Monday, June 6, 2016

बर्फी


मी त्याला बर्फी म्हणतो, बाबडी, झिंगर, सिंगर, पंपट, मनी, बाबली, छबली, शोंतक, शोन्या, चिंग्या, बाबू, बाबूजी आणि काय काय म्हणतो..माझा ज्यावेळेस जो मूड असेल त्या नावानी हाक मारतो.
त्याचं नाव "ईहान" आहे, ईहानचा अर्थ सूर्य

तर आता ईहान बडबडायला लागलाय. तुला काय आणू म्हणून विचारलं कि काॅक्केट म्हणतो. गाडीला गायी, चाकाला काक, टाक म्हणायचं असेल तरी काक, गोळीला गोई, आत्याला आत्ता, रीमोटला टिवी म्हणतो, मी ज्योला आवाज दिला की हा पण दोssss म्हणतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं नाव काय विचारलं कि सांगतो "नान" आणि अजून दोन चार वेळा विचारलं कि म्हणतो नानू नानू. तर आमच्या या नानला शेजारची सलू दिदी म्हणते तू माझा नान नाही काय, तू बटर नान एस. तेव्हापासून ए तू कोणेस रे विचारलं कि तो म्हणतो, "बटान्नान"
येता जाता हातात जे असेल ते माझ्याकडे फेकून क्याच म्हणतो, दोन्ही हात वर करत शिक्च म्हणतो.

मजा येते. सगळं विसरायला होतं.

रोज सकाळी माझी आवरा आवरीची गडबड चालू असते. सकाळी उठल्यापासून तो माझ्या मागे मागे असतो. कपड़े घालून आरशासमोर ऊभं राहताच "केच केच" म्हणत तो हट्ट करुन कंगवा मागून घेतो. मी माॅश्चरायजर फासकटंत असताना तो नाक गोळा करुन नाकाचा गोंडा आणि ओठांचा चंबू करुन चेहरा पुढे करतो, मग मी त्याला आधी माॅश्चरायजर लावतो. ते झाल्या झाल्या तो पाऊ पाऊ चा अविरत जप चालू करतो. जोवर मी पावडर हातावर चोळून त्याच्या गालावर लावत नाही तोवर पाऊ पाऊ करुन नाचत राहतो. पावडर लावताच हसतो. मग मी पर्फ्युमची बाॅटल उचलली की तो दोन्ही हात हात वर करत उ, , उ करतो. मी पर्फ्युमची बाॅटल त्याच्या काखेपाशी नेऊन तोंडानं फस्स फस्स आवाज काढतो. तो खुश होतो... मोठ्यानं हांsss म्हणतो.
आता त्याला माहिती असतं की मी देवघराकडे बघून नमस्कार करणार. ईतकावेळ हातात धरलेला कंगवा जोर लावून घाईघाईनं फेकत तो दोन्ही हात जोडत एखाद्या पुढा-यासारखा डोक्याच्या वर नेतो पार. मग स्वतःच देवघरापाशी जातो, घंटी उचलून वाजवतो, मग लगेच घंटी खाली ठेवतो, टाळ्या वाजवत "जजाजंजाज" अशी काहीतरी बडबड करतो आणि प्रसादाची वाटी ऊचलून प्रसादाचे साखर फुटाणे खातो.

तो असंच काहीबाही करत राहतो

परवा माधवी ताई म्हणाली जंगल बूक बघताना तो डायलाॅग खूप भावला तिला, जेव्हा मोगलीची आई म्हणते, "मेरा बेटा"

तसंच मला आणि आख्ख्या घराला प्रत्येक छोट्या गोष्टीत वाटत राहतं "माझा ईहान" 

आईबाप होता होता आईबाप कोण आणि काय हा कोर्स करायला सुरुवात होते. आणि माझे "आईबाप" मला शिकवणारा शिक्षक म्हणजे माझा लेक ईहान...

Tuesday, April 26, 2016

आई


त्या दिवशी आम्ही सकाळी... नाही नाही पहाटेच उठलो होतो, रादर झोपलोच नव्हतो असं म्हणलं तरी चालेल.

आवरा आवरी करताना वेळ कशी बुलेट ट्रेनसारखी फास्ट चालली होती. जवळपास पावणे सहाच्या सुमारास तिला ऑप्रेशन थिएटरच्या दारात सोडून आम्ही बाहेर उभे राहिलो. दोन ताया भाऊजी आई सासूबाई मेव्हणा आणि मी. आजवर खुशालचेंडू वाटणारी ती, तिचं वाढलेलं पोट सावरत आत जाताना मात्र म्हणाली मला,"मला खूप नर्व्हस फिल होतंय रे". मी जमेल तेवढी चेष्टा मस्करी करत, "जा गं, सगळं ठिक होईल" म्हणालो खरं पण मलाही खूप खूप नर्व्हस फिल होत होतं.

तसं तर आदल्या दिवशीच डॉक्टरने सांगितलं होतं कि सी सेक्शन करावं लागणारे, आता तुम्ही ठरवा उद्या करायचं की परवा.
खरंतर मी फार पूर्वीपासून ठरवलं होतं लेबर रुममधे जायचं आपण, पण सी सेक्शन असल्यामुळे डॉक्टरनं अलाऊ नाही केलं, म्हणाले रक्त बघून लोकांना चक्कर येते, तेव्हा आम्ही बाळांतीणीला संभाळायचं की तुझ्याकडे बघत बसायचं.

बाहेर उभ्या उभ्या नेमकं कसं वाटंत होतं हे सांगण कठीण ए खरंतर. म्हणजे ते नाही का हिंदी पिक्चरमधे दाखवतात, आजवरचे सगळे छान छान गोग्गोड क्षण किंवा मागचे ९ महिने वगैरेचा झर्रकन फ्लॅशबॅक वगैरे तसलं काहीही झालं नाही. ठरवूनंही काही आठवंतच नव्हतं, मेंदूच च्यायला कोरकरकरीत झाला होता. ना हॉस्पिटलच्या चकरा आठवल्या ना तिच्या पोटातल्या बाळाला झोपताना सांगितलेल्या गोष्टी आठवल्या.

एकदा तर काय झालं होतं, आम्ही प्री नेटल क्लास लावलेला आणि त्यात सांगितलं होतं कि असं होतं कधी कधी कि बाळाची हालचाल नाही जाणवत काहीवेळ, तर घाबरुन जायचं नाही पण जर का सबंध दिवस दिवस हालचाल नाही जाणवली तर मात्र येऊन चेक करुन जायचं. एकदा असंच ऑफिसवरुन घरी आल्यावर ज्योला लक्षात आलं की आपण दिवसभराच्या गडबडीत नोटिसंच नाही केलं कि आपल्याला बाळाची हालचाल नाही जाणवली. ती एकटीच थोडावेळ मागच्या रुममधे जाऊन पडून राहिली, दिवसभराचा दिनक्रम आठवत. बराचवेळ विचार करुनंही तिला हालचाल जाणवलेला एकंही इंस्टंस आठवेना. मग ती पोटावर हलकेच हात प्रेस करुन पडून राहिली पण तरीही काहीच हालचाल जाणवेना. मग मात्र तिनं घाईघाईत मला बोलवलं म्हणाली बघ रे तुला हालचाल जाणवतेय का? बराचवेळ प्रयत्न करुनंही मलाही काहीच जाणवेना. प्रीनेटलचं लेक्चर आठवून घाईघाईत आम्ही डॉक्टरकडे जायला निघालो, आईभाऊ काळजी करतील म्हणून त्यांना फक्त आलोच जाऊन म्हणत बाहेर पडलो. त्यानंतरची गाडी सावकाशंच चालवत असतानाची माझी लगबग सांगता नाही येयची शब्दात, डॉक्टर ज्योला आतमधे तपासत असतानाचा एकेक क्षण डोंगरा एवढा वाटला मला. एन.एस.टी. केली, अगदी नॉर्मल आली. बाळाचे ठोके ज्योला ऐकवले डॉक्टरनी. तिनं बाहेर येऊन सगळं ओके आहे हे सांगेपर्यंत माझा जीव गळ्याशी आला होता. आणि तोपर्यंत घरच्यांचीही काही वेगळी अवस्था नव्हती. सगळं ठिक आहे कळल्यावर मग विचार करताना लक्षात आलं हे आपण आईला सुद्धा सांगू शकलो असतो चेक कर म्हणून पण खरंतर तिला टेंशन येऊ नये म्हणून आम्ही तिला काहीच बोललो नव्हतो पण त्याचा परीणाम उलटा झाला. काही न सांगता घाईघाईत बाहेर पडल्यामुळे उलंट जास्त टेंशन आलं सगळ्यांना.

तर असे बरेच चढ उताराचे ९ महिने होते ते पण यातलं मला काहीही आठवत नव्हतं ऑपरेशन थिएटरच्या बाहेर.
आम्ही  गाडीतून ईकडे तिकडे जाताना रेडिओवर एखादं डांस नंबर लागलं कि मी थोडा आवाज वाढवायचो आणि नेमकं तेव्हाच बाळ पोटात किक करायचं, "आमचं आमचं आल ईज वेल वर्जन". ज्यो म्हणायची तुझ्यावर जाणारे, नाचतंय आत्तापासूनंच. हे ही नाहीच आठवलं प्रयत्न करुनंही

फार पूर्वीपासून मी सगळ्यांना म्हणायचो मला ना पहिली मुलगीच होयला पाहिजे. जुनी लोकं पोट बघून काय गणित मांडतात कुणास ठाऊक पण ऑल्मोस्ट ९९% बायका सांगायच्या मुलगाच होणार. बरं जी गोष्ट वर्षानुवर्ष आणि गेल्या ९ महिन्यात वारंवार घोकली होती ती ही तेव्हा गौण वाटत होती. बाहेर उभ्या उभ्या कोणी ना कोणी काही ना काही विषय काढून गप्पा मारत होतं, माझ्या कानावर शब्द पडत होते पण आत झिरपत नव्हते, म्हणायला मी तिथे होतो पण खरंतर मी मनानं आत होतो, लेबररुम मधे. अधून मधून एखाद्याच्या एखाद्या वाक्याला दुजोरा देत होतो, एखाद दुसरं वाक्यही बोलत होतो पण मी तिथे नव्हतो हे नक्की. त्यावेळी आठवणीवर, कुठल्याच एका विचारावर थांबायला, रेंगाळायला तयारंच होईना मन. डोक्यात परत परत फक्त आणि फक्त एकंच विचार, सगळं व्यवस्थित होऊ दे, बाळ टुणटुणीत आणि ज्यो कणखर राहू दे. सगळं सुखरुप पार पडू दे. मुलगा असो, मुलगी असो सगळं सगळं व्यवस्थित असणं महत्वाचं.

रोज एकेक दिवस मोजताना असं वाटायचं की अजून आsssठ महिने आहेत, अजून पाsssच महिने आहेत आणि शेवटचे दोनेक महिने तर खूपंच मोठे वाटत होते. पण डिलिव्हरीच्या आधीचे २-३ दिवस रॉकेटसारखे झुप्पकन निघून गेले. आणि आता एकेक मिनिट जात नव्हता.

सगळं नीट होईल ना सगळं ठिक असेल ना असा विचार करत असतानाच आत, ऑपरेशन थिएटरमधे बाळ रडल्याचा आवाज  आला. दोनेक मिनिटांनी मावशी बाहेर आल्या आणि म्हणाल्या काय ते डॉक्टरंच सांगतिल. उत्सुकता आणि काळजी शिगेला पोहोचली होती, कोणीच कोणाशीच बोलत नव्हतं आता. त्यानंतर डॉक्टर बाहेर येईपर्यंतचा वेळ क्यासेट अडकल्या पिक्चरसारखं वाटलं.

हिंदी सिनेमासारखं नव्हतं बरं का, डॉक्टरनी बाहेर येऊन बधाई हो, मुबारक हो, आप को बेटा हुवा है, पोता हुवा है मिठाई खिलाओ वगैरे फिल्मी डायलॉग्ज नाही मारले. डॉक्टर थेट माझ्याकडे येऊन फक्त म्हणाली, मुलगा झालाय, सगळं व्यवस्थिते, ती सुद्धा छान ए, काँग्रॅट्स, तुम्ही पाचेक मिनिटांनी आत जाऊ शकता. डॉक्टरच्या डिक्लेरेशन नंतर भाऊजींनी मला  कडकडून मारलेली मिठी मी कधीच विसरु शकणार नाही. त्यांच्या पाठीवर माझे हात घट्ट रोवताना माझ्या डोळ्यात हलकेच आलेले आनंदाश्रूही विसरणं केवळ अशक्य. त्याक्षणी भाऊ तिथे नव्हते, घरी होते, त्यांची तब्येत त्यावेळी बरी नव्हती. तो क्षण पहिल्यांदा त्यांच्यासोबत शेअर करायला न मिळाल्याबद्दल अजूनंही खूप  वाईट वाटतं. त्याक्षणी मी माझ्या बापाला खूप मिस केलं.

बाळाला बघून झाल्यावर मला आत जाऊन ज्योला जवळ घेऊन सांगायचं होतं, सगळं छान ए, काळजी करु नकोस पण माझी आई ज्योची मम्मा सगळे तिथेच होते.
कोणाचं रीस्ट्रिक्शन होतं अशातला भाग नाही पण मी थोडा अवघडलो होतो. मी आत गेलो, ज्योच्या डोक्यावरुन हात फिरवला, ती अजूनंही भूलीमुळे गुंगीत होती, तिला सांगितलं सगळं व्यवस्थित झालंय... आणि डोंट वरी मी आहे इथेच... हं त्यावेळी नेमकं काय वाटलं कुणास ठाऊक.. सेंस ऑफ रीस्पॉन्सिबिलिटी, काळजी, प्रेम... कि एका गोड जीवाला ९ महिने आपल्या जीवापाड संभाळणाऱ्या आईबद्दल आदर. तसं त्या रुममधे बाळ एक होतं पण आई.. त्या मात्र तीन होत्या...

बाप झाल्यावरच आई बाप कळतात हे मात्र नक्की...

केपी आर

Monday, December 1, 2014

कविता


तू माझ्यावर कविता कर ना
ती म्हणाली की तॊ फक्त हसायचा
ना हॊ म्हणायचा ना नाही
ती वॆड्यासारखी त्याच्या ऊत्तराची वाट पहायची
तिच्या वाढत्या हट्टाला शॆवटी दिलंच त्यानं ऊत्तर
"कवितेवर कविता करत नसतं कुणी"
माझी सगळ्यात सुंदर कविता
वाचता येत नाही, जाणवतॆ!
मग त्यानं तिचा हात घट्ट दाबून धरला
त्याच्या छातीशी
’धड्धड धड्धड’ शहारणाऱ्या
तळहातीच्या रॆषा सावरण्याआधी
त्यानं कधीही न लिहिलॆली त्याची
सगळ्यात सुंदर कविता
पाहिली त्यानं डॊळॆ भरुन त्याच्या पुढ्यात
अन वाचली तिनं त्याच्या डॊळ्यात
तिनं हात सॊडवून घॆण्याआधी म्हणाला तॊ परत
"कवितेवर कविता करत नसतात वॆडॆ"

के पी आर

Tuesday, November 11, 2014

Prakash


मावळत्या सूर्याकडे करुन पाठ
राहिलो जरी ऊभं
नव्या नवख्या अंधारात भिजवून काठ
काळवंडला जरी नभं
बघता बघता पेटतात चांदण्या ईरेला
स्वतःला जाळूनंही वाती, ऊजळवतात घराला
अन तेव्हाच तर मिटल्या पापण्यामागं स्वप्नांचा खेळ चालतो
काळोख आहे म्हणूनंच तर आपण ऊजेडाच्या दिशेनं चालतो
चांदवा मनापासून आभाळात राहतो तेवत
मन मात्र खुळं राहतं काळोखालाच दिवस-रात्र मनामधे ठेवत
कोणी किती झाकून ठेवलं जरी कोंबडं
फुटायचं तेव्हा फुटतंच असतं तांबडं
सोन्यासारखी झळाळते मग नभाची किनार
रात्र कितीही लांबली तरी सांगा काळोखाला
आता लवकरंच सकाळ होणार
आता लवकरंच Prakash  येणार...

के पी आर

विष


मग तिनं शांत रहायचं ठरवलं
आणि मी स्वतःशी बोलायचं

ती गिळत राहीली शब्द
आणि मी राग

रागाच्या एकेका घोटासोबत
होत राहीली पश्चातापाची पेरणी

वेशीवरचा अहंकार, परतवून लावू लागला शब्दांना
ऊच्चाराच्या प्रतिक्षेत ते पेटू लागले काळजात
अन लपेटून बसले विष, बाहेर जाण्याआधी

एका अनावर क्षणी
तिनं वाट मोकळी केली शब्दांना

त्यानंतर मात्र आपसांत वाटून घेतलीये
आम्ही शांतता...

हं... मागे वळून पाहिल्यावर वाटतं
जीवघेणी असली तरी सोपंच होतं तसं

वाटून घेणं शांतता...
आपसांत विष वाटून घेण्यापेक्षा...

के पी आर

गाठ


ती विचारायची नेहमी, कशी बांधू गाठ?
सोडगाठ बांधू की..
मी फक्त हसायचो, अजून अजून म्हणत
घट्ट करायला लावायचो
मग पहिल्या गाठीवर बोट ठेऊन
मदत करायचो तिला..
मग औक्षण करताना
दिव्यावर बोट धरुन
दोन भुवयांच्यामधे लावायची ती
मी "ऊहूं.." करायचो.. जाणवलं तरी नाहीच म्हणायचो
मग बोट भाजेपर्यंत दिव्यावर आणि मग माझ्या कपाळावर
त्यानंतर चिमूटभर साखर..
आणि मिरवायचो राखी दिवसभर

आता राखी आणि मिठाई
येते पोस्टानं..
प्रश्न वेगळा असतो..
मिळाली का रे राखी?

राखी मिळाली की मी ताईला सांगतो
तुला हवी तशी बांध
मी सोडणार नाही..
आणि सुटली तरी सुटू देणार नाही
आंघोळीच्या पाण्यानं
रंग उतरून हातावर पसरेल
हळू हळू हाताशी
रंग आणि धागे एकरुप होतील
नंतर गाठ दिसेनाशी होईल
तिथेच असली तरीही
सगळं कसं एकसंध..

मग ती येते वर्षाकाठी कधीतरी भारतात
हात बघून म्हणते
हि पुढची राखी माझी ना?
आणि वेडाएस का रे?
राखी ईतके महिने ठेवतं का कोणी हातात?
हात हातात घेऊन म्हणते
बघ आता सुटतंच नाहीये गाठ

मीही म्हणतो मग..
काही गाठी सुटण्यासाठी नसतातंच

के पी आर
(यावेळीसुद्धा पुढची राखी तुझीच)

जस्ट फ्रेंड्‌स


ती: व्हाय कांट वुई स्टील बी फ्रेंड्‌स..?

तो: पाऊस..
अंगोपांगी रुततो..
काळजात झिरपतो
कवेत घेतो
आठवणीत रमतो
कवितेत घुटमळतो
तळहातावर विसावतो
रंध्रा रंध्रातून सुखावतो
मातीच्य कणा कणाला
आयुष्याच्या क्षणा क्षणाला
मोहरुन टाकतो
डोळ्यात दाटतो..
मोकळा ढाकळा मनापासून
कडकडून भेटतो..
तोच खरा माझा पाऊस

माझाच पाऊस
काचेच्या आडून
दुसऱ्याच्या दारात..
पहायचा नाही मला

दुसऱ्याच्या दारात बरसताना बघून
झुरायचं नाही मला उगाच

खरंच नखशिखांत जाणवणारा तो
माझा पाऊस

त्यांच्या दारातलं ते फक्त पाणी

त्यापेक्षा..
माझ्या वाटचा पाऊस..
आठवणीत का असेना..
असू दे माझाच..

माझ्या हक्काच्या पावसाला
पाण्याचं लेबल नाही चिकटवायचं मला

म्हणूनंच..नाही..
नो.. वुई कांट बी जस्ट फ्रेंड्‌स

के पी आर

मैत्री


त्यानं एकवार कोऱ्या पानाकडे पाहिलं
अन परत डोळे मिटून बसला..
काही सुचतंय का "पाहण्यासाठी.." डोळे "मिटून"
डोळ्यासमोर उलगडलं परत तेच..
गेली कित्येक वर्ष, त्यातले कित्येक क्षण..
अन सरत्या वयाबरोबर येत गेलेलं शहाणपण
मग त्यानं परत
मिटल्या डोळ्यानं निरखून पाहिलं
पण काही टिपायचं सोडून
मन खुळ्यासारखं वाहवत राहिलं..
त्याची कविता त्यानं
मिटल्या डोळ्यातंच लिहिली
अन समोर पडलेल्या पानाची
एकेक ओळ अशी कोरीच राहिली
तसं लिहिणंही कठीणंच होतं म्हणा
कारण..
त्यांचा सहवास बाकी जगासाठी
होता खुळेपणा
.
.
.
व्यवहारात अर्थ नव्हता त्या खुळेपणाला
आणि त्या खुळेपणाशिवाय त्यांच्या जगण्याला
तसंही ते वेड
एखाद्या चिठोरीवर सामावलं नसतं
त्याला म्हणे ते आजकाल
फक्त मिटल्या डोळ्यानंच दिसतं..

मिटल्या डोळ्यात आणि खुल्या मनात
त्या वेडाची असते त्याला खात्री
जग म्हणतं वेड
अन तो मात्र म्हणतो त्याला मैत्री..

के पी आर

(व्यवहाराच्या चौकटीत कधीच न बसणाऱ्या
माझ्या सगळ्या "खुळ्या" मित्रांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा)

#HappyFriendshipsDayGuys :)

त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या


त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या
माझ्या तळहातावरच्या रेषांपेक्षा
सुंदर आहेत..

हरेक सुरकुतीत रुजलेत एकेक क्षण

त्या बदलत नाहीत.. डिवचत नाहीत
घाबरवत नाहीत.. भुलवतंही नाहीत
सतावत नाहीत... सलत नाहीत
रडवत नाहीत.. फसवत तर त्याहून नाहीत..

त्या समजून घेतात, सामावून घेतात..
हसू देतात.. समाधानंही देतात
आजच्या रिंकलफ्री नात्याच्या जमान्यातंही
टिकवून ठेवतात "घडी"
वाढतात.. व्यापतात
त्यांच्या चेहऱ्यासोबत माझं आयुष्य..

तळहाताच्या रेषांमधे.. शाश्वत काहीच नाही
म्हणे दडलंय त्यामागं माझं भविष्य
पण... त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमधेच
दिसतं मला... माझा आज, उद्या आणि
माझं सारं आयुष्य..

मऊ लुसलुशीत.. हव्याहव्याशा

हंम्म... खरंच

त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या
माझ्या तळहातावरच्या रेषांपेक्षा
सुंदर आहेत..

के पी आर

ती


ती वागते अशीच
कधीतरी वेड्यासारखी
उगाचंच डोळ्यात पाणी
आणि प्रश्नचिन्ह चेहेऱ्यावरती
पण तरीही पाहते निश्चयानं हसून
साऱ्यांच्या नकळत डोळे पुसून
हा वेडेपणा फार काळ टिकत नाही
अन किती केलं तरी ती
स्वतःसाठी जगायला शिकत नाही

पण जमणार तिला..
आज ना उद्या मनापासून हसायला
थोडा वेळ लागतोच ना
काळजाला व्यवहाराची गणितं शिकायला?

के पी आर

भीती


मग त्यानं..
धारदार सुरा घेऊन
जमीन चिरायला घेतली..
त्याच्या वाटचा, त्याच्या धर्माच्या वाटचा
तुकडा त्याला वेगळा हवा होता..
कायद्या बियद्याला जुमानत नव्हता तो
जमेल न जमेल असले
फुटकळ प्रश्नही पडत नव्हते त्याला
तो समाजाचा एक अविभाज्य भाग होता
पण त्याच्यासाठी त्याचा समाजंच वेगळा
"माजा"सहीत असल्यामुळेच
कदाचित "स"माज म्हणत असावे.. असा त्याचा अंदाज
रक्ताळलेल्या डोळ्यातली
भीती लपवण्यासाठी..
ओढून घेतली होती त्यानं डोळ्यावर मग्रुरी...

दातओठ खाऊन, जीवाच्या आकांतानं
चिरत राहीला तो जमिन
एवढा खाटाटोप करुनंही
जाईना मनातली भीती.. अन
चिरता येईनाच त्याला.. "जमिन"
.
.
.
.
आजकाल
तोच धारदार सुरा.. तो कमरेला लाऊन फिरतो..

पण..
भीती अजूनंही जातंच नाही..
म्हणूनंच सुऱ्याच्या आजूबाजूला
पसरवंत राहतो तो त्याच्यातलीच "भीती"

के पी आर

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...