कॉलेजात असताना आमचा एक दोस्त होता. मुंगेरीलाल आणि त्याच्यात फार म्हणजे फार्फारंच साम्यं होतं. तर या आमच्या मुंगेरीला कॉलेजातली प्रत्येक पोर्गी त्याच्या मागे हातंच काय तर हात पाय नाक तोंड सग्गळं सग्गळं धुवून मागे लागलीये असं वाटायचं. त्याचं स्वतःचं असं एक कल्पनाविश्व होतं, ह्यॅटतेच्यायला कल्पनाविश्व म्हणण्यापेक्षा भ्रामकविश्व होतं. कॉलेजातली कोणतीही पटाख्खा पोर्गी ही कशी त्याच्या मागं लागलीये, कितीवेळा कधीकधी कोणीकोणी त्याला फोन केले, ब्लँक कॉल मारले, रात्रीअपरात्री मेसेजेस केले निनावी पत्रं आणि ग्रिटींग कार्ड्स दिले याच्या सुरस कथा ऐकायला लै मजा येयची. पहिल्या वाक्यात आम्हाला कळलेलं असायचं की थापा चालू झाल्यात पण आमच्या कपाळावर बोल्ड आणि क्यापिटलमध्ये "चुतिया" लिहिलं असल्यासारखं हा आम्हाला स्वरचित कथा आणि मनाचे श्लोक ऐकवत बसायचा आणि आम्ही मोठ्या भक्तिभावानं त्याच्या या प्रवचनाचा परमानंद घेतंच रहायचो.
सगळ्या मित्रांकडे तेव्हा मोबाईल फोन नव्हते, तुरळक चार-दोन टाळक्यांकडे मोबाईल असायचा. एकेक करत प्रत्येकजण फोन घेऊ लागला आणि ज्याने कोणी नवीन फोन घेतला असेल त्याच्या फोनवरुन आम्ही मुंगेरीलालला मेसेज आणि मिस्ड कॉल मारायचो. तो तेच मेसेजेस आम्हाला दाखवायचा आणि प्रत्येकवेळेस कॉलेजातल्या वेगवेगळ्या पोरींची नावं सांगायचा. बघ अमुकनी मेसेज केला, बघ तमुकनी मिस्ड कॉल मारला. वास्तविक पाहता हे मेसेजेस आणि मिस्ड कॉल आम्हीच त्यावेळेसंच मारलेले असायचे.
एकदा असंच एका मित्राच्या बहिणीच्या लग्नाला गेलो असताना तिकडे दुसऱ्याच मित्राचा लहान भाऊ भेटला. बरं तेव्हा मोबाईल फोन घेणं ही एक बातमी असायची. लहानपणी जसे नवे कपडे घेतले की ते नवे कपडे घालून ताबडतोब शेजारीपाजारी चक्कर टाकून सगळ्यांना नवा ड्रेस घेतला, कसाय? असं सांगत, विचारत फिरायचो तसं त्याकाळी मोबाईलबद्दल होयचं. तर तो मित्राचा लहान भाऊ भेटल्या भेटल्या लै कौतुकानं माझ्यासमोर मोबाईल नाचवत म्हणाला, "कुण्या नवीन घेतला". अरे वाह म्हणता म्हणता माझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. एव्हाना आमच्या जवळपास सगळ्या मित्रांनी फोन घेऊन झाले होते आणि आपापले नंबर एकमेकांशी शेअरही करुन झाले होते त्यामुळे मुंगेरीला मेसेज आणि मिस्ड कॉल देण्यासाठी नवा फोन नंबर मिळणं दुरापास्तं झालं होतं. मित्राच्या भावाचा फोन बघितल्या बघितल्या नवा खजाना गवसल्यागत आम्ही खुश झालो. त्याला नीट समजावून सांगत हजारदा बजावलं आत्ता मी एक मेसेज तुझ्या फोनवरुन करणारे तर त्याला रीप्लाय आला किंवा त्या फोन नंबरवरुन परत कॉल आला तर रीसिव्ह करायचा नाही किंवा एखाद्या मुलीला बोलायला लावायचं. बर, लग्न होतं १४ फेब्रुवारीला... "व्हॅलेंटाईन डे" वगैरेचं तेव्हा लै अप्रुप. मग आम्ही मेसेज टाईप केला, "विल यू बी माय व्हॅलेंटाईन" आणि परत करकच्चून ब्याकस्पेस हाणून आख्खा मेसेज डिलीट हानला आणि मेसेज टाईप करुन गप्पकन् सेंड केला... "हाय हँडसम". डिलीव्हरी रीपोर्ट येतो न येतो तोवर जेवणाच्या रांगेतून आपला आलेला नंबर सोडून मुंगेरी धावतपळत आम्हाला शोधत आला, मला बाजूला ओढून नेत मोबाईलवरचा मेसेज हळूच दाखवला, "हे बघ, तिच पाठौवतीये परत"
कोण ती
तीच रे, ती मुंबैची
आ.... य.... ला, ती... घंटा कोण ते न कळताही जस्काय दिवसरात्र तिच्याबरोबर असल्यागत माझी प्रतिक्रीया
मग, किती दिवस तुला सांगत होतो, तुझा विश्वासंच नाही
विश्वास नाही असं कुठे झालंय काय, आमच्याबाबतीत असलं काय होत नसतंय म्हणून जरा वेगळं वाटतंय रे
हसू दाबत दाबत हा गंभीर संवाद चालू असेपर्यंत मित्रांनी दुसरा मेसेज टाकला
कॅन आय बी यो’र व्हॅलेंटाईन, हँडसम
तो मेसेज स्क्रीनवर दिसला न दिसला तोवर मी बोभाटा केला.
एय, आयला... कसले मेसेज यायलेत बघितलात काय दाद्याला... सेलिब्रीटी झाला आयच्या गावात. आपण मरायलो, झुरायलो पोरीशी न बोलताच आन हितं दादूला कनाकन मेसेज यायलेत व्हॅलेंटाईन डेचे.
एय गप गप, ओरडू नको असं उगंच म्हणत मुंगेरीनं फोन खिशात ठेवायची फक्त अॅक्शन केली.
सगळे कार्यकर्ते जमून, त्याच्याबाजूनं कोंडाळा करुन यथासांग त्या मेसेजेसचं जाहीर वाचन झालं, मग मोबाईल खोदून खोदून आम्हीच पाठवलेल्या मागच्या मेसेजेसचं जाहीर वाचन झालं. मुंगेरी खुश होऊन होऊन लालेलाल झाला. ग्रुपमधल्या प्रत्येकानं त्याला जमल तेवढा हरभऱ्याच्या झाडाच्या सगळ्यात वरच्या फांदीच्या सगळ्यात वरच्या पानाच्या वर चढवला, एवढा चढवला की त्यानं आम्हाला सगळ्यांना खुशी खुशीत त्या रात्री आईस्क्रीम खायला घातलं.
आईस्क्रीम खाता खाता, आयला दादू काय हिरोए राव असल्या कचकून चर्चा पार पडल्या, हसू दाबून धरण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले पण तरी दादू सातवे बितवे सोडा तेच्यायला लैच वरच्या कोनच्यातरी आस्मानात पोचलावता त्यामुळं त्याला आमचं हसणं नोटंच नाय झालं.
मग कोणतरी म्हणलं, थांबे च्यायला ही कोने ते मला बघैचंच्चे.. फोन लाव त्या नंबरला.
चुतिया ए का रे, पावणे बारा झाले रात्रीचे, एवढ्या रात्री पोरीला फोन लावतात होय रे, अक्कल चालव जरा
एवढ्या रात्री पोर्गी मेसेज करु शकती, आपण फोन नाय लावू शकत होय
मला म्हायतीये ती कोने सोड आता
काय म्हायती तुला, वायझ्येड, पोर्गी ए का पोर्गा ए हे पन म्हैत नसलं, म्हणे कोने ते म्हैतीये
अरे कालंच कॉलेजात भेटलीवती, म्हनली मी सगळ्यात हँडसम मित्राला प्रपोज कर्नारे उद्या
मंग तर नक्कीच ती नाय्ये. हँडसम म्हनलीये बे ती
भाड्या, आयस्क्रीम संपत आल्यावर लक्षात आलंय होय रे हँडसम म्हनलीये म्हन्जे मी नसंल ते
तू नाय रे, ती नसल पलिकडं.. फोन तर लाव.
अबे, कालंच सांगितलं होतं तिनी, उद्या दिवसभरात त्यानंच प्रपोज नाय केलं तर मी त्याला बरोबर साडे नौ वाजता एसेमेस कर्नारे म्हणून. मोबाईलमधला पहिल्या मेसेजचं टायमिंग चेक करता करता आमच्या माहीतीत त्यानी भर घातली.
कोणी त्याच्या बाजूने कोणी विरोधात बोलायचं असं आमचं तंत्र होतं. मग तो जोशात तो बोलतोय तेच कसं खरंय हे सिद्ध करायचा प्रयत्न करायचा.
आम्ही मग शेवटी दोन्दोन मस्तान्या हानून कबूल केलं की होय तो "ती"चाच्च मेसेज होता. दादूला व्हॅलेंटाईन मिळ्ळ्याबद्दल कडकडून मिठ्या हाणल्या, काँग्रॅच्युलेट केलं आणि घरी गेलो.
दादू मग मुंगेरीलाल के हसीन सपने बघत झोपला आणि आम्ही नवा नंबर शोधत बसलो त्याला पुढचा मेसेज करण्यासाठी.
लै भारी होते राव ते दिवस, लाल भडक कपड्यात फिरणारे कपल्स, एफ्सी रोडवर जमलेली जंता, त्यात आमच्यासारखे मित्राला खोटीनाटी गर्लफ्रेंड मिळवून देऊन पार्टी झोडणारे आणि हात चोळत बसून डोळे शेकणारे निम्मे आर्धे मेक्यानिकल इंजिनिअरींगचं उपाशी मित्रमंडळ, काहीच नाही जमलं तर बघंय भावा ती तुझ्याकडेच बघायली म्हणून एखाद्याला खुश करुन गेला बाजार रीलॅक्स्ची कॉफी किंवा दुर्गाची कोल्ड कॉफी पदरात पाडून घेणारे मित्र, शाळेतल्या मैत्रिणीला पुढच्या व्हॅलेंटाईनला प्रपोज करायचाच म्हणत झुरत बसणारा एकेकजण, नीट दाढी येत नसतानाही तिच्यायला तिला मनातलं सांगायच्याआधीच तिचं लग्नं ठरलं म्हणून मित्रांच्या घोळक्यात खुरटी दाढी वाढवून देवदास बनून मी लै लेट केला रे बोलायला, तिला मीच आवडायचो म्हणत नसलेल्या आठवणी सांगणारे कार्यकर्ते.... पुढच्या व्हॅलेंटाईनला मी तुमच्यात नाय रे तिच्याबरोबर असेन म्हणून टेर बडवून खुश होणारे, ती आपल्याला घंटा हो म्हणत नाही हे माहिती असतानाही एय वैनीये तुमची म्हणून मिरवणारे, त्यांच्या भावना दोस्तांपलिकडे तिच्यापर्यंत तर सोडाच पण तिच्या कुत्र्यापर्यंतही कधी न पोहचवू शकणारे दोस्त, व्हॅलेंटाईन डेची ग्रिटींग कार्ड आर्चिस आणि हॉलमार्कमधून घेऊन कपाटात ठेवणारे, यश चोप्राच्या पिक्चरमधल्या पुरनमासी को व्हॅलेंटाईन डे आला तर लै मोठा योग असतो मानणारे सगळे, आयला किमान ब्रेकअप होण्यासाठी तरी तिनी हो म्हणू दे म्हणजे तेरे नामची गाणी मनापास्नं म्हणता येतील असा विचार करणारे महाभाग वगैरे आणि थंड हवेत उडणारे उंचंच उंच लाल रंगाचे फुगे....आणि एका अर्थाने सगळ्यांचेच मुंगेरीलाल के हसीन सपने.
गर्लफ्रेंड नव्हती तेव्हाचे व्हॅलेंटाईन्डेच खरे बेस्ट होते... ती हुरहुर आता परत नाही...
केपी आर

No comments:
Post a Comment