Tuesday, February 20, 2018

टेक न्यू गोल्ड

आपल्या देशात लोकांना म्हणजे बऱ्याचशा लोकांना भूतकाळात रमायला आणि रहायला फार म्हणजे फार्फार आवडतं. स्वतः काहीही न करता पुराणाचे, भव्य इतिहासाचे गोडवे गाणं, आपल्या अस्मिता त्याच्याशी जोडणं हे यांचं प्राथमिक काम असतं. कोणा थोर पुरुषानं/स्त्रीनं समाजासाठी आयुष्य वेचून अचाट अफाट असं काहीतरी केलेलं असतं आणि हे सर्वश्रुत असलं किंवा आख्ख्या जगाने त्यांच्या कार्याची आणि पराक्रमाची योग्य ती दखल घेतलेली असली तरी हे महाभाग रात्रंदिवस फक्त थोर व्यक्तिमत्वांचा जप, जयजयकार करण्यात आणि त्यांच्या नावाने अरेरावी करण्यात धन्यता मानत असतात. बरं बऱ्याचदा हा जयजयकार अगदी चुकिच्या पद्धतीने केलेला दिसतो, महापुरुषांनी/स्त्रीयांनी जी शिकवण दिलेली असते किंवा जे महान कार्य केलेले असते त्याच्याशी काडीमात्र संबध नसल्यागत हे सगळे बिथरल्यासारखे वागत राहतात आणि याउपर यांचं असं म्हणणं असतं की या दिड शहाण्यांना आपल्या इतिहासाचा जाज्वल्य (?) वगैरे अभिमान असतो. त्यांच्याकडून प्रेरणा वगैरे घेऊन आपण काही करणं तर फार लांबची गोष्ट पण हे महाभाग त्यांचीच नितीमूल्य पायदुळी तुडवत असतात आणि हे यांच्या गावीही नसतं.

अरे किती दिवस आपण फक्त इतिहासावर बोलण्यात, इतिहासात रमण्यात, बेंबीच्या देठापासून फक्त जयजयकार करण्यात आणि एकूणातंच इतिहासाचे गोडवे गाण्यात धन्यता मानणार? किती दिवस आपल्याला आपल्या पूर्वजांची पूर्वपुण्याई पुरणार. तुम्ही स्वतःही काही करणार आहात का फक्त जयंती, पुण्यतिथी, हा ऊत्सव तो ऊत्सव करत गाड्यांच्या सायलेंसरच्या नळकांड्या काढून, कर्णकर्कश्य हॉर्न्स वाजवून, भगवे, निळे, हिरवे झेंडे घेऊन गाड्या उडवत राहणार? आपला आपल्या स्वकर्तुत्वावर बिलकुल विश्वास नाहीये, आपण त्यापेक्षा सोपा मार्ग निवडतो, इतिहासाच्या कुबड्या वापरुन आयुष्यात खुरडत राहतो. बरं कोणी चार चांगले शब्द सांगायला गेलं तर अस्मिता, अभिमान, गर्व बिर्वाचं कार्डं वापरुन त्याला/त्यांना वेठीस धरता येतं, आपल्या भावना तर  कचकड्यापेक्षा नाजूक असतात आणि त्या पापणी लवेस्तोवर दुखावल्या जातात. ज्या महापुरुषांची नावं घेतो आपण त्यांना वर लज्जेने मान खाली घालावी लागत असेल असलं वर्तन करुन आपण आपला निषेध नोंदवतो, दंगे, तोडफोड करतो. शिवाजी, गांधी, सावरकर, आंबेडकर, नेहरु, टिळक यांना आत्ताची परीस्थिती बघायची सोय असेल तर निश्चितंच त्यांना आपण कोणासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं असा प्रश्न पडून लाज वाटत असेल.

मी गेल्या दहाएक वर्षात कित्येक पोरं बघितली जी नेहमी तक्रारीच्या सुरात सांगत असतात की आमच्या फादरला तेव्हा लै चान्स होता राव पैसे कमवायचा, तेव्हा एखादी जागाबिगा घेऊन ठेवायचा पण तेव्हा काय नाय केलं. तेव्हाची अमुकएक संधी एनक्याश करायला बाप कसा चुकला नाहीतर आम्ही कसे आज श्रीमंत वगैरे असतो हे सांगताना हे महाभाग सोयीस्कररीत्या विसरलेले असतात की आपण स्वतः या घडीला काहीच करत नाही, गुड फॉर नथिंग आयुष्य जगतोय. बरं बापानं यांच्यासाठी आयुष्यभर केलेला स्ट्रगल यांना दिसत नाही, वडीलांच्या आजोबाच्या वडीलांचं नाव काय ते माहीत नसतं पण शके १७२० ला काय झालं त्याचे २०१८मध्ये गोडवे गात रीकामटेकडं बसायला यांना जमतं. अरे त्या थोर स्त्री-पुरुषांकडून आदर्श घेऊन तेव्हाच्या गोष्टीतून आज प्रेरणा घेऊन आत्ताच्या काळाशी सुसंगत गोष्टी करणं एवढं कठीण आहे का? बरं राजकारण्यांचं ठीके त्यांना त्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी तुम्हाला भूतकाळात रमवून, भावनांचं, अस्मितांचं राजकारण करणं गरजेचं आहे. असं केल्यानं लोकोपयोगी ठोस कसलीही कामं नाही केली तरी त्यांना त्यांची दुकानं चालवता येतात पण तुमची चूल कशी चालणार? तुमच्या आई-बाप, लेकराबाळांसाठी कोण झटणार?

मायला मोठा लोकप्रिय नेता होण्यासाठी विशेष काहीही काम न करता सतत फक्त आदर्श व्यक्तिमत्वांचा जयघोष करत रहायचं, पुतळे, स्मारकं उभी करायची ते करताना भाषा, प्रांत, धर्म नि जातीपातीचं राजकारण करायचं आणि तुम्हाआम्हालाही त्यात गुंतवून ठेवायचं ही ढोबळ पद्धत होऊन गेलेलीये आपल्याकडे. शाहूफुलेआंबेडकरशिवाजीसंभाजीटिळकगांधीसावरकर यांनी कोणाला अमुकतमुक माझे आदर्श/देव आहेत म्हणत हारतुरे घालून पुजत बसल्याचं ऐकीवात तरी आहे का? त्यांनी वेळ घालवला का या असल्या गोष्टीत? त्यांनी हेच केलं असतं तर आज आपलं आयुष्य कसं असतंय याचा विचार करुन बघा.

कोणीतरी काहीतरी बरळतो आपला माथा भडकतो, मरण्या-मारण्याची, कापण्याची, उडवण्याची भाषा, हातात दगड लाठ्या काठ्या हे सगळं क्षणात चालू होऊन जातं. कोणाही उपटसुंभानं आपल्या थोर व्यक्तीबद्दल अपशब्द उच्चारल्याने काहीही होत नसतं. ते सगळे सूर्य आहेत, वर तोंड करुन कोणी सूर्यावर थुंकायचा प्रयत्न केल्यानं काय होतं हे वेगळं सांगायला हवं का?

हे सगळे थोर लोक थोर होतेच याबद्दल कणमात्रंही शंका किंवा दुमत असूच शकत नाही, कोणीही ते नाकारु शकत नाही आणि नाकारल्यानं काही फरकंही पडत नाही... आज जर का शिवाजी फुले आंबेडकर सावरकर टिळक असते तर त्यांनी काय केलं असतं? ते आमचा एक युगपुरुष होऊन गेला म्हणून ढोल बडवत नसते बसले, रीसर्च-डेव्हलपमेंटमध्ये आपला देश पुढे कसा जाईल, नवनवे शोध कसे लावता येतील, लोकहितवादी गोष्टी कशा करता येतील, बाल्मृत्यू दर कमी कसा करता येईल, साक्षरता कशी वाढवता येईल, रोजचं जगणं कसं सोपं करता येईल यावर विचार केला असता, कृती केली असती. आपापल्या महापुरुषांची वाटणी करुन फुले आमचे टिळक तुमचे, गांधी तुमचे सावरकर आमचे असले धंदे करत बसले नसते.

ओशोच्या एका उताऱ्यातली एकंच ओळ आठवतेय,  पूर्ण आठवत नाहीये आत्ता पण ती एक ओळंही बेस्ट होती. "आय नो ओल्ड इज गोल्ड बट नाऊ टेक न्यू गोल्ड"
आपण कधी नवं गोल्ड घेण्याचं धाडस करणार आहोत? आपण कधी जागे होणार? कधी आपण पुढचं पाऊल टाकणार? किती दिवस आपण दिवसागणिक मागे मागे मागेच चालत राहणार?


केपी आर

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...