Saturday, May 16, 2026

दोघं - भाग १५

 


तो मुंबई विमानतळावर पोहोचला. इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर होती. गेल्या दोन दिवसात लंडन मुंबई फ्लाईट मिस झाली होती होती, नव्याने तिकिटस बूक करुन वेळेत भारतात येणं गरजेचं होतं. घरच्या सगळ्यांचे तिकिटस रीस्केड्युल करता येत होते पण त्यांची ट्रॅवल डेट दोनदा बदलून घेतली असल्यानं आता परत बदलता येत नव्हती. फॅमिलीला ज्या फ्लाईटमध्ये तिकिट मिळत होतं त्यात त्याला मिळत नव्हतं. त्याला त्यांच्या आधी सहा तास निघावं लागणार होतं. नाईलाजाने त्याने ते तिकिट बुक करून टाकलं. तो हिथ्रो एअरपोर्टवर पोचला आणि विमान दोन तास डिले झालं तरीही डायरेक्ट फ्लाईट असल्याने तो घरच्यांपेक्षा तीन तास आधीच मुंबई एअरपोर्टवर पोहोचला. दोन दिवसांची धावपळ शारीरिक आणि मानसिक रित्या भयंकर थकवणारी होती. त्याच्याकडे त्याची छोटी बॅकपॅक आणि हातातलं कोलीन हूवरचंइट एंडस विथ असवगळता काहीही सामान नव्हतं.

एअरपोर्टवर त्यातल्या त्यात कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी कोपऱ्यातल्या एका खुर्चीवर तो बसला आणि शेजारच्या खुर्चीवर त्याने बॅग ठेवली. आजूबाजूच्या गर्दीवर निरर्थक कटाक्ष टाकत त्याने हातातल्या घड्याळात पाहिलं, दुपारचे दोन वाजले होते. घरच्यांची फ्लाईट पाच वाजता लॅंड होणार होती. असहाय्यपणे एक उसासा सोडत त्याने पुस्तक उघडलं. पुस्तकात नीटसं लक्ष लागेना, मिस्ड फ्लाईट, लांबलेला प्रवास, एअरपोर्टवरचं ताटकळणं, शरीरासोबत मनंही आंबून गेलं होतं पार. तो चटकन वॉशरुममध्ये जाऊन चेहरा थंडगार पाण्याने धुवून परत जागेवर येऊन बसला. त्याने जरावेळ डोळे बंद करुन घेतले, सतत कुठेतरी धावत पळत काहीतरी गाठायचा प्रयत्न केल्यासारखं वाटत राहिलं, झोप मात्र येईना. झोप येईना तेव्हा त्याने परत एकदा पुस्तक काढून पुढे वाचायला सुरुवात केली, दोन पानं वाचून झाली असतील तेव्हा ॲटलस लिलीला म्हणत होता, “इन फ्युचरइफ बाय सम मिरॅकल यू एव्हर फाइंड यूअरसेल्फ इन पोझिशन टू फॉल इन लव्ह अगेनफॉल इन लव्ह विथ मी”.

ते वाक्य वाचून काहीतरी आठवल्यासारखं तंद्रीत जात त्याने पुस्तक पोटावर उपडं ठेवलं. खुर्चीत रेलत मान मागे सोडून दिली.

मिरामार बीचवर संध्याकाळचा सनसेट बघत शांत बसला असताना आभाळ जांभुळसर नारींगी झाल्यावर ते डोळ्यात साठवून घेत त्याने अशीच मान मागे सोडली होती. आजूबाजूचा कोलाहल क्षणात विरुन त्याची तंद्री लागली, बीचवरची गर्दी तर सोडाच पण पलीकडेच आपले दोन मित्र  बसले आहेत हे सुद्धा तो पूर्णपणे विसरुन गेला होता, कानात फक्त समुद्राच्या लाटांचा लयबद्ध आवाज येत होता आणि समुद्र किनारी जणू फक्त तो एकटा बसलाय असं त्याला वाटत होतं. तो त्याच्या विश्वात एवढा मश्गुल झाला होता कि त्याचे मित्राने त्याला - वेळा हाक मारलेलीही त्याला ऐकू गेली नाही, शेवटी त्याचा मित्राने जवळ येत त्याच्या खांद्याला धरुन त्याला गदागदा हलवलं आणि म्हणाला बरोबर आहे तुझं मी एकटाच आहे या बीचवर. तंद्रीतून भानावर येत त्याने मित्राकडे आश्चर्याने आणि तेवढ्याच वैतागाने पाहिलं. मी कुठे काय बोललोय हे शब्दशः विचारताही हा प्रश्न त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होता

मित्र हसू लागला तसं आजूबाजूला बघितल्यावर त्याला लक्षात आलं कि हा दुसऱ्याच कोणाशी बोलतोय. तो काही बोलणार इतक्यात मित्रानेच परत सांगायला सुरुवात केली, "हा काय ईथे बसूनही वेगळ्याच दुनियेत रमलाय आणि बाकीचे चौघे रुमवर मदिरा प्राशन करत बसलेत. मीच या गर्दीत हरवलोय टा, यू आर अबसोल्यूटली राईट मी एकटाच आलोय गोव्याला". मित्र समोर उभारलेल्या मुलीशी बोलतोय लक्षात येताच तो जगाचा उठून उभा राहिला, मित्राने दोघांची ओळख  दिली, तो म्हणाला ती त्याची फॅमिली फ्रेंड आहे आणि सांगितलं की  या चौघी गोव्याला निघाल्या होत्या पण त्यातल्या दोघींना तारकर्ली जास्तं आवडलं म्हणून त्या तिथेच थांबल्या आणि या दोघीच गोव्यात आल्या आणि आता पुढे येऊन बोअर होत आहेत. अरे मग उद्या आमच्या बरोबर या आम्ही साऊथ गोव्याला चाललोय म्हणून त्याने तिला इन्व्हाईट करुन टाकलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की हि आपली पहिलीच भेट आहे तसा तो चट्कन म्हणाला की आय मीन तुमची काही हरकत. त्याला थांबवत ती म्हणाली हरकत कसली त्यात दोघी बोअर होतोय, तुमच्या सोबत बोअर होऊन बघुया पण तुमच्या गाडीत जागा आहे का आम्हाला अकोमोडेट करायला?

अरे आपली नाईन सीटर आहे, एक जागा शिल्लक राहिल डोंट वरी म्हणत त्याने त्याची पँट झटकत रेती काढायचा एक अयशस्वी प्रयत्न केला. ते तिघेही तिथून निघाले तेव्हा त्याने नुकताच टिपलेल्या सनसेटचा वॉलपेपर त्याच्या डबल सिक्स डबल झिरो वर सेट केला, त्यावर्षी तुफान गाजत असलेलं गाणं लावून हेडफोन कानात सारले, कानात गाणं चालू झालं आणि त्याने परत एकदा गर्दीपासून स्वतःला डिस्कनेक्ट करुन घेतलं, केके त्याच्या आवाजाने संमोहित करत होता

तू हि मेरी शब है सुबह है तू हि दिन है मेरा.

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळात ते निघाले आणि त्या दोघींना वाटेतून पिक केलं, हाय हॅलो, ओळख पाळख झाल्यावर त्या दोघी उजव्या बाजूला मागून दुसऱ्या सीटवर बसल्या, खरंतर त्यांना सगळ्यात मागच्या सीटवर बसायची इच्छा होती पण शेवटच्या सीटवर त्याचं अघोषित रीजर्वेशन होतं. दिवसभर साऊथ गोव्या हिंडून मनसोक्त सीफूड खादडून संध्याकाळी वार्का बीचवर धमाल करुन ते परतीच्या प्रवासाला लागले तेव्हा बराचवेळ फना आणि गँगस्टरची गाणी डोळे मिटून ऐकणारा तो आशिकीचं अब तेरे बीन लागल्यावर स्वतःच्याच तंद्रीत जराशा मोठ्या आवाजात गाणं गाऊ लागला. गाणं संपलं तसे डोळे उघडले तर ती त्याच्याकडेच बघत होती. रीफ्लेक्स ऍक्शन व्हावी तसा त्याच्याही नकळत तो तिला सॉरी म्हणाला, काहीही न म्हणता खिडकीतून बाहेर बघणं कंटिन्यू केलं.

अच्छा तर काल तू खरंच बोलत होतीस तर म्हणत त्याने तिच्याशी बोलायचं प्रयत्न केला.

काय बोलले मी तुला? खिडकीतून अंधाराला आरपार भेदणारी नजर न हटवता तिने प्रतिप्रश्न केला.

हेच, की आत्ता दोघी बोअर होतोय उद्या तुमच्या बरोबर बोअर होऊन बघू.

तसंच काही नाही पण... तिने बोलणं मध्येच थांबवलं.

हां, आता कसं... पण आहे ना, तसंच काही नाही पण... पण काय

पण... मला वेगळं गाणं ऐकायची इच्छा आहे आणि तू स्टोनएज मधली गाणी एंजॉय कारतोएस.

एवढंच ना... सांग तुला कोणतं गाणं ऐकायचंय, चाल ते लाऊ.

कॅसेट नसणार त्याची गाडीत.

तो काहीही न बोलता उठून पुढे गेला आणि दोन मिनिटांत परत आला तेव्हा गाडीतली गाणी बंद झाली होती, बाकीचे जवळपास सगळे झोपी गेले होते.

काय रे मी गाणी बंद कर असं कुठे म्हणाले? तुझया फेवरेट गाण्यांना स्टोन एजची गाणी म्हणाले म्हणून राग आला की काय?

ह्याट राग काय यायचा त्याच्यात, मी म्हणलं तुझं फेवरेट गाणं आहे तर तुझ्या फोनमध्ये नक्कीच असेल, गाडीतली गाणी बंद केली तर तुझ्या मोबाईल मधली गाणी ऐकता येतील.

काय?

काय काय काय? कोणतं गाणं ऐकायची इच्छा होती ते लाव की.

तिने काहीही न बोलता गाणं लावून डोकं खिडकीच्या गजावर टेकवलं आणि चित्राच्या आवाजात स्वतःचा आवाज मिसळला, "ला ला ला ला ला ला ला ला, साथिया तूने क्या किया"

गाणं संपल्यावर तो म्हणाला लव्ह आणि आशिकी दोन्हीचा अर्थही तसा फारसा वेगळा नाहीये. ती काहीच बोलत नाहीये बघून तो म्हणाला हा पीजे असला तरी हे दोन्ही पिक्चर १-२ वर्ष मागेपुढे रीलीज झाले असतील तरी माझं फेवरेट गाणं स्टोनएज मधलं आहे वा.

आय डोंट नो अबाऊट एनी आदर सॉंग बात धिस वन इज ऍन एव्हरग्रीन.

पुढे पणजीला परत येई पर्यंत त्यांच्या एकमेकांना खेचत कधी एकमत होत गप्पा रंगल्या.

दिवसभर थकल्यामुळे रात्री जेवायला न येता तिची मैत्रीण थेट रुमवर झोपायला गेली आणि जेवण झाल्यावर तो तिला तिच्या रुमवर सोडायला म्हणून तिच्यासोबत चालत गेला. दोघांनी खूप गप्पा मारल्या, मेजॉरिटी वेळ गाणी हाच गप्पांचा समान धागा होता. नवी ओळख, दिवसभराचा अवघडलेपणा वगैरे कुठल्या कुठे गेला होता आणि आता झोपायला न जाता रात्रभर असंच पायऱ्यांवर गप्पा मारत बसावसं वाटत होतं दोघांना. तिला ४ वेळा मैत्रिणीचा फोन येऊन गेला होता, शेवटी नाईलाजाने साडेबारा वाजता दोघांनी काढता पाय घेतला तेव्हा त्यांना वर्षानुवर्षांपासून आपली ओळख असल्यासारखं वाटत होतं. दोघांनी नंबर्स एक्स्चेंज केले, रुमवर जाताच त्याच्या गुडनाईट मेसेजला तिने :) स्माईली पाठवून रीप्लाय केला.

पुढचे तीन दिवस त्यांनी जमेल तेवढा एकत्र वेळ घालवला, समुद्रातल्या राईड्स, सनसेट्स, लंच आणि डिनरच्या वेळी मिळून ऑर्डर देणं आणि रात्री दूरवर चालत जाऊन गप्पा मारणं सगळं सगळं एकत्रंच. दोघांनाही एकमेकांचा सहवास हवाहवा वाटू लागला होता, दोघांच्या आवडीची गाणी लावून एक इयरफोन त्याच्या आणि एक तिच्या कानात लाऊन गाणी ऐकणं आणि त्यासाठी एका सीटवर बसणं, याउपर एकमेकांच्या बोटाला स्पर्श करता करता हातात हात घेणं हे कधी चालू झालं हे त्यांच्याही लक्षात नाही आलं. 

सेकंड लास्ट डेला काहीही न करता हॉटेलवर पडीक राहायचा प्लॅन सगळ्यांनी केला असताना आणि सगळे कंटाळलेले असताना या दोघांनी सगळ्यांना जबरदस्ती परत एक्दा वार्का बीचला नेलं. संध्याकाळी परत येताना सगळ्यांनी यांना जबरदस्तीने ओल्ड गोवा चर्च बघायची गळ घातली. परतीच्या प्रवासात दोघांनी फक्त तूही मेरी शब आणि साथिया तूने क्या किया ची पारायणं केली. चर्च जवळ येत असताना तो झोपी गेला तेव्हा संध्याकाळचे जवळपास साडेसात वाजले होते. चर्च आल्यावर ए चला रे म्हणत एकेकाने गाडीतून बाहेर उड्या मारल्या तेव्हा मी उठवते त्याला, तुम्ही चला म्हणून तिने सगळ्यांना पुढे व्हायला सांगितलं. सगळे खाली उतरल्यावर तिने रस्त्याच्या बाजूच्या दोन खिडक्यांचे पडदे ओढून बंद केले आणि त्याला हाक मारली, त्याने शून्य प्रतिसाद दिला, क्षणभर थांबून तिने जवळ येत त्याच्या गालावर हलकेच तिचे ओठ टेकवले आणि त्याने काहीच न कळल्यासारखं आळोखेपिळोखे देत कूस बदलली. मग तिने त्याला मोठयाने आवाज देत उठवून खाली नेलं.

डिनरनंतर ढेपाळलेल्या सगळ्यांची पटापट विकेट उडाली. हे दोघे एक फेरफटका मारुन नेहमीप्रमाणे हॉटेलच्या मागच्या बाजूच्या पायऱ्यांवर येऊन बसले. रोजच्या सारखे आज ते अविरत बडबड करत नव्हते रादर दोघेही शांत होते. थोडावेळ काहीच न बोलता बसून राहिल्यावर ती म्हणाली फोन दे तुझा तुला गाणं ट्रान्स्फर करायचं होतं ना? ब्लूटूथने करते. गाणं ट्रान्स्फर करताना ती म्हणाली संध्याकाळी मी तुला गालावर किस केलं एवढंसुद्धा तुला कळलं नाही का रे? किती डंब आहेस तू. नजरेला नजर न मिळवता तो म्हणाला कळलं होता मला.

मग काही बोललाही नाहीस.

त्याने फक्त तिच्याकडे पाहिलं, दोघांमध्ये सूतभर अंतर शिल्लक होतं.

त्यात बोलण्यासारखं काही नव्हतं, तिच्यावर रोखलेली नजर न हटवता तो म्हणाला.

बोलण्यासारखं नव्हतं तर मग...

श्श.... म्हणून तिच्या ओठावर बोट ठेवत तो म्हणाला, बोलण्यासारखं नव्हतं... करण्यासारखं होतं

मग काहीच केलं का नाहीस?

तिथे शक्य नव्हतं

मग आत्ता...

तिचं वाक्य पूर्ण होऊ न देता त्याने ओठ तिच्या ओठांवर टेकवले, डाव्या हाताने तिची हनुवटी वर करत एकदा या गालावर आणि मग त्या गालावर हलकेच किस केलं आणि म्हणाला आपण इंटरेस्ट सकट परतफेड करतो.

बोलू नकोस... ती वैतागून म्हणाली तसा त्याने तिचा चेहेरा दोन्ही हातात पकडून ओठांवर ओठ टेकवत एक दीर्घ किस घेतला, मग परत एक आणि अजून एक, भान हरपून दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली.

 

एक्सयूज मी तुमची बॅग खाली ठेवलं का? कोणीतरी रिक्वेस्ट करतंय ते ऐकून तो तंद्रीतून बाहेर आला आणि डोळे न उघडताच शेजारच्या चेअरवर ठेवलेली बॅकपॅक खाली घेऊ लागला. बॅग खाली ठेवता ठेवता डोळे उघडून बघतो तर त्याच्या समोरच्या खुर्च्यांच्या ओळीतल्या एकाजणाला कोणीतरी बसायला जागा व्हावी म्हणून रीक्वेस्ट करत होती. त्याने पोटावरचं पुस्तक उचलून पुढे वाचायला सुरुवात केली. थोड्याच वेळात जेव्हा लिलीने रायलला सेपरेट होण्याचा पक्का निर्णय सांगितला त्याच्या पुढे त्याला वाचवेना. त्याने यावेळी पुस्तक चेहेऱ्यावर ठेवत डोळे मिटले.

लॉंग डिस्टन्स असूनही त्यांच्यातला स्पार्क ट्रिपनंतरंही कायम होता. तो पुण्यात ती मुंबईत पण फोनवर अहोरात्र बोलणं, जमेल तसं भेटणं चालू होतं. फॉर्मली दोघांनीही एकमेकांना प्रपोज वगैरे केलं नव्हतं आणि तशी त्याची गरजंही नव्हती. त्याच्या बंद डोळ्यासमोर परत एकदा २००६ चे दिवस दिसू लागले होते पण यावेळी चित्र जरा धूसर दिसत होतं, याला कारण मगाशी बॅग उचलायची रिक्वेस्ट करणारा आवाज होता. 

ती अली तशी ती अविरत कोणाशी तरी फोनवर बोलत होती. बोलण्यावरुन नवऱ्याशी बोलत असावी असा सहज अंदाज लावता येत होता. बोलता बोलता ती म्हणाली, "सी देअर इज नो साच थिंग ऍज बॅड पीपल, वुई आर ऑल जस्ट पीपल व्हू समटाईम्स डू बॅड थिंग्ज". त्याला हे वाक्य ऐकून त्यांची शेवटची भेट आठवली. त्या दिवशी तो तिला मुंबईला भेटायला गेला होता, तासनतास विनासायास एकत्र वेळ घालवणाऱ्या दोघांना त्यादिवशी काय करावं हे सुचत नव्हतं, बराचवेळ काहीच न सुचल्याने त्यांनी शेवटी वो लम्हे पिक्चर पहिला जाऊन. परत येताना गाडीत तेरे बिन मै यू कैसे जिया गाणं तिसऱ्यांदा लागलं तेव्हा तिने सीडी बाहेर काढली आणि न राहावून त्याला असली डिप्रेसिंग गाणी ऐकत जाऊ नकोस म्हणाली, आणि पुढे म्हणाली धिस इज नॉट द सेम गाय आय मेट इन द गोवा ट्रिप. त्याने शांतपणे तिच्या हातातली सीडी काढून घेतली, खिडकीची काच खाली घेत सीडी लांब अंधारात भिरकावून दिली, नाही ऐकणार प्रॉमिस म्हणत काच पुन्हा वर घेतली.

मी फार वाईट वागले ना? तू बोल ना यार, म्हण ना की मी वाईट आहे.

तिच्या ओठांवर बोट ठेवत तोही काहीसा याच आशयाचं बोलला होता, "नोवन इज बॅड अँड यू आर सर्टनली नॉट, समटाईम्स द सिच्युएशन इज बॅड".

पण त्याला डोळे मिटलेले असताना एक लक्षात आलं की फक्त या वाक्यामुळे आपल्याला ती शेवटची भेट आठवली नाहीये, हा आवाज... असा विचार करत त्याने डोळे उघडले, तोंडावर पुस्तक तसंच उपडं ठेवलेलं होतं, ती अजूनंही फोनवर बोलत होती, एकतर किती महिन्यांनी मी मुंबईत आलेय, तुला कित्ती सांगितलं नाही यायचं मला गोव्याला, नाही आवडत मला गोवा पण तू कधी ऐकतंच नाहीस. आता हि फ्लाईट डिले झालीये, वेड्यासारखं एअरपोर्टवर बसून राहायचं, घरीही जात येत नाही. समोरची व्यक्ती काय बोलली ते माहित नाही पण ती काकुळतीला येऊन म्हणत होती, बट आय हेट गोवा.

काहीतरी स्ट्राईक झाल्यासारखं त्याने झट्कन चेहेऱ्यावरचं पुस्तक खाली करुन समोर पाहिलं, समोरच्या खुर्चीत बसून फोनवर बोलणारी ती होती, हो तीच होती. त्याने तिला लक्षात यायच्याआधी क्षणात परत डोळे मिटून घेतले. त्यांच्या शेवटच्या भेटीला आता १६ वर्ष होऊन गेली होती. त्याने डोळे मिटले पण पुस्तक परत चेहऱ्यावर घ्यायचं त्याला सुचलंच नाही.

तब्बल १६ वर्षांनंतर ती त्याच्या समोर, अगदी दोन हाताच्या अंतरावर बसली होती, तो परत एकदा तिच्याशी बोलू शकत होता पण त्याने जणू तिला बघितलंच नाहीये असे डोळे बंदंच ठेवले. ती फोनवर बोलत होती पण त्याला तिचा शेवटच्या भेटीच्या वेळचा कारमधला आवाज ऐकू येत होता.

प्लिज असं करु नकोस, क्लीन शेव्ह कर, नीट राहा, आय'इल ऑल्वेज मिस यू, यू विल ऑल्वेज बी स्पेशल फॉर मी.

कारमधल्या त्याने डोळे झाकून घेतले होते, ती विनवणी करत होती, प्लिज प्रॉमिस मी तू नीट राहशील. त्याच्या गच्च मिटलेल्या डोळ्यातून पाणी गालावर ओघळलं, ती गाडीतून खाली उतरली होती. ड्रायव्हर साइडला येत तिने काचेवर टकटक केली, त्याने अंदाजानेच काच खाली केली.

नीट राहशील ना? तिने परत एकदा विचारलं.

डोळ्यातून पाणी ओघळत असताना त्याने हुंकार देत होकारार्थी मान हलवली.

तिने आय लव्ह यू म्हणून, त्याच्या गालावरचं पाणी पुसत हलकेच ओठ गालावर टेकवले आणि पाठ फिरवून झपाझप चालायला सुरुवात केली.

त्याने बराचवेळ डोळे उघडलेच नाहीत, गोव्यात उघडले नव्हते तसेच...

आत्ता एअरपोर्टवरंही त्याच्या गालावर ओठ टेकलेले त्याला जाणवले, तिचा आवाज मात्र येत नव्हता, कोणीतरी दूर निघून चालल्याची जाणीव होत होती.

एअरपोर्टवरचा सगळा कोलाहल थांबला होता आणि त्याच्यापासून थोडंसं दूर कोणाच्यातरी फोनची रींगटोन वाजली, "साथिया तूने क्या किया"

 

आजंही काहीच न कळल्याचा आव आणत तो मनातल्या मनात म्हणाला' "मैने किया तेरा इंतजार...."



केपी आर 


 


Saturday, January 17, 2026

प्रत्येक गोष्ट पूर्ण करायचा अट्टाहास करु नये - कुणाल

 खरं सांगू? या खरं सांगू नंतर मी घेतलेला पॉज पत्रात दिसत असता तर… 

खरं सांगू विचारल्यानंतर डोक्यात आलं नको खरं बोलायला, काट मारुन टाकूया या वाक्यावर. मग परत लक्षात आलं काट मारलेलीही कळेलंच, त्याखालचं खरं सांगू दिसेलंच. त्यापेक्षा हे पानंच डिस्कार्ड करुया दुसऱ्याच पानावर लिहायला घेऊ. पण खूप विचार केल्यावर कळलं आताही आडपडदा ठेवण्यात काही अर्थ नाही, मुखवट्यामागे लपून लिहिण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे खरंच बोलूया. 

खरं सांगायचं तर तुला मी जेव्हा पत्र लिहिलं तेव्हा त्याचं उत्तर येईल असं मला आजिबातंच वाटलं नव्हतं. म्हणजे तुला ते मिळेल की नाही आणि मिळालं तर उत्तर देशील की नाही… नकोच त्यात पडायला.


पण, मला वाटलं होतं हे शेवटचं किंवा कदाचित जर ८-१० दिवसांत पत्ता चुकीचाए म्हणून पोस्टमन ने परत आणून दिलं तर किंवा नाही दिलं तर परत एक पत्र टाकून बघूया का? याच्यापेक्षा जास्त विचार मी केला नव्हता. आणि खरं सांगायचं तर असं वाटलं होतं दीड वर्षाचा जो मी उल्लेख केलाय पत्रात त्यावर तू आक्षेप घेशील कारण आपल्याला कुठल्याही प्रकारे शेवटचा संपर्क करुन दीड नाही तर चार वर्ष झाली आणि मागचं पत्र लिहिताना अनावधानानं मी दीड वर्ष लिहून गेलो कारण गेले दीड वर्ष मी विचार करतोय तुला पत्र लिहिण्याचा, पत्र लिहिण्याचाच असं नाही पण कॉंटॅक्ट करण्याचा. 


आणि पहिले काही महिने तर मी का करु… मीऽच का करु याच्यामध्ये गेले. त्यानंतरचे काही महीने अकारण माझा राग तुझ्यावर काढण्यात गेले. तुझ्यावर रागवायचा बराच प्रयत्न केला, खूप विचार करुन बघितला काय केल्याने हिला त्रास होईल, हिची चिडचिड होईल, संताप होईल. कॉंटॅक्टंच नाही, एकमेकांना बघतंही नाही, चुकून कुठे दिसतंही नाही, कोणाकडून काही कळण्याची शक्यताही नाही तर हे कसं साधता येईल. 


हळूहळू राग निवळत गेला किंवा आपण म्हणूया कि कळत गेलं की तो अकारण आहे. आणि मग सुरुवात झाली की यार चुकलोच आपण हे हळूहळू ॲक्सेप्ट करण्याची. चुकलो याची जाणीव होऊ लागली हळूहळू. म्हणजे डोक्यात आलं की आपण चुकलो का आणि ते ॲक्सेप्ट करण्यात बाकीचा वेळ गेला. 

तर हे असं एकूण ॲक्सेप्टंसच्या किंवा उपरतीच्या प्रवासात वर्षदीड वर्ष गेलं आणि लिहिताना डोक्यात तेच असल्यानं चुकून मी दीड वर्षाचा उल्लेख केला. 


तुला पत्र लिहीण्या आधी ना बरेच दिवस, बरेच महिने खरंतर असं छातीवर कोणीतरी खूप मोठा दगड ठेऊन दाबतंय असं वाटायचं आणि पत्र पोस्टात टाकेपर्यंत… नाही सांगता येणार मला नेमकं काय.  आत्ताच का हा प्रश्न माझा मेंदू सतत कुरतडत होता पण ॲट द सेम टाईम आता नाही तर कधी हा ही होताच. ते लहानपणी ना आम्ही पतंग अडकला ना झाडामध्ये की लिमजर बनवायचो, मांजाच्या एका टोकाला दगड बांधायचा आणि बरोबर जिथे पतंग मांजासाकट अडकला असेल त्याच्यावर हा दगड टाकून एकमेकांत अडकवून एक टोक ओढायचं. आणि हळूहळू पतंगाचा मांजा खाली घेऊन तो काढायचा प्रयत्न करायचा. कधी जमायचं बऱ्याचदा फसायचाही प्रयत्न. आणि आपल्या हातातला दोर तुटून वरच्या मांज्यामध्ये गुंतून दगड आणि मांजा तसाच अडकून राहायचा. येताजाता तो दगड डोक्यावर हलताना दिसायचा. माझ्या डोक्यावर सतत हे दोन प्रश्न हलत होते, आत्ताच का आणि आता नाही तर मग कधी? शेवटी इतक्या वर्षानंतर मनात सगळ्यात जास्त तीव्रतेने येणारा प्रश्न जो होता, कशी आहेस? एवढंच लिहून पाठवलं. उत्तराची अपेक्षा नव्हती त्यामुळे उत्तर आल्यानंतर आता काय लिहावं या विचारानं पुरता गोंधळून गेलो. 


ज्या कॅफेत बसून पत्र लिहितोय ना तिथे त्याने गाणी लावलीयेत आणि आत्ताच का आणि आता नाही तर मग कधी या एकूण दोलायमान अवस्थेत असताना माझे पत्र लिहिण्याचे स्किल जेवढे खराब आहेत त्यापेक्षा खराब आवाजात  सुशांतसिंग राजपूत विचारतोय के तेरे मेरे बीच मे क्या है? त्या ओळीवर थांबून विचार करायला नको म्हणलं तरी रेंगाळायला झालंच. पुढे काय लिहू हा प्रश्नंही होताच. 

हे असं काहीतरी भरकटल्यासारखं लिहिणं झालंय, म्हणजे एकूणात पत्राची सुरुवात असावी, त्यात काहीतरी गाभा असावा आणि मग शेवट असावा हे असं आपल्याला खरंतर चौथीपाचवी मध्ये पत्रलेखनामध्ये शिकवलं होतं. 


सुरुवात, गाभा…. शे व ट म्हणजे पूर्ण कसं करु पत्र हा ही प्रश्न आहेच. आणि मग तेवढ्यात परवा अंधाधुन बघितलेला आठवला. त्यात तो आयुषमान स्पर्धेसाठी पियानोची प्रॅक्टीस करत असतो. त्याचा एक पीस कंप्लीटंच होत नसतो, तो बराच प्रयत्न करतो, एका लेवलला आल्यावर त्याला सुचतंच नाही पुढे काय वाजवावं. राधिका आपटेला पहिल्यांदा भेटतो तेव्हा तिला वाजवून दाखवतो आणि ती म्हणते कमाल आहे की. तो म्हणतो नाही पण पूर्ण नाही झाला ना.

पूर्ण नाही झाला? पण सुंदर आहे की हेच.

पण पूर्ण नाही ना झाला.

ती म्हणते पण काही गोष्टी म्हणूनंच चांगल्या असतात ना कारण त्या पूर्ण होत नाहीत, अपूर्ण राहतात. पूर्ण करायच्या नादामध्ये उगाच काहीतरी बोटं घालून खराब करु नकोस.

मला पटलंय ते… प्रत्येक गोष्ट पूर्ण करायचा अट्टाहास करु नये माणसानं.


सध्या तरी इतकंच!

विचारु नकोस कशी आहेस - अमृता

 



पत्र आल्याचं बघितलं आणि रेल्वे रुळाच्या अलिकडे उभ्या असलेल्या माझ्या स्तब्ध देहासमोरून एक रेल्वे धडधडत निघून गेली. त्या क्षणी स्तब्ध उभ राहून एका तालात आणि एका दमात डोळ्यासमोरचा पट बदलताना बघत बसणं या खेरीज काहीच नसतं आपल्या हातात. तसंच झालं.. 


पत्र न उघडता चक्क चुरगाळून भिरकावलं खोलीतच. सगळं संपलं आहे आता हे स्वतःला समजावूनही झालेत बरेच महिने मग हा त्रागा का होतोय? कसला होतोय? का मीच फेकून दिलेलं पत्रं भूत होऊन माझ्या मानगुटीवर बसतय?… 


नाही म्हणता म्हणता उघडलं पत्र आणि भिडायचं ठरवलं स्वतःलाच. रागाने तापलेली माझीच कानशिल आणि तितकाच गरम अश्रू. पण एकच. पूर्वी इतकं भडाभडा रडले नाही. हे नवीन होतं मलाच. अगदी लहानपणीची एक आठवण आहे माझी. बागेतल्या एका उभ्या खांबाला लटकत गोल गोल फिरत राहायचे. तासंतास त्या खांबा सोबतचे खेळ खेळायचे. त्या गरगरण्यात केवढी झिंग होती.. पुढे मुंबईत असताना  लोकलच्या खांबाला धरून दारात सुसाट वारं खाऊ लागले. ती एक वेगळी झिंग.. खऱ्या  आयुष्यात पण असाच एक खांब शोधला होता बहुदा मी… ज्याला घट्ट पकडून आजमावू शकेन स्वतःला. 


तो खांब कोसळला भसकन आणि सोबत मी ही.. 


असो.. पत्र वाचून जरा हसूपण आलंच मला. तुला खरच जमत नाही अजून पत्र लिहायला.. इतकी वळणं घेत घेत कधी बोलायला लागलास तू? “चुकलो मी.. मग? (सगळेच चुकतात)” चा माज पण आहेच.. तरी ‘कशी आहेस? पाशी थांबले आहे मी.  मी आहे हेच खूप आहे सद्ध्या. दिल्लीतली आर्ट क्युरेटर फेलोशिप संपवून नुकतीच आलेय  घरी परत. मी कशी आहे नाही विचारायचय मला.. तू ही नको विचारूस.


तूर्तास इतकंच.. 


Thursday, January 1, 2026

पत्र लिहिण्यास कारण की - कुणाल

 


मला हे पत्र बित्रं जमत नाही म्हणालो होतो पण तूच पत्र लिहिणं बंद केलंस. फोन हळूहळू कमी होत बंद झाले. नेहमीच्या ठिकाणच्या फेऱ्या तर कधीच बंद केल्या होत्या. भेट होण्याच्या सगळ्या शक्यता संपवून टाकल्या होत्या, तू कि मी यात पडण्यात काहीच अर्थ नाही. मान्य आहे तू फोन, मेसेज केले नाही म्हणून मी ही भेटण्या-बोलण्याचा प्रयत्न करु नये असं नाही पण असो. जे झालं ते कितीही उगाळलं तरी बदलता येणार नाहीये. 

दीड वर्ष मोठा पिरीएड असतो यार पण. दीड वर्षांनी तरी मी का पत्र लिहीतोय? तू तिथेच राहत तरी असशील का? तू कदाचित भेटायचा प्रयत्न केला असशीलही पण मीच काहीही न सांगता घर बदललं, आली असशील तर आय ॲम रीअली सॉरी आणि आली नसशील तर त्यात तुझी बिलकुल चूक नाही. साला कधी कधी कोणीच चुकीचं नसतं पण वेळ चुकीची असते असलं फिल्मी बोलावं वाटतंय पण तू म्हणशील स्वतःच्या चुका झटकून टाकण्यासाठी फिलॉसॉफी सुचतीये. तर असो… 

पत्र लिहिण्यास कारण की, कशी आहेस? काय करतेस सध्या वगैरे विचारणार नाही पण कशी आहेस हे मात्र विचारावं वाटतंय. हे विचारायला इतके दिवस लागले का किंवा आता का आठवण आली किंवा माझ्या या वरवर साध्या वाटणाऱ्या प्रश्नाला तू अजून बरेच प्रतिप्रश्न विचारु शकतेस पण I leave that up to you. तुझी प्रतिक्रिया काय असेल हे ही मीच बोलू लागलो तर म्हणशील किमान मला काय वाटतंय हे तरी माझं मला ठरवू दे.

तर पत्र लिहिण्यास एकमेव कारण हेच की कशी आहेस हे पत्र मिळालं तर नक्की सांग. बोलायची ईच्छा नसली तर तसेही स्पष्ट सांग कारण माझ्या लहरी प्रमाणे सध्या बोलायला नको, भेटायला नको म्हणत एकमेकांची सवय तुटेपर्यंत ताणलं असताना आता अचानक धूमकेतू सारखा समोर येतोय. खरंतर खूप बोलावं वाटतंय पण पत्र अजूनंही जमत नाहीच शिवाय जमलंच तरी तुझं म्हणणं काय आहे हे ही महत्वाचं आहेच नाही का? उगीच आपलं हुक्की आली म्हणून पत्राच्या नावाखाली इमोशनल मोनोलॉग खरडून पाठवण्यात काय हशील. त्यामुळे पत्र लिहिण्याचं कारण की कशी आहेस? 

नवा पत्ता देतोय, पत्र मिळालं आणि बोलायला हरकत नाही असं वाटलं तर नक्की उत्तर पाठव. 


कशी आहेस?


के-११०२, आयकॉन ग्रीनबर्ड

क्वालिटी कॉलनी, सोमवार पेठ

पुणे - ४११००१

पत्र बित्र - कुणाल

 



मला हे पत्र बित्र जमत नाही कधीच, तुला सुद्धा चांगलंच माहितीये हे. पण समहाऊ बोलण्यापेक्षा आज मी यातंच कंफर्टेबल आहे. कसंय ना तुझं, माझ्या चूका दिसतात तुला, नाही मान्य आहे मला चुकत असेन मी, नाही चुकतोच पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते बोलण्याची एक पद्धत असते. आपलं माणूस दुखावलं जाऊ नये म्हणून जीवाचा आटापिटा करावा लागतो. मी मनात ठेवत नाही कधीच, जमतंच नाही असं काही. 

पण माझे ही प्रॉब्लेम्स आहेत. आता तू म्हणणार शेअर केल्याशिवाय कळणार कसं? पण समजून घ्यायची तयारी असेल ना तर सगळं व्यवस्थित कळतं, किमान आपण ज्यांना ओळखतो त्यांच्या मनातलं तरी. किती चांगलंय नाही, तू ती डायरी तरी लिहितेस, कुठेतरी बाहेर पडतं. ईथे सगळंच कठीण आहे न लिहायला जमतं ना बोलायला कोणी. अन कोण असलंच तर आम्हाला एक्स्प्रेसंही करता येत नाही. डोक्यातले विचार वाढत वाढत डोळ्यात जमतातंच रोज रात्री. 

तुझ्या रुममधल्या वस्तू तुला चिडवतात समोर बसून अन मला डिवचतात ईथेही. मला सगळ्या आघाड्या सांभाळाव्या लागतात गं. आई दादा तू अन च्यायला हि मार्केटींगची नोकरी. कस्टमर सोबत बोलताना उगाचंच हसून आव आणायचा. रात्रभर रडून जळजळणारे डोळे अन जागरणानी सुकलेलं तोंड लपवायला दहा वेळा धुवायचं. आपण आपली समजूत काढली तरी तो बेसिनवरचा आरसा च्यायला कधीच खोट बोलत नाही. 

मी मात्र सगळ्यांशीच बोलत राहतो खोटं अगदी स्वतःशीही. काय करु सांग? ईतके दिवस गेले, काहीतरी कारणं आहेत गं माझ्या अशा वागण्यामागे. अजून थोडा वेळ मागायचा तुझ्याकडे असंच ठरवून आलो होतो पण परवाच्या तुझ्या बोलण्यानंतर मी सगळं तुझ्यावर सोपवलंय. आता कारणं कोणती हे विचारु नकोस, प्रत्येकंच गोष्ट बोलायची नसते. समजूनंही घ्यायला हवं.

मी काय बोलतोय मलाच कळत नाहीये. हे पत्र तुला पोस्ट करावं की नाही या द्विधा मनस्थितीमधे ईथवर आलोय.

पोस्ट केलंच तर... तर समजेल का तुला माझी अवस्था की परत..

एक लक्षात ठेव मी आज रुमवर येणार नाही असं सांगायला का होईना तुला मैत्रिण आहे. माझी मित्र मैत्रिण गर्लफ्रेंड सगळं तूच.. तूच पाठ फिरवलीस तर...!!

तीखा पानी - अमृता



 

एवढं आ वासून बघू नकोस पत्राकडे. मला माहीत आहे, तुला हे अजिबात अपेक्षित नाही. तू प्रोजेक्टसाठी बंगलोरला गेलास, एवढचं नाही तर भांडून गेलास, दोन - तीनच दिवस झाले पण आज डायरी लिहिली नाही तर डोक फुटून जाईल.. तुझ्या आठवणींनी आणि शेवटी नेहमी प्रमाणे मलाच नही रहावलं विचारात असतोस ना काय लिहिते डायरीत मग विचार केला डायरी पेक्षा पत्रं लिहुयात,

        सो, पत्र लिहिण्यास कारण की, परत कधी येणार आहेस? मनातल्या मनात हा प्रश्न कितीदा विचरला असेन मलाही माहीत नाही. "तीखा पानी बहोत कम डाला, फ़िरभी ऑंख में पानी?" शिवा चक्क "पूरा मीठा" पाणी पूरी समोर धरत बोलला. मंजु आणि श्री नेहमी प्रमाणे त्यांच्याच नादात. मी त्यांची नजर चुकवतानाच जोरात ठसका लागला... एक प्लेट सुद्धा पूर्ण न खाता मी रूम वर आले.

        रूम कालंच आवरलेली... आज सगळं अस्ताव्यस्त करून टकावस वाटलं परत. काहीच खाण्याची ईच्छा नव्हती. कामाचा शीण घालवण्यासाठी कॉफी घेउयात असं वाटलं पण बघते तर दूध नासलेलं आजही!.. विसरले फ़्रीज मध्ये ठेवायला आजही!.. तुझ्यामुळे होतंय हे सगळं शेवटी तांब्याभर थंड पाणी प्यायलं माठातलं. २-३ घोटात शांत शांत वाटलं एकदम. माझ्या डोक्यावर हात ठेऊन "वेडाबाई" म्हणतोस ना, अगदी तसंच

  पुन्हा हॉल मध्ये आले.. तू दिलेली उशी मज्याकडे बघून हसत बसली होती, बाजूच्या कपटावर तू दिलेला पेन स्टँड. भिंतीवरचं आपल्या आवडीचं घड्याळ, कोप-यात्ल्या जाळीत तू इथेच विसरून गेलेला वॉली बॉल... भिंतीवर केलेलं कॉलेज पिक्स चं कोलाज... आणि टेबलावरच्या पुस्तकांमध्ये माझी डायरी.. त्यावर फ़क्तं नाव माझं...आतली सगळी पानं तुझीच..

बाजुला मंजुच्या पलंगावर थोडासा पसारा होता. तीही आज रूम वर येणार नसल्याचा मेसेज वाचला आणि अजूनच रिकामं रिकामं वाटू लागलं


तसा तू पहिल्यांदाच नाही गेलास बंगलॊरला, पण आधी २-३ दिवसात काम संपायचं आता तसंही नाही.. आपल्या भांडणाच्या रागात तूला सी ऑफ़ करायला ही नाही आले मी.. तुलाही एका कॉल ने आग्रह करावा वाट्लं नाही??? ३ दिवस झाले तुझा काही कॉल नाही .. मेसेज नाही.. मी उगाचच कामात बिजी करून घेतलं.. म्हणजे भासवत राहीले स्वतःलाच!

Friday, March 1, 2024

यू हॅव रीच्ड भाग ६

 

तडक ईथून निघावं असं वाटत असलं तरी कोणीतरी खेचून घेतल्यासारखा तो शेडमध्ये मधोमध उभा होता. कितीही प्रयत्न केला तरी त्याला तिथून हलता येईना. अंगातलं अवसान गळाल्यासारखा तो मटकन खाली बसला. अंगावरचा शहारा अजूनंही गेला नव्हता, त्याच्या हालचालींवर आता त्याचंच नियंत्रण नव्हतं, तो कळसुत्री बाहुल्याच्या हालचाली कोणीतरी नियंत्रित कराव्या तसा चितेच्या जवळ सरकला. दोन्ही हाताचे तळवे कोपऱ्यापासून मनगटांपर्यंत फिरवत त्याने हात परत चितेवर शेकायला सुरुवात केली. अंगाप्रत्यंगाला आणि डोळ्यांना कमालीची झळ जाणवू लागली पण तो तिथून हलत नव्हता, चिता जळत जळत सगळी लाकडं हळूहळू खाली बसली, तिथून निघावं अशी पुसटशी सूचना मेंदू त्याला अजूनंही देत होता, ती सूचना ऐकण्यासाठी म्हणून त्याने मांडी मोडून उठायचा निष्फळ प्रयत्न केला, त्याच्या पयाला एवढ्या मुंग्या आल्या होत्या कि त्याचे पाय जागचे हलेचनात. दोन्ही हात डाव्या पायाच्या पोटरीखाली घालत त्याने पाय बाहेरच्या बाजूला ओढला, पाय सरळ करता करताही शेवटचं म्हणत त्याने तळवे चितेच्या निखाऱ्यावर क्षणभर का असेना शेकून घेतले. दोन्ही हाताची बोटं एकमेकांत गुंतवून हात डोक्यावर नेत त्याने आळोखेपिळोखे देत आळस दिला. मग हात जमिनीवर रेलत जोर देऊन उभं राहायचा प्रयत्न केला तसा डाव्या पायात संवेदना नसल्यासारखा तो धप्पकन् खाली पडला. हे काय होतंय त्याला कळेना, क्षणभर शांत बसल्यावर त्याला लक्षात आलं कि त्याच्या पायाला मुंग्या आल्यात, पायाच्या मुंग्या घालवण्यासाठी त्याने दोन्ही हाताचे तळवे पायावर आपटून तबला वाजवल्या सारखं केलं. आजूबाजूला पाहिलं तर पाऊस थांबला होता, आकाश निरभ्र होतं, सर्वदूर चांदण्या लखलखत होत्या आणि चंद्र क्षितीजाच्या कडेवरुन कोसळून अचानक लख्ख उजाडेल असं वाटत होतं. साला कोण म्हणेल थोड्यावेळापूर्वी दणकून पाऊस पडलाय. तो चितेच्या शेकोटीत कोणी तरी संमोहित केल्यासारखा इतका गुंतून गेला होता कि पाऊस नेमका कधी उघडला, तो तिथे किती वेळ बसलाय यातलं त्याला काहीही कळलं नाही.

पहिल्यांदा तर मला वाटलं होतं तुम्ही काहीतरी अघोरी करत असाल, निलेशचा आवाज त्याच्या कानात एखादी अडकलेली कॅसेट वाजावी असा घुमला. आपण अघोरीच झालोय च्यायला, जळणाऱ्या मढ्याच्या चितेवर आपण गेले कित्येक तास कपडे सुकवतोय, अंग शेकतोय. त्याला क्षणात स्वत:ची किळस वाटू लागली, आत्ता या क्षणी कैलास मधून जीवाच्या आकांताने धावत निघावं परत मागे वळून न बघता एका श्वासात घरी गेल्याशिवाय थांबूच नये असं वाटू लागलं त्याला. कितीही प्रकर्षाने असं वाटलं तरी त्याचे पायंच हलेनात, तरीही परत उभा राहत त्याने चालायला सुरुवात केली, तो जसा प्रयत्न करेल तसा त्याचा डावा पाय ठणकू लागला, पायाच्या झिणझिण्या कमी झाल्या होत्या पण दुखणं वाढलं होतं. त्याला चालता येईना तसं त्याने डावा पाय खुरडत खुरडत पुढे जायला सुरुवात केली. कोणीतरी पाय घट्ट धरुन ठेवल्याचा भास झाला त्याला विनाकारणंच, मागे बघण्यासाठी त्याने मान वळवली पण मान वळेना, कितीही जोर लावला तरी मान वळेना, पाय पुढे पडेना. त्याची छाती आत येताना धडधडंत होती तशीच पुन्हा धडधडू लागली, तोंडाला कोरड पडली, चेहरा घामाने डबडबला. ईथून बाहेर पडलो नाही तर हृदय तोंडातून बाहेर पडेलसं वाटू लागलं. त्याने चालण्याचा वेग वाढवण्याचा परत एकदा निष्फळ प्रयत्न केला, जमेल तेवढं आणि जमेल तसं वेगात तो चितेच्या शेडमधून बाहेर पडला, तो धावतोय असं त्याला वाटत असलं तरी तो खुरडत चालण्यापेक्षा जास्त काहीही करु शकत नव्हता. तेवढ्यात डाव्या पायाच्या अंगठ्यातून एक तीव्र कळ त्याच्या मेंदूपर्यंत गेली, त्याच्याही नकळत पायात पाय अडकून तो एखादा भलाथोरला वृक्ष उन्मळून पडावा तसा पडला आणि पडल्याजागी त्याची शुध्द हरपली.

तो कोसळला तेव्हा पहाट झाली होती, पाऊस थांबून आता बराच वेळ झाला होता. लख्ख उजाडायला वेळ होता पण क्षितिजाच्या पलिकडून सूर्याने आभाळाचा कॅन्व्हास रंगवायला सुरुवात केली होती. पाऊस आणि उन्हाची जुगलबंदी असल्यासारखं उन्हाने आदल्या रात्रीचा बॅकलॉग भरायला सुरुवात केली. थोड्याच वेळात आजूबाजूची जमिन कोरडी ठाक झाली, नाही म्हणायला वारा तेवढा कालच्या पावसाची आठवण काढत गारवा मेंटेन करायला ईकडून तिकडे तिकडून ईकडे बागडत होता. तो पालथा पडला होता, वारा त्याच्या टकईन केलेल्या शर्टात घुसुन त्याचा फुगा बनवत होता, जमिनीखालून थंडगार हात वर येत त्याच्या गालावरुन फिरवल्याचा भास झाला तसा तो ताडकन् उठला. समोर उभा निलेश त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत त्याला सर सर म्हणून आवाज देत होता. वीजेचा झटका बसावा असा तो मागे सरकून दोन्ही पाय पोटात दुमडून घेत बसला. कधी काळी पांढरा शुभ्र असणारा शर्ट चिखलाने पूर्णपणे माखून गेला होता, डोक्यावरचे केस अस्ताव्यस्त झाले होते आणि डाव्या पायाच्या तळव्याला झालेल्या जखमेतून भळाभळा वाहून गेलेलं रक्त वाळून गेलं होतं. पायाची हालचाल झाली तसा स्सss आवाज करत त्याने पोटाशी दुमडलेले पाय आणखी घट्ट दाबून धरले. त्याची दयनीय अवस्था बघून निलेश मनापासून कळवळला, प्रशांत निलेश सोबत नजर मिळवणं टाळत होता. निलेशने पुढे होत त्याची बॅग उचलून खांद्याला लावली, तो निलेशकडे बघणंही टाळत असला तरी त्याच्या डाव्या दंडाला पकडून निलेशने त्याला उठवलं, तोच हात त्याच्या गळ्याभोवती घालून घेऊन त्याला चालायला आधार दिला.


यू हॅव रीच्ड भाग ५

हे आताशा वारंवार होऊ लागलं होतं, अस्वस्थ वाटणं, छातीवर मोठ्ठा दगड ठेवून वरून कोणी तरी दाबल्यासारखं वाटणं, घसा अतोनात कोरडा पडणं आणि या अटॅक मधून बाहेर पडण्यासाठी फक्त कैलास मध्ये जावं वाटणं. कैलास मध्ये गेल्यावर अचानक अगदी जादू केल्यासारखं बरं वाटणं. हे त्याला आता विचित्र वाटू लागलं होतं. मनातून एक अनामिक भीती दाटू लागली होती. म्हणजे स्मशानाबद्दल कोणत्याही सर्वसामान्य माणसाला वाटत असलेली नैसर्गिक भीती त्याच्या मनातून केव्हाच गळून पडली होती पण आपल्याला सतत स्मशानात जावसं वाटतं, ते आकर्षण वाढतंच चाललंय, कितीही विचार केला तरी हे असं का होतंय हे लक्षात न येणं याची भीती वाटू लागली होती त्याला. पण त्या भीतीपेक्षा स्मशानात जाऊन बसण्याच्या ओढीची तीव्रता खूप जास्तं होती. रोजंच आज कैलास मध्ये जाणं टाळायचंच असं ठाम ठरवूनंही तो कैलास मध्ये जात होता. नुसता जात नव्हता तर तिथे तास न् तास घालवत होता. तिथे बसणं हे मेडीटेशन पेक्षाही त्याची दैनंदिन गरज होऊन गेलं होतं. जिवंतपणीच काय तर अगदी धडधाकट असताना स्मशान आपली दैनंदिन गरज झालंय हा विचार डोक्यात आल्यावर क्षणार्धात भीतीची थंड लाट तळपायापासून मेंदूपर्यंत उसळायची त्याच्या. सर्वांगातलं रक्त बर्फासारखं थंऽड झालंय आणि आपण एका जागी गोठून गेलोय, आता कसलीही हालचाल करणं शक्य नाही असं वाटायचं. सर्व शक्ती एकवटून तो जागचा हलायचा प्रयत्न करायचा अन त्यात यश मिळेपर्यंत पहाटेच्या वेळी पाना फुलावर दव जमावं तसा त्याच्या पूर्णांगावर थंडगार घामाचा घट्ट थर जमा झालेला असायचा. कैलासला पोहोचता पोहोचता आत्ताही तसंच झालं, धोधो पावसात चिंब भिजत तो कैलासच्या दारात येऊन थबकला आणि आत जाणं ही आपली मानसिक गरज आहे जाणवून त्याच्या छातीवरचं दडपण वाढलं, घसा कोरडा ठाक पडला, पायांना खिळे ठोकल्यासारखे पाय जागचे हलेनात, नखशिखांत भिजलेल्या अवस्थेतंही त्याला दरदरुन घाम सुटलाय असं वाटू लागलं, छातीत घण मारल्यासारखी धडधड वाढली. तो महत्प्रयासानं पाय जवळपास खुरडतंच मुख्य गेटाकडे चालू लागला. प्रत्येक पावलागणी छातीतली धडधड एवढी वाढली कि कोणत्याही क्षणी छाती बॉम्बसारखी फुटून ह्रदय बाहेर उडेल असं वाटू लागलं. हे सगळं सहन करत तो कसाबसा नीलाच्या गारीपर्यंत जाऊन पोहोचला. सगळ्यात आधी त्याचा घसा जादूची कांडी फिरवल्यासारखा पूर्ववत झाला, छातीचा भाता नियमित लयीमध्ये वर खाली होऊ लागला, छातीवरचं मणामणाचं ओझं हवेत कापूर उडून जावा असं नाहीसं झालं. तो शांतपणे खाली बसतो न बसतो एवढ्यात त्याच्या लक्षात आलं सर्वांगं पावसाच्या पाण्यानं भिजूनंही घाम सुटल्यामुळे त्याला इतकावेळ गार वाटत नव्हतं पण त्याची अवस्था पूर्ववत होताच अंगात मुरणारा घाम, पावसाचं पाणी आणि स्मशानात सुटलेल्या बोचऱ्या वाऱ्यामुळे तो थंडीने अक्षरश: कुडकुडू लागला.

 

कुठे बसता येईल याचा अंदाज घेण्यासाठी त्याने आजूबाजूला पाहीलंकुठे आडोसा दिसेना. नेहमीच्या पारावर बसावं तर पाऊस आडवा तिडवा पडत होतात्या अजस्त्र वडाखालीही पाऊस लागलाच असता. हा आटापिटा कोरडं राहण्यासाठी तर नव्हताचकारण तो आधीच ओलाचिंब झालेला होता. फक्त कुडकुडत असताना अजून धोधो पाऊस त्याला अंगावर झेलायचा नव्हता. दिवसभराचा मानसिक तणावदिवसभर पोटात अन्नांचा कण नाहीनाही म्हणायला मगाशी एक कप कि दोन कप प्यायलेला चहा आणि गेला पाऊण तास धोधो पावसात भिजत तुडवलेला रस्ता यामुळे तो थकला होता. शारिरीक थकव्यापेक्षा विचारांनी त्याची मानसिक परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. आता त्याला त्या पावसात उभं राहवेनाबटन दाबावं आणि कुठला तरी आडोसा मिळावा किंवा तयार व्हावा असं त्याला वाटू लागलं. मागचा पुढचा विचार न करता तो समोरच्या शेड खाली जाऊन उभारला. निम्म्याच्यावर. जळलेली एक चिता तिथे भकाभक धूर ओकत ठराविक वेळेत  पूर्ण जळून राख व्हायचं टार्गेट मिळाल्या सारखं घाईघाईत जळत होती. डोक्यावर पत्रा आणि चारी बाजूने मोकळी अशी शेडत्यातून आत येणारा पाऊस आणि सुयांसारखा बोचणारा वारा. साला वारा तर थांबणार नव्हता पण किमान पावसाचा कमीत कमी मारा लागावा म्हणून तो जास्तीत जास्त मधल्या बाजूला सरकला.

 

मागल्या वेळी चितेची उब मिळवायच्या फक्त विचाराने त्याला धडकी भरली होतीकैलास मधून तो जीवाच्या आकांताने बाहेर पळाला होता. आज मात्र त्याला काहीही झालं तरी कैलास मध्येच थांबावं वाटत होतं आणि चमत्कारीक रीत्या तो जसजसा चितेच्या आणखी जवळ जात होता तसतसं वाढणाऱ्या उबेमुळे त्याला बरं वाटत होतं. आज चितेची शेकोटी करायचं त्याच्या मनात आलं नसलं तरीही आपसूक तेच झाल्यानं त्याला फार बरं वाटत होतं. हळूहळू त्याने आकसून घेतलेलं अंग मोकळं सोडलंत्याच्या देहबोलीतला अवघडलेपणा कमी कमी होत पूर्ण गेला आणि चक्क त्या चितेकडे चेहरा करुन तो चितेच्या जेवढ्या जवळ बसता येईल तेवढ्या जवळ जाऊन तो बसला. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून त्याने आपोआपंच हात पुढे करत ज्वाळांवर शेकलेत्याच्या शरीराची पुढची बाजू बऱ्यापैकी कोरडी झालीमग त्याने बसल्या जागेवर फिरुन ज्वाळांकडे पाठ केली. जवळपास सगळे कपडे पूर्ण कोरडे झाल्यावर त्याचे पाय दुखतायेततळपायाला काहीतरी बोचतंय असं त्याला जाणवलं. पायाकडे बघितलं तर त्याला काही कळेनापरत गोल फिरत त्याने ज्वाळांकडे चेहरा केला. त्या उजेडात बघितलं तर तळपायातून रक्त येत होतंपाय चिखलात बरबटलेले होतेजखमा नेमक्या कुठे झाल्यात याचा त्याला अंदाजंच येईना. पाय धुतल्या शिवाय ते कळणंही शक्य नव्हतं. मोठ्या प्रयत्नाने सगळे कपडे कोरडे झाले होते आणि आता परत त्या शेडमधून बाहेर जाऊन पूर्ण भिजत पाय धुवायचं त्याच्या जीवावर आलं होतं. बसल्या जागचा न उठता तो तसाच बुड जमिनीवर घसरत घसरतखरंतर अक्षरशः खुरडत शेडच्या कोपऱ्यापर्यंत गेला. शेडमधून पाय बाहेर काढत पडत्या पावसात त्याने जमेल तसे पाय धुतले. परत जागेवर येत पाय ज्वाळांवर कोरडे केले आणि त्याच्या या वागण्याची त्याला भयानक लाज वाटलीस्वतःची घृणा वाटू लागली. तो चटकन जागचा उठलात्याच्या अंगावर सर्रकन् काटा आला.

 


दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...