आम्ही लहानपणी
आमच्या गल्लीत म्हणजे रस्त्यावर क्रिकेट खेळायचो. खूप मजा येयची.. कधी एका
चाळीच्या घराबाहेर कंपाउंड वॉलवर स्टंप आखून किंवा लाकडाची चौकट लावून तिथे बॅट्समन
उभा रहायचा, चाळीसमोरचं अंगण,
रस्ता सोडून पलिकडे बोलर उभा रहायचा तर कधी
तिरके स्टंप लाऊन पिंपळगावकरांच्या गुलमोहराच्या झाडापाशी नॉन स्ट्रायकर एंड. नंतर
नंतर रस्त्याला समांतर पिच असायचं. गोसाव्यांचं घर आणि पारख्यांच्या घराच्या मधोमध
लाकडी चौकट मांडून स्टंप बनवायचो, शिंद्यांच्या
दारात नॉन स्ट्रायकर एंड असायचा. किमान साताठ वर्ष असं वेगवेगळ्या ठिकाणी स्टंप
लाऊन क्रिकेट खेळलो. वेगवेगळ्या ठिकाणी नियम बदलत गेले कायमंच. भन्नाटंच असायचे
नियम
१) रस्त्याच्या
अलिकडे नो रन
२) एक टप्पा आऊट
३) रनवारी
(म्हणजे रन प्रमाणे) पहिला
४) जोरात मारला
तर आऊट
५) जोरात टाकला
तर नो बॉल
६) ऑन साईडला नो
रन
७) मग नंतर नंतर
पळून नो रन... ओन्ली फोर अँड सिक्स
(चाळीतल्या सगळ्या
घरांच्या कंपाउंड वॉल एका लाईनीत असायच्या)
८) समोरच्या
कोणाच्याही भिंतीला डायरेक्ट बॉल लागला की सिक्स, टप्पा पडून लागला तर फोर
९) शिंद्यांच्या
पत्र्यावरुन बॉल मागे गेला तर आऊट
१०) मग आडवं
खेळताना, कडेकरांच्या घरापुढे
किंवा पिंपळगावकरांच्या झाडापुढे पळून रन अलाऊड
११) मागे नो रन्स
१२) शिंद्यांच्या
कंपाउंडमधे डायरेक्ट मारला तर दोन रन... बाकी कोणाच्याही दारात गेला तर पळून काढाल
तेवढे
१३) शिंद्यांच्या
घरात जो बॉल मारेल त्यानीच जाऊन आणायचा
१४) सुळ्यांच्या
पत्र्यावर दोन रन
१५) चंद्रूच्या
दारातल्या खांबापुढे फोर सिक्स
१६) पहिले..
झाडातून बॉल घरंगळत आला आणि कॅच घेतला तरी आऊट... मग नाय रे तो तर टप्पा असतोय...
नॉट आऊट
१७) लास्ट मॅनला
बॅटींग मिळायची... मग लास्ट मॅनला नो बॅटींग
१८) पवारांच्या
झाडापुढे सिक्स
१९) मागच्या
चाळीत मारणारा आऊट
२०) एकदा तर
नासीर रन काढताना हातातून बॅट निसटून स्टंपवर पडली तरी हिट विकेट म्हणून आऊट दिला
होता त्याला
फोर सिक्सच्या
जागा बदलत गेल्या... एक टप्पा आऊट काळाच्या पडद्याआड गेलं... पळून रन काढायचे नियम
बदलले.... वाईड देणं न देण्यावर वाद झाले... दोन रन डिक्लेअर करायच्या जागा
बदलल्या... हळूहळू रस्त्यावर क्रिकेट खेळणं सुद्धा बंद झालं. आता तिथं चालतासुद्धा
येणार नाही एवढी गाड्यांची गर्दी असते.
पण मूळ मुद्दा
काय तर खेळाचे नियम कायम बदलत राहीले... पण किमान दोन-चार महिने तरी एक नियम कायम
असायचा... आजूबाजूच्या परिस्थितीनुसार नियमात बऱ्याच काळानं बदल होयचे... कोणाला
तरी हुक्की आली आणि रातोरात नियम बदलला काल पर्यंत पत्र्यावर मारल्यावर सिक्स आणि
आज अचानक पत्र्यावर मारल्यावर आऊट असं नाही झालं कधी... झाडाच्या अलिकडे कोणी पळून
रन नाही काढले...रनवारी पहिला असताना कमी रन करणाऱ्याला पहिली बॅटींग नाही मिळाली
आणि सहा ओव्हरची मॅच असताना अचानक तिसऱ्या ओव्हरनंतर कोण असं नाही म्हणालं की आता
ही शेवटची ओव्हर, काय रन करायचे ते
या ओव्हरमधे कराल तर जिंकलात नाहीतर हारलात...
मॅच चालू
झाल्यापासून मॅच संपेपर्यंत तरी कोणी नियम बदलले नाहीत... सगळ्यांना नियम सारखे...
एकसमान... कोणीही शब्द फिरवला नाही...
आयला
नोटाबंदीपेक्षा तर आमचं गल्लीतलं क्रिकेट चांगलं होतं
साताठ वर्षात
जेवढे नियम आम्ही गल्लीत क्रिकेट खेळताना बदलले त्याच्या हजारपट नियम दिड महिन्यात
या सरकारनं नोटांबद्दल बदललेत...
खेळणं बंद होऊन
आता किमान अठरा एकोणीस वर्ष झाली पण नियम तसेच्या तसे आठवतात कारण आली हुक्की
मारली बुक्की या न्यायानं नियम कधी बनवले किंवा बदललेही नाहीत... नोटांचे सगळे
नियम एका दमात सांगूही नाही शकणार आत्ता विचारलंत तरी.
अजून एक विशेष
म्हणजे आम्ही कधी लकी ड्रॉ काढून विजेता नाही ठरवला... काये ना सगळ्यांना माहीती
होतं की आपण गल्लीत का असेना "क्रिकेट" खेळतोय "लॉटरी"
नाही...
मित्रों... इथंतर
सगळं "आली लहरंच" आहे...
केपी आर

No comments:
Post a Comment