण फोन नाय लावू शकत होय
मला म्हायतीये ती कोने सोड आता
काय म्हायती तुला, वायझ्येड, पोर्गी ए का पोर्गा ए हे पन म्हैत नसलं, म्हणे कोने ते म्हैतीये
अरे कालंच कॉलेजात भेटलीवती, म्हनली मी सगळ्यात हँडसम मित्राला प्रपोज कर्नारे उद्या
मंग तर नक्कीच ती नाय्ये. हँडसम म्हनलीये बे ती
भाड्या, आयस्क्रीम संपत आल्यावर लक्षात आलंय होय रे हँडसम म्हनलीये म्हन्जे मी नसंल ते
तू नाय रे, ती नसल पलिकडं.. फोन तर लाव.
अबे, कालंच सांगितलं होतं तिनी, उद्या दिवसभरात त्यानंच प्रपोज नाय केलं तर मी त्याला बरोबर साडे नौ वाजता एसेमेस कर्नारे म्हणून. मोबाईलमधला पहिल्या मेसेजचं टायमिंग चेक करता करता आमच्या माहीतीत त्यानी भर घातली.
कोणी त्याच्या बाजूने कोणी विरोधात बोलायचं असं आमचं तंत्र होतं. मग तो जोशात तो बोलतोय तेच कसं खरंय हे सिद्ध करायचा प्रयत्न करायचा.
आम्ही मग शेवटी दोन्दोन मस्तान्या हानून कबूल केलं की होय तो "ती"चाच्च मेसेज होता. दादूला व्हॅलेंटाईन मिळ्ळ्याबद्दल कडकडून मिठ्या हाणल्या, काँग्रॅच्युलेट केलं आणि घरी गेलो.
दादू मग मुंगेरीलाल के हसीन सपने बघत झोपला आणि आम्ही नवा नंबर शोधत बसलो त्याला पुढचा मेसेज करण्यासाठी.

लै भारी होते राव ते दिवस, लाल भडक कपड्यात फिरणारे कपल्स, एफ्सी रोडवर जमलेली जंता, त्यात आमच्यासारखे मित्राला खोटीनाटी गर्लफ्रेंड मिळवून देऊन पार्टी झोडणारे आणि हात चोळत बसून डोळे शेकणारे निम्मे आर्धे मेक्यानिकल इंजिनिअरींगचं उपाशी मित्रमंडळ, काहीच नाही जमलं तर बघंय भावा ती तुझ्याकडेच बघायली म्हणून एखाद्याला खुश करुन गेला बाजार रीलॅक्स्ची कॉफी किंवा दुर्गाची कोल्ड कॉफी पदरात पाडून घेणारे मित्र, शाळेतल्या मैत्रिणीला पुढच्या व्हॅलेंटाईनला प्रपोज करायचाच म्हणत झुरत बसणारा एकेकजण, नीट दाढी येत नसतानाही तिच्यायला तिला मनातलं सांगायच्याआधीच तिचं लग्नं ठरलं म्हणून मित्रांच्या घोळक्यात खुरटी दाढी वाढवून देवदास बनून मी लै लेट केला रे बोलायला, तिला मीच आवडायचो म्हणत नसलेल्या आठवणी सांगणारे कार्यकर्ते.... पुढच्या व्हॅलेंटाईनला मी तुमच्यात नाय रे तिच्याबरोबर असेन म्हणून टेर बडवून खुश होणारे, ती आपल्याला घंटा हो म्हणत नाही हे माहिती असतानाही एय वैनीये तुमची म्हणून मिरवणारे, त्यांच्या भावना दोस्तांपलिकडे तिच्यापर्यंत तर सोडाच पण तिच्या कुत्र्यापर्यंतही कधी न पोहचवू शकणारे दोस्त, व्हॅलेंटाईन डेची ग्रिटींग कार्ड आर्चिस आणि हॉलमार्कमधून घेऊन कपाटात ठेवणारे, यश चोप्राच्या पिक्चरमधल्या पुरनमासी को व्हॅलेंटाईन डे आला तर लै मोठा योग असतो मानणारे सगळे, आयला किमान ब्रेक‌अप होण्यासाठी तरी तिनी हो म्हणू दे म्हणजे तेरे नामची गाणी मनापास्नं म्हणता येतील असा विचार करणारे महाभाग वगैरे आणि थंड हवेत उडणारे उंचंच उंच लाल रंगाचे फुगे....आणि एका अर्थाने सगळ्यांचेच मुंगेरीलाल के हसीन सपने.

गर्लफ्रेंड नव्हती तेव्हाचे व्हॅलेंटाईन्डेच खरे बेस्ट होते... ती हुरहुर आता परत नाही...

केपी आर

Wednesday, February 7, 2018

प्रपोज डे

मागच्या वर्षी मित्रासोबत कामानिमित्त लातूरला गेलो होतो एक दिवस. मित्राने आदल्या दिवशीच बजावून बजावून सांगितलं होतं की काहीही झालं तरी सकाळी सहा-सव्वा सहाला हडपसरला ये, तिथे तुझी गाडी लावून माझ्या गाडीतून आपण जाऊया. माझ्या लौकिकाविरुद्ध वागत मी कधी नाही ते ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी पोहचून मित्राची वाट बघत उभारलो होतो. पाचेक मिनिटांत हा पठ्ठ्या आला, गाडीत त्याच्या शेजारच्या सीटवर आणखी एक माणूस बसलेला होता. मी मागचं दार उघडत असताना मित्र म्हणाला, "ए कुण्या तू पुढे ये रे, मामा आता तू मागे बस". मी पुढे जाऊन बसेपर्यंत मित्राने ओळख करुन दिली, हा माझा मामाए. आमची नमस्काराची देवाण-घेवाण होयच्या आत तो म्हणाला याचंही लातूरला काम आहे, म्हटलं चल माझ्याबरोबर तसंही आपण दोघंच तर चाललोय, नाय का?

सक्काळच्यापारी हडपसरवरुन आमची गाडी पुढे निघाली तेव्हा गाडीत पहिलंच गाणं लागलं, "लगी आज सावन की फीर वोह झडी है", आयच्या गावात ते बाजीगरमध्ये जॉनी लिव्हर नाही का जेवणाआधीच दिलीप ताहीलला गरम पाण्यात लिंबाचे तुकडे टाकून आणून देतो तसं वाटलं. जे गाणं परतीच्या ओरवासात रात्री वाजवून माहौल बनवायला पाहिजे ते गाणं सकाळच्यापारी लागल्यानं सुरुवातंच शेवटापासून झल्यासारखं वाटायला लागलं होतं. कुण्या पाहिजे तर गाणं बदल असं अभयनं सांगताच पडत्या फळाची आज्ञा म्हणत मी पटकन गाणं बदललं. सकाळी ऐकण्यासारखी सुरेश वाडकरांची कित्येक सर्वांगसुंदर गाणी असताना प्रवासाच्या सुरुवातीलाच आयुष्यात काही राम न राहील्यासारखं मला "लगी आज सावन की फिर वोह झडी है" ऐकण्यात काडीमात्र इंटरेस्ट नव्हता. मी गाणं बदलत असताना मामाचा चेहरा एरंडेल पिल्यागत झाला होता, ए अरे असू दे की असं दबक्या आवाजात सांगणाऱ्या मामाला मी पटकन म्हणालो ओ मामा हे गाणं रात्रीसाठी राखीवंय. काय लका गाण्याला काय वेळापत्रक असतंय होय म्हणत मामानं आपला निषेध नोंदवायचा अयशस्वी प्रयत्न केला तोवर पुढच्या गाण्याचं म्युझिक चालू झालं होतं.

आरं तेच्यायला हे रीमिक्से की गड्या, जुनंच चांगलं होतं असं मामा म्हणतो न म्हणतो तोवर अभय म्हणाला, गपंय मामा, तुला काय कळत नाय, लै भारी केलंय रिमिक्ससुद्धा. गाणं कोणाचंय हे तरी म्हायतीये का?
ए.आर. रेहमान
श्रद्धा कपूरचंय लका, रयमान म्हने
येड्या हे रिमिक्स होय, ते पण रेहमानचंच्चे, आनि हिरो हिरोईन म्हनशील तर ओरीजिनल गान्यात अरविंद स्वामी, सोनाली बेंद्रे आणि मनिषा कोईराला होते. तसं हे रिमिक्ससुध्दा रेहमाननीच केलंय. कळली तुझी अक्कल गाणं हिरो-हिरोईनचं असतंय मग गीतकार, संगीतकार, गायक बियक काय भजे तळायला असतात होय रे?
अभय मुस्काटात जोडा हाणल्यागत तोंड करुन गप बसला.
मामाचं आपलं चालूच होतं, ओरीज्नल हंमा हंमा लै मस्तं होतं राव, बाँबे पिक्चरंच बेस्ट होता, पंच्याण्णव साली आल्ता. तो आपला अरविंद स्वामी हिंदू पोरगा असतो, त्याला मनिषा कोईराला मुस्लिम पोर्गी आवडलेली दाखौवलीये. बाबरी मशिद पाडल्यानंतर मुंबैत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंदू मुस्लिम लव श्टोरीवर होता पिच्चर. मनिरत्नम डायरेक्टरंय आणि रामलखनवाला सुभाष घै निर्माता होता. मामाचं बॉलीवूडबद्दलचं ज्ञान अगाध होतं, अधून मधून चूका होत होत्या पण त्या तो काँफिडंटली ठोकत असल्यानं लक्षात येणं कठीण होतं.
ओ मामा, सुभाष घई नाही काय झामु सुगंध होता ओ निर्माता, मी मामाचा टेंपो बिघडवत मामाला सांगितलं.
ए नाय राव मला चांगलं आठवतंय, सुभाष घईच होता, मी सांगलीला बघितला होता पिक्चर, विसरणार नाय मी. मामा मात्र त्याच्या माहितीवर ठामंच होता.
दाद्या आमच्या मामाला पिक्चरच्याबाबतीत चॅलेंज करु नको काय, लै दर्दी माणूस ए. अभयला जास्तं काही माहीत नसल्यानं त्यानं आपलं एक जनरलाईस्ड वाक्य हाणून दिलं.
आण्णा आपण काय कमी दर्दी ए का? निर्माता सुभाष घई नव्हताच, मला चॅलेंज करतो म्हणजे काय अशा अविर्भावात मी पण एक वाक्य चिकटवलं
लाव शर्यत च्यायला सुभाष घईच होता.
मामा हारणार राव तुम्ही कशाला पैज लावताय उगं
नाय राव शंभर टक्के ग्यारंटीए मला, मी हारलो तर आजचं जेवण माझ्याकडनं तुम्हाला. मामासुद्धा आता ईरेला पेटला होता.
मी शांतपणे मोबाईल बाहेर काढून गूगलवर बॉम्बे’ज प्रोड्युसर टाईप करताच झामु सुगंधचं नाव स्क्रीनवर आलं. मी मोबाईल मामा समोर नाचवत म्हणालो मामा कुठल्या हॉटेलात नेणार जेवायला. जेवायला काय म्हणशील तिकडं जाऊ की पण हे गुगल बिगलंच कायतरी चुकतंय राव असं हळूच म्हणत मामानं पराभव मानण्यास परत एकदा नकार दिला. विषय अजून न ताणता मी मोबाईल खिशात ठेऊन दिला तोवर अभय म्हणालाच एय मामा हारलायेस लका मान्य कर की आणि तिच्यायला सारख्याला वारखे मिळालात आज तुम्ही.

मी हसत हसत गाणं बदललं.
उदीत नारायणच्या आवाजातलं तुमही हमारी हो मंझिल माय लव्ह लागलं तसं मामा म्हणाला हे कोणत्या पिक्चरमधलंय सांग अभ्या.
एय तसलं मला काय कळत नाय, ते तुम्ही दोघं बघून घ्या, ओळखा ओळखी, शर्यत पैज आयला.
मामा यारा दिलदारा मधलंय, मी निर्विकार चेहऱ्यानी उत्तर दिलं
हां पर्फेक्ट, यातलं अजूनेक गाणं लै फेमसे कोणतं सांग तर मानलं तुला.
बिन तेरे सनम मर मिटेंगे हम आ मेरी जिंदगी
ए दुनियेचा भारी दोस्तंय लका अभ्या तुझा, लै दिवसानी आसलं कोनतरी भ्येटलंय म्हणत मामानी टाळीसाठी हात पुढे केला, मी मामाला टाळी देत खळखळून हसलो.
बाकी मामा होता मात्र खरंच दर्दी, एकेक गाणं, गायक, संगीतकार, हिरो हिरोईन सगळ्यावर चर्चा करायचा. गाणं कोणतंही असो मागच्या गाण्याएवडाच खुश होयचा तो. आणि त्या गाण्याचा पिक्चर कसा बेस्ट होता, कास्ट काय होती, कुठे बघितला वगैरे आठवणी डिटेलवार सांगायचा. गाणं लागलं रे लागलं मामा विचारायचा सांग कोणत्या पिक्चरमधलं गाणंय? आपण सांगायचं मामा त्रिदेव
आवाज कोणाचाय?
मोहम्मद अझिज

आम्हाला दोघांनाही सिनेमा आणि गाण्यांसाठी दुसरा एक्वली येडा माणूस भेटला म्हणून परमानंद झाला होता. मधे नाश्त्याला वगैरे थांबल्यावरंही आमची चर्चा थांबत नव्हती. एका गाण्यावरुन दुसरं, एका सिनेमावरुन दुसरा आमचं आपलं चालूच होतं. मधेच मामा विचारायचा काय रे तू अफसाना प्यार का बघितलायेस का?
टीप टीप टीप टीप बारीश शुरु हो गयी गाणंवाला का? आमिर खान आणि नीलम ए त्यात
हां... तोच. मला लै आवडायची राव नीलम. मी गावाकडं विडीओ पार्लरमध्ये बघितला होता तेव्हा.
ऐंशी नव्वदच्या दशकातले पिक्चर आणि गाणी वीकपॉईंट होते मामाचे. गोविंदा, सनी देओल, संजय दत्त, रोनित रॉय, सुमित सैगल, अविनाश वधावन, विवेक मुशरन, मिथुन, अनिल कपूर वगैरे हिरो, त्यांचे पिक्चर, गाणी, गायक, संगीतकार वगैरे बद्दल मामा एखाद्या जुन्या मित्राबद्दल बोलावं तसं जाम आत्मीयतेने बोलत होता. या सगळ्याशी त्याचा जाम स्ट्राँग कनेक्ट आहे हे त्याच्या प्रत्येक वाक्यातून जाणवत होतं. एखादं माणूस नॉस्टॅल्जिक होतं म्हणजे नेमकं काय होतं याची देही याची डोळा अनुभवत होतो मी. कोणी एखाद्या गोष्टिबद्दल भरभरुन बोलत असलं की मला ऐकतंच रहावंसं वाटतं. गुगल बिगल येयच्या आधीचा रसिक माणूस, पिक्चरबद्दल सगळी माहीती त्याच्या डोक्यात साठवलेली होती आपल्यासारखं क्रॉसचेक करायला त्याला खिशातून फोन काढून गुगलवर जायला लागत नव्हतं. सिनेमाच्या चालत्या बोलत्या एनसायक्लोपिडीयासोबत प्रवास करताना जाम मजा येत होती.

थोड्यावेळानं सिनेमा गाणी यावर भरपूर बोलून झाल्यावर मी मामाला म्हणालो, मग मामा लातूरला काय काम काढलं आज?
काय विशेष नाही रे बाबा, अभ्याची गाडी रीकामी चाल्ली होती म्हणलं जाऊया, जुने मित्र भेटतील तेवढेच, म्हणून आलो.
अभय हसला म्हणाला, आमचा मामा येडाय जरा त्याच्याकडं लक्ष नको देऊस. तुम्ही आपले पिक्चर गाण्यांच्या गप्पा मारा त्यापेक्षा.
मामानं तळहातावर तंबाखू मळता मळता पुढचं गाणं गुणगुणायला सुरुवात केली, मोहब्बत ईनायत करम देखते है. मी नेहमीचा प्रश्न फेकला, सांगा मामा कोणता पिक्चरंय हा. यारा दिलदाराय लका मळलेली तंबाखू ओठामागं दाबून हात झटकत झटकत बोलला मामा. परत चुकलात राव, बहार आनेतकंय हा, सुमित सैगलचा मी जास्त कोडी न घालता सांगून टाकलं. आयला हो की रे, रुपा गांगुली होती याच्यात माहीतीये का अभ्या मामानं प्रश्न विचारण्यासाठी सेफ टार्गेट निवडलं. ए तेच्यायला राव मला कळत नाय, मला नका काय विचारु कितीवेळा सांगायचं तुम्हाला, नसल जमत तर च्यायला खाली उतरा आणि एश्टीनी या दोघं. ह्याटतिच्यायला चिडतो कशाला, आपली महाभारतातली द्रौपदी रे म्हणत मामानं खिशातला मोबाईल काढून मित्राला फोन लावला.
कुठंय रे? हाय ना लातूरात? हा मी येतोय.. अभय किती वाजता पोचू रे आपण? आरे बाबा दिड वाजेपर्यंत येतो. थांबतो की चार साडेचार-पाच पर्यंत वेळ आहे माझ्याकडं
एय मामा आज परत जायचंय पुन्याला, साडेचार-पाच वाजवायचे असतील ना तर ये एश्टीनी तुझा तू. आयला एकतर बारा साडेबारा पर्यंत पोचू म्हणलं तरी मित्राला सांगतोस दिड दोन वाजतील. आमचं काम झालं की आम्ही निघणार हायवेवर नाय भेटलास ना तर तुला फोन पण करायच्या फंदात नाय पडनार हा आधीच सांगतोय.
ए अभ्या थांबशील रे... आजच्या दिवस कर की अ‍ॅडजस्ट.
तसलं काय होणार नाय आ मामा म्हणत अभयनी गाडी अजून जोरात पिटाळली

पुढच्या प्रवासात परत आम्ही भरपूर गप्पा मारल्या, गाणी म्हटली. आजंच दोन तासापूर्वी आपली ओळख झालीये असं बिलकुल वाटत नव्हतं. लातूर येईपर्यंत मामानं साताठ फोन ट्राय केले पण एकतर लागले नसावे किंवा कोणी रीस्पाँड केलं नसावं कारण त्याचं बोलणं एकाच फोनवर झालं. हायवेवरच्या चौकात त्याला ड्रॉप करुन अभयनी परत एकदा मामाला डेडलाईनची आठवण करुन दिली, मामा परत एकदा म्हणाला ए अभ्या असं नको करु राव, कर की माझ्यासाठी अ‍ॅडजस्ट... आधीच सांगतोय थोडा वेळ लागला तर थांब मी तुझ्याबरोबरंच परत येणारंय.
गाडी काढता काढता अभय म्हणाला यडाय आमचा मामा, बायकोबरोबर भांडण झालेलंय त्याचं, ती राहती हितं त्याला सोडून. तिला भेटायला आलाय, म्हणतोय तिला समजवून सांगतो ये म्हणतो परत पुन्याला. ती काय याला दाद देत नसती, तीन साडेतीन वर्ष झाली रे आता वेगळं रहायला लागून, आता काही नसतंय होत. उगं तुझ्यासमओर बोलायला नको म्हणून मित्रांना भेटायला आलोय म्हणत होता तो मगाशी. अभयनं थोडक्यात सगळं सांगेस्तोवर कस्टमरच्या दारात पोहोचलो होतो आम्ही. पुढचे तीन-चार तास कामात मामाचा विषयंही नाही झाला. कस्टमरशी बोलताना उलट मामाचाच दोन-तीनदा फोन येऊन गेला पण अभयला उचलता नाही आला. आम्ही काम उरकून हायवेवर येयच्या एक तास आधीच मामा ठरलेल्या ठिकाणी येऊन थांबला होता. गाडीत बसता बसता "भ"वर विशेष जोर देत मामानं शिवी घातली, भेंsssचोद, दिग्या आलाच नाय रे गैबाना, तिच्यायला दिड तास वाट बघितली. पुढचे दोनेक तास मामा अधून मधून गाणी पिक्चरवर गप्पा मारत आणि अधून मधून जशी आठवण येईल तशी दिग्याला कचकून शिव्या घालत राहीला. मधेच म्हणाला राव सकाळी म्हणला होतास की हे रात्रीचं गाणंय लाव की लका आता. लगी आज सावन की फिर वोह झडी है गाणं शेवटी मामानं सुरेश वाडकरसोबत डोळे झाकून पूर्ण म्हटलं. गाणं गाता गाता मधेच मला म्हणाला, बरोबरंय लका तुझं, रात्रीचंच गानंय हे, माहौल बनला एकदम...आणि गाणं कंटिन्यू केलं कभी टूटकर चीज कोई जुडी है.

एय भेटली का नाय ती, पिक्चर गाण्याशी काही घेणदेणं नसल्यानं माहौल ब्रेक करत अभयनं डायरेक्ट मामाला विचारलं.
खिडकीतून बाहेर एकसंध गिरवलेला अंधार बघत मामा म्हणाला नाय ना राव
अरे तेच्यायला ती पण नाय दिग्या पण नाय मंग केलं काय तू ईतका वेळ?
अरे अभ्या लका लै वेळा फोन लावला तिला पण नुसतं टूंग टूंग वाजतंय, ना एंगेजंय ना स्विचॉफंय. काय समजंना लका.
आरे येडाय का रे मामा तू? नंबर  बदललाय म्हणजे तिनी, कितीदा सांगायचं तुला दे की नाद सोडून
आरे असा कसा नाद सोडू अभ्या, माझं पोरगं पण ए रे तिच्याबरोबर
मंग काय करणार तू... ते जाऊ दे आज काय करायचं म्हणून आल्तास सांग
आज... आजनंतर मोठा पॉज घेऊन मामानं बोलायला सुरुवात केली.
आज पोरासाठी बायकोचे पाय धरायला लागले तरी चालंल या हिशोबानं आल्तो राव
मंग पकडले का?
आरे भ्येटलीच नाय सांगितलं ना तुला
येडाय तू मामा
अभ्या आठ वर्षाचा झाला श्रेयस मागच्या महिन्यात, आता तीनेक वर्ष झाली त्याला भेटून. ज्याला स्वतःच्या पोराला बघायला पण नाय मिळत ना त्यालाच कळू शकतं लका
अरे पन आज काय करायला आल्तास मामा आणि काय केलंस मंग
मी लका माघार घिऊन, माझीच चूकंय म्हणून तिला मनवायला आल्तो रे. आनि नसतंच ऐकलं ना तर किमान अधनंमधनं मी लातूरला येत जाईन पोराला तेवढं एखाद दिवस भेटू देत जा म्हणून रीक्वेश्ट करनार होतो लका
मंग क्येली का
तेच्यायला परत त्येच तुजं... फोन लागत नाय म्हनल्यावर तिकडं गेल्तो तिच्या घराकडं पण कुलूप होतं लका. थांबलो तिकडं कोपऱ्यावर आर्धा पाऊण तास कानोसा घेत. म्हणलं आली तर पाय धरु लागलं तर पण भ्येटूच आज. पण दिसली पण नाय रे.
मार खानारेस मामा एक दिवस तू नक्कीच, घरापाशी बिशी जाऊन उभा राहत जाऊ नको लका. तसं तर तिनी घर पन बदललं आसंल आता.
अभ्या तिथनं श्रेयसच्या शाळेपाशी गेल्तो. तिथं थांबलो बाहेर तीन तास, पोरगं दिसंल म्हणून. पण त्ये पण नाय दिसलं रे. मामा अभयचं ऐकून न ऐकल्यासारखं ट्रांसमध्ये बोलत राहीला.
आरे काय करनारेस बघून, आयला पोरगं तुला ओळखनार पन नाय आता.
आरे अभ्या पन मी ओळखतो की त्याला

त्यांचं हे बोलणं चाललेलं असताना मी फेसबूक ओपन केलं
कोणीतरी स्टेटस अपडेट केलं होतं
सारं काही जाणतेस तू
परत मी सांगायलाच हवं का
नजरेतल्या भावना वाचतेस तू
त्यांनाही शब्दात बांधायलाच हवं का
आज प्रपोज डे

लग्नानंतर दहा वर्षांनी परत एकदा स्वतःच्याच बायकोला योगायोगानं आजंच प्रपोज करायला गेलेल्या मामाला तिला प्रपोज करणं तर सोडाच पण ती साधी दिवसभरात दिसलीही नव्हती, तिचा बदललेला पत्ता, बदललेला फोन नंबरंही त्याच्याकडे नव्हता. शाळेच्या बाहेर उभं राहून डोळे भरुन पोराला फक्त बघावं म्हटलं तर शाळा सुटल्यावर येणाऱ्या जाणाऱ्या पोरात त्याला त्याचा लेक ओझरताही बघायला मिळाला नव्हता. फेसबूकवर प्रपोजल्सचा, शेरोशायरीचा पाऊस पडत असताना आज कसलासा प्रपोज डे आहे हे गावीही नसलेल्या मामाचं पॅच-अपचं प्रपोजल भेटेविना तसंच मनात साठून राहीलं.
आमची गाडी आंधार चिरत पुढे सरकत असताना गाडीतल्या म्युझिक सिस्टीमवर त्याच्या हिरोईनला न भेटता शाहरुखंही प्रपोज डेचे शेवटचे काही तास सार्थकी लावत एकतर्फी प्रपोज करत होता, तू हा कर या ना कर तू है मेरी किरन....

दिवसभर भरभरुन बोलणाऱ्या मामानी, आज बायकोशी काय बोलायचं याची मनातल्या मनात हजारदा तयारी केली होती, आता परत एकदा मनातल्या मनात परत तेच डायलॉग्ज म्हणत त्याने डोळे मिटले आणि पोरानं आपल्याला चुकून ओळखलंच तर त्याला देण्यासाठी म्हणून आणलेली दोन मोठी चॉकलेटं खिशात तशीच पडून राहीली तेव्हा आभासी जगात लोकं उद्याच्या चॉकलेट डेच्या तयारीला लागली होती

केपी आर

Saturday, February 3, 2018

पद्मावत व ती


प्रिय स्वरा
काहीही लिहियला सुरुवात करण्याआधी मला तुला हे सांगायचं आहे की मला एक अभिनेत्री म्हणून म्हणा की तुझ्या सिनेमांच्या निवडीसाठी म्हणा तू मला जाम आवडतेस. याव्यतिरीक्त तू वेळोवेळी जी सध्यपरीस्थितीवर बेधडकपणे मतं व्यक्त करतेस त्यामुळे मला तुझ्याबद्दल आतोनात आदर आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे यावेळेसही तू पद्मावत(ती) सिनेमा पाहून संजय लीला भंसाळींना जे पत्र लिहिलं आहेस (सौजन्य: द वायर) ते लिहिण्याचा आणि तुझं मत परखडपणे मांडण्याचा तुला अधिकार आहे असं मला १००% वाटतं. पण यावेळेस मी तुझ्या मताशी सहमत नाही हे ही तितकंच खरं. बरं पुढे जाण्याआधी हे ही स्पष्ट करतो की जसं तुला वाटतं की स्त्रीयांना जगण्याचा हक्क आहे तसंच मलाही वाटतं की त्यांना तो हक्क आहे आणि यासाठी नवरा जिवंत असणे/नसणे वगैरे कसल्याही अटी शर्ती असण्याचं काहीही कारण नाही.

मूळात मला तुझ्या पत्रातले वेगवेगळे मुद्दे पद्मावत(ती)शी न जोडता बघितल्यास कायमंच पटत आलेले आहेत. किंबहुना हे सगळे मुद्दे पद्मावत(ती) सारख्या तद्दन गल्लाभरु सिनेमाशी जोडणं मला पटलेलं नाही. काहीही करुन ओढून ताणून हे मुद्दे पद्मावत(ती)शी जोडण्याचा प्रयत्न केल्यासारखं वाटतंय. तुझ्यासारख्या अभ्यासू व्यक्तीकडून हे असलं काहीतरी आलेलं असल्यामुळे त्याला माझ्यालेखी महत्व आहे. हा सिनेमा एका राणीच्या जीवनावर आधारीत आहे जिच्या आयुष्याचा शेवट हा जौहारने झाला. तिच्या जीवनावरचा सिनेमा काढताना दिग्दर्शकाने त्यातून जौहार वजा करुन कसा काय सिनेमा काढावा? तेरावं शतक आणि आत्ताचा काळ यात जमिन-आसमानापेक्षाही जास्त फरक आहे स्वरा, अगं तेव्हाच्या स्त्रियांची मानसिकता आणि आत्ताच्या स्त्रियांची मानसिकता यात फरक आहे, निश्चितंच आहे. बरं तुझ्या पत्राला उत्तरं देताना दोन्ही बाजूच्या (समर्थक आणि विरोधक) लोकांनी जौहार बरोबर की चूक यावर हिरीरीनं मतं मांडलीयेत पण मूळात जौहारचं समर्थन करण्याच्या प्रश्नंच येत नाही. आणि ते त्याकाळी बरोबर होतं का चूक यावर बोलण्याचा माझा उद्देशही नाही. आपल्याकडे ना लोकांवर संस्कार करण्याची, उपदेश, संदेश देण्याची वगैरे जबाबदारी कायम सिनेमावर का टाकली जाते ते कळत नाही मला. दोन वर्षापूर्वी आलेल्या सैराटवर अशीच चहूबाजूनी टिका झाली होती की यामुळे कुमारवयातल्या किंवा तरुण वयातल्या मुलामुलींवर वाईट संस्कार होतील. सिनेमा म्हणजे काय तीन तासाचा संस्कार वर्ग असतो का स्वरा, थिअटरमध्ये जाऊन  तीन तास उपदेश पिऊन लोक बदलून जायला? सैराटच्यावेळी हा सिनेमा प्रस्थापितांविरुद्ध आहे म्हणत हिरीरीने नागराज आणि पर्यायानं सैराटच्या बाजूने बोलणारे कित्येकजण आज तुझं पत्र वाचून मात्र पद्मावत(ती)ने चुकीचा संदेश दिलाय, चूकीच्या पद्धतीचं उदात्तीकरण वगैरे केलंय म्हणत गळा काढतायेत. हे जर खरं असेल तर आपण आपल्या लेकराबाळांना सगळ्या आदर्श सिनेमांच्या सीडीज आणून घरीच बघायला देऊ या की कशाला शाळेत वगैरे घालायचं किंवा आपण काहीतरी चांगलं शिकवायची जबाबदारी घेयची स्वतःवर? आणि या न्यायाने अक्षय कुमारचे टॉयलेट, बेबी, पॅडमॅन, हॉलिडे वगैरे सिनेमेच बेस्ट कॅटेगरीत येतील की, बाकी सिनेमा बनवण्याची सगळी कौशल्य चूलीत जाऊ दे नाही का? उपदेश, बोध देणारे सिनेमेच बेस्ट असं म्हणायचं काय आपण मग? आणि एका सिनेमाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा हा (तुझ्या पत्राची वाह वा करणाऱ्या) दुटप्पीपणा काय पटला नाही आपल्याला.

मी २०१४ मध्ये दिग्दर्शक उमेश कुलकर्णीचा "शूट अ शॉर्ट" नावाचा  शॉर्ट फिल्म मेकींगवरचा चार दिवसाचा वर्कशॉप केला होता. त्यामध्ये तो आम्हाला जगभरातल्या वेगवेगळ्या शॉर्टफिल्म्स दाखवायचा आणि प्रत्येक फिल्म बघून झाल्यानंतर तो आम्हाला या फिल्ममधून तुम्हाला काय कळलं असं विचारायचा. त्याची गिरणी आणि गीतांजली रावची प्रिंटेड रेन्बो नावाची फिल्म दाखवल्यावर त्याने असंच विचारलं काय कळलं बघून. मी म्हणालो होतो, "गिरणीमध्ये त्या लहान पोराचं बालपण पिसून गेलं आणि प्रिंटेड रेन्बोमध्ये एकाकी असलं तरी आयुष्य एंजॉय करता आलं पाहीजे हा संदेश दिलाय दिग्दर्शकाने". बरं हे उत्तर दिल्यावर आपल्याला लै काहीतरी कळतं या अविर्भावात मी पुढे उमेश काय बोलतो हे ऐकत होतो. पुढे उमेश म्हणाला, "प्रत्येक सिनेमा किंवा शॉर्ट फिल्म आपल्या काहीतरी संदेश देते, आपण त्यातून काहीतरी बोध घेयलाच पाहीजे हा गैरसमज पहिल्यांदा मनातून काढून टाका. कोणी आपली गोष्टंच नाही सांगायची का तुम्हाला, प्रत्येक गोष्टीत तुम्ही काय संदेश दिलाय हेच कसं काय शोधत बसता". म्हणजे आता पद्मावत(ती)मुळे समाजावर घातक परीणाम वगैरे होतील हे तुझं म्हणणं फारंच पोकळ वाटतंय मला. याशिवाय या सिनेमाच्या टीमपैकी कोणीही जौहर प्रथा त्याकाळी का असेना बरोबर होती असं समर्थन केलेलं नाही हेही लक्षत घेयला नको का आपण? बरं तुझ्या पत्राला समर्थन देणाऱ्या काहीजणांचं असं म्हणणं आहे की दाखवायचाच होता जौहार तर फक्त उंच ज्वाळा दाखवायच्या होत्या पडदाभर, म्हणजे प्रतिकात्मक पाहिजे होता. अगं जुन्या सिनेमांमधे प्रणयदृष्याच्या जागी दोन फुलं एकमेकांच्या जवळ येताना बघून कुत्सित हसणाऱ्या पिढीला हे असलं प्रतिकात्मक आवडलं असतं का? आणि त्याही पुढे जाऊन भंसाळीला जे दाखवायचंय ते दाखवण्याचं स्वातंत्र्य त्याला नसावंच का?

संजय लीला भंसाळीचे सुरुवातीचे काही अपवादात्मक सिनेमे वगळल्यास त्याने आऊट अँड आऊट कमर्शिअल सिनेमे काढलेत आणि अशा कमर्शिअल सिनेमे काढणाऱ्या माणसाने जौहर वगळून सिनेमा काढावा अशी अपेक्षा करणंच भंपकपणाचं लक्षण आहे. पत्राच्या सुरुवातीला एकीकडे तू म्हणतेस की तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित रहायलाच पाहीजे आणि एकीकडे तुझी अशी अपेक्षा असते की एका ऐतिहास गोष्टीवर सिनेमा काढताना त्यातल्या एका घटनेचा संदर्भ वगळून किंवा तुला पटेलशी चित्रित करुन त्याने सिनेमा काढावा, कमालंच आहे सगळी. शिवाय तू पत्रात लिहिलं आहेस की तू संपूर्ण कुटुंबंच काय तर तुमच्या आचाऱ्यालाही सिनेमा पहायला घेऊन गेली होतीस. अरे पण मग सिनेमा बघायला जाताना तुझ्यासारख्या अभ्यासू व्यक्तीला माहीत असेलंच ना की राणी पद्मावतीने जौहर करुन आयुष्याचा अंत केला की तू आमच्यासारखी काहीही माहीत नसताना "सालीनं केला घोटाळा" नावाचा सिनेमा बघायला गेली होतीस? सिनेमाला जाताना आम्हाला वाटलं होतं साली म्हणजे बायकोच्या बहिणीनं कायतरी घोटाळा केला असणार पण सिनेमातल्या मास्तरचा पाय केळाच्या "सालीवरुन" घसरुन त्याची स्मरणशक्ती गेल्यानं झालेला घोटाळा होता त्या सिनेमात. तर पद्मावत असो की पद्मावती या दोन्ही नावावरुन सिनेमात काय असणारे याबाबत असा संभ्रम होण्याची काहीएक शक्यताही नाही. संजय लीला भंसाळीचा सिनेमा बघताना तो कमर्शियल अंगाचा नसून काहीतरी बोध देणारा असेल अशी अपेक्षा करणं म्हणजे सलमानचा सिनेमा बघायला जाताना काहीतरी सशक्त गोष्ट बघायला मिळेल किंवा सत्यजित रायच्या सिनेमात तडकतं फडकतं आयटम साँग बघायला मिळेल अशी अपेक्षा करण्यासारखं नाही का हे? तुझ्या पत्रातले स्त्रीवादाशी निगडीत मुद्दे स्वतंत्रपणे अगदी अचूक असले तरी ते पद्मावत(ती)शी जोडल्याने ते सुसंगत वाटत नाहीत बघ. साने गुरुजी नावाचा सिनेमा बघायला जावं आणि त्यात सनी लिओनीचं आयटम साँग बघून दातखिळ बसावी अशी प्रतिक्रीया का देते‍एस? उद्याला तू अनुराग कश्यपचा सिनेमा बघायला गेल्यावर म्हणशील,"फ... से फँटम क्यू बोला आपने? फ... से फेमिनिझम भी तो बोल सकते थे स्सर". तू एका तद्दन कमर्शियल सिनेमाचा सध्याच्या समाजातल्या विकृती आणि स्त्रीयांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांशी संबंध जोडण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न बघून हे असलं फालतू उदाहरण द्यावसं वाटलं.

आजकाल सोशल मिडीयावर प्रत्येक गोष्ट ही आदर्शपणाच्या तराजूमध्ये तोलायची टूमंच निघालीये. आणि स्त्रीवादंच नुकसान स्वतःला स्त्रीवादी म्हणणाऱ्या तथाकथित स्त्रीवाद्यांनीच जास्त केलंय असं मला तरी ठामपणे वाटतं. स्त्रीवादाचा अर्थ स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान हक्क असणं असा न घेता आजकालचे तथाकथित स्त्रीवादी लोक पुरुष जो बथ्थडपणा युगानुयुगे करत आलेत तोच बथ्थडपणा करुन बायकांनी त्यांची बरोबरी करणं असा घेतात. मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये असहिष्णूतेबद्दल बोलताना जावेद अख्तर म्हणाले होते,"मुझे लोग मिलते है और बोलते है साहब पीके मे आपने  हिंदू धरम के बारे मे ईतनी लिबर्टी ले ली, मुसलमानो के साथ लेते? तो क्या मुसलमानो जैसे बनना चाहते हो? अरे भाई कोशिश करो के वोह तुम्हारे जैसे हो जाए ईस मामले मे, बजाय ईसके के तुम उन के जैसे हो जाओ. किस से मुकाबला कर रहे हो? तालिबान से? अल्‌कायदा से? साहब देखिये वोह तो नही सुनते, वोह तो मार डालते है. तो मतलब आप भी वैसा होना चाहते है? मत करो ऐसा". मला वाटतं त्याच दिशेने तथाकथित स्त्रीवाद्यांचा प्रवास चाललाय. पुरुषांच्या ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या अंगीकारुन स्त्री-पुरुष समानता होणार आहे का? नाही होणार. आता तुला वाटेल मधेच काय हे तथाकथित स्त्रीवाद्यांबद्दल बोलतोय मी. हे बोलण्याचं कारण म्हणजे मला तुझं पत्र ते त्यातल्याच एखाद्या तथाकथित स्त्रीवाद्यानी लिहिल्यासारखे वाटले. आणि सद्याची सामाजिक परीस्थिती बरी नाही हे जरी खरं असलं तरी एका सिनेमामुळे म्हणजेच पद्मावत(ती) बघून तुला स्त्रीया फक्त योनीपुरत्याच मर्यादीत असल्याचं वाटलं हे वाचून खूप वाईट वाटलं.

संजय लीला भंसाळीच काय दुसऱ्या कोणाही सिनेदिग्दर्शकाला त्याची गोष्ट सांगण्याचा, त्याला हवी तशी सांगण्याचा अधिकार आहे आणि तसाच आपल्याला पटत नसल्यास आपण तो सिनेमा न पाहण्याचा आणि डब्ब्यात घालण्याचा आपल्याला निश्चितंच अधिकार आहे पण तुझी गोष्ट तू मला हवी तशीच पडद्यावर दाखव म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही, नक्कीच नाही.
सॉरी पण तुझ्यासारख्या गुणी, अभ्यासू, संवेदनशील व्यक्तिने या तथाकथित सुधारणावादी, स्त्रीवादी, बुद्धीवादी लोकांच्या रांगेत जाऊन बसू नये असं मनापासून वाटतं म्हणून हे माझं म्हणणं मांडण्याचा खाटाटोप करतोय कारण तू तथाकथित नाहीस तर आंतर्बाह्य खरी आहेस असं मला वाटतं.

केपी आर

Monday, January 15, 2018

मुक्काबाज


बऱ्याच दिवसांपासून मुक्काबाजबद्दल वाचत होतो, जगभर वेगवेगळ्या फिल्म फेस्टीवल्समध्ये वाहवा मिळवलेल्या मुक्काबाजचं ट्रेलर बघितल्यापासून पिच्चर बघायचाच हे ठरवलं होतं. And I must say it's worth the wait.

पात्रांची निवड, अभिनय, कथा, गाणी, बॅकग्राउंड स्कोअर, डायरेक्शन सगळ्याचीच भट्टी पर्फेक्ट जमून आलीये.

अनुराग कश्यपला जे लोक फॉलो करतात त्यांना एव्हाना त्याचं व्यक्तिमत्वं, त्याचे विचार कशाप्रकारचे आहेत हे बऱ्यापैकी समजलेलं असावं. घाबरणं त्याच्या गावीच नाही, अंगावर आलं की तो शिंगावर घेतो, तो सोशल मेडीयावरही शोषितांचा आवाज होतो किंवा चुकीच्या गोष्टी आणि लोकांविरुद्ध आवाज उठवतो. त्याचं हे व्यक्तिमत्वं विशेष त्याच्या सिनेमांतूनही ठळकपणे दिसत राहतं.

मुक्काबाजमधे तो बॉक्सिंगमधल्या आणि पर्यायानं खेळातल्या राजकारणावर प्रभावीपणे बोट ठेवतोच पण तो त्याची गोष्ट फक्त तेवढ्यापुरती मर्यादीत ठेवत नाही तर देशामधल्या सद्यपरीस्थितीलाही तो त्या कथेमध्ये अगदी बेमालूमपणे गुंफतो. फिल्मच्या ओपनिंग सीनमध्येच काहीजण तोंडावर फडकी बांधून गायी वाहून नेणाऱ्या पोरांना बांधून मारत असतात, मोबाईलच्या कॅमेऱ्यात त्यांचा विडिओ काढताना, "ईन को मारने के लिये ले जा रहे थे बोल" असं कॅमेऱ्यासमोर बोलायची जबरदस्ती करताना दिसतात. या सीनचा तसा फिल्मच्या कथेशी थेट संबंध नाही पण उत्तर प्रदेशमधली sociopolitical परीस्थिती कशीये हे दाखवण्याचं आणि प्रेक्षकाच्या मनावर ठसवण्याचं काम हा दोनेक मिनिटाचा सीन पर्फेक्टली करतो. सद्यपरिस्थितीवर भाष्य करण्याचं अजून एक उदाहरण म्हणजे श्रवणच्या दलित कोचला त्याचा शेजारी मेजवानीनंतर उरलेलं मटन आणून देतो आणि त्यानंतर दोनंच मिनिटात जमाव घरात घुसून गायीचं मांस शिजवलं म्हणून त्याला आणि श्रवणला बेदम मारतो.

श्रवण (विनित कुमार सिंग) आणि सुनैना (झोया हुसैन) यांच्यातल्या प्रेमकथेला वेगवेगळे अँगल्स आहेत. सुनैना भगवानदास मिश्राची (जिमि शेरगिल) पुतणी आहे. भगवानदास मिश्रा हा बरेलीमधला बॉक्सिंगचा सर्वेसर्वा आहे, तिथल्या सगळ्या नवोदित बॉक्सर्सचा तो गुरु आहे, शिवाय जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये कोणता खेळाडू खेळवायचा कोणत्या गटात खेळवायचा हे सगळं भगवानदासच्या हातात आहे. नावाप्रमाणेच तो भगवान म्हणजे देव आहे, कुठल्याही परीस्थितीत त्याला विरोध करणारे बॉक्सर्स बरेलीमध्ये नाहीत. विरोध हा शब्दंच त्याच्या डिक्शनरीमध्ये नाही, त्यामुळे त्याला विरोध करणाऱ्या श्रवणचं करीयर कुजवण्याच्या ईरेला तो पेटतो. घरात गावात कोणाचीही त्याच्याविरोधात ब्र काढायची हिंमत नाही आणि त्याला अपवाद ठरते फिल्मची नायिका सुनैना. सुनैना मुकी आहे पण त्याच्याविरोधात सगळ्यात मोठा आवाज तिचा आहे आणि तो आवाज तिच्या देहबोलीतून आणि नजरेतून दिसत राहतो. तिच्या पात्राला सुनैना नाव देणंही त्यामुळे अगदी चपखलंच. सुनैनावर लव्ह अ‍ॅट फर्स्ट जडलेल्या श्रवणसमोर तिच्याशी लग्न करण्यासाठी नोकरी मिळवण्याची अट असते आणि त्यामुळेच फार मोठी स्वप्नं नसतात त्याची. त्याला सुनैनाशी लग्न करण्यासाठी जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत जिंकून रेल्वेमध्ये नोकरी मिळवायचीये बास पण त्यासाठी त्याला भगवानदासचा विरोध मोडून काढावा लागणार आहे. श्रवण आणि भगवानदासमधला हा संघर्ष मोठ्या पडद्यावर बघणं हा एक अमेझिंग अनुभव आहे.

अभिनयाच्या पातळीवर विनितकुमार सिंगसोबतंच बाकी सर्वांनीच कम्माल केलीये. विनितने तर फिल्मसाठी बॉक्सिंगचं प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलंय, त्याची तब्येत आणि सामन्यांच्याआधीची तयारी बघणं इज अ रीयल ट्रिट. त्याचा रागाने एकवटलेला पंच, बायको हरवलेली असताना चेहेऱ्यावरची असहायता आणि एकूणंच बॉक्सरची देहबोली त्याने ईतक्या प्रभावी आणि प्रामाणिकपणे मांडलीये की तुम्ही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहू शकत नाही.
जिमि शेरगिलने रंगवलेला खलनायक जबरदस्त. आडदांड तब्यत नाही की दिसायला क्रूर नाही तरीही भगवानदास मिश्राची भीतीही वाटते आणि रागंही येतो. उच्च जातीचा असल्याचा माज आणि अहंकार त्याच्या चेहेऱ्यावरुन ओसंडून वाहत राहतो. हम ब्राह्मण है हम आदेश देते है असं म्हणतो तेव्हा किंवा बाटलीत लघवी करुन श्रवणला अमृत समझ के गटक जाओ जीवनदान मिल जायेगा म्हणतो तेव्हा किंवा वेटर ईन के लिये अलग जग मे पानी ले के आओ म्हणतो तेव्हा किंवा जेव्हा जेव्हा पडद्यावर श्रवणसोबत त्याचा संघर्ष रंगतो तेव्हा प्रेक्षकांना त्याची चिड आल्याशिवाय राहत नाही.
नवोदित झोयानंही सुनैनाची भूमिका एकदम ताकदिनं निभावलीये.
रवि किशनंही श्रवणच्या दलित कोचच्या भूमिकेत पर्फेक्ट. खेळाबद्दल पॅशन असणारा, विशेषतः पेलेचा खेळ बघून फूटबॉल आवडणारा पण दलित असल्यानं संधी नाकारण्यात आलेला, बाकीचे त्रास देतात म्हणून एकेकाला बुकलून काढणारा लहान मुलगा पुढे जाऊन बॉक्सर बनतो आणि तरुणपणातंही संधी न मिळाल्याने नंतर सच्ची पॅशन असलेल्या चेल्याच्या शोधात बॉक्सिंगचा कोच बनतो. भगवानदास आणि तो समोरा समोर आल्यावर भगवान त्याला विचारतो कौन हो... ब्राह्मण हो, क्षत्रिय हो, कायस्थ हो? तेव्हा तो उत्तर देतो, उसी चौथी जात के है जो आप को मुँह से बोली नही जाती, हरीजन. तो सीन म्हणा की अभी येह तुम्हे खुद तय करना है के तुम्हे मुक्काबाज बनना है या मुक्केबाज रवि किशन जीव ओतून काम करतो.

फिल्ममधली सगळीचं गाणी मस्तं आहेत आणि ती पर्फेक्ट टायमिंगला येतात मग ते हम पहला धक्का नही मारे असो, पैंतरा असो की बहुत हुवा सम्मान असो सगळीच गाणी फिल्मचा आलेख सतत चढता ठेवण्यात मदत करतात.

अनुरागचं डायरेक्शन अप्रतिम आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. सामाजिक आर्थिक परिस्थिती कमालीची आणि टोकाची भिन्न असणाऱ्या नायक नायिकेची कहाणी पडद्यावर मांडताना तो सद्यपरिस्थितीत असणारे कळीचे/चिघळलेले मुद्दे जागोजागी पेरतो. नायकावर होणारा अन्याय बघताना आपल्याला कमालीचा राग येतो, रक्तं उसळतं, त्या नायकाची लढाई आपल्याला आपली लढाई वाटायला लागते, आपल्या देशात पैसा आणि पॉवरच्या जोरावर काहीही करता येतं याचा प्रत्यय येतो, आपण असल्या पॉवरफुल भिकारचोटांच्यामध्ये राहतोय आणि त्यांचं आपण काहीही वाकडं करु शकत नाही यामुळे आपल्याला असहाय्य वाटू लागत आणि आपली चिड अजूनंच वाढते. एक डायरेक्टर म्हणून अनुराग ईथे जिंकतो असं मला वाटतं. राजकारणामुळे खेळाडू आणि खेळाची लागलेली वाट, डोपिंग, बॉक्सिंगच्या स्पर्धेसाठी राखून ठेवलेला हॉल स्वतःच्या कार्यक्रमासाठी पुढाऱ्याने ऐनवेळी बळकावणे, कुठेतरी उजाड रानात होणाऱ्या स्पर्धा, कोट्यातून मिळणारी सरकारी नोकरी किंवा राजकारण्याचा बॉडीगार्ड होण्यासाठी बॉक्सिंग करणारी तरुण पोरं, तब्येत कमवून पुढाऱ्याच्या मागेपुढे हांजी हांजी करत फिरणारी तरुण पिढी, स्पोर्ट्स कोट्यातून सरकारी नोकरी लागलेल्या पोरांना वरीष्ठांकडून मिळणारी वागणूक सगळे सगळे बारकावे अनुराग खूपंच चांगल्या पद्धतीनं मांडतो.


फिल्ममधले संवादही खुसखुशीत आणि जबरदस्त आहेत.
ईज्जत पे (इथे "ज"चा उच्चार "ज्ज्य" असा करायचा) हग चुके हो नाम पे मुत चुके हो
आप ने ऐसे कौनसे झंडे गडे है? आप का एक अचिबमेंट बताओ हमे. अरे हम ई तो जीत के लाये है जिस से आप किल भी नही ठोक सकते लेकीन उस के उपर जो ढक्कन है ना बहोत काम आता है मुँह पे लगाओ तो बकवास बंद और नीचे लगाओ तो हगवास
वगैरे वगैरे डायलॉग्ज जमून आलेत.

शेवटी भगवानला पंचेस मारताना प्रत्येक पंचसोबत भारत माता क्की ज्जय, भारत माता क्की ज्जय डायलॉगचा वापर करुन जमवून आणलेला sarcasmही बेस्ट.

जिमि शेरगिल आणि विनितच्या जुगलबंदीसाठी, अप्रतिम अभिनयासाठी, जबरदस्त डायरेक्शसाठी आणि फिल्ममध्ये जे जे काय हवं ते सगळं देणारं एक उत्कृष्ठं पॅकेज म्हणून मुक्काबाज बघायलाच हवा.

तळटीप: सद्याची एकूण सामाजिक राजकीय परिस्थिती बघता अनुरागला ट्रोल करणे, मोर्चा काढणे, ठराविक सीन्सवर बंदी घालायची आणि अनुरागला पाकिस्तानात पाठवण्याची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केपी आर

Thursday, December 7, 2017

द शो मस्ट गो ऑन

"द शो मस्ट गो ऑन"
खूप आवडायचं हे वाक्य नाही तुम्हाला
मी गेल्यावर सेलिब्रेट करा
रडू नका...
सांगायचात आम्हाला नेहमी हसून
पण तुम्ही गेल्यापासून
एकसारखा पाऊस पडतोय
हिवाळा असूनंही
रडू नका सांगायचात आम्हाला
मग... आता ही चिटींग नाहीये का
सांगा ना

०६/१२/२०१७

हे घर मोकळं मोकळं वाटतं
तुम्ही गेल्यापासून खरतंर
गर्दी वाढलीये ईथे
भेटणारे, सांत्वन करणारे
आणि खांद्यावर हात ठेऊन
आम्ही आहोत सांगणारे येतात
मी शून्यातली नजर
त्यांच्यासोबत मिळवायचा प्रयत्न करतो
कोण काय सांगतंय हे कळो न कळो
होकारार्थी मान हलवतो सगळ्यांनाच
जुन्या एकाकी पडक्या वास्तूंची भगदाडं कशी असतात
तशाच घराच्या कानाकोपऱ्यात आठवणींची भगदाडं पडलीयेत
त्याच्यातून आरपार बघताना
तुम्ही दिसता ठळक...
मग स्वतःकडे आरश्यात पाहिल्यावरही
फक्त तुम्हीच दिसता...
तुम्ही माझ्यात आहात याचं समाधान वाटतं
पण याव्यतिरीक्त...
दुसरीकडे कुठेही बघितलं तर
हे घर मोकळं मोकळं वाटतं

आय लव्ह यू भाऊ

०७/१२/२०१७

तो डॉक्टर म्हणाला होता मला
७२ तास यांना जगवलं व्हेंटीलेटरवर तर
बघतिल कदाचित तुझ्याकडे
डोळे उघडून
ओळखतील तुला
आणि कोणास ठाऊक
काही मिरॅकल झालंच तर
बोलतीलंही तुझ्याशी... पण..
पण वाचणार नाहीतच..
आत्ता कसंय विचारल्यावर म्हणाला
आत्ता काही कळत नाहीये त्यांना
वेदना, यातना, स्मृती... काहीच नाही
सेमी कोमामध्ये आहेत
कानात तुमचे शब्द ऐकू आले
मला व्हेंटीलेटरवर जगवू नका
म्हणाला होता तुम्ही ताई आणि मला

जगवायचं कशासाठी तर...
तुम्ही वाचणार नाहीत हे सांगण्यासाठी
पण व्हेंटीलेटर काढा
असं सांगायला जीभ रेटली नाही
कदाचित आयसीयू बाहेर
आमची द्विधा मनस्थिती
तुम्हाला बघवली नसेल
व्हेंटीलेटर चालू असतानाच
तुम्ही थांबायचं ठरवलंत
तुम्ही डोळे उघडून पाहीलं नाहीत माझ्याकडे
बोललाही नाहीत काहीच
तुम्ही हॉस्पिटलमध्ये गाढ झोपेत असताना
मी कित्येकदा येऊन म्हणायचो
आय लव्ह यू भाऊ
आजही म्हणतो रोज
तेव्हा वाटायचं तुम्ही ऐकलं नसेल कधीच
पण आज वाटतं तुम्ही नक्की ऐकल असेल
ऐकत असाल... आजंही
आय लव्ह यू भाऊ!

०७/१२/२०१७

रोज चिकाटीनं सकाळचा एक दिड तास
एकेक माणूस आठवून
सगळ्यांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवायचात तुम्ही
मग एक दिवस
मी तुम्हाला ब्रॉडकास्ट करायला शिकवलं
त्यात तुम्ही माझं नावंही ईन्क्लुड केलंत
हॉस्पिटलच्या बेडवर पाठ टेकवण्याआधी
तुम्ही शेवटचा ब्रॉडकास्ट केलात
"ईफ यू फॉल, आय विल बी देअर" गुड मॉर्निंग
आता व्हॉट्सॅप उघडायची ईच्छा होत नाही
जपून... लक्षपूर्वक पावलं उचलावी लागतात आता
तुम्ही म्हणाला होता
"ईफ यू फॉल, आय विल बी देअर"
पण आता...
पडून चालायचं नाही

आता रोज सकाळी उठून
तुमचा शेवटचा मेसेज वाचावासा वाटतो
"ईफ यू फॉल, आय विल बी देअर"

Friday, September 22, 2017

टिमलख लख ते टिमलख लख


नेहमीच्या सवयीनं सूर्य पूर्वेकडून काँक्रिटच्या जंगला पलिकडून डोकं वर काढत असतो. तुम्हाला आजकाल सकाळी उठण्यासाठी अलार्म लावायची गरज नसते. रात्री व्हॉट्‌सॅप फेसबूक वगैरेवर निरर्थक चर्चा चर्वितणं झोडता झोडता झोपी जाताना उशाशी कुठेतरी पडलेला मोबाईल उचलून तुम्ही डोळे किलकिले करुन चमकणाऱ्या स्क्रिनवर वेळ बघता, अजून पाऊणेक तासानं उठलं तरी चालेल असं मनाशी गणित बांधत पाठीचं दुखणं कमी व्हावं म्हणून गुडघे दुमडून पाय पोटाशी घेत एका कुशीवर पडून राहता, अजून थोडावेळ झोपण्यासाठी, झोप जरी लागली नाही तरी अजून थोडावेळ अंथरुणात रेंगाळायला मिळणार आहे याचा आनंद असतोच. चुरचुरणारे डोळे मिटल्यावर तरीही दहा-पंधरा मिनिट का होईना झोप लागावी वाटत असताना पहाटेच पडलेल्या कसल्याशा अगम्य स्वप्नाची मनातल्या मनात उजळणी करायला सुरुवात होते, तुम्ही मिटल्या डोळ्यानंच मान हलवून ती स्वप्नं डोक्यातून झटकून टाकायचा प्रयत्न करता, मग उलटे आकडे मोजायला सुरुवात करता. आता झोप लागणारंच तेवढ्यात साला आदल्या दिवशी संध्याकाळी कंटाळा आला म्हणून काम आर्ध्यात सोडून लॅपटॉप बंद करुन ऑफिसमधून निघताना, घरी जेवण झाल्यावर करु म्हणून राहीलेलं अर्जंट काम आठवतं. भूत दिसल्यासारखं तुम्ही खाड्‌कन उठून बसता, दोन मिनिटांच्या टेंशन नंतर आता गडबड करण्यात काही एक अर्थ नाही हे लक्षात आल्यावर तुम्ही राहीलेलं काम आज पहिल्यांदा कसं करायचं याचं प्लानिंग करत करत जागचे उठता तेव्हा ठरलेल्या वेळेच्याआधी उठल्यामुळे तुमच्याकडे आवरण्यासाठी बऱ्यापैकी मार्जिन असतं. मग जमेल तेवढं अंग स्ट्रेच करुन मोठ्यानं आळस देऊन, व्हॉट्‌सॅपवर ठरलेला गुड मॉर्निंग मेसेज ब्रॉडकास्ट करुन, दाराबाहेर पडलेले न्यूजपेपर आत आणून चाळत चाळत आपला मोर्चा फेसबूककडे वळवता. फेसबूक मेमरीचं दार तुमच्यासाठी सताड उघडं करुन तयार असतंच. एक नजर घड्याळाकडे ठेवून आवरायचं ठरवलेलं विसरुन तुम्ही स्वतःच्याच मेमरींना हात घालता. एकदोनतीनचारपाच... सातसात वर्षापूर्वीपर्यंतचा ऑनलाईन नॉस्टॅल्जिया फेसबूक तुमच्यापुढे पेश करतं. तुम्ही स्वतःच्याच पोस्ट्‌स वाचत बसता, स्वतःच्या जुन्या फोटोवरच्या कमेंट्‌स खुळ्यासारख्या वाचता, हसता... कुठलीतरी बरी आणि अजूनंही रीलेवंट वाटणारी पोस्ट कॉपी करुन रीपोस्ट करता, रीपोस्ट करताना तुमच्या फोनवरचं टूजी नेट मान टाकायला लागतं, मग तुम्ही दोन मिनिटासाठी थ्रीजी नेट चालू करता कारण भोक पडलेल्या बादलीतून बदाबदा गळणाऱ्या पाण्यासारखी तुमच्या स्मार्ट फोनची बॅटरी भसाभसा उतरायला लागलेली असते. ह्याशट्याग रीपोस्ट म्हणून झाल्यावर त्याच फोनवरच्या उजव्या कोपऱ्यातल्या आत्तापर्यंत दुर्लक्षिलेल्या छोट्याशा घड्याळाच्या आकड्यांकडे नजर जाते.

थोड्यावेळापूर्वीच आज वेळेच्याआधी आपलं नक्कीच आवरुन होणार असं वाटलेलं तुम्हाला आठवतं. आता मात्र पटापटा आवरलं तर जास्तं नाही पण पंधराएक मिनिट लेट का असेना आपण ऑफिसला पोहचूच असं मनातंच म्हणत तुम्ही पळतंच बाथरुम गाठता. आंघोळ वगैरे उरकून कपडे घालण्यासाठी कपाट उघडल्यावर कालच्या शर्टाला घामाचा वास येतोय हे लक्षात येण्याआधीच बायको तुम्हाला म्हणते कालचा शर्ट घालायचा विचारंही नको करुस. हिंदी सिरीयलमधलं झूम्म झूम्म झूम्म्म म्युझिक वाजल्यासारखं तुम्ही बायकोकडे बघता, बायको चेहेऱ्यावरचे भाव कणभरंही न बदलता म्हणते, "वास येतोय त्याला". चरफडत, पायाखाली विस्तव लावल्यासारखे तुम्ही घाई घाईत ईस्त्री चालू करता, ईथून पुढे तुमचं मल्टी टास्कींग चालू होतं. ईस्त्रीमधे पाणी भरुन टेंपरेचर कंट्रोलचं बटन तुम्ही वूलवर सेट करता, ईस्त्री तापेपर्यंत घाईघाईत तोंडाला अंगाला मॉश्चरायझर चोपडता, काल रात्री तसाच उघडा ठेवलेला लॅपटॉप स्विचॉफ न करता आहे असा बंद करता, चार्जर आणि लॅपटॉप बॅगेत भरेपर्यंत ईस्त्री तापलेली असते. ईस्त्री करुन पटकन निघावं म्हणत असतानाच नेमका लेक उठून तुमच्यासमोर येऊन उभा राहतो. आबा काय करतोयेस रे असं त्यानं विचारल्यावर तुम्ही त्याला म्हणता जेवतोय, तोही तुमचा बाप निघतो, "श्लिखंड खातोयेश काय" असं विचारुन तो हसतो. त्या गडबडीतंही सगळं सोडून तुम्हाला हसायला येतं तुम्ही त्याला जवळ ओढता, गालावर कपाळावर पपी दिल्यावर तो गुड मॉल्गिंग म्हणतो आणि मला घे मला घेचा घोशा लावतो. एव्हाना पंधरा मिनिट लेट पोहोचण्याचीही वेळ निघून गेलेली असते. तुम्ही त्याला उचलून घेऊन आख्ख्या घराची एकदा फेरी मारता, गाण म्हणता, त्याला कडेवर घेऊन थोडासा डांस करता, अरे पल्ला पल्ला पल्ला करुन त्याला सोडल्याचं नाटक करुन परत पकडता, तो तुम्हाला घट्ट मिठी मारुन बसतो. चला आता मला ऑफीसला जाऊ दे म्हणून त्याला उतरवायला लागल्यावर तो तुम्हाला अजूनंच घट्ट चिकटून बसतो, मलाही आपिचला येयचंय म्हणत हसतो. मग तो एकेक डिमांड समोर ठेवतो, चॉक्की, मोठं चॉक्की, दोन चॉक्की बायनोक्युलल म्हणता म्हणता कधी कधी तर मला घर आण म्हणतो, तुम्ही हसता तोही मोठ्यानं हसतो पण तुमच्या मानेभोवती गुंडाळलेले हात सोडत नाही. माझे सर मारतील हा मला ऑफीसला नाही गेलो तर या वाक्याची मात्रा लगेच लागू पडते. तो खाली उतरुन मग तुम्हाला टाटा करतो, लवकर ये सांगून तुम्ही पायऱ्या उतरु लागलात की हॉलमध्ये पळतो, हॉलची खिडकी उघडून खिडकीत उभा राहून तुम्हाला मोठ्यानं आवाज देऊन टाटा करतो, फ्लाईंग किस देतो, त्याच्यासाठी काय काय आणायचं याची लिस्ट सांगतो गाड्यांच्या आवाजात तुम्हाला नीटसं काही ऐकू येत नसतं पण तुम्ही हो हो म्हणत गाडी काढता, हात उंचावून बाय करताना त्यानं बेंबीच्या देठापासून लवकर ये सांगितलेलं तेवढं नीट ऐकू येतं आणि दारातून निघाल्यापासून ऑफिसमध्ये पोहचेपर्यंत तुम्हाला खिडकीतून टाटा करणारा तुमचा लेक दिसत राहतो.

पंधरा मिनिट म्हणता म्हणता ऑफिसमध्ये पोहोचायला  तुम्हाला चांगला तासभर तरी उशिर झालेला असतो.
खाली मान घालून कामाचा रतीब ओतणाऱ्या माणसांच्या गर्दीत, बंद खुराड्यात थंड हवा ओतणाऱ्या एसीखाली तुम्ही लॅपटॉप उघडून बसता तेव्हा उशिरा का होईना चालू झालेला एक रटाळ दिवस तुमची आ वासून वाट बघत बसलेला असतो. त्या मॉर्निंगमध्ये गुडचा कसलाही लवलेश नसतानाही तुम्ही समोर येणाऱ्या प्रत्येकाला गुड मॉर्निंग म्हणत असता, मला खोटेपणा जमत नाही असं इंटरव्ह्यूमधल्या एका प्रश्नाला दिलेलं उत्तर सोयीस्कररीत्या विसरुन तुम्ही खोटेपणाच्या लोकसंख्येत अजून एकाची भर घालत राहता. त्या चकचकीत चार भिंतीत कॅलेंडरच्या एका चौकटीतून दुसऱ्या चौकटीत चालण्यासाठी, कॅलेंडरची पानं बदलत राहण्याएवढी तरी शक्ति किंवा त्राण अंगात रहावा अशी ईच्छा मनोमन धरत पुढच्या एक तारखेच्या चौकटीकडे तुम्ही सरपट राहता. भिंतीवर डकवलेल्या घड्याळात भस्सकन बोट घालून त्याचे काटे गरगरा फिरवून संध्याकाळ करावी असं कितीही मनापासून वाटलं तरी तसं करता येत नाही आणि संध्याकाळ झाली म्हणून घरीही जाता येईलंच असंही काही नसतं. खजिन्यावर वेटोळा घालून फणा काढून फण्यावर दहाचा आकडा मिरवत बसलेल्या नागासारखा संध्याकाळी सहा वाजता तुमच्या घरच्या वाटेवर टपून बसलेला बॉस तुमच्या फोनच्या स्क्रीनवर डोलायला लागतो. तुम्ही फोन उचलून कानाला लावल्या लावल्या अमुकेक काम आज केल्याशिवाय जाऊ नकोस, थोडं जास्तं थांबायला लागलं तरी थांब असा फुत्कार तुमच्या कानात सोडून मोठ्या समाधानानं ऑफिसातून निघतो. हिंदी सिनेमात दाखवतात तसा उतारावर घरंगळणाऱ्या दगडासारखा घरंगळत तो पुढच्या पाचव्या मिनिटाला घरी पोहोचतो. तुम्ही टेबलावर वाकलेल्या नाईट लँपसारखे खुर्चीत वाकून कीबोर्डावर बोटं आदळत राहता. तिथून पुढे मात्र तुम्ही एकदा चुकून खाल्लेल्या तंबाखूच्या पानानंतर जेवढ्या जोरानं पृथ्वी तुमच्या आजूबाजूनं फिरली नसेल तेवढ्या जोरात घड्याळाचे काटे चक्रावल्यागत फिरत राहतात.

दिवसभर दबून बसलेला आंधार चोरपावलानं येता येता आजूबाजूला कोणी न दिसल्यामुळं जरा धीटाईनंच ऑफीसच्या आजूबाजूला पसरतो. तुम्ही आतल्या कृत्रिम उजेडात काम संपवायचंय म्हणत स्वतः कणकण संपत राहता. तुम्ही हताश नजरेनं निपचित पडलेल्या स्मार्ट फोनच्या स्क्रीनकडे बघता आणि शेवटचा आशेचा किरण वगैरे म्हणावा असा बॉसचा मेसेज येतो, "उद्या सकाळी बघूया". तुम्ही परत एकदा कालसारखाच अर्धवट काम ठेऊन लॅपटॉप बंद करता, रात्रीचं जेवण झाल्यावर करुया म्हणून. तुम्ही बॅग उचलून आतल्या खोट्या उजेडातून बाहेरच्या शाश्वत आंधारात पाय ठेवता, गाडी काढून निघणार एवढ्यात त्या आंधारात सिक्युरीटी गार्डचं ओळखीचं हसू चमकतं, तुम्हीही सवयीनं हसता, पुढे जाता जाता तुम्हाला उगाचंच जाहीरातीत दाखवतात तसं रीव्हाईटल खाल्ल्यागत फ्रेश वगैरे वाटत... तेही पुढचे पाचेक मिनिटंच. गाडीतल्या रेडीयोवर गाणी चालू होतात, त्यांच्या त्यांच्या शेड्यूलप्रमाणे एकेक करुन कानावर आदळत राहतात. तुम्ही ऑफिसातल्या गर्दीला मागे सोडत रस्त्यावरच्या गर्दीचा एक भाग होता. रस्त्यावर आपल्या बाजूने कचऱ्याची गाडी गेल्यावर महिनोन्‌महिने कुजलेल्या कचऱ्याचा वास जसा अनिर्बंधपणे आपल्या श्वासा श्वासात भरुन राहतो अगदी तसे अनिर्बंधपणे भारतीय विवाहसंस्थेचा ईतिहास ते जागतिक मंदीचे सावट ते दहीहंडीची वर्गणी ते कॉलेजातले आता आपल्याशी न बोलणारे मित्र-मैत्रिण ते कित्येक निरर्थक विषय आपल्या डोक्यात भरभरुन वाहत राहतात. मग मधेच आठवतं वडीलांची बीपीची गोळी संपलीये, गाडीच्या काचेतून आरपार शून्यात बघता बघता तुमच्याही नकळत तुम्ही डॅशबोर्डवरच्या घड्याळाकडे बघता, घरापासच्या मेडीकलपर्यंत पोहोचण्यासाठी अजून पाऊण तास लागणार असतो, मेडीकल अकरा-साडे अकरा पर्यंत चालू असतं असं मनाशी म्हणत तुम्ही चौकातल्या लाल दिव्याकडे बघत थांबता. सिग्नलचं काऊंटडाऊन चालू होतं तेव्हाच रेडीयोवर आमिर खान पापा केहते है बडा नाम करेगा गाणं म्हणायला लागतो, लहानपणी या गाण्यात मोटीवेशन शोधून खुश होणारे तुम्ही सिग्नलसारखी आपली "बडा नाम करण्यासाठीची" उलटी गिनती कॉलेज संपल्या संपल्या चालू झाली आणि आता आकडे संपत आलेत तरी आपण अजून काहीच ऐसा काम करु शकलो नाहिये हे जाणवून काहीसं नाराज होता तेवढ्यात हिरवा दिवा तुम्हाला पुढे जायला सांगतो अगदी तुमच्या आयुष्यासारखाच. तुम्ही जुनी झालेली कॅसेट टेपरेकॉर्डमध्ये अडकल्यागत गाडी चालवत राहता. तिकडे घरी कधी चॉक्की कधी बायनाक्युलल तर कधी गाडी आणि रोजंच तुमची वाट बघत तुमचं लेकरु झोपी जातं तुम्हाला गाडी चालवताना आठवत राहतं पोरानी बॅट बॉल, चॉकलेट, गाडी वगैरे वस्तू आणायला सांगून जमाना झालाय पण आजंही  तुम्ही हिंदी सिनेमात कायम उशिरा येणाऱ्या पोलिसांसारखे दुकानांची शटर खाली ओढल्यानंतर ऑफीसातून निघालेले असता. स्वतःच समाधान करण्यासाठी तुम्ही उद्या नक्कीच या वस्तू घेऊचया आणि लवकरंच हा जॉब बदलूया म्हणत गाडी हाकत राहता. पुढच्या चौकात नो एंट्रीतून एक पोरगं घ्यँग घ्यँग करत तुमच्या गाडीसमोर येतं तेव्हा त्याच्या गाडीचा हेडलाईट भक्कन्‌ तुमच्या डोळ्यावर पडतो तेव्हा रेडीओवर जॅकीनं तुम्हाला समजवायला घेतलेलं असतं, "रोशनी साथ लायी थी साये, साये गहरे थे रोशनी हलकी". हम न समझे थे बात इतनी सी ख्वाब शीशे के दुनिया पथ्थर की म्हणत तुम्ही अ‍ॅक्सिलेटर दाबता.

घरी पोहोचता पोहोचता कॉलेजच्या व्हॉट्‌सॅप ग्रुपवर कोणीतरी ट्रीप प्लान करायला घेतलेली असते, तुम्ही ते मेसेज न वाचता फोन खिशात टाकून घराचे जिने झपाझपा चढायला लागता, पायातले बूट काढण्याआधी दारातून डोकावून बघता तेव्हा तुमची वाट बघून निरागसपणे झोपलेलं लेकरु दिसतं. मग पायात साखळदंड बांधल्यागत तुम्ही खुरडत खुरडत जाऊन फ्रेश होता. घरच्यांसोबत जेवण करताना गप्पा टप्पा, चेष्टा मस्करी होते. ताटावरुन उठल्यावर तुम्ही लेकराच्या गालावरुन हात फिरवता त्याचा मुका घेता आणि सोफ्यावर जाऊन बसता.
आई ओरडत असते तुझ्या खोलीत जाऊन झोप, वडील अधून मधून राजकारणावर, समाजकारणावर, सिनेमावर गप्पा मारत मारत लॅपटॉपवर काहीतरी बघत असतात. तुम्ही दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यातून कधीही टप्पकन गळणाऱ्या पाण्याच्या थेंबासारखे कोणत्याही क्षणी गाढ झोपी जाल असं वाटत असतानाही फक्त थोडावेळ काही बोललो नाही तरी आईबापाच्या जवळ बसावं म्हणून तिथेच रेटून बसता. एका डुलकीनंतर जाग येते तेव्हा टिव्हीवरती रंग दे बसंतीमधला डिज्जे आयुष्याचं तत्वज्ञान सांगत असतो, "वही दुनिया दे झमेले, नोकरी ढूँडो पैसे कमाओ, घर बसाओ, ते लाईफ दे ईशारो पे नचते जाओ, टिमलख लख ते टिमलख लख. गेट दे इसतरफ हम लाईफ को नचाते है ते दुसरी तरफ लाईफ हम को नचाती है टिमलख लख ते टिमलख लख..... डिज्जेदी इथ्थे कोई औकात है, लोग कहते है डिज्जे मे बडी बात है कुछ करेगा डिज्जे, लेकीन बाहर दुनिया मे अच्छे अच्छे डिज्जे पिस गये लाखो की भीड मे... हंम्म्म...." सोफ्यावर उरलेल्या जागेत पडल्या पडल्या तुमची बायकोही झोपी गेलेली असते, तिला जागं करुन तुम्ही तुमच्या बेडरुममध्ये झोपायला जाता तेव्हा मेंदूवर रुटीनची गडद पुटं चढलेली असतात... मोबाईलशी चाळा करत करत उशाशी ठेऊन झोपता झोपता तुम्ही मनातल्या मनात म्हणत असता "टिमलख लख ते टिमलख लख"

केपी आर

Saturday, September 2, 2017

नोटाबंदी - कागज का टुकडा


स्वतंत्र भारताचा ईतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा ८ नोव्हेंबर २०१६ सर्वार्थाने एक गौरवास्पद, सुवर्णदिवस म्हणून ओळखला जाईल.
याच दिवशी भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांनी काळा धंदावाल्यांचं कंबरडं मोडणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि देशातल्या हजार पाचशेच्या सगळ्या नोटा त्या रात्री बारापासून निव्वळ "कागज का टुकडा" बनून गेल्या.
मोदीजी म्हणजे पराकोटीची स्वच्छ प्रतिमा, आतोनात निर्मळ अन हळवं मन शिवाय जात्याच कनवाळूपणा ओतप्रोत भरुन असलेले एक दुर्मिळ राजकीय नेतृत्व. याउपर की काय म्हणून चूकणे या शब्दाला त्यांच्या शब्दकोशात स्थानंच नाही. ते घेतील तो निर्णय ते करतील ती कृती हि सदासर्वदा केवळ बरोबरंच असते. त्यांच्या करारी चेहऱ्याच्या ९ किलोमीटर आजूबाजूच्या व्यासामध्ये चूक चूकुनंही फिरकतसुद्धा नाही. २०१४ साली भक्तगणांना होलसेलमध्ये वाटलेल्या शब्दकोशांमध्ये पर्फेक्शन या शब्दाचा अर्थ नमो किंवा मोदीजी असा देण्यात आला आहे आणि तो गेल्या तीन साडेतीन वर्षात घोकून घोकून पाठ करुन घेण्यात ते यशस्वीही झाले आहेत. तर या अशा निष्कलंक, निस्वार्थी, कनवाळू पंतप्रधानांनी जनतेच्या हितासाठी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे चूकीचेच आणि धातांत खोटे उद्देश गेल्या दहा महिन्यात काही समाजकंटकांनी आणि विघ्नसंतोषी लोकांनी समाजात पसरवण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय. काय तर म्हणे नोटाबंदीचा निर्णय काळ्या पैश्याला आळा घालण्यासाठी, कॅशलेस व्यवहार रुजवण्यासाठी, लेस कॅश पद्धती आणण्यासाठी, पडून सडणारा पैसा व्यवहारांच्या मुख्य स्रोतात आणण्यासाठी आणि यावर कडी म्हणून की काय तर दहशतवादाला आळा घालण्यासाठी घेण्यात आला होता. माननीय मोदीजींनी कधीही त्यांच्या भाषणात अथवा प्रेस रीलीजमध्ये यापैकी एकंही उद्देश जाहीररीत्या सांगितलेला नाही याची सर्वांनी नोंद घेऊन या बोलभांड मिडीयाचा निषेध करणं तर गरजेचंच आहे पण यापुढे जाऊन या असल्या ब्रिगेडी मिडीयावर बहिष्कार घालणंही तितकंच महत्वाचं आहे. मूळात समाजकंटकांना सतर्क होण्याची संधी न देता हळूच नोटाबंदीचा थोर उद्देश गुपित ठेऊनंच साध्य करुन घेण्याचा मोदीजींचा मानस होता पण त्यांच्यावर चहुबाजूंनी होणारी बोचरी टीका जिव्हारी लागल्याने आणि आता सहनशक्तीच्या पलिकडे हे सगळं जात असल्याने आम्ही या उद्देशांच्या मूळाशी जाऊन सगळ्यांपुढे हे उद्देश जाहिररीत्या मांडण्याचं ठरवलं आहे. तर बोलभांड आणि विकाऊ मिडियावर विश्वास न ठेवता आपला सद्‌सद्‌विवेक जागा ठेऊन हे उद्देश वाचावे, समजावे आणि जमेल तितक्या समविचारी लोकांपर्यंत पोहोचवावे हि मनःपूर्वक विनंती.
नोटाबंदीचे मूळ व आजवर गुपित ठेवलेले उद्देश खालीलप्रमाणे

१. वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे - नोटाबंदी करताना मोदीजींनी हे स्पष्ट केलं की ही बंदी त्या रात्री बारा वाजल्यापासूनंच होईल. अन हे जाहिर केलं तेव्हा बँका, ऑफिसेस, दुकानं वगैरे ऑलरेडी बंद झाली होती. त्यामुळे खिशात असलेला अमाप काळा पैसा उरलेल्या चार तासात कसा खर्च करायचा याची कोणालाच टोटल लागत नव्हती. काळा पैसावाले ईतके धास्तावले की त्यांच्या हृदयाचे ठोके अपरीमित प्रमाणात वाढले आणि मनुष्य जेव्हा आतोनात चिंताग्रस्त असतो तेव्हा त्याची प्रजनन क्षमता दिडशे पट कमी होते हे वर्षानुवर्षाच्या अभ्यासाअंति स्पष्ट झालेलं आहे. शिवाय जुन्या नोटा एकतर बँकेत जमा करणं किंवा त्यांची योग्य ती विल्हेवाट लावणं आणि नव्या नोटा एटीएम मधून काढणं यांत रात्रंदिवस अडकलेल्या जनतेच्या डोक्यात दुसरी कोणतीच गोष्ट येणं शक्य नसल्याने लोकसंख्येला आपसूकंच खिळ बसली. याव्यतिरीक्त मरायला टेकलेले लोक एटीएमच्या रांगेत येऊन येऊन पट्टकन खपल्याने त्यांनाही लवकर मोक्ष प्राप्ती झाली आणि गेल्या सत्तर वर्षातल्या प्रजनन दराशी तुलना केल्यास गेल्या दहा महिन्यातला प्रजनन दर हा किमान एकशे अठ्ठ्या‌ऐंशी टक्क्याने कमी झाल्याचा अहवाल नासाने दिला आहे. यावरुन हे निर्विवादपणे सिद्ध होतं की लोकसंख्या नियंत्रण हा नोटाबंदीच्या अनेक उद्देशांपैकी एक उद्देश आहे.

२. जागतिक तापमानवाढीत घट करणे - जागतिक तापमानवाढ ज्याला आपण सगळे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो ही आजच्या घडीला भारतंच नाही तर अवघ्या जगाला भेडसावणारी समस्या आहे. एकीकडे प्यारीस करार, ईथल्या परीषदा तिथल्या परीषदा वगैरे करत बसणारे निष्क्रीय नेते आणि एकीकडे थेट कृती करणारे आपले धडाकेबाज माननीय मोदीजी. आपण ज्या एटीएममधून पैसे काढतो त्या एटीएममध्ये वातुनुकुलित यंत्रणा २४ बाय ७ चालू ठेवावी लागते. वर्षानुवर जुन्या झालेल्या नोटा या एटीएम मशिनमध्ये ठेवल्याने त्या चार बाय चार खोलीतल विशिष्ट तापमान ठेवण्यासाठी वातुनुकुलित यंत्रणेची जास्तीत उर्जा खर्च होते. नव्या नोटांच्या तुलनेत ही उर्जा किमान चौसष्ट टक्के जास्त लागते. सगळ्या जुना नोटा सरसकट बाद केल्यामुळे फक्त एटीएमंच नाही तर बँका, सरकारी, निमसरकारी आणि खाजगी कार्यलयं शिवाय सार्वजनिक वाहतुक करणारी वाहनं आणि वातानुकुलित खाजगी वाहनं, जिथे जिथे म्हणून कॅश जुन्या नोटांच्या स्वरुपात हाताळली जात होती तिथे उर्जा वाचवून तापमानवाढ रोखण्याकडे एक महत्वाचं पाऊल मोदीजींनी उचललं आहे. आणि काल-परवाच आलेल्या जागतिक पर्यावरण रक्षण संस्थेच्या अहवालामध्ये मागच्या दिडशे वर्षांच्या तुलनेत ९ नोव्हेंवर २०१६ पासून मोजलं असता भारतातील तापमानवाढ उणे २४ टक्के एवढी नोंदवली गेल्याचं म्हटलं आहे.

३. तात्काळ ट्रिपल तलाकवर बंदी - मुस्लिम महिलांचे आयुष्य बरबाद करणारी तात्काळ ट्रिपल तलाक ही प्रतिगामी पद्धत रद्दबातल ठरवणे हे एक मोठ आव्हान देशाच्या नेतृत्वापुढे होतं. तात्काळ केलेल्या नोटाबंदीमुळे आतोनात समस्यांना तोंड द्यावं लागल्याने, तात्काळ घेतलेले निर्णय हे किती त्रासदायक होऊ शकतात हे ट्रिपल तलाकच्या खटल्यावर काम करणाऱ्या न्यायाधीशांच्या पॅनेलला समजल्याने त्यांनी विनाविलंब तात्काळ ट्रिपल तलाक पद्धतीवर बंदी आणली. ईतर धर्माचा तिरस्कार करतात असा सरसकट आरोप मोदीजींवर करणाऱ्या अंध विरोधकांना ही सणसणीत चपराक आहे.

४. साथीच्या रोगांना आळा घालणे - आजवर अगदी शालेय जीवनापासून आपण शिकत आलो आहोत की साथीच्या रोगांचा प्रसार हा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येऊन विषाणू पसरल्यानं होतो. जुन्या नोटांच्या पृष्ठ्भागाच्या कित्येक थर खालपासून लाखो करोडो साथीच्या रोगांच्या विषाणूंची पैदास होऊन आणि सूक्ष्मस्तरावर ते विषाणू साठून राहिले असून त्या नोटांच्या देवाण घेवाणीतून साथीच्या रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचं ईस्रोच्या २०१५ सालच्या वार्षिक अहवालात स्पष्टपणे नमूद केलं गेलं होतं. गेल्या सत्तर वर्षात फक्त उपग्रहांच्या उड्डाणांचे श्रेय लाटणाऱ्या नेतृत्वापेक्षा आपण वेगळे असल्याचा पुरावा मोदीजींनी या धडाकेबाज निर्णयातून दिला आहे.

५. सचिन तेंडूलकर आणि रेखाची राज्यसभेतली उपस्थिती वाढवणे - आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर राज्यसभेचं सदस्यत्व मिळवून, राज्यसभेत नाममात्र हजेरीही न लावणारे आणि त्यांना मिळालेला निधी तसाच सडू देणाऱ्या सचिन व रेखा यांना त्यांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी राज्यसभेत किमान ८०% हजेरी अनिवार्य केल्याची गोपनीय बातमी आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असून स्वतंत्र भारताच्या ईतिहासात लोकप्रिय सेलेब्रिटींच्या बाबतीत कठोर निर्णय घेणारे मोदीजी हे पहिले आणि एकमेव पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत गोल्ड स्पॉट बूक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये त्यांची नोंद झालेली आहे.

६. शेतकरी बांधवांना सहकार्य, गोमातेचं रक्षण व सोन्याच्या निर्मितीत वाढ - जुन्या नोटा या फक्त कागदाच्या लगद्यापासून बनवल्या नसून त्यामध्ये निरनिराळी रसायनं मिसळलेली होती शिवाय त्यामध्ये साथीचे रोग पसरवणारे लाखो करोडो विषाणू साठले होते. या अशा विषाणूग्रस्त नोटा जेव्हा फाटायच्या आणि त्यांची विल्हेवाट लावली जायची तेव्हा त्यातलं रसायन भूगर्भात जाऊन जमिनीचा कस कमी होत होता, फाटक्या नोटा गायींनी खाल्यामुळे त्यांच्या पोटात घातक रसायनं जात होती. भारतातल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार गायीच्या शेणामध्ये सोन्याचे कण असतात हे  यापूर्वीच पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. रसायनयुक्त नोटा खाल्ल्यानं गायींची शेणावाटे सोनं निर्माण करण्याची क्षमता गेल्या पंनास वर्षात आतोनात कमी झाली होती. नव्या नोटा ईको फ्रेंडली आहेत, त्यामध्ये फक्त हिरव्या वनस्पती असल्याने त्या खाल्ल्यावर गायींच्या पोटावर कोणताही विपरीत परीणाम होणार नाही तसेच ईको फ्रेंडली नोटांची विल्हेवाट लावताना रसायनं जमिनीत जात नसल्याने जमिनीचा कसंही सुधारण्यात मदत होत आहे. जमिनीचा कसं सुधारल्याने शेतकरी बांधवांना अप्रत्यक्ष मदत झाली आहे, विषाणूंपासून गायींचं संरक्षण होत आहे आणि पर्यायाने सोन्याच्या निर्मितीमध्ये वाढ झाली आहे. मोदीद्वेष्टे मात्र जीडीपीमध्ये घट झाल्याची खोटी बोंब ठोकत आहेत.

नोटाबंदीमागे याव्यतिरीक्त सहज लक्षात न येण्याजोगे, गोपनीय मात्र जनतेच्या हिताचे अगणित चांगले उद्देश दडलेले आहेत. येत्या काळात याची परीणिती आपणा सर्वांनाच येईल आणि आज या निर्णयावर कितीही टीका झाली तरीही ईतिहासात या निर्णयाची नोंद एक लोकहितवादी निर्णय म्हणूनंच होईल याची आम्हाला खात्री आहे, तोवर टिकाकारांनी काळा पैसा, दहशतवादाला आळा, केशलेस वेग्रे म्हणून मनगटाला चूना लावून खुशाल बोंबलत रहावं.

जय हिंद! भारत माता की जय!

केपी आर.

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...