Saturday, February 3, 2018

पद्मावत व ती


प्रिय स्वरा
काहीही लिहियला सुरुवात करण्याआधी मला तुला हे सांगायचं आहे की मला एक अभिनेत्री म्हणून म्हणा की तुझ्या सिनेमांच्या निवडीसाठी म्हणा तू मला जाम आवडतेस. याव्यतिरीक्त तू वेळोवेळी जी सध्यपरीस्थितीवर बेधडकपणे मतं व्यक्त करतेस त्यामुळे मला तुझ्याबद्दल आतोनात आदर आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे यावेळेसही तू पद्मावत(ती) सिनेमा पाहून संजय लीला भंसाळींना जे पत्र लिहिलं आहेस (सौजन्य: द वायर) ते लिहिण्याचा आणि तुझं मत परखडपणे मांडण्याचा तुला अधिकार आहे असं मला १००% वाटतं. पण यावेळेस मी तुझ्या मताशी सहमत नाही हे ही तितकंच खरं. बरं पुढे जाण्याआधी हे ही स्पष्ट करतो की जसं तुला वाटतं की स्त्रीयांना जगण्याचा हक्क आहे तसंच मलाही वाटतं की त्यांना तो हक्क आहे आणि यासाठी नवरा जिवंत असणे/नसणे वगैरे कसल्याही अटी शर्ती असण्याचं काहीही कारण नाही.

मूळात मला तुझ्या पत्रातले वेगवेगळे मुद्दे पद्मावत(ती)शी न जोडता बघितल्यास कायमंच पटत आलेले आहेत. किंबहुना हे सगळे मुद्दे पद्मावत(ती) सारख्या तद्दन गल्लाभरु सिनेमाशी जोडणं मला पटलेलं नाही. काहीही करुन ओढून ताणून हे मुद्दे पद्मावत(ती)शी जोडण्याचा प्रयत्न केल्यासारखं वाटतंय. तुझ्यासारख्या अभ्यासू व्यक्तीकडून हे असलं काहीतरी आलेलं असल्यामुळे त्याला माझ्यालेखी महत्व आहे. हा सिनेमा एका राणीच्या जीवनावर आधारीत आहे जिच्या आयुष्याचा शेवट हा जौहारने झाला. तिच्या जीवनावरचा सिनेमा काढताना दिग्दर्शकाने त्यातून जौहार वजा करुन कसा काय सिनेमा काढावा? तेरावं शतक आणि आत्ताचा काळ यात जमिन-आसमानापेक्षाही जास्त फरक आहे स्वरा, अगं तेव्हाच्या स्त्रियांची मानसिकता आणि आत्ताच्या स्त्रियांची मानसिकता यात फरक आहे, निश्चितंच आहे. बरं तुझ्या पत्राला उत्तरं देताना दोन्ही बाजूच्या (समर्थक आणि विरोधक) लोकांनी जौहार बरोबर की चूक यावर हिरीरीनं मतं मांडलीयेत पण मूळात जौहारचं समर्थन करण्याच्या प्रश्नंच येत नाही. आणि ते त्याकाळी बरोबर होतं का चूक यावर बोलण्याचा माझा उद्देशही नाही. आपल्याकडे ना लोकांवर संस्कार करण्याची, उपदेश, संदेश देण्याची वगैरे जबाबदारी कायम सिनेमावर का टाकली जाते ते कळत नाही मला. दोन वर्षापूर्वी आलेल्या सैराटवर अशीच चहूबाजूनी टिका झाली होती की यामुळे कुमारवयातल्या किंवा तरुण वयातल्या मुलामुलींवर वाईट संस्कार होतील. सिनेमा म्हणजे काय तीन तासाचा संस्कार वर्ग असतो का स्वरा, थिअटरमध्ये जाऊन  तीन तास उपदेश पिऊन लोक बदलून जायला? सैराटच्यावेळी हा सिनेमा प्रस्थापितांविरुद्ध आहे म्हणत हिरीरीने नागराज आणि पर्यायानं सैराटच्या बाजूने बोलणारे कित्येकजण आज तुझं पत्र वाचून मात्र पद्मावत(ती)ने चुकीचा संदेश दिलाय, चूकीच्या पद्धतीचं उदात्तीकरण वगैरे केलंय म्हणत गळा काढतायेत. हे जर खरं असेल तर आपण आपल्या लेकराबाळांना सगळ्या आदर्श सिनेमांच्या सीडीज आणून घरीच बघायला देऊ या की कशाला शाळेत वगैरे घालायचं किंवा आपण काहीतरी चांगलं शिकवायची जबाबदारी घेयची स्वतःवर? आणि या न्यायाने अक्षय कुमारचे टॉयलेट, बेबी, पॅडमॅन, हॉलिडे वगैरे सिनेमेच बेस्ट कॅटेगरीत येतील की, बाकी सिनेमा बनवण्याची सगळी कौशल्य चूलीत जाऊ दे नाही का? उपदेश, बोध देणारे सिनेमेच बेस्ट असं म्हणायचं काय आपण मग? आणि एका सिनेमाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा हा (तुझ्या पत्राची वाह वा करणाऱ्या) दुटप्पीपणा काय पटला नाही आपल्याला.

मी २०१४ मध्ये दिग्दर्शक उमेश कुलकर्णीचा "शूट अ शॉर्ट" नावाचा  शॉर्ट फिल्म मेकींगवरचा चार दिवसाचा वर्कशॉप केला होता. त्यामध्ये तो आम्हाला जगभरातल्या वेगवेगळ्या शॉर्टफिल्म्स दाखवायचा आणि प्रत्येक फिल्म बघून झाल्यानंतर तो आम्हाला या फिल्ममधून तुम्हाला काय कळलं असं विचारायचा. त्याची गिरणी आणि गीतांजली रावची प्रिंटेड रेन्बो नावाची फिल्म दाखवल्यावर त्याने असंच विचारलं काय कळलं बघून. मी म्हणालो होतो, "गिरणीमध्ये त्या लहान पोराचं बालपण पिसून गेलं आणि प्रिंटेड रेन्बोमध्ये एकाकी असलं तरी आयुष्य एंजॉय करता आलं पाहीजे हा संदेश दिलाय दिग्दर्शकाने". बरं हे उत्तर दिल्यावर आपल्याला लै काहीतरी कळतं या अविर्भावात मी पुढे उमेश काय बोलतो हे ऐकत होतो. पुढे उमेश म्हणाला, "प्रत्येक सिनेमा किंवा शॉर्ट फिल्म आपल्या काहीतरी संदेश देते, आपण त्यातून काहीतरी बोध घेयलाच पाहीजे हा गैरसमज पहिल्यांदा मनातून काढून टाका. कोणी आपली गोष्टंच नाही सांगायची का तुम्हाला, प्रत्येक गोष्टीत तुम्ही काय संदेश दिलाय हेच कसं काय शोधत बसता". म्हणजे आता पद्मावत(ती)मुळे समाजावर घातक परीणाम वगैरे होतील हे तुझं म्हणणं फारंच पोकळ वाटतंय मला. याशिवाय या सिनेमाच्या टीमपैकी कोणीही जौहर प्रथा त्याकाळी का असेना बरोबर होती असं समर्थन केलेलं नाही हेही लक्षत घेयला नको का आपण? बरं तुझ्या पत्राला समर्थन देणाऱ्या काहीजणांचं असं म्हणणं आहे की दाखवायचाच होता जौहार तर फक्त उंच ज्वाळा दाखवायच्या होत्या पडदाभर, म्हणजे प्रतिकात्मक पाहिजे होता. अगं जुन्या सिनेमांमधे प्रणयदृष्याच्या जागी दोन फुलं एकमेकांच्या जवळ येताना बघून कुत्सित हसणाऱ्या पिढीला हे असलं प्रतिकात्मक आवडलं असतं का? आणि त्याही पुढे जाऊन भंसाळीला जे दाखवायचंय ते दाखवण्याचं स्वातंत्र्य त्याला नसावंच का?

संजय लीला भंसाळीचे सुरुवातीचे काही अपवादात्मक सिनेमे वगळल्यास त्याने आऊट अँड आऊट कमर्शिअल सिनेमे काढलेत आणि अशा कमर्शिअल सिनेमे काढणाऱ्या माणसाने जौहर वगळून सिनेमा काढावा अशी अपेक्षा करणंच भंपकपणाचं लक्षण आहे. पत्राच्या सुरुवातीला एकीकडे तू म्हणतेस की तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित रहायलाच पाहीजे आणि एकीकडे तुझी अशी अपेक्षा असते की एका ऐतिहास गोष्टीवर सिनेमा काढताना त्यातल्या एका घटनेचा संदर्भ वगळून किंवा तुला पटेलशी चित्रित करुन त्याने सिनेमा काढावा, कमालंच आहे सगळी. शिवाय तू पत्रात लिहिलं आहेस की तू संपूर्ण कुटुंबंच काय तर तुमच्या आचाऱ्यालाही सिनेमा पहायला घेऊन गेली होतीस. अरे पण मग सिनेमा बघायला जाताना तुझ्यासारख्या अभ्यासू व्यक्तीला माहीत असेलंच ना की राणी पद्मावतीने जौहर करुन आयुष्याचा अंत केला की तू आमच्यासारखी काहीही माहीत नसताना "सालीनं केला घोटाळा" नावाचा सिनेमा बघायला गेली होतीस? सिनेमाला जाताना आम्हाला वाटलं होतं साली म्हणजे बायकोच्या बहिणीनं कायतरी घोटाळा केला असणार पण सिनेमातल्या मास्तरचा पाय केळाच्या "सालीवरुन" घसरुन त्याची स्मरणशक्ती गेल्यानं झालेला घोटाळा होता त्या सिनेमात. तर पद्मावत असो की पद्मावती या दोन्ही नावावरुन सिनेमात काय असणारे याबाबत असा संभ्रम होण्याची काहीएक शक्यताही नाही. संजय लीला भंसाळीचा सिनेमा बघताना तो कमर्शियल अंगाचा नसून काहीतरी बोध देणारा असेल अशी अपेक्षा करणं म्हणजे सलमानचा सिनेमा बघायला जाताना काहीतरी सशक्त गोष्ट बघायला मिळेल किंवा सत्यजित रायच्या सिनेमात तडकतं फडकतं आयटम साँग बघायला मिळेल अशी अपेक्षा करण्यासारखं नाही का हे? तुझ्या पत्रातले स्त्रीवादाशी निगडीत मुद्दे स्वतंत्रपणे अगदी अचूक असले तरी ते पद्मावत(ती)शी जोडल्याने ते सुसंगत वाटत नाहीत बघ. साने गुरुजी नावाचा सिनेमा बघायला जावं आणि त्यात सनी लिओनीचं आयटम साँग बघून दातखिळ बसावी अशी प्रतिक्रीया का देते‍एस? उद्याला तू अनुराग कश्यपचा सिनेमा बघायला गेल्यावर म्हणशील,"फ... से फँटम क्यू बोला आपने? फ... से फेमिनिझम भी तो बोल सकते थे स्सर". तू एका तद्दन कमर्शियल सिनेमाचा सध्याच्या समाजातल्या विकृती आणि स्त्रीयांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांशी संबंध जोडण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न बघून हे असलं फालतू उदाहरण द्यावसं वाटलं.

आजकाल सोशल मिडीयावर प्रत्येक गोष्ट ही आदर्शपणाच्या तराजूमध्ये तोलायची टूमंच निघालीये. आणि स्त्रीवादंच नुकसान स्वतःला स्त्रीवादी म्हणणाऱ्या तथाकथित स्त्रीवाद्यांनीच जास्त केलंय असं मला तरी ठामपणे वाटतं. स्त्रीवादाचा अर्थ स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान हक्क असणं असा न घेता आजकालचे तथाकथित स्त्रीवादी लोक पुरुष जो बथ्थडपणा युगानुयुगे करत आलेत तोच बथ्थडपणा करुन बायकांनी त्यांची बरोबरी करणं असा घेतात. मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये असहिष्णूतेबद्दल बोलताना जावेद अख्तर म्हणाले होते,"मुझे लोग मिलते है और बोलते है साहब पीके मे आपने  हिंदू धरम के बारे मे ईतनी लिबर्टी ले ली, मुसलमानो के साथ लेते? तो क्या मुसलमानो जैसे बनना चाहते हो? अरे भाई कोशिश करो के वोह तुम्हारे जैसे हो जाए ईस मामले मे, बजाय ईसके के तुम उन के जैसे हो जाओ. किस से मुकाबला कर रहे हो? तालिबान से? अल्‌कायदा से? साहब देखिये वोह तो नही सुनते, वोह तो मार डालते है. तो मतलब आप भी वैसा होना चाहते है? मत करो ऐसा". मला वाटतं त्याच दिशेने तथाकथित स्त्रीवाद्यांचा प्रवास चाललाय. पुरुषांच्या ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या अंगीकारुन स्त्री-पुरुष समानता होणार आहे का? नाही होणार. आता तुला वाटेल मधेच काय हे तथाकथित स्त्रीवाद्यांबद्दल बोलतोय मी. हे बोलण्याचं कारण म्हणजे मला तुझं पत्र ते त्यातल्याच एखाद्या तथाकथित स्त्रीवाद्यानी लिहिल्यासारखे वाटले. आणि सद्याची सामाजिक परीस्थिती बरी नाही हे जरी खरं असलं तरी एका सिनेमामुळे म्हणजेच पद्मावत(ती) बघून तुला स्त्रीया फक्त योनीपुरत्याच मर्यादीत असल्याचं वाटलं हे वाचून खूप वाईट वाटलं.

संजय लीला भंसाळीच काय दुसऱ्या कोणाही सिनेदिग्दर्शकाला त्याची गोष्ट सांगण्याचा, त्याला हवी तशी सांगण्याचा अधिकार आहे आणि तसाच आपल्याला पटत नसल्यास आपण तो सिनेमा न पाहण्याचा आणि डब्ब्यात घालण्याचा आपल्याला निश्चितंच अधिकार आहे पण तुझी गोष्ट तू मला हवी तशीच पडद्यावर दाखव म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही, नक्कीच नाही.
सॉरी पण तुझ्यासारख्या गुणी, अभ्यासू, संवेदनशील व्यक्तिने या तथाकथित सुधारणावादी, स्त्रीवादी, बुद्धीवादी लोकांच्या रांगेत जाऊन बसू नये असं मनापासून वाटतं म्हणून हे माझं म्हणणं मांडण्याचा खाटाटोप करतोय कारण तू तथाकथित नाहीस तर आंतर्बाह्य खरी आहेस असं मला वाटतं.

केपी आर

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...