त्यानं एकवार कोऱ्या पानाकडे पाहिलं
अन परत डोळे मिटून बसला..
काही सुचतंय का "पाहण्यासाठी.." डोळे "मिटून"
डोळ्यासमोर उलगडलं परत तेच..
गेली कित्येक वर्ष, त्यातले कित्येक क्षण..
अन सरत्या वयाबरोबर येत गेलेलं शहाणपण
मग त्यानं परत
मिटल्या डोळ्यानं निरखून पाहिलं
पण काही टिपायचं सोडून
मन खुळ्यासारखं वाहवत राहिलं..
त्याची कविता त्यानं
मिटल्या डोळ्यातंच लिहिली
अन समोर पडलेल्या पानाची
एकेक ओळ अशी कोरीच राहिली
तसं लिहिणंही कठीणंच होतं म्हणा
कारण..
त्यांचा सहवास बाकी जगासाठी
होता खुळेपणा
.
.
.
व्यवहारात अर्थ नव्हता त्या खुळेपणाला
आणि त्या खुळेपणाशिवाय त्यांच्या जगण्याला
तसंही ते वेड
एखाद्या चिठोरीवर सामावलं नसतं
त्याला म्हणे ते आजकाल
फक्त मिटल्या डोळ्यानंच दिसतं..
मिटल्या डोळ्यात आणि खुल्या मनात
त्या वेडाची असते त्याला खात्री
जग म्हणतं वेड
अन तो मात्र म्हणतो त्याला मैत्री..
के पी आर
(व्यवहाराच्या चौकटीत कधीच न बसणाऱ्या
माझ्या सगळ्या "खुळ्या" मित्रांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा)
#HappyFriendshipsDayGuys :)

No comments:
Post a Comment