Friday, September 22, 2017

टिमलख लख ते टिमलख लख


नेहमीच्या सवयीनं सूर्य पूर्वेकडून काँक्रिटच्या जंगला पलिकडून डोकं वर काढत असतो. तुम्हाला आजकाल सकाळी उठण्यासाठी अलार्म लावायची गरज नसते. रात्री व्हॉट्‌सॅप फेसबूक वगैरेवर निरर्थक चर्चा चर्वितणं झोडता झोडता झोपी जाताना उशाशी कुठेतरी पडलेला मोबाईल उचलून तुम्ही डोळे किलकिले करुन चमकणाऱ्या स्क्रिनवर वेळ बघता, अजून पाऊणेक तासानं उठलं तरी चालेल असं मनाशी गणित बांधत पाठीचं दुखणं कमी व्हावं म्हणून गुडघे दुमडून पाय पोटाशी घेत एका कुशीवर पडून राहता, अजून थोडावेळ झोपण्यासाठी, झोप जरी लागली नाही तरी अजून थोडावेळ अंथरुणात रेंगाळायला मिळणार आहे याचा आनंद असतोच. चुरचुरणारे डोळे मिटल्यावर तरीही दहा-पंधरा मिनिट का होईना झोप लागावी वाटत असताना पहाटेच पडलेल्या कसल्याशा अगम्य स्वप्नाची मनातल्या मनात उजळणी करायला सुरुवात होते, तुम्ही मिटल्या डोळ्यानंच मान हलवून ती स्वप्नं डोक्यातून झटकून टाकायचा प्रयत्न करता, मग उलटे आकडे मोजायला सुरुवात करता. आता झोप लागणारंच तेवढ्यात साला आदल्या दिवशी संध्याकाळी कंटाळा आला म्हणून काम आर्ध्यात सोडून लॅपटॉप बंद करुन ऑफिसमधून निघताना, घरी जेवण झाल्यावर करु म्हणून राहीलेलं अर्जंट काम आठवतं. भूत दिसल्यासारखं तुम्ही खाड्‌कन उठून बसता, दोन मिनिटांच्या टेंशन नंतर आता गडबड करण्यात काही एक अर्थ नाही हे लक्षात आल्यावर तुम्ही राहीलेलं काम आज पहिल्यांदा कसं करायचं याचं प्लानिंग करत करत जागचे उठता तेव्हा ठरलेल्या वेळेच्याआधी उठल्यामुळे तुमच्याकडे आवरण्यासाठी बऱ्यापैकी मार्जिन असतं. मग जमेल तेवढं अंग स्ट्रेच करुन मोठ्यानं आळस देऊन, व्हॉट्‌सॅपवर ठरलेला गुड मॉर्निंग मेसेज ब्रॉडकास्ट करुन, दाराबाहेर पडलेले न्यूजपेपर आत आणून चाळत चाळत आपला मोर्चा फेसबूककडे वळवता. फेसबूक मेमरीचं दार तुमच्यासाठी सताड उघडं करुन तयार असतंच. एक नजर घड्याळाकडे ठेवून आवरायचं ठरवलेलं विसरुन तुम्ही स्वतःच्याच मेमरींना हात घालता. एकदोनतीनचारपाच... सातसात वर्षापूर्वीपर्यंतचा ऑनलाईन नॉस्टॅल्जिया फेसबूक तुमच्यापुढे पेश करतं. तुम्ही स्वतःच्याच पोस्ट्‌स वाचत बसता, स्वतःच्या जुन्या फोटोवरच्या कमेंट्‌स खुळ्यासारख्या वाचता, हसता... कुठलीतरी बरी आणि अजूनंही रीलेवंट वाटणारी पोस्ट कॉपी करुन रीपोस्ट करता, रीपोस्ट करताना तुमच्या फोनवरचं टूजी नेट मान टाकायला लागतं, मग तुम्ही दोन मिनिटासाठी थ्रीजी नेट चालू करता कारण भोक पडलेल्या बादलीतून बदाबदा गळणाऱ्या पाण्यासारखी तुमच्या स्मार्ट फोनची बॅटरी भसाभसा उतरायला लागलेली असते. ह्याशट्याग रीपोस्ट म्हणून झाल्यावर त्याच फोनवरच्या उजव्या कोपऱ्यातल्या आत्तापर्यंत दुर्लक्षिलेल्या छोट्याशा घड्याळाच्या आकड्यांकडे नजर जाते.

थोड्यावेळापूर्वीच आज वेळेच्याआधी आपलं नक्कीच आवरुन होणार असं वाटलेलं तुम्हाला आठवतं. आता मात्र पटापटा आवरलं तर जास्तं नाही पण पंधराएक मिनिट लेट का असेना आपण ऑफिसला पोहचूच असं मनातंच म्हणत तुम्ही पळतंच बाथरुम गाठता. आंघोळ वगैरे उरकून कपडे घालण्यासाठी कपाट उघडल्यावर कालच्या शर्टाला घामाचा वास येतोय हे लक्षात येण्याआधीच बायको तुम्हाला म्हणते कालचा शर्ट घालायचा विचारंही नको करुस. हिंदी सिरीयलमधलं झूम्म झूम्म झूम्म्म म्युझिक वाजल्यासारखं तुम्ही बायकोकडे बघता, बायको चेहेऱ्यावरचे भाव कणभरंही न बदलता म्हणते, "वास येतोय त्याला". चरफडत, पायाखाली विस्तव लावल्यासारखे तुम्ही घाई घाईत ईस्त्री चालू करता, ईथून पुढे तुमचं मल्टी टास्कींग चालू होतं. ईस्त्रीमधे पाणी भरुन टेंपरेचर कंट्रोलचं बटन तुम्ही वूलवर सेट करता, ईस्त्री तापेपर्यंत घाईघाईत तोंडाला अंगाला मॉश्चरायझर चोपडता, काल रात्री तसाच उघडा ठेवलेला लॅपटॉप स्विचॉफ न करता आहे असा बंद करता, चार्जर आणि लॅपटॉप बॅगेत भरेपर्यंत ईस्त्री तापलेली असते. ईस्त्री करुन पटकन निघावं म्हणत असतानाच नेमका लेक उठून तुमच्यासमोर येऊन उभा राहतो. आबा काय करतोयेस रे असं त्यानं विचारल्यावर तुम्ही त्याला म्हणता जेवतोय, तोही तुमचा बाप निघतो, "श्लिखंड खातोयेश काय" असं विचारुन तो हसतो. त्या गडबडीतंही सगळं सोडून तुम्हाला हसायला येतं तुम्ही त्याला जवळ ओढता, गालावर कपाळावर पपी दिल्यावर तो गुड मॉल्गिंग म्हणतो आणि मला घे मला घेचा घोशा लावतो. एव्हाना पंधरा मिनिट लेट पोहोचण्याचीही वेळ निघून गेलेली असते. तुम्ही त्याला उचलून घेऊन आख्ख्या घराची एकदा फेरी मारता, गाण म्हणता, त्याला कडेवर घेऊन थोडासा डांस करता, अरे पल्ला पल्ला पल्ला करुन त्याला सोडल्याचं नाटक करुन परत पकडता, तो तुम्हाला घट्ट मिठी मारुन बसतो. चला आता मला ऑफीसला जाऊ दे म्हणून त्याला उतरवायला लागल्यावर तो तुम्हाला अजूनंच घट्ट चिकटून बसतो, मलाही आपिचला येयचंय म्हणत हसतो. मग तो एकेक डिमांड समोर ठेवतो, चॉक्की, मोठं चॉक्की, दोन चॉक्की बायनोक्युलल म्हणता म्हणता कधी कधी तर मला घर आण म्हणतो, तुम्ही हसता तोही मोठ्यानं हसतो पण तुमच्या मानेभोवती गुंडाळलेले हात सोडत नाही. माझे सर मारतील हा मला ऑफीसला नाही गेलो तर या वाक्याची मात्रा लगेच लागू पडते. तो खाली उतरुन मग तुम्हाला टाटा करतो, लवकर ये सांगून तुम्ही पायऱ्या उतरु लागलात की हॉलमध्ये पळतो, हॉलची खिडकी उघडून खिडकीत उभा राहून तुम्हाला मोठ्यानं आवाज देऊन टाटा करतो, फ्लाईंग किस देतो, त्याच्यासाठी काय काय आणायचं याची लिस्ट सांगतो गाड्यांच्या आवाजात तुम्हाला नीटसं काही ऐकू येत नसतं पण तुम्ही हो हो म्हणत गाडी काढता, हात उंचावून बाय करताना त्यानं बेंबीच्या देठापासून लवकर ये सांगितलेलं तेवढं नीट ऐकू येतं आणि दारातून निघाल्यापासून ऑफिसमध्ये पोहचेपर्यंत तुम्हाला खिडकीतून टाटा करणारा तुमचा लेक दिसत राहतो.

पंधरा मिनिट म्हणता म्हणता ऑफिसमध्ये पोहोचायला  तुम्हाला चांगला तासभर तरी उशिर झालेला असतो.
खाली मान घालून कामाचा रतीब ओतणाऱ्या माणसांच्या गर्दीत, बंद खुराड्यात थंड हवा ओतणाऱ्या एसीखाली तुम्ही लॅपटॉप उघडून बसता तेव्हा उशिरा का होईना चालू झालेला एक रटाळ दिवस तुमची आ वासून वाट बघत बसलेला असतो. त्या मॉर्निंगमध्ये गुडचा कसलाही लवलेश नसतानाही तुम्ही समोर येणाऱ्या प्रत्येकाला गुड मॉर्निंग म्हणत असता, मला खोटेपणा जमत नाही असं इंटरव्ह्यूमधल्या एका प्रश्नाला दिलेलं उत्तर सोयीस्कररीत्या विसरुन तुम्ही खोटेपणाच्या लोकसंख्येत अजून एकाची भर घालत राहता. त्या चकचकीत चार भिंतीत कॅलेंडरच्या एका चौकटीतून दुसऱ्या चौकटीत चालण्यासाठी, कॅलेंडरची पानं बदलत राहण्याएवढी तरी शक्ति किंवा त्राण अंगात रहावा अशी ईच्छा मनोमन धरत पुढच्या एक तारखेच्या चौकटीकडे तुम्ही सरपट राहता. भिंतीवर डकवलेल्या घड्याळात भस्सकन बोट घालून त्याचे काटे गरगरा फिरवून संध्याकाळ करावी असं कितीही मनापासून वाटलं तरी तसं करता येत नाही आणि संध्याकाळ झाली म्हणून घरीही जाता येईलंच असंही काही नसतं. खजिन्यावर वेटोळा घालून फणा काढून फण्यावर दहाचा आकडा मिरवत बसलेल्या नागासारखा संध्याकाळी सहा वाजता तुमच्या घरच्या वाटेवर टपून बसलेला बॉस तुमच्या फोनच्या स्क्रीनवर डोलायला लागतो. तुम्ही फोन उचलून कानाला लावल्या लावल्या अमुकेक काम आज केल्याशिवाय जाऊ नकोस, थोडं जास्तं थांबायला लागलं तरी थांब असा फुत्कार तुमच्या कानात सोडून मोठ्या समाधानानं ऑफिसातून निघतो. हिंदी सिनेमात दाखवतात तसा उतारावर घरंगळणाऱ्या दगडासारखा घरंगळत तो पुढच्या पाचव्या मिनिटाला घरी पोहोचतो. तुम्ही टेबलावर वाकलेल्या नाईट लँपसारखे खुर्चीत वाकून कीबोर्डावर बोटं आदळत राहता. तिथून पुढे मात्र तुम्ही एकदा चुकून खाल्लेल्या तंबाखूच्या पानानंतर जेवढ्या जोरानं पृथ्वी तुमच्या आजूबाजूनं फिरली नसेल तेवढ्या जोरात घड्याळाचे काटे चक्रावल्यागत फिरत राहतात.

दिवसभर दबून बसलेला आंधार चोरपावलानं येता येता आजूबाजूला कोणी न दिसल्यामुळं जरा धीटाईनंच ऑफीसच्या आजूबाजूला पसरतो. तुम्ही आतल्या कृत्रिम उजेडात काम संपवायचंय म्हणत स्वतः कणकण संपत राहता. तुम्ही हताश नजरेनं निपचित पडलेल्या स्मार्ट फोनच्या स्क्रीनकडे बघता आणि शेवटचा आशेचा किरण वगैरे म्हणावा असा बॉसचा मेसेज येतो, "उद्या सकाळी बघूया". तुम्ही परत एकदा कालसारखाच अर्धवट काम ठेऊन लॅपटॉप बंद करता, रात्रीचं जेवण झाल्यावर करुया म्हणून. तुम्ही बॅग उचलून आतल्या खोट्या उजेडातून बाहेरच्या शाश्वत आंधारात पाय ठेवता, गाडी काढून निघणार एवढ्यात त्या आंधारात सिक्युरीटी गार्डचं ओळखीचं हसू चमकतं, तुम्हीही सवयीनं हसता, पुढे जाता जाता तुम्हाला उगाचंच जाहीरातीत दाखवतात तसं रीव्हाईटल खाल्ल्यागत फ्रेश वगैरे वाटत... तेही पुढचे पाचेक मिनिटंच. गाडीतल्या रेडीयोवर गाणी चालू होतात, त्यांच्या त्यांच्या शेड्यूलप्रमाणे एकेक करुन कानावर आदळत राहतात. तुम्ही ऑफिसातल्या गर्दीला मागे सोडत रस्त्यावरच्या गर्दीचा एक भाग होता. रस्त्यावर आपल्या बाजूने कचऱ्याची गाडी गेल्यावर महिनोन्‌महिने कुजलेल्या कचऱ्याचा वास जसा अनिर्बंधपणे आपल्या श्वासा श्वासात भरुन राहतो अगदी तसे अनिर्बंधपणे भारतीय विवाहसंस्थेचा ईतिहास ते जागतिक मंदीचे सावट ते दहीहंडीची वर्गणी ते कॉलेजातले आता आपल्याशी न बोलणारे मित्र-मैत्रिण ते कित्येक निरर्थक विषय आपल्या डोक्यात भरभरुन वाहत राहतात. मग मधेच आठवतं वडीलांची बीपीची गोळी संपलीये, गाडीच्या काचेतून आरपार शून्यात बघता बघता तुमच्याही नकळत तुम्ही डॅशबोर्डवरच्या घड्याळाकडे बघता, घरापासच्या मेडीकलपर्यंत पोहोचण्यासाठी अजून पाऊण तास लागणार असतो, मेडीकल अकरा-साडे अकरा पर्यंत चालू असतं असं मनाशी म्हणत तुम्ही चौकातल्या लाल दिव्याकडे बघत थांबता. सिग्नलचं काऊंटडाऊन चालू होतं तेव्हाच रेडीयोवर आमिर खान पापा केहते है बडा नाम करेगा गाणं म्हणायला लागतो, लहानपणी या गाण्यात मोटीवेशन शोधून खुश होणारे तुम्ही सिग्नलसारखी आपली "बडा नाम करण्यासाठीची" उलटी गिनती कॉलेज संपल्या संपल्या चालू झाली आणि आता आकडे संपत आलेत तरी आपण अजून काहीच ऐसा काम करु शकलो नाहिये हे जाणवून काहीसं नाराज होता तेवढ्यात हिरवा दिवा तुम्हाला पुढे जायला सांगतो अगदी तुमच्या आयुष्यासारखाच. तुम्ही जुनी झालेली कॅसेट टेपरेकॉर्डमध्ये अडकल्यागत गाडी चालवत राहता. तिकडे घरी कधी चॉक्की कधी बायनाक्युलल तर कधी गाडी आणि रोजंच तुमची वाट बघत तुमचं लेकरु झोपी जातं तुम्हाला गाडी चालवताना आठवत राहतं पोरानी बॅट बॉल, चॉकलेट, गाडी वगैरे वस्तू आणायला सांगून जमाना झालाय पण आजंही  तुम्ही हिंदी सिनेमात कायम उशिरा येणाऱ्या पोलिसांसारखे दुकानांची शटर खाली ओढल्यानंतर ऑफीसातून निघालेले असता. स्वतःच समाधान करण्यासाठी तुम्ही उद्या नक्कीच या वस्तू घेऊचया आणि लवकरंच हा जॉब बदलूया म्हणत गाडी हाकत राहता. पुढच्या चौकात नो एंट्रीतून एक पोरगं घ्यँग घ्यँग करत तुमच्या गाडीसमोर येतं तेव्हा त्याच्या गाडीचा हेडलाईट भक्कन्‌ तुमच्या डोळ्यावर पडतो तेव्हा रेडीओवर जॅकीनं तुम्हाला समजवायला घेतलेलं असतं, "रोशनी साथ लायी थी साये, साये गहरे थे रोशनी हलकी". हम न समझे थे बात इतनी सी ख्वाब शीशे के दुनिया पथ्थर की म्हणत तुम्ही अ‍ॅक्सिलेटर दाबता.

घरी पोहोचता पोहोचता कॉलेजच्या व्हॉट्‌सॅप ग्रुपवर कोणीतरी ट्रीप प्लान करायला घेतलेली असते, तुम्ही ते मेसेज न वाचता फोन खिशात टाकून घराचे जिने झपाझपा चढायला लागता, पायातले बूट काढण्याआधी दारातून डोकावून बघता तेव्हा तुमची वाट बघून निरागसपणे झोपलेलं लेकरु दिसतं. मग पायात साखळदंड बांधल्यागत तुम्ही खुरडत खुरडत जाऊन फ्रेश होता. घरच्यांसोबत जेवण करताना गप्पा टप्पा, चेष्टा मस्करी होते. ताटावरुन उठल्यावर तुम्ही लेकराच्या गालावरुन हात फिरवता त्याचा मुका घेता आणि सोफ्यावर जाऊन बसता.
आई ओरडत असते तुझ्या खोलीत जाऊन झोप, वडील अधून मधून राजकारणावर, समाजकारणावर, सिनेमावर गप्पा मारत मारत लॅपटॉपवर काहीतरी बघत असतात. तुम्ही दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यातून कधीही टप्पकन गळणाऱ्या पाण्याच्या थेंबासारखे कोणत्याही क्षणी गाढ झोपी जाल असं वाटत असतानाही फक्त थोडावेळ काही बोललो नाही तरी आईबापाच्या जवळ बसावं म्हणून तिथेच रेटून बसता. एका डुलकीनंतर जाग येते तेव्हा टिव्हीवरती रंग दे बसंतीमधला डिज्जे आयुष्याचं तत्वज्ञान सांगत असतो, "वही दुनिया दे झमेले, नोकरी ढूँडो पैसे कमाओ, घर बसाओ, ते लाईफ दे ईशारो पे नचते जाओ, टिमलख लख ते टिमलख लख. गेट दे इसतरफ हम लाईफ को नचाते है ते दुसरी तरफ लाईफ हम को नचाती है टिमलख लख ते टिमलख लख..... डिज्जेदी इथ्थे कोई औकात है, लोग कहते है डिज्जे मे बडी बात है कुछ करेगा डिज्जे, लेकीन बाहर दुनिया मे अच्छे अच्छे डिज्जे पिस गये लाखो की भीड मे... हंम्म्म...." सोफ्यावर उरलेल्या जागेत पडल्या पडल्या तुमची बायकोही झोपी गेलेली असते, तिला जागं करुन तुम्ही तुमच्या बेडरुममध्ये झोपायला जाता तेव्हा मेंदूवर रुटीनची गडद पुटं चढलेली असतात... मोबाईलशी चाळा करत करत उशाशी ठेऊन झोपता झोपता तुम्ही मनातल्या मनात म्हणत असता "टिमलख लख ते टिमलख लख"

केपी आर

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...