ओ तुम्हीच हो हो तुम्हीच
मगाशी नाही का हाॅटेलात
खाल्लीत पावभाजी...
२० रुपयाच्या प्लेटसाठी
मोजले शे-दिडशे
चौघांचे पाच-सातशे
मग बिलाबरोबर आलेली
बडीशेप
बकना भरुन खाल्लीत
तरी थोडी उरलीच मागं
आयला पैसे वसूल करायचे
म्हणून
बांधून घेतलीत ती
टिश्श्यू पेपरमध्ये
परवा पण नाही का
आयनाॅक्समध्ये लाह्या
घेतल्यात
दोनशे रुपयांना
आणि तोटरा बसतो म्हणून
फुलपात्रभर कोक घेतलात
कागदाच्या कपात
रोख दिडशे मोजून
स्ट्राॅचा फुर्र फुर्र
आवाज होईस्तवर
ओढलंत जीव खाऊन
कोल्ड्रींक
निघण्याआधी घासलंत कार्ड
बिल भरायला
खिशात कार्डाची थप्पी नीट
जपत तुम्हीच म्हणाला होता नोटाबंदीच्या वेळी
जरा सोसा की कळ देशासाठी
तिच्यायला
चौकातल्या भाजीवाल्याकडं
थांबून
गाडीची काच खाली केलीत
बटन दाबून
म्हणलात सुकून गेलीये पार
भाजी
पिशवी भरुन घेताना
हक्कानं सांगितलंत
सव्वा दोनशे नाही दोनशेच
देईन
शंभराच्या दोन नोटा
त्याच्या हातात
कोंबून निघत असताना
रस्त्याच्या कडेला
फाटक्या पुस्तकात
डोकं घालून बसलेलं त्याचं
पोरगं चोरुन बघत होतं
काचा वर करुन एसीत
बसलेल्या
तुमच्या पोराच्या
हातातल्या खेळण्याकडं
तुम्ही गाडी चालू करता
करता म्हणालात बायकोला
भाजीपाला काय महाग झालाय
बायको म्हणाली तरी
तुरीसाठी
बोंब मारतायेत साले
सकाळी साडे आठ वाजता
आॅफिसमध्ये पोचताच म्हणालात
ए अरे तो एसी बावीसवर कर, कोण चुत्या वाढवतं रे टेमपरेचर
संध्याकाळी कार काढताना
पंधरा सेकंद काचा खाली
घेयचा सोपस्कार पार पाडत वाढवलात एसीचा ब्लोअर
पुटपुटलात स्वतःशीच काय
उन्हाळाय च्यायला
रेडीओवर आरजे प्रसिद्ध
क्रिमिनल लाॅ़यरला (?) विचारत होती
शेतक-यांनी संप का केलाय?
लाॅयर म्हणाला त्यांना
क़र्ज़माफ़ी पाहिजे म्हणून
तुम्ही कुत्सितपणे हसून
स्टेशन बदललंत
पलिकडच्या स्टेशनावर
बादशाह म्हणत होता
जानूsss आज रात का सीन बना ले
तुम्ही स्टेअरींगवर ठेका
धरलात
तुम्ही... झालंच तर
अप्रेझलच्या मिटींगमध्ये
बसलात आडून अॅडीशनल २.५%
पगारवाढीसाठी
म्हणालात, सर परवडत नाही
वर्षभर खपून काम केल्यावर
फक्त ८% पगारवाढ
राजीनामा देईन म्हणालात
निक्षून
वाढीव अडीच टक्के पदरात
पाडून घेऊन
मग घरी आलात जेत्याच्या
आविर्भावात
टिव्हीवर लावल्यात
बातम्या पोट भरुन जेवण झाल्यावर
चोवीस तास बातम्यांचं दळण
पाडणारं एक च्यानंल सांगत होतं
शेतक-यांच्या संपाचा आज
पहिला दिवस...
बळीराजानं आक्रमक होत दूध
भाजीपाला ओतला रस्त्यावर
तुम्ही डायनिंग टेबलवरची
मगासची भाजीची पिशवी फ्रिजमध्ये ठेवलीत
बायकोला म्हणालात बरं
झालं मगाशीच घेतली आठवडाभराची
हाॅटेलात थेटरात आॅफिसात
अन झालंच तर कोप-यावरच्या फाटक्या भाजीवाल्याकडं तुमचे पैसे वसूल झाल्याचं समाधान
चेह-यावर मिरवत
परत येऊन सोफ्यावर बसत
फ़ेसबुक चालू केलंत
स्टेटसमध्ये लिहिलंत
"हा खरंच संप आहे का? अन्नाची नासाडी
करणारा माजोर्डा अन्नदाता असूच शकत नाही... ह्याशट्याग माजलेत साले...
केपी आर